मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

आज्जी..


"रे असो काय करतं? वायच ह्यो निवळ घे नि मग जा खंय तो.." मी शाळेतून घरी आल्यानंतर लगेच कुठे बाहेर पडायला लागलो कि आजीचा डायलॉग ठरलेला. दुपारचं जेवण करायच्याआधी साधारण ११.३०-१२ वाजता तांदळाची पेज पिणे हा शिरस्ता होता. ती स्किप करता उपयोगाची नाही. या पेजेतला तांदळाचा भात वगळता वरचं पाणी म्हणजे "निवळ". पेज नको म्हटली तर "निवळ" तरी घ्यावा हा आजीचा आग्रह. त्या पाण्यात सगळी पोषक तत्व आलेली असतात असं तिचं म्हणणं असे. " नको.. माका जावचा हा आता सायकल मारीत.. निवळ घेतलंय तर पोटात डूचमाळता..." माझं तिचा आग्रह मोडण्यासाठीचं ठरलेलं उत्तर. " हळू चलव हां रे सायकल.. नि लवकर ये.. गरम करून ठेवतंय पेज"

माझी आज्जी.. बाबांची आई.लहानपणी माझं विश्व होतं ते.. लहानपणापासून मी तिच्याबरोबरच असायचो आणि ती माझ्या बरोबर. तिच्या ख-या नावाने हाक मारणारं कोणीच हयात नव्हतं. आजोबा सुद्धा. मी साधारण पहिली दुसरीत होतो जेव्हा आजोबा गेले. ते काकांकडे राहायचे. आजीला कळलं तेव्हा ती धाय मोकलून रडत होती आणि तिला तसं पाहून मी हसत होतो. त्याआधी तिला रडताना कधी पाहिलंच नव्हत मी. मग मात्र ती थांबेचना म्हटल्यावर मीही रडायला सुरुवात केली असं धूसर धूसर आठवतंय..

मी "अहो आज्जी" असं संबोधन वापरायचो तिच्याशी बोलताना. पण इतरांशी बोलताना तिचा एकेरी उल्लेखच असे. आता करतोय तसा.

जाम लाड करायची माझे.. आणि फक्त माझेच हां. दादाचे नाही. नाही म्हणजे माझ्याइतके तरी नाही.माझे मात्र तिला शक्य होतील ते सगळे हट्ट पण पुरवायची. "आज्जी,माका चिटक्यांची उसळ व्हयी वाटाणे घालून.. तुमी करतास तशी.." असं नुसतं म्हटल्यावर "करतंय हां माजे बाय.." म्हणत ती नऊवारी साडीचा पदर खोचून गवार मोडायला घ्यायची त्याचवेळी काळे वाटाणे भिजत घातले जायचे. दुपारी आई ऑफिसमधून आली कि वैतागायची..
"काय आई, कशाला करता सगळं? मी आल्यावर करेन ना..!"
"गो.. गप -हंव हां, तुज्यासाठी नाय करुक हां.. हेका खावशी वाटली म्हणान करतंय.."
आई माझ्याकडे खाऊ कि गिळू नजरेने बघत स्वत:चं आणि बाबांचं ताट वाढून घ्यायची.. माझं आणि दादाचं ताट आजीच वाढायची आणि मग मला भरवायचीसुद्धा अगदी चौथीपर्यंत.. भुकेपेक्षा दोन घास कमी खावे हा सिद्धांत आजीला कधीच पटला नाही .. पोटाच्या क्षमतेपेक्षा दोन घास जास्तच खावे हे तिचं समीकरण. "वाढत्या आंगाची पोरा तुमी.. कसली कसली थेरा काढतास" म्हणत ती 'डाएट' वर टीका करत असे. तिने केलेलं केळ्याच शिकरण तर मला प्रचंड आवडत असे.. शाळेतून आलो की आठवड्यातून दोन तीनदा तरी माझा हा शौक मी आजीकडून पूर्ण करून घेत असे.

पाचवीपासून मी दुपारच्या शाळेत जायला लागलो तेव्हा सकाळी आजीची कोण लगबग असे. अगदी देवासाठी कंपाउंडमधल्या फुलझाडांची फुलं आणण्यापासून ते बंबासाठी जळण आणण्यापर्यंत! आईबाबांनी ऑफिससाठी ९:३० ला घर सोडलं कि आज्जी पूर्ण ताबा घेत असे. मग माझ्यासाठी दादासाठी आणि स्वत:साठी आंघोळीच पाणी तापवणे, चहापाण्याची छोटी भांडी आणि कप धुऊन टाकणे वगैरे छोटी मोठी कामं ती अगदी तन्मयतेने करत असे. मी आणि दादा तिला फुलझाडांच्या उंच वाढलेल्या फांद्या काठीने खाली वाकवून देणे, बंबात किंवा चुलीत सारखी काठी ढोसून निखा-यांवरची राख झटकून टाकणे, तिच्यासाठी गरम पाण्याची बादली बाथरूमपर्यंत नेऊन देणे अशी कमी कष्टाची आणि निरुपद्रवी कामं करत असू! दादाची शाळा जवळच होती त्यामुळे तो सायकल घेऊन जायचा पण मी स्कूलबसच कंटिन्यू केली होती. संध्याकाळी आलो की आजी दरवाज्यावर बसलेली असे माझी वाट पहात. मग पुन्हा चहा,आईने लपवून ठेवलेलं फरसाण आणि हव्या असतील तर गरम केलेल्या चपात्या असा दणकून नाश्ता व्हायचा. मग मी खेळायला जायला मोकळा!

घरात सगळ्यात जास्त काळ आम्हीच एकत्र असायचो. मोकळ्या वेळात आम्ही दोघेजण खूप गप्पा मारत असू. ती प्रौढ साक्षरता वर्गातून थोडंफार शिकली होती. मी शाळेतल्या गमतीजमती तिला सांगायचो आणि तीदेखील त्यात रस घेऊन ते सगळं ऐकायची. बाबा लहानपणी कसे होते,काका काय मजा करायचे शाळेत, वगैरे गोष्टी सांगायला लागायची..त्याचवेळी बाबा आले की मग अजूनच धमाल.
"एकदा आईने जेवण बनवलं होतं. मला इतकं आवडलं की मी पूर्ण फन्ना उडवला.. दोघाजणांचं जेवण फस्त केलं.." बाबा सांगायचे..
"मग आजी, तुमी काय केलास?" माझी उत्सुकता.
"काय करतलंय, सगळा सरताहा बघल्यावर परातीत पीठ भिजौक घेतलंय.. ह्येका एकदम येवढा खावसा वाटात ह्या माका कसा समाजतला?"
"कायव सांगू नुको हां.. तू तेवा कमीच बनवलंलंस. माशे असतनासुदा मी कधी येवडो जेवलंलंय नाय.." बाबांचा बचाव.
"गप -हंव! माशे असले काय तिप्पट ढकलीस ता इसारलंस? स-स चपात्ये एकटो खाय.. अशे जेवनारे तिघे.. हात मोडान येय लाटतना!!"
आजी जेवणाची मापं काढायला लागली की बाबा माघार घेत.. आणि त्याचं भांडण जुंपल की मी आणि दादा मनमुराद मजा लुटायचो.. आईपण सैंपाकघरातून बेडरूमच्या दरवाज्यात येवून कमरेवर हात ठेवून या लटक्या भांडणाची मजा घ्यायची.
"काय गो.. काय ठेवलंहं ग्यासवर?"
"चपाती करत्येय" माझ्या आईला मालवणी बोलता येत नसे
"करपात ती.. जा जवळ -हंव"
"परतून आलेय मी.." असं म्हणेपर्यंत जळल्याचा वास नाकापर्यंत पोचलेला असायचा... आई लगबगीने ओट्याजवळ धावायची..
" शिरा पडली! सांगतंय तरी ऐकना नाय... बघलं? " असं मला म्हणत आज्जी मोठ्याने ओरडायची.. " गोsss माका वाढ हां ती चपातीss"

दादाने जिम जॉईन केल्यावर त्याच्या instructor ने दादाच्या भात खाण्यावर लगाम घालायचा ठरवलं. कोकणातलं घर आणि भाताला नकार?? आजीचं पित्त न खवळतं तरच नवल!!
"काय होणा नाय २ मुद भात खालस म्हणान... अरे भाताचो पिंड आपलो नि भाताकच नाय म्हणतं? कोण हा तो सांगनारो? फटकी रे येवंदे तेच्या तोंडार..." आजीने पट्टा सुरु केला की दादा गुपचूप भात घेत असे. खरतर त्याला भात आवडायचाच पण त्याला कारण हव असे instructor ला सांगायला.. "आज्जी सांगते त्यामुळे खावा लागतो भात!"
आजी सुद्धा भाताचा छोटासा ढीग रचत असे स्वत:च्या ताटात.. मी त्याला डोंगर म्हणायचो आणि तिने वरती थोडासा खळगा करून वरण ओतलं की मी "ज्वालामुखी फुटला..ज्वालामुखी फुटला.." असं आरडाओरडा करायचो आणि आजीचा ओरडा खायचो.. "जेवूक तरी दी सुखान..." म्हणत ती जेवायला लागायची.

