मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

ताळेबंद-उरलेला

आंतरजालावरून साभार
ताळेबंद: जमेल तेवढा

आमच्या ऑफिसमध्ये घरभाड्याची पावती आणि प्रवासभत्ता (म्हणजे एल्टीये ) यावर करसवलत मिळते. त्यामुळे सरसकट सगळेच कुठूनतरी पावतीपुस्तक आणून पावत्या तयार करून सबमिट करतात. मीपण तसली एक पावती तयार करून त्यावर स्ट्याम्प तिकीट चिकटवत होतो. एक खोटी सही मारली कि पावती तयार!तेवढ्यात आमच्याच हापिसातला एक नुकताच नोकरीला लागलेला पोरगा येउन विचारतो कसा, "हा करता तो भ्रष्टाचार नाही का?" वरून "राजकारणी त्यांच्या लेवल वर भ्रष्टाचार करतात... तुम्ही तुमच्या!" असंही म्हणून गेला! नेमकं त्याचवेळेला माझ्या जिभेवर तिकीट होतं म्हणून वेळ निभावून नेता आली; नाहीतर त्याला काय प्रत्युत्तर द्यायचं हेच मला कळलं नसतं! एक ज्युनिअर येउन अपमान करून जातो म्हणजे काय? तर असो.

बाकी मला अशा ज्युनिअर्सचा, सुनेला सासुरवास करणाऱ्या सासवांचा, बायकोला मारझोड करणाऱ्या नवऱ्यांचा, शिक्षकांना उलट उत्तरं देणाऱ्या पोरांचा, रस्त्यात हुज्जत घालणाऱ्यांचा, बस मध्ये एका दाराने चढून कंडक्टर पोचायच्या आत  त्याच दाराने  उतरणाऱ्यांचा, तिकीट न काढताच लोकल प्रवास करणाऱ्यांचा, बायका-पोरींशी बिंधास  बोलणाऱ्यांचा, ऑफिसमध्ये बसून ऑफिसच्या वेळातच ऑफिसमधल्या लोकांकडे  ऑफिसमधल्या लोकांच्याच कागाळ्या करणाऱ्यांचा अशा अनेक लोकांचा वेळोवेळी प्रचंड आदर वाटत आला आहे. मानतो बुवा आपण त्यांच्या डेरिंग ला!! तसा मी मधून मधून इतर लोकांमागे जाऊन  (चौकात मामा नाहीये याची परत परत खात्री करून) सिग्नल वगैरे तोडतो परंतु यापेक्षा जास्त बंडखोरी या जन्मात जमेल असं  वाटत नाही. पोलिस कशाला अगदी होमगार्ड लोकांची पण मला दहशत वाटते. लहानपणी तर मी खाकी कपड्यामुळे पोष्टमन लोकांना पण घाबरत असे पण पुढे मोठा झाल्यावर टोपी आणि पोट यावरून मी पोलिस आणि पोष्टमन वेगवेगळे ओळखायला लागलो.

छंद म्हणायला गेलात तर तसा काहीच नाही. लहानपणी नाणी जमवायचा प्रयत्न केलेला आठवतोय पण भारतीय नाणी सोडून इतर देशांची नाणी जमवायची म्हणजे खायचं काम नाही हे लक्षात आल्यावर तो नाद सोडून दिला. मग सोपं पडेल म्हणून काड्यापेट्या जमवायला लागलो. त्या मात्र थोड्याफार जमवल्या. पण मी कोणाला माझ्या छंदाबद्दल सांगितले नव्हते. एकदा आमच्या मातोश्रींनी कचरा समजून सगळ्या काड्यापेट्या एकत्र करून त्याला काडी लावली. मी नसताना! मला ते कळल्यानंतर मी रडून धिंगाणा घातला होता. पुढे मोठा झाल्यावर बायोडाटा मध्ये कोणाचं तरी बघून मी 'लिसनिंग म्युझिक' असा छंद लिहायचो. पहिल्याच मुलाखतीत कुठल्या पद्धतीचं संगीत आवडतं ? आणि आवडते संगीतकार कोण वगैरे अवघड असे प्रश्न त्या छंदामुळे पडल्यामुळे माझी विकेट  पडली होती. ताबडतोबीने छंद बदलून मी "रिडिंग" करून टाकला! त्यापुढच्या इंटरव्यूत विचारल्या गेलेल्या "काय वाचायला आवडतं ?"  या  प्रश्नाचं माझं "पेपर" हे उत्तर ऐकून प्रश्नकर्ता गडबडल्याचं  आठवतंय!

