मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

कोणे एके दिवशी : उत्तरार्ध

पूर्वार्ध :
"मी इथच बसवलं होतं ग त्यांना.." सासूबाई रडायला लागल्या होत्या..
"आई तू रडू नकोस ग.. नक्की आठवून बघ"
 माणसाने आणि मेव्हण्याने आजूबाजूला धावत जावून पाहिलं. सगळीकडे माणसंच माणसं होती, त्या रखवालदाराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. कोणी सापडलं नाही.कोणाला काहीच सुचेना.
थोड्या वेळाने रखवालदार आला. तो नैसर्गिक विधी आटपायला गेला होता. माणसाला असा राग आला त्याचा! तो नसताना म्हातारी कुठे गेली असेल तर? इथे दुसरा माणूस बसवायचा नाही का? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारले.
"दादा, इथे एक आजीबाई बसल्या होत्या.."
"मी बसवलं होतं, तुम्हाला सांगून गेले होते.." सासूबाईना थोडासा धीर आला..
"हां  हां.. त्यी  बायी  व्हय.. ग्येली त्यी. मला म्हनली घरी जात्ये नि गेली.."
"कुठे घरी? अशी कशी जाईल? तुम्ही विचारलं नाहीत?"
"अवो मी कसं नि काय इचारू? कुटं हाय तुजं घर मनून? माजा काय संमंद कोन कुटं जातंय तेच्याशी?"
माणूस प्रश्न विचारून पस्तावला होता.. यावर काय बोलावं त्याला सुचेना...
" त्या इथल्या नाहीत.. बरं पण कुठल्या बाजूला गेली ते तरी सांगाल ?" मेव्हण्याने विचारलं..
"ह्या  बाजूला.."  भक्त निवासाच्या दिशेने त्याने बोट दाखवलं. वेळ न दवडता मेव्हणा भक्त निवासाकडे धावत सुटला. माणसाला काही सुधरेना.
त्याने बायकोला सगळ्यांना घेऊन भक्त निवासाकडे यायच्या सूचना दिल्या आणि तोही तिकडे झपाझप निघाला. जाताना नजर आजूबाजूला भिरभिरत होती. आईला भक्तनिवासाची खोली माहित असण्याची शक्यता फारच कमी होती आणि मुख्य म्हणजे खोलीची चावी माणसाजवळ होती!  दुस-या फ्लोअर वर पोचेपर्यंत मेव्हणा पडलेला चेहरा घेऊन येत होता.

"तुम्ही सगळ्या खोल्यांमध्ये शोधून बघा. चुकून कोणाच्या तरी खोलीत गेली असेल तर.. आम्ही जरा  आजूबाजूच्या एरियात शोधून बघतो." माणूस सांगत होता.
"ए मुलांनो आमच्याबरोबरच राहा. नाहीतर अजून ताप व्हायचा डोक्याला.." माणसाचं फ्रस्ट्रेशन वाढलं होतं.

म्हातारीला शोधायला सगळेजण वा-यासारखे सैरावैरा सुटले होते.

दुपारचे साडेतीन

"असं  कसं सोडून गेलात तुम्ही लोक म्हातारीला एकटीला? तेपण एवढं सोनं अंगावर असताना?"  चौकीतला पी एस आय 'मिसिंग' चा एफ आय आर नोंदवून घेताना विचारत होता. कोणाकडे काहीच उत्तर नव्हतं.
"पाटील, तुम्ही सांगितलेलं वर्णन लिहून घ्या आणि सगळ्यांना फोन करून ताबडतोब कळवा." तो एकापाठोपाठ एक सूचना करत होता
" अशोकराव, २ माणसं रेल्वे लाईन, स्टेशन आणि जवळच्या इलाक्यात जाऊदेत.. कोणीपण अननोन म्हातारी बाई दिसली तर विचारपूस करा. आणि हो, कुठे बॉडी दिसली तरी ताबडतोब रिपोर्ट करा म्हणून सांगा" तो शांतपणे सांगत होता. माणसाच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.
"साहेब तसं  काही झालेलं नसेल"
"हो पण आपल्याला शक्यता विचारात घेतली पाहिजे कि नाही. तुम्हीच तर म्हणताय कि बीपी ची गोळी घेतली नाही तर ती दुपारपर्यंत उभी सुद्धा राहू शकत नाही म्हणून..."
"हो.." माणसाच्या काळजातली धडधड कमी व्हायचं नाव घेईना.

