गुरुवार, २८ जुलै, २०११

मन्या, प्रेम वगैरे वगैरे!




"ए मन्या.. आली रे." -मी
"मग ? मी काय करू? " -मनू
"आयला! मग मी काय करू ?"
"च्यायला मला माहित असतं तर तुला कशाला बोलावलं असतं?"
"फूल कुठाय?"
"मी नव्हतं आणलं.. मी कशाला आणणार?"
"@$%%^& तेपण आम्हीच आणायचं का? यू फुल!!"
"&(*$^&** कोट्या कसल्या करत बसलायस.. आता काय?"
"!#@!^ **$@$* ए..ती गेलीपण.. आता बस बोंबलत.."
"तुझ्यामुळे.. सगळं तुझ्यामुळे.. कसले फालतू मित्र मिळालेत मला.."
"एक काम नाय केलं तर लगेच फालतू का? हे भारीच!!"

"मरो..दुसरा कायतरी प्लान करू.." मन्याने भैरवी घेतली आणि आम्ही परत अड्ड्यावर आलो.."मिशन फेल्युअर" चा कलंक माथ्यावर घेऊन. मिशन होतं नीलिमा नावाच्या आमच्या कॉलेजमधल्या एका सुंदर मुलीला मागणी -छ्या छ्या- प्रपोज करण्याचं!

नीलिमा उर्फ निलूला पटवण्याचा मन्याचा कितवा प्रयत्न ते मोजणं आम्ही सगळ्यांनी सोडून दिलं होतं. पण बाकीचे सगळे प्रयत्न मन्यातल्या ...सॉरी... मनातल्या मनात होते.. प्रत्यक्षात आलेला हा पहिलाच! तो पण गेल्या तीन-साडेतीन वर्षात!!

मन्याने 'जिन्दगानी' कि काय म्हणतात त्यात खूप मोजक्याच गोष्टी मनापासून केल्या..त्यापैकी माझ्या माहितीतल्या दोन! एक अभ्यास आणि 'निलीमाराधना'. परंतु या दोन्ही ठिकाणी मात्र त्याला अपेक्षित यश लाभलं नव्हतं हे नक्की! मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार होतो. शेकड्यांनी पुस्तकं,नोट्स, झेरॉक्स चा दर सेमला फडशा पाडल्यानंतर इंजिनियरिंगच्या एका वर्षातून दुस-या वर्षातच नव्हे तर एका सेमिस्टर मधून दुस-या सेमिस्टरला जाताना सुद्धा साहेब backlog चं उष्टं-खरकटं घेऊन जात असत.
आणि मग निलू.. ही नीलिमा माझी मैत्रीण.. तसं बघायला गेलं तर फक्त ओळखीची. आमच्या कॉट बेसिस च्या शेजारच्या बंगल्यात पेईंग गेस्ट म्हणून राहायची. त्यामुळे कधी मधी स्माईल द्यायची किंवा मोजकं बोलायची इतकच! पण कॉलेजात पोरींची लांबून जरी ओळख असली तरी मित्रमंडळात "ती माझी फ्रेंड आहे" असा उगीच रुबाब मिरवता येतो न तसा विषय होता एकंदरीत!

तिला तो तिच्या मागे आहे हे माहिती नव्हतं असं नसावं.. पण ती मुद्दाम तसं दाखवायची नाही. मन्या सारखा मला त्याचा मिडीएटर म्हणून वापरायचा प्रयत्न करायचा.. पण आपलीपण मैत्री तुटेल या भीतीने मी जास्त मध्ये मध्ये करायचो नाही.. मुळात मन्यालाच ती मुलगी आवडत असल्यामुळे तशी ती मैत्री असूनही मला 'तसा'ही काही फायदा नव्हता! तरीपण माझ्यात गट्स नाहीयेत हे जाहीरपणे मनुला सांगण्याऐवजी मी हे 'मैत्री तुटेल'चं कारण द्यायचो! आणि वासू.. अरे हो.. सदानंद उर्फ वासू हा आमच्या सगळ्या गैरकृत्यातला पार्टनर. पोरींचा वास काढत फिरणं हा मुख्य धंदा. म्हणून 'वासू' !! दुनियाभर अगणित लफडी करून महाशय कट्ट्यावर मात्र साळसूदाचा आव आणून बसायचे. कॉलेजात मात्र एकही लफडं नाही! जगात इतक्या मुली असताना फक्त आपलं कॉलेज हेच कार्यक्षेत्र कशाला ठेवायचं? हा त्याचा मौलिक विचार.. आणि आचार सुद्धा! तर हा वासू या मन्याला नसते प्लान करून द्यायचा.. आणि मी वेठीला धरला जायचो..