व्यसन म्हणायला गेलात तर वडील पैसे देत होते तेव्हा बरीच केली.. 'जे मला पाहिजे ते मी मिळवतोच' ह्या जाहिरातीतल्या खोट्या आवेशापाई मी बरेच दिवस ब्रिस्टल ओढ़त असे.. नंतर मी पैसे कमवायला लागल्यावर फोर स्केअर वर आलो.. लग्न झाल्यावर मात्र व्यसन न करण्याचं व्यसन लागलं.. जेमतेम घरखर्च चालवू शकेन इतपत नोकरी मिळाल्यावर काही महिन्यातच स्थळ सांगून आलं. हे मुला मुलींनी बाहेर भेटायचं फ्याड मला तितकसं पसंत नव्हतं परंतु दोन्ही पार्ट्यां कडून आपण कसे एडवान्स आहोत हे दाखवायची स्पर्धा असल्याने ही नौबत आली होती.. शिवम हॉटेल ही इडली डोसा चापायची आणि सांबर ओरपायची जागा. भविष्याचे आराखडे हे रूपाली-वैशालीत बांधायचे या माझ्या मताला कोणी कसपटाची किंमत दिली नव्हती! "उलट त्या पोरीनेच सुचवलं आहे-थोडं स्वस्त.. थोड़े पैसे वाचवायला शिक.." असं सुनवण्यात आलं. 

मी थोडा भाव खायचा म्हणून उशिराच पोचलो तरी तिचा पत्ता नव्हता. मग काहीतरी चाळा पाहिजे म्हणून एक गुडनगरम मारली तेवढ्यात ती आली..  तिने मला ऑर्कुटवर पाहिलेलं  होतं त्यामुळे ओळखलं,  मी पण तिचा फोटो आधी बघितल्यामुळे(च) तिला ओळखलं. (हिच्या ऑर्कुटवर करीना कपूरचा फोटो लावला होता!) ती माझ्या दिशेने आली आणि हाय हॅलो च्या आधी तिने
"शी बाई हा वास कसला? तुम्ही सिग्रेट पिता की काय?" असा  प्रश्न केला!
कोणतीही मुलगी हे असं डायरेक् विचारू शकते हे मला माहीत नव्हतं..आणि "मुलगा सुस्थापित - निर्व्यसनी" अशी माझी धड़धड़ित खोटी जाहिरात केली गेली होती हे मला मुलीकडून कळलं! 
"आं.. नाही मी ते आपलं हॉल्स आणायला गेलो होतो.. तेव्हा एक मित्र भेटला तो सुट्टा मारत-म्हणजे ते फुकत-आपलं ते हे-सिगरेट ओढ़त होता आणि ते म्हणतात ना.. धूर…  धुर माझ्यावर सोडत होता.." उजव्या हाताची दोन बोटं ओठांसमोर हलवून मी तिला एक्सप्लेनेशन देत होतो आणि डाव्या हातातल्या दोन हॉल्स तिला देत होतो. 
" तेच म्हटलं, मला तर सांगितलं होतं की सुपारीच्या खांडाचंपण व्यसन नाही मुलाला.. मला हा सिग्रेटच्या धुराचा वास अजिबात सहन होत नाही.. लग्नानंतर तुम्ही असल्या मित्रांची संगत सोडाल तरच बोलू आपण पुढे!" आयुष्यात एक गोष्ट मी  स्वत:च्या मताने करत होतो ती पण आता सोडली पाहिजे! 'नाय' म्हटलं तर "मी फुकतो" याची जाहिरात होणार आणि पोरगी स्वतःहुन पटेल असं दाखवण्यासारखं माझ्याकडे काहीही नव्हतं आणि नाही! शाळा कॉलेजात " आपल्याला काय इंट्रेस्ट नाय रे पोरींबिरित! " असं सांगून पोरगी न पटण्याचं शल्य दोघाचौघात जाहिरपणे लपवता येत असे पण आयुष्याच्या शाळेत,आपल्याला फोटो बघून पसंत केलेलं असताना, निव्वळ सिगरेटीच्या मोहापायी आपण ते नाकारावे याची मला हिंमत होईना. पुढचा तास भर तिने माझा इण्टरव्यू घेतला आणि मी आयुष्यभर तिच्या ताटा खालचं मांजर बनून राहू शकतो याची तिने खात्री केल्यावर मी आमचं दोघांचं बिल भरलं.