"तुम्ही तुमच्या परीने शोध चालू ठेवा.. एफायार पण लॉग केला आहे मी. आमची माणसंही कामाला लावली आहेत.. काही काळजी करू नका. अहो अशी केस पेंडिंग राहिली तर संस्थानाची पण बदनामी होईल.. डोन्ट वरी. सद्गुरू आहेत!"

संध्याकाळचे साडेपाच :
संस्थानातल्या आवारातच एका ओट्यावर माणूस सुन्न होऊन बसला होता. एकूण एक कानाकोपरा धुंडाळून झाला होता. अगदी एकेका भिकारीणीकडे देखील निरखून पाहून झाले होते.
धाकटा  मुलगाही घामेजलेल्या अंगाने बसला होता. दोघांच्याही पोटात  अन्नाचा कण  नव्हता.
"काहीतरी खाऊन घेतोस का?"
"नको बाबा.. भूक नाहीये "
"ज्यूस तरी पी"  तो मुलाला जवळच्याच गाडीवर घेऊन गेला.
"काय सांगायचं रे तुझ्या काका आणि आत्यांना?" माणसाने मुलाला विचारलं."आई हरवली म्हणून?" माणसाला अश्रू आवरेनात."ते सुद्धा इतकेजण सोबत असताना?"
"बाबा, रडू नका न.. सापडेल आजी कुठेतरी." बापाला रडताना पाहून मुलाला ज्यूस घशाखाली उतरेना.
लांबून मेव्हणा येताना दिसला. म्लान, गलितगात्र झालेला. पोलिसाने एक बॉडी  ओळखायला बोलावलं होतं. माणसाचा धीर होत नव्हता म्हणून मेव्हणा गेला होता. माणसाने अश्रू पुसले. वाईट बातमी नसावी म्हणून सद्गुरुंची प्रार्थना केली.
" सुदैवाने आजींची नाहीये 'ती' बॉडी. पोलीस म्हणताहेत असं  कधी घडलं नाही. इथल्या रेकॉर्ड्स  मध्ये माणसं हरवल्याची नोंद नाही. सापडेल सापडेल म्हणताहेत पण अजून त्यांच्याकडे पण काही खबर नाही."
 माणसाने निःश्वास सोडला.
"खावून घे रे काहीतरी" त्याने मेव्हण्याला सुचवलं. मेव्हणा वडापाव च्या गाडीकडे वळला.
थोड्या वेळातच मोठा मुलगा आणि बायको एका दिशेने आले , त्याचवेळी सासूबाई आणि तिची सूनही पोहोचले. कोणाच्याच हाताला काही लागलं नव्हतं.
"ती जाणारी आजी आपली नव्हे न?" लांब दिसणारी एक म्हातारी दाखवत मोठ्या मुलाने विचारलं. क्षणभर सगळ्यांचे चेहरे डवरले. पण नंतर लुगड्याचा रंग बघताच ते  पुन्हा कोमेजले.

"आता तर चालणारी म्हातारी शोधूनही उपयोग नाही. मला वाटत नाही आई आता उभं राहायच्या अवस्थेत असतील." बायको ने सत्यावर बोट ठेवलं.
सगळे हताश झाले होते.
"एक सद्गुरूच बाहेर काढतील या संकटातून " मेव्हण्याने विश्वासाने म्हटलं.

