सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

परवाना करी दिवाना : पूर्वार्ध


अमेरिकेला जाणे राहणे परतणे याबद्दल मध्यमवर्गीय भारतीय जनमानसात पूर्वीइतकं कुतूहल नसावं.. तरीही तिथल्या काही गोष्टी अजूनही अनाकलनीय आहेत हे पण तेवढंच खरं.  या देशातल्या  मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्रानंतरची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडी! हो... बरोबरच बोललो मी.. गाडीच! कदाचित वस्त्रापेक्षा जास्त महत्त्व  गाडीला असावं! निवारा बिवारा सगळं नंतर.. कारण इथल्या टीव्ही वर मी एक होमलेस लोकांसाठीच्या एनजीओ ची जाहिरात पाहिली.. त्यात ती होमलेस बाई आपल्या गाडीच्या दरवाजांवर कपडे वाळत घालते आहे, लहान बाळाला मागच्या सीट वर झोपवते आहे असे हृदयद्रावक वगैरे चित्रण होते!! त्यामुळे (बाई)माणूस होमलेस असू शकतो पण कार-लेस नाही अशी माझी धारणा बनली तर त्यात काय नवल? साफसफाई करणारे लोक, रस्ता दुरुस्ती करणारे कंत्राटदार, पोस्टमन, गवत कापणारी माणसं (जीन्स-टी शर्ट- गॉगल-हेडफोन सहीत  हि कामं  करणाऱ्यांना आणि फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्याना डायरेक्ट कचरेवाला,कामगार किंवा माळी म्हणायला अजून जीभ सरावत नाही!) ज्या पद्धतीच्या गाड्या घुमवतात त्यावरून निवाऱ्यापेक्षा चारचाकी महत्वाची असावी यावर मी शिक्कामोर्तब करून टाकलं. अर्थात मनातल्या मनात! (नायतर आमच्या शिक्कयाला विचारतो कोण?)

10 मिनिटांवर असणाऱ्या ऑफिसमध्ये घेऊन जायला आणायला काही दिवस तरी गाडी असताना आपल्याला ताबडतोब कशाला लागतेय गाडी? असा तत्कालीन धोरणी विचार मी करत होतो पण ऐनवेळी संपलेलं दूध, किराणा माल वगैरे किरकोळ गोष्टींसाठी पहिल्याच आठवड्यात मैलोनमैल पायपीट करायची वेळ आल्यानंतर "कसं जमायचं गाडीशिवाय?" असा प्रश्न पडायला लागला! 10 मिनिटं लागणारं ऑफिस 4 मैलावर (अमेरिकेतल्या 'प्रयोगातून विज्ञान' विषयात एम के एस मोजमापन पद्धती शिकवत नसावेत) आहे हे गुगलमॅप मधून कळलं! ऑफिसच्या सहकाऱ्यांकडून "बँकेत जायचंय ? जवळच आहे.. 5 मैल.. मेडिकल स्टोर इथेच तर आहे हार्डली साडेतीन मैल! भाजी मंडई 15 मिनिटाच्या अंतरावर आहे 10 मैल फक्त.. एटीम एकदम पलीकडे दीड मैल, 2 मिनिटात पोचशील. 'ड्राईव्ह इन' आहे गाडीतून उतरायची पण गरज नाही.. " वगैरे मार्गदर्शन मिळायला लागल्यावर मला जाणीव झाली कि हे काही खरं नाही. स्वतःच्या मताने चालायचं तर दोन पायांचा फारवेळ टिकाव लागणार नाही; त्यात मनाला वाटेल तसं  मूड बदलणारं वातावरण.. त्यामुळे चार चाकं हवीतच. खरंतर गाडी हि हौस म्हणून घ्यायची गोष्ट पण अमेरिकनांनी आणि इथल्या वातावरणाने ती गरज करून टाकलीये. एवढे मोठे रस्ते असताना मधून मस्त बी आर टी  वगैरे काढायची सोडून गाडी घ्यायला मजबूर करतात हे लोक! बर  दोन चाकी गाडी घ्यावी तर ती चारचाकीपेक्षा महाग.  नीच पणाचं  याहून मोठ्ठ उदाहरण कुठलं असेल? (म्हणजे असतील बरीच,पण हे वाक्य उगीच वजन टाकायला... )

