गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

अनावस्था प्रसंग!

गोरेगावच्या रेल्वेस्थानका वरून पश्चिमेला बाहेर पडून रिक्षाने साधारण सरळ त्याच दिशेला गेलं की अंदाजे १०-१२ मिनीटांनंतर बांगूरनगर नावाचं "उप-उपनगर" लागतं. गजबजलेल्या मुंबापुरीत अशा शांत निवासी भागात गेलं की फार बरं वाटतं. उन्ह उतरायला लागली की त्या भागातले बरेचसे लोक फेरफटका मारायला बाहेर पडतात. तिथून मालाडच्या बाजूला चालत दहा मिनिटांच्या अंतरावर एकेकाळचा "सर्वात मोठा" अशी बिरुदं मिरवलेला 'इन-ऑर्बिट" मॉल आहे.मालाड आणि गोरेगावच्या सीमेवर. दस-याला इथले लोक हटकून या मॉलमध्ये जात असावेत जेणेकरून खरेदी आणि सीमोल्लंघन अशी दोन्ही पुण्यकर्मे पार पाडता येतील असं मला उगीचच वाटायचं!

मुंबईला गेलं की गोरेगावच्या काकांकडे मुक्काम आणि मुंबईतल्या मित्रमंडळींना जमवून थोडा टाईमपास असं माझं गणित असायचं. अशाच एका शनिवारच्या संध्याकाळी आम्ही सर्वांनी भेटायचं ठरवलं. बोरीवली कांदिवली ठाणे वगैरे भागातून तीन मित्र आणि त्यातल्या दोघांच्या 'मैत्रिणी' असे सगळे येणार होते. ‘इनॉर्बीट’ टाईमपाससाठी सुद्धा सुयोग्य ठिकाण आहे त्यामुळे सगळ्यांनी तिथेच यायचं असा प्लान झाला. मला तर बरंच झालं. तिघांपैकी एक-दोघे जण पोचले की घरातून बाहेर पडायचं असा विचार करून मी काकांकडे टीव्ही पाहत राहिलो.

स्टेशन वर पोचल्यावर एकाने फोन केला त्याबरोबर मी तयारी केली आणि बाहेर पडलो. इतरांना फोन करून त्यांचं स्टेटस अपडेट घेत मी चालू लागलो. ३-४ मिनिटात मी बांगूरनगरच्या अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्याला टच झालो आणि फोन वर बोलत बोलतच मी इनॉर्बीट च्या दिशेला वळलो.
"मॉल दिसतोय रे बाबा मला. पोर्चमधून जरा डोळे ताणून बघितलंस तर तुलापण मी दिसेन .." मी तिथे पोचलेल्या माझ्या एका मित्राला मी किती जवळ आहे ते पटवून देत होतो..
तेवढ्यात माझ्या खांद्यावर एक हात पडला..

"भाय..एक मिनिट रुक.."
एक मवाली दिसणारा तरुण मला थांबवत होता. "मी ठेवतो रे फोन" म्हणत मी फोन ठेवला आणि त्या व्यक्तीकडे वळलो.
"बोला..काय झालं?"
"तूने वो पीछे के कॉर्नर पे जो लडकी खडी है उसको कुछ बोला क्या?"
मी लांबवर नजर टाकली. मुंबईच ती ! नजरेच्या पट्ट्यात साहजिकच खूप सारी माणसं आली. जिथून मी वळलो होतो त्या कॉर्नरवर एक बाई हातात पिशवी घेऊन उभी होती. पण कोणी मुलगी दिसेना.
"कौन लडकी?, मुझे तो कोई दिख नही रहा है"

तेवढ्यात आणखी एक; आधीच्यापेक्षा जरा बरासा दिसणारा इसम आमच्या रोखाने येऊ लागला.
"काय बोलतोय रे तो? बोलला काय तिला हा?" तो इसम म्हणाला.
"नाय म्हन्तो तो.." मवाली तरुण.
'आयला.. म्हणजे मराठीच आहेत तर.. मी उगीच हिंदीत बोलत होतो..' मी मनातच म्हणालो.
"नाय म्हणतो? पण वर्नन तर हेच केल होत..पांढरा टी शर्ट,निळी जीन् प्यांट ,डाव्या कानात बाली.. बॉस तुने बोला क्या किसीको?"
"नाही बुवा.. मी नाही कोणाला काही बोललो.."
"मराठीच आहेस का? मी पन.. आपन इम्रान कोकनी..." त्या माणसाने आपली ओळख दिली. "काय हाय म्हायताय का? इथे आपला सलीम भाई आहे ना त्याच्या भैनीला रोज कोणतरी छेडतं.. आमी फुल प्लानिंग केला होता आज त्याला पकडायचा.. ही सगळी आपली पोरं हायेत पेरून ठेवलेली.. तुझं वर्नन दिलं म्हणून तुला हटकला. तू नव्हता ना नक्की?"
"छे छे.. मी तर आपला गुपचूप मोबाईल वर बोलत चाललो होतो. छेड काढणं तर सोडाच चुकून कोणाला धक्का लागल्याचंसुद्धा आठवत नाहीये."
"ठीक है.. जरा साईडला ये. उसको जरा थोबडा दिखाकार आयेंगे.. कन्फम होईल ना तू तो नाय्ये म्हणून.."
"मी कशाला? जाऊन सांगू शकता ना तुम्ही लोक?" मी त्रासिक चेहरा करत म्हणालो. आधीच उशीर झाला होता. ठाण्याचा मित्र तिकडून इकडे पोचला होता आणि १० मिनिटांच्या अंतरावरून यायचं असून मी मात्र अजून रस्त्यातच होतो..
"सून मेरे भाय.. सलीम भाय को जाके ऐसा बोला ना तो हमारा थोबडा आउट कर देगा वो.. तु आके जा ना दो मिनट मे. तेरेको किधर जाना है क्या?"
हे तर भारीच! जाणा-या माणसाला थांबवून "तेरेको किधर जाना है क्या?"
'च्यायला मी जणू काही इथेच बसायला आलो होतो. २-४ पोरींनापण छेडीन म्हणतो जाता जाता..' मी बोललो पण सगळं मनातल्या मनात!!
"जाना तो है.. मित्र वाट बघतायत इनऑर्बिटला " मी त्यांना म्हणालो.
"किती?" मला मागून यायचा इशारा करत तो रस्ता क्रॉस करायला लागला.
'तुला काय करायच्यात रे चांभारचौकश्या?' हे अर्थात स्वगत.. "आहेत ८-१० जण" मी ठोकून दिलं! होते ३ जणच पण म्हटलं आपली अर्जन्सी कळेल यांना. एका माणसासाठी इतके लोक खोळंबलेत म्हटल्यावर लवकर आटपतील.
मी गपगुमान त्यांच्या मागे जायला लागलो.पण माझी वाट बघणारे एक मित्रवर्य काही दम धरेनात.. पुन्हा फोन वाजला.
"येतोय रे बाबा.. जरा एक missunderstanding झालंय काहीतरी. आलो निस्तरून."
तिकडून लगेच "आम्ही येऊ का?" ची विचारणा झाली."सध्यातरी नको" म्हणून मी फोन ठेवला..
"फोन उचलू नको हा आता.. बंद करून ठेव तो" इति इम्रान कोकनी!
"काय?" मी आश्चर्यचकित! तो परत काही बोलला नाही.