संध्याकाळचे सहा:
दुपारपासून म्हातारी गावातल्या रस्त्यावरून फिरत होती. रस्ताही ओळखीचा वाटत नव्हता आणि लोकही. इतकी वर्ष या गावात राहून आपण रस्ता चुकतो याबद्दल तिला विषाद वाटलाच होता पण गावात कोणीही आपल्याला ओळखत नाही याचा जास्त ! पण तरीही कोणीतरी निदान मुलाच्या तरी ओळखीपाळखीचं माणूस भेटेल या आशेवर ती चालत होती. तेवढ्यात म्हातारीला एक शेती दिसली. बायका राबत होत्या. पायवाटेने ती खाली उतरली.
"ए मुली.. तुला माझ घर माहित आहे का?" तिने एका बाईला विचारलं.
"कोण ग आजी तू ? कुठे राहतेस?"
"मला नेमका पत्ता नाही सांगता यायचा. पण असाच रस्ता आहे. जास्वंदीची खूप झाडं आहेत आमच्या परसात."
बायका आपापसात चर्चा करू लागल्या.
'वेडी झालली दिसत्ये ह्यी म्हातारी'
'नाय ग..खानदानी आसंल.'
'कशावरून'
'आगं , आंगावर  दागिनं बग'
'व्हय गं.. रस्ता चुकल्याली दिसते' त्यांची चर्चा चालू असताना म्हातारी तिथून निघाली. पायवाटेने वर जाऊन मघाच्याच डांबरी रस्त्याने थोडं पुढे गेल्यावर एक साधारणसं तिच्या घरासारखंच  दिसणारं घर तिला दिसलं. घर बंद होतं. परसात जास्वंद नव्हती तर कापूस होता. घराच्या अंगणात जाऊन म्हातारी उन्ह उतरेपर्यंत बसून राहिली.

रात्रीचे साडेआठ:

म्हातारी तशीच बसली होती. एकटीच. उपाशीपोटी. दिवसभर चालून गमावलेलं त्राण तिला उठून उभंसुद्धा राहू देत नव्हतं. घर बंद होतं. एवढा काळोख झाला तरी नातवंडं शाळेतून परत आली नव्हती , मुलगा आणि सून सुद्धा ऑफिसमधून परतले नव्हते. 'घराचा दरवाजा कुलूपबंद करून कसे गेले हे लोक, ते सुद्धा मी इथे असताना?' म्हातारीला समजत नव्हतं. तिने स्वतःच शोध घ्यायचं ठरवलं आणि एका नव्या निर्धाराने ती बाहेर पडली.

रस्त्यावरून सायकल घेऊन चाललेल्या एका पांथस्थाला तिने थांबवलं.
"अहो, माझा मुलगा दिसला का हो तुम्हाला?"
"आजे, कोन तू नि कुटनं आलीस? तुज्या मुलाचं  नाव काय है?"
आजीने मुलाचं नाव सांगितलं आणि यायच्या दिशेकडे हात दाखवून 'कुटनं आलीस' चं उत्तर पण दिलं
"घर बंद करून कुठे गेलेत सगळे देवाला ठाऊक.." म्हातारी पुटपुटली
"आं ? काय म्हनलीस?" त्याने विचारलं.
"काही नाही .. निदान आमच्या शेजा-यांकडे तरी नेऊन सोडा तोपर्यंत.." म्हातारीने त्याला विनवणी केली..
"कोन हैत तुज्ये श्येजारी?
आधीचं मुलाचं आडनाव ऐकताच पांथस्थाचा बळावलेला संशय शेजा-यांच आडनाव ऐकताच दृढ झाला. त्याने ताडलं कि म्हातारी इथली -- या गावातली दिसत नाही . बहुतेक भ्रमिष्ट होऊन रस्ता चुकलेली दिसते. अंगावर एवढे दागिने घेऊन रात्रीचं एकटी फिरायचं धाडस इतर कोणी करणार नाही!
"आजे, मी सोडतो तुला घराकडं माज्या सायकलच्या शीटवर बश्शील?"
"नाही जमणार मला"
"बरं मंग चालत चलशील?"
"बरं" म्हातारी चालायला लागली.

