मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

परवाना करी दिवाना :उत्तरार्ध

पूर्वार्ध: 

सेक्रेटरीएट ऑफ स्टेटच्या ऑफिस मध्ये एका भल्यामोठ्या रांगेत पब्लिकची कागदपत्र चेक करण्यात येत होती. हि रांग ऑफिस मधूनही बाहेर आली होती. नशिबाने मी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली असल्याने मला त्या रांगेतून माझा नंबर येईपर्यंत वाट बघत राहावी लागली नाही. लाइनमधल्या कित्येकांना हे ऑनलाईन अपॉईंटमेन्ट वगैरेचं प्रकरण माहितीही नव्हतं त्यामुळे अमेरिकन जनता सुद्धा आधुनिकतेपासून दूर असू शकते हा साक्षात्कार झाला. सरकारी ऑफिसात धक्काबुक्की, घुसाघुसी आणि वादावादी न करता रांगेत उभं राहिलेलं पब्लिक आणि आपल्याला समजेल इतक्या वेगाने पुढे सरकणाऱ्या रांगा हा मात्र निर्विवादपणे अमेरिकन फॅक्टर!! या खिडकीतून त्या खिडकीत पळवण्याचे सरकारी उद्योग इथंही चालतात त्याला अनुसरून नवीन लायसन्स साठी दोन काउंटर फिरल्यावर तिसऱ्या ठिकाणी मी उभा राहिलो.

दहा-एक मिनिटं तिसऱ्या काउंटर समोर उभा राहिल्यावर मी कशासाठी उभा राहिलोय ते मला विचारण्यात आलं. मी सांगितल्यावर 'तू सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं?' असा उलट प्रश्न आला. आता काय बोलणार? बरं पुढे काय तर परीक्षा द्यायची.. त्या बाईने मला पेपर आणि पेन्सिल दिली आणि एका 'एक्झाम सेक्शन' असा बोर्ड असणाऱ्या ओपन एरिया मध्ये बसून पेपर लिहायला सांगितलं. मी अवाक झालो!  आपल्याकडच्या परीक्षा पद्धतीची सवय असणाऱ्या मला थोडावेळ काही झेपलंच नाही. आपल्या इथं लर्निंग लायसन्ससाठी पद्धतशीर एका खोलीत बसवून प्रश्न दाखवतात आणि तुमच्या बेंचवर असणाऱ्या A B C बटणांपैकी योग्य बटण दाबायला सांगतात. थोडक्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरून परीक्षा देण्याचा हा अनुभव गाठीशी असताना अत्याधुनिक अमेरिकेत कम्प्युटर, टॅब किंवा असंच काहीतरी देऊन टेस्ट द्यावी लागेल असं उगाच वाटत होतं आणि हातात मिळाली पेपर आणि पेन्सिल!

चटकन येणारी उत्तरं सुरुवातीला,थोडी कठीण वाटणारी नंतर आणि 'ड' गटातली शेवटी-असला फॉर्म्युला वापरायची वेळदेखील येऊ नये असला तो पेपर होता! नाही म्हणायला कनफ्यूज होण्यासाठी 2 प्रश्न होते.. ज्यांनी पहिला प्रयत्न देवाला सोडायला सांगून विनाकारण टेन्शन दिलं होतं त्यांच्या मातोश्रींचा मनातल्या मनात उद्धार करून साधारण अर्ध्या तासात मी सोडवलेला पेपर परत दिला. सुपरवायझर नाही कि घंटा नाही.. अगदीच सिरियसनेस जाऊ नये म्हणून माझ्या पाठीमागच्या बाजूला 'कृपया मोबाईल वापरू नये' अशी विनंतीवजा सूचना (अर्थात इंग्रजीतून) चिकटवून ठेवली होती! मघाच्याच बाईने माझ्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका छापून आणली आणि माझ्या समोरच पेपर तपासला. तपासला म्हणजे प्रत्येक उत्तरावर तांबड्या मार्करने ती तिरकी काट मारत सुटली. प्रत्येक काट छातीत धडकी भरवत होती. घाबरून मी विचारलं कि "डिड आय आन्सर एव्हरीथिंग रॉंग?" तर ती बया म्हणे कि "मी बरोबर असणाऱ्या उत्तरांवर अशी खूण करतेय!" अगदी ओठांवर आलेला "शाळा कुठली गं  तुझी?" हा प्रश्न मी महामुश्किलीने गिळून टाकला. 2 प्रश्न वगळता सगळं बरोबर होतं.. आता ते 2 प्रश्न चुकल्यामुळे मी त्यांना कनफ्यूज करणारे म्हटलं ते वेगळं सांगायला नको! झालं.. दृष्टी - कागदपत्र तपासणीचे उरलेले सोहळे आटपल्यावर आणि रोख फी भरल्यानंतर लर्निंग लायसन्स ताब्यात आलं. सुदैवाने भारतीय परवान्यामुळे मला ताबडतोब प्रात्यक्षिक परीक्षा द्यायला परवानगी देण्यात आली होती.

आता लायसन्स घ्यायचं तर प्रात्यक्षिक द्यायलाच हवं--प्रात्यक्षिक द्यायचं तर गाडी हवी--गाडी विकत किंवा लीज वर घ्यायची तर लायसन्स हवं--इतर कोणाची मागावी तर इन्शुरन्स वर चालकाचं नाव हवं--बरं इन्शुरन्स वर नाव ऍड करायचं म्हटलं तर ज्याचं नाव ऍड करायचं त्याचं लायसन्स हवं-- आणि लायसन्स घ्यायचं तर प्रात्यक्षिक द्यायलाच हवं! म्हणजे नोकरी नाही म्हणून अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून नोकरी नाही च्या धर्तीवर लायसन्स आणि गाडी चा खेळ चालू झाला! लोकांशी बोलताना नव्याने इमिग्रेट झालेल्या लोकांना भाड्याने गाड्या देणाऱ्या एका गॅरेज मालकाबद्दल माहिती कळली, त्याच्याकडे गेलो तर त्याच्या सगळ्या गाड्या बाहेर गेलेल्या होत्या, होती ती एक अतिप्रचंड जुनाट गाडी. तो माणूस ती सुद्धा कशी  'मख्खन' आहे वगैरे गोष्टी समजवायला लागला! आता हे लोढणं महिनाभर गळयात अडकवून घेण्यापेक्षा लोकांचे उपकार घेणं परवडलं असतं. "एखादी-चालवताना स्वतःचीच स्वतःला लाज वाटणार नाही -इतपत बरी गाडी असेल तर सांग" असं त्याला सांगून मी बाहेर पडलो. अनेक ठिकाणी चौकश्या करून दमल्यावर सरतेशेवटी आमचं हपिस मदतीला आलं. इन्शुरन्स बद्दल चौकशी करायला गेलं असताना 'गरजू' लोकांना ऑफिस आठ्वड्याभरासाठी गाडी + विमा कागदपत्रं देतं असं कळलं. नेहमी भांडल्यासारखा वाटणारा आवाजाचा सूर कटाक्षाने खालच्या पातळीत ठेऊन मी स्वतःला 'गरजू' ठरवण्यात यशस्वी झालो आणि ऑफिस ने मला आहे तेवढं पेट्रोल भरून द्यायच्या बोलीवर सात दिवस वापरायला गाडी दिली..

आता सुरु झालं प्रात्यक्षिक! अमेरिकन जमिनीवर पाऊल ठेवल्यानंतर मी पहिल्यांदाच गाडीत ड्रायव्हर सीट वर बसत होतो. डावीकडे!!  ड्रायव्हिंग गाईडलाईन्स चं  पुस्तक कोळून प्यायलं आणि कितीही नाही म्हटलं तरी सुरुवातीला आपला मेंदू गाडी डावीकडूनच चालवायला आणि गाडी रस्त्याच्या (लेनच्या) उजवीकडे ठेवायला सांगतोच सांगतो! त्यात भारतात स्वतःची गाडी असताना आणि ती इतकी वर्ष चालवत असताना इथे ड्रायव्हिंग स्कुल मध्ये परत शिकणे हा कसा अपमान समजला पाहिजे यावर इतरांनी माझी बौद्धिकं घेतली. त्यात क्लासचं  टायमिंग ऑफिसच्या वेळात आणि वरून दर ताशी काही डॉलर्स अशी दणकावून फी! त्यामुळे तो मार्गही माझा मीच बंद करून टाकला. सात दिवसात गाडी परत करायची बोली असल्यामुळे वेळ दवडून उपयोग नव्हता. शेवटी नवख्या ड्रायव्हर सारखं अगदी स्लो सुरुवात करून रात्रीच्या वेळी कम्युनिटीच्या आतल्या रस्त्यांवर निशाचरासारखी मी गाडी फिरवायला लागलो. दोन दिवसांनी शेजारी एकाला नियम पाळतोय का ते बघण्यासाठी बसवून मुख्य रस्त्यावर बाहेर पडलो. पण सगळं स्मूथ होईल तर शप्पथ! थोडं अंतर जातो न जातो तोच 'टॉंय टॉंय टॉंय' असा सायरनचा आवाज आला! मी टरकलो.. निळा गणवेश, रंगांची उधळण, पिस्तुलधारी पोलीस सगळे डोळ्यासमोरून तरळून गेले.. च्यायला, गाडी चालवायला बाहेर पडलो नाही आणि मी कुठलातरी नियम तोडला कि काय ?  पण नाही, नशिबाने अँब्युलन्स होती. इतरांचं  बघून मीही  गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. कमाल  म्हणजे रस्त्याच्या अलीकडे पलीकडे असणाऱ्या सगळ्या गाड्या थांबल्या होत्या! अँब्युलन्स गेल्यावर परत सगळे रस्त्यावर आले (शब्दशः अर्थ घेणे!). नाही म्हटलं तर चकित व्हायला झालंच.


