शनिवार, २५ जुलै, २०२०

ड्रिमलँड (बालकथा)



अनीला झोपायला मुळीच आवडायचं नाही. दुपारी शाळेतून आल्यावर खाल्लं कि आई जबरदस्तीने झोपायला सांगायची पण त्याला ते अजिबात जमायचं नाही. 'स्लीपिंग इज सच वेस्ट ऑफ टाईम' तो म्हणायचा..
"अरे दुपारी थोडावेळ झोपलास कि संध्याकाळी फ्रेश वाटतं..ती शेजारची निधी बघ. तिच्या आईचं ऐकते. झोपते दुपारची, संध्याकाळी गार्डन मध्ये खेळताना जांभया देत नाही रहात तुझ्यासारखी" आई समजवायची. पण हा टक्क डोळे उघडे ठेऊन राहायचा. बेडवरच चुळबुळ चुळबुळ करायचा. आईचा थोपटणारा हात काढून टाकायचा .. गोष्ट सांग ना म्हणून आईच्या मागे टुमणं लावायचा. आई सांगायची पण गोष्ट; पण मग हा म्हणायचा "एवढीश्शी? अजून मोठी सांग.. मला झोप येईपर्यंत संपणारी"
संपणारी गोष्ट म्हणजे कापूस कोंड्याची. ती अनीला आवडायची कारण त्यात आईला पण झोपता यायचं नाही. दुपारी अनीला झोपवायचा प्रयत्न करताना आईलाच झोप अनावर व्हायची. मग त्याला सुटका झाल्यासारखी वाटायची..
"आईss "
"अं" आईचा झोपेतच आवाज यायचा
"मला झोपायचं नाही , मी बाहेरच्या रूममध्ये जाऊ ?"
"अं.."
मग अनी उठून जायचा... खेळण्यांशी खुडबुड खुडबुड करत राहायचा, चित्र काढत बसायचा, शाळेचा अभ्यास करायला सुरुवात करायचा मग कंटाळायचा आणि पेपर वर काहीबाही खरडत बसायचा, तोंडाने गाड्यांचे आवाज काढत गाड्यांनी खेळत बसायचा. नंतर ऊन्हं जराशी कलतात कलतात तोवर आईला उठवायला जायचा.
आई वैतागायची ... " काय पोरगा आहे , दोन मिनिटं डोळ्याला डोळा लागू देत नाही. स्वतःपण झोपत नाही मला पण झोपायला देत नाही"
"आई, स्लीपिंग इज सच वेस्ट ऑफ टाईम.. झोपलं कि खेळताच येत नाही " अनी म्हणायचा
"चल ना गार्डन मध्ये खेळायला जाऊ..निधी गेलीपण तिच्या डॉलला घेऊन!"

अनीला गार्डन खूप खूप आवडायचं, स्लाईड्स, सीसॉ, स्विन्ग्स आणि काय काय! मुख्य म्हणजे गार्डन मध्ये बेड नसायचा, जास्तीत जास्त बसता येतं तिथल्या हँडलवाल्या बेंचवर पण झोपता येत नाही. त्यामुळे घरापेक्षा त्याला गार्डनच जास्त आवडायचं. आता काही आजोबा लोक बेंचवर बसल्या बसल्याच झोपतात ती गोष्ट वेगळी. त्याला झोपपण आवडायची नाही आणि झोपणारे लोक पण. गार्डन मध्ये ट्रॅम्पोलिन पण होतं. आजूबाजूच्या कुठल्याच गार्डन मध्ये ट्रॅम्पोलिन नव्हतं. त्याला सगळ्यात ते आवडायचं. उंच उंच उड्या मारायला. बाबाच्या कित्ती मागे लागला होता तो कि घरात एक छोटंसं ट्रॅम्पोलिन घेऊया म्हणून तर बाबाने 'घरात कुठे ठेवायचं' म्हणून आणलं नव्हतं.