मे महिन्याच्या सुट्टीत तिची काकांच्या गावाला ट्रीप ठरलेली.. महिनाभर काकांकडे राहायची. तिथे माझ्या चुलत भावावर प्रेमाचा वर्षाव करायची. जून आला की आमची शाळा सुरु व्हायच्या वेळी ती पुन्हा घरी डेरेदाखल! माझ्याविना तिला करमत नसे हेच खरं. पण तेव्हा मला या गोष्टी कळत नसत.
दहावीनंतर मी पुण्याला जायचा निर्णय घेतला.. तेव्हा आजी काकांकडे होती. ती परत आल्यावर मी तिला हे सांगितलं. तिला धक्का बसला असावा. काही बोलली नाही पण तिच्या जीवाची घालमेल जाणवत होती मला. २ दिवसानंतर मी एकटा बसलेलो असताना ती आली.
"रे.. जावकच व्हया काय भायर?"
"होय ओ.. थय माका इलेक्ट्रोनिक्स घेवक मिळताहा.. हंयसर तो ऑप्शन नाय हा.."
तिला फारसे काही कळले नसावे.. पण माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढे मात्र कळले..
"तुजो बापूस म्हणत होतो की हयसुदा इंजिनयर होऊचा कालेज आसा.." ती बाबांकडून चौकशी करून आली होती..

"माजे बाय... तो फुड्चो प्रश्न हा.. मी आता अकरावी बारावी करुक चल्लहंय पुण्यात.." ती त्यावर गप्प राहिली.. मी जाणारच आहे हे मात्र तिला कळलं..

मी पुण्यात निघताना तिचे डोळे पाण्याने भरले... "आज्जी.. मी येतलय महिन्या दोन महिन्यान.. तवसर कळ काढा.. " मी समजूत घालत होतो पण माझ्या मनातही भावनांचे कढ येत होते. आजीची इतक्या वर्षाची सोबत सोडून जायचे म्हणजे काय... पण माझे मित्रसुद्धा गाव सोडून जात होते. मी एकटा काय करणार होतो? आणि कधी ना कधी.. निदान २ वर्षांनी तर जावे लागणारच होते. नाहीतरी गावातलं इंजिनियरिंग कॉलेज तेव्हढंसं रेप्यूटेड नव्हतं.

पहिले काही दिवस तिच्याशिवाय काढायचे म्हणजे प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास झाला.. आंघोळीला टॉवेल नेण्यापासून, घालायचा शर्ट निवडण्यापासून ते अगदी सर्दी झाल्यावर नाकाला विक्स चोळण्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट आजीची आठवण करून देऊ लागली,एवढा डीपेंडन्ट होतो का मी? कधी जाणवलच नव्हत आतापर्यंत!! आठवड्यातून एकदा मी घरी फोन करायचो बूथवरून तेव्हा आजीची न चुकता चौकशी करायचो आणि तिच्याशी बोलायचो पण... घरी गेलो की तिचा आनंद गगनात मावत नसे. मी पण तिला पुण्यातल्या गमतीजमती सांगायचो. तिची चेष्टा मस्करी करायचो आणि सूचनांची मोठी यादी ऐकून परत पुण्याला जायचो. पुण्यात आजारी पडलो की तिचा कांद्याचा काढा आठवायचा आणि त्यातून सुटका झाली याचा आनंदही व्हायचा!

तरुणपणी जसजसं आपण एखाद्यापासून दूर होत जातो तसतसं आपण त्याच्याविना जगायची सवय होते.. त्या व्यक्तीबद्दलच्या तीव्र भावना हळूहळू बोथट होत जातात. वर्ष दोन वर्षात मीही आजीशिवाय इतरत्र रमायला शिकलो.. पण जुनं हाड वळवावं तसं वाकत नाही. आजीला माझ्याशिवाय मुळीच करमत नसे. त्यात दादाही शिकायला म्हणून रत्नागिरीला गेला.. त्यामुळे ती अजूनच एकटी पडली.. झाडांना पाणी घालणे ,कचरा काढणे वगैरे कामं करून ती दिवसाचा वेळ काढायची. साधारण ८० वर्ष पूर्ण केली असतील तिने.. तिला तिचं जन्मवर्ष वगैरे माहित नव्हतं पण अंदाजाने तिचं वय तेव्हढ असावं..

एकदा मी न कळवता अचानक घरी गेलो.. सरप्राईज द्यायला.. सगळे खुश झाले..
बाबा आजीला म्हणायला लागले.. "इलो बघ.. शोधीत हुतस न काल.."
"मग मी सांगत होतंय ना.. तो कालच इलोहा.. होय ना रे झिला?" आजी म्हणत होती.
मला भानगड कळेना. मग आईने खुलासा केला. काल तिला स्वप्न पडलं किंवा भास झाला की मी आलोय आणि तिला हाक मारून कुठेतरी लपून बसलोय.. मला शोधून दमली;आई बाबांना सांगून थकली. कोणीच ऐकेना. आणि नेमका दुस-या दिवशी मी आलो होतो! इंट्यूशन म्हणतात ते हेच का? तेव्हा मोबाईल हा प्रकार ही नव्हता; लगेच मला फोन करून कन्फर्म करायला वगैरे. लहानपणी मी असाच तिला हाक मारून लपून बसायचो. तिच्यासाठी मी तेवढाच लहान होतो अजूनपण!

१-२ वर्ष झर्रकन गेली. मी इंजिनीरिंग सुद्धा पुण्यातच करणार हे तिला समजलं होतं. तिनं दोन महिनेच नव्हे तर तब्बल दोन वर्ष कळ सोसूनही मी तिला दिलेला शब्द पाळला नव्हता... तिचं वार्धक्य आता प्रकर्षाने जाणवू लागलं होतं. नाव विसरणं, काळ विसरणं वगैरे वार्धक्याच्या खुणा स्पष्ट दिसून येत होत्या. २ महिन्यांनी वगैरे गेल्यावर तिच्यातला बदल ठळकपणे जाणवायचा..

"खानास नाय कित्या?" मी विचारायचो
"हाडां हत नुसती.. तेंका कितीसा व्हया खाउक?" म्हणत ती विषय हसण्यावारी न्यायची.. तिच्या लहानपणाच्या गोष्टी सांगायची. तिच्या अर्थात आमच्याही नातेवाईकांनी हिच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन केलेल्या गोष्टी सांगायची..
"कामाक व्हये म्हणून मागल्यान रे तेनी ते कागद.. परस्पर जमीन तेंच्या नावावर करून घेतल्यानी.. माका वाचूक येयात असता तर?तेच्यानंतर जाऊन मोठ्यांच्या शाळेत बसाक लागलंय. पण काय उपयोग.. जमीन तुमच्या चुलत चुलत्यांच्या नावावर झाली ती झालीच.. माजीच चूक झाली.." म्हणत स्वतःच्या कर्माला दोष द्यायची..
वस्तुत: या गोष्टीचा मला काय उपयोग होणार ते तिचं तिलाच माहित.. पण तिला बहुतेक कुठल्याच बंधनात म्हणा,आरोपात म्हणा अडकायचं नव्हतं.

इंजिनीरिंगला असताना एकदा काहीतरी भयानक स्वप्न पडून मी जागा झालो. दुपारी बूथ वर जाऊन घरी फोन केला. आईने उचलला..
"हलो.. तू कशी काय घरी?"
"काही नाही.. रजा काढली होती आज. अचानक कसा काय केलास फोन?"
"असंच.. कसे आहेत सगळे? आजी?"
"बरे आहेत.."
एवढ त्रोटक उत्तर? काहीतरी चुकत होतं खास..!! २ दिवसांनी मी पुन्हा फोन केला.. "आई एक्स्पायर झाल्या रे काल.. " आई मुसमुसत होती..
काळजात धस्स झालं.. मला वाटलंच होतं. पुन्हा एकदा इंट्यूशन मिळूनही...श्या!!  "मी निघू का लगेच? परवा केला फोन तेव्हाच कि काय ?"
"तेव्हा नाही. तेव्हा सिरिअस होत्या..कालच गेल्या सगळे इथेच होते काका वगैरे. त्यामुळे फ्युनरल केलं कालच. तू आता कार्याला ये.. " आईने तसाच फोन ठेवला. आजी आता या जगात नव्हती.. माझे डोळे ओलावले.. जुने दिवस आठवून अश्रूंना बांध घालण कठीण होऊ लागलं. 'ती तिकडे आहे असंच समज' मन माझी समजूत घालत होतं पण ते तेव्हढ सोपं असतं का?

दहाव्याला मी गेलो.
"काही त्रास दिला नाही.. त्यादिवशी मला सांगीतलन रजा घ्यायला. दुपारी बोलावलं जवळ आणि मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडले.. तुझी आठवण काढत होती पण तुला मध्येच यायला कसं सांगणार ? " बाबा सांगत होते. मी सुन्नपणे ऐकत होतो. वर्षानुवर्षाचं दुखण -खुपण नाही.. कोणाकडून सेवा करून घेणं नाही कि कोणाला कसला त्रास देण नाही.. आजी निघून गेली होती.. माझी वाट बघून पण मला न सांगताच..

