सोमवार, ५ एप्रिल, २०१०

विखुरलेल्या आठवणी..रात्रीचे ११:३०.. मी पीएमटीतून शिवाजीनगरला उतरलो आणि चालायला लागलो.. "साहेब नाशिक का? औरंगाबाद डायरेक्ट गाडी आहे.. चला कुठे परभणी का ? शनी शिंगणापूर...शनी शिंगणापूर..." मी "नाही नाही" म्हणत रस्ता काटत होतो.. अगदीच एखादा "कुठे जायचं ते तरी सांगा.. व्यवस्था करतो.." असा मागे लागला तर "मी इथलाच आहे, घरी चाललोय " अशा बिनधास्त थापा ठोकत मी निघालो होतो.. मनात विचारचक्र सुरु झालं.. अगदीच नाही तर या नरकयातनांतून सुटका होणार तर.. आज माझा शेवटचा पुणे-नाशिक प्रवास! शेवटचा म्हणजे जबरदस्तीने आणि माझ्या इच्छेविरुद्ध करावा लागणारा शेवटचा पुणे-नाशिक प्रवास..

आठ महिन्यांपूर्वी एका शुक्रवारच्या प्रसन्न संध्याकाळी साहेबाने विचारलं नाशिकला जायला तयार आहेस का? मी विचारलं “किती ड्युरेशनसाठी ?” “जास्तीत जास्त ३ महिने! नवीन ब-याच गोष्टी मिळतील शिकायला” वगैरे टीपिकल डिस्कशन झाल्यावर मी तयारी दर्शवली.. मेल आलं "सोमवारी तुला तिकडे जायचंय" या अर्थाचं..! धक्काच बसला.. हे इतकं फास्ट होणार होतं? मला कल्पनाच नव्हती.. शनिवारी मी छोटी मोठी खरेदी केली आणि रविवारी नाशिकला प्रस्थान.. तो पहिला रविवार.. नंतर त्या तीनाचे आठ महिने कसे आणि कधी झाले ते आमच्या कंपनीलाच माहीत!

पहिल्या इम्प्रेशनमधेच मला नाशिक आवडलं नाही! का कोण जाणे.. म्हणजे शहर सुंदर आहे.. रेखीव.. ठिकठिकाणी बागा..सजवलेले चौक वगैरे.. पण मला गेस्ट हाउस मिळालं होतं पार एका टोकाला आणि मला जावं लागायचं MIDC एरिया मध्ये.. थोडक्यात बराच लांब! आठवडाभर जायचे १०० आणि यायचे १०० वगैरे देऊन नाशिकच्या मदमस्त रिक्षावाल्यांवर बरेच उपकार केल्यानंतर मला ते गेस्ट हाउस सोडणं भागच पडलं!

सुदैवाने मला तिथे रघू भेटला.. हा पुण्याचाच! माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये माझ्या ओळखीचा झाला होता.. फार नाही पण ४-५ वेळा बोललो असू आम्ही काहीतरी.. त्यानंतर त्याने कंपनी सोडली होती. पण त्या अगदीच अनोळख्या वातावरणात मला त्याचा प्रचंड आधार वाटला! तो पण २ महिन्यांपूर्वीच आला होता तिथे.. काही काळासाठी.. पण तो काही काळ कधी संपेल हे मात्र त्याच्या कंपनीने त्याला सांगितले नव्हते.. नशीब! कोणीतरी ओळखीचं मिळालं! पण त्याने माझी फार मदत केली.जणू काही आमची फार जुनी ओळख होती.. मला राहायची जागा मिळवून दिली.. मला ऑफिसमध्ये जायला यायला कंपनी दिली.. आणि महत्वाचे म्हणजे पुण्याला परत परत यायचा उत्साह टिकवून ठेवला.. संधी मिळाली की आम्ही पुण्याला निघत असू....

...हॉर्नच्या कर्णकर्कश्श आवाजाने माझी तंद्री भंग पावली. मी भुयारी मार्गात पोहोचलो होतो. तिथे कोणी बारीकसा आवाज काढला तरी घुमतो. लोक कशासाठी तिथे हॉर्न वाजवतात कोण जाणे! तेवढ्यात "अवी" चा फोन आला.

