Monday, October 18, 2010

मुन्नी बदनाम हुई: एका खंडकाव्याचे रसग्रहण

भारतीय सांगीतिक इतिहासात उलथापालथ घडवून आणण्याची ताकद असणा-या "मुन्नी बदनाम हुई" या खंडकाव्यावर भारतातील आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख येणं तर सोडाच पण या काव्याची साहित्यविश्वाने साधी दखलही घेऊ नये याचं आम्हांस फार वैषम्य वाटलं म्हणूनच या काव्याला (ज्याला सामान्य लोकांनी 'गाणं गाणं' म्हणून हिणवलं) सदर मीमांसा अर्पण!
या कवितेतील वाक्य-वाक्यात दडलेल्या परिपूर्ण प्रतिभेचा रसास्वाद घ्यायचा आम्ही एक क्षीण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीपासून स्टार्ट  करू!

मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

मुन्नी म्हणतेय कि हे प्रियतम, फक्त तुझ्यासाठी ही मुलगी जिला सगळे लाडाने मुन्नी म्हणत असावेत,तिची बदनामी झाली.. ती कशी झाली याचं उत्तर गाण्यात सापडतं का ते आपण पाहूया. येथे डार लिंग हा शब्द डार्लिंग या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश असावा. त्यावरून मी 'प्रियतम' हा सर्वांना समजेल असा सुटसुटीत शब्द योजला आहे. या पहिल्या वाक्याचं समर्थन करताना ती पुढे म्हणते,

मुन्नीके गाल गुलाबी,नैन शराबी,चाल नवाबी रे....
..मुन्नीने नेहमीप्रमाणे मेकअप केला आहे त्यामुळे तिच्या गालावर त्याची गुलाबी छटा पसरली आहे, तसेच ती बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी,ज्या पद्धतीने मलायका अरोरा या गाण्यात नाचली आहे त्यावरून कोणी आमच्या विधानाला हरकत घेईल असे वाटत नाही. आणि पुढे पहा.. अल्कोहोल चा ओव्हरडोस झाल्यावर पावलं राजेशाही थाटात पडणं साहजिकच आहे नाही का? तो थाट वर्णन करताना तिनं म्हटलंय कि माझं चालणं असं आहे कि जणू नवाब लोकांचा थाटच ! ती पुढे म्हणते..

ले झंडू बाम हुई, डार लिंग तेरे लिये..
म्हणून हे प्रियतम, तुझ्यासाठी मी 'झंडू बाम' झाले. म्हणजे अर्थातच तुझ्या सगळ्या दुखण्यावरचा उपाय झाले. फक्त एवढाच मर्यादित अर्थ नाहीये या ओळीचा;तर मतितार्थ लक्षात घ्या. बाम ही वस्तू डोकेदुखी दूर करण्यासाठी वापरली जाते, तसेच 'कमर मे मोच,पीठदर्द,घुटनों में दर्द' साठी प्रभावी उपचार म्हणून याचा प्राथमिक वापर होतो. माझं गाणं ऐकून होणारी डोकेदुखी, किंवा माझ्यासारखं नाचताना लचक आली तर त्यापासून सुटका कशी करायची? तर या ओळीतून मुन्नीने सर्वांसाठी इलाज सुचवला आहे.
पुढच्या नवरात्रात किंवा गणपतीत हे गाणं जेव्हा जोरजोरानं वाजेल तेव्हा म्हाता-या लोकांना डोकेदुखी हमखास सुरु होणारच. या वर्गाला होणारा स्मृतीभ्रन्शाचा विकार विचारात घेता सुनेला जेव्हा ते हाक मारतील तेव्हा त्यांना सोयीस्कर जावं यासाठी मुन्नी त्यांना ब्रांड देखील सुचवते. गाणं ऐकताच ते म्हणू शकतील "सुनबाई, जरा झंडू बामची बाटली आण गं!"
हेच या गाण्याचं धृवपद आहे. केवढी मोठी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून हे गाणं लिहिलं गेलं आहे याची कल्पना ऐरागैरा करूच शकणार नाही!

