सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

निरुत्तर

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून हनुमान टेकडीकडे म्हणजे मी राहायचो तिकडे जायचं म्हणजे चालत अवघं वीस-पंचवीस मिनिटांचं अंतर.. पण संध्याकाळी मला तेही नको वाटायचं. म्हणून मी ३०१ क्रमांकाच्या बसची वाट बघत थांबायचो..रांगेतून बस मध्ये चढायचं सुख मुंबईत अनुभवता येतं... ती मजा पुण्यात नाही! मुंबईत कितीही गर्दी असली तरी लोक रांगेतूनच चढणार. बस भरली कि गुपचूप पुढच्या बसची वाट बघत उभे राहणार.. पुढची बससुद्धा आज्ञाधारक असल्याप्रमाणे कोणताही दगाफटका न करता १० मिनिटात येणार आणि पुन्हा हे चक्र चालत राहणार. मला कोण कौतुक वाटायचं या सगळ्याचं! अर्ध्या रस्त्यावर येवून थांबणारे लोक नाहीत... बस थांब्याच्या पुढे फर्लांगभर अंतरावर बस थांबवणारे उन्मत्त ड्रायव्हर्स नाहीत..गुळाच्या ढेपेला झोंबणा-या मुंगळ्यान्सारखी दरवाजाशी झटापट करणारी बेशिस्त गर्दी नाही कि कोलमडलेल वेळापत्रक नाही. सगळं कसं शिस्तबद्ध आणि सुरळीत!

मी विचारात असतानाच बस आली आणि माझा नंबरही आला..मी बसमध्ये चढणार तोच एक युवती अचानक प्रकट झाली आणि मला बाजूला ढकलत बसमध्ये चढू लागली.. आता तरुण पोरीने धक्का दिला म्हटल्यावर माझ्यासारख्याचा तोल ढळणं स्वाभाविकच  आहे नाही का? मी आधारासाठी काहीतरी धरलं.. ते काहीतरी म्हणजे तिची ओढणी होती हे माझ्या लक्षात येईपर्यंत ती वळून वस्सकन माझ्या अंगावर ओरडू लागली..
"कुछ तमीज है के नही आपको.."
सगळा प्रकार सेकंदाच्या कितव्याश्यातरी भागात घडला असेल पण मी भांबावून गेलो..तरी सावरून मी म्हटलं..
"सॉरी,पण मी मुद्दाम नाही केलं.. तुम्ही मध्ये घुसलात.. त्यामुळे माझा balance गेला.."
"ए गपे.. मी ओळखते तुमच्यासारख्या लोकांना.. हात लावायला चान्स शोधत असता. हो की नाही?" तिने रणरागिणीचा अवतार धारण केला. नसत्या बालंटमुळे मी सर्दच झालो..
तेवढ्यात माणुसकी मदतीला धावून आली. रांगेत मागे उभे असणारे लोक मोठ्याने तिला सांगू लागले..
"ए मुली.. एकतर तू लाईन तोडून घुसलीस आणि वरून त्यांना बोलतेस? गुपचूप आत हो नाहीतर खाली येवून उभी राहा.. "
याचा मला अपेक्षित होता तो परिणाम झाला.ती आत गेली..मीही बसमध्ये चढलो तर दुर्दैवाने हे बया शेजारीच उभी! मी जरा अंग चोरून उभा राहिलो..बसायला जागा मिळाल्यानंतर मी चोरून तिच्याकडे कटाक्ष टाकला तर मला जाणवलं की ती रोखून (कि खजील होऊन?) माझ्याकडे बघत होती. मी नजर वळवली आणि खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. माझा शेवटचा stop होता. मी उतरताना बसमध्ये नजर टाकली तर ती नव्हती..सुटलो! म्हणत मी माझ्या मुक्कामावर पोचलो.

दुस-या दिवशीच्या संध्याकाळी मी stop वर उभा राहिलो तर ती मुलगी मला पुन्हा दिसली. यावेळी मात्र रांगेत होती.खरतर ती रोजच असायची त्या दरम्यान तिथे, पण आम्ही कधी एकमेकांना नोटीस नव्हतं केलं.. रांगेत असताना प्रत्येकजण बसचीच वाट पाहत असतो;फार क्वचित रांगेत कोण आहे ते पाहतो आणि दहा मिनटांनी बस अशी फ्रिक्वेन्सी असेल तर कधी ती आधी निघून जाणं किंवा मी आधी निघून जाणं असं होत असावं.. तिनेही मला पाहिलं. मी उभा राहताच ती आपला नंबर सोडून माझ्या मागे येवून उभी राहिली. कालच्या प्रसंगाची आठवण झाल्यामुळे मी उगाचच कॉशस झालो..
"हलो मिस्टर..  " ती माझ्याशीच बोलत होती..
"अं? "
"एम सॉरी..कालच्या इन्सीडन्सबद्दल.."
"इट्स ओके..." पोरगी स्वतःहून माफी मागतेय म्हटल्यावर माफ करायची संधी कशाला सोडा? नाहीतरी माझ्या बाबतीत असले प्रसंग वारंवार येत नाहीत..
"मी काल जरा घाईत होते.."
'म्हणून चारचौघात माझी इज्जत काढायची..?' ओठांवर आलेले शब्द मी महत्प्रयासाने रोखून धरले.. "हरकत नाही.. होतं असं कधी कधी.. पण नसतीच आफत आणली होती तुम्ही काल.." मी प्रकटपणे बोललो..
"सॉरी वन्स अगेन.. पण तुम्ही मला माफ केलंय ना?"
"हो.." वास्तविक 'चल..केलं तुला माफ' असं स्टाईलमध्ये मला म्हणायचं होतं पण ते अगदीच पुस्तकी वाटलं असतं...तिच्या प्रश्नासारखच!