रात्रीचे साडेनऊ :
"आजे तू थांब हितं" पांथस्थाने घराच्या बाहेर सायकल लावली आणि तो आत गेला. म्हातारी चिंताग्रस्त झाली. "कुठे घेऊन आलाय हा? ठिकाण तर ओळखीचं वाटत नाही. आपल्याला लुटायचा तर डाव नसेल याचा? घर दाखवायच्या बहाण्याने इथपर्यंत घेउन आला. आता आपले दागिने लुटून पोबारा केला तर? "  नाही नाही ते विचार तिच्या डोक्यात यायला लागले.
"माझ्या मुलाची पोलिसात ओळख आहे हां .. सांगून ठेवते.." पंधरा वीस मिनिटात हातपाय धुउन तो बाहेर येताच म्हातारीने त्याच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला.
तो शांतपणे हसला.
"बरं मंग.. माजे आये..चाल.. पोलीस टेशनात जाऊ.."
"मला नको नेऊ तिकडे.. मी काय चोर आहे ? तुला सोडणार नाही माझा मुलगा" म्हातारीने हल्ला सुरूच ठेवला.
"निदान तुजं घर तर शोदुया?" त्याने विचारलं..
"बघ हां ..घर शोधायच्या बहाण्याने मला लुटायचा डाव असला तर आधीच सांगते.. माझी नुसती हाडं आहेत.. उगीच झटापट करायला जाशील आणि माझा जीव जायचा.."
पांथस्थ पुन्हा हसला. त्याने आजीचा हात धरला आणि हळू हळू तो चालू लागला. म्हातारी कभिन्न अंधारातून त्याच्या मागून चालायला लागली.

रात्रीचे अकरा:
अर्ध्या तासापासून माणूस समाधीसमोर बसून होता. सगळे प्रयत्न थकले होते. गात्रं थकली होती. सगळे पर्याय चाचपून झाले होते. पोलिसांनी "बॉडी matching  टू  डिसक्रीप्शन - अलाईव्ह ऑर डेड" च्या सूचना देऊनही हाती काही लागलं नव्हतं.
"सद्गुरू , तुमच्याकडे आजपर्यंत काही मागायची वेळ आली नव्हती पण आज आली आहे...  मी माझी आई मागतो. माझी आई मला परत द्या.. मला आई परत द्या सद्गुरू.. इतक्या वर्षांच्या भक्तीनंतरही तुमच्या अस्तित्वावर माझं जे काही प्रश्नचिन्ह होतं त्यावर शिक्कामोर्तब करायचं कि ते कायमस्वरूपी मिटवून टाकायचं याचा निर्णय आज तुम्ही घ्यायचा आहे. पण एक निक्षून सांगतो, जर इथून मी आईविना परतलो तर तुमच्या दारात कधी पाउल टाकणार नाही.." माणूस ढसा ढसा रडू लागला..

रात्रीचे अकरा वाजून पाच मिनिटं :
खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. विषण्ण  मनाने कोणीतरी दरवाजा उघडला. बाहेर हवालदार उभा होता.
"तुम्ही सांगितलेल्या वर्णनाची आजी मिळाली आहे.. मुलाला घेऊन या असा धोशा लावलाय.मला वाटतं तुमच्याच आजी आहेत त्या. चौकीवर येऊन बघता का जरा?"सगळेजण वेड्यासारखे धावत सुटले.
"देवळात जाऊन बाबांना सांगून ये"  माणसाच्या बायकोने धाकटया मुलाला सांगितलं आणि कुलूप लावून तीदेखील चौकीच्या दिशेने पळत सुटली.