असो, अशा रीतीने कधी अँब्युलन्स तर कधी स्कुलबस तर कधी रस्ते दुरुस्त करणाऱ्यांची गाडी , असे (पोलिसांची गाडी वगळता) इतर वाहनांचे अनुभव घेत घेत ६ दिवस उलटून गेले.  होता होता, बाकीच्या गाड्यांचा अंदाज आला, रस्त्यावरच्या सूचनांकडे आपसूकच लक्ष दिलं  जाऊ लागलं. अंडर कन्स्ट्रक्शन रोड्स वरचे 'रस्ता  कामगाराला जखमी केलंत तर ७५०० डॉलर्स दंड आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास' अशा अर्थाचे बोर्ड भीती दाखवायचे कमी झाले. थोडा तरी कॉन्फिडन्स आला. मी आधीच अधिकृत प्रात्यक्षिक घेणाऱ्या आणि सर्टिफिकेट देणाऱ्या प्रायव्हेट ड्रायव्हिंग स्कुल ची अपॉईंटमेन्ट घेतली होती. म्हटलं होईल ते होईल! त्यादिवशी थोडा जास्त वेळ देवासमोर घालवू आणि जाऊ. समजा नापास झालोच तर चारचौघात बदनामी नको या हेतूने 'वैयक्तिक कामासाठी' म्हणून ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन गुपचूप जायचा माझा प्लॅन होता. अर्धा दिवस सुट्टी तर मंजूर झाली पण गुपचूप सटकायच्या धोरणाला सुरुंग लागला. ज्या माणसाने ऑफिसची गाडी माझ्या ताब्यात सोपवली होती तो सकाळी सकाळीच 'मी गाडी ठरल्याप्रमाणे आणि पेट्रोल वगैरे भरून वेळेत परत करणार आहे ना'  याची खातरजमा करायला माझ्या जागेवर आला. मी त्या दिवशी टेस्टला जाणार आहे हे कळल्यावर त्याने बोटाने लांब दिसणारी एक जागा दाखवून तिथे बसणारी अमुक एक मुलगी महिन्याभरापूर्वी कशी लागोपाठ दोनदा फेल झाली होती आणि रडत होती याचं अगदी रसभरीत आणि यथायोग्य हावभाव करीत वर्णन केलं आणि वरून 'ऑल द बेस्ट' देऊन गेला. आधीच उद्यापासून गाडी नसणार हे टेन्शन आणि त्यात त्याचं ते अगोचर वागणं! हे कमी म्हणून कि काय त्याच्या (अमेरिकन रिवाजाप्रमाणे) मोठमोठ्याने बोलण्यामुळे आणि विनाकारण केलेल्या गडगडाटी हास्यामुळे आजूबाजूच्या चार जणांना  मी कुठे जाणार आहे ते कळलं आणि त्यांनी मोलाचे सल्ले देऊन कमी अधिक प्रमाणात 'माझं टेन्शन कमी तर होणार नाही ना' याची काळजी घेतली.

ठरलेल्या वेळेप्रमाणे मी निघालो तर अर्ध्या रस्त्यात ड्रायव्हिंग सेंटर वाल्या बाईंचा फोन! त्या स्वतःच  माझ्या परीक्षक असणार होत्या. मी त्यांना 'पाच मिनिटात पोचतो' असं सांगितलं परंतु बहुतेक तिला माझ्यासारख्या लोकांच्या 'पाच मिनिटांचा' अर्थ ठाऊक असावा. तिने 'आतापासून १० मिनिटात पोहोचला नाहीस तर मी तुझ्यसाठी थांबू शकत नाही' अशी प्रेमळ सूचनावजा धमकी दिली. सुदैवाने मी पाचव्या मिनिटाच्या आतच तिथे पोहचलो आणि 'एक बार जो मैने कमिटमेंट दे दी' च्या धर्तीवर 'मी कसा पक्का वेळ पाळणारा आहे' या अर्थाचं एक वाक्य फेकलं. परीक्षक आणि पर्यवेक्षक अशी दुहेरी भूमिका निभवायला तयार असणाऱ्या त्या वयस्कर स्त्रीने माझं वाक्य ऐकून उगाच कायच्याकाय तोंड केलं आणि माझे कागद तपासायला घेतले. \ त्यानंतर गाडीचे लाईट, इंडिकेटर्स, हॉर्न सगळं एक एक करून तपासलं. जणू काही मी तिला सेकण्डहॅन्ड गाडी विकायला आलोय!

सुरुवातीला बाहेर उभं राहून तिने थांबणं, रिव्हर्स घेणं, पार्किंग करणं यासारख्या प्राथमिक गोष्टी मला करायला लावून त्याला मला जमताहेत आणि मी गाडीत बसवून नेल्यानंतर गाडीसकट तिला 'आपटवणार' आणि 'आटपवणार' नाही  याची खातरजमा करून घेतली.  त्यानंतर सुरु झाली परीक्षा. एक्स्टर्नल व्हायव्हा च्या वेळेला  जे फिलींग येते ते घेऊन मी तिच्या सूचनांनुसार गाडी चालवायला लागलो.. पण इथे प्रॅक्टिकल करत व्हायव्हा द्यायची होती! ती अगदी काटेकोर पणे  मी स्पीड लिमिट्स, सिग्नल्स, नियम पाळतोय का ते पाहत आपल्या नोंदवहीत टिपणं काढत होती. मध्ये मध्ये मला वाहतुकीच्या नियमासंदर्भातले प्रश्न विचारत होती. त्यामध्ये "समोरून कोणीतरी गाडी चालवत तुझ्या दिशेने आला आणि तुला ठोकणारच आहे तर तू गाडी कुठे आपटवशील?" अशा सारख्या अघोरी प्रश्नांचाही समावेश होता. "शुभ बोल गं नारी" असं मनात म्हणून दिलेली माझी उत्तरं ती नोंदवून घेत होती. रेडिओ बंद कर, ए सी चालू कर असा बावळटपणा करायला सांगत होती. मध्येच 'वॉच युर स्पीड' वगैरे सांगून सावध करीत होती. गाडीतल्या बटणांची कार्यपद्धती आणि त्या एरियातले साधारण सगळे गल्लीबोळ तिच्या मनासारखे बघून झाल्यानंतर तिने मला गाडी हायवे ला घ्यायला लावली. माझ्या डोळ्यांसमोर आपल्याकडच्या ड्रायविंग टेस्ट चे सुखद अनुभव तरळून गेले..

"साहेब, हे काय? ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुमचीच गाडी आणलीय का? " -इति परीक्षा घेणारा खाकी वर्दीधारी इसम.
"होय साहेब.. हि हि " -इति मी
"वा! आता या रस्त्याने पुढे जावा आणि वळवून आणा." - खा. व. इ. 
"माझ्याबरोबर कोणी बसणार नाही? तुम्ही?" -मी
"मी या ड्रायव्हिंग स्कुल वाल्यांच्या गाडीत बसणाराय, जावा तुम्ही" - खा. व. इ.
मी गेलो आणि साधारण दोनशे फुटावरच्या अंतरावरून गाडी वळवून परत आलो. वर्दीधारी इसम रस्त्याच्या पलीकडे राहिला आणि "ड्रायव्हिंग स्कुलवाल्यांच्या गाडीत" बसायच्या तयारीत होता
"ओ ss  साहेब... मी काय करू?" - मी
"जावा तुम्ही, येईल तुमचं  लायसन्स" - खा. व. इ.
 "बरं..!" -इति मी आणि इत्यस्तु ! हाय काय नि नाय काय!!

"टेक दि नेक्स्ट एक्सिट अँड रिमेम्बर यू नीड टू स्टाप दि इंनिकेटा (प्रमाण भाषेत इं-डि-के-ट-र) वन्स यू मुव्ह्ट टु डिजायर्ड लेन" तिच्या सूचनेने मी त्या रम्य आठवणींच्या तंद्रीतून वास्तवात आलो. साधारण चाळीस पंचेचाळीस मिनिटं गाडीचं पेट्रोल जाळल्यानंतर आम्ही परत होतो त्या ठिकाणी पोहोचलो. तिच्या हातावरच्या अर्जावर तिने केलेल्या असंख्य खुणा बघून काळीज धडधडलं. निर्विकार चेहऱ्याने ती अजून काहीबाही लिहीतच होती. घाबरतच मी तिला विचारलं की "हौ वॉज इट? डिड आय ड्रॅईव्ह वेल ऑर इट वॉज अ  स्केअरी ड्रॅईव्ह?" मी गाडी चालवताना केलेल्या चुकांचा पाढा वाचून दाखवून काही क्षण जाणीवपूर्वक शांतता ठेऊन ती म्हणाली "तरीसुद्धा तू टेस्ट पास झाला आहेस.. हे घे तुझं सर्टिफिकेट!" मी सुस्कारा सोडला.

