बुधवार, ५ डिसेंबर, २०१२

हुंकार



रस्त्यावरून एक स्मॉल कार मार्गक्रमणा करत होती. गाडीच्या आय पी वरच्या घड्याळात रात्रीचे ११ वाजले होते. रस्ता फक्त नावाला डीस्ट्रीक्ट हायवे. रुंदीला छोटासाच. नुसता म्हणायला दोन पदरी. समोरून ट्रक आला तर गाडी आधीच जेमतेम असणा-या टार रोड वरून खाली उतरवावी लागणार हे नक्की! पण सुदैवाने रस्त्याला कोणीच नव्हतं.

ना ट्राफिक, ना वर्दळ, ना वस्तीची चिन्ह. गाडी चालवणा-यासाठी म्हटलं तर चांगलंच पण काही विपरीत घडलं तर मदतीसाठी सुद्धा कोणी येणार नाही अशी जागा!

शक्य तितक्या लवकर आपापली घरं गाठायची असा चौघांचाही प्लान होता.. आशू, सॅम, अन्या आणि पमू.. पैकी पमू एकटीच मुलगी. हायवे चा कंटाळवाणा रस्ता सॅम ने काटल्या नंतर स्टीअरिंग व्हीलचा ताबा आता खडतर रस्त्यांचा राजा म्हणजेच अन्याकडे आला होता. हायवे सोडून या मधल्या रस्त्याने घुसायची आयडिया आशूची.. मुलखाचा फट्टू! निघाल्यापासूनच 'बारा वाजायच्या आत घर गाठायचं' हा धोशा घेऊन बसलेला.. आता सगळ्यांनाच माहित होतं कि सरळ रस्त्याने गेलं तर बाराच काय तर रात्री दीड वाजला तरी पोहोचणं शक्य नव्हतं. एकवेळ गाडी फास्ट नेता येईल पण टोल नाक्याची गर्दी जाम टंगवते! पण आशूने गुगल map मधून एक नवाच रस्ता शोधून काढला होता. 'डीस्ट्रीक्ट हायवे' असा उल्लेख असल्यामुळे बाकीचे लोक सुद्धा जायला तयार झाले. तेवढाच एक नवा रस्ता कळेल आणि लवकरसुद्धा पोचता येईल असा सगळ्यांचा कयास होता.

पण एकंदरीत रस्ता बघितल्यावर त्याला हाय वे म्हणायचे कि नाही असा प्रश्न पडला होता. सुरुवातीचा थोडा रस्ता चांगला होता. नंतर आनंदीआनंद होता. मुख्य हाय वे पासून दहा एक किलोमीटर पर्यंत वर्दळ होती कारण तिथे एक गाव होतं. तिथपर्यंत माणसांची चाहूल तरी होती.आता तर ते पण नव्हतं.. रस्ता जास्त वाहतुकीचा नव्हता त्यामुळे फारसा खराब नव्हता पण त्यामुळे आपसूकच रस्ता जिथे खराब झाला होता तिथे दुरुस्त करायचे कष्टही घेण्यात आले नव्हते. चांगला रस्ता; मधेच एक खराब patch अशी परिस्थिती होती..

गप्पांचे विषय संपले नसले तरी बडबड करायचा कंटाळा आला होता. सी डी प्लेयर वर तीच तीच गाणी ऐकून सगळ्यांचा जीव जाम वैतागला होता. रेडीओ कोणताही सिग्नल रिसीव्ह करत नव्हता. गाडीची काच ओपन केली तरी घुसणा-या वा-याचा आवाज भीतीदायक वाटत होता. आणि काचा बंद केल्यावर सगळ्यांनाच गाडीतली शांतता भयाण वाटत होती.

" ए काहीतरी टॉपिक काढून बोला ना रे.. मला भीती वाटतेय शांततेची" पमू म्हणाली
"हो रे.. " आशूने अपेक्षेप्रमाणे दुजोरा दिला.
" तासाभरात पोचू काय रे... ? अमानवी वेळ सुरु व्हायच्या आत पोचलो तर बरं.." तो पुढे म्हणाला..
"ए .. असलं काहीतरी बोलणार असलास तर शांत बसलेलं बरं.. आधीच बाहेरचं वातावरण हे असं त्यात हा असले शब्द वापरतोय.."
"तर काय.." सॅम ने आशूला टपली मारली
"मग काय? ए, पण तुम्हा लोकांना हा रस्ता जरा जास्तच सुनसान वाटत नाही काय रे ? " अन्या विचारायला लागला.
"तुला आणि पमूला तरी समोर गाडीचे लाईट्स दिसताहेत, आम्हा दोघांना मागच्या सीट वरून फक्त काळोख आणि काळोखच दिसतो आहे."
"आणि कित्ती झाडं ही?" पमूने म्हटलं..
"गाणी तरी लावा.. असं एकमेकांना घाबरवत राहण्यापेक्षा ते तरी बरं.." -आशू
"हो आणि तेवढाच आवाजही होत राहील.. " पमूने री ओढली
"कसले फट्टू आहात रे दोघेपण.." अन्या म्हणाला आणि टाळीसाठी त्याने हात मागे-सॅमकडे नेला..

