मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

बाईक रायडींग स्कूल! -उत्तरार्ध



पूर्वार्ध:
माझ्याचकडून फी चे पैसे घेऊन हा माणूस मलाच "तुमची निवड झाली आहे" असं सांगतो? कमाल आहे!!
विचार करत करत वाड्याला वळसा घालून मागच्या बाजूला असलेल्या वर्गावर मी पोहोचलो. हो.. वर्गावरच! बेंचेस,फळा, प्रोजेक्टर,रोलिंग व्हाईट बोर्ड असा जामानिमा असणा-या खोलीमध्ये. माझ्यासारखे मोजके लोक वर्गात बसले होते. अगदी शाळकरी मुलं बसतात तसे. वह्या-पेन घेऊन!! मी दबकत एका मोकळ्या बेंच वर जाऊन बसलो. नोटपॅड आणि काही स्टडी मटेरियल बेंचवर ठेवण्यात आल होतं. ते चाळायला सुरुवात करायच्या आधी मी शक्य तितका कुत्सित स्वर आणून आणि नकारार्थी उत्तराची अपेक्षा ठेऊन, समोर बसलेल्या निळसर कुर्ता परिधान केलेल्या व्यक्तीला प्रश्न केला.
"इथे वर्गात शिकवणार का गाडी?"
" आमास्नी काय म्हायती नाय बा..पर आसत्याल. पुन्यातला कलास हाय ह्यो. इद्येच म्हाएरघर म्हनत्यात ह्ये.. शिकवत आस्त्याल वर्गात गाडीबी!!"
"कुठले तुम्ही?" मी निरखून त्याचे कपडे पाहिले. मगाशी निळसर वाटणारा कुर्ता मुळात पांढरा असावा. नीळ टाकून टाकून त्याने शेवटी हा रंग धारण केला असावा हे जाणवलं..
"आं"
"म्हणजे गाव कोणतं?"
"आस्स व्हय? आमी सतारकडल.. ३० -४० किलोमीटर वरती हाय गाव आमचं.."
"पुण्यापासून?"
"आवं.. सतारपासून ..तुमी कुनीकडचं म्हनायचं.."
"कोकणातला"
"बारं.. तवाच हिथ आलायसा." गडी हसत हसत म्हणाला.. "म्या बी लय ट्रायल मारून पायला हितं गाडी चालवायचा.. पर काय जमना.. आवं.. आट आट टनाचा टरक न्हेतोया मी बाजारला गेल्या धा वर्साधरनं.. पर हितं पुन्यात -हायला आल्यापासू दोन-चाकी चालवाय तरास होतु.. जरा फुडं ग्येलो कि ह्यो इकडून घुसतोय, त्येला वाचवाय ग्येलो तर त्ये बेनं तिकडून घुस्तंय.. च्या मायला इट आला सगळ्याचा.. त्येच्यात आमची बुलेट पाचशेवाली. मागं कुत्रं आलतं चाकाखाली.. आयच्यान सांगतु.. 'क्याक' कराया बी टायम नाय घावला त्येला!! हालीच ह्या कलासबद्दल कळालं तवा म्हनल मानूस चाकाखाली येयच्या आत कलास लावून शिकू तरी पुन्यात कशी काय चालवायची ती गाडी.. "

माझ्यासारखाच होता हा बहाद्दर पण! म्हणजे सगळे नॉन-पुणेकर असणार होते.तेवढ्यात तरातरा चालत वर्गात तांडवकर सरांनी एन्ट्री केली. हा मगासचाच खडूस म्हातारा.. पण त्यांनी आपली ओळख "मी तांडवकर सर" अशी करून दिली! याला झेलायचंय? पण नाविलाज को क्या इलाज?? झेललं पाहिजे!

नमस्कार चमत्कार आणि ओळखीपाळखी झाल्यावर सरांनी "पुण्यात गाडी शिकण्यासाठी मुळात तुम्हाला पुणेकर होणे गरजेचे आहे" असे सांगून बॉम्ब टाकला. वर्गात कुजबुज सुरु झाली."व्वा,क्लास हवा तर असा!","त्याच फी मध्ये हे पण ट्रेनिंग मिळतंय तर नकोय कोणाला?","हे काय आता नवीन?","असं कसं काय होणार..?"," बोललं कि होतं का?" "नको बाई!" दबक्या आवाजात अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या..