शिल्पासा फिगर बेबो सी अदा , बेबो सी अदा...
ती म्हणते माझा बांधा शिल्पा (ही शेट्टयांची असावी, कारण शिरोडकरांचा बांधा जाहीर उल्लेख करण्यासारखा राहिला नाहीये!) सारखा कमनीय आहे. वा! वा ! शब्दा-शब्दातून सौंदर्याचे नवीन मापदंड कसे उभे केले आहेत ते पहा.. माझ्या अदा म्हणजे नटणं मुरडणं हे कपूरांच्या करीनासारखं आहे. बहुधा सध्याच्या काळात तिची दखल घेण्याजोगी ही एकच गोष्ट असावी. तिची फिगर मुन्नीच्या नजरेतून कशी सुटली हा मात्र संशोधनाचा विषय होऊ शकतो.असो! तर मुन्नी म्हणते..

है मेरे झटके में फ़िल्मी मज़ा रे फ़िल्मी मज़ा...
मुळात 'फ़िल्मी मज़ा' हा काय प्रकार असतो हे माहित नसल्यास या वाक्यातून काही अर्थबोध होणार नाही. आम्ही संशोधनाअंती असा निष्कर्ष काढला कि भारतीय भाषेत फिल्मी म्हणजे 'आभासी'! त्यामुळे प्रत्येकाच्या कल्पनेमध्ये 'मजा' या शब्दाचा जो 'अर्थ' ऐकणा-याला अभिप्रेत आहे, तो त्याने घेतला कि या वाक्यातली मजा कळेल! (आधी हे वाक्य कळलं का बघा!) मुन्नीने अंगाला दिलेल्या प्रत्येक झटक्याबरोबर तुम्हाला 'ती मजा' घ्यायची असेल तर कल्पनाशक्तीला जेव्हढा वाव देता येईल तेवढा चांगलं! पण हे समजणारे फार थोडे लोक असतात आणि याची मुन्नीलादेखील जाणीव आहे बरं का? म्हणूनच ती पुढे म्हणते..

हाय तू न जाने मेरे नखरे पे..... हाय तू न जाने मेरे नखरे पे लाखों रुपैया उड़ा..
ज्याना ही उपरोल्लेखित 'मजेची जाण' आहे त्या सुजाण लोकांनी लक्षावधी रुपये या मुलीवर उधळले आहेत अशी कबुली ती स्वतःच देते. यावरून तिच्या व्यवसायाची साधारण कल्पना येते.

वे मैं टकसाल हुई , डार लिंग तेरे लिये..

म्हणजे पहा.. नुसत्या नख-यावर खो-याने पैसा ओढणारी ही (बार)बाला स्वतःला टांकसाळीची समर्पक उपमा देते. यावरून प्रियकर म्हणून तिचा रोख साधारण बारमालकाकडे अथवा तो फारच वयस्कर असल्यास त्याच्या मुलाकडे असावा असे वाटते. इथे मुन्नीच्या प्रतिभेला दाद द्यावी तितकी थोडी! पुढे मुन्नी म्हणते..

सिने माहॉल हुई , डार लिंग तेरे लिये..
म्हणजे संधीविग्रह केल्यानंतर हे वाक्य "सिनेमा हॉल हुई" असं असावं. मल्टीप्लेक्स मध्ये एंटरटेनमेंट ट्याक्सच्या नावाखाली ओढला जाणारा प्रचंड पैसा लक्षात घेता ते पैसा छापण्याच मशीन बनलं आहे यात शंका नाही. नेमका हाच मुद्दा उचलून मुन्नीने स्वतःच स्वतःला ती उपमा दिली आहे. 'मी नाचगाण्यातून  किती पैसा मिळवते आहे ते पहा, आणि ही गोष्ट विचारात घेता तू इकडे आकर्षित व्हायला काहीच हरकत नसावी' असे मुन्नीला येथे म्हणायचे असावे!