"कुठे आहेस तू? पोचलास का?"
"पोचतोय ५-१० मिनिटात" असं सांगून मी फोन ठेवला..
हा 'अविनाश' .. "हीना travals" चा माझा सिंगल पॉइंट ऑफ़ contact .. फोन केला की सीट ठेवायचा राखून.. अगदी जायच्या रात्री १० ला केला तरी! सहा महिन्यात कधी वाढीव भाडं घेतलं नाही त्यानं.. रघूचीच कृपा हीपण!

... पहिल्या आठवड्यातच एकदा चहा पिताना सिगारेटचा धूर हवेत सोडत त्यानं सांगितलं "आपला बसवाला आहे एक.. स्वस्तात सोडतो!" मी मान हलवत "ठीकेय" म्हटलं.. तोच हा अवी! हळूहळू मी नाशिकच्या वातावरणात मी रुळत होतो पण मन पुण्यातून बाहेर यायला तयार नव्हतं.. मला साधा निरोप सुद्धा घेता आला नव्हता कोणाचा.. त्यात हे ऑफिस.. शहरापासून बरंच दूर.. तिथपर्यंत यायचं म्हणजे तिथपर्यंत येणारं कोणीतरी शोधलं पाहिजे.. नसेल तर शेअर रिक्षाचा जीवघेणा प्रकार!

पुण्यातल्या ऑटोवाल्यांसारखा "नाशिकचे ऑटोवाले" हा सुद्धा स्वतंत्र शोध निबंधाचा विषय होऊ शकतो.. मला त्याचं महत्त्व फारसं वाढवायचं नाहीये म्हणून मी त्यावर काहीच लिहिणार नाही अस ठरवलं होतं तरीपण फुटकळपणे सांगायचं झालं तर ३ सीटर रिक्षामध्ये रिक्षावाल्यासकट ९ जण आणि पिआजिओ आपे सारख्या ६ सीटर रिक्षामध्ये १५ जण "बसवण्याची" करामत नाशिकचे रिक्षावालेच करू जाणे ! शेअर ऑटो हा नाशकाच्या श्रमिक जीवनाचा अविभक्त भाग. कारण जिथे जायचे शेअर ऑटोवाले घेतात १० रुपये तिथेच जायचे "स्पेशल" ऑटो घेणार ६० रुपये! "स्पेशल" ऑटो हा सुद्धा त्यांचाच स्पेशल शब्द. त्याचा अर्थ मागच्या सीट वर ज्याने "स्पेशल" रिक्षा केली आहे त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणी बसणार नाही.. रिक्षाड्रायव्हर च्या बाजूला बसू शकतात! ते लोक आपण जातो तेव्हढंच अंतर त्याच रिक्षातून जाणार आणि १० रुपये देणार..आपण मात्र स्पेशल रिक्षा केलेली असल्यामुळे ६० रुपये द्यायचे!! यातून होणारा मानसिक त्रास वाचवण्यासाठी एकाच पर्याय.. मी सुद्धा शेअर ऑटोने जायला सुरुवात केली.

सकाळी ह्या कसरती करत ऑफिसला पोहोचायचं. दिवसभर प्रचंड काम आणि रात्री परत याच्या त्याच्या विनवण्या करत एमआयडीसीच्या बाहेर यायचं.. ब-याचदा माझा प्रेमळ बॉस मला अर्ध्या रस्त्यात किंवा सोयीस्कर ठिकाणी सोडायचा पण अन्यथा ससेहोलपट ही होतीच! सकाळी १.५ किमी चालून शेअर रिक्षा जातात त्या ठिकाणी पोहोचायचं; रात्री तसंच एक किमी चालत तसलाच स्पॉट गाठायचा.. हा रस्ता मात्र अंधारा.. कारण तिथे कोणत्या कंपनीचं ऑफिस नव्हतं.. एफ एम वरच्या गाण्यांचीच काय ती सोबत.. अनोळखी ठिकाणी असल्या वातावरणात अजूनच एकटं एकटं वाटायला लागतं..

...मोबाईलच्या रिंगने मी त्या दु:स्वप्नातून बाहेर आलो… 'अवी' च होता. 'येतोय रे बाबा.. मी काय पळून नाही चाललो' मनातल्या मनात पुटपुटत मी फोन उचलला.