"मला माहित आहे तुम्हाला ते शक्य नाही.." बिनधास्त हसत ते म्हणाले. "पण पुणेकरांचे काही गुण तर अंगी बाणवू शकता ना? गाडी चालवण्यासाठी त्याची आपल्याला गरज पडणार आहे" असं म्हणून 'पुणेकर' या विषयावर त्यांनी एक लेक्चर घेतले. स्वाध्याय म्हणून 'पुलं' च्या 'तुम्हाला कोण व्हायचंय?मुंबईकर ,पुणेकर कि नागपूरकर?' या लेखाचे वाचन करा असे सांगितले. काळजीपूर्वक वाचून त्यातील "पुणेकर होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शब्दात समोरच्याचा अपमान करता येणे गरजेचे आहे" यांसारखी वाक्ये लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले! तांडवकरांनी "मला माहित आहे तुम्हाला पुणेकर बनणे शक्य नाही.." हे सांगून सोदाहरण या वाक्याचे स्पष्टीकरणही दिले होते.

सकाळच्या सेशन मध्ये थियरी शिकवण्यात आली त्यात वेगवेगळ्या क्लृप्त्या शिकवल्या गेल्या.आम्ही महत्वाचे मुद्दे नोंदवून घेतले..
'पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गावी शिकलेले आर टी ओ चे नियम पुण्यात लागू नाहीत.. कागदोपत्री असतील पण पुणेकर ते मानत नाहीत. त्यामुळे तुम्हालाही ते विसरावे लागतील..'
'इथे गाडी चालवताना लांबचा विचार करायचा नाही..जवळचे विचार करायचे.. स्पष्ट सांगायचं झालं तर 'घरी पोचणे' हा झाला लांबचा विचार.. आणि समोरच्या वाहनाच्या पुढे जाणे हा झाला जवळचा विचार. पुण्यातल्या रस्त्यांवर हा विचार जो करेल तो यशस्वीपणे गाडी चालवेल, जो करणार नाही तो मागे पडेल!'
'हॉर्न हे महत्वाचे साधन आहे.. गाडीला एकवेळ ब्रेक नसला तरी चालेल पण हॉर्न हवा आणि तो वाजणारा हवा.. त-हेवाईक आवाज असणं केव्हाही चांगलंच!आणि न विसरता एका ठरावीक कालावधीनंतर हॉर्न वाजवत राहावा.'
' इंडिकेटर्स,आरसे, हेल्मेट आणि लेनची शिस्त या गोष्टी नसतील तेवढ जास्त सोयीस्कर!'
"उजवीकडून केलेला ओवरटेक फाउल धरला जातो."
"गर्दीच्या वेळी डिव्हायडर नसणारा रस्ता हा जाणा-या येणा-या वाहनांसाठी अर्धा-अर्धा विभागला न जाता साधारणत: पाऊण-पाव या प्रमाणात विभागला जातो"
"सिग्नल ला जरा कौंटडाऊन असेल तर आकडा 0 होऊन सिग्नल हिरवा होण्याची वाट न पाहता आकडा 6 वरून 5 वर येवून ब्लिंक करू लागताच गाडी पुढे दामटणे श्रेयस्कर! आणि जोश असा हवा कि सगळ्यात पुढे जाणा-याला स्वतः राष्ट्रपती त्यांच्या नावाचं पदक देऊन गौरवणार आहेत.. हे विसरलात तर पुण्यात बाईक चालवणं देखील विसरा.. "
"बाईक ने कारच्या मागे थांबणं हा बाईकचासुद्धा अपमान आहे आणि पुण्याचासुद्धा! शक्यतो कारच्या डाव्या साईडला थांबावं. ती रस्त्यात कुठेही असेल तरी!!"
"दुकानात जसं गि-हाईक सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट आहे तशीच रस्त्यांवर पादचारी.. त्याला हॉर्नने अथवा तोंडाने जोरात आवाज देऊन घाबरवण्याचा प्रयत्न करावा..यु विल बी द मोस्ट सक्सेसफुल बाईक रायडर!!"
सर एकापाठोपाठ एक फंडे देत होते आणि आम्ही अचंबित होऊन ऐकत होतो. दोन वाजता लंच ब्रेक झाला तत्पूर्वी सरांनी त्यांच्या ५१ अफलातून 'आयडीयाज आणि थिय्रीज-मेड इन पुणे' सांगून संपल्या असल्याच जाहीर केलं.