रात्रीचे सव्वा अकरा :
आजीला समोर बघून सगळ्यांच्या संयमाचे बांध कोसळले होते.. एकमेकांच्या गळ्यात पडून सगळे रडत होते. पोलिसांचे सुद्धा डोळे पाणावले होते..
"एक भला माणूस सोडून गेला यांना इथे."  पोलीस सांगत होते.
"त्यांना थांबवायचं नाही का?" माणूस विचारात होता..
"तेच ना .. त्यांना 'थांबा' म्हणत होतो तर 'नाही' म्हणाले.. म्हणाले 'खूप उशीर झाला आहे. घरी बायकामुलं वाट  बघत असतील' मग कसं थांबवणार.? तुम्ही बघून घ्या दागिने-बिगीने.. काही चोरीला वगैरे गेलंय  का?"
"साहेब, माझी आई मिळाली एवढं खूप आहे. तुम्हीच हे पैसे ठेवा थोडे. बक्षीस म्हणून." माणूस म्हणाला
"अहो पैसे कसले देताय.. आम्ही आमचं कर्तव्य केलं.."
"असू दे साहेब..  त्या भल्या माणसाला द्या शक्य झालं तर.."
"कुठे गेलेलात सगळे मला सोडून?" म्हातारीने सगळ्याने प्रतिसवाल केला..
लहान मुलाइतकी ती निरागसता पाहून कोणालाच हसावं कि रडावं ते सुचेना!!
"आम्ही कि तू ?"
"अरे असं काय? काल रात्री रस्ता चुकला तेव्हा घरी परत आलो ना आपण सगळे? मग? आणि आपलं घर बंद करून तुम्हीच लोक गेलेलात कुठेतरी.."
तेवढ्यात मेव्हणा आला.
"कुठे होतास रे?" माणसाने विचारलं.
"आजीला सुरक्षित आणलंस तर ११ प्रदक्षिणा घालेन मंदिराला, असा नवस केला होता सद्गुरूंना.. तो पूर्ण करून आलो" मेव्हणा म्हणाला.
माणसाने डोळे मिटून घेतले. प्रत्यक्ष सद्गुरुंचं नसलं तरी, कधीही न झालेलं सद्गुरुंच्या अस्तित्वाचं दर्शन त्याला झालं होतं. सगळ्या शंका-कुशंका पूर्ण मिटल्या होत्या..

पहाटेचे साडेसहा वाजले होते..
भक्त निवासाच्या गेट मधून एक राखाडी तवेरा बाहेर पडत होती.. आतमध्ये 'माणूस' आणि त्याचा कुटुंबकबीला होता..
माणूस पुन्हा एकदा खुश होता..

समाप्त

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

कोणे एके दिवशी : पूर्वार्ध

पहाटेचे साडेसहा वाजले होते..
भक्त निवासाच्या गेट मधून एक राखाडी तवेरा  आत येत होती.. आतमध्ये 'माणूस' आणि त्याचा कुटुंबकबीला होता..
माणूस खुश होता..
आदला दिवस :
राहतं घर ते सद्गुरूचं संस्थान हि त्याची दरवर्षीची वारी.. आठ-साडेआठशे किलोमीटरचा प्रवास आणि पुन्हा तेवढाच परतीचा रस्ता.. दरवर्षी एसटी महामंडळावर भिस्त ठेवून त्याचा हा प्रवास असे. डायरेक्ट बस सेवा उपलब्ध नसल्याने एकतर तीन टप्प्याचा प्रवास.. प्रत्येकवेळी रिझर्वेशनमुळे सीट नक्की असे पण हक्काची सीट मिळवायला देखील कोण कष्ट पडत.. आधी स्थानकावर जावून गुर्मीत असणा-या आणि उलट उत्तरं करणा-या अधिका-यांकडून रिझर्वेशन मिळवायचं, नन्तर गर्दीमध्ये घुसून आपल्या  बायकोला आणि पोरांना आता घ्यायचं, मग बसमध्ये नाही नाही त्या लोकांच्या नादाला लागावं लागायचं, त्यांनी practically अडवलेली सीट कायदेशीररित्या आपण कशी रिझर्व केली आहे हे त्यांना पटवून द्यायचं..एक ना दोन! एक टप्पा संपला  कि स्थानकावरच पुढची बस येईतो वाट पहा.. मग बस बदला पुन्हा तोच कंटाळवाणा खेळ..