पुढील कडव्याला स्पर्श करण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते!
वास्तवात मुलींशी साधे बोलायचे देखील गट्स नसणारा एखादा नवखा खेळाडू, सोशल नेट्वर्किंग साईटवर मुलींचे प्रोफ़ाईल्स चाळून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी फोटोजवर "u look cool " "nic snap dear ! " "beutiful dear.. " "gorgius " अश्या (अशुद्ध लेखन असणा-या) कमेंट्स देऊन नंतर "माझ्यशी मैत्री कर्नर क ?" किंवा "wana b my frend?" वगैरे विचारतो. इथे खुल्ली ऑफर देणा-या मुन्नीने तिच्याबद्दल एवढ सांगितल्यानंतर तिथे असणा-या एखाद्याला तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली नाही तरच नवल! असाच एक जण लगेच आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो..
ओ मुन्नी रे, ओ मुन्नी रे..
तेरा गली गली में चर्चा रे...

कॉलेजात एखादी नवीन मुलगी आली तर ती गेटमधून बिल्डींगमध्ये पोहोचेपर्यंत तिची चर्चा वर्गावर्गात सुरु झालेली असते तर इथे स्वतः मुन्नीने घसा फोडून सांगितल्यानंतर तिची चर्चा कुठे होणार नाही हे शक्य आहे का? तेच इथे सांगितलं जातंय.. मुन्नीला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जातेय कि गल्ली गल्ली मध्ये तुझ्या नावाची चर्चा चालू आहे. याच भावना पूर्वी शम्मी कपूरने "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे" या गाण्यातून व्यक्त केल्या होत्या.पुढे हा आशिक म्हणतो..

है जमा इश्क दा इश्क दा परचा रे जमा इश्क दा इश्क दा परचा रे ...
ओ मुन्नी रे !!

या ओळींवर (खालची मुन्नीला दिलेली हाळी वगळता ) आमचे अजूनही संशोधन चालू आहे.. काव्य प्रकाशित झाल्यानंतरदेखील हा लेख प्रकाशित करायला एवढा वेळ झाला या मागचं मुख्य कारण ह्या दोन ओळीच आहेत. भान हरपल्यानंतर मनुष्य काहीबाही बरळत सुटतो त्यापैकी हा प्रकार असावा असे आमचे प्रथमदर्शनी मत आहे. यातून खरेच काही अर्थबोध होत असल्यास त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी आमची विनंती आहे!

असे कितीतरीजण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात म्हणून मुन्नीने काय सगळ्यांनाच फ्रेंड लिस्ट मध्ये add करायचं की काय? छे छे.. अश्या लोकांशी कस वागायचं हे मुन्नीला चांगलंच ठाऊक आहे! म्हणून ती लगेच म्हणते..
कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा.......हो कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा...
या कडव्यात मुन्नीला एक गहन प्रश्न पडला आहे कि या कसल्या निर्बुद्ध माणसाशी आपली गाठ पडली आहे? तिला तो बेअक्कल का वाटावा? तर त्याचं उत्तर तिनं लगोलग देऊन टाकलं आहे.
बिना रुपैये के आके खड़ा मेरे पीछे पड़ा...
एखाद्या बारबालेच्या मागे लागणं तेदेखील हातात/खिशात एकही छदाम नसताना? हे निर्बुद्धपणाचेच लक्षण नव्हे काय? मुन्नीने ते बरोबर जोखले आहे म्हणून त्या मूर्खाचा पोपट असा उल्लेख करून ती म्हणते..
पोपट न जाने मेरे पीछे वो सैफू...
एखाद्याला हातोहात मूर्ख बनवला, किंवा त्याला वेड्यात काढला कि त्याचा 'पोपट' केला असं म्हणतात. तोच अर्थ मुन्नीला घ्यायचा असावा. आंबटशौकीन श्रोत्यांच्या डोक्यात जर चटकन कोणताही दुसरा अर्थ आला असेल तर त्यांनी तो लगेच काढून टाकावा ही विनंती आहे. ती म्हणते माझ्यापाठी सैफु लागलाय... सैफु म्हणजे सैफ अली खान, बरं का? तो तिच्या मागे आहे; तर या सगळ्या बिन पैसेवाल्या भिकारी लोकांनी त्यांच्या हद्दीत राहावं असा तिचा स्पष्ट सल्ला आहे! आता पहिल्या कडव्यात करीनाचा उल्लेख केल्यावर सैफ अली खानला अनुल्लेखाने टाळणे म्हणजे त्याचा घोर अपमान! याचं पातक डोक्यावर घ्यायचं मुन्नीनं खुबीनं टाळलंय. तिची ही शिताफी लक्षात येताच कोणालातरी दाद दिल्याशिवाय राहवत नाही..दबक्या आवाजात तो ओरडतो
हाय हाय मारही डालोगी क्या..
पण त्याला न जुमानता मुन्नी त्यालाही त्याची औकात (मराठीत..लायकी) दाखवून देते..
पोपट न जाने मेरे पीछे सैफू से लेके लम्बू खड़ा...
म्हणजे नुसता सैफच नव्हे तर लंबूही तिच्या मागे आहे. लंबू म्हणजे अमिताभ बच्चनच असावा यात डाउट नाही. बॉलीवूडच्या शहेनशाहचा 'लंबू' असा अपमानास्पद उल्लेख करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे. इतिहासाची पाने चाळल्यास गोविंदानेदेखील आपल्या नायिकेला भुलवण्यासाठी 'जो तू होती जया भादुरी.. हम भी तो लंबू होते... गोरी तेरे नैनो में हम बस जाते!' असं म्हणून अमिताभला लंबू म्हटले आहे. आता अमिताभची उंची आहे जरा जास्त म्हणून काय त्याचा सारखा सारखा असा उल्लेख करून त्याला पदोपदी हिणवायचं? आपल्याला नाही बुवा आवडलं! पण हे आमचं वैयक्तिक मत आहे. जाऊ दे.. विषय भरकटला.. तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील..

आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..
आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..

आयटम म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेत 'अनेकात एखादी'. 'आयटम' या शब्दाच्या प्रत्येकाच्या संज्ञा वेगवेगळ्या असू शकतात! जश्या कि 'लाखात एखादी' 'हजारात एखादी' इत्यादी इत्यादी.
तर ढोबळमानाने असणारा 'चारचौघात लक्ष वेधून घेणारी' हा अर्थ आपण घेऊ तर तो मुन्नीवर अन्याय होईल. 'सैफ' वगैरे म्हणजे जरा जास्तच पातळी आहे त्यामुळे इथे 'त्या' लेव्हलची बाला 'आम' झाली.. आता बघा.. इथे भाषेतला शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेलाय त्याला महत्व आहे. हा 'आम' खायचा नाही.. आय मीन..हा 'आम' खायचा 'आम' नाही. आम म्हणजे अतिसामान्य.. 'आम जनता' मध्ये असलेला अर्थ. या भाषेची हीच तर खासियत आहे! ही देखणी, लावण्यवती (असताना ती ) अतिसामान्य झाली.. आता आधीच्या वाक्याचा संदर्भ घेतला तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील.. ही खास आयटम जनसामान्यांसाठी उपलब्ध झाली (श्रोत्यांनी आणि वाचकांनी इथे आपल्या कल्पनाशक्तीला थोडासा लगाम घालावा..) कारण, हे प्रियतम फक्त तू आणि तुझ्यासाठी! बघा बघा.. अपूर्व त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण घालून दिलेलं आहे मुन्नीने! याला म्हणत असावेत खरखुर आकर्षण! आणि त्यामुळेच ती पुन्हा आठवण करून देते कि बाबा खरंच...
मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

एवढं सगळं म्हटल्यानंतर (तेदेखील एका सुस्वरूप मुलीने !) कोणाच हृदय द्रवलं नाही तरच नवल!
है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा ..है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा...
इथे मुन्न्याची एन्ट्री झालेली आहे.. आम्ही पहिल्यांदा केलेल्या 'मुन्नी बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी' या विधानाला पुष्टी देणारी वाक्य तो स्वतः इथे फेकत आहे पहा.. 'तुझ्यामध्ये पूर्ण बाटली पिल्यानंतर जेवढी नशा चढते तेवढीच नशा आहे' असा या वाक्याचा जरी वरवरचा अर्थ असला तरी छुप्या अर्थाकडे कोणाचं लक्ष जाणार नाही म्हणून स्पष्ट करत आहे.. 'एका बाटलीमुळे जेवढी नशा चढते तेवढी नशा तुला चढली आहे..झेपत नाही तर कशाला प्यायची एवढी' अशी मुन्नाला तिच्याबद्दल वाटणारी काळजी त्यातून व्यक्त होते.

