सोमवार, ५ डिसेंबर, २०११

गद्धेपंचविशी

पंचविशी!! आतापर्यंत जन्म, बारसं, पहिला वाढदिवस, सोळावं वरीस, टीनेज, चाळीशी, पन्नाशी, साठी, मृत्यू सगळ्या सगळ्यांशी संबधित कच-यासारखं लिखाण झालंय,झालं होतं आणि होत राहील..पण साली पंचविशी हि 'गद्धेपंचविशी' म्हणून ओळखली जाते आणि तमाम लोकांनी तिला जणू वाळीतच टाकलं गेलंय..हो की नाही? शिंगं फुटण्याचं वय हे..यावर काय लिहायचं?आणि कोण वाचणार? असा याच्यामागे विचार असेल बहुतेक! योगायोगाने हल्लीच फेसबुकवर एकाने तेवीस हे वर्ष कसं असतं यावर मत मांडलं होतं,आणखी एका ब्लॉगर मित्राने पंचविशीबद्दल मतं व्यक्त केलीयेत तेव्हा जाणवलं कि हो.. मीही हा विचार कधी काळी केला होता..

कॉलेज संपल्यानंतर याच वयात लागलेल्या नव्या जॉब चे नऊ दिवस ओसरले कि एखादा वीकेंड असा मिळतो कि घरात कोणीच नसतं. आपल्याला झोपून कंटाळा आलेला असतो, टीव्ही कडे पाहवत नाही, पेपर वगळता वाचायला दुसरं काहीच नसतं, मित्रमंडळ कुठलातरी टुकार नाव असलेला (उदाहरणादाखल हल्लीच्या काळात 'टेल मी ओ खुदा'!! ) पिक्चर पाहायला बोलावत असतं पण आपल्याला तर इकडे आंघोळ करायचा सुद्धा वैताग आलेला असतो. कम्प्युटर वरचे सगळ्या भाषांमधले आणि 'सगळ्या पद्धती'चे पिक्चर्स बघून बघून अक्षरशः पाठ झालेले असतात.. (अशी वेळ तुमच्यावर कधीच आलेली नसेल तर तुमच्याइतके लकी तुम्हीच ब्वा!! पुढच्या वीकेंडला पेन ड्राईव्ह घेऊन येतो! ) डॉ. सलील कुलकर्ण्यांच्या भाषेत कंटाळ्याचा देखील कंटाळा आलेला असतो त्यावेळेला विनासायास,विनाखर्च करण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे 'विचार'.. हवा तितका वेळ,हवा तिथे,हवा तसा करा! कोण्णाचं काही ऑब्जेक्शन नसतं!

तेविशीपासून पंचविशीपर्यंतचा काळ कसल्या प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जातो याचा आपल्याला अंदाजच येत नाही..या वयात किती गोष्टी घडतात. कळत नकळत.

शाळेत अभ्यासाचा तिटकारा असणा-या आपल्याला अचानक साक्षात्कार झाल्यासारखा अभ्यास जवळचा वाटू लागतो.. पुढे शिकायची इच्छा असेल किंवा हवी तशी अथवा कसलीच नोकरी न मिळाल्याने असेल, आपल्यातले काहीजण post -graduation चा पर्याय निवडतात आणि तिथे बराच चांगला परफॉरमन्सही दाखवतात. त्या जोरावर चांगल्या नोकरीच्या संध्या चालून येतात वगैरे वगैरे.. शाळेत जर प्रचंड अभ्यास वगैरे केला असाल तर हुशारीच म्हणजे सर्व काही नाही,त्यापलीकडेही जग असतं हे कळायला लागतं. ड्रिंक्स घेणे म्हणजे अट्टल दारूडा असणे असं नव्हे किंवा वीकेंडना मुवीज पाहणे म्हणजे निव्वळ टाईमपास करणे असं नव्हे..असे नवनवीन साक्षात्कार व्हायला लागतात.