"कुठे आहेस रे?"
"अंडरग्राउंड रोड ने बाहेर पडतोय.. पोचेन एक ५ मिनिटात.."
"ठीक आहे लवकर ये, काउंटर ला येणारेस कि डायरेक्ट बसमध्ये?"
"डायरेक्ट बसमध्ये" म्हणून मी फोन ठेवला.. अवीचा हा दरवेळचा प्रश्न मला कधीच कळला नाही.. पण दोन पर्यायांमधला दुसरा पर्याय मला निदान कळायचा तरी म्हणून मी तोच निवडायचो!

हायवे वरून थोडसं अंतर चाललं की "हीना" उभी असलेली दिसू लागायची.. माझी वाट बघत! क्लीनर आतासा काचेवर फडका मारत होता.. ह्या 'अवी'ला ना भलतीच घाई! मी मनातल्या मनात त्याच्यावर चरफडत नकळत वाढवलेला चालण्याचा स्पीड कमी केला.. ११:४५ तर झालेत.. १२ शिवाय हे लोक बस चालू पण करणार नाहीत.. आणि उगीच "पोचला का,पोचला का" चा धोशा.. पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी दिवसाचा धंदा गुंडाळून मागच्या सीटवर पथारी पसरायची तयारी चालू केली होती.. पुन्हा रिक्षावाले.. चेंज द सब्जेक्ट.. काहीजण विरंगुळा म्हणून पत्ते खेळत होते.. हि काय वेळ आहे? चेंज द सब्जेक्ट.. ओके.. विरंगुळा..

कॉलेज रोड हे आमचं मुख्यत्वे विरंगुळ्याच ठिकाण.. लोक इथे आपापल्या ‘विरंगुळ्या’सोबत अथवा विरंगुळा शोधण्यासाठी येत.. ज्या वीकेंडला पुण्याला जाता येत नसे अथवा आठवड्याच्या मधेच चुकून एखादी सुट्टी आली तर हे आमचं ठरलेलं ठिकाण! रोड वर भटकून दमलो की मी "सिनेम्याक्स" चा आधार घेत असे.. सर्वात जवळच्या अंतरावर असणारं मल्टीप्लेक्स. वीकेंड असला कि त्यांचे भाव डायरेक्ट २०-२५ रुपयांनी वाढत! पण अडला हरी म्हणतात ना.. आणि असे बरेच "अडले हरी" लाईनमध्ये उभे असत.. दरम्यान च्या काळातले अगदी टूकार मूव्हीज सुद्धा मी पाहिले.. नाईलाज म्हणून! नाहीतर आणखी काय करणार?

हॉटेल्स मात्र बरीच फिरलो आम्ही तिथे.. ब-याचदा जेवायला कोणत्या ना कोणत्यातरी हॉटेलात जायचो.. कारण जिथे मेस लावायची ठरवत होतो त्याने काही दिवसातच मला माझा विचार बदलायला भाग पाडलं! पातोळ्या, शेव असल्या निर्जीव पदार्थांना तेलाचा तवंग असणा-या रश्श्यात मिक्स करून जो पदार्थ बनत असे त्यालादेखील तो मूळ पदार्थाची भाजी म्हणत असे! जस कि 'शेवभाजी' इ. इ. मी तोपर्यंत शेव हा प्रकार चहाबरोबर किंवा फावल्या वेळात तोंडात टाकायला वगैरे म्हणून खाल्ला होता.. पण जेवणाबरोबर?? तोसुद्धा आठवड्यातून दोनदा आणि कम्पल्सरी? मग हॉटेल्सचा आसरा घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं! इथे तुम्हाला "ताटात काय येणार" याच गेस वर्क तरी नाही करावं लागत! कुसुमाग्रजांच्या घराजवळ एक छान हॉटेल आहे. "वैदेही" नावाचं. खरच सुंदर.. आमच्या नेहमीच्या जाण्यामुळे तिथला कॅप्टन आम्हाला मेनू कार्ड मध्ये नसलेले पदार्थ स्वतःहून सांगत असे.. आणि ते छानही असत.