"उद्या ती देसायांच्या मेस वर चौकशी करायला जाणार आहे.. तिकडे डबा लावेल भौतेक."वासूची अटकळ..
"कुठनं आणतोस रे असल्या बातम्या?" मन्याने वाश्याकडे कौतुकाच्या नजरेने बघत विचारलं..
"आणतो ना? मग झालं! कुठनं आणतो, कश्या आणतो ते विचारायचं नै!" वासूने असं म्हणताच मन्याचा चेहरा पडला पण तरीही तो उत्साहाने पुढे सरसावला.
"ऐक" वाश्याने प्लान सांगायला सुरुवात केली.. "देसायांच्या कम्पाउंड शेजारी एक मोठ्ठ वडाचं झाड आहे. त्याच्या तिथे आपण लपून बसू. ती तिकडे आली कि तू पुढे व्हायचं आणि तिला हाक मारायची.. "
"तिने वळून बघितलं कि झटकन तिला गुलाबाचं फूल द्यायचं आणि म्हणायचं.." मी त्याचं बोलणं मध्येच तोडत माझी कल्पना सांगू लागलो.. वासूच्या कपाळाला आठ्या पडल्या..
"निलू, विल यू marry मी?" मन्या एकदम soft आवाज काढत म्हणाला..
"च्यायला..ते तसलं पिक्चरमध्ये चालतं..समजलं ना? तू जाऊन फक्त म्हणायचं..हाय नीलिमा..हे तुझ्यासाठी.. " मी एखाद्या अनुभवी माणसासारखा सांगू लागलो.
"पुढे बोल..पुढे बोल.. "मन्या स्वप्ननगरीत दंग झाला...
"अरे बैला.. त्यावर तिची reaction बघायची नि मग ठरवायचं..बरोबर ना वाश्या?" मी विचारलं
"ए गपे..ते 'विल यू marry मी' पिक्चरमध्ये चालतं,,आणि तू हे जे काय सांगतोयस ते या दुनियेत चालतं का?" वासू मला विचारायला लागला.
"चालतं म्हणजे काय.. चालणारच..मन्या तुला पटतंय कि नाही सांग.." मी
"अरे पण आधी तिच्याशी मैत्री तर करूदेत त्याला.. पयल्यांदा बोलायचं मग दोस्ती वाढवायची..मग पुढे.."
"ए च्चल! एवढा वेळ कसा काय काढायचा बुवा? एकतर शेवटचं वर्ष.. तू म्हणतोयस ते करायचं असतं तर आधीपासून करायला हवं होतं.. च्यायला सेकंड आणि थर्ड इअर ला जमलं नाही ते एकदम आत्ता कसं काय जमणार? मला याचीच आयडिया बरोबर वाटतेय!" मन्या बोलला. मी उगीच कॉलर ताठ केली..
बराच वेळ वादविवाद झडल्यानंतर माझाच प्लान फ़ायनलाईज झाला हे दिसल्यावर वासूने माझ्याकडे बघून सुस्कारा टाकला,मन्याकडे तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकला आणि " उद्या संध्याकाळी भेटा,प्लान कसा फसला ते सांगायला." असं आत्मविश्वासाने बोलून वासू अंतर्धान पावला.