जेव्हा स्वतःची गाडी घ्यायची मनाची तयारी झाली तेव्हा कळलं कि काही अमेरिकन राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य लायसन्स वर (म्हणजे भारतीय!) मी काही महिने गाडी चालवू शकतो. पण चालवता तर आली पाहिजे!  राज्य वाहतूक परवाना मिळवण्यासाठी लेखी परीक्षा आणि खरीखुरी ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते आणि त्यांच्या निकषांनुसार पास ही व्हावं लागतं हे म्हणजे अतीच झालं. भारतात बाईक जेमतेम चालवता येत असताना चारचाकीचं लायसन्स घरपोच मिळवलेल्या आमच्या काही मित्र मंडळींना हा तर सरसकट अन्याय वाटला आहे आणि त्यानी दोन पेग पोटात गेल्यावर तसं  स्पष्ट नसेना का पण अडखळत अडखळत बोलून दाखवलं आहे.  

जोपर्यंत गाडी चालवायचीच नसते तोपर्यंत ती कशी चालवावी, कशाला शिकायची वगैरे प्रश्न पडत नाहीत पण एकदा चालवायची म्हटली तर मग असंख्य प्रश्न एकामागोमाग एक पडायला लागतात. मग तुम्ही ती जगात कुठेही शिकत असा. कारण तिथले नियम!! 'भारतात चारचाकी चालवल्यानंतर अमेरिकेतच काय, अख्ख्या जगात कुठेही गाडी चालवू शकाल'  हे तद्दन भंपक विधान - खोटा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी - भारतात कधीही गाडी न चालवलेल्या व्यक्तीने निर्माण केलं आहे आणि अमेरिकेत येऊन पहिल्यांदा गाडी घेतलेल्या/शिकलेल्या काही अनिवासी भारतीयांनी ते उचलून धरलेलं आहे हे मी ष्ट्याम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे!! तसंही भारतातून अमेरिकेला येणाऱ्या पहिलटकरांना बऱ्यापैकी मिसगाईड करण्यात त्यांच्याआधी बराच काळ स्थायिक झालेले भारतीय कारणीभूत असावेत असं मी अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो.

युरोपीयनांनी कधी ना कधी बस्तान मांडलेल्या सगळ्याच देशांमध्ये गाडी चालवणारा उजवीकडे बसतो.   आपल्या गाडीत शक्यतो आपणच ड्रायवर असतो आणि अख्ख्या गाडीत कितीही माणसं आणि सामान कोंबून बसवलं तरी ड्रायवर ला कधीही अडचण होता नये असा आपल्याइथे एक (ड्रायव्हर प्रजातीने जाणीवपूर्वक पसरवलेला गैर)समजही असतो. त्यामुळे घरात मांजर असणारी मंडळी सिंहाच्या दिमाखात गाडी चालवताना (आणि नंतर गाढव बनून गाडीतलं सामान उचलताना) मी याची डोळा पहिले आहे. अमेरिकेत गाडी चालवत नसताना उजवीकडेच बसावं लागत असल्याने प्रथमदर्शनी गाडी मध्ये फारसा फरक वाटला नाही.. परंतु चालक मागे न बघता बिनधास्त आणि झपकन उजवीकडे वळतो, जवळपास सगळ्या छोट्या रस्त्यांवर ७०km/hr च्या वेगाने गाडी दामटतो, छोट्या रस्त्यावरून हळू येऊन स्पीड वाढवत वाढवत फ्रीवे वर तर १२० ने सुसाट जाणाऱ्या गाड्यांमध्ये घुसतो तेव्हा काळजाचा ठोका चुकतोच. त्यामुळे मग मी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला मग तो ऑफिस मधला ड्रायव्हर असो, कलीग असो, मित्र असो वा बॉस असो वाट्टेल ते (पण गाडी चालवण्यासंबंधीच) प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग तो नवखा असो वा मुरलेला. त्यांनीही आपलेपणाने म्हणा, मदतीच्या भावनेनं म्हणा किंवा फुशारून जाऊन म्हणा मला ज्ञानामृत पाजायला सुरुवात केली!

