मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

प्लेसमेंट(ल) : उत्तरार्ध

पूर्वार्ध:
…पण तसंच होतं! सुदैवाने माझं नाव त्यात होतं.. साधारण 10 15 मुलं 'हिटलिस्ट' वर होती. म्हणजे पुढच्या राउंडला तरी मासळीबाजार नसणार! पण कसचं काय! पुढचा राउंड तिसरयाच् कॉलेज ला होता आणि तिथेही 8 9 कॉलेजची पोरं होती...
--X-O-X--
"गो थ्रू दिज टू प्रोफाइल्स. द अदर पॅनेल वांट्स यू टू इंटरव्यू देम." मी प्रोफाईल्स  चाळतो. दोघांपैकी aptitude चे मार्क्स जास्त  आहेत त्याला मी बोलवतो. चेहरा बघितल्यावर मला ग्रुप डिस्कशन चा राउंड आठवतो. हा पोरगा बोलतो फर्मास! एकदम टू  द पॉइंट! बघू काय सांगतो ते.
" प्लीज"   मी खुर्चीकडे हात दाखवून त्याला बसायला सांगतो आणि त्याचा रेझुमे चाळायला लागतो.
इंटरव्यू सुरु होतो. त्याचा कॉन्फीडंन्स हा ओवरकॉन्फीडंन्स नाहीये ना हे चेक करणारे, काही ऑनलाईन न मिळणारे ट्रीकी क्वेश्चन्स, काही तयार केलेली पझल्स मी त्याला विचारतो. बाकीच्यांना विचारली तशीच पण तीच नाही. न जाणो आधी बाहेर गेलेल्यांना याने काही विचारलं असेल तर! कारण मीही तेच करायचो!!
कॉलेजला गेलो तर हीssss  गर्दी! आमच्या कंपनीच्या पुढच्या राउंडसाठीच शंभरएक जण! मी अवाक!! च्यायला हि सगळी पोरं त्या त्या कॉलेज ची शॉर्टलिस्टेड पोरं असणार. दहा कॉलेजेस जरी असली तरी झाले कि शंभर. मी आवंढा गिळला. कंपनी दहा-पंधरा लोक घेईल अशी सुरुवातीला अटकळ होती पण अख्ख्या  युनिवर्सिटीतून दहा पंधरा घेईल असा कोणी अंदाजच बांधला नव्हता.
"ऐसा कोई करता है  क्या? कुछ राउंड एक तरफ  बाकी के राउंड दुसरी तरफ! हमारे कॉलेज  के कुछ लोग तो  आयेही नही" तरीपण इतकं पब्लिक होतं! जास्त पब्लिक म्हणजे जास्त कॉम्पीटिशन असा साधा सरळ हिशोब होता.
"हि पहिलीच कंपनी असं  करणारी"
"नवीन ट्रेंड सेट करतायत,दुसरं काही नाही"
आमच्या टी पी ओ ने सांगितलं कि आता सिम्पोजिअम होणारेत. मी कधीच हा प्रकार actively केला नव्हता. पण आता काय आलिया भोगासी असावे सादर!!
दहा दहा चे ग्रुपस करून चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. जो जी चिठ्ठी उचलेल त्याने त्या विषयावर आपल्या ग्रुप मधल्या उरलेल्या नऊ  जणांना ३ मिनिटांत आपले विचार सांगायचे आणि उरलेल्या ७ मिनिटात ते जे काही प्रश्न विचारतील त्यांची उत्तर देऊन चर्चा करायची असा तो प्रकार होता.
आमच्या ग्रुप च्या सगळ्यांचं आटपायला दोन-अडीच तास लागले. यातून निवडले जाणाऱ्यांचेच इंटरव्यू होणार होते. सिम्पोजिअमचे निकाल कन्सोलिडेट होऊन यायला तासभर लागला. ज्यांची नावं पुकारली जात होती ती मुलं मांदियाळीतून निघून आतल्या हॉल मध्ये जात होती.तेवढ्यात…. माझ्या नावाचा पुकारा झाला!