"जेवणानंतरच्या सेशनमध्ये लोकांना झोप येते त्यामुळे शंकानिरसन आणि त्या अनुषंगाने सांगता येण्यासारखे काही असले तर सांगूयात" हि सरांची कल्पना आम्ही विद्यार्थ्यांनी (इतर काही पर्याय नसल्यामुळे) मान्य केली. पहिलाच प्रश्न 'सिग्नल' संबंधी होता.
"सर,इथल्या सिग्नलच्या बाबतीत माझं नेहमी कन्फ्युजन होतं. तुम्ही 'पुण्यातले सिग्नल्स' हा विषय जरा सविस्तरपणे समजावून सांगाल का?"प्रश्नकर्त्याने जणू काही माझ्या तोंडाचा प्रश्नच पळवून नेला होता.
"नक्कीच!" सरांच्या चेह-यावर हास्य खुललं. "पण त्या आधी सिग्नलच्या रंगाचे तुम्हाला माहिती असणारे अर्थ कोणी सांगेल का?" बरेचसे हात वर गेले.
"सर, हिरवा म्हणजे जा, भगवा म्हणजे आपला स्पीड कमी करा आणि लाल म्हणजे थांबा" एका जाड भिंगाच्या चष्मेवाल्या मुलाने पुस्तकी उत्तर दिलं.
सर कीव आल्यासारखे हसले.. "हे नियम आर टी ओ च्या कार्यालयात आणि इतर शहरांमध्ये लागू होतात." सर म्हणाले.. "पुण्यात हिरवा म्हणजे जा, भगवा म्हणजे जोरात जा आणि लाल म्हणजे थांबा पहा व जा!!" वर्गात कुजबुज सुरु झाली.
"सर म्हणजे सिग्नलला थांबायचंच नाही का? "
"थांबायचं ना! पण समोर मामा असेल तर.. मामा हा शब्द ट्राफिक पोलिसाला उद्देशून असतो हे वेगळे सांगणे न लगे. कुठल्या सिग्नलला थांबायचं आणि कुठल्या नाही हे अनुभवाने तुमच्या लक्षात येईल..." सर पुढे सांगू लागले "जर एखाद्या चौकातून डावीकडे वळायचे असेल तर सिग्नलचा नियम अस्सल पुणेकरांस मान्य नाही.. त्यामुळे डावीकडे जायचे असतानादेखील तुम्ही जर सिग्नल पडण्याची वाट बघत असाल आणि मागून कोणी हॉर्न वाजवू लागले तर तो दोष सर्वस्वी तुमचा असेल. म्हणून योग्य सवय अंगी बाणावलेलीच बरी!" सर सांगत होते.."तुम्हाला जे स्टडी मटेरियल दिले गेले आहे त्यामध्ये बरेचसे चौक,मुख्य रस्ते आणि तिथे अपेक्षित असणारे तुमचे वर्तन याचा तक्ता बनवला आहे...." फडाफडा पानं परतल्याचे आवाज येवू लागले..

मी चटकन नजर टाकली..त्यावर त्या चार्ट व्यतिरिक्त
कर्वे रस्यावरून डेक्कन कॉर्नर चौक मार्गे लकडीपूल -> प्रवेश बंद -> गेल्यास अलकाच्या चौकात मामा पावती फाडतात.
कर्वे रस्यावरून डेक्कन कॉर्नर चौक मार्गे गुडलक चौक -> सिग्नल कडे दुर्लक्ष करणे.
अलका चौकातून लक्ष्मी रस्त्याला प्रवेश बंद->कुमठेकर रस्त्यावरून कुलकर्णी पेट्रोलपंपाच्या मागच्या बाजूने पोलिसांना चकवून घुसता येते.
टिळक रोड वरचे सिग्नल आणि गर्दी टाळण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या रस्त्याने सरळ जावून बाजीराव रोड च्या अलीकडे उजवीकडे वळणे.
लालबहादूर शास्त्री रोड वरील लोकमान्य नगरचा सिग्नल वगळता इतर सिग्नलकडे दुर्लक्ष करणे.
असल्या काही प्रबोधनात्मक टीपा होत्या.
त्याचप्रमाणे "स्त्रियांचे वाहन कौशल्य","वृद्ध पादचा-यांचे रस्त्यांवरचे वर्तन","कार आणि बसवाल्यांशी हुज्जत" या विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारले गेले. त्यावर सरांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