ते सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा एस ओ एस च्या ऑफिस मध्ये गेलो. प्रथेनुसार एक बावरलेल्या चेहऱ्याचा आधार कार्ड टाईपचा फोटो काढला आणि सगळ्या कागदपत्रांसहित पक्क्या लायसन्सच्या औपचारिकता पूर्ण केल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसची गाडी परत केली(अर्थात पूर्ण पेट्रोल भरूनच.. नसत्या शंका घेऊ नयेत!) त्यानंतर पुन्हा इतरांच्या उपकारावर काही दिवस काढल्यावर माझे लायसन्स घरपोच आले आणि अशा तऱ्हेने अमेरिकेतल्या गाड्यांच्या गर्दीमध्ये अजून एका गाडीची भर घालण्याचा माझा मार्ग मोकळा झाला!!

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

परवाना करी दिवाना : पूर्वार्ध


अमेरिकेला जाणे राहणे परतणे याबद्दल मध्यमवर्गीय भारतीय जनमानसात पूर्वीइतकं कुतूहल नसावं.. तरीही तिथल्या काही गोष्टी अजूनही अनाकलनीय आहेत हे पण तेवढंच खरं.  या देशातल्या  मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्रानंतरची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडी! हो... बरोबरच बोललो मी.. गाडीच! कदाचित वस्त्रापेक्षा जास्त महत्त्व  गाडीला असावं! निवारा बिवारा सगळं नंतर.. कारण इथल्या टीव्ही वर मी एक होमलेस लोकांसाठीच्या एनजीओ ची जाहिरात पाहिली.. त्यात ती होमलेस बाई आपल्या गाडीच्या दरवाजांवर कपडे वाळत घालते आहे, लहान बाळाला मागच्या सीट वर झोपवते आहे असे हृदयद्रावक वगैरे चित्रण होते!! त्यामुळे (बाई)माणूस होमलेस असू शकतो पण कार-लेस नाही अशी माझी धारणा बनली तर त्यात काय नवल? साफसफाई करणारे लोक, रस्ता दुरुस्ती करणारे कंत्राटदार, पोस्टमन, गवत कापणारी माणसं (जीन्स-टी शर्ट- गॉगल-हेडफोन सहीत  हि कामं  करणाऱ्यांना आणि फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्याना डायरेक्ट कचरेवाला,कामगार किंवा माळी म्हणायला अजून जीभ सरावत नाही!) ज्या पद्धतीच्या गाड्या घुमवतात त्यावरून निवाऱ्यापेक्षा चारचाकी महत्वाची असावी यावर मी शिक्कामोर्तब करून टाकलं. अर्थात मनातल्या मनात! (नायतर आमच्या शिक्कयाला विचारतो कोण?)

10 मिनिटांवर असणाऱ्या ऑफिसमध्ये घेऊन जायला आणायला काही दिवस तरी गाडी असताना आपल्याला ताबडतोब कशाला लागतेय गाडी? असा तत्कालीन धोरणी विचार मी करत होतो पण ऐनवेळी संपलेलं दूध, किराणा माल वगैरे किरकोळ गोष्टींसाठी पहिल्याच आठवड्यात मैलोनमैल पायपीट करायची वेळ आल्यानंतर "कसं जमायचं गाडीशिवाय?" असा प्रश्न पडायला लागला! 10 मिनिटं लागणारं ऑफिस 4 मैलावर (अमेरिकेतल्या 'प्रयोगातून विज्ञान' विषयात एम के एस मोजमापन पद्धती शिकवत नसावेत) आहे हे गुगलमॅप मधून कळलं! ऑफिसच्या सहकाऱ्यांकडून "बँकेत जायचंय ? जवळच आहे.. 5 मैल.. मेडिकल स्टोर इथेच तर आहे हार्डली साडेतीन मैल! भाजी मंडई 15 मिनिटाच्या अंतरावर आहे 10 मैल फक्त.. एटीम एकदम पलीकडे दीड मैल, 2 मिनिटात पोचशील. 'ड्राईव्ह इन' आहे गाडीतून उतरायची पण गरज नाही.. " वगैरे मार्गदर्शन मिळायला लागल्यावर मला जाणीव झाली कि हे काही खरं नाही. स्वतःच्या मताने चालायचं तर दोन पायांचा फारवेळ टिकाव लागणार नाही; त्यात मनाला वाटेल तसं  मूड बदलणारं वातावरण.. त्यामुळे चार चाकं हवीतच. खरंतर गाडी हि हौस म्हणून घ्यायची गोष्ट पण अमेरिकनांनी आणि इथल्या वातावरणाने ती गरज करून टाकलीये. एवढे मोठे रस्ते असताना मधून मस्त बी आर टी  वगैरे काढायची सोडून गाडी घ्यायला मजबूर करतात हे लोक! बर  दोन चाकी गाडी घ्यावी तर ती चारचाकीपेक्षा महाग.  नीच पणाचं  याहून मोठ्ठ उदाहरण कुठलं असेल? (म्हणजे असतील बरीच,पण हे वाक्य उगीच वजन टाकायला... )

जेव्हा स्वतःची गाडी घ्यायची मनाची तयारी झाली तेव्हा कळलं कि काही अमेरिकन राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य लायसन्स वर (म्हणजे भारतीय!) मी काही महिने गाडी चालवू शकतो. पण चालवता तर आली पाहिजे!  राज्य वाहतूक परवाना मिळवण्यासाठी लेखी परीक्षा आणि खरीखुरी ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते आणि त्यांच्या निकषांनुसार पास ही व्हावं लागतं हे म्हणजे अतीच झालं. भारतात बाईक जेमतेम चालवता येत असताना चारचाकीचं लायसन्स घरपोच मिळवलेल्या आमच्या काही मित्र मंडळींना हा तर सरसकट अन्याय वाटला आहे आणि त्यानी दोन पेग पोटात गेल्यावर तसं  स्पष्ट नसेना का पण अडखळत अडखळत बोलून दाखवलं आहे.  

जोपर्यंत गाडी चालवायचीच नसते तोपर्यंत ती कशी चालवावी, कशाला शिकायची वगैरे प्रश्न पडत नाहीत पण एकदा चालवायची म्हटली तर मग असंख्य प्रश्न एकामागोमाग एक पडायला लागतात. मग तुम्ही ती जगात कुठेही शिकत असा. कारण तिथले नियम!! 'भारतात चारचाकी चालवल्यानंतर अमेरिकेतच काय, अख्ख्या जगात कुठेही गाडी चालवू शकाल'  हे तद्दन भंपक विधान - खोटा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी - भारतात कधीही गाडी न चालवलेल्या व्यक्तीने निर्माण केलं आहे आणि अमेरिकेत येऊन पहिल्यांदा गाडी घेतलेल्या/शिकलेल्या काही अनिवासी भारतीयांनी ते उचलून धरलेलं आहे हे मी ष्ट्याम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे!! तसंही भारतातून अमेरिकेला येणाऱ्या पहिलटकरांना बऱ्यापैकी मिसगाईड करण्यात त्यांच्याआधी बराच काळ स्थायिक झालेले भारतीय कारणीभूत असावेत असं मी अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो.

युरोपीयनांनी कधी ना कधी बस्तान मांडलेल्या सगळ्याच देशांमध्ये गाडी चालवणारा उजवीकडे बसतो.   आपल्या गाडीत शक्यतो आपणच ड्रायवर असतो आणि अख्ख्या गाडीत कितीही माणसं आणि सामान कोंबून बसवलं तरी ड्रायवर ला कधीही अडचण होता नये असा आपल्याइथे एक (ड्रायव्हर प्रजातीने जाणीवपूर्वक पसरवलेला गैर)समजही असतो. त्यामुळे घरात मांजर असणारी मंडळी सिंहाच्या दिमाखात गाडी चालवताना (आणि नंतर गाढव बनून गाडीतलं सामान उचलताना) मी याची डोळा पहिले आहे. अमेरिकेत गाडी चालवत नसताना उजवीकडेच बसावं लागत असल्याने प्रथमदर्शनी गाडी मध्ये फारसा फरक वाटला नाही.. परंतु चालक मागे न बघता बिनधास्त आणि झपकन उजवीकडे वळतो, जवळपास सगळ्या छोट्या रस्त्यांवर ७०km/hr च्या वेगाने गाडी दामटतो, छोट्या रस्त्यावरून हळू येऊन स्पीड वाढवत वाढवत फ्रीवे वर तर १२० ने सुसाट जाणाऱ्या गाड्यांमध्ये घुसतो तेव्हा काळजाचा ठोका चुकतोच. त्यामुळे मग मी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला मग तो ऑफिस मधला ड्रायव्हर असो, कलीग असो, मित्र असो वा बॉस असो वाट्टेल ते (पण गाडी चालवण्यासंबंधीच) प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग तो नवखा असो वा मुरलेला. त्यांनीही आपलेपणाने म्हणा, मदतीच्या भावनेनं म्हणा किंवा फुशारून जाऊन म्हणा मला ज्ञानामृत पाजायला सुरुवात केली!