तिच्याशी बोलताना मला अवघडायला झालं होतं. भूकही लागल्यासारखी वाटत होती.
"मी जरा काहीतरी खाऊन येतो.. भूक लागली आहे"  मी निमित्त काढून रांग सोडून शेजारच्याच हॉटेलात गेलो. डोश्याची ऑर्डर देऊन  सरकणा-या रांगेकडे पाहत स्वस्थ बसून राहिलो. भिरभिरत्या नजरेने तिने इकडे तिकडे पाहिलं. हॉटेल तिथून दिसत होतं आणि तिथे बसलेला मीही! परत एकदा नजरानजर होताच मी ओळखीचं हसू चेह-यावर आणलं. तिने स्माईल देत नजर वळवली आणि काहीतरी विचार करून माझ्याच दिशेने चालत यायला लागली!! माझे धाबे दणाणले.. काल काहीच केलं नव्हतं तर पब्लिकमध्ये तिने माझी बेइज्जती केली होती आज तर तिच्याशी बोललो होतो आणि आता तिला पाहून मी चक्क हसलो होतो! काय च्यायला ब्याद आहे...
'उठून पळून जावं का?' असा विचार करत मी बुड खुर्चीवरून उचललं तर वेटर डोसा आणून ठेवू लागला.. अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीला जर जीव असता तर तिच्या चेह-यावर जे भाव आले असते सेम टू सेम भाव माझ्या चेह-यावर तेव्हा आले असावेत.. कारण माझी ती केविलवाणी अवस्था बघून "सर,वॉशरूम जाना है क्या?" असं वेटर आगाऊपणे विचारू लागला!
जवळ आल्यावर मोहक हास्य चेह-यावर आणत ती म्हणाली.. "मलाही अक्चुअलि कॉफी प्यावीशी वाटली होती मगाशी.. आय वॉज सर्चीन फॉर अ कंपनी.. इफ यु डोन्ट माईंड देन कॅन आय..?"खुर्ची सरकवत तिने विचारलं..
"येस..शुअर..प्लीज"  मी तिला बसण्यासाठी खाणाखुणा केल्या..
"भैया,एक कॉफी लाना..फिल्टर्ड "
मला प्रचंड भूक लागली होती.. ऑफिसमधलं जेवण खास नव्हतं त्यामुळे जास्त जेवलोही नव्हतो. पण डोश्याला हात लावायचा कसा? एकतर ती समोर बसल्यामुळे मला प्रचंड ऑकवर्ड वाटत होतं. आणि काट्याचमच्यांशी खेळत डोसा खायचा माझा खरच मूड नव्हता. पण जाऊ दे.. उगीच इम्प्रेशन डाऊन नको करायला.. मी डाव्या हातात फोर्क घेऊन चमच्याने डोश्याचे ताटलीबाहेर पसरलेले पंख आत मुडपत तिला ऑफर दिली..
"यू कॅन have धिस..इफ यू विश.."
"या.. आयल have ओन्ली वन बाईट.."  कमालय! कालचीच ओळख असूनही जुन्या मित्राशी बोलावं तशी ती बोलत होती..
"मला नाही बुवा हे काट्याचमच्याने खाणं जमत!"म्हणत तिने हातानेच घास मोडला..
"मलाही!!" फोर्क बाजूला ठेवता ठेवता सुटकेचा निःश्वास सोडत मी बोललो.. जरा कम्फर्टेबलही झालो.
मग औपचारिक ओळख झाली. कुठे काम करतो,कुठे राहतो वगैरे जुजबी माहिती विचारून झाली.. माझ्या वाटेवरच कुठेतरी ती राहत होती.
"इफ यु डोन्ट माईंड तर आपण चालतचालत जायचं का?" बाहेर पडताना तिनेच विचारलं.
"हरकत नाही.. सोबत कोणीतरी असेल तर काहीच वाटत नाही..एकट्यानं चालायचं म्हणजे जीवावर येतं बुवा"

त्यानंतर मग दर संध्याकाळी तिला अंधेरी सीप्झ वरून national पार्कपर्यंत यायला तिच्या कंपनीची बस असायची आणि त्या stop पासून तिच्या सोसायटीच्या लेनपर्यंत माझी कंपनी!

ती मूळ मुंबईची नव्हती तरी तिला इथे बरीच वर्ष झाली होती. शिक्षणासाठी म्हणून दहावीनंतर ती या मायानगरीत आली होती. आधी कोणा नातेवाईकांकडे राहायची मग रूममेट्स बरोबर राहायला लागली. जॉब करायला लागूनही काही वर्ष झाली होती. त्यामुळे तिचे 'लुक्स'ही एखाद्या अस्सल मुंबईकर मुलीइतकेच मॉड होते. बोलायला खूप आवडायचं बहुधा तिला. काय काय आवडतं, काय काय करता येतं, छंद, मित्र मैत्रिणी, नातेवाईक माती धोंडे एक ना दोन ! एकदा सुरु झाली कि सांगतच राहायची! एकवरून दुसरा दुस-यावरून तिसरा असे विषय निघायचे..पण निव्वळ गॉसिप्स नव्हे तात्विक,वैचारिक चर्चाही झडायच्या.. पण कसंही करून आर्ग्युमेंट जिंकणं तिला आवडायचं. खरं म्हणजे समोरच्याला निरुत्तर करणं तिला आवडायचं!

स्त्री-पुरुष यांच्यातली नाती हा तिचा खास जिव्हाळ्याचा विषय. विश्वातल्या सर्व महत्वाच्या गोष्टी याच्याशीच रिलेटेड असतात हा तिचा सिद्धांत होता.. रामायण सीतेमुळे, महाभारत द्रौपदीमुळे अगदी पहिलं महायुद्ध फ्रांझ फर्डिनांड च्या गर्लफ्रेंड मुळे कसं घडलं हे सांगून ती तिच्या सिद्धांताची सिद्धता मांडत असे आणि माझ्यासमोर निरुत्तर होण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय राहत नसे!