नोकरीला असणा-यांना एवढ्यात कळून चुकतं कि कॅम्पस प्लेसमेंट हे केवळ मानचिन्ह आहे. ऑफिसेस लांबून जितकी आकर्षक दिसत असतात, आतून तितकीच क्रूर असतात . आणि खूप काम करायचा तसाच निव्वळ आराम करायचादेखील कधी कधी कंटाळा येतो.. इंटरनेटचं कौतुक नेट कॅफे मध्ये जितकं होतं तितकसं राहत नाही.आपल्या नेटवरच्या ,मेल थ्रू केल्या जाणा-या activities चं इतरांना काय तर आपल्यालाही तितकसं अप्रूप राहत नाही. दर महिन्याला जमा होणारा पगार एवढीच काय ती जमेची बाजू..बाकी सगळा खर्चच!

मैत्री ही केवळ मैत्री नसते - तिला स्वतःच्या काही नियम व अटी असतात. हे आपल्याला कळतं आणि पटतं पण! कॉलेजात असताना अडीनडीच्या वेळी धावून येणारे सगळेच मित्र अथवा मैत्रिणी आता तेवढे क्लोज राहत नाहीत."हर एक फ्रेंड जरुरी होता है" हे वाक्य फक्त ऐकायलाच बरं वाटतं!! काहीजणांना आपण हक्काने कुठेही बोलावू शकत नाही , काहीजणांना हक्काने आपण बोलावू शकतो पण ते येतीलच हे छातीठोकपणे सांगू शकत नाही.. पैसा,पद आणि प्रतिष्ठा हि कितीही नाही म्हटली आणि मनाने कितीही नको म्हटलं तरी मित्र मैत्रिणी आणि नाती ठरवण्याची माध्यमं बनतात! अर्थात आपल्यालाही सगळीच नाती जपणं शक्य होतंच असं नाही.

याच वयात कॉलेजात जुळलेली मनं तुटतात... शेकडो प्रेमभंग होतात... शेकडो वेळा ऐकलेल्या आणि सहस्र वेळा पुटपुटलेल्या 'आय लव्ह यू' या वाक्यामागे भावनादेखील असतात याची जाणीव होते. आपलं कधीकाळचं क्रश आठवलं तरी आपल्याला आपलंच हसू येतं. नुसतं आवडणं,आकर्षण,गोड गोड बोलणं आणि ओढूनताणून केलेलं प्रेम म्हणजे खरं प्रेम नव्हे हेही उमगतं. एकेकाळचं आपल्या जीवापाड आवडीचं माणूस कधी, का आणि कसं 'एक्स' होतं कळतही नाही. ते लग्नाच्या बोहल्यावर चढतं आणि तुम्ही केवळ पहात राहता! तर कधी 'प्रेम' या शब्दाचा अर्थ नव्याने उमगू लागतो. शाळा कॉलेजात न मिळालेली जवळची व्यक्ती ध्यानीमनी नसताना आपल्याला बाहेरच्या जगात मिळते. नोकरी नाही म्हणून सोडून गेलेल्या गर्लफ्रेंड्सपेक्षा किंवा कॉलेज संपल्यावर डच्चू देणा-या बॉयफ्रेंड्सपेक्षा वेगळं कोणीतरी जगात असतं हे सुद्धा आपल्याला समजतं..

या काळातच आपल्याला 'एखाद्याचा हात पकडणं' आणि 'खरोखरीचं प्रेमात पडणं' यातला फरक कळतो.. तर कधी कळतं कि प्रत्येक मिठीचे अर्थही वेगवेगळे असतात.. एखाद्याशी बोलणं प्रत्येकवेळी तोच प्रत्यय देतही नाही.. प्रॉमिस किंवा वचन हि गोष्ट जितक्या फास्ट देता येते तितक्या फास्ट मोडताही येते आणि हेही उमजतं कि काहीवेळा कोणीतरी म्हटलेलं 'बाय' हे कायमस्वरूपी असतं.. पण यातल्या कशालाच आपल्याकडे उपाय नसतो!

आपल्याच कॉलेजच्या नव्हे तर इतर कुठल्याही कॉलेजच्या कॅम्पस मध्ये गेलो तर आपण मोठे झालो आहोत हे आपोआपच कळून येत.. कॉलेज मधल्या मुली आणि मुलं अचानक शाळकरी वाटायला लागतात. सबमिशन च्या फाईल्स घेऊन त्यांची चालणारी लगबग बघितली तर उगाचच हसू फुटतं.त्यांच्या वयात आपण पहात असलेली स्वप्नं ही आपली नव्हती तर आपल्या आईबाबांची होती याची जाणीव होते. पण तोपर्यंत आपण स्वप्न बघणंच विसरून गेलो आहोत हे सत्यही स्वीकारावं लागतं.