सुरुवातीला बाजूला बसूनही एवढा बावरून जायचो कि विचारायची सोय नाही! तसंही मीच इतरांना विचारत असे म्हणा. 'कोणी येत नसेल तर आपण रेड सिग्नलवरही राईट टर्न घेऊ शकतो' असं सांगणारा पुढे एका ठिकाणी उजवीकडे वळायचं असताना देखील रेड सिग्नलला ठोंब्यासारखा उभा राहिल्यावर मी त्याने नुकताच शिकवलेला नियम त्यालाच सांगायला गेलो तर तो उलट विचारत असे "तिथं 'नो टर्न ऑन  रेड' लिहिलंय पाहिलं नाही का?" "कुठे?"
तर  "मगाशी एक बोर्ड लावलेला त्यावर लिहिलं होतं. आता मागे गेला तो."असं तो सांगत असे.
एखाद्या रस्त्यावर अचानक गाडी एकदमच हळू केली म्हणून विचारलं तर कळलं  'इथे २५ मैल प्रति तास असं लिमिट आहे. रेसिडेन्शियल एरिया असणार '
"कुठे लिहिलंय असं?"
तर "मगाशी एक बोर्ड गेला त्यावर लिहिलं होतं.आता मागे गेला तो."हे उत्तर!
अर्थात, हळू हळू कळत गेलं की मला पडणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नाची उत्तरं 'मगाशी एक बोर्ड लावलेला होता' त्यावर लिहिलेली होती,जो मला प्रश्न पडता क्षणी मागे गेलेला असे!

यातून एक गोष्टीची जाणीव झाली की आपल्याकडचे बहुसंख्य चालक (सन्माननीय अपवाद वगळता, उगाच भावना दुखावून घेऊ नयेत!) गाडी चालवताना ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यात फक्त वाहतुकीचे नियम, सिग्नल आणि सर्व सजीव यांचाच समावेश नसून असल्या निर्जीव साइनबोर्ड्सचा पण समावेश असतो! अर्थात 'संभाजी पुलावर दुचाकी वाहनांना बंदी-सकाळी ९ ते ५' अशासारखे दुर्गम भागातले साईनबोर्ड असल्यावर कशी काय सवय लागणार म्हणा? पण असो. कळत-नकळत आपण नियमांची पायमल्ली करतो याची जाणीव होणे हे ही नसे थोडके..

एकदा आमचा एक सहकारी त्याच्या गाडीने कुठेतरी जात होता. फ्रीवे वरून मस्त सुसाट. तर अचानक भोंss भॉss क असा आवाज आला. तो टरकला. काय झालं असावं हा विचार करेपर्यन्त त्याला आरशात वेगवेगळ्या रंगांची उधळण सुरू झालेली जाणवली. हायवे पोलीस त्याच्या मागे लागला होता.  त्यामुळे पठ्ठ्याने गुपचूप गाडी बाजूला घेतली. (भारतात कोणाच्याच बापाला न जुमानता गाड्या पळवणारं आमच्या मित्रासारखं  पब्लिक इतर देशांमध्ये गपगुमान लाईन वर येतं ,हेही एक उघड गुपित आहे म्हणा!) पोलिसाच्या म्हणण्यानुसार त्याने म्हणे स्पीड लिमिट एक्सीड केलं  होतं. थोडंथोडकं नव्हे तर 70 मैल प्रति तास(120 km/h) ऐवजी हा बैल 90 मैल प्रति तास (145 km/h) ने गाडी पळवत होता.

"एss  अरे घे बाजूला, पन्नास देतोस की शंभरची पावती फाडू?' असले प्रश्न ठाऊक असणाऱ्या आमच्या परममित्राला  "जेंटलमन, व्हेर आर यु गोईंग विथ नाईन्टी  माईल्स अन आवर ऑन धिस ब्युटीफुल मॉर्निंग?" असले शालजोडीतले प्रश्न ऐकायची सवय नाही. आणि 'चुकलो,असं परत नाही करणार' या वाक्याना उत्तर मानायची त्या पोलिसाला सवय नाही. त्यामुळे दंड लागलाच! बरं पोलिसाचा एक हात पूर्णवेळ कमरेला लावलेल्या पिस्तुलावर! त्यामुळं 'जाऊ दे की मामा' म्हणून वाद घालायची सोय नाही. पण त्याच्या या अनुभवावरून मला कळलं की स्पीड लिमिट हे खरंच पाळायला असतं आणि हायवे पॅट्रोलिंग वाले ते पाळत ठेवून बघत देखील असतात. ८० km /h च्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर त्या आणि त्यापेक्षा खालच्या स्पीड ने फक्त लाल पिवळी एसटी जाते. कार नव्वद च्या खाली असेल तर तो बहुधा फाऊल धरला जातो आणि मागून दणादण  हॉर्न वाजवून तुम्हाला रेस मधून बाजूला व्हायला भाग पाडलं जातं.  या आणि अशा गृहीतकांवर आतापावेतो जगणाऱ्या आमच्या मित्राला पोलिसाचं ते वागणं त्याक्षणी फार अपमानास्पद वाटलं पण 'तुम्हाला बाजू मांडायची असेल तर इथल्या कोर्टात अपॉइंटमेंट घ्या, त्यादिवशी हजर राहून मी हवंतर स्पीडगन चा पुरावा सादर करू शकतो' असं पोलिसाने नम्रपणे सांगितल्यावर  काय करणार? त्यामुळे शहर हद्दीनुसार 135 डॉलर्स ची खमंग फोडणी बसल्यावर त्याने कानाला खडा आणि स्पीडोमीटरवर नजर दोन्ही एकदम लावले!

या खऱ्याखुऱ्या आणि असल्याच काही ऐकीव किशश्यातून शहाणं होत होत मी ड्रायविंग लायसन्स च्या परीक्षेचा अभ्यास करायला सुरवात केली.  हो अभ्यासच! शंभर पानी पुस्तकावर लेखी परीक्षा देऊन त्याच्यात ऐंशी टक्के मिळवल्यावर जर लर्निंग लायसन्स मिळणार असेल तर अभ्यास करायलाच हवा. पहिली काही पानं बाळबोध होती. या वेगाने दोन दिवसात सगळं वाचून संपेल असं वाटायला आणि खरं ज्ञान बाहेर पडायला एकच गाठ पडली! बरं नियम राहिले बाजूला नियम तयार करणाऱ्यांचं इंग्लिश इतकं भारी! 'राइट ऑफ वे' चा अर्थ 'वाटेच्या उजवीकडे' नसून 'वाट वापरण्याचा अधिकार' आहे हे कळलं असं स्वतःच्या समाधानासाठी गृहीत धरलं तरी शोल्डर ऑफ रोड, कर्ब ऑफ पेव्हमेंट, पासिंग ऑन रोड असल्या नवनवीन संज्ञा वाचून डॊक्याचं दही झालं.. 2 दिवसात संपेल असं वाटणारं पुस्तक 5 दिवस झाले तरी संपेना शेवटी एका दिवशी (म्हणजे खरंतर रात्री) इंजिनियरिंग च्या जुन्या दिवसांना स्मरून 'नाईट मारली' आणि पुस्तक वाचून संपवलं! साधारण 400 पानी पुस्तकासाठी असलेल्या 'नाईट मारणे' या संज्ञेचा अनादर टाळण्यासाठी मी अजून दोनदा ते पुस्तक वाचलं  आणि सगळं विसरण्याआधी मी लर्निंग लायसन्स च्या परीक्षेची अपॉइंटमेंट घ्यायची ठरवली. लागणारी कागदपत्र गोळा करुन मी (अमेरिकेत गाडी चालवण्यात) सिनियर पब्लिकला त्यांचे अनुभव विचारायला सुरुवात केली. इथेही इंजिनियरिंग च्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. सिनियर्स चे चेहरे वेगळे, परीक्षा वेगळी, देश वेगळा पण उत्तरं तीच! ' काय नाय रे एकदम सिम्पल असतं, माझा पहिल्या अटेम्प्ट मध्ये निघाला म्हणजे बघ किती सोप्पा असतो पेपर' पासून ' दोनदा द्यावीच लागते.. पहिला चान्स देवाचा म्हणून सोडून द्यायचा.. अनुभव येतो. पुढच्या अटेम्प्ट ला नक्की पास करतात!' अशी दोन्ही टोकाची उत्तरं मिळाली!! शेवटी नाय-होय करता करता मी एकदाची अपॉइंटमेंट घेतली आणि आर टी ओ (वाचा सेक्रेटरिएट ऑफ स्टेट) ऑफिस मधे गेलो.

अमेरिका म्हटल्यावर सगळं हाय-फंडू असा जो माझा समज करून देण्यात आला होता त्याला या लर्निंग लायसन्स टेस्ट ने सुरुंग लावला...