कधीतरी बोलता बोलताच आमच्या पहिल्या भेटीबद्दल उल्लेख झाला..
"तुला आठवतं ना.. तू बसमध्ये चढत असताना मी घुसले... " झालं.. मी झालेला अपमान विसरण्याचा प्रयत्न करतोय तर ही पुन्हा पुन्हा जखमेवर मीठ चोळतेय..
"मला त्या रांग तोडून मध्ये घुसण्याबद्दल काहीच नाही बोलायचं अगं.. पण 'चान्स शोधत असतोस'  असं काहीतरी बोललीस वाटतं. हे असले आरोप म्हणजे जरा.."
"सॉरी ना अरे.. पण आत्तापर्यंतचे अनुभव इतके आलेत ना मला लोकांच्या नजरांचे..लोकल, बस, हॉटेल कुठेही जा; बायका, मुली सगळ्यांकडे असे वखवखलेल्या नजरेने बघत असतात पुरुष.."
"काहीजण असतीलही पण म्हणून अख्ख्या 'पुरुष' या जमातीला एकाच तागडीत तोलायचं का?"
"का नाही.? ओल्याबरोबर सुकंही जळणारच ना?"
"२५ टक्के तरी चांगले असतीलच ना? त्यांच्यावर का अन्याय?" मी विचारलं
"२५? जास्तच बोलतोयस तू अरे! फारफारतर १० टक्के असतील.."
"एवढे कमी तर मुळीच नसतील.. माझ्या मते वाईट पुरुष वीसेक टक्के असतील.. नाहीतर छेडछाड, विनयभंग, बलात्कार यांच्या 'बातम्या' होणं बंद झालं असतं..." मी म्हटलं.
"म्हणजे?"
"आय मीन, बातम्या अश्याच गोष्टींच्या होतात ना ज्या सरसकटपणे सगळीकडेच होत नाहीत? सामान्य माणूस जगतोय ती बातमी नाही होत किंवा तो वृद्धापकाळाने मेला तरी ती बातमी नाही होत पण एखादा तेविसाव्या वर्षी हार्टफेल ने गेला, किंवा कधीतरी अपघातात गेला तर त्याची बातमी होते कारण ही घटना नेहमी नेहमी घडणारी नाही.. तसंच त्या गोष्टींचही आहे." मी स्पष्टीकरण दिलं.
"मी सांगतेय ती कॅटेगरी वेगळी आहे.. शंभरातले २० पुरुष असतील वाईट असं गृहीत धरू तुझ्या अनुमानाप्रमाणे. मी म्हणतेय ते चांगले १० टक्केही सोडू पण म्हणून बाकीचे ७० टक्के सभ्य असतातच असं नाही..कदाचित त्यांच्यात गट्स नसतात! ते संधीच्या शोधत असतात. तूच बघ ना..मगाशी म्हणालास त्याच 'बातम्या' चवीने वाचता ना तुम्ही लोक? हेडलाईन वाचल्यानंतर पूर्ण बातमी कशासाठी वाचतो आपण? त्याचे डीटेल्स मिळावे म्हणून.. इथे काय डीटेल्स अपेक्षित असतात तुम्हाला?"
मी निरुत्तर झालो.. खरं होतं तिचं म्हणणं. काय डीटेल्स हवे असतात? वर्णनच ना? शी..मला स्वतःचीच घृणा आली.पण माघार घ्याची नाही असं मी ठरवलं होतं. आता मी नुसता 'मी'च नव्हतो तर अख्ख्या पुरुषवर्गाचा प्रतिनिधी होतो!
"हं.. हेही खरंच म्हणा..मी कधी हा विचारच नव्हता केला. आपल्या इथे स्त्री-पुरुष,मुलगा-मुलगी या संबंधांना समाजाने इतकं टोकाचं निषिद्ध बनवून ठेवलंय की केवळ कुतूहल शमवायाच्या इच्छेपोटीच हे प्रकार होत असावेत अजूनही.. पण मुलीही यात मागे नसतात. त्यांनीसुद्धा कपड्यांचं, राहणीमानाचं, तारतम्य बाळगलं पाहिजे कि नको?"
"म्हणजे ? मुलींनी काय आपली आवड मारायची? हिरोईन्स घालतात तेव्हा चालतं तुम्हाला.पण तीच fashion आम्ही केली कि बोचणा-या नजरांचा सामना करावा लागतो"
"हिरोईन्सना तरी कोण चांगल्या नजरेने बघतं? फक्त पडद्यावर असतात म्हणून त्यांना त्या नजरा नाही टोचत! पण मला सांग.. पुरुषांचे कपडे कधी पाहिलेस का तू? सेमी ट्रान्सपरन्ट, गळा, पाठ दाखवणारे कपडे का नसतात त्यांचे? त्यांच्या शरीराची वळणं का दिसत नाहीत शर्ट मधून ? पिक्चरमध्ये हिरो देखील उघडे फिरतात म्हणून वास्तवात सगळे तसं करत नाहीत..मुलींना सुद्धा लक्ष वेधून घ्यायची खुमखुमी असेलच ना? आता हेच बघ,मुलींचा सलवार कुडत्यासारखा सुसभ्य पंजाबी पोशाख पण त्यातला सलवार, आता घोळ असणारा चुडीदार किंवा पटियाला  न राहता पायाचा पूर्ण आकार दाखवतो..ओढणी राहायला पाहिजे तिथे न राहता गळ्याबरोबर जाते. कमीजचे साईडला असणारे कट्स कमरेपर्यंत पोहोचलेत, या तुझ्या  top वरच बघ, या असल्या लक्षवेधक कोट्स असतात.  मग पुरुष चळले तर पूर्ण दोष त्यांनाच नाही ना देता येणार?"
"हे बघ.. आकर्षक दिसणं आम्हा मुलींना आवडतं कारण तो त्यांचा अंगभूत गुण आहे आणि मुलांना तसं वाटत नाही त्याला कोण काय करणार?"
तिच्या या विधानासरशी मी शरणागती पत्करली आणि तिच्याबरोबरच्या आधीच्या इतर असंख्य आर्ग्युमेंट्सप्रमाणे हाही वादविवाद मी हरलो! पण पुरुषवर्गाबद्दल असणारा तिचा हेटाळणीचा सूर कशाने आला असावा याचं मात्र मी उत्तर शोधत राहिलो..

तिच्याशी बोलणं म्हणजे नॉलेज शेअरिंगचं सेशन असायचं. वेगवेगळ्या संवेदनशील गोष्टी,भावभावनांचे बंध,नात्यांचे कंगोरे हळुवारपणे उलगडत जायचे. पण कधीतरी फारच कठीण काहीतरी बोलायची, जड जड शब्द वापरायची! एवढे की समजून घेताना माझ्या नाकी नाऊ येत. त्यात पुन्हा मधूनच "तुला काय वाटतं?' 'बरोबर की नाही?' 'तू तिथे असतास तर काय केलं असतंस' असले प्रश्न विचारून ती माझं मत आजमावत असे, त्यामुळे तिचं बोलणं पहिल्यापासून काळजीपूर्वक ऐकावं लागे! रूममेट्स,मालकीणबाई ज्यांना ती 'मावशी' म्हणायची आणि तिचे आई-बाबा हे तिच्यासाठी विश्व होतं.वीकडेजमधल्या २० मिनिटांच्या वॉकमध्ये होणा-या बोलण्यात त्यांच्या गमतीजमती,त्यांच्यातली भांडणं, रुसवेफुगवे,  काढलेल्या समजूती याचा उल्लेख नसेल तर मलाच चुकल्याचुकल्यासारखं  वाटायचं! आणि वीकेंडला? मुळीच काही वाटायचं नाही कारण डेली सोप मधला एखादा भाग चुकला तर आपल्याला कुठे फारसा फरक पडतो? नाही का?