त्यानंतर जे घडलं ते तर सर्वश्रुत आहेच! वासूला सगळा किस्सा सांगितला,त्याने तो निर्विकारपणे ऐकून घेतला आणि म्हणाला "देखा मन्या? तू इसकी बातोंमे आ गया? माझं ऐकायचं सोडून त्याचं ऐकायला गेलास? कभी तो सोच, की एक अंधा दुसरे अंधे को कैसे बता सकता है की नंगी लड़की कैसी दिखती है!!! पण असो, तुम्ही फट्टू असल्याचा एक फायदा झाला...तिने तुमचं ,विशेषतः ह्या मन्याचं थोबाड बघितलं नाहीये.. म्हणजे अजून तरी तिच्या नजरेत हा पडला नाहीये"
"म्हणजे?? आय मीन,तिच्या नजरेत हा पडला नाहीये म्हणजे काय बुवा? तिला अजून हा दिसला नाहीये असं?"
वासू गडबडला पण सावरून म्हणाला.. "अरे अकल के अंधो, मतलब उसकी नजरमे ये गिरा नही है..आपण अजून प्रयत्न करू शकतो."

काही दिवस त्याची हालचाल दिसेना म्हटल्यावर मन्याला राहवेना..
"सदानंद ,मित्रा.. देसायांकडे येताना दिसत नाही ती.. तू तर म्हणाला होतास कि ती डबा लावणारेय म्हणून.. "
"देसायाचं जेवण पचनी पडलं नाही बहुधा तिच्या.. मालकिणीच्या इथेच ती जेवते आहे.." ती राहायची माझ्या शेजारी आणि या वासूला सगळी बित्तंबातमी!!
"मग आता काय करायचं?"
"अरे, कॉलेजात बोल ना तिच्याशी..जरा ओळख-बिळख काढ. बोलायला सुरुवात तर कर.."
"साल्या ते जमत असतं तर तुझ्या मागे मागे फिरलो असतो का?"
"हे बघ.. आपण तिघे जाऊ एकत्र.. हा तिला हाय म्हणेल.. मग मी बोलेन आणि मग तू बोल.. त्यानंतर आम्ही दोघे कल्टी मारू मग फक्त तू आणि ती.. काय? कस काय?" वाश्याने विचारलं.
मनूचा चेहरा खुलला..

त्यानंतर मग थोड्याच दिवसात एकदा ती फ्लुईड मेक्यानिक्स च्या lab मधून बाहेर पडत आहे असा संदेसा घेवून वासू पोचला..आम्ही प्लान रिसाईट केला..आणि कॉरिडोर मध्ये तिच्या समोर आम्ही येवू अशा बेताने आम्ही चालू लागलो..आणि हाय रे देवा.. ती तिच्या मैत्रिणींसोबत होती.
"आली.. आली..." दोघांची खुसफुस..ती जवळ आली तशी माझी धडधड वाढली..
"...." मी शांतच
"अरे बोल ना.. 'हाय' म्हण ना..." वासू पुटपुटला..
नीलिमा आम्हाला क्रॉस झाली..तिची माझी नजरानजर होताच ती हलकसं हसली.. मी हसलो आणि या दोघांकडे पाहिलं.. मन्या जणू ती त्याच्याकडे बघून हसली असं तोंड करून होता.. वासू माझ्याकडे रागारागाने बघत होता..
"काय रे..फज्जा उडवलास...."वासू म्हणाला..
"अरे किती मैत्रिणी आहेत बरोबर.. " मी हळूच म्हणालो..
"मग काय झालं.. 'हाय' केलं असतंस तर थांबली असती ना ती.."
"आणि तिच्या मैत्रिणी ?"
"त्या राहिल्या असत्या बाजूला उभ्या.." मनू लुडबुड करायला लागला.."मग मी आलो असतो.."
"साल्या.. ये इथे आणि मार हाक.. तुझ्यासाठी एवढी मरमर करतोय तर तू या वासूची साईड घेऊन मलाच थर्ड लाव.. " मी भडकलो.. "मी तिच्याशी बोलायला लागल्यावर जर तिच्या मैत्रिणी बाजूला राहू शकतात तर माझ्या मित्रांना सुद्धा बाजूलाच उभं राहायला पाहिजे..आणि जर माझा मित्र येऊ शकतो तर तिची मैत्रीण सुद्धा येवू शकते..."मी रागारागात काहीतरी लॉजिक बनवून सांगितलं..
वासू तिकडे दुर्लक्ष करून वेगळाच विचार करत होता. "आय विल डू इट!" तो बोलला. "जस्ट वेट & वॉच.."