जरी सद्गुरुंच्या अस्तित्वाचं दर्शन त्याला कधी झाल नव्हत तरी त्यांच्यावरची निस्सीम भक्ती त्याला दरवर्षी तिकडे खेचून नेत असे.. 'हि ओढ आहे म्हणजेच त्यांचं अस्तित्व आहे' असं समजून, बारा -चौदा (किंवा त्यापेक्षा जास्तच ) तासांचा प्रवास आणि मग नंतरची चार तासांची भक्तांची रांग पूर्ण करून तो समाधीपाशी पोचला कि शीण कुठल्याकुठे  पळून जात असे.. त्यांच्या मूर्तीचे आश्वासक डोळे मन प्रफुल्लीत करत असत. दोन मिनिटं भक्तिभावाने केलेली आराधना ; त्याला आधीचे दगदगीचे चोवीस तास विसरायची आणि पुढच्या सगळ्याला सामोरं जायचं बळ देत असे.

पहिल्यांदाच तो गाडी ठरवून सदगुरुंच्या पायाशी आला होता.. दरवर्षी जातात म्हणून यावेळेला 'मी पण येते' म्हणून त्याच्या सासूने सुद्धा टुमणं लावलं होतं, आई सुद्धा 'मला एकदा घेऊन जा' म्हणत होती.. आता एवढ्या म्हाता-या लोकांना घेऊन बस प्रवास करणं तोही अश्या पद्धतीने म्हणजे जीवाला अजूनच घोर. त्यामुळे हे गाडीचं प्रकरण करावं लागलं होतं.. मेव्हण्याला गाडी चालवता येत असे त्यामुळे त्याने त्याच्या मित्राची गाडी घेतली होती.

आदली
रात्र :
आता सगळे म्हणतात, पण गाडी सुद्धा तितकीशी आरामदायी नसते हे त्याला एव्हाना कळून चुकलं होतं. दिवसाचा साडेचारशे किलोमीटरचा पहिला टप्पा सुखरूप झाला पण पुण्यातल्या नातेवाईकांकडे घेतलेल्या   थोड्याश्या विश्रांती नंतरच्या रात्रीच्या प्रवासात एका रिकाम्या आणि सरळसोट  रस्त्यावर मेव्हण्याला डुलकी लागल्यासारखी झाली होती. त्यामुळे गाडीला छोटासा झटका बसला होता.
"तू झोपतोस का जरा? " विचारल्यावर 'घाबरू नका हो भावोजी,परत असं नाही होणार असं सांगून' मेव्हण्याने त्याला आश्वस्त केलं होतं पण हे कारण, अख्ख्या प्रवासभर माणसाची झोप उडायला पुरेसं होतं. मागे सासूबाई, आई आणि बायको निश्चिंत झोपल्या होत्या , एकदम शेवटच्या सीट्स वर मुलं आणि मेव्हण्याची बायको झोपली होती..