--X-O-X--
मी मान वर करून बघितलं. आमची एच आर पर्सन मलाच हाक मारत होती. "वि नीड टू  डिक्लेअर रिझल्ट्स बिफोर फाय… कॉलेज  स्टाफ साडेपांच बजे निकाल जाता है. धिस इज द लास्ट वन. शाल आय सेंड हर इन?"
"डू  आय have अ चॉईस ?" मी विचारल्यावर ती हसून शेवटच्या उमेदवाराला बोलावते.
"बी कम्फर्टेबल! लेट्स बिगीन विथ योर इंट्रोडक्षन.."
" माय नेम इज…. "
एक कान तिकडे ठेऊन मी परत बारकाईने तिचा सी व्ही वाचू लागतो.
" यू  have  स्कोर्ड गुड मार्क्स इन टेन्थ as  वेल as , व्हॉट  वेन्ट  रॉंग  इन इंजिनियरिंग?"
"एक्चुअली माय  मदर एक्स्पायर्ड व्हेन आय वॉज इन स्कूल…"
तिच्या पेरेंट्स पैकी  कोणीतरी एक तिच्या लहानपणीच वारलेलं आहे हे त्याच्या कौटुंबिक माहितीवरून कळलं परंतु इंजिनियरिंगच्या चारही वर्षांचे मार्क्स कमी असण्याशी त्याचा काय संबंध? सहानुभूती मिळवायला बघतेय का ही ?
--X-O-X--
 हृदयातली धडधड थोडी मंदावली. आता शेवटचा मुलाखतीचा राउंड. माझा आतापर्यंत वीक ठरलेला पॉइंट. केबिन मध्ये बसलेले ३ जण इंटरव्यू घेंत होते. एकामागोमाग एक मुलं आत जाउन बाहेर येत होती. काही दहा मिनिटात, काही वीस तर काही अर्ध्या अर्ध्या तासानंतर!  माझं नाव पुकारलं गेलं. साधारण १० -१५ मिनिटं प्रश्नोत्तरं  झाली. मी बाहेर आलो. इंटरव्यूअर्स च्या मनाचा थांग घेऊन आडाखे बांधणं कठीण होतं असं एकंदरीत जाणवत होतं. असो जे होईल ते होईल असा विचार करून मी बाहेर पडलो. संध्याकाळी ५ वाजता रिझल्ट जाहीर होतील असं  सांगण्यात आलं होतं. माझी मुलाखत पहिल्या काही मुलातंच असल्याने मला साधारण ४ तास घालवायचे होते. सकाळपासून या कॉलेज मध्ये इकडेतिकडे पळापळ करून वैताग आला होता. ४ तास करायचं तरी काय? माझ्या कॉलेजची  जी पोरं होती त्यापैकी मोजकीच उरली होती, त्यात माझ्या ओळखीचं असं  कोणीच नव्हतं. सिलेक्ट कि रिजेक्ट ते कळायला थांबायलाच हवं होतं.  शेवटी जवळच्याच एका मल्टीप्लेक्स मध्ये गेलो आणि जो लगेचचा शो होता त्याचं  तिकीट काढून जाऊन बसलो!. नको ती विचारचक्र आणि नको ती तगमग! निदान हा थोडा वेळ तरी डोक्याला शॉट नाही. सिनेमा संपला मी बाहेर आलो आणि परत कॉलेजमध्ये गेलो तर कळलं कि अजून प्रोसेस चालूच आहे!! आज निकाल लागण्याची शक्यता शून्य पूर्णांक शून्य शून्य एक इतकी आहे! तसाही एवढ्याश्या शक्यतेसाठी जीवाला त्रास करून घेणारा मी नव्हतो. सिलेक्ट झालो तर उद्याही कळेल पण इथे थांबून रिजेक्ट झालो तर परतीचा प्रवास सुद्धा कंटाळवाणा होणार. उरलेली संध्याकाळ आणि रात्र बोंबलणार ते वेगळच! मी सरळ कलटी  मारली आणि अर्ध्या तासात घरीसुद्धा आलो!