वासूने स्वतः सिरीअसली इंटरेस्ट घेतलाय म्हटल्यावर काहीतरी घडेलच याची आम्हा दोघांनाही शाश्वती होती.वासूची स्वतःची निरनिराळी अकाउंटस सांभाळून तो हे काम समाजकार्य म्हणून करत होता त्यामुळे मन्याचा त्याच्याविषयीचा आदर दुणावला..
थोड्याच दिवसात वासूने निलीमाची ओळख काढलीच. "हा तिचा नंबर" असं वासूने सांगितल्यावर मन्या प्रचंड खूश झाला.
"काय उपयोग? ज्याची ओळख व्हायला पाहिजे त्याची न होता बाकी दोघांची झाली." मी म्हटलं..
"असू दे रे.. आगे आगे देखो होता है क्या.." मोबाईलमधले फोटो स्क्रोल करत मन्याच्या गादीवर पहुडलेला सदानंद बोलत होता.. मनूच्या डोळ्यातून कौतुक ओसंडून वाहत होतं. त्याच्या उपकाराची परतफेड करायची म्हणून त्याने उगीच वाश्याचं कौतुक आरंभलं!!
"कसं जमतं यार तुला सगळं हे.."
"त्याचं काय आहे.. मुलीला कधी 'डू यु लव मी?' म्हणत नाय मी..सरळ 'आय लव यू' म्हणून मोकळा होतो! लिसन गाईज.. नेव्हर आस्क फॉर हग..जस्ट टेक इट आणि नेव्हर से आय कान्ट लिव्ह विदाउट यू,जस से आय लिव फॉर यू!!" वासू म्हणाला..
"एक नंबरचा फ्लर्ट आहेस तू.."
"हो का? मीच का? हे बघ.." सेल मधला romantic नावाचा फोल्डर दाखवत वाश्या म्हणाला.. "हे वेगवेगळ्या पोरींनी पाठवलेले मेसेजेस.. फॉरवर्डेड आहेत.. त्यांना कुठून येतात? कोणीतरी दुसरा पाठवत असेलच ना? अरे प्रत्येक जण गेम करत असतो.. आपण प्यादं व्हायचं कि मूव्ह करायची ते आपल्या हातात असतं!"
"कायतरी भन्नाट ऐकवू नकोस आम्हाला..पण काय रे च्यायला.. आम्हाला एक मुलगी पटत नाही आणि एवढ्या सगळ्या मुलींशी एकाचवेळी कसा काय contact ठेवतोस रे तू? जम्ब्लिंग नाय होत? म्हणजे एकीला दुसरीच्या नावाने हाक मारलीस कधी तर?" त्याच्या मोबाईलमधले फोटो आता मन्या स्क्रोल करत होता!!
"ह्या ह्या.." वासू एकदम कुसक्यासारखं हसला.. "अरे आयडिया आहे आपली..नाव विचारतो ते पहिल्याच वेळी.. नंतर पेट नेम.. यांची नावं तुझ्यासाठी वेगवेगळी असतील पण माझ्यासाठी सगळ्याजणी 'शोनूटली' आहेत.."
"क्काय? कोण आहेत?"
"शो-नू-ट-ली"
"शी.. कित्ती घाणेरड टोपण नाव आहे.."
"असू दे.. तुझ्यासाठी नाहीये ते.." वासू म्हणाला,तेवढ्यात त्याचा फोन खणखणला.. "हां..शोनूटली..बोल कशीयेस? आं? बरिस्ता नको ग.. लेट्स गो टू मोका धिस टाईम.." वासू लांब गेला तसा त्याचा आवाज अस्पष्ट झाला..
आम्ही दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलो..