उत्तरार्ध

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

ताळेबंद-उरलेला

आंतरजालावरून साभार
ताळेबंद: जमेल तेवढा

आमच्या ऑफिसमध्ये घरभाड्याची पावती आणि प्रवासभत्ता (म्हणजे एल्टीये ) यावर करसवलत मिळते. त्यामुळे सरसकट सगळेच कुठूनतरी पावतीपुस्तक आणून पावत्या तयार करून सबमिट करतात. मीपण तसली एक पावती तयार करून त्यावर स्ट्याम्प तिकीट चिकटवत होतो. एक खोटी सही मारली कि पावती तयार!तेवढ्यात आमच्याच हापिसातला एक नुकताच नोकरीला लागलेला पोरगा येउन विचारतो कसा, "हा करता तो भ्रष्टाचार नाही का?" वरून "राजकारणी त्यांच्या लेवल वर भ्रष्टाचार करतात... तुम्ही तुमच्या!" असंही म्हणून गेला! नेमकं त्याचवेळेला माझ्या जिभेवर तिकीट होतं म्हणून वेळ निभावून नेता आली; नाहीतर त्याला काय प्रत्युत्तर द्यायचं हेच मला कळलं नसतं! एक ज्युनिअर येउन अपमान करून जातो म्हणजे काय? तर असो.

बाकी मला अशा ज्युनिअर्सचा, सुनेला सासुरवास करणाऱ्या सासवांचा, बायकोला मारझोड करणाऱ्या नवऱ्यांचा, शिक्षकांना उलट उत्तरं देणाऱ्या पोरांचा, रस्त्यात हुज्जत घालणाऱ्यांचा, बस मध्ये एका दाराने चढून कंडक्टर पोचायच्या आत  त्याच दाराने  उतरणाऱ्यांचा, तिकीट न काढताच लोकल प्रवास करणाऱ्यांचा, बायका-पोरींशी बिंधास  बोलणाऱ्यांचा, ऑफिसमध्ये बसून ऑफिसच्या वेळातच ऑफिसमधल्या लोकांकडे  ऑफिसमधल्या लोकांच्याच कागाळ्या करणाऱ्यांचा अशा अनेक लोकांचा वेळोवेळी प्रचंड आदर वाटत आला आहे. मानतो बुवा आपण त्यांच्या डेरिंग ला!! तसा मी मधून मधून इतर लोकांमागे जाऊन  (चौकात मामा नाहीये याची परत परत खात्री करून) सिग्नल वगैरे तोडतो परंतु यापेक्षा जास्त बंडखोरी या जन्मात जमेल असं  वाटत नाही. पोलिस कशाला अगदी होमगार्ड लोकांची पण मला दहशत वाटते. लहानपणी तर मी खाकी कपड्यामुळे पोष्टमन लोकांना पण घाबरत असे पण पुढे मोठा झाल्यावर टोपी आणि पोट यावरून मी पोलिस आणि पोष्टमन वेगवेगळे ओळखायला लागलो.

छंद म्हणायला गेलात तर तसा काहीच नाही. लहानपणी नाणी जमवायचा प्रयत्न केलेला आठवतोय पण भारतीय नाणी सोडून इतर देशांची नाणी जमवायची म्हणजे खायचं काम नाही हे लक्षात आल्यावर तो नाद सोडून दिला. मग सोपं पडेल म्हणून काड्यापेट्या जमवायला लागलो. त्या मात्र थोड्याफार जमवल्या. पण मी कोणाला माझ्या छंदाबद्दल सांगितले नव्हते. एकदा आमच्या मातोश्रींनी कचरा समजून सगळ्या काड्यापेट्या एकत्र करून त्याला काडी लावली. मी नसताना! मला ते कळल्यानंतर मी रडून धिंगाणा घातला होता. पुढे मोठा झाल्यावर बायोडाटा मध्ये कोणाचं तरी बघून मी 'लिसनिंग म्युझिक' असा छंद लिहायचो. पहिल्याच मुलाखतीत कुठल्या पद्धतीचं संगीत आवडतं ? आणि आवडते संगीतकार कोण वगैरे अवघड असे प्रश्न त्या छंदामुळे पडल्यामुळे माझी विकेट  पडली होती. ताबडतोबीने छंद बदलून मी "रिडिंग" करून टाकला! त्यापुढच्या इंटरव्यूत विचारल्या गेलेल्या "काय वाचायला आवडतं ?"  या  प्रश्नाचं माझं "पेपर" हे उत्तर ऐकून प्रश्नकर्ता गडबडल्याचं  आठवतंय!

व्यसन म्हणायला गेलात तर वडील पैसे देत होते तेव्हा बरीच केली.. 'जे मला पाहिजे ते मी मिळवतोच' ह्या जाहिरातीतल्या खोट्या आवेशापाई मी बरेच दिवस ब्रिस्टल ओढ़त असे.. नंतर मी पैसे कमवायला लागल्यावर फोर स्केअर वर आलो.. लग्न झाल्यावर मात्र व्यसन न करण्याचं व्यसन लागलं.. जेमतेम घरखर्च चालवू शकेन इतपत नोकरी मिळाल्यावर काही महिन्यातच स्थळ सांगून आलं. हे मुला मुलींनी बाहेर भेटायचं फ्याड मला तितकसं पसंत नव्हतं परंतु दोन्ही पार्ट्यां कडून आपण कसे एडवान्स आहोत हे दाखवायची स्पर्धा असल्याने ही नौबत आली होती.. शिवम हॉटेल ही इडली डोसा चापायची आणि सांबर ओरपायची जागा. भविष्याचे आराखडे हे रूपाली-वैशालीत बांधायचे या माझ्या मताला कोणी कसपटाची किंमत दिली नव्हती! "उलट त्या पोरीनेच सुचवलं आहे-थोडं स्वस्त.. थोड़े पैसे वाचवायला शिक.." असं सुनवण्यात आलं. 

मी थोडा भाव खायचा म्हणून उशिराच पोचलो तरी तिचा पत्ता नव्हता. मग काहीतरी चाळा पाहिजे म्हणून एक गुडनगरम मारली तेवढ्यात ती आली..  तिने मला ऑर्कुटवर पाहिलेलं  होतं त्यामुळे ओळखलं,  मी पण तिचा फोटो आधी बघितल्यामुळे(च) तिला ओळखलं. (हिच्या ऑर्कुटवर करीना कपूरचा फोटो लावला होता!) ती माझ्या दिशेने आली आणि हाय हॅलो च्या आधी तिने
"शी बाई हा वास कसला? तुम्ही सिग्रेट पिता की काय?" असा  प्रश्न केला!
कोणतीही मुलगी हे असं डायरेक् विचारू शकते हे मला माहीत नव्हतं..आणि "मुलगा सुस्थापित - निर्व्यसनी" अशी माझी धड़धड़ित खोटी जाहिरात केली गेली होती हे मला मुलीकडून कळलं! 
"आं.. नाही मी ते आपलं हॉल्स आणायला गेलो होतो.. तेव्हा एक मित्र भेटला तो सुट्टा मारत-म्हणजे ते फुकत-आपलं ते हे-सिगरेट ओढ़त होता आणि ते म्हणतात ना.. धूर…  धुर माझ्यावर सोडत होता.." उजव्या हाताची दोन बोटं ओठांसमोर हलवून मी तिला एक्सप्लेनेशन देत होतो आणि डाव्या हातातल्या दोन हॉल्स तिला देत होतो. 
" तेच म्हटलं, मला तर सांगितलं होतं की सुपारीच्या खांडाचंपण व्यसन नाही मुलाला.. मला हा सिग्रेटच्या धुराचा वास अजिबात सहन होत नाही.. लग्नानंतर तुम्ही असल्या मित्रांची संगत सोडाल तरच बोलू आपण पुढे!" आयुष्यात एक गोष्ट मी  स्वत:च्या मताने करत होतो ती पण आता सोडली पाहिजे! 'नाय' म्हटलं तर "मी फुकतो" याची जाहिरात होणार आणि पोरगी स्वतःहुन पटेल असं दाखवण्यासारखं माझ्याकडे काहीही नव्हतं आणि नाही! शाळा कॉलेजात " आपल्याला काय इंट्रेस्ट नाय रे पोरींबिरित! " असं सांगून पोरगी न पटण्याचं शल्य दोघाचौघात जाहिरपणे लपवता येत असे पण आयुष्याच्या शाळेत,आपल्याला फोटो बघून पसंत केलेलं असताना, निव्वळ सिगरेटीच्या मोहापायी आपण ते नाकारावे याची मला हिंमत होईना. पुढचा तास भर तिने माझा इण्टरव्यू घेतला आणि मी आयुष्यभर तिच्या ताटा खालचं मांजर बनून राहू शकतो याची तिने खात्री केल्यावर मी आमचं दोघांचं बिल भरलं.