असो. यथावकाश (वशिल्याने का होईना) नोकरी मिळाली, छोकरी मिळाली आणि छोकरी झाली सुद्धा! तशी ती होईपर्यंत लहान पोरं मला कधीच आवडली नाहीत. मी स्वतः लहान असेपर्यंत "मुले हि देवाघरची फुले" हे वाक्य मला आवडत असे पण मोठा झाल्यावर आणि नातेवाईकांची वगैरे खरोखरीची मुले बघितल्यानंतर वरचे वाक्य साफ खोटे आहे यावर माझा पक्का विश्वास बसला. कोणाच्याही घरी लहान मुल असले आणि मी काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर साधारण ९० टक्के वेळ हा त्या लहान पोराचं/पोरीचं कौतुक ऐकण्यात जातो! त्यात त्या लहानग्याने दाराची कडी कशी लावून घेतली इथपासून टीव्हीचा रिमोट कसा लपवून ठेवला इथपर्यंत सगळ्याचा समावेश असतो.
लहान मुलांनी चष्मा तोडला-कौतुक  ; मोठी चप्पल घातली आणि धडपडली-कौतुक ; घाणेरड्या पायाने गादीवर/सोफ्यावर चढून उडी मारली -कौतुक; पिठाचा डबा सांडला-कौतुक; झोपलेल्या माणसाची मिशी/शेंडी ओढली- कौतुक आणि वरून कित्ती लब्बाड माझं पिल्लू चं पालुपद! वास्तविक पाहता याच गोष्टी जर कुणा मोठ्याने केल्या तर त्याला अद्वातद्वा बोलणाऱ्यांना लहानाने केल्यावर त्याचं काहीच वाटत नाही हे विशेष! !