'हुज्जत' या विषयावर १५-२० मिनिटं छोटेखानी व्याख्यान दिल्यावर सरांनी आमच्याकडून"बधीर" "माजोरी कुठचा!" "आंधळ्या" ,"बहि-या" हे शब्द आणि "रस्ता काय तुझ्या बापाचा समजलास काय रे मंद, कुठून कुठून गर्दी करायला पुण्यात येतात कोण जाणे.." हे वाक्य घोटवून मुखोद्गत करून घेतलं."हे वाक्य परवलीचं असल्याने कोणत्याही भांडणाचा शेवट करताना हे वाक्य मोठ्याने उच्चारावे व चटकन निघून जावे" असा सल्ला सरांनी दिला. तो आम्ही नोट डाऊन करून घेतला. 'इतरांनी याचाच प्रयोग आपल्यावर करू नये म्हणून कानात सदैव ईअरफोन्स असणे चांगलं म्हणजे इतरांच्या शिव्या,हॉर्न्स ऐकू येत नाही आणि आपल्याला एकाग्रता साधणं सोप जातं !' असं सुचावायलाही ते विसरले नाहीत!
तोपर्यंत चहापानाचा ब्रेक झाला.

ब्रेकमधेही सर व आमच्यात या ना त्या विषयावर चर्चा रंगत गेली. "प्रवेश बंद चा फलक केवळ शो साठी असतो" हाही सल्ला त्यांनी जाता जाता दिला. "कमीत कमी पैशात ट्राफिक पोलीस पासून कशी सुटका करून घ्यायची" याच्या १०१ क्लृप्त्या सर सांगणार होते पण त्यासाठी वेगळे पैसे पडतील हे कळल्यावर सगळे पांगले.. त्या भानगडीत माझ्या हातातला चहाचा कप गार झाला! मग काय करणार? गुपचूप चहा तिथल्याच झाडाच्या कुंडीत ओतून मी वर्गात जाऊन बसलो. तांडवकरांनी यावेळी स्वतःचं शब्दांचं त्यांच्या जिभेवर चालणारं तांडवनृत्य थांबवून प्रोजेक्टरवर एक व्हीडीओ चालू केला. त्यामध्ये पुण्यातल्या दुचाकीचालकांच्या सवयी रेकॉर्ड केलेल्या होत्या.. "नीट लक्ष देऊन बघा, खूप शिकण्यासारखं आहे यात.." सर सांगत होते. आधीच चहा झाला नव्हता आणि त्यात रेकॉर्डेड व्हीडीओ... माझ्या डोळ्यांवर झोपेनं गारुड केलं नसतं तरच नवल! प्रयत्न करूनही पापण्या एकमेकांपासून विलग व्हायला तयार नव्हत्या.शेवटी वर्गात जी ट्रिक वापरून मी काही मिनिटं निद्रादेवीसाठी अर्पण करत असे तीच मी इथेही वापरायचं ठरवलं. हनुवटी डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवून बोटांनी डोळ्यांना आडोसा करून मी डोळे मिटले.

टिंक टिंक...टिंक टिंक... टेबल क्लॉकचा अलार्म वाजत होता. मी हात लांब करून गजर बंद केला. ..आणि चपापलो. मी आडवा झोपलोय? खाडकन झोप उडाली.मी उठून बसलो. 'कुठेय मी?' मी माझ्याच बेडवर होतो. घड्याळात पाहिलं. सकाळचे पाच वाजले होते. "मिशन रायडींग स्कूल सर्च" डायरी लाईट ब्लिंक करत मेमो दाखवू लागली. म्हणजे ते स्वप्न होतं तर..माझं डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. मी लाईट ऑन केला.

काय सालं स्वप्न होतं! अक्षरशः जगलो मी ते.. fan बंद करताच गादीवरच पडलेल्या नोटपॅडची पानं फडफडायची थांबली. "नोटपॅड? हे तर माझं नाहीये.." मी पुटपुटत ते उचलून बघितलं.. आतमध्ये माझ्याच हस्ताक्षरातल्या नोट्स होत्या.. आश्चर्यचकित होऊन मी त्या वाचायला लागलो..

'गावी शिकलेले आर टी ओ चे नियम पुण्यात लागू नाहीत..'
'गाडी चालवताना लांबचा विचार करायचा नाही..जवळचे विचार करायचे..'
'गाडीला हॉर्न हवा आणि न विसरता एका ठरावीक कालावधीनंतर हॉर्न वाजवत राहावा.'
'चालकाकडे इंडिकेटर्स,आरसे, हेल्मेट आणि लेनची शिस्त या गोष्टी नसाव्यात!'
मी अवाक झालो! काही सुचेना.. मी पूर्ण चक्रावून गेलो.