असो. यथावकाश (वशिल्याने का होईना) नोकरी मिळाली, छोकरी मिळाली आणि छोकरी झाली सुद्धा! तशी ती होईपर्यंत लहान पोरं मला कधीच आवडली नाहीत. मी स्वतः लहान असेपर्यंत "मुले हि देवाघरची फुले" हे वाक्य मला आवडत असे पण मोठा झाल्यावर आणि नातेवाईकांची वगैरे खरोखरीची मुले बघितल्यानंतर वरचे वाक्य साफ खोटे आहे यावर माझा पक्का विश्वास बसला. कोणाच्याही घरी लहान मुल असले आणि मी काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर साधारण ९० टक्के वेळ हा त्या लहान पोराचं/पोरीचं कौतुक ऐकण्यात जातो! त्यात त्या लहानग्याने दाराची कडी कशी लावून घेतली इथपासून टीव्हीचा रिमोट कसा लपवून ठेवला इथपर्यंत सगळ्याचा समावेश असतो.
लहान मुलांनी चष्मा तोडला-कौतुक  ; मोठी चप्पल घातली आणि धडपडली-कौतुक ; घाणेरड्या पायाने गादीवर/सोफ्यावर चढून उडी मारली -कौतुक; पिठाचा डबा सांडला-कौतुक; झोपलेल्या माणसाची मिशी/शेंडी ओढली- कौतुक आणि वरून कित्ती लब्बाड माझं पिल्लू चं पालुपद! वास्तविक पाहता याच गोष्टी जर कुणा मोठ्याने केल्या तर त्याला अद्वातद्वा बोलणाऱ्यांना लहानाने केल्यावर त्याचं काहीच वाटत नाही हे विशेष! !

लग्नानंतर एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. म्हणजे त्याने बोलावलेलं मुलाच्या महिन्याभरानंतर केलेल्या बारशाला, पण स्पष्ट सांगायचं तर मी जेवणाच्या वेळेच्या जरा आधीच जातो. लग्न , मुंजी, वाढदिवस बारशी या सगळ्यात जेवण हाच मुख्य कार्यक्रम असतो.. तर फ्लेक्स वर आधीच छापून आणलेले आणि भिंती आणि पाळण्यावर लटकवलेले नाव बाळाला ठेवण्याचा औपचारिक कार्यक्रम आटपल्यावर आमच्या बायकोने त्याच्या गळ्याच्या शिरा ताणून रडणाऱ्या लहान म्हंजे अगदीच इतकुश्या मुलाला खेळवायला सुरुवात केली. तेवढ्यात मित्राच्या बायकोने तिला हाक मारली तर तिने ते लटांबर (दुपट्या बीपट्या  सकट) माझ्याकडे सोपवलं आणि आत गेली. त्या गोळ्याने रडणं थांबवून जरावेळ माझं निरीक्षण केलं. तोंडातून थुंकी काढून दाखवणे, फुर्रर्र करणे वगैरे शक्य तितके किळसवाणे प्रकार केले आणि एकदम हातपाय हलवायचे थांबला! मला माझं पोट गरम होत जातंय असं  जाणवलं आणि झटक्यात शर्ट ओलेते झाले! मी गडबडून बायकोला हाक मारली. तर तिने येउन "अग्गोबाई, थांब्ला कि रडायचा" वगैरे म्हणून त्या मूढ मंद गोळ्याचंच कौतुक करायला सुरवात केली! वरून मित्राच्या बायकोला बोलावून तिच्या पोराने माझ्या पोटावर फार मोठ्ठा पराक्रम गाजवला आहे अशा पद्धतीने तिला काहीबाही सांगू लागली. माझी अवस्था काय झाली म्हणून सांगू तुम्हाला! एकदा का पाणी कपड्यांच्या आतून पोटाच्या खाली उतरलं कि मग तुम्ही कोणाचे राहत नाही हे काय मी सांगायला हवं? असो! मित्र फिदीफिदी हसत इतरांना त्याचं पोर नेमकं ऑफिसला जायच्या वेळी त्याचे कपडे कसं भिजवतं जे कौतुकाने सांगत बसला.. वहिनींनी मित्राचे शर्ट प्यांट ऑफर केले खरे पण "प्रॉब्लेम बाहेरच्या कपड्यात नाहीये" हे चारचौघात सांगण्याचं अवसान मी काही जमवू शकलो नव्हतो! माझ्या भिडस्तपणामुळे हापिसात मला इतरांना माझंच  काम समजावून सांगत येत नाही, अहो साधं सलून वाल्याला केस कसे कापून हवे आहेत ते सांगता येत नाही. तर इतर कोणाच्या बायकोला एवढ्या अवघड गोष्टी कशा काय सांगणार? दुर्दैव म्हणजे या लहान कार्ट्याना कसा कोण जाणे पण मी आवडतो नाहीतर आईशिवाय कोणाकडेही गेल्यास कर्कश्श आवाजात भोकाड पसरणारी कार्टी माझ्याकडे शांत कशी काय राहिली असती? आमच्या मुलीच्या बाबतीत मी मात्र असं  काही करत नाही. माफक लाड करतो म्हणा.. पण ते वेगळं! आमची पोरगी या बाकीच्या कार्ट्यांसारखी नाहीये मुळी!!

बाकी तसा माझा हा भिडस्तपणा 'झाकली मुठ' सुद्धा ठरला आहे म्हणा! सासुरवाडीला गप्प बसून राहण्यामुळे काही अनपेक्षित गोष्टी पदरात पडल्या आहेत. हापिसात नेमाने दिवाळीला सलग सुट्ट्या मिळत आहेत. सासुरवाडीला पहिल्या दिवाळसणाला अंगठी दिल्यावर मी गप्प बसून राह्यलो तर सासर्च्यांनी 'मी नाराज आहे' असा अर्थ लावून चेन दिली. तरी मी गप्पच बसलो. बायकोने 'ते तस्सेच  आहेत' असं  सांगितलं नसतं तर अजून काहीतरी मिळालं असतं.  पण असो.. थोडक्यात सुख महत्वाचे! माझ्या मागे दागिने करून द्यायला तगादा लावणारी ही मला काही मिळतंय म्हटल्यावर नको म्हणते याचीच मला कमाल वाटली होती!

तर दागिन्यांनंतर आमच्या बायकोला (आणि त्यामुळे मला) कसलं कौतुक असेल तर सिनेमाचं. प्रत्यक्षात तर हिरो वाट्याला आला नाही तर निदान पडद्यावर बघून खुश होऊ हा हेतू असावा तिचा; पण माझी जाम गोची होते. मी एवढा इन्व्हॉल्व्ह होऊन जातो की विचारू नका.. पडद्यावर अमिताबच्चन (हे असंच म्हणतात ना?) ने रडण्यासाठी डोळे लाल केले कि माझ्या डोळ्यातून टीपं गळायला लागतात, कुठल्या सस्पेन्स सिनेमात दरवाजा करकरला कि माझी हवा टाईट होते, कोणी मारामारी करायला लागलं की उसना जोश चढतो! घरात टीव्ही वर पण बातम्या वगळता काही चालू असलं की माझं असं होतं. कितीही कंट्रोल करायचं म्हटलं तरी त्या हिरो च्या जागी स्वतःला बसवल्याशिवाय माझं सिनेमा बघणं पूर्ण होत नाही.  नवीन लग्न झाल्या झाल्या आमची ही 'चला न, पिच्चर्ला जावया' म्हणायची आणि आम्ही जायचो सुद्धा!! पण नंतर एकदा 'धूम थ्री' सिनेमा बघून आम्ही आमच्या हिरो होंडा सी-डी हंड्रेडवरून घरी आलो आणि त्यानंतर तिने परत कधी सिनेमाला जाण्याचा लकडा लावला नाही. का कोण जाणे! मग आम्ही सुद्धा कधी सिनेमा बघायला थेट थेटरात गेलो नाही! हल्ली त्या मैत्रिणी मैत्रिणी मिळूनच जातात. आपला त्याला सुद्धा आक्षेप नाही.. 

तर असं आपला अगदी आत्ताआत्तापर्यंत चा जीवनप्रवास.. जाम म्हणजे जाम बोर. पण लहानपणापासून  लाईफमध्ये तसं पब्लिकला खुलवून खुलवून सांगण्यासारखं काही घडलंच नाही. म्हटलं तर आताच्या तुलनेत गरिबी होती पण माझ्या बरोबरीचे सगळेच तसे होते तर माझ्याच गरिबीचं काय म्हणून मार्केटिंग करणार? 'चालत 4 किलोमीटर शाळेत जात असे' म्हणावं तर माझ्या शाळेतली सगळीच तशी येत असत! आणि शाळा जितकी आवडली नाही तितका जास्त मला तो जाण्यायेण्याचा प्रवास आवडत असे..लहानपणी 'मिणमिणत्या बल्बच्या उजेडात अभ्यास करत असे' म्हणावं तर झगझगीत ट्यूबच्या उजेडात अभ्यास करून मी जीवनात काय असा उजेड पाडणार होतो? माझ्या आयुष्यात घडलेले प्रसंग कित्येकांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने घडलेच असतील पण म्हणून काय मी आत्मचरित्रच लिहायचं नाही काय?