सुरुवातीला बाजूला बसूनही एवढा बावरून जायचो कि विचारायची सोय नाही! तसंही मीच इतरांना विचारत असे म्हणा. 'कोणी येत नसेल तर आपण रेड सिग्नलवरही राईट टर्न घेऊ शकतो' असं सांगणारा पुढे एका ठिकाणी उजवीकडे वळायचं असताना देखील रेड सिग्नलला ठोंब्यासारखा उभा राहिल्यावर मी त्याने नुकताच शिकवलेला नियम त्यालाच सांगायला गेलो तर तो उलट विचारत असे "तिथं 'नो टर्न ऑन  रेड' लिहिलंय पाहिलं नाही का?" "कुठे?"
तर  "मगाशी एक बोर्ड लावलेला त्यावर लिहिलं होतं. आता मागे गेला तो."असं तो सांगत असे.
एखाद्या रस्त्यावर अचानक गाडी एकदमच हळू केली म्हणून विचारलं तर कळलं  'इथे २५ मैल प्रति तास असं लिमिट आहे. रेसिडेन्शियल एरिया असणार '
"कुठे लिहिलंय असं?"
तर "मगाशी एक बोर्ड गेला त्यावर लिहिलं होतं.आता मागे गेला तो."हे उत्तर!
अर्थात, हळू हळू कळत गेलं की मला पडणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नाची उत्तरं 'मगाशी एक बोर्ड लावलेला होता' त्यावर लिहिलेली होती,जो मला प्रश्न पडता क्षणी मागे गेलेला असे!

यातून एक गोष्टीची जाणीव झाली की आपल्याकडचे बहुसंख्य चालक (सन्माननीय अपवाद वगळता, उगाच भावना दुखावून घेऊ नयेत!) गाडी चालवताना ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यात फक्त वाहतुकीचे नियम, सिग्नल आणि सर्व सजीव यांचाच समावेश नसून असल्या निर्जीव साइनबोर्ड्सचा पण समावेश असतो! अर्थात 'संभाजी पुलावर दुचाकी वाहनांना बंदी-सकाळी ९ ते ५' अशासारखे दुर्गम भागातले साईनबोर्ड असल्यावर कशी काय सवय लागणार म्हणा? पण असो. कळत-नकळत आपण नियमांची पायमल्ली करतो याची जाणीव होणे हे ही नसे थोडके..

एकदा आमचा एक सहकारी त्याच्या गाडीने कुठेतरी जात होता. फ्रीवे वरून मस्त सुसाट. तर अचानक भोंss भॉss क असा आवाज आला. तो टरकला. काय झालं असावं हा विचार करेपर्यन्त त्याला आरशात वेगवेगळ्या रंगांची उधळण सुरू झालेली जाणवली. हायवे पोलीस त्याच्या मागे लागला होता.  त्यामुळे पठ्ठ्याने गुपचूप गाडी बाजूला घेतली. (भारतात कोणाच्याच बापाला न जुमानता गाड्या पळवणारं आमच्या मित्रासारखं  पब्लिक इतर देशांमध्ये गपगुमान लाईन वर येतं ,हेही एक उघड गुपित आहे म्हणा!) पोलिसाच्या म्हणण्यानुसार त्याने म्हणे स्पीड लिमिट एक्सीड केलं  होतं. थोडंथोडकं नव्हे तर 70 मैल प्रति तास(120 km/h) ऐवजी हा बैल 90 मैल प्रति तास (145 km/h) ने गाडी पळवत होता.

"एss  अरे घे बाजूला, पन्नास देतोस की शंभरची पावती फाडू?' असले प्रश्न ठाऊक असणाऱ्या आमच्या परममित्राला  "जेंटलमन, व्हेर आर यु गोईंग विथ नाईन्टी  माईल्स अन आवर ऑन धिस ब्युटीफुल मॉर्निंग?" असले शालजोडीतले प्रश्न ऐकायची सवय नाही. आणि 'चुकलो,असं परत नाही करणार' या वाक्याना उत्तर मानायची त्या पोलिसाला सवय नाही. त्यामुळे दंड लागलाच! बरं पोलिसाचा एक हात पूर्णवेळ कमरेला लावलेल्या पिस्तुलावर! त्यामुळं 'जाऊ दे की मामा' म्हणून वाद घालायची सोय नाही. पण त्याच्या या अनुभवावरून मला कळलं की स्पीड लिमिट हे खरंच पाळायला असतं आणि हायवे पॅट्रोलिंग वाले ते पाळत ठेवून बघत देखील असतात. ८० km /h च्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर त्या आणि त्यापेक्षा खालच्या स्पीड ने फक्त लाल पिवळी एसटी जाते. कार नव्वद च्या खाली असेल तर तो बहुधा फाऊल धरला जातो आणि मागून दणादण  हॉर्न वाजवून तुम्हाला रेस मधून बाजूला व्हायला भाग पाडलं जातं.  या आणि अशा गृहीतकांवर आतापावेतो जगणाऱ्या आमच्या मित्राला पोलिसाचं ते वागणं त्याक्षणी फार अपमानास्पद वाटलं पण 'तुम्हाला बाजू मांडायची असेल तर इथल्या कोर्टात अपॉइंटमेंट घ्या, त्यादिवशी हजर राहून मी हवंतर स्पीडगन चा पुरावा सादर करू शकतो' असं पोलिसाने नम्रपणे सांगितल्यावर  काय करणार? त्यामुळे शहर हद्दीनुसार 135 डॉलर्स ची खमंग फोडणी बसल्यावर त्याने कानाला खडा आणि स्पीडोमीटरवर नजर दोन्ही एकदम लावले!