सारखं सारखं एका जागेवर बसून मुलं वैतागली होती . माणसाच्या आईला मुळात एवढ्या लांबच्या प्रवासाची सवय नव्हती .. इतका वेळ बसून ती फार अवघडून गेली होती . त्यात वय जास्त आणि वरून ब्लड प्रेशर अर्थात बीपी चा त्रास.. तिला संध्याकाळी निघतानाच भ्रम वाहायला सुरुवात झाली होती ..  'काय झालं रे? कधी पोचणार आपण? नको तो प्रवास .. परत मागे जावूया ..'  असं काहीबाही सांगून ती आपल्या मुलाचं मन वळवू पाहत होती . पण माणूस आधीच शिणला होता . 'गप बस ग आई जरा.. अगं ए तिच्या बी पी च्या गोळ्या दे तिला घेतल्या नसतील तर... ' असं बायकोला ओरडून तो पुढे बघत बसला.. आता ते आठवल्या नन्तर त्याला जरा भरून आलं. ' आपण तेव्हा पुढचे परतीचे प्लान्स करत होतो. दर्शन लवकर आटपल तर लगोलग निघायचं... तेवढीच एक सुट्टी वाचेल. वगैरे वगैरे. त्यामुळे आवाज चढला.. पण काही झालं तरी आपल्या म्हातारीची आपणच काळजी घ्यायला हवी' असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला.

त्यात रात्री एका ठिकाणी रस्ता चुकला!! मेव्हण्याने कुठेतरी चुकीचा रस्ता पकडला आणि २ एक किलोमीटर गाडी पळवली . मग माणसाच्या लक्षात आलं कि गडबड झाली ..  चिडचिड होणं ओघानं आलंच! मेव्हण्याला चार शब्द सुनावून झाले.  माणसाच्या वरच्या पट्टीतल्या आवाजाने गाडीतले सगळे जागे झाले होते.

"काय झालं, अहो? कशाला ओरडताय त्या बिचा-याला पण?" बायकोचा काळजीयुक्त सवाल..
"बघ याला.. झोप म्हटलं जरा वेळ, तर ते पण नाही. शेवटी चुकवला रस्ता. सांगत होतो, त्या टर्न वर लक्ष ठेव म्हणून... आता मागे जाण्याशिवाय पर्याय पण नाही"
"असेल अहो रस्ता इथून" तिने समजावणीच्या सुरात म्हटलं.
"कशाला उगाच? तो मागे जायचं म्हणतोय तर जाऊ या गं घरी.. कंटाळा आला या प्रवासाचा. किती वेळ गाडी चाललीच आहे. बसून बसून पाठीला रग लागली, हाडं दुखायला लागली माझी... पोरं पण कंटाळली आहेत " अर्ध्यात उठलेल्या म्हातारीने विषय समजून न घेताच रडगाणं सुरु केलं.

तिकडे दुर्लक्ष करून माणूस मेव्ह्ण्याला सूचना द्यायला लागला. गाडी वळवायला पण जागा नव्हती एवढ्या चिंचोळ्या रस्त्याला गाडी लागली होती. मग त्याने पण मान खाली घालून गाडी रिवर्स घेतली..म्हातारीची बडबड  चालूच होती. पण इतरांना झोप अनावर झाली होती. माणूस सवयीने तिचं बोलणं टाळायला शिकला होता आणि मेव्हण्याला तर जागं राहायला त्या आवाजाची मदत होत होती.

पहाटेचे  पावणेसात :

पहाटे  गावात शिरल्यानंतर संस्थानाचा पत्ता शोधताना परत नाकीनउ आले कारण एसटीची सवय. पण शेवटी ते पोचलेच! माणसाने धावतपळत जाऊन भक्त निवासाच्या बुकिंगच्या रांगेत जागा अडवली आणि थोड्या वेळात रूम्स च्या किल्ल्या घेऊन तो परत आला. एव्हाना मेव्हणा ड्रायव्हर च्या भूमिकेतून हमालाच्या भूमिकेत शिरला होता आणि त्याने सगळं सामान गाडीतून काढून खाली मांडलं होतं.

"चला,  बरं झालं रूम्स अवेलेबल होत्या. दोन रूम मिळाल्या आहेत.. चटचट सामान हलवूया आणि आंघोळी आटपून दर्शनाच्या रांगेत उभं राहू. लवकर गेलो तर गर्दी कमी असेल.' माणूस एकापाठोपाठ एक सूचना देत होता आणि बाकीचे त्या फॉलो  करत होते.