तसं तिशीत गेल्यावर असलं काहीतरी लिहिणं हे अतीच होतं पण मला आताच लहानपणीचे किस्से अंधुक आठवतात तर आत्मचरित्र लिहीणाऱ्या  महान लोकांना सत्तर-ऐंशीव्या वर्षी त्यांच्या बालपणातले प्रसंग जशेच्या तशे कशे काय आठवतात कोण जाणे. आता तसाही महान बिहान होण्याचा माझा चान्स एव्हाना संपल्यातच जमा आहे.. पदरात (बायको आणि बायकोच्या पदरात ) मुलगी आहे. त्यामुळे अगदी काही असामान्य करायचा विचार जरी आला तरी परिस्थितीची जाणीव  कर्तृत्वाला लगाम घालते.. (वा वा! क्या बात है! असली वाक्य ऐकायला बरी वाटतात आणि मला कधी कधी सुचतात याचपण माझं मलाच कौतुक वाटतं.) म्हणून म्हटलं, आठवतंय तेवढं लिहून काढावं. अगदीच चरित्र लिहायचं झालं तर मूळ साचा तयार असावा! त्यातल्याच काही गोष्टी मीठमसाला लावून अजून रंजक करून टाकता येतील. मला उपयोगाला नाही आलं तरी इतरांना-त्यांच्या आत्मचरित्रात!

थोडक्यात एखाद्या सामान्य माणसाचा या वयापर्यन्तचा ताळेबंद थोडाबहुत असाच असेल. आतापर्यंत आयुष्यात जे जे घडलं आहे त्यातलं एवढंच लक्षात आहे त्यामुळे डायरेक 'संपलं' असं म्हणण्यापेक्षा एखाद्या साहित्यिकासारखं 'आटोपतं घेतो'! धन्यवाद...

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

ताळेबंद-जमेल तेवढा

आंतरजालावरून साभार
मी अमुक अमुक..अं हं हं.. लगेच फेसबुकवर शोधू नका.. तुम्हाला वाटतोय तो मी नव्हे. अहो खूपच कॉमन नाव आहे माझं. असो.. आज काय प्रयोजन.. तर तसं काहीच नाही. बोलावसं वाटलं म्हणून बोलतो. जेव्हापासून मला समज आली तेव्हापासून खूपदा हे असं फिलिंग येतं मला, पण घडाघडा बोलून टाकता येत नाही. शाळा कॉलेजात- वर्गात असताना ब-याचदा मला शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर येत असत..पण मी कधी बोललो नाही. गुरुजी बाई म्याडम किंवा सरांनी प्रश्न विचारला आणि 'मला उत्तर येतंय' असं वाटत असलं कि प्रत्येकवेळी 'ह्या..एवढं सोप्प असतं तर थोडीच विचारलं असतं?' किंवा 'त्या हुशार मुलाने/मुलीने हात वर नाय केला मग आपण कसा करायचा?'  किंवा ' सांगितलं आणि चुकलं तर? आणि मग सगळे हसले तर?' हा अधिकचा प्रश्न मला पडायचा आणि मी उत्तर देणं टाळायचो. नंतर कोणीतरी उत्तर दिलं आणि ते माझ्या उत्तराशी जुळत असलं कि हळहळ वाटायची.. तेव्हा आज ठरवलं कि वाटतंय न मग बोलून टाकूया..ऐकायचं ते ऐकतील.नाय ते सोडून देतील. इथे मार्क थोडी ना आहेत..

आता मी काही लेखक वगैरे नव्हे त्यामुळे साधं शुद्ध लिहायलाही जमत नाही. पण निदान नेहमी ऐकतो तसच्या तसं लिहायचा प्रयत्न करतो. सिंह शब्द 'सिंव्ह' असा म्हणायचा आणि 'सिंह' असा लिहायचा यामुळे काय साधतं ते मला पण कळलं नाही! (होय ला पद्धतशीर 'होय' लिहायचं पण नाय ला 'नाही' असं का? ते कळत नाय-आपलं-नाही) हल्ली शेजा-याचा तिसरीतला मुलगा किंवा पहिलीतली मुलगी असले प्रश्न विचारतात..उत्तर नाही आलं तरी त्यांचं कौतुक वाटतं. कबूलच करायचं झालं तर मला हा प्रश्न तिने विचारेपर्यंत पडला नव्हता! हल्लीची पिढी खूपच हुशार. जनरेशन ग्याप ला ग्याप म्हणायला लाज वाटावी एवढी मोठी झाली आहे ती..ग्याप कसली दरी आहे मोठ्ठीच्या मोठी.

मी शाळेत असताना, कधीतरी खर्चाला मिळणा-या ५ रुपयाच्या नोटेवर 'मैं धारक को अमुक अमुक रुपये अदा करने का वचन देता हुं' असं का लिहिलेलं असतं हा मला पडलेला आणि कोणाला उत्तर माहित नसलेला कठीण प्रश्न! मला असं प्रश्न पडला आणि पडू शकतो याचा मला कोण अभिमान वाटला होता. त्यानंतर मग कठीण म्हणावा असा प्रश्न पडला नाही. कधी पडलाच तर त्याच उत्तर 'येवढा मोठ्ठा झालास तरी साधं येवढं कळत नाही?' किंवा 'नुसता वाढला रेड्यासारखा पण अक्कल काडीची नाही' किंवा 'गप्प बस' यापैकी एक होतं. तसंही मी प्रश्न विचारतोय आणि समोरच्याने उत्तर देणं अपेक्षित आहे हे प्रसंग सुद्धा माझ्या आयुष्यात मोजकेच आले. अन्यथा बायको, शिक्षक, प्रोफेसर्स, नातेवाईक ,साहेब हा प्रवर्ग अनुक्रमे घर, शाळा,युनवर्सिटी,  हॉपीस या ठिकाणी खिंडीत गाठून मलाच प्रश्न विचारण्यासाठी जन्माला आला होता याबद्दल माझ्या मनात अजूनतागायत शंका नाही.

शाळेत शिकलो मराठी मिडीयम मधून पण फक्त म्हणायला आणि इलाज नव्हता म्हणून. अभ्यास वगैरे जेमतेमच केला. आता 'जेमतेम केला' म्हणजे तेवढाच यायचा. जास्त करायचा ठरवला असता तरी मला करता आला नसता.  आमची आई तर सुरुवातीला "आमच्या वेळी आम्हाला परिस्थिती मुळे  जमलं नाही, तुम्ही शिकून मोट्ठे व्हा' वगैरे डायलॉक्स मारायची. मी खूप इमोश्नल  होऊन जायचो आणि तावातावाने पुस्तकाचं पहिलं पान वाचून काढायचो.  इंग्रजीचं असेल तर डिक्शनरी वगैरे उघडून बसायचो.पण कितीही इमोशनल झालो तरी माझा उत्साह दीड पानात गळून पडायचा. कांबळी नि तेंडल्याचं करियर जास्त आकर्षक वाटायचं! अशी कित्येक पुस्तकांची पहिली पानं मी कित्येकदा नव्याने वाचली आहेत पण परीक्षेत कधीच पहिल्या पानात उत्तर असणारा प्रश्न कधीच विचारत नाहीत हे इतक्या परीक्षांच्या अनुभवांवरून मी छातीठोकपणे सांगू शकतो! अपवाद आमच्या दहावीत असणारा 'नरिंद्रबासा भेटी अनुसरण' नावाचा टुकार एक पानी धडा! तो अक्खा धडा पाठ असूनही त्यावरच्या एकाही प्रश्नाचं उत्तर धड जमलं नाय बुवा. त्या धड्यावर थोडक्यात उत्तरं असूदेत किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण असुदेत मी जवळपास सगळा धडाच लिहीत असे आणि जमतील तितके मार्क गोळा करीत असे!

तर एवढा(स्सा) अभ्यास करूनपण आईचं  तेच पालुपद!  "आमच्या वेळी आम्हाला परिस्थितीमुळे जमलं नाही आणि हे कार्टं  बघा!" एवढाच काय तो वाक्यात बदल. त्यामुळे मी माझं बरचसं लहानपण मी खूप मोठ्ठ्या भावनिक दबावाखाली काढलं. पण इतरांना आणि त्यावेळी मलादेखील ते कळलं नाही. जरा मोठं झाल्यावर एकदा मला बाहेरून परीक्षा देता येतात ते कळलं. मला वाटलं आईसाठी हि चांगली संधी आहे. पुढे एकदा तिने तो पठडीतला डायलॉक मारल्यावर मी म्हटलं कि "आई, आता तू अभ्यास करून बाहेरून परीक्षा देऊ शकतेस!" तर जी भडकली म्हणता! पाठीचं धीरड  होईपर्यंत धोपटलं  मला. जाम रडलो होतो तेव्हा. त्यानंतर समजलं कि   मला निव्वळ इमोशनल ब्ल्याकमेल करण्यासाठीच तिला ते वाक्य आवडायचं कारण त्यानंतर तिने कधीच हे वाक्य माझ्यावर फेकलं नाही!