या खऱ्याखुऱ्या आणि असल्याच काही ऐकीव किशश्यातून शहाणं होत होत मी ड्रायविंग लायसन्स च्या परीक्षेचा अभ्यास करायला सुरवात केली.  हो अभ्यासच! शंभर पानी पुस्तकावर लेखी परीक्षा देऊन त्याच्यात ऐंशी टक्के मिळवल्यावर जर लर्निंग लायसन्स मिळणार असेल तर अभ्यास करायलाच हवा. पहिली काही पानं बाळबोध होती. या वेगाने दोन दिवसात सगळं वाचून संपेल असं वाटायला आणि खरं ज्ञान बाहेर पडायला एकच गाठ पडली! बरं नियम राहिले बाजूला नियम तयार करणाऱ्यांचं इंग्लिश इतकं भारी! 'राइट ऑफ वे' चा अर्थ 'वाटेच्या उजवीकडे' नसून 'वाट वापरण्याचा अधिकार' आहे हे कळलं असं स्वतःच्या समाधानासाठी गृहीत धरलं तरी शोल्डर ऑफ रोड, कर्ब ऑफ पेव्हमेंट, पासिंग ऑन रोड असल्या नवनवीन संज्ञा वाचून डॊक्याचं दही झालं.. 2 दिवसात संपेल असं वाटणारं पुस्तक 5 दिवस झाले तरी संपेना शेवटी एका दिवशी (म्हणजे खरंतर रात्री) इंजिनियरिंग च्या जुन्या दिवसांना स्मरून 'नाईट मारली' आणि पुस्तक वाचून संपवलं! साधारण 400 पानी पुस्तकासाठी असलेल्या 'नाईट मारणे' या संज्ञेचा अनादर टाळण्यासाठी मी अजून दोनदा ते पुस्तक वाचलं  आणि सगळं विसरण्याआधी मी लर्निंग लायसन्स च्या परीक्षेची अपॉइंटमेंट घ्यायची ठरवली. लागणारी कागदपत्र गोळा करुन मी (अमेरिकेत गाडी चालवण्यात) सिनियर पब्लिकला त्यांचे अनुभव विचारायला सुरुवात केली. इथेही इंजिनियरिंग च्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. सिनियर्स चे चेहरे वेगळे, परीक्षा वेगळी, देश वेगळा पण उत्तरं तीच! ' काय नाय रे एकदम सिम्पल असतं, माझा पहिल्या अटेम्प्ट मध्ये निघाला म्हणजे बघ किती सोप्पा असतो पेपर' पासून ' दोनदा द्यावीच लागते.. पहिला चान्स देवाचा म्हणून सोडून द्यायचा.. अनुभव येतो. पुढच्या अटेम्प्ट ला नक्की पास करतात!' अशी दोन्ही टोकाची उत्तरं मिळाली!! शेवटी नाय-होय करता करता मी एकदाची अपॉइंटमेंट घेतली आणि आर टी ओ (वाचा सेक्रेटरिएट ऑफ स्टेट) ऑफिस मधे गेलो.

अमेरिका म्हटल्यावर सगळं हाय-फंडू असा जो माझा समज करून देण्यात आला होता त्याला या लर्निंग लायसन्स टेस्ट ने सुरुंग लावला...

उत्तरार्ध

१० टिप्पण्या:

  1. हाहाहा कमाल! वेटिंग फॉर पुढचा पार्ट...

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद स्वाती जी आणि ब्लॉग वर स्वागत!पुढचा भाग लवकरच टाकतो..

      हटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!