पमू ने सीडी प्लेयर ऑन केला. गाडीचं panel झळाळून उठलं.
तेवढ्यात अन्याने डोळ्याच्या कोप-यातून उजवीकडच्या खिडकीत बघितलं आणि तो गडबडला.
अचानक त्याने स्टीअरिन्ग व्हील डावीकडे वळवलं आणि क्षणार्धात परत सरळ केलं.
बेसावध असणा-या बाकीच्या तिघांचाही तोल गेला.. सॅम आणि पमू गाडीच्या विंडो ग्लासेस वर आपटले तर आशू सॅमवर!

"अरे हळूsss"
"सॉरी गाय्झ, खिडकीत बघितल्यावर मी दचकलो.."
"क्काय? काय दिसलं तुला?"
" मला वाटलं कोणीतरी तिकडून आलं कि काय.."
"... " त्याच्या या वाक्याने एका क्षणात सगळ्यांची हवा गुल झाली नसती तरच नवल!
"अक्चुअली या टेप panel च्या लाईट्स चं रिफ्लेक्शन पडतंय न काचेत.. मी तिकडे बघत होतो. इतक्यात बहुतेक इकडे पमूने आवाज वाढवायला हात फिरवला. त्यामुळे मला भास झाला कि कोणीतरी आलं कि काय या बाजूने.."
"कित्ती घाबरवलंस आम्हाला"
"डोन्ट वरी या..."
"अरे अरे अरे... समोर बघ.."

एक रस्त्याचा अतिप्रचंड वाईट patch अचानक समोर आला होता. गप्पा मारण्याच्या गडबडीत अन्याचं लक्ष हटलं होतं तेवढ्यात हा खराब रस्ता आला होता. स्पीड मधून गाडी स्लो करे-करेपर्यंत एका प्रचंड खड्ड्यातून गेलीच! मोठ्ठा आवाजही आला.. पुढच्या बाजूचा बम्पर रस्त्याला घासला असणार यात शंकाच नव्हती!! एकापाठोपाठ एक चिकटून चिकटून असे खड्डे होते की स्टीअरिन्ग चाकांना कंट्रोल करण्याऐवजी चाकं स्टीअरिन्गला कंट्रोल करत होती.. निदान असं वाटत तरी होतं... कारण पहिल्या दणक्यानेच अन्याचा डावा हात व्हीलवरून सटकला होता. गियर शिफ्ट करायलाही वेळ न मिळाल्यामुळे अपेक्षेप्रमाणेच काही अंतरातच आचके देऊन गाडी बंद पडली होती..सगळेजण शिव्या घालायला लागले..

अन्याने गाडी पुन्हा चालू करण्याआधी सवयीप्रमाणे दिवे, एसी आणि टेप बंद केला.. स्टार्टर मारण्याआधी त्याच्या कानाने एका आवाजाचा वेध घेतला. कोणीतरी गुणगुणत होतं..
हुं...हुं...हुं...
एका संथ लयीत.. त्याने दुर्लक्ष केलं आणि स्टार्टर मारला..
...पहिला प्रयत्न फेल गेला.. त्याने पुन्हा एक अटेम्प्ट केला ... आवाज करून गाडी बंद पडत होती..
अजून एक प्रयत्न आणि...आणि काही फारस भयप्रद न घडता तिस-या प्रयत्नात गाडी चालू झाली..

पुन्हा तोच रस्ता.. तीच स्मशान शांतता.. पण तो आवाज सुद्धा.. हुंकार भरल्यासारखा!!
"ए तुमच्यापैकी कोणाचा मोबाईल वाजतोय का ?"
"माझा नाही बुवा" -पमू
"माझापण नाही" -आशू
"माझाही.. पण का रे?" -सॅम
"तुम्हाला कोणाला गाण्याचा आवाज येत नाहीये का? मोबाईलच्या स्पीकर वर काहीतरी उशी वगैरे ठेवली की त्याचा आवाज बाहेर पडू शकत नाही त्यामुळे येतो ना ? तसा.. किंवा सायलेंट मोड वर असताना फोन कसा वाजतो ? तसा... कोणाचा सेल खाली पडलाय का बघा जरा लाईट लावून.." अन्या जास्तच खोलात शिरायला बघत होता..
"आमचे सेल्स आमच्या खिशातच आहेत आणि तुझा तिथे dash बोर्डवर" पमुने म्हटलं
हुं...हुं...हुं...हुं...
"ए होय रे मला पण येतोय ..बहुतेक कुठेतरी लांबवर गाणी चालू असतील लाउड स्पीकर वर" आशू म्हणाला.
काही क्षण शांततेत गेले..
हुं...हुं...हुं...
आवाज येतच होता ..