बाबांनी तर मला जाम धुतला आहे. माझ्याच वस्तू मोडणे, हरवणे, वापरण्याच्या लायकीच्या न ठेवणे, नवीन वस्तूंसाठी हट्ट करणे, बेहिशेबी मालमत्ता जमवण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या लक्षात येईल इतका जास्त वेळ खेळणे अथवा घराबाहेर घालवणे, अभ्यास न करणे इत्यादी (माझ्या दृष्टीने) किरकोळ गुन्ह्यांकरता त्यांनी आपला हात साफ करून घेतला आहे. कधी कधी तर त्यांना फक्त खुमखुमी आली म्हणूनही फालतू कारण उकरून काढून धोपटला असावा असा माझा कयास आहे! मी मोठा झालो आणि सरकार-मध्यमवर्ग, पोलीस-मोर्चेकरी, सरकारी अधिकारी- गरजू व्यक्ती याची नाती बघतो तेव्हा कळतंय कि उलट मारू न शकणाऱ्याला असंच धोपटण्यात कोणालाही मजाच येत असावी! आमचं  कुठलं एवढं सुदैव?

आता जेमतेम तिशीचा आहे मी.. थोड इकडे तिकडे..(खरंतर बराचसा तिकडेच) पण आताच 'आमच्या काळात हे असं होतं' म्हणण्यासारखी परिस्थिती बदलली आहे.  काय महाग झाल्याहेत वस्तू. सोनं 30000 रुपये तोळा झालंय म्हणे.. जेमतेम 3000 रुपये तोळा असतानाचे दिवस माहित आहेत आहेत मला.. पेट्रोल तर 10 रुपयाने होतं. आमची आजी लहानपणी 'आमच्या काळात 300 रुपयाने होतं सोनं' वगैरे गोष्टी सांगायची पण त्या हिशेबाने मी सत्तरीत पोचल्यावर आताचे रेट असणं अपेक्षित होतं पण काहीतरी गंडलंय खरं. महागाई वाढली असं म्हणायला गेलो तर परवा टीव्ही  घेतला, आमच्या बाबांनी दहा-पंधरा वर्षापूर्वी घेतला होता त्याच किंमतीत आणि  त्याच्यापेक्षा कैकपट भारी. काय पिक्चर क्वालीटी आहे म्हणून सांगू..

लहानपणी या टीव्ही वरची 'मम्मी' बघून मला शिवाजी महाराजांसारखं  'अशीच अमुची आई असती वगैरे वाटायचं'  पण आमच्या आईकडून तर बहुतेकदा मार आणि रोजच्या दोन वेळच्या जेवण्याव्यतिरिक्त इतर काही खायलाही मिळालंही नाही..  मॅगी वगैरे तर लांबची गोष्ट! तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराज आणि त्यांच्यासारख्या मोठ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींना ते मोठे झाल्यावर महत्व आलं असावं. कारण एकदा एका १ ऑगष्टला टिळकांवरती बाकीच्यांनी केलेल्या भाषणं प्रेरित होऊन, मी वर्गात 'मी कागद फाडला नाही मी कपटे उचलणार नाही असं सांगितलं होतं' पण त्याला कोणीच 'बाणेदारपणा' वगैरे म्हटलं नाही. बाईंनी २५ उठाबशा काढायला लावल्या आणि झाडू घेऊन सगळा व्हरांडा झाडायला लावला होता. तेव्हापासून माझी हि समजूत दृढ होत गेली आहे.

'उच्च' शिक्षणासाठी (म्हणजे बी ए) मुंबईत गेल्यानंतर कॉलेजामधली एकंदर परिस्थिती बघता मला मराठी मिडीयम मधून शिकल्याची तशी लाजच वाटायची. बाहेरच्या राज्यातून आलेली मुलं हिंदी इंग्रजी बोलून एकमेकांवर ,शिक्षकांवर आणि विशेषकरून मुलींवर छाप पडत असत. आलेल्या मुलांवर मी उगीच हिंदीतून बोलून इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करायचो. ती पोरं हिंदीतून बोलायची तेव्हा मला कधी मराठी बोलावसं वाटलं नाही. मला वाटायचं कि असं केलं तर पोरं मलाच हसतील.आणि फ़क्त मीच असा नव्हतो..बरेच होते.. 'इंग्रजी बोलता न येण्याचा न्यूनगंड फ़क्त हिंदी बोलून दूर सारता येतो' या मताचे.. त्यामुळे माझं इंग्रजी तसंच राहिलं आणि मराठी असल्याचा सुगावा इतरांना लागू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहिलो..आईवडिलांनी इंग्लिश मिडीयम च्या शाळेत न घातल्याबद्दल त्यांना दूषणं  देत बसलो!बरेचसे तसंच करायचे.

एक मात्र होतं, कॉलेजात गुजराती पोरं एकमेकांशी गुजरातीतून बोलत, आंध्रची तेलुगुतून, केरळची मल्याळीतून परंतु हीच मुलं शिक्षकांशी, जमत असेल तर अस्खलित, नसेल तर तोडक्या मोडक्या इंग्रजीतून बोलत.. आम्ही मराठी मात्र एकमेकांशीही हिंदीतून बोलत असू आणि शिक्षकांशीही.. मराठी वापरली ती फ़क्त शिव्यांपुरती! मराठी शिकू पाहणाऱ्या परप्रांतियांना शिकवल्या त्या मराठी शिव्या! त्या मुलांना कधी मराठीमुळे अडेल अशी वेळच येऊ दिली नाही.. कायम त्यांचा भाषान्तरकार म्हणून वावरलो.पण मी मिक्स नाही होउ शकलो.. खरतर त्यानाच मी कितपत हवा होतो काय माहीत! त्यांच्या ग्रुप मध्ये मी असताना ते एकमेकांशी त्यांच्या भाषेत बोलत असत; मला समजत नाही याचा विचार न करता.. परंतु मी मात्र, ग्रुपमध्ये एखादाही मराठी न समजणारा असा कोणी असेल तर त्याला कळावं  म्हणून न चुकता हिंदीतून बोलत असे. सहिष्णुता कि सगळा व्हरन्याक असल्याचा परिणाम! कोण जाणे? असो.. आता मुलीला इंग्रजी मीडियम शाळेत घालून पापक्षालन करीन म्हणतो..

शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी फार आटोकाट प्रयत्न केले..  पण स्वतःची पब्लिसिटी करणं मला जमलंच नाही. 'मी आहे तसाच मला घ्या आणि मला हव्या त्या पगारावर ते पण मुंबईतच!!' हा मित्रांच्या टोळक्या बरोबर जमवलेला उसना एट्टीट्यूड पहिल्या काही मुलाखतीत गळून पडला.. "तुम्ही म्हणाल ते आणि पडेल ते काम करायला तयार आहे..काही महीने फुकट करतो हवं तर! तेही कुठेपण" इथपर्यंत माझं ट्रांझिशन व्हायला काहीच दिवस पुरले. बाबांच्या वशिल्याने मी पुण्यात आता आहे तिथे नोकरीला लागलो. तिथपासून आजवर केवळ नोकरी टिकवणे हा माझा उद्देश राहिला आहे. नोकरीवरुन तड़काफड़की काढू नये आणि शक्यतो सुट्टीच्या दिवशी सुट्टी मिळावी या दोन माफक अपेक्षा घेऊन मी पाट्या टाकत आहे! 

घरी आलो की मात्र नेमाने दमल्याची ऍक्टिंग करतो.. ते पण मला सुरुवातीला माहित नव्हतं पण नवीन लग्न झाल्यानंतर  पहिले काही दिवस  ऑफिसातून आल्यावर बायको ' दमला असाल ना, चहा करते' असं म्हणत असे.. दिवसातला तो तासभर बसल्या बसल्या चहा मिळतो, कुठे जायचा धोशा मागे लागत नाही, हवं ते चॅनल बघता येतं, कसल्या घरगुती तक्रारी सांगितल्या जात नाही, डोळा लागला तरी खपून जातं या आणि अशा विविध फायद्यांची जाणीव झाल्यामुळे मी ती एक्टिंग करायला लागलो आणि नंतर ती अंगवळणीच पडली! नाहीतर दिवसभर खुर्चीत बसून कसला आलाय थकवा? माझ्या बघण्यातला बैठं काम करणारा कोणीही नोकरदार दिवसभर मान मोडून फक्त काम करतोय आणि खरोखर 'दमलाय-बिमलाय' असे पाहण्यात नाही.. पण वर्षानुवर्षे ऑफिसमधून येणाऱ्या नोकरदार पुरुषवर्गाला घरात हक्काने मिळणारा परंपरागत वेळ आपण का उपभोगू नये हे आपले माझे मत! अर्थात कच्चेच! 

नोकरीच्या ठिकाणी सुद्धा माझी फारशी पक्की मतं नसतात. त्याक्षणी त्यावेळी मला जे पटेल तेच माझं त्यावेळचं मत असतं.  आता बघा, सरकारी लोक, राजकारणी हे लोक करत असणाऱ्या करप्शन विरोधात मी कधीकधी तावातावाने बोलतो  (म्हणजे अजूनपर्यंत तीनदा बोललोय) आणि माझा राग व्यक्त करतो. सगळीकडेच. परवा तर म्हणजे गंमतच झाली....

ताळेबंद : उरलेला