...समोरच असलेल्या टेबलावरचा भिंतीच्या आधाराने उभा केलेला देवांचा फोटो घसरून आडवा पडला होता. मी विचार करत तो उभा केला.. पण का कोण जाणे फोटोतला श्रीकृष्ण नेहमीपेक्षा जरा जास्तच हसत असल्यासारखा वाटत होता आणि फोटोतल्या शंकरानेदेखील मांडीची घडी बदलल्यासारखी दिसत होती!!
समाप्त.
(निर्विवादपणे पूर्णतः काल्पनिक!)

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

बाईक रायडींग स्कूल ! -पूर्वार्ध

वयाच्या बरोब्बर अठराव्या वर्षी मी 'मोटारसायकल विथ गियर'चं लायसन्स काढलं. आधी चारेक वर्ष विना लायसन्स गाडी चालवलीच होती. त्यामुळे लायसन्स काढल्यावर तर 'अख्ख्या भारतात आपण कुठेही बाईक चालवू शकतो' असा  आत्मविश्वास कम अभिमान मला वाटू लागला होता. पण लवकरच हा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे हे मला कुठे माहित होतं? पुण्यात बाईक घेवून आल्यावर स्वारगेट पासून अलका थीएटर पर्यंतच्या पहिल्याच फेरीत माझा अभिमान, पोटावर आधीच ताणला गेलेल्या लेंग्याची नाडी तुटल्यावर जसा लेंगा पडावा, अगदी तस्साच पूर्णपणे गळून पडला. रों रों करत, इकडून तिकडून हव्या तश्या जाणा-या, वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या गाड्यांनी निरनिराळ्या पद्धतीने घाबरवून सोडत मला ब्रम्हांड आठवायला भाग पाडलं!!  'घरी धडपणे पोचलो तरी पुरे' अशी माफक अपेक्षा घेवून मी गाडी कशीबशी घेवून राहण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचलो. मुठीत धरलेला जीव सोडल्यानंतर मला माझे गाडी शिकतानाचे दिवस आठवले..

बाईक (कशीबशी) चालवायला मी साधारण सहावी-सातवीमध्ये शिकलो. पाचवीच्या मे महिन्यातल्या सुट्टीमध्ये आमच्या एमेटीची (फार पुरातन काळात बजाजचं m 80 या विचित्र नावाचं वाहन होतं ) आणि आमची स्वतःची हाडं (आधी नुसतं पडल्यामुळे आणि नंतर घरी मार पडल्यामुळे) काहीवेळा खिळखिळी झाल्यानंतर मला मोपेड चालवता यायला लागली. 'एक गाडी आली कि बाकीच्या लगेच येतात' या विधानातला फोलपणा त्या कालखंडात मला उमगला होता. उगाच भस्सकन हे शिकायचं असं न ठरवता स्टेप बाय स्टेप जायचं अशी आमच्या मामाश्रींची शिकवण (खरतर इच्छा)  असल्यामुळे मी प्रथम सायकल शिकलो. इयत्ता दुसरी मध्ये दोन चाकांची सायकल चालवणारा मी आमच्या एरियात काही काळासाठी का होईना कौतुकाचा विषय होतो. लोकांना फक्त सायकल चालवणारा मीच दिसत असे पण माझी सोललेली कोपरं आणि खरचटलेली ढोपरं दिसत नसत. तशी दिसू नयेत याची मीच पुरेपूर दक्षता घेत असे. उगीच इम्प्रेशन कशाला खराब करा? वय वर्ष ९-१० च्या दरम्यान म्हणजेच चौथीच्या मे महिन्यात मामाने कुठूनशी एक रिक्षा पैदा केली जी रात्री आमच्या (म्हणजे मामाच्या) ताब्यात असे, त्या रिक्षाने आम्हाला (आदरार्थी एकवचन! चौथीत गाडीचं ज्ञान म्हणजे आदर दिलाच पाहिजे!! ) हातातले गियर्स, क्लच, अक्सलरेटर,ब्रेक वगैरे प्राथमिक गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून दिलं.  सीटवर मामा स्वतः बसत असे आणि आम्ही handle आणि सीटच्या मधल्या  मोकळ्या आणि चिंचोळ्या जागेत उभे राहत असू. पायातला ब्रेक मामा दाबणार आणि पुढचा ब्रेक आधीच डिसेबल्ड!! तरीपण अथक प्रयत्नांती मी रिक्षा शिकलो. आता सायकल येते आणि रिक्षाही येते म्हटल्यावर एमेटी आलीच पाहिजे अस साधं लॉजिक.. पण ते आमच्या अंगवळणी पडलं नाही. आधीच म्हटल्याप्रमाणे ब-याचदा धडपड केल्यानंतर ती जमायला लागली. तीच कथा बाईकची! एमेटी आली म्हणून पायातले गियर्स जमतील याची काय शाश्वती देता येत नाही (आणि माझ्या बाबतीत तर मुळीच नाही!) मात्र तुलनेने कमी कष्टात मला बाईक जमू लागली.