वाश्या नीलिमाचे दुस-या दिवशीचे प्लान्स तिलाच विचारून मन्याला सांगत होता आणि मनू संधीमागून संधी दवडत होता.. प्रत्येकवेळेला माझ्या शिव्या खायच्या आणि ती दुसऱ्यादिवशी कुठे जाणार ते वासूला विचारायचं हे त्याच रुटीन झालं. दिवसागणिक वेगवेगळ्या स्तरावरील प्रयत्न फसत होते..नवनवीन प्लान्स बनत होते..

इकडे निलीमावर मी बारीक नजर ठेवून होतो. सातव्या सेमिस्टरच्या परीक्षा जवळ येत होत्या त्यामुळे हल्ली तिचं उठसुठ बाहेर पडणं कमी झालं होतं. क्लास आणि कॉलेजला मैत्रिणींचा कंपू तिच्या बरोबर असायचा पण संध्याकाळी मात्र ती एकटीच बाहेर पडायची. हि गोष्ट वासूच्या नेटवर्कने त्याच्यापर्यंत कशी काय पोचवली नाही काय माहित
मी एकदा वासूला फोनवरून हि माहिती दिली.. तो चमकला. पण सावरून "काय, कधी, कुठे" वगैरे सगळं त्याने मला विचारून घेतलं. "अरे नेटवर्क म्हणजे काय रे?तुमच्यासारखे दोस्त लोक हेच नेटवर्क माझं.." असं म्हणून त्याने मला भावनिक सुद्धा केलं..

असो! तर आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो पण मन्याची गाडी नीलिमाशी साधं बोलण्यापर्यंत सुद्धा पोचत नव्हती. ....आणि एकदा कधीतरी मन्या बसमध्ये ती असताना त्याला ती शेजारी दिसली!! मान कलंडती करून फोन वर बोलता बोलता; खांद्याची bag ,पाठीवरची sack आणि हातातली पिशवी सांभाळून उभं राहणं तिला जिकिरीचं जातंय हे मनूने हेरलं. त्याने वासूचा फोन फिरवला तो नेहमीप्रमाणे बिझी लागला. ताबडतोब त्याने मला फोन केला आणि परिस्थिती सांगितली. "हडपसर बस मध्ये आहे. वासुशी बोलता यायला हवं होतं रे आता.. नेमका त्याचा फोन बिझी."
इथे वासू माझ्या समोरच फोनला चिकटला होता..
"अरे..इथेच आहे तो.. त्याच्या एका "शोनूटली" शी बोलतोय.." आम्ही फिदीफिदी हसलो.. वासू माझ्याकडे रागाने बघायला लागला आणि उठून बाल्कनीत गेला..
"आता ऐक..हा चान्स तरी घालवू नकोस..बोल तिच्याशी.. उठ आणि तिला बसायला जागा दे. काहीतरी बोल."
"हो उठतो. नाहीतरी शेजारी एक अगडबंब माणूस बसलाय. मीच अवघडलोय.. हि शेलाटी शेंग मात्र सहज मावेल इथे आणि सांग न.. काय बोलू?"
"अरे सगळं काय मीच सांगू? लहान आहेस काय..? सुरुवात करताना वाश्याबद्दल बोल.. तो माझा मित्र आहे वगैरे वगैरे.. आणि मग बोलणं सुरु होईलच पुढे. आणि एक काम कर.. फोन तसाच चालू ठेव ईयरफोन एका कानात घालून. मला काही सुचलं तर सुचवतोच वरून वासूला आवरतं घ्यायला सांगतो. त्याचं आटपलं कि तोसुद्धा सूचना देईल तुला इकडून. ठीकेय?"
मी नेहमीप्रमाणे परत एक जोरदार प्लान बनवला..

तिला जागा देण्यासाठी मनू उभा राहिला.. ती हसली. "मी तुला दोन मिनटात फोन करते " तिने फोनवर सांगितलं म्हणजे फोन ठेवला असावा.. मी इकडे आडाखे बांधत होतो. पिशव्यांची कुरकुर ऐकू येत होती म्हणजे मन्या बसायला मदत करत असावा.मन्याच लक आज जोरात होतं कारण ती बसली आणि तेवढ्यात शेजारच्या सीटवरचा अजस्त्र देह सुद्धा उठला.त्याबरोबर ती आत सरकली. मन्याला तिने नजरेने बसायची खूण केली. मन्या हरखून गेला असावा यात वाद नाही! तो तिच्या शेजारी बसला..