रात्री झोपताना तो बाबाला पण पिडायचा. मुळात झोपावं लागतं म्हणून त्याला रात्रपण आवडायची नाही! बाबा पण त्याला शाळेत काय झालं ते विचारायचा , घरात काय काय केलं त्याची चौकशी करायचा , गार्डन मध्ये केलेली मज्जा ऐकून घ्यायचा .. त्याचं बोलून संपायचंच नाही.. मग बाबा गोष्टीच्या पुस्तकातली गोष्ट वाचून दाखवायचा .. ते ऐकून झालं कि "तू आता गोष्टीच्या पुस्तकात नसणारी गोष्ट सांग ना " म्हणून तो बाबाच्यापण मागे टुमणं लावायचा. बाबा पण सांगायचा गोष्ट, कधी खिडकीतून दिसणाऱ्या चांदोबाची , कधी चमचमत्या चांदण्यांची, कधी ढगांची , तर कधी पऱ्यांची.. पण मग गोष्ट ऐकल्यावर हा त्यालापण विचारायचा 'एवढीश्शी? अजून मोठी सांग.. मला झोप येईपर्यंत संपणारी". आता बाबापण एवढी मोठ्ठी गोष्ट कुठून सांगणार आणि संपणारी गोष्ट म्हणजे कापूस कोंड्याची. अनीची आवडती! रात्री ती गोष्ट सांगितली तर बाबाच्या पण झोपेचं खोबरं आणि आईच्यापण ! बाबा म्हणायचा ," झोप रे बाबा" आणि अनी म्हणायचा "झोपू नको ना रे बाबा, झोपलं कि काही गंमत पण करता येत नाही.. स्लीपिंग इज सच या वेस्ट ऑफ टाईम!" मग बाबा हमखास गोष्ट सांगायचा ती लहानपणी स्वप्नांच्या दुनियेत खेळलेल्या खेळांची. गोष्ट ऐकता ऐकता आईच झोपी जायची आणि सांगता सांगता बाबालापण झोप यायची.. मग तो बाबाला विचारायचा "अशी काय स्वप्नांची दुनिया असते का कधी ? तुझ्या गोष्टी सगळ्या फिक्शनल!

बाबाचे डोळे मिटायला लागले कि बाबा 'संपली गोष्ट , आता झोपा' म्हणून दुसऱ्या मिनिटाला गाढच झोपून जायचा. अनीला मिठीत घेऊन .. त्याला तसंच आवडायचं. रात्री झोपायला तर आवडायचं नाही पण आई बाबा झोपल्यावर एकटं असल्याची भीती पण वाटायची. बाबाने मिठीत घेतलेलं असलं कि भीती तरी नाही वाटायची त्याला. हि रात्र होतेच कशाला ? ना खेळता येत, ना काही मज्जा करता येत झोपलं की ! स्लीपिंग इज सच या वेस्ट ऑफ टाईम!

पण एका रात्री गंमतच झाली. बाबांची गोष्ट ऐकता ऐकता नेहमीप्रमाणे आई झोपली आणि बाबा पण झोपला, तेही अनीला कुशीत घेताच. त्याला भीती वाटायला लागली. पण एक बरं होतं.. खिडकीच्या काचेतून दिसत होते बाबाच्या गोष्टीतले मूनक्लाउड्स आणि ट्विन्कलींग स्टार्स. अनी डोळे सताड उघडे ठेऊन बघत होता. रुममधल्या नाईट लॅम्पच्या उजेडात कसल्याकसल्या सावल्या दिसत राहतात त्यापेक्षा बाहेरच्या काळोखातल्या चांदण्या बऱ्या! पण हे काय? एक चांदणी मोठी व्हायला लागली. अनीला वाटलं चुकून आपणपण झोपलोच कि काय ? या मोठ्ठ्या लोकांसारखे. त्याने हातपाय हलवले , स्ट्रेच केले , आई म्हणते तसे आळोखे कि पिळोखे दिले. आईला पाय लागला तशी तिने कूस बदलली म्हणजे जागाच होता कि तो! तरीपण चांदणी मोठी व्हायची थांबेना. बहुतेक जवळच येत असल्यासारखी वाटत होती.. आता अर्थ वर येते कि काय ? हळू हळू चांदणीच्या बाजूच्या दोन अँगल्स चे हात झाले , खालच्या दोन अँगल्स चे पाय तयार झाले आणि वरच्या अँगल चं हेड झालं. चांदणीची मुलगीच तयार झाली.. फेअरी.. परी, बाबांच्या गोष्टीतली!