आता एवढे कष्ट घेवून गाडी शिकलो तर निव्वळ पुण्यातल्या इतर चालकांना घाबरून आपण गाडीच चालवणं  सोडायचं कि काय? छे छे! हा तर पळपुटेपणा होईल.. म्हणून त्यानंतरचे आठ-दहा दिवस मी पुण्याच्या रस्त्यांवरून सुरक्षितपणे दुचाकी चालवण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला. पण छे.. पहिले पाढे पंचावन्न!
एका चौकात सिग्नलला (लाल रंग पाहून) उभा राहिलो. तर मागून एक कारवाला पों पों असा हॉर्न वाजवायला लागला. (खरं म्हणजे असा आवाज पी एम टी च्या हॉर्नचा येतो पण मला सोयीस्कर शब्द सापडले नाहीत म्हणून पों पों!). मला समजेना. समोर तर लाल दिवा होता. मी मागे वळून पाहिलं.
"ए.. चल की.."
"लाल सिग्नल आहे म्हणून थांबलो."मी म्हणालो.
"इथे थांबायचं असतं का?" त्याने ओरडून विचारलं.
"आमच्या आर टी ओ ने दिलेल्या तक्त्यात तरी असंच सांगितलं होतं!" मी निरागसपणे म्हणालो. पण माझा हा निरागसपणा त्याला उर्मटपणा वाटला की काय कोण जाणे. तो रागारागाने गाडी माझ्या साईडने पुढे काढत "काय च्यायला त्रास आहे.. कुठून कुठून येतात कोण जाणे."  असं मला ऐकू येईल अशा बेताने म्हणत सिग्नल लाल असतानाच निघून गेला. त्याच्या पाठोपाठ आणखी काही दुचाकीस्वार गेले. यथावकाश सिग्नल हिरवा झाल्यावर मी आणि बरोबर थांबलेले तुरळक लोक निघाले.
मग मात्र मी धसका घेतला. आपण काहीतरी वेगळं करतोय याची जाणीव पावलापावलाला होऊ लागली आणि कोणीतरी हे सगळ शिकवण्याची,समजावून सांगण्याची गरज प्रकर्षाने भासू लागली.

एके दिवशी मी ठरवलं की आता बास! काही झालं तरी सकाळी लवकर उठून पुण्यात बाईक शिकवणार स्कूल शोधायचंच! मी पहाटे ५ चा अलार्म लावला. डिजिटल डायरीत "मिशन रायडींग स्कूल सर्च" असा 'मेमो विथ अलार्म' तयार करून ठेवला . लवकर उठून तयार होऊन लगेच शोधमोहीम सुरु करायची असं ठरवून मी रात्री (नेहमीपेक्षा काही मिनिटं) लवकर झोपलो.