लग्नानंतर एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. म्हणजे त्याने बोलावलेलं मुलाच्या महिन्याभरानंतर केलेल्या बारशाला, पण स्पष्ट सांगायचं तर मी जेवणाच्या वेळेच्या जरा आधीच जातो. लग्न , मुंजी, वाढदिवस बारशी या सगळ्यात जेवण हाच मुख्य कार्यक्रम असतो.. तर फ्लेक्स वर आधीच छापून आणलेले आणि भिंती आणि पाळण्यावर लटकवलेले नाव बाळाला ठेवण्याचा औपचारिक कार्यक्रम आटपल्यावर आमच्या बायकोने त्याच्या गळ्याच्या शिरा ताणून रडणाऱ्या लहान म्हंजे अगदीच इतकुश्या मुलाला खेळवायला सुरुवात केली. तेवढ्यात मित्राच्या बायकोने तिला हाक मारली तर तिने ते लटांबर (दुपट्या बीपट्या  सकट) माझ्याकडे सोपवलं आणि आत गेली. त्या गोळ्याने रडणं थांबवून जरावेळ माझं निरीक्षण केलं. तोंडातून थुंकी काढून दाखवणे, फुर्रर्र करणे वगैरे शक्य तितके किळसवाणे प्रकार केले आणि एकदम हातपाय हलवायचे थांबला! मला माझं पोट गरम होत जातंय असं  जाणवलं आणि झटक्यात शर्ट ओलेते झाले! मी गडबडून बायकोला हाक मारली. तर तिने येउन "अग्गोबाई, थांब्ला कि रडायचा" वगैरे म्हणून त्या मूढ मंद गोळ्याचंच कौतुक करायला सुरवात केली! वरून मित्राच्या बायकोला बोलावून तिच्या पोराने माझ्या पोटावर फार मोठ्ठा पराक्रम गाजवला आहे अशा पद्धतीने तिला काहीबाही सांगू लागली. माझी अवस्था काय झाली म्हणून सांगू तुम्हाला! एकदा का पाणी कपड्यांच्या आतून पोटाच्या खाली उतरलं कि मग तुम्ही कोणाचे राहत नाही हे काय मी सांगायला हवं? असो! मित्र फिदीफिदी हसत इतरांना त्याचं पोर नेमकं ऑफिसला जायच्या वेळी त्याचे कपडे कसं भिजवतं जे कौतुकाने सांगत बसला.. वहिनींनी मित्राचे शर्ट प्यांट ऑफर केले खरे पण "प्रॉब्लेम बाहेरच्या कपड्यात नाहीये" हे चारचौघात सांगण्याचं अवसान मी काही जमवू शकलो नव्हतो! माझ्या भिडस्तपणामुळे हापिसात मला इतरांना माझंच  काम समजावून सांगत येत नाही, अहो साधं सलून वाल्याला केस कसे कापून हवे आहेत ते सांगता येत नाही. तर इतर कोणाच्या बायकोला एवढ्या अवघड गोष्टी कशा काय सांगणार? दुर्दैव म्हणजे या लहान कार्ट्याना कसा कोण जाणे पण मी आवडतो नाहीतर आईशिवाय कोणाकडेही गेल्यास कर्कश्श आवाजात भोकाड पसरणारी कार्टी माझ्याकडे शांत कशी काय राहिली असती? आमच्या मुलीच्या बाबतीत मी मात्र असं  काही करत नाही. माफक लाड करतो म्हणा.. पण ते वेगळं! आमची पोरगी या बाकीच्या कार्ट्यांसारखी नाहीये मुळी!!

बाकी तसा माझा हा भिडस्तपणा 'झाकली मुठ' सुद्धा ठरला आहे म्हणा! सासुरवाडीला गप्प बसून राहण्यामुळे काही अनपेक्षित गोष्टी पदरात पडल्या आहेत. हापिसात नेमाने दिवाळीला सलग सुट्ट्या मिळत आहेत. सासुरवाडीला पहिल्या दिवाळसणाला अंगठी दिल्यावर मी गप्प बसून राह्यलो तर सासर्च्यांनी 'मी नाराज आहे' असा अर्थ लावून चेन दिली. तरी मी गप्पच बसलो. बायकोने 'ते तस्सेच  आहेत' असं  सांगितलं नसतं तर अजून काहीतरी मिळालं असतं.  पण असो.. थोडक्यात सुख महत्वाचे! माझ्या मागे दागिने करून द्यायला तगादा लावणारी ही मला काही मिळतंय म्हटल्यावर नको म्हणते याचीच मला कमाल वाटली होती!