रस्ता क्रॉस करून एका अरुंद बोळात ते शिरायला लागल्यावर मी गोंधळलो.
"बॉस , कुठे चाललोय आपण? मला जायचं आहे. जास्त वेळ नाहीये माझ्याकडे"
दोघेही थांबून माझ्याकडे वळले. मुख्य रस्त्यापासून हे ठिकाण पन्नास एक मीटरच्या अंतरावर होतं.दोन बाजूला दुकानाच्या बिल्डिंग्ज. पैकी एक दुकान दुपारची वेळ असल्याने बंद! नक्की मराठी दुकानदार असावा!! कारण आजूबाजूची दुकानं चालू होती असं येता येता माझ्या नजरेला पडलं होतं. मी बंद दुकानाची पाटी वाचली.. 'लकी फर्निचर मार्ट-प्रोप्रा. अशोक पवार' वाटलंच! तर थोडक्यात त्यावेळी तरी ती सुनसान जागा होती. उगाच थांबवलं यांना अस मला वाटून गेलं.
'जरा वस्तीच्या ठिकाणी गेलो असतो तर बर झालं असतं.' माझं मन मला सूचना देत होतं..
"सुन.. तेरेको जल्दी है तो तू इधरीच रुक. तेरा फोन दिखाके आता मै.."
'साल्या ह्या लोकांच्या भाषेत क्रियापदं नसतात कि काय?' मी गुपचूप उभा राहिलो.
"उसका कोनसा फोन बोला रे?" कोकण्याचा त्याच्या सहका-याला प्रश्न..
"एन सेवंटी" तत्पर सहकारी उत्तरला.
'सुटलो तिच्यामायला...' मी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला..
"माझा नाहीये तो.." मी माझा फोन काढून त्याच्यासमोर नाचवत म्हटलं.
"दे इकडे.. मै दिखाके आता.."
"असा कसा देऊ? तुम लोग लेके गये और वापीस नही आये तो?"
माझ्या या प्रश्नाने कोकणी जरासा गांगरला पण सावरून त्याने आपला फोन बाहेर काढला. नोकियाने कच-यासारखी मॉडेल्स लॉंन्च केल्यामुळे तो नेमका कोणता फोन होता याचा मला अंदाज आला नाही.
"ठीक हे? ए खालिद तू पन दे रे तुजा फोन"
'खालिद नाव काय या प्राण्याचं ?' इम्रान भायची ऑर्डर आल्यावर त्याने आपला पण फोन दिला.
दोन्ही फोन्स माझ्या हातात टेकवून त्यानं विचारलं..
"इस्से तो मेहंगा नही ना तेरा फोन?"
खरं तर असावा पण या प्रश्नामागच्या भावना 'आमचे फोन तुझ्या हातात असताना आम्ही तुला ठकवून कुठे जाणार नाही' अश्या असाव्या म्हणून मी नकारार्थी मान हलवली.
"ये खालिद रुकेगा इधरीच. मै जाके आता.. यूँ गया और यूँ आया.."

इम्रान कोकणी शेजारच्याच बिल्डिंगच्या मागे गेला.. काही क्षण शांततेत गेले. आता या खालीदमियांशी काय बोलणार?
"किधर गये वो भाईसाब?" मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
"सलीमभाई के घरपे. उन्को दिखाके आयेंगे तुमारा मोबाईल. उनकी भेन घरपेही रहेगी. वो पेचान लेगी"
'आयचा घो याच्या!! नुसता बोलला तरी शिव्या घालतोय कि काय असं वाटतं!'
"पर वो एन सेवंटी था ना. माझा तो नाहीये. कितना दूर है उनका घर?"
"पासहीच है. तेरा फोन नही भी रहेगा तो भी वो ना बोलना मंगती!!"
आता काय करायचं? शांतता भंग करणं कठीण जाऊ लागलं.. टिपिकल रापलेला चेहरा, रंगवलेले केस, गळ्यात कसल्या कसल्या साखळ्या स्टील,अल्युमिनियम वगैरेच्या असाव्यात.. रस्त्यावर विकत मिळतात
तसल्याच.. झोपडपट्टीला साजेशी पर्सन्यालिटी!