ठरल्याप्रमाणे उठून पहाटे लवकर मी कुठे 'बाईक रायडींग इन पुणे' अशी 'इस्पेश्यल' सर्विस देणारं स्कूल सापडतंय का पाहत चालू लागलो. सदाशिव पेठेतून नारायण पेठेत गेलो. तिथून शुक्रवार पेठेच्या दिशेने बराच वेळ चालत होतो..सगळीकडे नन्नाचा पाढा वाचला जात होता.
कुठे 'बाईक शिकवली जाईल पण पूर्ण फी भरावी लागेल' अस ठेवणीतलं उत्तर तर कुठे 'स्पेशल पुण्यासाठी? काय येडे कि काय तुम्ही?" असा सुस्पष्ट अपमान झेलत मी मार्गक्रमणा करत होतो. पुढे पुढे तर तंद्रीत चालत कुठे पोहोचलो मलाच कळेना.. कुठली पेठ होती तेही धड कळत नव्हतं. शुक्रवारेतून बुधवार पेठेकडे जाणारा रस्ता धरला कि काय अशी शंका मनाला चाटून गेली. अल्मोस्ट निर्जन रस्ता.. चढणारं उन..सकाळपासून काहीच पोटात पडलं नव्हतं. माझा घसा कोरडा पडला होता.पायही दुखायला लागल्यासारखे वाटत होते. पण सगळ्या घरांचे,हाटेलांचे दरवाजे बंद!! कुठल्या गल्लीत घुसलोय काहीच समजेना.तेवढ्यात लांबून एक माणूस येताना दिसला
"हा कुठला एरिया आहे हो? मला वाटतं मी रस्ता चुकलोय." मी म्हटलं. त्याला माझी शोधक नजर कळली असावी.
"काय शोधतोयस बाळ?"
डायरेक्ट  'बाळ' ? कमालय!
"पुण्यात बाईक चालवायची कशी हे शिकवणारी एखादी शाळा!" माझ्या उत्तरावर तो छद्मी किंवा कुत्सित यापैकी कसंतरी हसला..
"एवढा मोठा झालास तरी बाईक येत नाही?" त्याने खोचक प्रश्न केला
"तशी येते ओ..पण मागच्या काही दिवसात मला बाईक चालवता येते यावर आता माझाच विश्वास बसेनासा झालाय !" मी रडवेला चेहरा करून सांगितलं. त्या माणसाचं हृदय द्रवलं असावं.
"म्हणजे तुला बाईक येते ना? मग शिकायचंय काय ?" काय शॉट आहे हा माणूस? तोंडी परीक्षा घेत होता जणू!
"गाडी चालवण्याच मला असलेलं ज्ञान इथे कसं वापरायचं हे सांगणारं कोणीतरी!!" मीही इरेला पेटलो होतो.
प्रश्नावली थांबवून तो माणूस अंतर्मुख होऊन विचार करू लागला. नंतर त्याने कोणाला तरी फोन लावला "हलो.. देव बोलतोय रे..  एक मेंबर आहे.. अं?.. त्याला पुण्यात बाईक शिकायची आहे..अं?.. हो.. अं?.. बरर्र..अं? " असं म्हणत त्यांची थोडी गहन चर्चा झाली.
"एक पत्ता सांगतो. त्या ठिकाणी जा.. इथून जवळच आहे.."
"बरं.." मी म्हणालो. परत थोडा विचार करून साहेब म्हणाले ,"चल.. मीच तुला सोडतो तिथे.." आणि थोड्या वेळाने  पेठेतल्या कुठल्याश्या वाड्याच्या दरवाज्यात आम्ही पोचलो. कुठला भाग होता समजायला काहीच मार्ग नव्हता.. ना "सदाशिव पेठ- घ. नं. अमुक अमुक ते तमुक तमुक" असले बोर्ड, ना दुकानांवर अमकी आळी तमकी गल्ली असल्या खुणा. इतक्या वर्षात हा भाग कसा बघायचा राहिला याचंच मला आश्चर्य वाटत होतं तेवढ्यात हे सद्गृहस्थ बोलले,
"आत जाऊन "मी पाठवलंय " म्हणून सांग" त्या माणसाने मला तिथे सोडलं आणि तो आल्या पावली परत चालू लागला आणि वाड्याच्या भिंतीपलीकडे उजवीकडे वळलासुद्धा.
"अहो.. अहो..कोणी पाठवलंय म्हणून सांगू? अहो.. तुमचं नाव काय?" मी त्याच्या मागे गेलो तर हा भाई गायब! "च्यायला.. म्हातारा खूपच फास्ट चालतो.. काय नाव बरं त्याचं..? आडनाव तरी 'देव' होतं!
मगाशी फोनवर बोलताना तो तेच म्हणाला होता..साला माझं नाव जाणून घ्यायचे कष्टसुद्धा न घेता हा माणूस निघून गेला.. काय च्यायला माणसं असतात एक एक!