"पिंडाला कावळा शिवत नाहीये.." भटजी सांगत आला.
"थांबा.मी येतो." मी म्हणालो. नदीच्या काठाकाठाने चालत मी पिंडदानाच कार्य चाललं होतो तिथे पोहोचलो.
"इलो हा गेsss तुझो लाडको नातूsss" बाबा आकाशात बघत ओरडले आणि झाडावरच्या कावळ्यांनी "काव काव" करत पिंडाभोवती गर्दी करायला सुरुवात केली...

मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

मृगजळ अंतिम भाग

भाग -१
भाग -२

तो पुण्यात आला त्याला आता आठवडा होत आला होता. रोजच्या रोज मेसेजेस चा रतीब चालू होता.. एक दिवस त्याने मेसेज नाही केला तर रात्री तिचा मेसेज "no msg 2dy? ab kaam khatam to msg bhi khatam?"
क्काय?? आहे काय हे? ही अशी का बोलते नेहमी? आपले कॉम्प्रेहेन्डींग स्कील्स कमी आहेत कि वोक्याब्युलरी ? कसलं काम? काही वेगळा अर्थ असावा का या मागे? छे! कळायला काही मार्गच नाही. अर्थ विचारायला त्याने रिप्लाय केला तर त्याला "तू ते समजून घे" अशा टाईप चं व्हेग आन्सर!
कदाचित असंही असेल कि तिच्या मनात माझ्या बद्दल काहीतरी असेल! ती आपल्याला या गोष्टी सुचवतेय आणि आपण बहुधा समजून घेत नाहीये.

वीकेंडला ती परत पुण्यात आली. सोहमने तिला फोन केला. "तुला फक्त वीकेंडलाच माझी आठवण येते" असा लटका राग व्यक्त करून झाल्यावर आकांक्षाला सोहमने भेटायचं कधी ते विचारलं.. "संध्याकाळी मी फ्री झाले कि भेटू" असं म्हणून तिने कन्फर्मेशन सुद्धा दिलं.
संध्याकाळी तयारी झाल्यानंतर त्याने लिहून ठेवलेलं पत्र हातात घेतलं एवढ्यात मेसेज आला..
"i hv so many issues with u. we can't gel up"
सोहमला बसलेला हा पहिला शॉक! त्याने फोन केला.
"काय झालं अचानक? काय इश्यूज आहेत? या मेसेज चा अर्थ काय?"
"तुला समजला ना? तोच!"
"अगं, नाही कळला म्हणून फोन केला ना?"
"सोहम, माझ्या घरी माझे मम्मी पपा माझ्यासाठी लाईफ पार्टनर शोधतायत.. यू नो..आय जस्ट डोन्ट want टू स्टार्ट धीस अगेन.."
काय आहे हे? कशाचा कशाला संबंधच नाही! तिला घरचे स्थळं बघतायत म्हणून मला भेटणारपण नाही? मी काय मंगळसूत्र घेऊन उभा आहे का? त्याला काहीच झेपत नव्हत.
"...आणि तुझ्या इतक्या मैत्रिणी.. काल अंकिता,आज मी तर उद्या दुसरी कोणी.. हाऊ कॅन आय रिलाय ऑन यु?"
"....."
सोहम सुन्न झाला होता..

मम्मी पपा माझ्यासाठी लाईफ पार्टनर शोधतायत... वगैरे विचार ती करते म्हणजे तिच्या पण मनात हेच असणार!! सोहमने विचार केला आणि मेसेज टाईप केला "मला तू आवडतेस.. मला तुझी जन्मभर सोबत करायला आवडेल. आज आपण जर भेटलो असतो तर मी तुला हेच सांगणार होतो."
….पण आकांक्षाचा काहीच रीप्लाय आला नाही.

सोहमने एक-दोन दिवस वाट बघितली.. पुन्हा मेसेज केला.. पुन्हा नो रीप्लाय! त्याने बरेच मेसेज केले तिला त्यानंतर.. पण एकाचही उत्तर आल नाही.. फोन करायचा प्रयत्न केला तर उचलत नाहीच वरून " यू आर डिस्टर्बिंग मी.." सारखे रूड मेसेजेस.. सोहम सैरभैर झाला..
त्याने पुन्हा एकदा तिला सांगायचा प्रयत्न केला की एकदा.. फ़क्त एकदा मला माझी बाजू मांडू दे तुझ्यासमोर.. त्यानंतर तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. पण आकांक्षाकडून काहीच रीस्पॉन्स नाही..

शेकडो विनंत्या करूनही काहीच फरक पडत नाही हे पाहून सोहमचीही मन:शांति ढळली.

सगळं मस्त चाललं होतं. तू आलीस आणि एवढा फरक पाडलास माझ्यात.. पोरींना शष्प भाव न देणारा सोहम बदलला.. फक्त तुझ्यामुळे! प्रत्येक क्षणी तुझी आठवण मला छळते.. तुला विसरण्याच्या प्रयत्नात इतर गोष्टी विसरतो पण तुला विसरू नाही शकत! कोणत्या अधिकाराने माझा छळवाद मांडला आहेस तू?? का आलीस तू माझ्या आयुष्यात? का? का?
सोहमने कोणत्याही प्रतिक्रियेची अपेक्षा न ठेवता तिला मेसेज पाठवला.

आणि अखेरीस तिचा रिप्लाय आला!! सोहम आनंदला पण हा आनंद काही क्षणच टिकला..
"मी तुझ्या आयुष्यात आले होते मैत्रीण म्हणून! फक्त एक प्युअर फ्रेंड.. तो तू होतास ज्याने त्याला वासनेचे रंग दिले. स्वतःच्या आयुष्याची स्वतःच ओढाताण करून तू खापर मात्र माझ्यावर फोडू पाहतोयस. मी तुझ्या अवती भवती होते तेव्हा i was trying to be genuine. यावर एकच उपाय.. तू माझा विचार सोडून दे.."

सोहमचा चेहरा खर्रकन उतरला.. काय अपेक्षित होतं आणि काय पुढ्यात आलं?
"माझ्या मनात तुझ्याबद्दल real feelings च होत्या गं.. कसल्या वासना आणि कसले रंग?? आणि तुला कधीच असं काही वाटलं नाही का?"

"मुळीच नाही! मुलगी तुमच्या जोक्स ना हसली आणि तिने तुमच्या मेसेजेस ना रिप्लाय केला कि ती तुमच्या प्रेमात पडली असं समजणं म्हणजे मनाचा कोतेपणा सिद्ध करणं असं वाटत नाही का तुम्हा मुलांना?" आकांक्षाचा मेसेज आला.

काय?
नव्हतंच मनात काही तर कशाला नंबर दिला?
तोसुद्धा एकदा नव्हे तीन-तीनदा??
तिच्या मनाजोगता मी वागलो नाही तरी कशाला contact ठेवला?
गर्लफ्रेंड ची दहा दहा वेळा विचारपूस करून कशाला कन्फर्म केलं कि मला गर्लफ्रेंड आहे किंवा नाही ते?
"हाऊ कॅन आय रिलाय ऑन यू?" या प्रश्नाचा अर्थ असा नाही निघत का कि "इफ यू चेंज युअर attitude आय कॅन रिलाय ऑन यू?"
मी मेसेज नाही केला तर कशाला अस्वस्थ व्हायची ती?
"आय जस्ट डोन्ट want टू स्टार्ट धीस अगेन.." म्हणजे हेच ना कि "आय ऑलरेडी फेल फॉर समबडी and ही बेट्रायड मी,सो..आय जस्ट डोन्ट want टू स्टार्ट धीस अगेन.."?
माझ्या स्वभावाचा एवढा अभ्यास कशाला करत होती ती?
"तू इगो आणि सेल्फिशनेस काढून टाक मग एकदम आयडीअल पर्सन होशील मुलींसाठी" हा सल्ला तिने मला द्यायला माझ्या लग्नाचा कैवार घेतला होता का तिने?
"माझे मेसेज फक्त मलाच पाठवलेले असले पाहिजेत, ग्रुपला नाही. एखादेवेळेस तूपण लिही.. फॉरवर्ड नसला तरी चालेल" हा आग्रह कशासाठी होता?
आणि शेवटी तर i have so many issues with you म्हणे !! कसले issues ? ते तरी सांगायचं! केले असते की सॉर्ट आउट..
पण नाहीच सांगत! का? कोणास ठाउक?
सोहमला न उलगडलेल्या प्रश्नांनी भंडावून सोडले..