..बसजवळ पोचताच माझी नजर भिरभिरू लागली.. विनोद आणि इतर नेहमीचे वारकरी दिसले.. मी त्यांच्याजवळ गेलो.. काय केलं दोन दिवस? किती नंबर सीट? वगैरे जुजबी आणि निरर्थक प्रश्नावली संपल्यावर काही वेळाने आम्ही बस मध्ये चढलो.. निरर्थक यासाठी कि ब-याचदा विशेष काही केलेलंच नसे वीकेंडला.. याच बसने शुक्रवारी मध्यरात्री नाशिकहून निघून शनिवारी पहाटे पुण्यात पोचल्यामुळे सकाळी उशिरापर्यंत उठणं होत नसे.. आळसावलेल्या अवस्थेत काय प्लान करणार? त्यामुळे शनिवार वायाच जायचा आणि रविवारी रात्री निघायाचच असल्याकारणाने काही मेजर प्लान करणं शक्यच नसायचं.. उगीच याला भेट, त्याला बोलाव, असल्याच गोष्टी व्हायच्या.. अन्यथा पिक्चरचा प्लान. येऊन जाऊन प्रत्येकजण तेच करायचा.. ज्यांचं घरच पुण्यात होतं ते लोक तर तंगड्या ताणून झोपण्याव्यतिरिक्त इतर काही उद्योग करत नसत. त्यामुळे या "काय केलं ?' वगैरे प्रश्नांना फारसा अर्थ नसायचा. उगीच बोलायला काहीतरी सुरुवात व्हावी म्हणून! आणि झोपणा-या माणसाला सीट नंबर विचारून काय फायदा? तरी पण आम्ही विचारत असू..

…१२ वाजून पण गेले..बघायला गेलं तर सोमवार सुरु झाला! मी सीट मागे ढकलली आणि रेलून खिडकीतून बाहेर बघत राहिलो.. खरंच आपले हाल झाले नाशिकला कि आपणच एन्जॉय नाही करू शकलो? एवढी "सिटी ऑफ पिल्ग्रिम्स" म्हणतात पण आपण त्र्यंबकेश्वर वगळता कुठेच नाही गेलो.. अगदी पंचवटीसुद्धा. मुळात पुण्यातून ज्या पद्धतीने जावं लागलं त्यामुळे असावं कदाचित.. लोक तर गाड्या करून वगैरे जातात नाशिकला वणीच्या देवीकडे, दिंडोरीला आणि आपण? तरीपण काही कमी मजा नाही केली.. ऑफिसच्या मुलांबरोबर गेस्ट हाउस ला केलेली धमाल.. आय-पी-एल च्या निमित्ताने घातलेला धिंगाणा.. सुला विनेयार्ड (कि वाईनयार्ड?) ला झालेलं गेट-टुगेदर.. सीसीडीची बेचव कॉफी.. 'बंजारा' मधला साईट स्क्रीन आणि वेताच्या खुर्च्या.. दादासाहेब फाळके स्टेडीयम मधला रॉक-शो.. लोकांच्या 'मकालू' मधल्या सेंड-ऑफ आणि बर्थ-डे पार्ट्या.. ब-याच चांगल्या आठवणीसुद्धा आहेत की!

.. अवि आला..
"तुझी विंडो सीट आहे.."
"मला नकोय विंडो"
"का?"
"थंडी वाजते रात्री"
"बरं.. बस इथेच. किती आहे नंबर? ७ का? ठीकेय"

स्वत:च प्रश्न विचारून स्वत:च उत्तर देत अवीने तिकीट दिलं.. याला सांगावं का? मी नसणारेय यापुढे म्हणून! पण त्याला काय फरक पडणार आहे? मी ज्या रविवारी नसायचो तेव्हा त्याने कधी नाही विचारलं तर कशाला सांगायचं? जाऊ दे.. सगळ्यांचीच साथ सुटणार आता.. हा नाशिक-पुणे-नाशिक वाला वारकरी संप्रदाय.. नाशिक मधले ऑफिसचे लोक.. कॉलेज रोड, सिटी सेंटर मॉल... बंजारा मधला डी जे.. 'वैदेही'चा कॅप्टन... हॉस्टेलवरचं पब्लिक.. गेस्ट हाउस...अवी आणि हीना सुद्धा!