कर दे बुढापे को कर दे जवाँ रे कर दे जवाँ...
आता तरणीताठी पोरगी बेधुंद होऊन जर बेफाम नाचायला लागली तर त्यापासून स्फूर्ती घेऊन म्हाता-याकोता-यांनादेखील नाचावेसे वाटेल यात शंका नाही. याच अर्थाने मुन्नाने, मुन्नीच्या नशेची महती वर्णन करण्यासाठी एक दाखला म्हणून हे वाक्य उच्चारले असावे! तुझी नशा एवढी आहे कि म्हातारपणालासुद्धा तरुणाईत बदलायची असीम ताकद आहे त्यात! केवढ हे कौतुक.. केवढी ही स्तुती आणि उतू जाणारं प्रेम! यापुढे मुन्ना आणि मुन्नीची प्रेमकहाणी फक्त या एका काव्यामुळे लैला-मजनू, हीर-रांझा, सोनी-महिवाल अगदी आताच्या काळातले राधे-निर्झरा, वीर-झारा यांच्या बरोबरीने अजरामर होणार ही काळ्या दगडावरची (खडूने मारलेली पांढरी) रेघ आहे!!
पुढे मुन्ना फॉर्मात येऊन म्हणतो..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली, हाये..
वा वा! ओठांवर शिव्या तुझ्या डोळ्यात दोन रंग.. बहुधा दारूमुळे लालपिवळे झालेले तिचे डोळे मुन्नाने अचूक हेरले असावेत.. आणि शिव्या हा अल्कोहोलचा काऊन्टर इफेक्ट आहे हे जाणकार श्रोत्यांना कळले असेलच! म्हणजे हे गाणं ऐकताना नुसते कान नव्हेत तर भानही हवे. तो पुढे म्हणतो कसा..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली रे दे है जिया...
तू आयटम बॉम्ब हुई, डार लिंग मेरे लिए...
इथे आयटम हा शब्द atom या अर्थी योजला आहे.. एकाच शब्दाचा उपयोग दोन वेगवेगळ्या अर्थांनी करायची किमया इंग्रजी भाषेनंतर बॉलीवूडच्या गीतकारांनी साधली आहे यावर कोणाचेच दुमत नसेल! तू माझ्यासाठी जणू अणुबॉम्ब झालीस! प्रतिभा पहा.. 'बॉम्ब' हा शब्द तरुण मुलं कोणत्या अर्थाने वापरतात हे त्यांना तर सांगायला नको पण लेडीज वाचकांवर अन्याय नको म्हणून मी जरा सोज्वळ शब्दात हे संकल्पना सांगतो.. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर जर पाहणा-याच्या मनामध्ये संमिश्र भावनांचा (म्हणजे सर्व भावना एकाचवेळी एकत्र! ) कल्लोळ माजला (जसा बॉम्ब फुटल्यावर माजतो) तर ती व्यक्ती 'बॉम्ब' आहे असं म्हणायला हरकत नाही!सहसा या विशेषणाचा वापर मुलींकरिताच केला जातो असा समज आहे. नुसता बॉम्ब म्हटलं तर एवढा कल्लोळ तर 'आयटम बॉम्ब' म्हणजे काय असेल याची तर कल्पनाच न केलेली बरी! मुन्नाने हे विशेषण मुन्नीला देऊन तिच्या नटण्या मुरडण्याचा, मेकपचा, नाचाचा, दारू पिऊन घातलेल्या धिन्गाण्याचा, थोडक्यात तिच्या ओव्हरऑल कार्याचा यथायोग्य सन्मान केलेला आहे असे आम्हास प्रामाणिकपणे वाटते.