सकाळचे सव्वा आठ :

तासा दीड तासात सगळे रेडी होते. संस्थानाच्या दारात पोचताच माणसाला समजलं यंदापासून सगळ्या भक्तांसाठी वेगळी सोय करण्यात आलेली आहे. पुरुष, स्त्रिया आणि वृद्ध यांसाठी तीन वेगवेगळ्या रंग करण्यात आलेल्या आहेत. माणसाला बरं वाटलं. दर्शन देत नसले तरी सद्गुरू अनुभव देतात ते खरं आहे.त्याने स्वतःशीच विचार केला. म्हाता-यांना भल्यामोठ्या लायीन्मधून बसत उठत नेण्यापेक्षा हे बरं झालं. लगेच तो आणि मेव्हणा 'पुरुष', बायका आणि मुलं 'स्त्रिया' व सासुबाई  आणि आई 'वृद्ध' अशी विभागणी झाली.

दुपारचे पावणे दोन :
तब्बल साडे पाच तासांच्या भल्यामोठ्या रांगेनंतर दर्शन मिळाले. गाभा-यातून बाहेर पडताच त्यांच्या  'स्त्रिया' आणि लहान मुलं दिसली आणि माणसाच्या चेह-यावर हसू खुललं. 'चला, मुख्य काम झालं.'  तो पुटपुटला. कडकडून भूक लागली होती. पोरं मरगळलेली होती.
' आई आणि तुझी आई कुठेयत?' त्याने पृच्छा केली.
'येतीलच इतक्यात' बायको म्हणाली आणि सगळे  गाभा-याकडे डोळे लावून बसले. "छान झालं न दर्शन?'" म्हणेपर्यंत सासूबाई बाहेर पडल्या. आता पाठोपाठ आई येईल म्हणून त्याने डोकावून पाहिलं.

"आज्जी दिसत नाही ती?" मुलांनी एव्हाना ते हेरलं होतं.
"थांबा रे.. आई कुठे राहिली?" त्याने विचारलं.
'आई, अगं आई कुठायत?' पाठोपाठ बायकोने विचारलं.
"आई, अहो विसरलात कि काय त्यांना?" बायकोच्या भावजयीचा प्रश्न.
"कुठे मागे राहिल्या कि काय?' मेव्हणा 
"थांबा, थांबा" सासूबाई म्हणाल्या. " या माझ्या मागून" सगळे तिच्या मागून मुख्य दरवाज्याकडे जाऊ लागले.
"त्यांना उभं राहवेना, कालची दगदग खूप झाली. भ्रम पण व्हायला लागले आहेत. 'घरी जाऊया' म्हणायला लागल्या. म्हटलं अहो विहीणबाई  बरं वाटत नाही का? तुम्हाला झेपत नसेल तर रांगेबाहेर बसून विश्रांती घ्या. नंतर बोलावते तुम्हाला. तर म्हणाल्या मला काही झेपणार नाही. तुम्ही सगळे दर्शन घेऊन या. मी म्हटलं 'ठीक आहे ' आणि त्यांना आणून बाहेर बसवलं आणि तिथल्या शिपायाला सांगितलं 'आजींकडे लक्ष ठेवा' म्हणून" सासूबाईंची बडबड अखंड चालू होती. सगळे तिच्यामागून लगबग चालत होते.

एका बाकाकडे  आल्यानंतर सासुबाईन्चा चेहरा पांढराफटक पडला..
"काय झालं आई? कुठे बसवलं होतंस त्यांना?"
"इथेच.." सासूबाईंना काहीच सुधरेना.. घेरी आल्यासारखं व्हायला लागलं..
"कुठे इथेच? इथे तर कोणीच नाहीये"
माणसाची आई त्या बेंचवर बसलेली नव्हती!!

उत्तरार्ध :