मध्यरात्रीचे १२:३० …बस चालू झाली आणि एक एक करत पुण्यातली ठिकाणं मागे पडायला लागली.. मी येणारेय परत.. पण यावेळेला परत जाण्यासाठी नाही.. मी मनातल्या मनात म्हणालो.. रात्रीच्या शांततेत इंजिनाचा आवाज घुमत होता.. आणि हीना तटस्थपणे आपल्या मार्गावर मार्गक्रमणा करत होती....

११ टिप्पण्या:

 1. akhilesh..
  lekh apratim aahe..jya prakare tu pratyek goshta ani situation explain kartos..tyachyanech kharatar he evdha apratim hota..
  lay ch bhari..!!
  keep writing..!

  उत्तर द्याहटवा
 2. @akhi,

  Sudharlas re tu, marathi madhe changle BATTIS marayla lagalayes...

  Bar Blog Sunder hota, Mantramugdha zalo wachun, watale ki wachatch rahawe.... KOUTUK Sohla ungach.....


  Ajun ek.... Kahihi aso Rikshowwale, Mess sodun jar settle whayche asel tar Nasik--no comparison.....

  Shikals hi bharpur tu, kadhi pai n chalela, n-kam kelela manushya, agadi kami welat khup kahi shikala !!!!!!!


  Amol

  उत्तर द्याहटवा
 3. akhilesh
  article khup chhan ani realistic aahe it teaches a lesson majhyasarakhya lokkanna jyana sagala ayata milata

  उत्तर द्याहटवा
 4. are akhlesh 1dam chan lihlas re.
  agadi tantotant varan kartos tu.

  an akhilesh je punyat 2-3 varshat tu shikla nahis te nashik adhe shikla asashil :)
  mal athvat tuze ratri 11.30 wajtache nashik ST standvr sales countervar zalele bhandan.kiti bhandla hotas tu suttya paishnvarun.

  gauri he fakt article nahi xperince ahe nashik-pune-nashik samprdayacha.

  ani punyat rahun zopnarya lokanmadhe mich ahe ;)

  उत्तर द्याहटवा
 5. mitra kharatar mala jara vaitach vaatale, tujhi nashikbaddalchi samajut vachun. bahuda pune hi tujhi swapnanagari asavi. amolchya mhananyanusar nashik hi kharach settle honyasarakhi jaaga aahe. mhanoontar to poonyala gelay aani mhatara jhalyavar nashikmadhe sthaayik (settle) honyasathi yenar aahe.
  baki lekhabaddal, shevati todalyasarakhe vaatale, ka mahit nahi. aani poornataha prathamik garajanchach vichar kelela disatoy.

  उत्तर द्याहटवा
 6. अमोल ला शाल-जोडीतले फटके दिलेस ते समजले बरं!! आणि नाशिक बद्दल "शहर सुंदर आहे.. रेखीव.. ठिकठिकाणी बागा..सजवलेले चौक वगैरे.. " असा चांगलाच उल्लेख आहे रे मित्रा.. "पहिल्या इम्प्रेशनमधेच मला नाशिक आवडलं नाही! का कोण जाणे.." हा मलाच पडलेला प्रश्न आहे.. काही अनुभवांमुळे मत वाईट झालं हे खरं असलं तरी ते काही फायनल मत नव्हे..वैयक्तिक मत आहे ते.. आणि लग्न करून सेटल व्हायला वगैरे नाशिक खरच चांगल आहे. मी पण अग्री.. पण मी सामान्य माणूस आहे रे... प्राथमिक गरजांचा विचार करणं स्वाभाविकच आहे नाही का?