'यांचा काही प्लान तर नसावा? फोन घेऊन पळून जायचा? नाहीतरी हे हातात दिलेले फोन त्यांचेच आहेत कशावरून? हे कलटी देतील नि आपण लटकायचो . मागे एकदा मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा मला आठवू लागला. तो रस्त्याने चालत असताना दोन हेल्मेटधारी बाईकर्स त्याच्या शेजारी आले आणि त्याला म्हणाले कि त्यांना एक अर्जंट फोन करायचा आहे पण त्यांच्या फोन ची battery संपली आहे. त्याने औदार्य दाखवून नंबर विचारला डायल करण्यासाठी तर ते लोक म्हणाले कि 'माझ्या कॉल साठी तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका. माझ सीम कार्ड तुमच्या फोन मध्ये घालून मी कॉल करतो..' माझा मित्र बिचारा भोळा.. मदत करण्यासाठी त्याने आपलं सीमकार्ड काढून फोन त्यांच्या हातात दिला..आणि त्या दोघांनी त्याच्या डोळ्यासमोर त्याचा फोन घेऊन पोबारा केला!! असलं काहीतरी आत्ता झालं तर? नाही. यांच्याशी सबुरीने वागून फायदा नाही'

मी काही बोलणार एवढ्यात 'इम्रानभाय' परतला.. माझ्या फोनसकट! मी सुस्कारा सोडला.
"ये फोन नही है बोलती वो"
'सुटलो बुवा' त्यांचे फोन देऊन मी माझा फोन परत घेत आणि चेक करत मी विचारलं "मग मी जाऊ का?" सुदैवाने फोन वनपीस आणि ऑपरेशनल होता.
"रुक.. वो फोन ये नही बोला उसने. आदमी नही.. फोन काय कोनपन बदलू शकतं"
"....."
"उसके हात मे अंगुठी है बोला और गले मे गनपतीका पेंडल है ऐसा बोला उसने.."
एव्हाना मला काहीतरी गडबड असल्याचा वास येऊ लागला होता.. सगळ्या खुणा माझ्या "दागिन्यांच्या" रिलेटेडच कशा काय?
"मेरा तो थंब रिंग है. अंगुठी नही."
त्याने सरळ माझ्या गळयाजवळ हात नेऊन चेन चाचपायला सुरुवात केली. मी मागे सरकलो.
"क्या कर रहे हो? उसमे कोई पेंडन्ट नही है.."
चैनमधला गणपती बोटात धरून दाखवत तो म्हणाला "नही है?तो ये क्या है? XXX समझा क्या मेरे को?"
"वो लॉकेट है. पेंडन्ट नही! " मी सांगितलं
" वो मेरेको पता नहीं. जो भी है ..ये उनको दिखाना पडेगा .."
"मैं आके उनको दिखता हूँ.."
"मस्जिद है उधर. समझा ना? मस्जिद! मस्जिद में सोने के जेवर अलाउड नहीं रहते.. और उधर अपने बच्चे भी है. खालीपीली झगडा हो जायेगा. निकालके दे दे.. में दिखाके लाता हूँ"
"निकालके कैसे दे दूँ? जिनको दिखाना है उनको यहाँ लेके आओ.." काहीतरी मोठा लोचा होता खरा..
"क्या रे..? तेरे से सीधा बात किया तो तुम हमको आडा ही लेने लगा.. बोला ना तेरेको? निकालके दे दे.. चल अंगूठी निकाल.. ”
मी टरकलो.. तरी पण अवसान राखून मी बोललो.. "ये बात नाही है.. लेकिन ऐसे कैसे दे दूँ? वैसे भी वो निकलती नहीं.."
"अरे? उंगली में डाल सकता है तो निकाल नहीं सकता?"
"ना.. निकाल के देखो चाहिए तो..बचपन में पहेनी थी.." विशिष्ट पद्धतीने काढल्याशिवाय ती थम्ब रिंग निघत नाही हे मला माहित होतं.त्यामुळे मी माझा अंगठा त्याच्यासमोर केला ..त्याने जराशी झटापट करून पाहिली पण माझ्या थम्ब रिंगने जाम दाद लागू दिली नाही!

खालिद कडे बघत त्याने माघार घेतली.
'हुश्श.. वाचवली बुवा' आमचे मनाचे श्लोक! "मैने बोला था.. वो नही निकलती"
"हां.. ठीके ठीके.. ज्यादा बात मत कर..चेन निकाल फिर.."
"क्काय?" साला आगीतून सुटून फोफाट्यात पडलो होतो मी!
"सिधेसे निकाल के देता या मै निकालू?" त्याने डायरेक्ट गळ्याच्या चेनलाच हात घातला!!
मी मनात म्हटलं गंडलो आता.. मी चटकन त्याचा हात धरला आणि चेन त्याच्या हातातून सोडवून घेतली. त्याला हा प्रतिकार अनपेक्षित असावा.
"समझता नही क्या तेरेको? क्या रे खालिद? समझाने का क्या अपने तरीकेसे?"
"सुनता नही तो समझाना हि पडेगा!" खालिदने री ओढली..
कोणाला धमकावायचं असेल तर बम्बय्या हिंदीसारखी भाषा नसावी. काय लहेजा आहे...वा! पण ही भाषेचं कौतुक करायची वेळ नव्हती.
त्या दोघांनी येऊन माझ्या गळ्याशी झटापट सुरु केल्यावर मला चेन काढून द्यावीच लागली नाहीतर त्यांनी ती तोडून काढली असती..