"मी काही एवढाही immature नाहीये गं,फक्त मेसेजेसच्या रिप्लाय वरून कन्क्लूजन काढायला.. पण मला तसं वाटलं.. आणि आयुष्यात एकदा प्रेमभंग झाला म्हणून सगळ्याच मुलांबद्दल वाईट मत नको करून घेऊ. माझ्या वर ही अशी चिखलफेक करायच्या आधी तू नयनाला तरी विचारायचंस माझ्याबद्दल.." सोहम ने तिला टेक्स्ट पाठवलं.

"तू कशावरून ठरवलंस कि मला तू आवडतोस? मला तू आवडत असतास तर मीच तुला तसं सांगितलं असतं. चिखलफेक मी करत्येय कि तू ते पहिलं ठरव. तुझ्या मनात माझ्याबद्दल भावना होत्या.. माझ्या मनात नाही.. आणि खरं प्रेम हे निरपेक्ष असतं..त्यामुळेच ते शोधायलाही कठीण असतं." आकांक्षाच उत्तर!

कागदावर लिहायला ही विधानं ठीक आहेत. पण अनुभवायला?? नको रे बाबा! सोहम मनातल्या मनात म्हणाला.

"माझी चूक झाली असं मी म्हटलय.. तुला ओळखण्यात माझीच चूक झाली. आणि जर मी तुझ्या भावनांचा विचार करत नसतो तर सरळ तुझ्या घरी जावून मागणी घातली असती ना.. पण त्यामुळे तू माझा आता करतेयस त्यापेक्षा जास्त तिरस्कार केला असतास "

"each & evry act of urs is makin' me hate u more & more day by day" आकांक्षाने भैरवी घेतली..

संपलं!! एखादी बिघडलेली गोष्ट सुधारण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न त्या गोष्टीला आणखीनच बिघडवत नेतात तसं झालं हे..
वपु म्हणालेत ते खोटं नव्हे..
"सगळ्यात वाईट तेव्हा वाटतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या हेतूने करू पाहता आणि तुमच्या त्या हेतूबद्दलच शंका घेतली जाते.." सोहम विचार करत होता.. "शंभर वेळा माझं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न केला मी, पण माझ्या प्रत्येक वाक्यातून तिने वेगळाच अर्थ काढला.."

आयुष्यात परत कोणी आकांक्षा भेटेल की नाही माहित नाही.. आपल्यासाठी एकदम आदर्श मुलगी मिळाली पण बहुधा ती तिच्यासाठीच्या आदर्श मुलाच्या शोधात होती... तो मिळेल की नाही हे तिलाही माहित नाही.. पण सध्यातरी तिने आपल्यासाठी दरवाजे बंद करून घेतले आहेत. मृगजळामागे धावण्यात बरेच क्षण वाया घालवले आपण; तरीही सत्याला सामोरं गेलंच पाहिजे मला! जरी मी कितीही तहानलेला असलो तरी रस्त्यावर लांबवर दिसणारं पाणी हे वास्तवात नाहीये याची जाण ठेवायला हवी होती.. सोहम अचानक भावनाविवश झाला.. “कसं असतं ना? आयुष्यात ब-याच गोष्टी न मागताच मिळत गेल्या आपल्याला. ज्या मिळाल्या नाहीत त्यासाठी एफर्ट्स घेतले आणि मिळवल्या.. पण इथे हे हव असताना देखील मिळत नाहीये. कारण मी माझ्या मनाला हवं तसं समजावू शकतो पण जिथे दुस-यांच्या मनाचा प्रश्न आहे तिथे मी काय करणार? पण झाल्या प्रकारातून एक धडा नक्कीच घ्यायला हरकत नाही.. मुलीच्या मनाचा थांग लागणं अथवा लावणं हे खरंच कठीण असतं. आणि जर तिला नकारच द्यायचा असेल तर ती तो देतेच! भले मग त्याचं स्पष्टीकरण लॉजिकल वाटो अथवा निरर्थक!

तो टाईप करू लागला..

"तू माझा नंबर बार करण्याआधी किंवा माझ्या त्रासातून सुटण्यासाठी स्वतःचा नंबर चेंज करण्याआधी मीच डीक्लेअर करतो की हा माझा शेवटचा एसएमएस.. माझ्या मनात खरंच तुझ्याबद्दल खूप खूप चांगल्या आणि सोज्वळ भावना होत्या... मनोमन बरीच स्वप्नही रंगवली होती मी. पण मी तुला ओळखायची आणि सगळ सांगायची घाई केली... केलेली चूक आता परत सुधारता येणार तर नाहीच.. पण माझ्या मनात मात्र तुझ स्थान अढळ राहील. आयुष्यातल्या कोणत्याही वळणावर जर तुला मागे वळून पहावसं वाटलं अथवा परतावंसं वाटलं तर मी इथेच आणि असाच उभा असेन.. तुझ्या वाटेवर डोळे लावून.. "

तिच्यासाठी लिहून ठेवलेलं पत्र चुरगाळत त्याने तिचा नंबर सिलेक्ट केला.."टेक केअर डीअर" तो पुटपुटला... हातात धरलेला मोबाईल त्याला हळू हळू धूसर दिसू लागला आणि “सेंड” च बटन दाबता-दाबताच त्याच्या उष्म अश्रुंचे खरेखुरे थेंब मोबाईलच्या स्क्रीनवर पडले...

(समाप्त)

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

मृगजळ भाग - २


भाग - १ 

एकदा घरात येऊन कपडे बदलल्यानंतर सोहम घरच्यांव्यतिरिक्त कोणालाही न्यायला आणायला वगैरे जात नसे.. कितीही जिगरी मित्र असला तरी.. कोण बदलणार सगळे कपडे परत? घरच्या लोकांना तो shorts वर गेला तरी फरक पडत नसे.."लायसन्स आणि पीयुसी सोडून बाकी काही नसलं तरी चालेल गाडी चालवताना!" हा त्याच्या पिताश्रींचा सल्ला!

पण आता लगोलग तो कपडे बदलून तिला आणायला गेला.

"तो मला म्हणायला लागला की घरी चल.. ही काय वेळ आहे? मी विचारलं की कोण कोण आहे घरी? तर म्हणे कोणीच नाही.. मी लगेच त्याला गाडी थांबवायला सांगितली आणि उतरून तुला फोन केला.. प्लीज डू मी अ फेवर.. तू नयनाला किंवा अंकिताला यातलं काही सांगू नको.. प्ली s s ज"

सोहम ने तिला प्रॉमिस करून नयनाच्या हॉस्टेलवर सोडलं..

१२ वाजता नयना चा मेसेज आला "didi rchd"
"so late ?" सोहम ने रिप्लाय पाठवला.
"came by an auto "
म्हणजे खरच तिने नयनाला सांगितलं नव्हत तर.
"thnx :)" आकांक्षाचा मेसेज आला
"hw ws d auto ride?"
"gr8! gnsdtc"
"wish u d same!" सोहम चा रिप्लाय

त्यानंतर लगेचच आकांक्षा गावी गेली. नंतर त्यांची भेट अशी झालीच नाही.. काही दिवस मेसेजेस वगैरे चालू होते.. कामाच्या व्यापात सोहमही हे प्रकरण विसरून गेला.कधी नयना घरी गेली आणि तिचा फोन आला तर आकांक्षा सोहमशी बोलायची.. आणि 'मला तुझे जोक्स ऐकण्यासाठी तरी पुण्यात यायचं आहे' म्हणायची.. स्वाईन फ्लूच्या काळात मात्र एकदा तिचा "काळजी घे" टाईप चा मेसेज आला होता. तेवढाच..


नंतर एकदा नयना म्हणाली "दीदी पुण्यात येणारेय आता.. काहीतरी करायचं म्हणतेय.."
"म्हणजे? कायमस्वरूपी?"
"बघू.. ते अजून नाही ठरलं.."
"कधीपासून येणारेय?"
"बहुतेक पुढच्या महिन्यात.."

आकांक्षाचं पुण्यातलं पुनरागमन आणि सोहमला कंपनीच्या कामानिमित्त मुंबईला जावं लागणं हे काहीस एकत्रच आलं.. म्हणजे तो मुंबईला गेला त्याच्या बरोब्बर तिस-या दिवशी आकांक्षा पुण्यात आली.. प्रोजेक्ट कमिशनिंग स्टेजपर्यंत जायला किमान सहा-आठ महिने तरी लागणार होते.

तब्बल १५ दिवसानंतर तो पुन्हा पुण्यात आला. अंकिता त्याला भेटायला आसुसली होती. याला अचानक तडकाफडकी जावं लागलं आणि अंकिताला जायच्या आधी भेटता सुद्धा आलं नव्हतं.
"तुला काहीच वाटत नाही ना रे ? एव्हढा कसा तू स्टोन हार्टेड?" कप्पाळ! आता या प्रश्नाला तो काय उत्तर देणार?
"चल,McD मध्ये जाऊ.. तुला मस्त चिकन बर्गर खाऊ घालतो.. "
"ए काय रे.. '
"ठीकेय, फ्रेंच फ्राईज आणि कोक पण!! आता तरी येशील ?"
"तू सुधारणार नाहीस.. चल"

जे एम रोडच्या McDonald's मधून रस्त्याचा व्ह्यू दिसतो त्यामुळे बोलण्यात आणि खाण्यात लक्ष लागत नाही अस अंकिताचं लॉजिक! त्यामुळे तिने आतली जागा अडवली असणार हे माहिती असल्याने सोहम हातातला ट्रे सावरत जिन्यावरून उजवीकडे वळला..