एकदा चालता चालता nansy कॉलनी आली तरी ती काहीच बोलत नव्हती. माझ्या बोलण्यालाही react होत नव्हती.
"काय गं, आज अचानक एवढी अबोल का झालीस?"
"अं.. काय?" तंद्री भंग पावल्यासारखी ती बोलली..
"..बरं वाटत नाहीये का?" मी विचारलं.
"आई-बाबा लग्न करायचं म्हणताहेत.."
"परत? आणि या वयात?" मी पीजे टाकला. तेवढाच तिचा मूड ठीक होईल असं मला वाटलं.
"गप रे.. माझं लग्न म्हणतेय.."
"मग मूड ऑफ करून घेण्यासारख काय आहे त्याच्यात? चांगला जीवनसाथी मिळेल ना तुला..कि तू ऑलरेडी कोणी शोधला आहेस?" मी विचारलं.
"..."
"काय गं.. काय झालं?"
"आय had बीन इन्टू द रिलेशनशिप फॉर समटाईम.." ती म्हणाली.माझ्यासाठी नवीन गोष्ट होती ती. एवढं काय काय सांगत असायची पण कधी बोललीही नव्हती ती या विषयाबद्दल..
"मग?"
"वी ब्रोक अप टू इअर्स अगो.."
"हम्म.." मी सुस्कारा सोडून तिला सहानुभूती द्यायचा प्रयत्न केला. "प्रेमात कधी कधी होतं असं..आणि दोन वर्षांपूर्वी ना? मग आता अचानक एवढं काय वाईट वाटून घेतेयस त्याचं? " मी विचारलं.
"काय असतं रे प्रेम म्हणजे? खरंतर तसं काही असतं का याच विचारात आहे मी.. शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम वाटण्याच्या वयात आमचं नातं सुरु झालं." ती सांगायला लागली.
"त्रास होणार नसेल तर दुरावलात कशामुळे ते सांगशील?" मी विचारलं..
"तुला माहितीये का? मुली मुलांपेक्षा दोन वर्षांनी जास्त मच्युअर असतात.." ती तंद्रीत असल्यासारखं बोलायला लागली..
"काय?" नवीनच माहिती कळत होती मला.
"म्हणजे सपोज मुलगा आणि मुलगी१८ वर्षाचे आहेत तर मुलगा २० वर्षाचा असल्यावर जो विचार करू शकतो तोच विचार मुलगी १८व्या वर्षीच करत असते. तिला तेव्हाच समाजाचं,जनरीतींच भान असतं.."
"त्याचा इथे काय संबंध?" ती घालत असलेलं कोडं सोडवायचं की तिचं बोलणं ऐकायचं या दुविधेत मी अडकलो.
"अरे त्याच्यामुळेच तर नैतिकता टिकून राहते स्त्री-पुरुषांच्या नात्यांमधली.." ती सांगत होती.
"म्हणजे?" मी आणखीनच गोंधळात पडलो!
"म्हणजे कुठल्या नात्यात कुठपर्यंत जायचं त्याचं लिमिट मुलींना कळतं..निदान मला तरी कळलं होतं. म्हणूनच मी लांब जायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी तेव्हा प्रेम म्हणजे भावना नव्हत्या त्याला वाटायचं प्रेम म्हणजे नुसतं..." ती दुसरीकडे बघत चालत राहिली. बहुतेक तिच्या डोळ्यात पाणी आलं असावं. त्याक्षणी मन मागे गेलं आणि मला आमची पहिली अपघाती भेट पुन्हा आठवली. त्या सगळ्या गोष्टींचा, तिच्या reactions चा, आमच्या डिस्कशन्सचा उलगडा झाला..तिने समस्त पुरुषवर्गाबद्दलचा तिरस्कार का बाळगला होता याचं उत्तर मला अचानक गवसलं!
"शारीरिक गरजा कोणाला नसतात? अरे..मुलींनासुद्धा त्याच फीलींग्ज असतात किंबहुना मुलांपेक्षा जास्तच.. पण त्यांना सेल्फ कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने माहित असतो.." ती सावरून म्हणाली
"असेलही कदाचित. मी एक मुलगा आहे. त्यामुळे तुझ्या भावना समजून घेणं कठीण जातंय मला.
 काही क्षण शांततेत गेले..
"असो.. आता त्याच्याशी आता काही contact?" मी विचारलं.
"त्याचा फोन येतो. मी म्हणतेय त्या चुका उमगल्यात म्हणतो. सगळ्याची जाणीव झालीय त्याला असं वाटतंय एकंदरीत."
"अगं मग बरंच आहे ना? तुला लग्न पण करायचं आहे आणि यू have युअर man ऑल्सो.."
"हम्म.. पण अरे घरच्यांनीसुद्धा मुलगा बघितला आहे."
"हे बघ.. अ नोन डेव्हिल इज थाउजंड टाईम्स बेटर than द अननोन रास्कल! असा मेसेज आला होता मला.." मी म्हटलं.. ती खळखळून हसली.
"तेही खरंच.. शेवटी लग्न म्हणजे कॉम्प्रोमाईज.. एक तडजोड. नाही का?"तिने विचारलं.
"पण ते अरेंज्ड असेल तर! राईट?? " मी हसत युक्तिवाद केला. ती पहिल्यांदाच निरुत्तर झाली.

मी मुंबई सोडली त्याला काही महिने लोटले. कालांतराने तिचं लग्नही झालं.त्याच्याशीच! दहिसरला त्यांनी संसार थाटला.कामानिमित्त असाच मुंबईला गेलो तेव्हा मित्राबरोबर दहिसरच्या ठाकूर मॉल मध्ये जायचा योग आला. आणि काय योगायोग पहा. या बाईसाहेब आणि त्यांचा नवरा शॉपिंग साठी तिथे आले होते. शॉपिंग आटपली होती आणि ते बहुधा निघायच्या बेतात होते. आमचे मित्रवर्य खरेदीत गुंग होते. मी तिला हाक मारली. तिला आश्चर्याचा धक्का बसला. प्राथमिक चौकशी झाली. तिच्या नव-याला माझी आणि मला आपल्या नव-याशी ओळख करून दिल्यानंतर आम्ही जरावेळ गप्पाटप्पा केल्या. निरोप घेतल्यानंतर तिचा नवरा गाडी काढायला गेला. गेटजवळ आम्ही बोलत थांबलो.
"घरी येऊन जा ना.. आमचा संसार बघ.." ती म्हणाली.
"येईन. वेळ काढून नक्की येईन. बरं... रमलीस ना संसारात?" मी विचारलं. ती हसली आणि म्हणाली.."तू म्हणाला होतास ना की लग्न अरेंज्ड असेल तरच ते कॉम्प्रोमाईज असतं? तर ऐक... कुठलंही लग्न म्हणजे तडजोडच असते.. अरेंज्ड असेल तर ती तडजोड आपण लग्नानंतर स्वीकारतो आणि प्रेमविवाह असेल तर ती आपण आधीच स्वीकारलेली असते! राईट??"
मला पुन्हा एकदा निरुत्तर करून जाणा-या तिच्या पाठमो-या आकृतीकडे मी पाहतच राहिलो.

सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

कोकणवेडा

माझा फोन खणखणला..आणि मी खडबडून जागा झालो. घड्याळात पाहिलं. रात्रीचे २ वाजले होते. 'कोण आहे इतक्या रात्री' डोळे चोळतच मी फोन उचलला..
'कोवे' होता.. "एक बातमी आहे रे" त्याने त्याची नेहमीची सुरुवात केली..
एवढ्या रात्रीचा फोन म्हटला कि मी आधीच धास्तावतो.. त्यात पुन्हा याचा फोन म्हटल्यावर माझा जीव कानात गोळा झाला.हृदयाचे ठोके जोरात पडू लागले. हातापायाला आधीच कंप सुटू लागला.
"उद्या सकाळी तुला तुझ्या होणा-या वहिनीशी बोलायचंय.. तयार राहा!'
मी सावरलो. माझा जीव पुन्हा हृदयात सुखरूप परतला!
"काय म्हणतोस? 'हो' म्हणाली का ती?" -मी
"हो.. म्हणाली फायनली! अरे..झोपच येत नव्हती.. आय एम सो एक्सायटेड.. यू नो! म्हणून तुला फोन केला.."
त्यानंतर जवळपास दीड तास अव्याहत बडबड करून कोव्याने फोन ठेवला.
मी नॉर्मल झालो.. पण झोप येत नव्हती. तसाही वीकेंड सुरू झाला होता.मी उठून galleryत येऊन खुर्चीत बसलो. मला त्याने याआधी असा अपरात्री केलेला फोन आठवला.

असाच माझा फोन वाजला होता. "एक बातमी आहे रे" कोवे तिकडून बोलत होता.
"बोल ना"
" एवढं करूनही आपल्या जिल्ह्यात ४९ मायनिंग प्रोजेक्ट्सना परमिशन दिली रे गवर्नमेंटने.." कोव्या हुंदके देत रडू लागला..
मी ऐकत राहिलो..अगदीच धक्कादायक बातमी नव्हती ती माझ्यासाठी. पण त्याच्यासाठी नक्कीच होती. त्याच्या भावना मी समजू शकत होतो.. त्याचं सांत्वन करताना माझ्या नाकी नऊ आले होते.