'सर सलामत तो पगड़ी पचास' असंच म्हणतात ना आपल्या जिवावर बेतत असेल तर? आणि काय प्रसंग गुदरला होता! माझी सोन्याची चेन त्यांच्या हातात आणि ती सुद्धा मीच काढून दिलेली! तेवढ्यात माझा फोन खणखणला. मला कुणाच्यातरी आधाराची गरज होती. मी उचलणार इतक्यात…
"तेरेको बंद करनेको बोला था ना? दिमाग में घुसती नही क्या तेरे बात..?" इम्रान गरजला..
मी घाबरून फोन कट केला..
"रहेता किधर है तू ?"
मी क्षणभर विचार केला आणि बोललो "इधर ही..बांगुरनगर मे. 'सरगम' बिल्डींग मे"
मी बिनदिक्कत खोटं बोलायला सुरुवात केली! काकांच्या बिल्डिंगचं नाव मी सांगून टाकलं. इथलाच माणूस आहे म्हटल्यावर कदाचित यांचा विचार बदलेल असा माझा होरा होता.
"क्या? इधर का ही है क्या तू? तो दिखता कैसे नही? तुम्हे घुमते हुये तो कभी नही देखा हम लोगोने" साल्यांनी माझ्यावर वॉच ठेवून सापळा रचला होता तर!!
"हालही मे आया हूँ इधर" माझी पण कमाल आहे! खोटं तेपण एकदम सुसंगत!!!
"तो पहले किधर रहता था?"
"वेस्ट में.. आरे कॉलोनी में.." ए.. दे धमाल.. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी स्वतः वरच खुश झालो.
"तो इधर कब आया..?" प्रश्नावली काही संपायचं नाव घेत नव्हती.
"पिछले सन्डे को ही शिफ्ट हुए हम लोग..हफ्तेभर ऑफिस में रहूँगा तो बाहर कैसे दिखूंगा?" वा! काय लॉजिक सुचलं!!

त्यांनी आपापसात काहीतरी डिस्कशन सुरु केलं.. एकदम खालच्या आवाजात..आणि त्यानंतर इम्रान बोलता झाला.
"चल.. तू इधर ही रुक.. चेन भाई को दिखाके वापिस दे देता.."
"मैं आता हूँ आपके साथ..इतनी मेहेंगी चीज आपके हात में देके मै इधर रुक नाही सकता" मी कासावीस झालो होतो..
"साला.. XXXX तेरेको सौ बार समझाया फिर भी वही बात..बोला ना मस्जिद में जेवर अलाउड नहीं है..." खालिदकडे वळत तो म्हणाला.."ये ऐसे नहीं मानेगा.क्या बोलता खालिद ?"
खालिद ने ज्या पद्धतीने मान हलवली ती सहमतीची खूण असावी कारण इम्रान पुढे सरसावला..मी दोन पावलं मागे हटलो.. अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. परिस्थिती चिघळत चालली होती.
"तेरेको इतना मारेंगे ना.. हात पाँव तोडके रख देंगे. घरपे चलके जानेके काबील नहीं रहेगा.."
माझ्या शरीराला घाम फुटू लागला होता.भीतीनं हातपाय थरथरू लागले. मी काही बॉलीवूड किंवा दाक्षिणात्य सिनेमातला हिरो नव्हतो.. जर असतो तर नक्कीच बाह्या सरसावून,नुसते दोन गुद्दे लगावून दोघांना हवेत उंच उडवून दिलं असतं आणि तेदेखील आज्ञाधारक मुलासारखे हवेत गोल गोल फिरत किंवा उडत छतावर जाऊन कळवळत पडले असते!!
मला तर काय बोलावं सुधरेना.. घशाला कोरड पडली.. मी आवंढा गिळला..

तोपर्यंत मागं वळून ते दोघंही त्या बिल्डींगच्या मागे जाऊ लागले होते. मघाशी इम्रान कोकणी गेला त्याच. मी त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो आणि पाहतो तर काय.. मागे मोकळी जागा. जराशी पुढे बैठी चाळ. बहुतेक तिथल्या लोकांना कुठल्यातरी बिल्डरनं रीलोकेट केलं असावं, कारण सर्व दारं बंद होती! थोड्या वेळापूर्वी इम्रान कोकण्या फोन दाखवून जेवढ्या वेळात मागे परतला होता त्यावेळात तो त्या मोकळ्या मैदानातून धावत जाऊन त्या बैठ्या घरापर्यंत पोचणंदेखील मुश्कील होतं. सलीम भाईला भेटणं तर लांबच! म्हणजे फसवणूक...निव्वळ फसवणूक चालू होती तर!! मघाशी याचा अंदाज होता; आता तर कन्फर्म झालं! धमक्या आणि दादागिरी माझी चेन लांबवण्यासाठी होती. माझ्या मनावर फसवणूकीच दुःख दाटत चाललं. अंगातला क्षत्रिय-मराठा जागा झाला!

मला कोणीतरी लुटलं आणि ते सुद्धा ते निशःस्त्र असताना? नुसत्या धमक्यांच्या जोरावर? आणि तू साधा विरोध नाही करू शकलास? 'सर सलामत तो पगड़ी पचास' असं म्हणतात ते आपल्या जिवावर बेतत असताना नव्हे तर स्वतःचा पराभव लपवत असताना!
मला अचानक साक्षात्कार झाला. 
मारलं तर मारलं...गुपचूप स्वतःची वस्तू देऊन टाकण्यापेक्षा खाऊ थोडा मार! हातपाय मोडतील म्हणतात ना? माझे पण हात काय केळी खायला नाही गेलेले! दोघांपैकी एकाला तर लोळवेनच.. जरी नाही लोळवला तर त्यांच्या लक्षात तर येईल कि इतक्या सहजासहजी मिळत नाहीत गोष्टी! हातपाय मोडले तर सरळ करायला येणारा खर्च हा चेनच्या किमतीच्या निम्मा सुद्धा नसेल! लढलो तर साला पश्चाताप तरी होणार नाही. प्रतिकार केल्याचं समाधान तरी लाभेल.. कोणीतरी येऊन तुला लुटतो आणि तू मुकाटपणे लुटू देतो.. माफ करशील का स्वतःला?' माझ्यातला स्वाभिमान जागृत झाला... 'हरहर महादेव.. जय भवानी जय शिवाजी ..' माझ्या मनातल्या श्लोकात या ओवीचीसुद्धा भर पडली!