थोडावेळ ती खिडकीच्या बाहेर तरंगत राहिली आणि अनीने जरा डोळे ब्लिंक करेपर्यंत आतपण आली! कित्ती छान दिसत होती ती! एकदम निधीच्या बार्बीसारखी! पण फ्रॉक मस्त होता तिचा बार्बीपेक्षा भारी! पांढऱ्या शुभ्र फ्रॉकवर छोटे छोटे स्टार्स होते, आणि ते पण खऱ्या खुऱ्या स्टार्स सारखे ट्विन्कलींग! तिच्याकडे ती वॉन्ड होती, टोकाला स्टार असणारी आणि तिला पंख पण होते, खूप मोठे पण नाजूक. इकडून तिकडचं दिसत होतं त्या पंखातून .. सेम ड्रॅगनफ्लायच्या पंखांसारखे.. सोनेरी केसांवर टिएरा होता. खोलीत डिस्को डान्ससारखा लाईटच झाला. कसलं भारी! अनीला वाटलं बाबांना उठवून त्यांना दाखवावी परी..

"तू खरी परी आहेस का ?" अनीने विचारून घेतलं
"मग काय ?" परीने विचारलं " हा काय प्रश्न झाला ? मला येताना बघितलंस ना ?"
अनी उठून बसला
"तुला खरं वाटत नाहीये ना ? या स्टारला बोट लाव " परीने तिची वॉन्ड पुढे करत म्हटलं. अनीने हात लावला तर तो हवेत तरंगायलाच लागला. परीने आता वॉन्ड खिडकीकडे केली आणि अनीला हळूच फुंकर मारली.. एखाद्या पिसासारखा तरंगत अनी बंद खिडकीतून बाहेर गेला आणि पाठोपाठ परीपण बाहेर आली.
"आता माझ्या हाताला टच कर." अनीने तरंगतच तिच्या हाताला बोट लावलं. त्याला वाटलं कि तिने त्याचं बोट पकडलं कि काय , रस्ता क्रॉस करताना आई पकडते तसं. परीने हळूच उंच झेप घेतली आणि अनी तिच्या बरोबर उडायला लागला, घाबरून त्याने डोळे गच्च मिटून घेतले
"अरे घाबरतोस काय , मी आहे ना ?" परीने त्याला धीर दिला." खाली बघ किती छान दिसतंय ते"
अनी ने किलकिले करत डोळे उघडले. चंद्र प्रकाशात रात्र किती छान दिसत होती. झाडांच्या वर , नदीच्या पाण्यात , तळ्यामध्ये सगळीकडे चंद्राचा प्रकाश पडला होता. ब्रिज वर , रोड्सवर बिल्डिंगच्या जिन्यांवर लाईट्स दिसत होते. खूपच मस्त दिसत होतं सगळं वरुन! केवढी छान असते रात्र!

परी त्याला खूप उंच घेऊन गेली, चांदोबाच्या शेजारी. ते दोघेही एका ढगावर उतरले. चांदोबा तर निवांत बसला होता, लोडाला टेकून बसल्यासारखा.. नुकताच आंघोळ करून आल्यासारखा दिसत होता. एकदम फ्रेश. अनीला आणि परीला बघून तो हसला. अनीला माहितीच नव्हतं तो हसतो ते.. परीनं त्याला हात दाखवला आणि ती अनी चा हात धरून उभी राहिली. ते उभे असलेला ढग सरकायला लागला पुढे. कितीतरी चांदण्या आजूबाजूला लखलखत होत्या. अनीला जामच मज्जा येत होती. काळोखात एवढा उजेड नाईट लॅम्पने पण नाही व्हायचा आणि त्या घाबरवणाऱ्या सावल्या पण नव्हत्या इथे.