..कोकणवेडयाची आणि माझी दोस्ती अगदी लहानपणापासूनची. 'कोकणवेडा' हे त्याच मीच ठेवलेलं नाव. पण मी त्या नावाने कधीच हाक मारली नाही. मी त्याला कोव्या म्हणायचो. आमच्या घराच्या शेजारची जमीन त्यांची. तिथे घर बांधायचा त्यांचा प्लान होता. त्या जमिनीचा व्यवहार झाला तेव्हा आजूबाजूची चौकशी करायला म्हणून कोकणवेडयाचे आईबाबा आमच्याकडे आले. घर बांधत असताना जवळपास कुठे भाड्याने राहायची सोय होईल का? या प्रश्नाला 'आमच्याकडेच होईल की' असं उत्तर आमच्या मातोश्रींनी दिलं आणि त्यांच्या कुटुंबाचे आणि आमचे बंध जुळले असं म्हणतात.. म्हणजे आम्ही तेव्हा भूतलावर अवतरलो असलो तरी काही समजायच्या वयात नव्हतो म्हणून 'म्हणतात'.. मीही आणि तोही!

त्याची आई आमच्या परड्या (कंपाउंड ) मध्ये इतकं काय काय करत असायची कि मला लहानपणी ते आमचे भाडेकरू आहेत असं वाटतच नसे. झाडांची निगा राखणे, आळी (झाडांच्या मुळाभोवती पाणी साठून राहावं म्हणून मातीची तयार केलेली गोल रिंग ) करणे, फुलझाडं लावणे, वाफे तयार करून कसल्याकसल्या भाज्या लावणे, वेलींसाठी काठ्यांचा मांडव उभारणे असलं काही ना काहीतरी ती करत असायची. आमच्या आईला ऑफिसला सुट्टी असली की दोघीजणी मिळून बागकाम करायच्या. साफ-सफाईला मात्र पुरुषमाणसं जुंपली जायची. "अहो.." अशी कोणाचीही हाक रविवारी ऐकू आली तर दोघींचेही 'अहो' गुपचूप बाहेर यायचे. नाहीतर बोलणी पडायची भीती!!

कोकणवेडयाच्या बाबांकडे बक्कळ पैसा होता. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे ते माझ्या बघण्यातले पहिले गृहस्थ! 'लहानपणापासून इन्व्हेस्ट केला ना की पैसा वाढतोच' हे त्याचं तत्वज्ञान. आमच्या बाबांना ते असलं काहीतरी सांगत असायचे. बाबासुद्धा त्यांच्याकडे पैसे वगैरे द्यायचे इन्व्हेस्ट करायला पण तोलूनमापून! नोकरदार माणसाला असलेली भीती त्याला पैश्याला खेळवण्यापासून थांबवते त्यामुळे आयुष्यभर पैसा त्याला खेळवतो. (अर्थात हे पण काकांचंच वाक्य म्हणा!) त्यांनी काही जमिनी,बागा अशा गोष्टी खरेदी केल्या होत्या वरून बँकेतली नोकरीही होती. तरीपण आमच्याकडे भाडयाने राहात. अरे हो.. सांगायचंच राहिलं. घर बांधायला म्हणून ते ज्या वर्षी आले त्यानंतर तब्बल १० वर्षांनी त्यांनी तिथे घर बांधलं. कारण आमच्या कुटुंबांची जुळलेली नाळ!

कोकणवेडा लहानपणापासून आमच्या परड्यात रमायचा. ते गुण त्याच्या आईकडून त्याच्यात आले असावेत. झाडांशी जणू गप्पागोष्टी करायचा. फुलझाडे त्याच्या विशेष आवडीची. अगदी लहान असताना त्याची आई त्याला कडेवर घेऊन कंपाउन्डभर फिरत जेवण भरवत असे. मोठा झाल्यानंतरही रविवारची सकाळ तो त्या झाडातच घालवायचा! त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळीच क्रिकेट खेळावं लागायचं. बरं त्याला वगळून खेळायचं म्हटलं तर स्टंप त्याचे-अगदी बेल्ससकट. मला किंवा आमच्या इतर मित्रमंडळीच्या घरच्याना बॉल आणि bat सोडून इतर चोचले पुरवण शक्य नव्हतं. त्यामुळे या गाढवाचे पाय धरावे लागत असत! आणि तसा तो 'गाढव'ही नव्हता. तो फास्ट बॉलर होता. सुसाट करायचा बॉलिंग. टीममध्ये खेळतानापण आधी फलंदाजाला 'शेकवणे' आणि मग त्रिफळाचीत करणे हे सूत्र त्याने नेहमी वापरलं. इंग्लंडच्या लारवूड नंतर बॉडीलाईनचं अस्त्र वापरणारा हाच. एखादा batsman जर जास्तच फॉर्मात आला तर 'वडा काढू काय रे?' असं विचारून कोव्या बॉल घ्यायचा हातात आणि मग फलंदाज जायबंदी,त्याची रडारड,खेळ थांबणे वगैरे नेहमीचा इतिहास घडत असे! तरी बरं आम्ही कधी सिझन बॉलने खेळलो नाही!

तसाच अभ्यासात.. पहिल्या पाच-दहात तरी असायचाच. झाडं वगैरे जर नसती तर त्याला पहिला नंबर काढण्यापासून रोखायची आलम दुनियेत कोणाचीच टाप नव्हती! परीक्षेच्या दिवशी सुद्धा पुस्तक घेवून मी रिविजन करत असताना हा सकाळी झाडांना पाणी घालत असायचा. "पांढरी जास्वंद फुलली रे!" "गुलाब कसला सोकावलाय बघ..!" किंवा "आपलं सदाफुलीच कलम सक्सेसफुल झालं बरं का.." असलं काहीतरी तिसरंच निरीक्षण तो नोंदवत असायचा. त्याच्या आईला मात्र हे बिलकुल खपत नसे..
'अरे पेपर आहे ना तुझा? हे लिहिणारेस का पेपरात?" असले टिपिकल आयांचे ठरलेले संवाद फेकून ती कर्तव्य बजावत असे.

जसा जसा मोठा होत गेला तसं तसं त्याचं कोकणाबद्दलचं आकर्षण वाढत गेलं आणि जाणीवही. पदोपदी तो ती मलाही करून देत असे. 'जगामध्ये भारतात, भारतात महाराष्ट्रात आणि राज्यातही अश्या नितांत सुंदर प्रदेशात जन्म घ्यायला आपण मागच्या जन्मी फार काहीतरी पुण्य केलं असलं पाहिजे' हे किंवा अशा अर्थाचं वाक्य तो अशा आवेशात म्हणा,लकबीत म्हणा बोलत असे की प्रत्येक कोकणवासियाच्या मनात आदरयुक्त अभिमान निर्माण झालाच पाहिजे. तेव्हाच कधीतरी मी त्याला 'कोकणवेडा' म्हणायला लागलो.

पण 'आम्ही कोकणात राहतो' हे सांगायला मी शिकलो ते त्याच्यामुळेच. अकरावीपासून बाहेर शिकायला जायचा माझा प्रस्ताव त्याने धुडकावून लावला.

"अरे असलं निसर्गरम्य वातावरण सोडून त्या सिमेंटच्या जंगलात जायचं? अभ्यासात मन तरी लागेल का?"असं म्हणत कोव्या तिथेच राहिला. मी गाव सोडलं.