"सोह sss म! हे बघ कोण आहे.." अंकिताच्या आवाजाने सोहमचीच नाही तर अख्ख्या जनतेच्या नजरा तिच्याकडे वळल्या..
तिथे आकांक्षा आणि प्रणील होते..
"अरे नयना गेली आत्ताच" प्रणील म्हणाला.. "पिक्चरची तिकिट्स काढलीयेत तिच्या मित्राने,आणि त्याचा प्लान कॅन्सल झाला, आम्ही विचारच करत होतो २ तिकिटांचं काय करायचं! पण आता ठरलं!"
"म्हणजे? मी पण येतोय?" सोहमने विचारलं..
"मग? अंकीने डिसिजन दिलेला आहे.. प्लान डन आहे.. आता गुपचूप चलायचं!" इति प्रणील!
"हम्म,आलिया भोगासी.." सोहमने म्हणताच अंकिताने त्याला रट्टा दिला.. सगळे हसायला लागले..

ब-याच दिवसांनी भेटल्यामुळे आकांक्षा आणि सोहमच्या पुन्हा गप्पा रंगल्या..
"ए चला,ती तिकडे वैतागली असेल.. शेवटी मलाच बोलणी खायला लागतात.." प्रणीलने सगळ्यांना उठवले.
आकांक्षा प्रणीलच्या बाईक वर बसली आणि अंकिता सोहम बरोबर.. नयना ने सगळ्यांना रिसीव्ह केलं.

"३ ईडियट्स" सुद्धा धमाल होता..

मध्यंतरात E-Square च्या जिन्यावरून उतरता उतरता आकांक्षाने सोहम ला विचारलं.. "अंकिता तुझी गर्लफ्रेंड आहे का?" त्याने थबकून तिच्याकडे पाहिलं.ती त्याच्याकडे न पाहता जिना उतरत होती..
"नाही गं, वी आर जस्ट गुड फ्रेंड्स..का गं?"
"काही नाही असंच"
"म्हणजे तुला असं का वाटलं? कि ती माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून?"
"असंच.."
सोहमचा प्रचंड राग राग झाला.. अर्धवट काहीतरी बोलून विषय सोडून द्यायचा म्हणजे काय.. श्या! पण हिला कस काय बोलणार..?
"तुला गर्लफ्रेंड आहे?" परत तिने विचारलं..
"का माझ्या गर्लफ्रेण्डच्या मागे पडली आहेस? मला जर गर्लफ्रेंड असती तर मला असं सुखाने फिरू दिलं असतं का तिने?" दोघेही या वाक्यावर खळखळून हसले..
"तुला बॉयफ्रेंड ..."
"तो विषय काढू नकोस.."
"सॉरी.."
"..."
"आणि माझ्यासारख्याला कसली मिळणारे गर्लफ्रेंड?"
"ए चल.. in fact, मुलींना तुझ्यासारखीच मुलं आवडतात!"

कॉम्प्लिमेंट?? सोहम मनातल्या मनात खुश झाला!

…पिक्चरचा सेकंड हाफ सुरु झाला..
पण सोहम चं लक्षच लागेना.. खरच तिचे आणि त्याचे खूप विचार जुळत होते.. प्रत्येक विषयातलं तिचं नॉलेज त्याच्याच तोडीचं होतं. पुरोगामी विचार, पारंपरिक संस्कृतीचीसुद्धा जपणूक, टापटीप राहणी,आदबशीर बोलणं. दिसायला सुद्धा अगदी अप्सरा नसली तरी उठून दिसणारीच होती चारचौघात.. लाईफ़ पार्टनर हवी तर अशी! नाहीतरी आपल्या घरातले लोक काही बुरसटलेल्या विचारांचे नाहीयेत,आणि आपणही नाही आहोत.. त्या त्या कोण सिंधी कि मारवाड्यासारखे..

आणि मागे एकदा जापनीज गार्डन मध्ये म्हणत होती ती कि "पैसा वगैरे नसतं रे सगळंच.. खूप पाहिला पैसा त्याच्या बरोबर असताना.. रोज कुठली ना कुठली तरी कार घेऊन यायचा तो.. हे कानातलं ५ हजाराचं आहे! Tommy Hilfigher.. "

सोहमने निरखून बघितलं.. ५ रुपये सुद्धा जास्त वाटले असते त्या तथाकथित कानातल्याचे.. हि पोरगी आपल्या रेंजच्या बाहेर आहे अस तेव्हा त्याला वाटूनही गेलं होतं..
"५ हजार? भारी आहे!" आपल हसू आवरत तेव्हा त्याने म्हटलं होतं...
….जाऊ दे!

म्हणजे फक्त आणि फक्त पैश्यापाठीच पळणारी आहे असं म्हटलं तर तसंही नाहीये, आता पेक्षा कित्येकपट जास्त पैसा पाहिलंय तिने..
जेवण होईपर्यंत ते या ना त्या विषयांवर बोलतच होते.. तो रात्रीच जाणार होता परत मुंबईला.
"विल मिस यू.." ती पुटपुटली..
ती खरच असं बोलली की आपल्याला भास झाला की आपल्यालाच असं म्हणायचं होतं? सोहम पुरता गोंधळून गेला..
"ए.. “मेड फॉर ईच अदर”! चला आवरा.. बाकीच्या दुनियेला इतरही काम आहेत म्हटलं!" अंकिताने गुलुगुलू बोलणा-या नयना–प्रणीलच्या प्रेमी युगुलाला वास्तवात आणलं.. " ए दीदी, आमची जोडी मस्त जमते की नाही गं?" नयनाने विचारलं..

"हो.. एकदम परफेक्ट!" आकांक्षा म्हणाली!
"तुला विषाची परीक्षा घ्यायला आवडत का? मला १०० वेळा आणि अंकिला १००० वेळा विचारलं असशील हे.." सोहम म्हणाला.
"आय थिंक यू कॅन मेक अ गुड पेअर" प्रणील अचानक बोलला.. " दीदी and यू! तुमचं understanding सुद्धा चांगलं आहे.."
......सन्नाटा!!
"सोहम.. आणि पेअर?? impossible !" अंकिता म्हणाली, "तो practical माणूस आहे! म्हणजे थोडक्यात मशीन! फक्त श्वास वगैरे घेतो म्हणून माणूस म्हणायचं त्याला! बघ ना.. मला न भेटता गेला मुंबईला आणि त्याला त्याचं काहीच नाहीये.."
"ए बाई चल.. पुरे तुझं रडगाणं.. नंतर ऐकव तुझी दर्दभरी कहाणी!! मला रात्रीचीच बस पकडायचीये.."
सोहम विषय आवरता घेत म्हणाला खरा पण त्याच्या डोक्यात मात्र किडा वळवळायला लागला..

रियली, अशीच बायको शोधत होतास ना तू? अशीच हुशार, जिच्याशी सतत बोलत रहावस वाटेल, जिच्याशी गप्पा मारताना किंवा तिच्या गोष्टी ऐकताना बोअर होणार नाही.. लग्न करायचं ठरलं कि घरच्यांनासुद्धा जातीपातीचा अडसर नाही येणार.. हो.. आकांक्षा सारखीच मिळावी बायको.. मग आकांक्षा सारखी का? आकांक्षाच का नको? बोलून दाखवू का तिला? सोहमच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं..

सोड रे!! तिच्याच मनात नसेल तसं काही. उगीच एकतर्फी विचार करण्यात काय फायदा? तुला काही सिग्नल दिला का तिने? जाऊ दे.. सोहम हा तुझा प्रांत नव्हे! त्याच मन त्याला समजावत होतं..

सोहम ने ऑफिसच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं.. नयनाचा पण contact नको आणि प्रणीलचा पण.. भानगडच नको काही.. गाडी परत रुळावर येत होती पण एके दिवशी सोहमला एका अननोन नंबर वरून मेसेज आला..

..."hi,dis is my new no. b in touch" आकांक्षाच असेल का ही? की आपल्याला असं वाटतंय?
त्याने फोन केला.. अननोन नंबर ला फोन करायची त्याची हि पहिलीच वेळ बहुधा!
"हलो, कोणाचा नंबर आहे हा?"
"माझा! अरे आकांक्षा बोलतेय..काय तू ? मुंबईला गेलास आणि आम्हाला विसरूनच गेलास.."
"अं.. हो.. वर्कलोड होता गं खूपच. जमलंच नाही... आणि न्यू नंबर म्हणजे आधीचा नंबर चेंज केलास कि अजून एक घेतलास?" सोहमने विचारलं.
"म्हणजे? मागच्या महिन्याभरात मला मेसेज वगैरे पोचत नाहीत हे तुझ्या लक्षात नाही आलं? एक महिना झाला मला आधीचा नंबर बंद करून..."
"..."
"आहेस का?"
"हो अगं.. तसं नाहीये पण.. जाऊ दे .. का बदललास नंबर? काही खास कारण?"
"हो काही लोकांचा contact नको होता.. फार कमी जणांना दिलाय मी हा नंबर."
"आणि तुझा तो यामाहा आर १५ वाला मित्र?"
"तुला चेष्टा सुचतेय का? त्या दिवशी नंतर परत contact पण नाही केला मी..ते राहू दे परत कधी येतोयस पुण्यात?"
"मे बी नेक्स्ट वीकेंड.."
"भेट मग तेव्हा जमलं तर.. we will have fun! "
"या शुअर!"
मग पुन्हा आठवडा-दोन आठवडे मेसेजेस,कॉल्सचा सिलसिला सुरु झाला..!