पुढे जातात तर काय ? एक सुपर ह्यूज गेट आणि त्या गेटला होती तेवढीच ह्यूज कमान. त्यावर लिहिलं होतं 'ड्रिमलँड'! कित्ती कलर्स मधले कित्ती लाईट्स होते तिथे.. एकदम रेनबो सारखे रंगीबेरंगी!
"हे काय आहे ? " एक्साईट होऊन ओरडतच अनीने विचारलं आणि तो परीचा हात सोडून धावत सुटला. गालातल्या गालात हसत परी त्याच्या पाठोपाठ आत गेली. आतमध्ये एवढे खेळ होते , कितीतरी घसरगुंड्या, वेगवेगळ्या आकाराच्या, सगळ्यांवर कुणी ना कुणीतरी खेळत होतं.. लहानापासून मोठे मोठे सीसॉ, तिथेपण तसंच, खूप खूप झोपाळे, प्रत्येक झोपाळ्यात मुलगा किंवा मुलगी ...एक मुलगी तर एवढ्या उंच स्विंग वर झोके घेत होती कि ती बघूनच भीती वाटली आणि मज्जा पण..
"हे तर आमच्या गार्डनपेक्षा हंड्रेड थाऊसंड टाईम्स मोठ्ठं आहे! " अनी म्हणाला.

परीने हसून पुढे जायला सांगितलं. तो धावत गेला पुढे, तर तिथे एक ट्रॅम्पोलिन होतं. मोठ्ठंच्या मोठ्ठं. एकदा बाबाला सांगताना त्याने इमॅजिन करून सांगितलं होतं कि एवढं मोठं ट्रॅम्पोलिन असेल तर त्याच्यावर उडी मारली तर ढगात जाऊन येता येईल.. हे अगदी तेवढंच मोठं होतं ! तो धावत गेला आणि त्याने उडी मारली तर ट्रॅम्पोलिन मधून खालीच पडला तो. खाली ढग होते म्हणून बरं! 'चुकली वाटतं उडी' म्हणत त्याने परत उडी मारली परत तसंच झालं .. परत केलं तर परत तसंच झालं. जाऊ दे फॉल्टी दिसतंय ते म्हणत तो धावत एका सीसॉ कडे गेला. लांबच्या लांब सीसॉ. तिथेपण तसंच झालं. तो बसायला गेला तर तो खालीच पडला! सगळे ढग अंगाला लागले! झाडत झाडत तो उठला आणि एका घसरगुंडीवर गेला. उंचच उंच घसरगुंडी. आणि एवढ्या उंच घसरगुंडीवर फक्त एकच मुलगा स्लाईड करत होता. अनी त्या घसरगुंडीच्या शिडीवर चढायला गेला तर त्याला शिडीवर पायच ठेवता येईना. पाय ठेवला तो सरळ खालीच गेला . हात धरायला गेला तर हात पुढेच गेला. स्लाईडच्या बाजूने वर चढायला गेला तरी तेच, धुपकन खालीच पडला! तेवढ्यात तो मुलगा स्लाईडवरून खाली आला , अनी ला बघून मोठ्ठ्याने किंचाळला आण घसरगुंडीसकट गायबच झाला! अनी त्याच्यापेक्षा मोठयाने किंचाळला!