"रुक" मी मागून पळत जाऊन हात इम्रानच्या खांद्यावर टाकला.
"क्या बे अभीतक पीछे पीछे आ रहा है? और सीधा कंधे पे हाथ? औकात भूल गया क्या?" रस्त्यावरचा छपरी मनुष्य माझी लायकी काढत होता!
"देखो भाई..आप मेरा चेन वापस दे दो.."
"तेरेको बताया ना.. सलीमभाई..."
"जो भी भाई हो मै खुद जा के दिखा दुंगा.. मुझे रास्ता दिखा दो.. "
इम्रान कोकणी खालिदकडे बघत हसला.. "साले वो उधर फेंक दुंगा तेरा चेन फिर ढूंढते बैठेगा.." लांबवर बोट करत तो बोलला..
"मेरा चेन वापिस कर दो" मी पुन्हा अवसान आणत बोललो.
"हिम्मत है तो लेके जा" हात पसरवत कोकण्याने challenge केलं.
मी सरळ जाऊन चेन उचलली आणि मुठीत घेतली. त्याने माझा हात धरला मी जोराचा हिसडा मारून तो सोडवून घेतला. मघासपासूनच्या युद्धातला पहिला विजय! मी मनोमन खुश झालो!
"अपने लड्कोंको बुला रे.. साल्याला राडा व्ह्यायला पायजे वाटतं इथे.."  इम्रानने खालिदला म्हटलं
लगेच फोन बाहेर काढून मी एका मित्राचा नंबर डायल करत म्हटलं "बोलावच!! राडा तर राडा.. वन टू वन होऊन जाऊ देत काय ते.. पण अशी तशी चेन द्यायचो नाही मी..समजलं?"
'ऑल द रुट्स टू धिस लाईन आर बिझी' फोनवरची बाई मंजुळ आवाजात मला सांगू लागली... मी चेह-यावरचे भाव अजिबात बदलू न देता बोललो "अरे..मी इकडे अडकलोय.. कोण आहेत माहित नाहीये.. अशोक पवारच्या फर्निचर च्या दुकानाच्या शेजारच्या गल्लीतून आत ये.. लकी फर्निचर मार्ट आणि हो जमलेल्या सगळ्या पोरांना घेऊन ये. कितीजण आहेत? मग आठजणच या! बाकीच्यांना थांबू देत तिकडेच."
माझा उभा जन्म मारामाऱ्या करण्यात गेला असल्याच्या आविर्भावात मी तावातावाने बोलत होतो.. आणि फोनवरची प्रीरेकोर्डेड मंजुळाबाई हिंदीतली सूचना पूर्ण करून मराठीत बोलत होती .."या मार्गावरील सर्व लाईन्स व्यस्त आहेत.. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.."वगैरे वगैरे..! मी फोन ठेवला.. "बुलाया क्या तुम्हारे बंदोको?' गुर्मीत मी विचारलं..

मी दिलेलं ओपन challenge आणि माझा बदललेला आवेश बघताच त्यांचा नूर पालटला.. खालिद तर गुपचूप सटकायच्याच मार्गावर होता.. इम्रान कोकणीने मात्र दम द्यायचा सोडलं नाही..
"ए चल! निकल इधरसे!! सिधा वो पतली गली पकड़के इधरसे वटनेका अभी..और दुबारा इधर नजर आया ना तो याद रखना..समझा ना?"
हातात अलगद पडलेलं सावज निसटून चालल्याचं दुःख मात्र त्याला चेह-यावरून लपवता येत नव्हतं.. मी तोच आवेश ठेवून त्यांच्याकडे वळून बघत बघत, सावकाश चालत त्या गल्ली पर्यंत आलो. ते दिसेनासे होताच उसनं जमवलेलं अवसान आता क्षणार्धात गळून पडलं. चेन आणि फोन खिशात कोंबून मी सगळ्या शक्तीनिशी पळत सुटलो. न थांबता... अगदी इनॉर्बीट मॉल येईपर्यंत!!

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

फॉर्म १६ आणि अनामिका

फॉर्म १६ नुसार "सरल" भरून रिटर्न्स फाईल करणं हे नोकरदार वर्गाला नव्याने सांगायला नको. जुलै आला कि लोकांची धावपळ सुरु होते..
"आपल्या ओळखीचा आहे एक.. त्याने भरून दिला फुकट.."
"काय नाय रे.. सोप्पं असतं.. फॉर्म १६ बघायचा आणि कॉलम भरत जायचे..."
"तुझा इकडे नाय सबमिट होणार.. प्रभात रोड च्या ऑफिस ला जावं लागेल.. आपला झाला. माझा मित्र आहे त्याची वट आहे.त्याने परस्पर पाठवला.."
"ऑफिस मध्ये येतो ना तो अकौंटंट.. सोडायचे २०० रुपये.. डोक्याला ताप नाही.."
इत्यादी संवाद हमखास कानावर पडतातच..
नोकरीचं पहिलं वर्ष सरेपर्यंत आपला ह्या भानगडींशी काही संबंध नसतो.  अचानक आलेल्या या गोष्टी दुर्बोध वाटायला लागतात आणि त्यामुळेच ‘ती’ माझ्या आयुष्यात आली.
तसं बघायला गेलं तर अपघातानेच आणि खरंतर "इन्कमट्याक्स" वाल्यांच्या कृपेने!

