मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

मृत्यू असावा तर असा!!

आयुष्यात ब-याच व्यक्ती पाहिल्या..काहींची चरित्रं वाचली.. वर्णनं ऐकली..काहींवर बनलेले सिनेमे पाहिले, सिरीयल्स बघितल्या.. सगळ्यांमधून एकाच संदेश मिळाला. 'जीवन असावं तर असं!' पण परवा पहिल्यांदा असं  वाटलं कि 'मृत्यू असावा तर असा!!'
वीस हजारांचं पोलीस दल, तीन स्पेशल आर सी एफ च्या तुकड्या , वीस एक लाखांचा जनसमुदाय..आणि सार्वजनिक जीवनाला स्वयंघोषित पॉज! इतक्या लोकांना दुखावून एखाद्याला घेऊन जाताना यमानेही दोन क्षण विचार केला असेल.

राजकारण या शब्दाची उकल व्हायला लागण्याच माझं वय होतं तेव्हा या माणसाच्या नावाचा दबदबा होता. नव्हे.. चुकलो! दरारा होता... सेना म्हणजे हाणामारी, कापाकापी, सेना म्हणजे तोडफोड,हातापाई आणि हो मुख्य म्हणजे सेना म्हणजे शिव-सेना असाच सरळ हिशोब होता. त्यामुळे शिवसैनिक (आणि कोकणात सिवसैनिक !!) म्हटला कि कुतूहलापेक्षा भीती जास्त वाटत असे..

मग जशी अक्कल यायला लागली , पेपर पहिल्या पानापासून वाचता येऊ लागले तेव्हा कळलं कि सैनिक करतात ते 'रिमोट कंट्रोल' ने दिलेल्या आदेशावरून.. आणि हेही कळलं कि एका माणसाच्या हाकेवर तमाम महाराष्ट्र उभा राहतो तो असाच नव्हे काही. काहीतरी जादू आहे .. हृदयाला हात घालणारे शब्द आहेत.. मनाला साद घालणारी शैली आहे. विरोधकही नावापुढे 'साहेब' हा शब्द जोडतात म्हणजे काहीतरी आहे..

अशाच एका काळात सच्च्या 'सिव'सैनिकाच्या घरावर हल्ला झाला होता.. एका खुनाला चिथावणी दिल्याच्या संशयावरून. हल्लेकरी विरोधी पक्षातले होते..हल्ल्यानंतर प्रत्यक्ष दर्शींनी सांगितलं कि संपूर्ण घरात तोडफोड करण्यात आली होती.. घरात दोनच गोष्टी सुखरूप राहिल्या होत्या . एक शिवाजी राजांची तसबीर आणि दुसरी साहेबांची!

काळ  पुढे सरकला तसं कळलं कि शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणा-याच्या मनातही या माणसाबद्दल अढी नाही. असला तर तो फक्त आदर! किंबहुना प्रत्येकाचे शिवसेना सोडण्याचे कारणही कधीच शिवसेनाप्रमुख हे नव्हतं. देवस्वरूप मानलं सगळ्यांनी त्यांना.

टीव्ही मधल्या चर्चासत्रातली एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे अंत्ययात्रेसाठी आलेल्या लाखोच्या जनसागराला ना त्यांनी नगरसेवक बनवलं होतं , ना आमदार, ना खासदार..  हे लोक होते ज्यांना त्यांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. प्रत्यक्ष ओळख नसताना त्यांच्यासाठी ढसाढसा रडणारे लोक पहिले तेव्हा त्यांना ' हिंदूहृदयसम्राट' कशासाठी म्हणत त्याच उत्तरही मिळालं!