परी लांबून बघत होती .. ती अनीची गंमत पाहून हसायला लागली. तो  रडवेला झाला.
"असं का होतंय ? बाकीची मुलं छान खेळतायत आणि माझं असं का होतंय ? त्याने विचारलं.
परीने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली "अरे इथे कसं खेळायचं, काय खेळायचं , कोणाशी खेळायचं, कितीवेळ खेळायचं कसले कसले म्हणून नियम नाहीत, पडून लागण्याची भीती नाही , लक्ष ठेवायला आई बाबा नाहीत , शाळेतले टीचर्स नाहीत कि पार्कमधले आजोबा नाहीत. नियम एकच कि तुम्ही झोपायचं आणि मग तुमच्या स्वप्नातून इकडे यायचं. तू आलास तसं डायरेक्ट नाही, "

"म्हणजे.. असं कसं ?"

"म्हणजे असं कि हे ड्रिमलँड आहे ! तुझ्या इमॅजिनेशन्स इथे खऱ्या होतात,तुला हवी ती खेळणी , हवे ते खेळ  इथे मिळतात .. हीच तर इथली गंमत आहे. हि सगळी मुलं त्यांच्या त्यांच्या ड्रीम्स मधून आली आहेत इथे खेळायला. ती झोपली कि त्यांना हवी तशी आणि हवी तेवढी खेळणी इथे तयार होतात .. ती वळ्णावळणाची घसरगुंडी बघ .. 25 टर्न्स आहेत तिथे.. ते तिकडे बघ , वॉटरपार्क वाली घसरगुंडी पण आहे! ते ट्रॅम्पोलिन बघितलंस ना ? तू तुझ्या बाबांना सांगितलं होतंस ना तेच आहे ते ! "

"आणि ती गायब झालेली घसरगुंडी ? " अनीने विचारलं.

"त्या घसरगुंडी वाल्या मुलाला कळलंच नाही कि त्याच्या स्वप्नात तू कसा काय आलास ते! तो जागा झाला असणार झोपेतून. झोपेतून उठलं कि इथून जावं लागतं. म्हणून जितका जास्त वेळ झोपशील तितकं जास्त वेळ इथे खेळता येईल. समजलं कि नाही?" परीने त्याला समजावून सांगितलं

अनी ने मान डोलावली. "मला खेळायला यायचंय इथं" तो म्हणाला.

" मग आता आपण परत तुझ्या घरी जायचं?, मग तू झोप आणि तुझ्या स्वप्नातून ये इकडे. चालेल ना? अनी ने हो म्हटलं आणि परीचं बोट टच करून तो परत घरी निघाला. इकडे चांदोबा जांभया देत होता, ते बघून अनीला पण मोठी जांभई आली! परीने त्याला कडेवर घेतलं, तिच्या खांद्यावरून तो लांब लांब जाणारं ड्रिमलँड बघत होता. आता त्याला कळलं कि खरी गंमत झोपल्यावरच येते. एवढं फन आहे ड्रिमलँड म्हणजे. रात्र पण किती सुंदर असते.त्याचे डोळे आपोआप मिटायला लागले, एवढे कि परीने कधी त्याला नेऊन त्याच्या बेडवर ठेवलं ते त्याला कळलंच नाही.

आता त्याला झोपायला सांगितल्यावर अनी घाईघाईने झोपायला जातो. झोपताना जेव्हा तो आईबाबांना तो गोष्ट सांगतो,  ड्रिमलँड मध्ये तो किती आणि कशा गमतीजमती करतो त्याची; मोठ्ठाल्या ट्रॅम्पोलिन वर उडी मारतो आणि डायरेक्ट आभाळाला हात लावतो त्याची, एलिवेटेर असणाऱ्या  उंच घसरगुंडीवर जाऊन खूप गोलगोल फिरत खाली घसरत येतो त्याची, दोन्ही बाजूला १० १० मुलं बसू शकणाऱ्या सी सॉ ची... ढगांना पाय लावता येईल एवढ्या उंच झोका घेता येणाऱ्या झोपाळ्याची...  तेव्हा बाबा गालातल्या गालात हसतो पण आई म्हणते कि "असं ड्रिमलँड असतं का कधी ? तुझ्या गोष्टी सगळ्या फिक्शनल!"