"रिटर्न्स फाईल करने थे ना.. त्याच्यामुळे उशीर झाला" तिची ही मिश्र भाषा ऐकून पहिल्यांदा मी तिच्याकडे पाहिलं. कॉन्फीडन्ट चेहरा, सावळी त्वचा,लक्षवेधक बांधा, ओव्हरऑल आकर्षक बाह्यरूप आणि कंपोज्ड व्यक्तिमत्व असं तिचं थोडक्यात वर्णन! 'तिलक' (अर्थात सदाशिवेतल प्रसिद्ध नाश्ता सेंटर, उच्चारी टिळक!) वर ती फोनवर कोणाशीतरी बोलत होती. 'रिटर्न्स', 'फाईल' वगैरे शब्द कानावर पडल्यावर मी वड़ापाव खाता खाता जरा सावध झालो.
"हाय! तू रिटर्न फाईल करतेस का? माझेपण करायचेत" मी तिरमिरित जाऊन बोललो.. माणूस परिस्थितीने गांजलेला असला कि इतर कसला उदाहरणार्थ लाज,लज्जा,भावना यांचा विचार करत नाही. मीपण त्यातलाच!!
माझ्या कडे विचित्र नजरेने पाहत ती जरा बाजूला झाली..
"सॉरी..पहचान न होने पर भी बात कर रहां हूँ  पर मुझेभी आय टी रिटर्न्स भरने थे.. आप कि फीस बता दिजीयेगा..लेकीन मुझे करवाने ही है.." मी भानावर येत आजुबाजुला पाहत विचारलं. न जाणो हिच्या आजुबाजुला एखादा सांड चहा आणायला गेलेला असायचा आणि त्याचा गैरसमज व्हायचा!
"कर दुंगी ना..बट आय चार्ज १०० रुपीज पर फॉर्म!" ती म्हणाली.
"अम्म्म... मेरे औरभी कलीग्ज है .उनके भी करने थे.." ती एकटीच आहे याचा एव्हाना मला अंदाज आला होता त्यामुळे मघाशी एकवटलेलं धैर्य वापरून मी पुन्हा तोंड उघडलं.
"ठीकाय, करते मी. पाचसहा असतील तर आय वोन्ट चार्ज फॉर यू ..आय मीन योर्स विल बी फ्री ऑफ कॉस्ट " डायरेक्ट बिझनेस ऑफर? तीपण मराठीत? मीपण चाट पडलो!
"तुला मराठी येतं?"
"मराठीच आहे अरे मी.. कामानिमित्त हिंदी इंग्लिश बोलावं लागतं.."
"कुठे काम करतेस?"
"राठी and असोसीएट्स"
"आणि तुझं नाव ?"
"अरे,किती प्रश्न विचारशील? सांस भी लेने दोगे या नही?"
आमची पहिली ओळख ही अशी.. नाव विचारलं ते मोबाईल नंबर एक्स्चेंज करतानाच.

त्यानंतर या ना त्या निमित्ताने तिचा contact होतच राहिला आणि मग तो तसा होणं हा दिवसाचा अविभाज्य भाग बनला.
"फक्त काम असतानाच फोन नाही करत मी.." अस मला म्हणून बोलायला सुरुवात करायची ही तिची सवय! पण "तुझ्याकडे कुठला नवीन पिक्चर आहे का?" अश्या विचारणेपासून "मला तुझा पेन ड्राईव्ह हवा आहे रे... दोन चार दिन के लिये" अशा अधिकारवाणीच्या बोलण्यापर्यंतचा तिचा प्रवास अगदी एखाद्या महिन्यातच झाला.. एखादी मैत्रीण आपल्या मैत्रिणीसाठी जे काही करू शकते ते सर्व आपल्या मित्रासाठी करू शकते का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी देण्याइतकी जाणीव तिने करून दिली.

"अरे बच्चा.. तुझी टोटल इन्व्हेस्टमेंट आणि बाकीचं कॅल्क्युलेशन बघता तुझे फक्त ६००५ रुपये ईअर्ली taxable आहेत, उतना ही कर इन्व्हेस्ट" म्हणून तिने माझा एलआयसी चा कमीत कमी प्रीमिअम किती असावा हा मला बरेच दिवसांपासून पडलेला प्रश्न चुटकीसरशी सोडवून दिला होता. (आणि जेव्हा नंतर tax कॅल्क्युलेशन ची शीट आली तेव्हा तो आकडा अचूक होता यावर शिक्कामोर्तब ही झाल!) ती बी कॉम करत होती आणि जॉबही. पण सांभाळायची दोन्ही! अर्थात कॉलेज ला दांडी मारणं जास्त फ्रीक्वेंट असायचं.
"मला आवडतं हे tax वगैरेचं काम करायला. यू गेट टू अप्लाय योर नॉलेज इन लाईफ एन यू अर्न मनी अल्सो!" ती जस्टीफीकेशन द्यायची. मला खरतर कशावरही ऑब्जेक्शन नव्हतं आणि का असावं? माझा देखील फायदाच होत होता त्यात. तिने माझा विनाकारण कट झालेला tax मिळवून दिला होता, माझं जराजीर्ण झालेलं pancard रिन्यू करून दिलं होतं आणि बरंच काही!

"हलो"
"हाय बच्चा!"  कायपण नाव ठेवलं होतं माझं! बच्चा!
"काय करतेयस गं?"
"कुछ नही..लंच के बाद सोयी थी..अभी नींद खुल गयी थोडी देर पहले.. तू बता.."
"रिसेप्शन ला चाललो होतो कात्रज च्या जैन मंदिरात.... एका मित्राचं लग्न झालंय. तुमच्यातलाच आहे...मारवाडी. येणारेस?" मी आपलं विचारायचं म्हणून विचारलं..
"ए मी मारवाडी नाहीये हां.. जैन आहे. आणि तो पण जैनच असणार.. आणि तू मला न्यायला येशील?"
मी अवाक! "म्हणजे तू येणारेस?"
"येते ना.. आय लाईक सच फंक्शंस .."
मी गुपचूप तिला आणायला गेलो.. ही बया सजून धजून तयार!!
"अग ए.. लग्न माझ्या मित्राचं झालंय!! तुझं नाही.."
" जैन आहे म्हणालास ना? तिथे असचं जाव लागतं. and व्हॉट इज धिस?.. जीन्स? यू गॉन mad ऑs व्हॉट? चेंज कर पहिलं.."
" ए तू नको येऊ हव तर पण मी असाच जाणार आहे"
"गपचूप बाईक ने तुझ्या flat कडे आणि चेंज करून ये. मी खाली वाट बघते."
इलाज नव्हता! स्वतःच्या पायावर मी कु-हाड मारून घेतली होती!!
...रिसेप्शन नंतर मित्राने स्वतः फोन करून मी नक्की लग्न वगैरे केलं नाहीये ना त्याची खातरजमा करून घेतली!!