मोबाईल मधलं एस एम एस हे एकेकाळी अग्रेसर असणारं संपर्क आणि दळणवळणाचं माध्यम अचानक मागे पडतं. अगदीच एस एम एस करायचा झालाच तर शॉर्टकट करून आपला मेसेज १६० कॅरेक्टर्स मध्ये बसवणारे आपण आता एक्स्ट्रा स्पेस मुळे २ एस एम एस गेले तरी फारशी तमा बाळगत नाही! प्रीपेड सर्विसेसचे या वयातले ग्राहक पोस्टपेडकडे वळतात आणि extra talk-time , फ्री एस एम एस, नवीन नवीन प्लान्स यांची एकमेकात चालणारी चर्चाही खुंटते. एकेकाळी नुसत्या missed call ची भाषा अवगत असणारे आपण बारीकसारीक गोष्टींकरताही फोन कॉल वाया घालवायला मागेपुढे पहात नाही. प्रीपेडचं दीड महिन्याचं असणारं बजेट आता केवळ पोस्टपेडचं मंथली रेंट झालं तरी आपल्याला फारसा फरक पडत नाही.

याच वयात कधी कधी आपल्या आवडीनिवडीही बदलतात. हार्ड मेटल वरून अचानक सुफी संगीत आवडायला लागतं.. कथांपेक्षा कादंब-या जवळच्या वाटायला लागतात. न्यूज मधलं स्वारस्य वाढतं. शेवटच्या पानावरून पेपर वाचायला सुरुवात करणारे आपण आता पहिल्या पानावर नजर फिरवूनच पुढे जातो. राजकारण थोडंफार का होईना लक्ष वेधून घ्यायला लागतं. नेहमीच कोणा ना कोणाबरोबर असण्यापेक्षा कधी कधी स्वतःलाही वेळ द्यावासा वाटायला लागतो. वेगळ्या शब्दात एकटेपणा जवळचा वाटायला लागतो. काहीतरी करावं अशी प्रचंड उर्मी सारखीसारखी दाटून येत राहते. कधीकधी कडू गोड आठवणी मनात गर्दी करतात.आणि तशी गर्दी झाली की हल्ली हल्ली पर्यंत माहीतसुद्धा नसलेली आणि केवळ कोणाकोणाच्या लिखाणातून वाचलेली 'कातरवेळ' म्हणजे संध्याकाळचा नेमका कोणता काळ हे सुद्धा उमगतं!

आपण मोठे झालोत ही जाणीव इतर लोकही आपल्याला करून देतात. 'लहान आहे, त्याला/तिला काय समजतंय/ काय विचारायचं' असं परवापरवा पर्यंत म्हणणारे घरातले आता बारीकसारीक गोष्टी आपल्या कानावर घातल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत... 'चिंता करितो विश्वाची' म्हणजे काय असतं त्याचा आपल्याला प्रत्यय येवू लागतो आणि जबाबदारीची जाणीव होते. घरच्यांसाठी भिन्नलिंगी फ्रेंड्स आता निव्वळ मैत्रीपुरते राहत नाहीत आणि स्थळ म्हणजे 'जागा' आणि कर्तव्य म्हणजे 'काम'  एवढेच माहित असणा-या आपल्या कानावर  हे शब्द निदान त्यांचे निराळे अर्थ तरी माहित असावेत या हेतूने घातले जातात!!

पंचविशी!! आयुष्याचा रौप्यमहोत्सव तो.. तब्बल पंचवीस वर्ष. त्यातली पहिली ५ वगळता आपण कसे घडत गेलो याच्या खुणा आणि ओरखडेसुद्धा आपल्याच मनावर हलकेच उमटलेले असतात. आता आपल्याला कोणी छडी मारून शिक्षा करणार नसतं, कान पिळून वर्गाबाहेर उभं करणार नसतं, 'उलट उत्तर करायची नाहीत' असा दम भरणार नसतं, 'आता तरी सुधार' असा सल्ला देणार नसत. सुधारायचं वय निघून गेलेलं असतं आणि आतापर्यंत आपण जो मुखवटा चेह-यावर चढवलेला असतो तो घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची असते!

कालाय तस्मैः नमः!