पुढच्या वीकेंडला तो पुण्यात यायला निघणार इतक्यात तिचा फोन आला..
"हाय! कुठे आहेस?"
"पुण्यात येतोय.. "
"कधी पोचणार ?"
"रात्री उशीर होईल.. आता साडे-दहा वाजलेत म्हणजे दादरची वीकेंडची रश बघता आणि मुंबईचं ट्राफिक विचारात घेतलं तर.. "
" दीड-दोन तरी वाजतीलच" तिने वाक्य पूर्ण केलं.." मी राहिलीये मुंबईला.."
"बोल, काय म्हणतेस?" हसत हसतच सोहमनं म्हटलं..
"अं.. मला एक काम आहे उद्या सकाळी. मला सोडायला येशील?"
"किती वाजता?"
"सहा वाजता.."
"किती?? सहा???? सकाळचे सहा? " सोहम गडबडला..
"हो.."
"ऐक ना.. वाईट नको वाटून घेऊ पण मला सकाळी उठणं जमत नाही.. खरच..! तू प्लान पोस्टपोन करून शकतेस का?"
"मला सहा वाजताच जायचं होत.. बघ ना.. ट्राय कर.. मला पुण्यात जास्त काही माहित नाही.. आणि रिक्षावाले तर तुला माहितीच आहेत."
" हो.. तेही खरंच.. ठीकेय मला उठवायला कॉल करशील सकाळी?"
"करते.. चलो बाय गुड नाईट आणि happy journey!"
"thanks"

'सालं का होतं असं सगळं..? मी लांब पळायला बघतोय तितका त्यात ओढला जातोय..' सोहमला माहित होतं प्रत्यक्ष देवाने मनात आणलं तरी सकाळी सहा वाजता जाग येणं कठीण होतं.. आणि रात्री २ ला झोपल्यावर तर अशक्यच!

अलार्म क्लॉक, मोबाईल,मित्र आणि आकांक्षा सगळ्यांनी प्रयत्न करून देखील आठ वाजेपर्यंत त्याचा डोळा उघडला नाही.. मोबाईल वर ११ मिस्ड कॉल्स!! तो तिला पुन्हा कॉल ट्राय करत होता पण तिने काही फोन उचलला नाही... 'सॉरी' चे मेसेज पाठवूनही काही फरक पडला नाही!

एवढं काय वाईट वाटून घ्यायचं तिनं? मित्र या नात्यानं मी आधीच कल्पना दिली होती कि मला जमणार नाही.. ‘येतो’ असं कन्फर्म सांगून ऐनवेळी के एल पी डी तर केला नाही? तरी हे नाटक? गेली उडत.. साला किती विचार करायला लावते ही पोर.. विनाकारण आपल्या डोक्याला शॉट! सोहम मनातल्या मनात स्वतःला आणि आकांक्षाला शिव्या घालत होता.. वीकेंडला ती त्याला भेटली नाही हे वेगळे सांगणे न लगे! अंकिताला चेहरा दाखवून तो पुन्हा कामावर रुजू झाला..

“पुन्हा तीच मुंबई.. पुन्हा तोच क्लायंट, पुन्हा तेच काम थोडक्यात पुन्हा तेच रुटीन. पण आकांक्षाबद्दलचे विचार जात नाहीत मनातून.. खरोखरच काहीतरी वाटतंय तिच्याबद्दल आपल्याला...पण तिला काहीच नाही वाटत! च्यायला!! होतं असं कधी कधी.. अंकिता नाही का हेच बोलत आपल्याबद्दल?” त्याने झरझर तिच्याबद्दलचे त्याचे विचार कागदावर उतरून काढले.. “हम्म आता जरा कुठे ओझं उतरल्यासारखं वाटतंय.. देऊन टाकावा का हा कागद? जास्तीत जास्त "नाही"च म्हणेल ना? पण "नाही" म्हणाली तर? सहन करता येईल का मला?”

कित्येक दिवस तो डायलेमा मध्येच होता.. हिय्या करून त्याने एके दिवशी तिला मेसेज पाठवला.. पण.. "delivery report: failed "

नंबर बदलला वाटतं हिने.. त्याने नंबर ट्राय केला.. बंद!! साला.. आपण काहीतरी ठरवतो आणि कसा ना कसातरी त्याचा विचका होतो.. आता काय करायचं?? काहीच नाही.. तिला जर थोड तरी काही वाटत असेल तर करेल ती आपणहून contact..

२ महिने असेच गेले.. मुंबईचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं होतं... अजून एखादा आठवडा मग पुण्याला परत! त्याच्या डोक्यातून आकांक्षा काही गेली नव्हती पण कामापुढे तिला वेळही देता येत नव्हता.. आणि कसा देणार? तिचा नंबरही बंद होता. अशातच पुन्हा एकदा त्याला एका अननोन नंबरवरून मेसेजेस आले.. मैत्री वगैरेबद्दल! त्याने नेहमीप्रमाणे "who is this" वगैरे विचारायचं सौजन्य सुद्धा दाखवलं नाही.. ४-५ मेसेजेस नंतर त्याच नंबर वरून आलेल्या एका मेसेज खाली –Dr. Akanksha अशी सिग्नेचर दिसताच तो मनोमन खुश झाला. त्याच रात्री त्याने फोन लावला..

ख्यालीखुशाली विचारून झाल्यानंतर त्याने विचारलं..
"नंबर बदललास का पुन्हा? मी आधीच्या नंबर वर ट्राय केला होता आणि अननोन नंबर्सना मी भाव देत नाही हे सांगितलंय ना तुला मी एकदा?"
"हो माहितीये.. मी तुझी टेस्ट घेत होते.." -आकांक्षा
"कसली टेस्ट? आणि पास झालो का मी?" इति सोहम
"आता झालास पण मागे एकदा फेल झाला आहेस.."
"कधी ग?"
"मला गरज होती तेव्हा सोडायला नाही आलास तू.. माझी केवढी धांदल उडाली माहितीये त्या दिवशी?"
"सॉरी अगं.. माझा weak point आहे सकाळी उठणं हा.. म्हणून मी तुला काहीच कमीट सुद्धा नव्हतं केलं"
"ठीकेय ठीकेय.. बाकी काय म्हणतोस?"

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने तो पुन्हा पुण्यात जातोय हे तिला सांगितलं. पण नेमकी त्या आठवड्यात ती घरी जाणार होती त्यामुळे लगेचच भेटणं शक्य होणार नव्हतं..
“ठीक आहे ‘सब्र का फल मीठा होता हैं’ असं म्हणतात.. पाहू..”
मात्र या वेळेला तिला तो कागद तरी द्यायचाच हे त्याने ठरवलं होतं.. “बोलायचं तर धारिष्ट्य नाहीये.. लिहूनच सांगू..” पण हे एकतर्फीच आहे का सगळं? या प्रश्नाचा त्याला उलगडा होत नव्हता..

त्याला प्रसंग आठवू लागले..
"काय रे मला जे मेसेजेस पाठवतोस तेच नयनाला पण पाठवतोस का?" मागे एकदा तिने विचारलं होतं..
"म्हणजे आधी पाठवायचो एकत्र पण हल्ली नाही पाठवत.."
"डोन्ट डू इट.. मला नाही आवडत ते.."
"अगं हल्ली नाही पाठवत.. पूर्वी पाठवायचो अगदीच ओळख नवी होती तेव्हा.."
"ठीके ठीके"

का पझेसिव्ह आहे ही इतकी माझ्याबद्दल? केवळ मित्र म्हणून? "यू कॅन मेक अ गुड पेअर" असं प्रणीलनं म्हटल्यावर त्याला हसून दाद देणारी तीच होती.. आपणच जरा कावरे बावरे झालो होतो तेव्हा..

तिने फोन कट केला कधी तर " सॉरी स्वीट्स" सारखा रिप्लाय एखादी मुलगी आपल्या ‘नुसत्या’ मित्राला देते? अंकीने कधी नाही म्हटलं असं अजून! इतर मैत्रीणीपैकीही कोणी असं बोललं नाही..
जर तिला काहीच नसतं वाटत,तर एकदा धोका दिल्यावर सुद्धा का पुन्हा पुन्हा नंबर देतेय ती तिचा?