ती माझी tax कन्सलटन्ट झाली,इन्व्हेस्टमेंट advisor झाली,माझी fashion डिझायनर झाली, मी गाडीमुळे प्रॉब्लेममध्ये असताना माझी ड्रायव्हर सुद्धा झाली.. "मैत्री" हा शब्द अपुरा वाटायचा आमच्या नात्याला. तिला बॉयफ्रेंडही होता. अगदी प्रेमळ -म्हणजे तिच्यासाठी! माझ्याशी पण बोलायचा तिच्या फोनवरून. मी त्याला निरुपद्रवी वाटत असेन कदाचित! आम्ही कित्येकदा भेटायचं ठरवलंही होतं पण तो योग जुळून आला नाही. आमचा संपर्क असायचा तो तिच्याच थ्रू. त्याला अगदी बित्तंबातमी असायची; कुठे काय खरेदी केली इथून कोणता पिक्चर पाहिला आणि तो कसा आहे  इथपर्यंत. "सगळं सांगते मी त्याला.. आयेम गोन्ना बी हिज बेट्ट हाफ" हे वरून!! पण नंतर मला त्याची सवय झाली होती. मीही तिच्या जीवनात काही भूमिका निभावल्या पण त्या तेवढ्याश्या कृशुअल नव्हत्या. तिचं सगळं व्याख्यान ऐकून घ्यायचं. सल्ले द्यायचे, तिची गुपितं ऐकून ती विसरून जायची," मिटवलंच पाहिजे नाहीतर ही ब्याद माझ्या गळ्यात पडायची" असं जाहीर करून बॉयफ्रेंडशी भांडण झालं की मिटवायचं.अमका कसा हिच्याशी फ्लर्ट करतो, तमकी कशी हिच्याबद्दल जेलस फील करते वगैरे तिच्या न पाहिलेल्या इतर मित्र-मैत्रिणीविषयीच्या कागाळ्या ऐकायच्या इत्यादी इत्यादी.

कमला नेहरू पार्क हे तिचं आवडतं ठिकाण. कॉलेज, ऑफिस आणि हॉस्टेल यापैकी कुठे ती नसेल तर मोस्ट ऑफ द टाईम्स ती तिथे असायची.
"के एन पी पे हूँ.. आ रहा है क्या चाय पिलाने??" तिचा फोन यायचा.
मुलीने दिलेलं आमंत्रण कोणी टाळतं का? "आलोच.." हे माझं उत्तर असायचं आणि कृतीही! उभ्या उभ्या तिथला बासुंदीयुक्त मसाला चहा पीत मी तिच्या गोष्टी ऐकत राहायचो आणि तिला उगीच सल्ले देणं, तिच्या बोलण्याला उगीचच response देणं वगैरे गोष्टी करायचो. कमला नेहरू पार्क ला गेल्यावर आपल्या बरोबर असणा-याच मुलीकडे सोडून इतरत्र नजर न वळवणा-या मुलाने फार फार कठोर तपश्चर्या वगैरे केलेली असली पाहिजे असं माझं (वैयक्तिक असलं तरी) ठाम मत आहे!! तिच्या हे लक्षात यायला फार वेळ लागायचा नाही.हातावर चापटी बसली की ग्लास हिंदकळायचा.
"थांब गं!चहा सांडेल ना!!"
"लक्ष कुठेय तुझं ?"
"तुझ्याकडेच आहे.. काय म्हणालीस ते सांगू का ?"
"कान असतात माझ्या बोलण्याकडे.. डोळे कुठे भिरभिरतायत ते विचारत्येय.."
मी लाचार हास्य चेह - यावर आणायचो.. दुसरं काय करणार??
"आटप पटकन,या दत्त मंदिरात जाऊन येऊ.. चांगले विचार तरी येतील तुझ्या मनात!" तिचं हे भाबडं मत होतं आणि "सब लडके एक जैसे होते है" हे पालुपद! मी तिच्यामते कोणतही "गैरकृत्य" केलं उदाहरणार्थ मुलींकडे पाहणे,त्यांच्या सौंदर्याची तारीफ करणे, एखादी कमेंट (अर्थात त्या मुलीला ऐकू जाणार नाही अशा बेताने! कारण तेवढ आमच धैर्य कुठल?!) करणे वगैरे वगैरे कि हे पालुपद ती आळवायची. "चूप कर.. हे भगवान.. सब लडके एक जैसे होते है!" इत्यादी इत्यादी. आता जिथे इंद्र,मदन हे देव आमच्या "भगवान" लोकांमध्ये येतात तिथे 'भगवान'कडे तक्रार करून भागणार नाही हे या जैन मुलीला कोण समजावणार ? मी आपला तिच्या समाधानासाठी शेजारच्या दत्त मंदिरात जायचो..

माझ्या मित्रांच्या ग्रुपशी मी तिची कधी ओळख करून दिली नाही,ना तिने कधी आपल्या मैत्रिणींची इंट्रो करून दिली. तशी गरजही पडली नाही. त्यामुळे फ्रेन्डशिप डे ला वगैरे आमचे नेहमीच्या मित्रांसोबतचे कार्यक्रम आटपले की रात्री ९.३०/१० वाजता आम्ही भेटायचो. के एन पी च्या शेजारी किंवा करिष्मा गार्डन च्या इथे कॅड बी खाता खाता दिवसभरात काय केलं याचा हालहवाल एकमेकांना दिला घेतला जायचा.