--X-O-X--
"अगर मै हिंदी मी बोलू तो चलेगा क्या?"
" मुझे शायद चलता मगर हमारी कंपनी जिन क्लायंट्स के लिये काम करती है उन्हे हिंदी नही समझती!"
"ok सर, आय विल टॉक इन इंग्लिश"
"शाल वी  प्रोसिड?"
मुलाखत पुढे चालू होते. अभ्यासाव्यतिरिक्त केलेल्या कामांची माहिती, काही कार्यक्रमांमधला सक्रिय सहभाग, अनुभव या अनुषंगाने गाडी पुढे पुढे सरकतच राहते.
--X-O-X--
एक सिम्पोजिअम, एक इंटरव्यू, एक सिनेमा  आणि जाण्यायेण्याचा ट्राफिकमधला मोठ्ठा प्रवास एवढा दिवसाचा हिशेब जमवून मी बेडवर पडलो. कॉलेजमधल्या दिवसांत एका दिवसात एवढं काम खूपच होतं! तेवढ्यात माझा फोन वाजला.
"अरे कुठे आहेस तू? तुझं नाव घेतलंय इकडे" दबक्या आवाजात पलीकडला बोलला
"कोणी?"
"अरे कोणी काय कोणी? तू सिलेक्ट झाला आहेस!" परत दबका आवाज आला
"क्काय??" मी जवळजवळ ओरडलोच "नक्की?"
"मग मी काय उगीच सांगतोय. तू ये इकडे पुढचा एक राउंड आहे बहुतेक."
"अरे काय चाललंय यांचं? डायरेक्ट म्यानेजर निवडतायत  कि काय?" मी वैतागलो
"अरे आता वीस पोरं सिलेक्ट केली आहेत, पण त्यांना सगळ्यांना भेटायचं आहे"
"पण मी परत आलोय आता"
"मग काय झालं ये परत  इकडे"
"पण मला अजून अर्धा तास….  "
"बघ बाबा काय ते… मी सांगायचं काम केलं"
"प्लीज त्यांना सांग मी अर्ध्या तासात पोचतो"
"बरं मी सांगतो पण फक्त इन्फर्म करणार हां मी, कन्विन्स नाही"
"thanks मित्रा! पोचतोच मी "

पुढच्या वीस पंचवीस मिनिटात एका एकदम जवळच्या मित्राने बहुतेक "हि नोकरी मिळाली नाही तर मी आयुष्यातून उठणार" असा समज करून घेऊन अतिशय धोकादायक पद्धतीने बाईक चालवत मला त्या कॉलेज मध्ये पोचवलं! पुढचा राउंड  सुरु झाला होता.
"व्हेअर वेर यू ?"
"सर वन ऑफ माय फ्रेंड मेट विथ an accident! "  युद्धात, प्रेमात आणि आता प्लेसमेंट मध्ये सगळं माफ असतं अशी मी समजूत काढून घेतली आणि धडधडीत खोटं बोललो! "वी admitted हिम इन दीनदयाळ हॉस्पिटल. आय had  टू  चेंज क्लोथ्स  and  कम " मला कपडे बदलून यावं लागलं असं  मी माझ्या त्यावेळच्या इंग्रजीनुसार भाषांतरित करून सांगितलं. खोटं खोटंच!
"ओह, हाऊ  इज हि नाऊ?"