"रात्री झोपताना ब्रश करत जा' अशा सूचना करणारे मेसेज आपण कोणाला उभ्या जन्मात फॉरवर्ड केले नाहीत पण तिने मात्र आपल्याला पाठवलेत.. तिचा पझेसिवनेस तर जाणवतो आहेच. हे सिग्नल नाही तर काय आहे? "पेरेंट्स बरोबर आहे.. बोलू शकत नाही म्हणते" म्हणजे असं काय बोलायचं असतं? पेरेंट्स बरोबर असताना "नुसत्या मित्रांशी" आपण बोलू शकतो ना? मग आपल्याला ती कोणी "नुसत्या मित्रांपेक्षा" वेगळा समजते का? सोहम च्या मेंदूत विचारांनी थैमान घातलं होतं..

आपल्यालाच ते सिग्नल कळत नाहीयेत का? कि आपण ते मुद्दाम तिला कळू देत नाहीये? कोणाला फसवतोय आपण? तिला, इतरांना कि स्वतःलाच ??

ठरलं तर मग.. या वेळेला भेटू तेव्हा सांगायचंच.. "मला तू आवडतेस.. या माझ्या तुझ्याबद्दलच्या भावना..तुझा विचार काय तो कळव!"

क्रमश:

अंतिम भाग

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

मृगजळ भाग- १


"सगळ्यात वाईट तेव्हा वाटतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या हेतूने करू पाहता आणि तुमच्या त्या हेतूबद्दलच शंका घेतली जाते.." सोहम विचार करत होता.. "शंभर वेळा माझं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न केला मी, पण माझ्या प्रत्येक वाक्यातून तिने वेगळाच अर्थ काढला.."

सोहमची आणि आकांक्षा ची मैत्री तशी अलीकडचीच.. पण सुरुवातीपासूनच त्यात कुठेतरी पाणी मुरत होतं.
अपघातानेच भेटले ते दोघेजण. अंकिता ही सोहमची ज्युनिअर आणि जानी दोस्त. अंकिताची लहानपणापासूनची बेस्ट फ्रेंड नयना. तिची मोठी बहीण आकांक्षा.. सोहमच्याच वयाची. असं हे सगळ त्रांगड होतं.
"कोण कुठली आकांक्षा? कशी आली आपल्या आयुष्यात? आणि का हे सगळं घडलं?" विचार करून सोहम थकला.. गेल्या काही महिन्यातला चित्रपट सरसर त्याच्या डोळ्यासमोरून सरकू लागला..

"ही माझी बहीण आकांक्षा!" नयना सांगत होती "आणि दीदी, हा सोहम, अंकीचा जे डी.."
"हाय!" -आकांक्षा " हलो " सोहम चा रिप्लाय! एकदम फॉर्मल..
" माहितीये का? आधी "सर" म्हणायचे मी त्याला.. सिनिअर ना?" अंकिता म्हणाली.. सगळेजण हसू लागले
सोहमही त्या हसण्यात सामील झाला.. नजरेच्या कोनातून तो आकांक्षाला न्याहाळत होता. नीट नेटकी राहणी.. प्रॉपर मेक-अप वगैरे... स्कर्ट कि असलंच काहीतरी घातलं होतं तिनं.. गो-या रंगामुळे त्या आउट-फिट्स चीच शोभा वाढली होती खरंतर..
"तू काय करतोस?" आकांक्षा च्या प्रश्नानं तो भानावर आला.. " अं .. मी तसं काहीच नाही करत.. संध्याकाळी फिरतो वगैरे.. रात्री जेवण, मग पीसीवर एखादा पिक्चर, झोपतो मस्त दहा-एक तास आणि मग सकाळी सगळे जण बिझी असतात त्यामुळे मीसुद्धा वेळ घालवायला जातो नोकरीवर! पण तिथेही काही नाही करत! " पुन्हा सगळेजण हसू लागले.. सोहमला स्वत:चीच कीव आली.. याच टाईपच्या जोक्सवर आधी अंकिता मग नयना आणि आता आकांक्षा किती जणांकडून हुकमी हशे वसूल करणार??
" ए टाटा मोटर्स मध्ये इंजीनिअर आहे गं तो.. सगळ्यांना असंच काहीतरी सांगतो.." पुन्हा एकदा हशा..
"आणि तू?" सोहमने विचारलं.. "नयना म्हणत होती कि तू डॉक्टर वगैरे आहेस म्हणून.. "
"डॉक्टर ‘वगैरे’ नाही.. डॉक्टरच आहे मी.. बीडीएस केलंय मी. बघू तुझे दात?" सोहम ने आपसूक "ई..ss " केलं! " यु कॅन बी माय पेशंट! " आकांक्षा म्हणाली.. पुन्हा एकदा हास्यसागर उसळला..
" मुंबईला होती अरे ही इतके दिवस.. घरी जायच्या आधी इथे हॉल्ट घेतलाय २ दिवस. परवा जाणारे परत"
"हो का.. अच्छा अच्छा.. तू बोलली होतीस मागे एकदा"
" हो.. ए चल.. आम्हाला जायचंय.. माझं पिल्लू वाट बघत असेल.." नयना म्हणाली..
"माझा पण "हाय" सांग ग प्रणीलला"
"बाय" " बाय बाय" "पुन्हा भेटू" वगैरे शब्दांची देवाण घेवाण झाल्यावर दोघी जणी स्कूटी वरून निघून गेल्या..
" हा प्रणील नयनाचा बॉय फ्रेंड आहे की तिचं बाळ आहे तेच कळत नाही कधी कधी! " सोहम म्हणाला..
"गप रे.. ते प्रेम आहे.. तुझा आणि त्या गोष्टीचा दूर -दूर पर्यंत संबंध नाहीये!"
"तसं नव्हे गं.. पण प्रणीलला सुद्धा नाही आवडत त्याला पिल्लू-बिल्लू म्हटलेलं.. मला बोलला पण तो! आणि जेव्हा मी तिला एकटा भेटलोय तेव्हा तिला हे सांगितलंय पण.. की त्याला असलं काहीतरी म्हणत नको जाऊ चार-चौघात.. बर नाही वाटत ऐकायला..." अंकिताची डीओ वळवून त्याने तिला नजरेनेच बसायला सांगितलं.
"जाऊ दे रे.. आकांक्षा कशी वाटली?"
"बरी आहे..पण तिला वाटल असणार की काय अटीट्यूड आहे या पोराकडे उगीच.. मी भाव नाही दिला ना जास्त.."
"चल रे.. तुझ्या भाव देण्या न देण्याला विचारतंय कोण? मी सोडून?" अंकिता म्हणाली.. " हे असलं नाटक असतं न तुझं म्हणून मी म्हटलेलं मागे.. वी कॅन जस्ट बी फ्रेंड्स नॉट पार्टनर्स! "
" हो हो माहितीये.. आणि मी सोडून तुला कोण विचारतं?"
"ए हलो!! किती तरी प्रपोजल्स ठोकरली आहेत मी ठीके??"
"जाऊ दे गं, किती चिडशील?" सोहमने विषय थांबवायला म्हटलं.. थ्रोटल दिल्यावर गाडी सुसाट निघाली "दुर्गा"कडे...