ओळख जुनी होत गेली की 'अतिपरिचयात अवज्ञा' होते. 'टेकन as ग्रांटेड' अर्थात गृहीत धरलं जाणं होत जातं. यथावकाश आमचंही नातं जुनं होत गेलं. बारीकसारीक गोष्टींवरून खटके उडणे..वाद विवाद होणे या गोष्टी नवरा-बायकोत,बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड मध्येही होतच असतात.. आमच्या नात्याला तर नावच नव्हतं. तिथे तर हे होणं आलंच! शॉपिंग ला जायचं म्हटल्यावर एका पायावर तयार असणारी ती "कंटाळा आला" चं कारण पुढे करू लागली. "पिक करायला ये" म्हटल्यावर मीही "आज रिक्षा ने ये ना.. मी आताच चेंज केलंय"वगैरे सांगू लागलो. सदाशिव पेठ ते के एन पी हे अंतर मला अचानक लांब वाटू लागायचं तर रात्री ९.४५ म्हणजे तिला फार्र फार्र उशीर वाटू लागायचा. काही भांडण झालंच तर कोणा एखाद्याने माघार घेऊन समजावणीचा सूर आळवणे हे सुरुवातीसुरुवातीला व्हायचं पण त्यातली inconsistency वाढत गेली.. "मी का करू..?तुझी चूक आहे" वगैरे वगैरे

मग फायनली एका वर्षी पुन्हा फॉर्म १६ भरायची वेळ आली.तिला फोन करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी आणि माझ्या कलीग्ज चे फॉर्म्स तिला नेऊन दिले.
"पुढच्या आठवड्यात देते करून. पैसे तुझ्याचकडे ठेव. रिसीट्स दुंगी तब दे देना"
"ठीकाय, पण झाले की कळव हां नक्की! यावेळेला २० फॉर्म्स आहेत."
"हो रे.. कित्ती घाई?"
"नाही अगं. मला नाहीये.ज्यांनी दिलेत त्यांना आहे!"
"देते मग.."

आठवडा गेला.. २ आठवडे झाले.. तिचा काही रिप्लाय नाही.
"ए मुली.. कधी देणारेस?" माझा तिला कॉल!
"देते रे.. झालंच आहे.. फक्त आय टी ऑफिस ला सबमिट करायचे आहेत.दो मिनट का काम है.. करेगा क्या? "
"नको बुवा.. कर तूच..!"

होता होता महिना लोटला.. फॉर्म दिलेल्यांनी तगादा लावला..
"काय? करणार आहे ना काम नक्की तुझी ती 'मैत्रीण'? ख्या ख्या ख्या"
"आमचे व्हिसा रिजेक्ट होतील हां तिच्या नादात"
"अरे हे काम आधी कर, बाकीची नंतर"
" माझा फॉर्म परत दे.. मी दुसरीकडून घेतो करून.."
"तुझ कमिशन किती यात? ही ही ही..." अश्या कमेंट्स ऐकल्यावर माझंही डोकं गरम व्हायला लागलं.

"नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतं तुझ्यामुळे. कधी देणार आहेस ?" माझा पुन्हा कॉल..
"अरे फक्त सबमिटच करायचे आहेत आय टी ऑफिस ला. मला पण वेळ नाहीये. आणून देते. कर तू.."
"म्हणजे काय? पैसे घेतेस ना वाजवून प्रत्येक फॉर्म मागे की उपकार खात्यात करून घेतोय.... फुकट मध्ये? महिना झाला तरी 'सबमिटच करायचेत..सबमिटच करायचेत..' " मी तिला वेडावत म्हणालो..
"हे बघ मला वेळ नाही.." तिचा आवाज हळू हळू चढायला लागला होता.
"महिनाभर वाया घालवून आता सांगत्येस तुला वेळ नाही? याचा अर्थ हाच ना की तुला गरज नाहीये आता आणि तुला... " मी पट्टी तिच्यापेक्षा वर नेली.
"तुला काढायचा तो अर्थ काढ.. आएम नॉट योर मेड टू लिसन योर ऑर्डर्स .. वन मोर थिंग..."
मी फोन कट केला .. मला त्या वन मोर थिंग मध्ये अजिबात स्वारस्य नव्हत.. माझी कामं आता ऑर्डर्स वाटायला लागली काय हिला? गेली उडत!

आठवड्याभरात माझ्या नावाचं कुरियर ऑफिसच्या पत्त्यावर आलं. सगळ्यांचे 'सरळ' भरलेले 'सरळ' फॉर्म होते त्यात.. माझ्याव्यतिरिक्त!! माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. चेह-यावर पाण्याचा हबकारा मारून मी शांत झालो. इतरांचा पाहून मी माझाही फॉर्म भरला. आय टी ऑफिस ला सबमिट करायला त्यांच्यातलाच एक 'गरजू' गेला. त्याचा व्हिसा इंटरव्यू होता २ दिवसांनी! काय करतो बिचारा! तो पावत्या घेऊन आल्यावर मी त्याला काय काय केलं ते विचारलं. "काहीच नाही' हे त्याच उत्तर ऐकून मी मनातल्या मनात पुन्हा तिला आणि मग स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहिली.

त्यानंतर तिचा संग सुटला तो कायमचाच. नंतर तिची खबरबातही राहिली/मिळाली नाही, मीही पेठेतून दुसरीकडे राहायला गेलो. एकही कॉमन फ्रेंड नसल्यामुळे संपर्क पूर्णपणे तुटला.

फॉर्म १६ मुळे सुरु झालेलं नातं फॉर्म १६ मुळेच संपलं!! पण आजही जेव्हा आय टी रिटर्न्स फाईल करायची वेळ येते तेव्हा तिची राहून राहून आठवण येते आणि वाटतं एखाद्या संध्याकाळी तिचा मेसेज येईल .." गुड इविनिंग बच्चा... मै के एन पी पे हूँ.. कॅन वी मीट? व्हॉट इज योर डीनर का प्लान?"