मराठीपणाचा धोशा लावताना हिंदी आणि इंग्रजीवरची त्यांची पकड तोंडात बोटं घालायला लावणारी होती. अस्खलित  इंग्रजी मध्ये दिलेल्या त्यांच्या मुलाखती ऐकल्या कि 'मराठी माणूस... मराठी माणूस...' चा जाप करणारी व्यक्ती ती हीच का असा प्रश्न पडत असे..मी त्यांचं तरुणपण पाहिलं नाही पण उतरत्या वयात देखील ऐन तारुण्यातल्या घटना ज्या डिटेल्स सहित ते सांगत ते पाहून त्यांच्या तल्लख स्मृतीचं आश्चर्यही वाटत असे.

भारतासारख्या देशातही जातीपलीकडे जाऊन राजकारण करता येतं हे तमाम राजकारण्यांना आणि जनतेला या व्यक्तीने पहिल्यांदा शिकवलं. अमुक एक समाजाचा नेता हे समीकरण त्यांच्या कारकिर्दीत कधीच दिसलं नाही. जो जिथे काम करतो त्याला तिथे संधी मिळणार तिकीट मिळणार असा सरळसोट आणि रास्त हिशोब दिसत असे.. त्यांची बरीचशी विधानं हि जनसामान्यांच्या मनातली होती आणि त्यामुळे आपलेपणाची वाटणारीही होती. असो..त्यांचा राजकारण,समाजकारण आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरंच काही छापून  येत आहे, येत राहील,आणि माझी समजही नसेल त्याबद्दल लिहिण्याची कदाचित....

तरीपण..

यापुढे जेव्हा जेव्हा  कोणी "माझ्या बंधुंनो , भगिनींनो आणि मातांनो " अशी साद देईल....
जेव्हा जेव्हा कोणाचा रुद्राक्षांच्या माळेत गुरफटलेला हात हवेत जाईल...
कमरेवर हात ठेवलेला आणि भगवी शाल पांघरून घेतलेला कोणताही पाठमोरा माणूस जेव्हा जेव्हा दिसेल... किंवा जेव्हा जेव्हा रिमोट-कंट्रोल ,शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट यापैकी एखादा शब्द कानावर पडेल तेव्हा तेव्हा मेंदूमध्ये ज्याची प्रतिमा तयार होईल ती व्यक्ती एकच असेल.. आणि ती ओळखायला कोणत्याही 'विशेषनामा'ची गरज पडणार नाही!!

१३ टिप्पण्या:

  1. अगदी मनातल्या भावना येथे आपण व्यक्त केल्या आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. Hey I know you from engg college and well I am not much familial with you but I know you are very good in terms of literature and writing.What ever you wrote above , I have one word "Awesome" !! Your statements made me cry.
    --- Viresh

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद @gaurav.suryagandh
    खरं बोललास मित्रा @Dinesh!
    आभारी आहे.. @Ninad , @Omkar आणि @Kalandar लिखाण आवडलं हे पाहून आनंद वाटला.. आपल्या सर्वांचे ब्लॉगवर स्वागत !!

    उत्तर द्याहटवा
  4. सर्व मराठीजनांच्या भावना --- तुझ्या एका एका शब्दातून व्यक्त होत आहेत.

    तुझा संपूर्ण लेख हा कौतुकास्पद आहे !!!

    उत्तर द्याहटवा
  5. एकदम छान लेख....!!

    त्यांच्यावर प्रेम करा वा द्वेष त्यांना वगळून महाराष्ट्राचा विचारच होणार नाही.
    खरोखरच मृत्यु असावा तर असा अन केवळ असाच........

    उत्तर द्याहटवा
  6. धन्यवाद अभिषेक पाटील खरं बोललात.
    मी कुणी शिवसैनिक नाही.मी त्यांच्या विचारांचा चाह्ताही नाही...
    मी त्यांना कधी मनापासून सपोर्ट सुद्धा केलेला नाही..
    आणि तरीही या व्यक्तीमत्वाबद्दल एक जिज्ञासा असते.आकर्षण असते. हा लेख लिहिण्यामागची प्रेरणा सुद्धा हीच आहे

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!