दुस-या दिवशी रविवार होता. नयनाचा फोन आला. "सोहम,केळकर म्युझिअम ला चाललो आहोत मी आणि दीदी.. येणारेस?'
सोहम चा दुपारपर्यंत काहीच प्लान नव्हता.दुपारी एका पार्टीला जायचं होतं "येतो, पण दुपारी मला जेवायला जायचं आहे. अंकीला बोलावलं आहेस का?"
"का, तुला करमत नाही तुझ्या "अंकी"शिवाय?" सोहमला फोन मधून दोघींच्या खुद्खुदण्याचा स्पष्ट आवाज आला.
"माझी-बिझी चा प्रश्न नाहीये.. तुझीच मैत्रीण आहे ती.. म्हणून विचारलं."
"हो रे.. आम्हाला सुद्धा वेळ नाही मिळाला बोलायला हल्ली. ती पण येतेय.."
"बरं.."
सगळं आवरून पोचायला त्याला हार्डली ३५ मिनिट्स लागली.. म्हणजे आवरायला २८ आणि पोचायला ७! सदाशिव पेठ ते बाजीराव रोड ३ आणि चुकीचं बोळ, शोधाशोध,राँग साइड इत्यादीला पुढची ४! पल्सर २२० सीसी म्हणजे अफलातून मशीन आहे..झूम आणि तुम्ही इथून तिथे!
पुण्यात ८ पूर्ण वर्ष आणि काही महिने काढून पठ्ठ्याला "केळकर म्युझिअम" कुठे आहे ते माहित नव्हतं म्हणजे आत जायचे २० रुपये वगैरे लागतात हे माहित असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता.. रविवारच्या सकाळी ५०० रुपयांचे सुट्टे शोधणे ते देखील पुण्यात हे "एमटीव्ही रोडीज" मधलं टास्क असू शकतं! आणि असलं टास्क करण्याचा सोहम चा मुळातच स्वभाव नव्हता.. त्यानं सरळ अंकिताला फोन लावला.
"कुठेयस?"
"केळकर म्युझिअम"
"पोचलीस पण?"
"हो.. तू बोल पटकन. इथला सिक्युरीटी गार्ड बघतोय माझ्याकडे. फोनला कॅमेरा आहे त्यामुळे" अंकिता कुजबुजली.
"खाली ये. माझ्याकडे पैसे नाहीयेत सुट्टे. २० रुपये आण"
अंकिताकडून तिकीट काउंटरपासून होणारा पाणउतारा ऐकून घेत सोहम वर गेला.. "आकांक्षा पण आलीये?"
"तू तिच्यासाठी आलास? मला वाटलं माझ्यासाठी.."
"मी प्रश्न काय विचारला,उत्तर काय देतेस?तू वायवा मध्ये नापास व्हायचीस का ग नेहमी? म्हणजे अशी उत्तरं एक्स्टर्नल ला दिली असशील तर तो फेल करणारच!"
"गप, पाचकळ जोक पुरे.. आलीये ती"
ही त्याची आणि तिची दुसरी भेट!
त्याने हातखंडा विषय "पी जे" यामध्ये डॉक्टरेट मिळवली असल्याने त्याला सगळ्यांना हसवण फारसं कठीण गेल नाही.. विशेषतः आकांक्षाला! ती पहिल्यांदाच असं ऐकत असल्याने तर त्याचे बाष्कळ जोक्स ऐकूनही तिची हसता हसता मुरकुंडी वळत होती..
अंकिता आणि नयना मात्र सरावलेल्या असल्याने त्यांनी त्यांच्या "गर्ल्स talks" सुरु केल्या.. आकांक्षा आणि सोहम ची ब-यापैकी गट्टी जमली. दुपारपर्यंतचा वेळ चटकन निघून गेला.. "तू येणारेस का आमच्याबरोबर जेवायला?" आकांक्षाने डायरेक्ट इन्व्हाईट केल्यावर सोहम जरासा गडबडला.. "अग माझा आधीच प्लान आहे.."
"गर्लफ्रेंड हं.. "
"नाही नाही.. ऑफिसचे कलीग्ज आहेत. ईव्हन यू कॅन जॉईन अस..."
"नको.. thanks फॉर द इन्व्हिटेशन"

हॉटेल बांबू मध्ये ए सी मध्ये बसल्यावर पेग्ज चा काउंट राहत नाही हे सोहमला माहित होतं..
"ए मला बास हं.."
"क्यूं सोहम, आज ३ पेगमेही आउट?" मिनूनं उगाच पिंक टाकली.
"ए मिनू, तेरेको पता है.. आर एस.. ४ इनटू ६०! स्टील रॉक स्टेडी.. पण आज मला जायचंय.."
"ओहो.. गर्ल फ्रेंड नंबर..?"
"मिनू अभी चूप भी रहेगी.. तेरेको कितनी बार बोला है.. वाईन ही तेरे लिये ठीक है.. ये वोडका के चक्कर में मत पडा कर! "
ऑफिसचं पब्लिक यावर जाम खुश झालं. मिनुचा चेहरा पडला..

अपेक्षेप्रमाणे अंकिता चा फोन आला.
"कुठे आहेस रे? आम्ही सगळे जापनीज गार्डन मध्ये आहोत"
"आय एम ड्रंक.. येऊ का असाच?"
"ओ के वाटत असेल तर ये.. "
"येतो"

वाटेतच त्याला एक फोन आला.. अननोन नंबर..
"येस?"
"सोहम ना?" गोड आवाज आला.
"हो. कोण?"
"मी आकांक्षा बोलतीये.. कुठे पोचलास तू?"
सोहम स्वतःला सावरत म्हणाला " मी येतोय १० मिनिटात,तुम्ही कुठे जाणार आहात का?"
"नाही, ये तू.. मी तुझीच वाट बघतीये.."
"अं?"
"आम्ही तुझीच वाट बघतोय म्हटलं..."
"हा तुझा नंबर आहे?"
"हो, नयना कडून घेतला तुझा नंबर.. काही प्रॉब्लेम आहे का?"
"नाही,त्यात प्रॉब्लेम कसला? पोचतोच मी"
सोहम अविश्वासाने फोनकडे पहात राहिला..
एक दिवसाची ओळख ती काय आणि हे असलं बोलणं? जाऊ दे फारच frank आहे ती.. कि आपल्यालाच असं ऐकू आलं? ३ पेगच तर झालेत.. एवढ्यात आपले कान वाजण शक्यच नाही.. जाऊ दे.. पोचल्यावर बघू तिथं.

गार्डन मध्ये पोरी पाण्यात पाय सोडून बसल्या होत्या.. सोहम येताच लांबूनच अंकिताने त्याला "ये ये" अस खुणावलं. " मी पिऊन आलोय अस जाणवत नाहीये ना?"
"तुला अस नेहमी का वाटत रे कि तमाम पब्लिकला तुला निरखून बघण्याशिवाय काहीच उद्योग नाहीये? "
"ए.. हा माझा डायलॉग आहे.. स्पेशली तुझ्यासाठी राखीव.."
"म्हणूनच मारला.. काही वाटत नैये..चल तू.. "
पाण्यात खिदळून झाल्यावर जवळच्याच बाकांवर चौघेही जण बसले.. नयना आणि आकांक्षा एकत्र बसल्या , अंकिता सोहमच्या शेजारी बसली..
" मला वाटल प्रणीलही आला असेल"
"तो करणारेय जॉईन.. तू हे आकांक्षा चे फोटो बघ. ऑसम आहेत."
"ती काय मॉडेलिंग वगैरे करते की काय?" अल्बम मधले फोटो बघत सोहमने विचारलं..
"आहे मला आवड.. मला अभिनय सुद्धा करायला आवडतो.." आकांक्षा तिथे येत म्हणाली..
"वा!.. सहीये! प्रॉपर पोर्टफ़ोलिओ बनवला आहेस तर!"
"या, इट्स अ पार्ट ऑफ इट! अंकी तुझी हरकत नसेल तर याला जरा घेऊन जाऊ का चालायला?" सोहम च्या हाताला धरून त्याला जवळ जवळ उठवतच तिने अंकिता ला विचारलं.
"ऑफ-कोर्स, मला काय विचारतेस?"
"चल रे... इथेच राउंड मारून येऊ.."

मग झालेल्या गप्पा, तिच्या आवडीनिवडी, छंद, ambitions, वेगवेगळ्या विषयांमधलं नॉलेज, त्याने कॉलेज मध्ये असताना नाटकातून काम केलंय हे समजताच तिच्या चेह-यावरचे बदललेले हावभाव,
तिने "कुठे ओळख असली तर दे" असं सांगून त्याच्या मोबाईलवर ट्रान्स्फर केलेले फोटो.. त्याचे काढलेले फोटो.. सोहमला सगळं सगळं आठवायला लागलं..

..तिने सांगितलेलं तिचं अफेअर.. कोणी सिंधी की मारवाडी होता.. हिने मनापासून प्रेम केलं त्याच्यावर. तोसुद्धा लग्नाला तयार होता पण त्याची अट होती की हिने लग्नानंतर घराबाहेर पडायचं नाही वगैरे.. मग हिने ते “जमणार नाही” सांगून त्याच मन वळवायचा केलेला प्रयत्न.. पण त्याच्या घरच्यांचा हिच्या या अटीला असणारा विरोध.. मग त्याने घरच्यांच्या इच्छेनुसार केलेलं लग्न.. मग हिची प्रचंड रडारड वगैरे वगैरे!!
ह्या असल्या छप्पन्न कहाण्या निरनिराळ्या व्यक्तींकडून ऐकल्या होत्या सोहमने.. आणि त्यांना कौन्सिलिंग सुद्धा केलं होतं.. त्यात आणखी एका कथेची भर इतकंच! भावनाशून्य असण्याचा हा एक फायदा असतो... दुस-यांच्या दु: खात गुंतून न पडता तटस्थपणे मार्गदर्शन करता येतं!
त्याच रात्री का? हो त्याच रात्री..
सिंहगड रोड च्या "सवाई" मध्ये जेवणं झाल्यावर प्रणीलने नयनाला तिच्या हॉस्टेल वर सोडलं आणि सोहमनं अंकिताला घरी सोडलं.. आकांक्षाला कोणीतरी न्यायला आला होता. यामाहा आर १५ घेऊन.. त्यांचा काहीतरी प्लान असावा. सोहम गाडीकडेच पहात बसला होता.. नंतर काहीतरी बिनसलं वाटतं त्या दोघांत आणि ती तशीच कुठेतरी उतरली..

रात्री ११.३० वाजता तिचा फोन
"सोहम, मी बोलतीये.."
सोहम तीन ताड उडाला.. "इतक्या उशिरा?"
"ऐक ना.. तसं काम पडलं म्हणून केला फोन.. मला न्यायला येशील?"

क्रमश:

भाग २