मुन्नी बदनाम हुई,
मुन्ना आणि मुन्नी यांचा एक दुर्मिळ फोटो!
डार लिंग मेरे लिये..
मुन्नीके गाल गुलाबी,
नैन शराबी,चाल नवाबी रे....
ले झंडू बाम हुई,
डार लिंग तेरे  लिये..
मुन्नी बदनाम हुई,
डार लिंग तेरे लिये..

या ओळींचा अर्थ आधी दिलेलाच आहे.. तसेच यातील धृवपद आधीच स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान वगैरे वगैरे!

बात ये आम हुई, डार लिंग तेरे लिये..
इतकावेळ "मुन्नी बदनाम हुई, मुन्नी बदनाम हुई" ओरडून सांगितल्यानंतर 'रोज मरे त्याला कोण रडे' या उक्तीप्रमाणे तिच्याभोवती फुकटात नाचणा-या पब्लिक ला त्याचं कौतुक वाटेनासं होतं त्यामुळे ते तशी स्पष्ट कबुली देऊन टाकतात. यासाठी सुद्धा धैर्य लागतं बरं!! ते म्हणतात 'मुन्नी बदनाम हुई' हि आता सामान्य गोष्ट झालीये आम्हाला काहीतरी नवीन हवंय.. चलाख मुन्नीला याचा सुगावा लागताच प्रसंगावधान राखून ती म्हणते..
बे-हिंदुस्तान हुई, डार लिंग तेरे लिये..
दुर्दैवाने या वाक्याचासुद्धा आम्हास अर्थ लागला नाही! येथे 'बे' हा शब्द दोन या अर्थी आहे कि बे-घर होणे या अर्थी आहे हे कळायला पुरेसा वाव नाही. दुसरा अर्थ जरी थोडासा अर्थपूर्ण वाटतो पण तो अर्थ घेतल्यास असंबद्धपणा जरा जास्तच वाढतो त्यामुळे हे वाक्यसुद्धा सध्यातरी ऑप्शन ला टाकल्याचे आम्ही जाहीर करत आहोत. जरी ते चुकीचे वाटत असले तरीपण इथे मुन्नीने प्रसंगावधान राखून तोच तोच पणा टाळल्याबद्दल तिचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे

अमिया से आम हुई,डार लिंग मेरे लिये..
इथे 'आम' हा शब्द आधी सर्व ठिकाणी उपयोजल्याप्रमाणे 'सामान्य' या अर्थी नसून आंबा या अर्थी असावा.. कारण कैरीपासून जसा आंबा होतो तसा अमिया पासून आम होत असावा. मुन्नीला अभिप्रेत असणा-या विचारापर्यंत आम्हाला पोचता आले नाही याबद्दल आम्ही खेद व्यक्त करीत आहोत.
ले झंडू बाम हुई, डार लिंग मेरे लिये..
सिने माहॉल हुई , तेरे तेरे तेरे लिए..

ओळींचा अर्थ आधी दिलेला आहे.. (म्हणजे परत परत सांगितला जाणार नाही!) धृवपदही स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान, पैश्याची खाण वगैरे वगैरे!

आ ले बदनाम हुई हांजी हाँ तेरे लिए..
ले सरेआम हुई, डार लिंग तेरे लिये..डार लिंग तेरे लिये..

शेवटची ओळ पुन्हा एकदा ऑप्शनला! (इंजिनियरिंगची सवय! सुंभ जळला तरी पीळ जात नाही! काय करणार?)


तर आम्ही आमच्या परीने या अफलातून गाण्या(जनसामान्यांचा शब्द)चे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदीचा अपुरा व्यासंग आणि भाषेची व्याप्ती या दोन गोष्टींमुळे काही ठिकाणी बंधने आली आहेत. तरीदेखील इतरांनी दुर्लक्षिलेल्या गोष्टीचा अभ्यास करणं (आणि करायचा त्यांचा न करणं) याची सुरुवातीपासूनच आवड असल्याने आम्ही हे संशोधन केले आहे. या संबंधात काढलेली टाचणं, टिपणं, संदर्भग्रंथ आमच्या अभ्यासिकेत उपलब्ध आहेत. अभ्यासूंनी वैयक्तिकरित्या संपर्क केल्यास ती त्यांच्यासाठी उपलब्धही करून दिली जातील.