मी खिडकी उघडून बाहेर पाहिलं.. नशिबाने वाश्याचा फोन (तुलनेने लवकर) आटपला होता..तो बाल्कनीत फोनवर काहीतरी करत बसला होता.. फोन संपला कि मेसेज.. अजून काय असणार?
"सदानंद.. ए sss सदुभाऊ.. " मी वाश्याला प्रेमाने हाक मारली.पण साल्याचं लक्ष पण नव्हतं एवढा तंद्रीत होता.
"वाश्या- नालायका लवकर आत ये.. " मी फर्मान काढलं..
वासू आत आला आणि करंगळी दाखवत म्हणाला "जाऊन येवू??"
"परमिशन कसली घेतोयस?? जा.. पटकन हलका होऊन ये. एक जड मिशन सांभाळायच आहे.. अनायसे सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत. मन्याचा फोन आहे.."
"सांग त्याला, आज नीलिमा हडपसर ला चालली आहे म्हणावं मामाकडे तिच्या.." आतून ओरडून वाश्या सांगत होता!
"ए त्याला आधीच माहितीये ती हडपसरला चालली आहे ते.." मी मन्याला सांगितलं.
"त्याचं नेटवर्क म्हणजे ना.." असं म्हणत आम्ही थोडा वेळ वासूचे गोडवे गायले..
"ती काय करतेय?" मी विचारलं
"आईचा फोन आलाय.. कसला डब्बा फोन आहे तिचा.. आई बोलतेय तेसुद्धा मला कळलं आणि काय बोलतेय ते मला स्पष्ट ऐकू येतंय.." मनू हळू आवाजात मला सांगत होता."तिला घरी कधी येणारेय ते विचारतेय..practicals कधी आहेत ते विचारलं.."
"असू दे असू दे..तूच ऐक ते.. आटपलं कि तू बोल.."
"पण ती इतकी हळू बोलतेय कि ते मला ऐकू येत नाहीये तर तिच्या आईला कसं काय ऐकू जात असेल कोणास ठाऊक?"
मी हसलो. लवकरच तिने फोन ठेवला.

"हाय.."या 'हाय' बरोबर मन्याने गिळलेला आवंढा फोन वरून मलासुद्धा ऐकू आला.. बोलला बाबा एकदाचा! मला उगीचंच 'हाय'सं वाटलं..
"हलो.."
"मी ऋषिकेश.." हो खरं..मन्याचं नाव ऋषिकेश होतं. मग आम्ही त्याला मनू का म्हणत असू बुवा?? अच्छा..त्याच्या वडिलांचं नाव मनोहर होतं!! मला माझंच हसू आलं आणि मन्याचं पण!
"मी नीलिमा.."
"माहितीये.. आय मीन ऐकून माहितीये. वासू माझा मित्र.."
"कोण वासू?" तिने विचारलं..
"सदानंद.. सदानंद म्हण" मी prompting केलं..
"सदानंद म्हण.." मन्या बोलला.. भलताच गडबडून गेला होता बिचारा!!
"आं? अच्छा सदा?? कधी बोलला नाही मला तो..त्याच्या तोंडून मी एक 'मन्या' नाव ऐकलंय आणि दुसरं.."
"हां हां..तो मन्या म्हणजे मीच.." साल्याने तिचं वाक्य मधेच तोडलं नाहीतर वाश्या मला काय म्हणतो ते कळलं असतं!
"अच्छा.. सदा मन्या का बरं म्हणतो तुला? हृषीकेश इज सच अ क्युट नेम.. ही कॅन कॉल यू हृषी टू"
पहिल्या प्रश्नाने गांगरलेला मन्या तिच्या दुस-या वाक्याने प्रचंड लाजला! असं कोणी बोललंच नव्हतं न आजपर्यंत! 'हृषीकेश' सुद्धा नाही आणि 'हृषी' सुद्धा नाही! क्युट बीट म्हणायचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता!
"मी कॉम्प ला आहे.." हृषी--आपलं-- मन्या म्हणाला.
"हो का? मला वाटलं सदाबरोबरच आहेस.. सिविलला.. मी मेक ला आहे.. काय बघ ना..चार वर्ष झाली आपल्याला या कॉलेज मध्ये पण आत्ता आत्ता ओळख होतेय.."- इति नीलू
"हो ना..ते पण शेवटच्या सेमला.. हार्डली महिना राहिला ना आपल्या एग्झाम्स ना?" मन्या फॉर्म मध्ये आला असं वाटत होतं एकंदरीत!
"हो. मला सदाच हे म्हणाला कि इतक्या वर्षात कशी काय ओळख झाली नाही आपली हा प्रश्न त्याला सतावतोय.."
"आयला.. सदा आपली "सदा सदा" करतेय..प्रत्येक वाक्यात सदा.आपण पण वाश्याला इतक्यावेळा सदा म्हटलं नसेल चार वर्षात!" मी मन्याला म्हटलं..