बाहेर आल्यानंतरच्या एक-दोन महिन्यातच कधीतरी त्याच्या घरी मी फोन केला होता.
"काकी, कोकणवेडा आहे का गं?"
"काय रे कसा आहेस? जेवणाचे हाल असतील ना? आपल्यासारखं वाटप लावत नाहीत तिकडे. कधी येणार आहेस? आलास की मस्त सुरमईची आमटी घालते करून " कोव्याच्या आईची गाडी सुसाट सुटत असे.
"ए काकी,बिल पडतंय अग. आल्यावर सांगेन तुला. पोरगा कुठाय तुझा?"
"कुठे असणार? बागेत. हा बघ आलाच..आणि तुला माहितीय का? मोसंबी धरली आपली.. आणि पायरीच्या कलमाची एक फांदी मोडली रे.. बरं बरं.. हा बघ हा बोलतोय"म्हणत तिने त्याच्याकडे फोन दिला.
"हलो,काय पत्ता काय तुझा? फोन करायचा ठरवलं तरी कुठे करायचा? गेल्यापासून आत्ता करतोय फोन, काकी म्हणत होती, आम्हालापण आठवड्याभरानेच करतो म्हणून. ही काय पद्धत आहे वागायची? आताच ही गत तर पुढे काय होणार देवाला माहित.." कोव्या त्याच्या आईचा मुलगा जास्त शोभायचा यात वादच नव्हता!
"आता गप.. ऐक पुढच्या महिन्यात मी येतोय. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचा प्लान कर. आयला... इथं पोरांनी वेडयात काढलं मला. म्हणतात इतकी वर्ष राहिलास आणि किल्ल्यावर नाही गेलास म्हणजे धन्य आहे!" मी म्हटलं.
"मग? मी एका पायावर तयार आहे. सकाळी किल्ला फिरू नंतर मालवणात मस्त जेवू नंतर संध्याकाळी तारकर्लीला जावू आणि रात्री घरी येवू" कोकणवेडयाने प्लान फायनलपण करून टाकला!
घरी गेल्यावर तो प्लान तसाच एग्झीक्यूट केला हे विशेष!

त्याच वाचनही तुफान होतं. इतिहासाचे दाखले देताना किल्ल्यात शिसं का,कोणी,कधी आणि कसं ओतलं ते सांगताना खाली वाकून तिथला दगड उचलून आणि निरखून 'हम्म.. बसाल्ट! हे बघ.. हे बेट बसाल्टचं बनलंय...' म्हणत त्याने तो दगड माझ्या हातात ठेवला की मी "हो का? बरं!" असं म्हणत तो समुद्राच्या पाण्यावर भिरकावून देत असे.. पाण्याच्या पृष्ठभागावर टप्पे खात जाणारा दगड त्याक्षणी जितका सुंदर दिसतो त्यापेक्षा जास्त सुंदर कधीच दिसत नाही. भले मग तो बसाल्ट का असेना! खरं की नाही?

तारकर्ली बीचच्या वाळूवरून त्याची बुलेट हाकताना जाम मजा यायची. हो बुलेटच! हा घरचा एकुलता एक.. मग बाबांच्या पैश्याचं काय लोणचं घालायचंय?
"हे असलं सुख विकत नाही रे मिळत! पिक्चर मध्ये लोक बघतात तेव्हा त्यांना काय हेवा वाटतो त्या हिरोचा. त्या हेव्याचा वाटेकरी त्या हिरोईनबरोबरच इथल वातावरणपण आहे. बाईकवर हिरोईन नसली तरी चालेल पण आजूबाजूला हा निसर्ग हवाच.." वाळूत बसल्या बसल्या अथांग समुद्राच्या फेसाळत्या लाटांच्या आणि मावळत्या सुर्यबिंबाच्या साक्षीने कोव्या तत्त्वज्ञान ऐकवायचा आणि मी ऐकायचो.."आपण अनुभवतोय ती वर्णनं लिहून कित्येक लेखकांनी पैसे कमावले असतील!"तो म्हणायचा!
त्याच्याबरोबर असताना सतत जाणवायचं की नशीब चांगलं म्हणून कोकणात जन्माला आलो.. नाहीतर घाटमाथ्यावर असतो तर पैसा खर्च करून हे सुख अनुभवायला यावं लागलं असतं. गाडया घेवून-बिवून!
हाफप्यांट झाडता झाडता उठत तो म्हणायचा "चल जाऊ.. गाडी धुवायला हवी रात्रीच नाहीतर गंज चढायचा! खा-या हवेतल्या क्षारांमुळे आणि किना-यावरच्या वाळूमुळे मेटल करोजन होतं माहितीय ना?" "हं.." म्हणत मी गाडी चालू करायचो..

मी इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित इत्यादी विषय शाळा-कॉलेजात शिकलो असेन पण अप्लाईड इतिहास,अप्लाईड भूगोल,अप्लाईड विज्ञान शिकवलं कोव्यानेच! अप्लाईड गणित मात्र इंजिनियरिंगने शिकवण्याचा प्रयत्न केला! पण त्यात कोव्याइतकी रंजकता नसल्यामुळे ते तेवढसं पचनी पडलं नसावं!

यथावकाश कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पार पडलं. बारावीला पठ्ठ्याने जोरदार मार्क पाडले. त्याच्या आईच्या आग्रहाखातर मेडिकलसाठीची प्रवेश परीक्षाही दिली.तिथेही चांगला नंबर मिळवला. पण 'शिकेन तर कोकणातच' या त्याच्या स्वतःच्याच शब्दांना जागून त्याने इंजिनियरिंगलाच admission घेतली. घराजवळचं कॉलेज सोडून रायगडमधल्या कॉलेजमध्ये! का तर कोकणातला तो जिल्हा म्हणे बघायचा राहिला होता! घराबाहेर पडल्यानंतर तो जणू मोकाट सुटला. निसर्ग-भ्रमंतीमुळे त्याच्या मनातली कोकणाबद्दलची आपुलकी जास्तच वाढत गेली. कधी कधी तो माझ्याकडे यायचा. दोन दिवस राहायचा आणि त्याने गेल्या काही दिवसात काय धमाल केली ते सांगायचा.. 'त्या दिवशी दापोलीच्या कृषी विद्यापीठात गेलो, ग्रीन हाउसला पाच लाख रुपये खर्च येतो, जरबेराचं एक फुल ५० पैशात सप्लायरना जातं आणि ते ५ रुपयांना लोकल मार्केट मध्ये विकतात आणि १५ रुपयांना एक्स्पोर्ट करतात.... मागे एकदा हर्णै बंदरात गेलो. लिलावात मासे घेतले विकत. आठशे रुपयांना अख्खी टोपली! मजा आली. हल्लीच एकदा रत्नागिरीला गेलो... थिबा प्यालेस बघितला परत. तिथून सायकलवर गणपतीपुळ्याला गेलो.. ऑसम एक्सपिरीअंस डूड!' असलं काहीतरी रोमांचक अनुभवकथन तो करायचा.