तर दागिन्यांनंतर आमच्या बायकोला (आणि त्यामुळे मला) कसलं कौतुक असेल तर सिनेमाचं. प्रत्यक्षात तर हिरो वाट्याला आला नाही तर निदान पडद्यावर बघून खुश होऊ हा हेतू असावा तिचा; पण माझी जाम गोची होते. मी एवढा इन्व्हॉल्व्ह होऊन जातो की विचारू नका.. पडद्यावर अमिताबच्चन (हे असंच म्हणतात ना?) ने रडण्यासाठी डोळे लाल केले कि माझ्या डोळ्यातून टीपं गळायला लागतात, कुठल्या सस्पेन्स सिनेमात दरवाजा करकरला कि माझी हवा टाईट होते, कोणी मारामारी करायला लागलं की उसना जोश चढतो! घरात टीव्ही वर पण बातम्या वगळता काही चालू असलं की माझं असं होतं. कितीही कंट्रोल करायचं म्हटलं तरी त्या हिरो च्या जागी स्वतःला बसवल्याशिवाय माझं सिनेमा बघणं पूर्ण होत नाही.  नवीन लग्न झाल्या झाल्या आमची ही 'चला न, पिच्चर्ला जावया' म्हणायची आणि आम्ही जायचो सुद्धा!! पण नंतर एकदा 'धूम थ्री' सिनेमा बघून आम्ही आमच्या हिरो होंडा सी-डी हंड्रेडवरून घरी आलो आणि त्यानंतर तिने परत कधी सिनेमाला जाण्याचा लकडा लावला नाही. का कोण जाणे! मग आम्ही सुद्धा कधी सिनेमा बघायला थेट थेटरात गेलो नाही! हल्ली त्या मैत्रिणी मैत्रिणी मिळूनच जातात. आपला त्याला सुद्धा आक्षेप नाही.. 

तर असं आपला अगदी आत्ताआत्तापर्यंत चा जीवनप्रवास.. जाम म्हणजे जाम बोर. पण लहानपणापासून  लाईफमध्ये तसं पब्लिकला खुलवून खुलवून सांगण्यासारखं काही घडलंच नाही. म्हटलं तर आताच्या तुलनेत गरिबी होती पण माझ्या बरोबरीचे सगळेच तसे होते तर माझ्याच गरिबीचं काय म्हणून मार्केटिंग करणार? 'चालत 4 किलोमीटर शाळेत जात असे' म्हणावं तर माझ्या शाळेतली सगळीच तशी येत असत! आणि शाळा जितकी आवडली नाही तितका जास्त मला तो जाण्यायेण्याचा प्रवास आवडत असे..लहानपणी 'मिणमिणत्या बल्बच्या उजेडात अभ्यास करत असे' म्हणावं तर झगझगीत ट्यूबच्या उजेडात अभ्यास करून मी जीवनात काय असा उजेड पाडणार होतो? माझ्या आयुष्यात घडलेले प्रसंग कित्येकांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने घडलेच असतील पण म्हणून काय मी आत्मचरित्रच लिहायचं नाही काय?

तसं तिशीत गेल्यावर असलं काहीतरी लिहिणं हे अतीच होतं पण मला आताच लहानपणीचे किस्से अंधुक आठवतात तर आत्मचरित्र लिहीणाऱ्या  महान लोकांना सत्तर-ऐंशीव्या वर्षी त्यांच्या बालपणातले प्रसंग जशेच्या तशे कशे काय आठवतात कोण जाणे. आता तसाही महान बिहान होण्याचा माझा चान्स एव्हाना संपल्यातच जमा आहे.. पदरात (बायको आणि बायकोच्या पदरात ) मुलगी आहे. त्यामुळे अगदी काही असामान्य करायचा विचार जरी आला तरी परिस्थितीची जाणीव  कर्तृत्वाला लगाम घालते.. (वा वा! क्या बात है! असली वाक्य ऐकायला बरी वाटतात आणि मला कधी कधी सुचतात याचपण माझं मलाच कौतुक वाटतं.) म्हणून म्हटलं, आठवतंय तेवढं लिहून काढावं. अगदीच चरित्र लिहायचं झालं तर मूळ साचा तयार असावा! त्यातल्याच काही गोष्टी मीठमसाला लावून अजून रंजक करून टाकता येतील. मला उपयोगाला नाही आलं तरी इतरांना-त्यांच्या आत्मचरित्रात!

थोडक्यात एखाद्या सामान्य माणसाचा या वयापर्यन्तचा ताळेबंद थोडाबहुत असाच असेल. आतापर्यंत आयुष्यात जे जे घडलं आहे त्यातलं एवढंच लक्षात आहे त्यामुळे डायरेक 'संपलं' असं म्हणण्यापेक्षा एखाद्या साहित्यिकासारखं 'आटोपतं घेतो'! धन्यवाद...