तेवढ्यात मला कडीचा आवाज आला..
"तू बोल रे कायपण.. फालतूगीरीचं..तोपर्यंत मी वासूकडून points घेतो.." मी मन्याला म्हटलं..
सदानंद बाहेर आला..
"माकडा, करंगळी दाखवून गेलास आणि इतकावेळ?"
"मग? साल्या कधीपासून होल्ड केलं होतं माहितीये? तासभर बोलत होतो फोनवर पोरीशी"
"कमालय बुवा..कस काय जमतं तुला" मी विचारलं
"मी याला इंद्रिय संयम म्हणतो!! " डोळे मिटून वाश्या म्हणाला..
"बैला..ते नव्हे..तासतासभर पोरीशी फोनवर बोलायला कसं काय जमतं ते विचारत होतो.."
"अच्छा ते होय? ते स्कील आहे.. जमेल तुलापण! पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतो तसा प्रेमात पडल्यावर माणूस बोलायला शिकतो !"
"तू इतक्या मुलींशी प्रेमात पडला आहेस कि काय?"
"गप रे..मी तुझ्यासाठी सांगत होतो ते..अपना मामला थोडा अलग है.."
"असो..ते नन्तर सांग.. सध्याला मन्याला गाईडलाईन्स हव्या आहेत.."
"अरे..आणखी कसल्या गाईडलाईन्स हव्या आहेत? लहान आहे का आता तो? आता काय त्याचा हात पकडून घेवून जाऊ तिच्याशी बोलायला? एवढे क्लूज देतो तिच्या मुव्ज बद्दलचे..अजून काय पायजे? एका संधीचं तरी सोनं करून दाखवावं.. सोनं राहू दे अगदी तांबं, पितळ..गेला बाजार अलुमिनिअम तरी केलान ना तरी ठीक!!"
आम्ही खळखळून हसलो.
'ए सांगायला सांग ना त्याला...' मन्याने मेसेज पाठवला.. मी तो त्याला दाखवला आणि आम्ही परत एकदा हसलो..
"बरं..त्याला सांगितलंस ना ती हडपसरला चाललीये म्हणून? परत आली कि करू काहीतरी प्लान म्हणावं.. मी एक अर्जंट कॉल करून येतो..ठीके?"
मी "अरे पण.." म्हणेपर्यंत तो बाल्कनीत गेला..