  उत्तर द्याहटवा
 7. कुठला शहर वाईट आणि कुठला चांगला हा खरा च वादा चा मुद्दा आहे (वाद घातला ही पाहिजे ..नाहीतर बिचार्या "अस्मिता" ची किम्मत कमी होते )..
  ...मी पुण्याचा असल्या कारणाने पुण्याबद्दलचा माझा मत चांगला असणा हा काही दैवी योग नाही ....पण अखिलेश ने जास्त जग बघितला आहे (निदान माझ्यापेक्षा तरी नक्की च जास्त)... आणि तो मुळ चा कोकणातला असल्याने कसला ही पूर्वग्रह असण्याचा प्रश्न च नाही ..हे लक्षात घेता .. त्याच्या "पुणे चांगला आहे आणि नाशिक तितकासा नाही " या उक्ति ला महत्वा प्राप्त झाला आहे ( जिवंत असताना सुध्हा माणसाला महत्वा प्राप्त होऊ शकता ....स्पेशल केसेस मधे..अखिलेश ची त्यातली च एक केस ) ...
  तरी सर्व नाशिक प्रेमी जनतेने (जरी भावना दुखावल्या गेल्या असतील तरी) पुणे चांगला च आहे हे मान्य करायला हरकत नाही (अमोल आणि विनोद तुम्ही दोघानी पण आपसात चर्चा करून सत्या ची आस आणि कास धरावी )...
  उदास आणि भकास या शब्दांचा खरा अर्थ काय असतो याचा मी नाशिक मधे प्रत्यय घेत असताना च ...एके दिवशी अखिलेश ने नाशिक मधे प्रकट होणे आणि त्याचे तमाम-खासमखास मित्रमंडल असताना सुध्हा माझ्या सारख्या पामरा बरोबर सर्व सुख-सोयी-सम्पन्न गेस्ट हाउस सोडून शिफ्ट होणे .....याला च नशीब वगैरे असला काहीतरी म्हणतात बुवा लोक.
  त्यानंतर जी काही माझ्या मेंदू ची धुलाई (brainwash) झाली....ती इतिहासात (माझ्या आयुष्या च्या ) अमर राहिल
  .............. (क्रमश:)

  उत्तर द्याहटवा
 8. are must lihle ahes tu..
  sagle incidence dolyasamor ubhe keles .. ekdam live vatte :)

  उत्तर द्याहटवा
 9. @Dipti : कौतुकाबद्दल thanks गं..अशीच भेट देत राहा अधून मधून..

  उत्तर द्याहटवा
 10. @rohangaribe : प्रतिक्रिया आवडली.. प्रोत्साहनपर शब्दांबद्दल औपचारिक आभार!
  @gauri : :) जॉब मिळाल्यानंतर तुला एव्हाना बरेच अनुभव आले असतील.. या प्रतिक्रियेच्या वेळी तुझं शिक्षण चालू होतं त्यामुळे हि प्रतिक्रिया ग्राह्य धरत आहे!
  @vinod : काही गोष्टी विसराव्या म्हटल्या तरी विसरता येत नाहीत... बरेच लक्षात ठेवण्यासारखे क्षणही होते नाशकात..असो..हा लेख लिहून तुझी इच्छा आणि माझ्याकडे असणारी मागणी दोन्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे
  @RaghuRaj : क्रमशः चं समाप्त करण्याची तसदी घेणे! ;) अन्यथा.... ;)

  उत्तर द्याहटवा
 11. माझ्या नाशिक मधल्या रूम वर चे काका ..ज्यांच्याशी बोलायला मला २-३ महिने लागले....अखिलेश ने माझ्या रूम मध्ये एन्ट्री मारल्या मारल्या पहिल्या काही मिनिटात त्यांना बोलता करून टाकला ...आणि माझा दुसरा रूम पार्टनर "डॉक्टर सुनील" ...तो पण काही दिवसात अखिलेश भक्त बनला...इति अखिलेश महिमा ...लवकर च अखिलेश ला "मानकर सदन " "खानावळ" आणि "महिंद्रा" मध्ये "अक्की" म्हणून लोका ओळखायला लागले...३ महिने घालवून सुद्धा जी माणसा मला ओळखायची देखील नाहीत ...तीच लोका आता मला अखिलेश बरोबर असणारा लंबू म्हणून ओळखायला लागली...अखिलेश ने थोडक्या दिवसात कामात पण खूप जास्त प्रगती दाखवून दिली...या सगळ्या गोष्टी चालू असताना च मी कुठेतरी घरापासून लांब आल्यामूळे थोडासा दुखी .....आणि घर का करियर या द्विधा मनस्थितीत होतो...पण त्याचवेळी कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुना चा कन्फ्युजन दूर केला...तसा च हा चष्मेवाला कोकणी कृष्ण माझ्या मदतीला धावून आला... आणि माझा घरी (पुण्याला) कायमचा परतण्याचा निर्णय मी पक्का करू शकलो...

  उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!