सरतेशेवटी सांगायचे झालेच तर..आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात या गाण्याने एका नवा मैलाचा दगड उभा केला आहे यात तिळमात्र शंका नाही आणि याबाबत कोणताही वाद असण्याचा प्रश्नच नाही!

28 comments:

 1. Jabardast aahe mitra! Munni kharach badnaam nahi tar mashoor jhali aahe tumchya ya savistar rasagrahanamule.Atishay sakhol ani gadha abhyas aahe asa vatta.

  ReplyDelete
 2. @Shweta : पेशंस ठेवून एवढं मोठ्ठ लिखाण वाचल्याबद्दल धन्यवाद!
  @Sudha : खरंतर माझ्या मते हे एक प्रचंड निरर्थक गाणं आहे. उडत्या चालीची जी गाणी असतात त्यात एक अजून भर,एवढंच!सहज ऐकताना या गाण्याचा अर्थ लावणं एवढं मुश्कील होत होतं कि तेव्हा जे विचार आले त्यातून मी हे लिहिलं. त्याचं एडिटिंग करण्याचे कष्ट मी टाळले त्यामुळे कदाचित लांबी वाढली असावी.. बाकी वाचल्याबद्दल आभार.

  ReplyDelete
 3. hahaha..hehehehe..hohohoho..!! :) :) :)
  ek request aahe..
  marathit ek navin gaana aalay..tu aikla ashhilch..
  "ga vaat majhi baghtoy rickshawala"..
  tyacha pan asla kahi lihi na..!! :P
  m waiting..!! :)

  ReplyDelete
 4. kharach khupach mast!

  ashya ganyache asehi vishleshan hou shakte ? kharach aashcharya vatlya shivay rahat nahi!


  hasun hasun melo ! murkundi valali jabda dukhayala lagla aata kay punha ekda Zandu bam shivay paraya nahi!

  ReplyDelete
 5. @rohan: (हसल्याबद्दल)आभारी आहे! तसंच मी काही कोणी(विषय सुचवल्यावर लेख प्रसवण्याइतका) सिद्धहस्त लेखक नव्हे तरीदेखील शक्य झाल्यास प्रयत्न करून पाहीन.
  @tuljaram: आपणांस लेख आवडला हे पाहून बरं वाटलं. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

  ReplyDelete
 6. अरे बाप रे....... हसून हसून कोथळा बाहेर पडायची वेळ आलॊये.. मित्रा, चाबूक्क्क्क्क्क्क्क्क नुसता चाबूक नव्हे तर जंबो/मेगा चाबूक...
  लोळालोळी नुसती.... अरे काय जबर्‍या लिहीलंय...मेलो हसून हसून.. कुठे होतास इतके दिवस?
  मी ह्या पोस्टची लिंक ट्विटर, फेसबुक वगैरे सगळीकडे देतोय... अफाट्ट आहे !!!!!!!

  ReplyDelete
 7. प्रचंड हसलोय आज हे वाचताना. मलायकाला दे वाचायला. धन्य होइल ती ;)
  भन्नाट मित्रा, मुजरा :)

  ReplyDelete
 8. मुन्नीची काव्यप्रतिभा भारी आहे.. च्यायला हसून हसून लोळतोय..

  ReplyDelete
 9. पर्वाच कुठेतरी काव्य आणि कविता यातला फरक विचारला होता. मुन्नी बदनाम..............हे काव्य नसून कविता आहे.

  हहपुवा

  ReplyDelete
 10. :)) Tooo goood...

  मी ह्या पोस्टची लिंक ट्विटर, फेसबुक वगैरे सगळीकडे देतोय.. +1

  ReplyDelete
 11. मस्तच... ह ह पु वा...

  मी पण लिंक पेस्टतेय...