"मन्या..वासू फोन वर बोलतोय तोपर्यंत तूच लढव किल्ला.त्याचं आटपल कि सांगतो..." मी मन्याला सूचना केली..
"पण कधी?मला कॉर्पोरेशन ला उतरायचंय."
"काय रडतो रे..जा ना जरा पुढपर्यंत. झालं कि ये मागे परत"
"ठीकाय मी काढतो तिकीट पुढचं.."मन्या उत्साहाने म्हणाला.."तिला फोन आलाय..ऐकू?"
"काय हवं ते करेनास...."
"नीलिमा तुला फोन आलाय..ब्लिंक होतेय स्क्रीन..रिंगटोन ऑफ आहे वाटतं.."खिडकीतून बाहेर बघणा-या तिला मन्याने सांगितलं..
"ओह.. thanks हं.."म्हणत तिने फोन उचलला आणि कानाला लावला.
"हाय" तिचा आवाज मलापण ऐकू आला..
मन्या एकदम शांत झाला..
"नाही रे..बसायला जागा मिळाली..तुला ना मी एक गम्मत सांगेन परत आले कि.." ती कोणाला तरी सांगत होती..
"मन्या..काय करतोयस? शांत का बसलायस?" मी विचारलं..दुस-याचं सगळं बोलणं चोरून ऐकणं बरं नव्हे.." मी मन्याला सांगत होतो..
तो एक शब्द बोलायला तयार नव्हता.. त्याचं बोलणं ऐकू येत नाही म्हणावं तर मला तिचा शब्द न शब्द ऐकू येत होता.. तेवढ्यात फोन कट झाला.. मी फोन केला तर तो त्याने कट केला.

..वासूचा फोन संपल्यावर मी त्याला मन्याचा फोन कट झाला ते आणि परत लागत नसल्याचं सांगितलं.
"कुठेय तो?"
"अरे हडपसर बसमध्ये होता निलिमाच्या शेजारी.."
"क्काय?? "म्हणत वासू तीनताड उडायला आणि मला मन्याचा फोन यायला एकाच गाठ पडली..
"आला आला.." म्हणत मी फोन उचलला..आणि त्याला शेलक्या शिव्या घातल्या.."बोलला का नाहीस ?"

"मी काय ऐकलं माहितीये?"
"कुठे?"
"तिच्या फोनवर.."
"काय?"
"तिला कोणीतरी 'हाय शोनुटली,उभीच आहेस का अजून?' असं विचारलं फोन वरून!"
"क्क्काय ?" आता आश्चर्यचकित व्हायची वेळ माझी होती. "म्हणजे वाश्या..." मी वाश्याकडे पाहिलं.. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता..
"साला त्याला माहिती होतं मला काय जमणार नाही म्हणून.. पण म्हणून आपणच चान्स मारला नालायकाने .." मी बधीर झालो होतो तरीपण मला ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मन्याने साधारण पंधरा एक मिनिटं मन मोकळं करून "विचार ना त्या हरामीला.." म्हणत फोन ठेवला..

वाश्याकडे बोलायला काही नव्हतं.. "ती पडली यार प्रेमात..मी काय करू? या मन्याच्या नादाने माझंच बोलणं इतक्यावेळा व्हायला लागलं की कळलंच नाय यार.... "
"..." -मी
"बट सिम्स शी इज ऑफ माय टाईप..आय नेव्हर फेल्ट सो बिफोर.."
"..."-मी.
तो बरंच काहीबाही बोलला.. मला एव्हाना तिचं संध्याकाळी रेग्युलरली बाहेर पडणं, वासूचं चमकणं आणि बाकीचं संशयास्पद वागणं सगळ्याच्या लिंक्स लागल्या होत्या. पण त्याचंही बोलणं मला पटत होतं.
दोस्त दोस्त ना राहा :P
रात्री मन्या परत आला.. उद्ध्वस्त झाल्यासारखा! वासू मान खाली घालून बसला होता.. मला हसू कि रडू ते कळत नव्हतं आणि तेवढ्यात रेडिओ मिरची 98.3 वर 'पुरानी जीन्स' मध्ये नेमकं गाणं लागलं... 'दोस्त दोस्त ना राहा..प्यार प्यार ना राहा.. जिंदगी हमे तेरा ऐतबार ना रहा...' मन्याने नकळत सुरात सूर मिसळले आणि तो म्हणू लागला.."अमानते ये प्यार की..गया था जिसको सौंपकर..वो मेरे दोस्त तुम ही थे... तुम ही तो थे..."