बरं बाकीचा महाराष्ट्र किंवा भारत तो फिरला नव्हता असं नव्हतं.. त्याच्या बाबांना बँकेतून जाहीर होणा-या योजनांमधून ज्या सवलती मिळत असत त्यात ते कुटुंब सुट्ट्यांमध्ये फिरत असे. भारतभ्रमंती केली त्याने, पण त्याला आवडलं असं कोणतंच ठिकाण नाही.

"शिमला शिमला करतात ते काय आहे शिमल्यात? जाऊन आलो. काही विशेष दिसलं नाही बुवा. थंडी आपल्या कोकणासारखीच हवी.. सुसह्य आणि हवीहवीशी.. ही च्यायला रक्त गोठवणारी थंडी हवीये कोणाला? "
किंवा..
" केरळ? अरे आपल्यासारखीच माडांची झाडं आहेत. हां पण तो नदीबिदीतून फिरायचा आयटम एक भारी आहे तो सोडला तर बाकी सगळं कोकणासारखंच! आपल्याकडेपण नदीतून फिरतात कि लोक. पण आपल्याकडे असलं कौतुक करून घ्यायची आणि मिरवायची प्रथा नाही त्यांच्यासारखी!"
सगळ्या गोष्टी कोकणशी कशा रीलेट कराव्या ते कोकणवेड्याकडून शिकावं! कारण त्याच्या घरच्यांना मात्र तीच ठिकाणं जाम आवडलेली असत आणि त्याची आई तिथले प्रेक्षणीय फोटो वगैरेही दाखवत असे!

इंजिनियरिंगच्या एका वर्षी माझा कॉलेजचा एक ग्रुप कोकणदर्शन करायचं या हेतूने टूरवर आला. अर्थात मीच लीडर होतो. राहण्याची व्यवस्था आमच्या घरी केली होती. आमच्या इकडची ठिकाणं फिरायची आणि कोवे नाही अस शक्यच नव्हतं त्यामुळे कोकणवेड्याच्या सुट्ट्या अड्जेस्ट करूनच प्लान केला होता. त्यानेही कुणकेश्वर, रेडीचा गणपती, सिंधुदुर्ग किल्ला,देवगडच्या पवनचक्क्या, वेतोबा देऊळ, आंबोलीचा धबधबा, सावंतवाडी, किल्ले विजयदुर्ग, रत्नागिरीचा जयगड, सुंदरबन,पावस, मंडणगड, डेरवण, मार्लेश्वर असा जोरदार प्लान आखला.. चार दिवस आणि चार रात्रींचं package! तो चांगला टूर को-ऑर्डीनेटरसुद्धा होऊ शकला असता.
पहिल्या दिवशी मी सगळ्यांना सगळ्यांची ओळख करून दिली. कोव्याला कॉलेजच्या मित्रमैत्रिणीची ओळख करून दिल्यानंतर मी त्याच्याकडे निर्देश करून म्हटलं..
"आणि लोकहो.. हा कोकणवेडा"
त्याचं नाव ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले "शी बाई! असलं कसलं नाव ?" " पेट नेम असेल रे.."असल्या कमेंट्स ऐकल्यावर माझी चूक माझ्या लक्षात आली.
मी लगेच म्हणालो.."अरे.. हे त्याचं मी ठेवलेलं नाव आहे.. त्याचं खरं नाव आहे...." इतक्यात माझ्या तोंडावर हात ठेवत तो म्हणाला.. "..कोकणवेडा हे नावच मला आवडतं.."
इतक्या वर्षानंतर मला पावती दिली होती त्याने! त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव तरळून गेल्यासारखं वाटलं मला.. उगीचच!
गाडीतून फिरताना बिस्कीट खाल्ल्यानंतर एकीने विचारलं..
"raper चा कागद कुठे टाकू रे.."
"टाक की खिडकीतून बाहेर.. कोकण आपलंच आहे!"
"हो..कोकण आपलंच आहे... पण म्हणूनच ते खराब करू नका! आपल्याच घरात आपणच कचरा करायचा?" कोकणवेड्याच्या सवालाने आम्ही निरुत्तर झालो आणि एकमेकांकडे टकामका पाहायला लागलो.
कोकणवेड्याने एक कागदी पिशवी बाहेर काढत त्यात तो कागद ठेवला.
विचारांमधली ही प्रगल्भता त्याच्यात कुठून आली कोण जाणे? कोकण प्रदेशाबद्दलची नितांत श्रद्धा आणि असीम भक्ती त्याच्या नसानसातून वाहत होती!
ट्रीप अगदी मस्त झाली.. त्यात कोव्याच्या अगाध "अप्लाईड" नॉलेज ने जास्तच रंगत आणली. त्याच्या भ्रमंतीमध्ये त्याने करून ठेवलेल्या ओळखी आम्हाला ब-याच उपयोगी पडल्या! राहायचे म्हणा; खायचे म्हणा अजिबात वांधे झाले नाहीत. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं.
"नाव बरिक शोभतं हो तुला!" आमच्या एका पुणेरी मैत्रिणीने त्याला कॉम्प्लीमेंटही दिली. कोकणवासीयांच्या आतिथ्यशिलतेचा अनुभव घेऊन त्यांच्या आदरातिथ्याच कौतुक करत आणि छान छान आठवणी साठवून घेत माझे मित्र मैत्रिणी पुण्याला परत गेले.

अप्लाईड असल्यामुळे इंजिनियरिंग कोव्यासाठी 'कीस झाड की पत्ती' होतं! कॉलेज मध्ये असताना त्याला एका नामांकित कंपनीची ऑफरही आली. पण त्याच्या आईला आता त्याचं महत्व पटलं होतं.
"काही नको करू नोकरी बिकरी.. इथेच राहा तू. एवढं सगळं केलं तुझ्यासाठी आणि तू आता मुंबईत जाऊन राहणार का? असं विचारतेय आई" तो म्हणाला.
"तिला पटवून दे ना मग.. एवढं शिकलो ते कशासाठी म्हणावं... "
"कशाला? मला पण इथेच रहायचंय!" डोळे मिचकावत तो म्हणाला. मग मी काय बोलणार?
त्याने गावाकडेच राहून बाबांनी करून ठेवलेल्या बागा बघायला सुरुवात केली आणि बघता बघता एक-दोन वर्षात धंदा कुठच्या कुठे नेला.कोव्या बघता बघता मोठा माणूस झाला.. त्याचे बाबाच चकित झाले! तरीपण त्याचे पाय जमिनीवरच राहिले.
हल्लीच कुठल्यातरी कृषी संस्थेचा माननीय सभासद म्हणून कसल्याश्या अभ्यास दौ-यासाठी जेव्हा तो कॅलिफोर्नियाला जाऊन आला तेव्हा मात्र 'ते भारी आहे' असं म्हणाला!
मी म्हटलं "नशीब! पहिल्यांदा तुला कोकण सोडून इतर कुठलातरी प्रदेश आवडला! भारतात नाही तर निदान परदेशात तरी!"
"ते भारी आहे ते तिथे.. इथे मात्र हेच!!' तो हसत म्हणाला.