"नाऊ  हि इज ओके सर"
"ओके, वि had गीवन अ पझल टू  एवरीवन फिफ्टीन मिनिट्स back. नाऊ  सीन्स यु आ हिय, यु कॅन टेक धिस challenge बट  यू  have  टू  सीट इन  द केबिन, यू वील गेट थर्टी मिनिट्स"
"ओके सर" दीर्घ निश्वास सोडून मी केबिन मध्ये बसलो. कोडं सुटायला साधारण पाच मिनिटं लागली!  मला वाटलं काहीतरी चुकलं कि काय!! पुढची पाच मिनिट मला दुसरं काही सुचत नाही म्हटल्यावर मी पेपर परत द्यायला बाहेर गेलो.  त्यांनी  माझं उत्तर  पाहिलं…
"डिड  यू नो धीस अल्रेडी ?" क्लासरूम मधली बाकीची पोरं गेला अर्धा पाउण  तास झगडत होती आणि मी पाच मिनिटात उत्तर काढलं यामुळे  मी कुठून तरी कॉपी पेस्ट केलं कि काय अशी शंका येउन त्यांनी विचारलं.
"नो सर." मी माझं लॉजिक त्यांना समजावून सांगितलं. सक्सेसफुली!!
वीसपैकी चौदा मुलं सिलेक्ट झाली! माझं नाव माझ्या कानांवर पडलं तेव्हा शरीरावरचा भार उतरून शरीर एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं!!
--X-O-X--
प्रोजेक्ट manager ने एक छोटेखानी भाषण केलं. सगळीच मुलं कशी चांगली होती परंतु आम्हाला काहींनाच चान्स देता येईल वगैरे वगैरे! समोर वाट बघणाऱ्या मुलांना त्यात काडीमात्र इंटरेस्ट नव्हता परंतु आम्हाला मान द्यायचा म्हणून मान हलवत होती ती बिचारी! एच आर ची ऑफर लेटर्स तयार होऊन हातात येईपर्यंत भाषण चाललं.  थोड्याच वेळात सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं पुकारली गेली. एकेका  नावाबरोबर जल्लोष होत होता. २ panels ची मिळून ६ नावं जाहीर झाली. बाकीच्यांचे चेहरे पडले. सिलेक्ट झालेल्या मुलांनी येउन आमच्याशी हात मिळवले. मग त्यांच्याबरोबर पुन्हा एक छोटेखानी फोटोसेशन.
--X-O-X--
ऑफर लेटर हातात आलं. मी मोकळा श्वास सोडला! झालो एकदाचा सिलेक्ट!! केवढं ओझं उतरलं डोक्यावरचं… आता यापुढे कसली हुरहूर नाही कि जीवाला घोर नाही. कॉलेज  संपेपर्यंत आता नाटक, आर्ट  सर्कल आणि जमेल तसा अभ्यास. इंटरव्यू तर इतक्यात द्यायचाच नाही आयुष्यात! उशिरा का होईना प्लेसमेंट झाली तीसुद्धा कॉलेज मधल्या हायेस्ट पेयिंग कंपनीत. देर आये मगर दुरुस्त आये… या आधीची रिजेक्शन्स, टोमणे, माझ्या क्षमते विषयी घेतल्या गेलेल्या शंका एका क्षणात विसरून गेलो होतो मी.  आता होता निखळ आनंद. जो होता है अच्छे  के लिये होता है. घरी फोन करून कळवलं…आता रात्री मित्रांबरोबर पार्टी!!
--X-O-X--
कॉलेजच्या टी पी ओ नी  आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आटोपताच आम्ही सगळे बाहेर पडतो. चला! इथला प्लेसमेंटस चा खेळ आटोपला. आता नवीन कॉलेज ,नवीन मुलं . हातातला ब्लेझर गाडीत ठेऊन, टाय मोकळा करत मी गाडीत बसतो. कॉलेजमधून बाहेर पडता पडता गाडी स्लो करून मी मागे वळून कॉलेजकडे पाहतो… माझा मीच दिसल्याचा मला भास होतो. याच कॉलेजमध्ये, नऊ वर्षापूर्वी झालेल्या एका कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळालेलं ऑफर लेटर घेऊन, याच वाटेवरून गेटकडे धावणारा!