"पण बाहेरचा आवाज गाडीत कसा काय येईल?"
"आपण मगाशी दाणकन आपटलो त्यामुळे गाडीचं काही निखळलं नाही ना?"
"मलापण मगाशी तीच शंका आली... पण इतका बारीक आवाज नाही येणार आणि तो पण असा गुणगुणल्यासारखा.." खिडकीची काच जराशी खाली करत अन्या म्हणाला.. " बघ वा-याचा आवाज आला कि तो आवाज बंद होतो.. निदान ऐकू तरी येत नाही!" त्याने काच बंद केली..
हुं...हुं...हुं...हुं...हुं...हुं...

आता सगळ्यांना तो आवाज स्पष्ट पणे ऐकू येत होता.. सगळ्यांची तंतरली होती..
"नक्कीच हा आवाज लाउड स्पीकर वरच्या गाण्यांचा नाहीये.. नाहीतर इतका वेळ येत राहिला नसता." सॅम म्हणाला
"हो आणि मगाशी काच खाली केली तेव्हाही ऐकू आला नाही..फक्त वा-याच्याच आवाज येत होता" अन्या ने अनुमोदन दिलं..
हुं...हुं...हुं...हुं...
"जरी तो तसा असता तरी आता आपण बरेच किलोमीटर्स पुढे आलो आहोत आणि आवाज तर इतक्या जवळून येतोय.."

रस्त्यात परत खड्ड्यांचा patch आला.. अन्याने कचकावून ब्रेक्स लावत ३ सेकंदात गाडी १० च्या स्पीडवर आणली. कशामुळे तरी पमू दचकली आणि पाठोपाठ हात जोरजोरात झटकत तिने जोरात किंकाळी फोडली.. आणि पाय उचलून सीटवर घेतले.. तिच्या किंकाळीने सगळ्यांचे धाबे दणाणले!

"काय झालं अगं?" अन्याने विचारलं
पमूने डोळे गच्च मिटून घेतले होते.
"अगं बोल ना..." सॅम म्हणाला
"इथून पटकन लांब चल.."
"अगं पण झालं काय?"
"या खिडकीतून कोणीतरी माझ्या हातावर उडी मारली.. आणि नन्तर गाडीत.. म्हणजे आता 'ते' गाडीत पडलंय.."
"अन्या.. पटकन गाडी पळव आणि वस्तीच्या ठिकाणी घे.. " आशूची प्रॉपर फाटली होती!!

हुं...हुं...हुं...हुं... आवाज चालूच होता!

" गप रे.. " सॅम म्हणाला.. " अन्या आरामात चल.. नाहीतर स्पीडच्या नादात आपटायचो कुठेतरी...आणि काय ग पमू" पमूकडे वळत सॅमने विचारलं "खिडकी तर बंद आहे.. कोणी आणि कसं काय उडी मारू शकतं तुझ्यावर?"
पमू आता भानावर आली.. "काय? खिडकी बंद आहे?" तिने लाईट लावला.. टिश्यू पेपरचा बॉक्स खाली पडला होता. अन्याचा अचानक लावलेल्या ब्रेक्स मुळे तो panel वरून घसरून पमूच्या हातावर पडला असावा.. आणि ती घाबरली..

मघापासून कानाचा ठाव घेणारा तो हुंकार आता काळजाचा ठाव घेत होता..बाकीच्या आवाजांना ओवरराईड करून आता फक्त तोच आवाज येत ऐकू येत होता.. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी..

"ए थांबून बघूया तरी का कसला आवाज आहे ते?"
"ए.. नको हां.. अंधा-या रात्री अनोळखी ठिकाणी नको थांबू.." आशू.
"पण हाच आवाज गाडीचा काळ ठरायचा आणि जबरदस्तीने थांबावं लागायचं.." सॅम म्हणाला..
"हो बरोबर आहे.. मी गाडी बाजूला घेतोय.."
"जरा पुढे चल ना.. पुढे तो बोर्ड दिसतोय तिथे..तिथे रस्ता असेल. म्हणजे काहीतरी वस्ती असेल" सॅम ने सुचवलं.
अन्याने गाडी हळू केली.