  ReplyDelete
 12. भन्नाट मित्रा, मुजरा :)

  ReplyDelete
 13. @Vikrant Deshmukh: प्रतिक्रिया तर त्यापेक्षाही जबरी आहे.. आपली प्रतिक्रिया वाचून मी नक्की माझ्याच लेखावरची आहे का हे पाहायला लेख पुन्हा वाचला!! लेखन वाचल्याबद्दल (सहन केल्याबद्दल आणि प्रसाराबद्दल) मनःपूर्वक आभार!

  @विशाल: मुज-याचा स्वीकार करण्याइतकी मी मोठी असामी नाही तरीही आपला मान राखण्याकरिता स्वीकार करतो! धन्यवाद..

  @विक्रम: वाचल्याबद्दल थांकू रे! आणि प्रतिक्रीयेसाठीही !

  @मुक्त कलंदर: मुन्नीची काव्यप्रतिभा जोखल्याबद्दल आभारी आहे.

  @सुहास: धन्यवाद साहेब!

  @उमा : कौतुकाबद्दल धन्यवाद गं उमे!!

  @शांतीसुधा : खंडकाव्य म्हणून मी आधीच गौरवलेल आहे. परंतु आपण कविता म्हणून आदर राख्लात त्याबद्दल आभारी आहे.

  @Aniket :Thanks re mitra !

  @श्रद्धा :मनापासून आभार..

  @rajkiranjain : राजे,मिपा आणि मिम वर चालणा-या आपल्या लेखणीचा आणि कर्तृत्वाचा मी (पाहुणा आणि वाचनमात्र का होईना पण) चाहता आहे.. त्यामुळे आपल्याकडून प्रतिसाद मिळणं हि माझ्यासाठी भाग्याची गोष्ट! खरंच आभार!!

  @prajakta :thanks गं!

  ReplyDelete
 14. अशक्य भारी....लोळा लोळी.....प्रचंड भारी लिहल आहेस मित्रा... :) :)

  ReplyDelete
 15. @yogesh : आपल्याला लिखाण आवडलं हे पाहून आनंद वाटला.. अश्या दिलखुलास प्रतिक्रिया लिहिण्यासाठी स्फूर्ती देतात.. धन्यवाद!

  ReplyDelete
 16. जबरी लिहिलं आहेस.
  मलाईकाला वाचता यायला हवं हे! आपण नकळत केवढं महान कार्य करून ठेवलंय हे कळेल तिला.

  ReplyDelete
 17. @मोगरा फुलला: लिखाण आपल्याला आवडलं हे पाहून बरं वाटलं..

  ReplyDelete
 18. हा हा हा..लोळालोळी.....अशी आणखी काही काव्यरसग्रहण कर बाबा...एक मस्त गाथा तयार होईल....
  सक्काळ सक्काळी धम्माल वाचायला मिळालं...आता फ़ेबुवर टाकणार मी पण....
  जबरा....मार डाला...उम्म्म्मा..........:

  ReplyDelete
 19. Lai Bhaaree livlays gadyaa!
  --Vinayak Govitrikar

  ReplyDelete
 20. हा..हा..लय भारी..मुन्नी तर बदनाम होता होता महान झाली...
  ही सगळी चुक त्या संगीतकाराची आहे...एवढ्या महान गाण्यास(काव्यास) आयटम सॉँग करून टाकले...
  विशेष आभार...पुणेकर मान्यवरांचे...त्यांच्यामुळे आम्ही या दरबार आलो आणि आमचे डोळे उघडले...:)

  ReplyDelete
 21. @ अपर्णा: धन्यवाद हो!
  @ vinayak : आभारी आहे..
  @ Sagar :आपल्या आभारप्रदर्शनाने सुखावलो आहोत! या छोट्याश्या दरबारात स्वागत आहे..

  ReplyDelete
 22. I think somebody has misused this post:

  http://vaibhavtaksale.wordpress.com/2011/01/27/

  See the link and
  Correct me if I am wrong.

  ReplyDelete
 23. @Sameeksha : माहितीबद्दल धन्यवाद. दिलेल्या दुव्यावर सदर लेख सापडला नाही. बहुतेक तो तिथून हटवण्यात आला असावा. आपल्या शोधक नजरेचे आभार..

  ReplyDelete

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!