मी कर्र कर्र करणारा दरवाजा उघडून आत शिरलो. ओसरीवर केस वाढवलेला एक म्हातारासा  माणूस आणि त्याच्या आजूबाजूच्या खुर्च्या अडवून इतर काही लोक बसले होते.मला पाहताच त्याने डोके वहीत खुपसले आणि त्याने विचारलं
"बोला, काय काम आहे?"
"बाईक शिकायची आहे"
"क्काय?" त्याने आधी चमकून माझ्याकडे पाहिलं मग इतरांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं आणि तो फिदीफिदी हसला. बाकीच्यांनीही त्याचं अनुकरण केलं..
"त्यात हसण्यासारख काय आहे? बाईक चालवता येते मला.. मला पुण्यात बाईक चालवायची कशी ते शिकायचं आहे" मी त्रासिक चेहरा करून म्हटलं..
त्याचा चेहरा गंभीर झाला.. इतरांना हाताने पांगायची खूण करत त्याने मान पुढे काढत विचारलं "कोणी पाठवलं?"
"देव" मी म्हणालो
"काय शिंचा त्रास आहे.. तेहतीस कोटींपैकी कोणता देव ?"
"तुम्हाला आत्ता फोन केला होता त्यांनी.."
"अच्छा,शि-याने पाठवलं होय? काय राव, आधी बोलायचं ना?" आता साठ पासष्ठीच्या माणसाचं नाव "शि-या" इतकं ताजं(तवान) असेल हे कोणाला पटेल काय?
"बसा..अहो श्रीयुत श्रीकृष्ण देव आमचे बालमित्र.. शेजारीच राहतो. असो.. मुद्द्याकडे येऊ.. आमचा crash course आहे. एका दिवसाचा..आता सुरु केल कि संध्याकाळपर्यंत शिकाल."
"इतक्या लगेच ?" आणि त्या घाई लागलेल्या म्हाता-याचं नाव "श्रीकृष्ण देव"? ख-या देवांची नावं जितकी विचित्र नसतात तेवढी माणसांची असतात.. माझ्या चेह-यावर स्मित उमटलं. पण ते पाहताच समोरच्याच्या चेह-यावर आठी उमटली..
"तुम्हाला बाईक आधीच येते.. इथे ते ज्ञान कसं वापरायचं.तेवढंच शिकायचंय ना?"
"हो"
"बरं मग हा फॉर्म भरा. या लोकांना पण शिकायची आहे गाडी. आता सुरूच करणार होतो पण तुमच्यासाठी खोळंबलो होतो." मी गुपचूप फॉर्म आणि पैसे भरले.


नाव, वय, लिंग, सध्याचा पत्ता याव्यतिरिक्त फॉर्ममधले काही इन्टरेस्टिंग कॉलम. केवळ नमुन्यादाखल:
मी जिथे गाडी शिकलो ते गाव: अ) पुणे ब) इतर क)यापैकी नाही ________
पुण्यात कोणती गाडी शिकायची आहे? (हा पर्याय वरील 'लिंग' या कॉलमनुसार व दिलेल्या पर्यायापैकीच निवडावा )
पुरुषांसाठी/मुलांसाठी: अ) स्कूटर ब)मोटारसायकल क) यापैकी नाही________
स्त्रियांसाठी/मुलींसाठी: अ)सनी, स्कूटी,स्पिरीट किंवा तत्सम ब) activa ,डीओ किंवा तत्सम क) गाडीचे नाव माहित नाही/आठवत नाही_________
मागील पानावर सूचना होत्या. त्यापैकी काही निवडक नियम येणेप्रमाणे:
१) येथे फक्त पुण्यात गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.यासाठी आपणास पुणे वगळता इतरत्र गाडी चालवता येणे मुळात गरजेचे आहे.
२) आपले गाव पुण्याव्यतिरिक्त इतर असणे गरजेचे आहे. (पुणेकर असल्यास हे ज्ञान आधीपासून असते त्यामुळे त्यांच्यासाठी प्रवेश वर्ज्य! )
३) वर्गामध्ये शांतता राखावी. आपले वर्तन इतरांस त्रास होईल असे नसावे. वैयक्तिक सवयींवर नियंत्रण ठेवणे (उदा वायु-परीमार्जन जसे कि ढेकर,जांभया व इतर,मोठ्याने हसणे वा बोलणे,)
याव्यतिरिक्त, 'प्रवेश नाकारण्याचे अथवा घेतलेला प्रवेश रद्द करण्याचे अधिकार संचालकांकडे राखीव'; 'कोणत्याही कारणास्तव फी परत मिळणार नाही' वगैरे टिपिकल नियम होतेच!  नमनाला घडाभर तेल , नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न, चार आण्याची कोंबडी-बारा आण्याचा मसाला कि आणखी कोणती म्हण या crash course साठी सूट होईल याचा विचार मी करत असतानाच तब्बल अर्धा तास आतल्या खोलीत घालवून आलेल्या त्याच महाशयांनी माझी एखाद्या ड्रीम जॉब साठी निवड केल्याच्या आवेशात 'तुमची निवड झाली आहे' असे सांगितले. थोड्याच वेळात 'वर्ग' सुरु होणार होता..

क्रमशः

उत्तरार्ध