हुं...हुं...हुं...हुं... चा आवाज जास्तच स्पष्ट येऊ लागला..
बोर्डच्या जवळून रस्त्याला एक फाटा फुटला होता. बोर्डवर गावांची नाव लिहिली होती..
अचानक पमू पुन्हा ओरडली..
"ए चला इथून .. चला पटकन.. हीच जागा मिळाली होती तुम्हाला थांबायला..?" तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत प्रश्न विचारला..
"काय झालं काय पण? अन्याने विचारलं..
"त्या बोर्ड वर काय लिहिलंय ते वाच"
सॅम आणि अन्याने बोर्ड वाचताच क्षणभर त्यांची पण टरकली! फाट्याच्या दिशेने दिशादर्शक बाण दाखवून
त्यावर लिहिलं होतं.. 'भूतलवाडी' !!!
आशू गर्भगळीत झाला होता..

"ए .. पमू चं म्हणणं बरोबर आहे.. निघू आपण लगेच इथून" काप-या आवाजात तो बोलला..
"मुळीच नाही.." गाडीचं इग्निशन बंद करत अन्या ठामपणे म्हणाला.. "भित्यापाठी ब्रम्ह राक्षस म्हणतात तो असा . ती 'भूत'ल'वाडी' नाहीये तर 'भू'तल'वाडी' आहे...भू म्हणजे जमीन.. तल ..म्हणजे सपाट किंवा तळ यापैकी काहीतरी पण 'भूताशी रिलेटेड नक्कीच काही नाहीये.."
आवाज अजूनही येत होता.. हुं...हुं...हुं...हुं...
"गाडीचं  इंजिन बंद आहे.. टेप बंद आहे.. रेडीओ बंद आहे.. कोणाचाही मोबाईल वाजत नाहीये.. मग हा आवाज कसला असेल?" अन्याने मागे वळून सॅमला विचारलं..
"सॅम.. काय असेल रे .?"
"काहीच कळत नाहीये रे..." सॅम म्हणाला.. त्याचा पण धीर हळू हळू सुटत चालला होता..
"मला तर वाटतंय आपल्याला भुताने पद्धतशीर सापळ्यात अडकवलंय " काप-या आवाजात आशू म्हणाला.
"अन्या..चल ना रे इथून..मला खूप भीती वाटतेय.." पमूने दुजोरा दिला..

तेवढ्यात मागून एका गाडीच्या फ्लड लाईट्सचा झोत गाडीत पडला.. चौघांच्याही जीवात जीव आला. तरीही आशूने शंका काढली.. " ए.. कशावर भरवसा ठेवू नका.. इल्युजन असेल.. !! तू गाडी स्टार्ट कर आणि निघ.." गाडीचा प्रकाश पडला तरी हुंकार ऐकू येतच होता. त्यात अजिबात चलबिचल नव्हती. त्या आवाजाच्या निर्मात्याला मागून येणा-या गाडीच्या अस्तित्वाचा काहीच फरक पडला नव्हता..

सॅमने मागच्या काचेतून गाडीच्या फ्लड लाईट्स कडे पहिलं.. मग काचेकडे पाहिलं आणि तो ओरडला....
"हे बघा भू sssss त..!!!"
पमूने डोळे गच्च मिटले .. आशू ने तिकडे मान न वळवता हनुमान चालीसा गुणगुणायला सुरुवात केली.
अन्याने मागे वळून बघितलं.. नन्तर सॅम कडे बघितलं आणि दोघेही खळखळून हसायला लागले ..
दोघांच्या हसण्याचा आवाज ऐकून पमूने डोळे उघडले.. आशुने स्तोत्र थांबवलं .. दोघांनीही माना वळवून मागे पाहिलं...

...त्यांच्याच गाडीच्या त्या काचेवर रियर वायपर फिरत होता.. एका संथ लयीत..

पहिल्यांदा आपटलेल्या खड्यात जेव्हा अन्याचा डावा हात व्हीलवरून स्लीप झाला होता तेव्हा स्टीअरिन्गशेजारी असणारं वायपरचं लीवर खाली झालं होतं. त्यामुळे त्याच्या आणि इतरांच्याही नकळत गाडीचा रियर वायपर चालू झाला होता.

सुक्या काचेवर पाण्याशिवाय घासणारा त्या वायपरचा रबर एका लयीत आवाज करत होता....
हुं...हुं...हुं...हुं... !!!!

मी मराठी लाईव्ह दैनिकाच्या 'ब्लॉगांश' सदरात प्रकाशित