पर्यावरणाच नुकसान हे त्याला स्वतःचं नुकसान वाटायचं. तो ब-याच आंदोलनातही सहभागी होता. अगदी सक्रीय! त्याचमुळे सिंधुदुर्गात खाण प्रकल्पांना मान्यता मिळताच तो दुःखी झाला होता. पर्यावरण संरक्षण म्हणून त्याने त्याच्या कारलासुद्धा gas कीट लावून घेतला होता.
"आपली लोकं ऐकतात ते बोलतात! ह्याला 'ग्यास्केट' म्हणतात!" वेड्यासारखा हसत तो सांगत होता.."पण एक सांगतो.. इतका फिरलो मी तरी इतकी चांगली माणसं कुठेच दिसली नाहीत." तो सांगायचा
" पाचवीला पुजलेलं दारिद्र्य आहे आपल्या शेतक-यांच्या नशिबी; पण कधी कोणी आत्महत्येचा भ्याड मार्ग अवलंबल्याच ऐकलं आहेस? मी एक सर्वे वाचला होता..तिकडे मराठवाडा-विदर्भात म्हणे लग्नासाठी,घरासाठी शेतीच्या नावावर कर्ज घेतात सावकाराकडून आणि त्याचं कर्ज फेडता येत नाही. अरे पेरलं नाही तर उगवणार कसं? हत्तींमुळे, अतिवृष्टीमुळे फियान (कोकणात येणारं चक्रीवादळ ) मुळे आपल्याकडेही कराव्या लागतात दुबार पेरण्या. तरीपण आपली लोकं रडत बसत नाहीत. अनुदानं आणि packages वर पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच खर्चात त्यांना इकडे पाठवा म्हणावं गवर्नमेंटला.. स्वाभिमानाने जगायचं कसं ते तरी शिकवतो! "
"अरे हो.. पण तिकडे मुलीच्या लग्नासाठी खर्च होतोच. हुंडा वगैरे.." मी म्हटलं.
"तेच ना.. शिकले तिथले लोक, पण अकला नाही आल्या! आपल्या इथे मुलगी आणि नारळ देतात माहितीये ना? लग्नाचा खर्च सुद्धा दोन्ही पार्ट्या निम्मा निम्मा उचलतात. म्हणून आपल्याकडे मुलगी झाली तरी तेवढंच सेलिब्रेट करतात जेवढा मुलगा झाल्यावर! अरे आई बापांनी वाढवलेली सुशिक्षित मुलगी तुम्ही आपल्या घरी घेऊन जाताय तरी वरून निर्लज्जासारखे हुंडा मागता? उलट तेवढी रक्कम मुलीकडच्यांना दिली पाहिजे. तुमचा पोरगा काय नामर्द आहे काय पोरीचे पैसे वापरायला? "
यावर मी काय बोलणार? त्याच्या ब-याचश्या विधानांना क्रॉस करता येणंच मुश्कील होतं. मलाच काय कुणालाही!

गणेश चतुर्थी आली की कोव्याच्या आनंदाला उधाण यायचं. आरत्या, भजनं अगदी तल्लीन होऊन करायचा.. कुठल्यातरी 'अमुक तमुक भजनी प्रासादिक मंडळात' जाऊन टाळ कुट कुट कुटायचा! शिकला सावरलेला आणि हातात पैसे खुळखुळवणारा तरुण पोरगा आपल्यात सहजी मिक्स होतो हे पाहून जुन्या जाणत्या लोकांच्या भुवया उंचावायच्या.रात्र रात्र भजनं करत हिंडायचा. बरं हा अजातशत्रू आणि वरून बरीच माणसं जोडलेली त्यामुळे कसली भीतीपण नव्हती.

असा हा भला मनुष्य सरतेशेवटी कोकणाव्यतिरिक्त इतर कोणाच्यातरी प्रेमात पडला.ती गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये मूळ गावी आलेली एक नवयौवना होती.
'मला ती आवडते' असं हा सांगायचा. पण पोरगी भाव देईल तर शप्पथ!
"विचारून टाक ना.. तुझ्याकडे पैसा आहे,सेटल्ड आहेस तर कुठली पोरगी नाही कशाला म्हणेल?"
"ते बघून येणारी पोरगी नकोय मला.. माझे विचार पटणारी हवी. mature हवी. माझं इथल्या मातीवरचं प्रेम, त्यामागच्या भावना जाणून घेणारी हवी.. ही तशी आहे. मुंबईची आहे. बॉर्न and ब्रॉट अप at परळ! बापाचा टू बीएचके आहे तिकडे आणि ही एकुलती एक. तरीपण जेव्हा मूळ गावाबद्दल कळलं तेव्हा आईला घेऊन आली इकडे."
"तिची स्टोरी मला कशाला सांगतोस? तू तुझं बघ." मी बोललो पण एकंदरीत बरीच माहिती काढली होती त्याने!
"तेच रे.. म्हणजे तिलापण इंटरेस्ट आहे गावात वगैरे! पण मला अजिबातच विचारत नाही."
"बरं.. नाव काय तिचं ?"
"सांगेन वेळ आल्यावर! उगीच काही सरकलं नाही पुढे तर कशाला बदनामी हवी दोघांची पण? सध्यातरी एकतर्फीच आहे म्हणायला हवं" सुस्कारा टाकत तो म्हणाला होता.

मी भानावर आलो.. तांबडं फुटत होतं. सहा महिने झाले असावेत या गोष्टीला. मध्यंतरीच्या काळात आम्ही खूप वेळा बोललो पण त्याने हा विषय टाळला होता. मीही मुद्दामहून काही बोललो नव्हतो. नावच माहित नाही मुलीचं तर कसा आणि काय म्हणून उल्लेख करणार रोजच्या बोलण्यात? असो.. उद्या निदान नाव तरी विचारून घेऊ! विचार थांबल्याबरोबर माझे डोळे पेंगायला लागले.

.... उन्हाचा चटका लागताच माझी झोप उघडली. खुर्चीतच मला डुलकी लागली होती. सकाळचे दहा वाजले होते. मी तोंड धुऊन फ्रेश होतो ना होतो तोपर्यंत त्याचा फोन आलाच.

"हे.. गुड मॉर्निंन.."
"मॉर्निंग.. बोला.. भेटलास का तिला?" मी विचारलं.
"हे काय.. तिच्याबरोबरच आहे..बोल तिच्याशी"--- "हाय" एक मंजुळ आवाज आला
"हे हाय..! सो यू फायनली अग्रीड! अभिनंदन!!" मी अभिनंदनाचा ठराव मांडला.
"thanks a ton.. हा सारखा तुझ्याबद्दल बोलत असतो. त्यामुळे डायरेक्ट अरे तुरे करत्येय. प्लीज डोंट माईंड हं!" ती म्हणाली.
"..डोंट बी सो फॉर्मल याss .. तुला एक सांगू का? आय शुडन्ट से धिस पण माझ्याबद्दल त्याने तुला एवढं सांगितलं तरी मला तुझं नाव सांगितलं नाहीये अजून त्याने." मी लगेच तक्रार नोंदवली.
"सांगते ना.. पण तू मात्र मला, मी सांगेन त्याच नावाने हाक मारायची.. ठीकाय? "
"हे काय आता नवीन? बरं.. मग नाव राहू दे बाजूला; मी काय नावाने हाक मारायची तेच सांग!"
मी उत्सुकतेपोटी विचारलं आणि प्रत्युत्तरादाखल ती म्हणाली..

"...कोकणवेडी!!!"