शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

मृगजळ भाग - २


भाग - १ 

एकदा घरात येऊन कपडे बदलल्यानंतर सोहम घरच्यांव्यतिरिक्त कोणालाही न्यायला आणायला वगैरे जात नसे.. कितीही जिगरी मित्र असला तरी.. कोण बदलणार सगळे कपडे परत? घरच्या लोकांना तो shorts वर गेला तरी फरक पडत नसे.."लायसन्स आणि पीयुसी सोडून बाकी काही नसलं तरी चालेल गाडी चालवताना!" हा त्याच्या पिताश्रींचा सल्ला!

पण आता लगोलग तो कपडे बदलून तिला आणायला गेला.

"तो मला म्हणायला लागला की घरी चल.. ही काय वेळ आहे? मी विचारलं की कोण कोण आहे घरी? तर म्हणे कोणीच नाही.. मी लगेच त्याला गाडी थांबवायला सांगितली आणि उतरून तुला फोन केला.. प्लीज डू मी अ फेवर.. तू नयनाला किंवा अंकिताला यातलं काही सांगू नको.. प्ली s s ज"

सोहम ने तिला प्रॉमिस करून नयनाच्या हॉस्टेलवर सोडलं..

१२ वाजता नयना चा मेसेज आला "didi rchd"
"so late ?" सोहम ने रिप्लाय पाठवला.
"came by an auto "
म्हणजे खरच तिने नयनाला सांगितलं नव्हत तर.
"thnx :)" आकांक्षाचा मेसेज आला
"hw ws d auto ride?"
"gr8! gnsdtc"
"wish u d same!" सोहम चा रिप्लाय

त्यानंतर लगेचच आकांक्षा गावी गेली. नंतर त्यांची भेट अशी झालीच नाही.. काही दिवस मेसेजेस वगैरे चालू होते.. कामाच्या व्यापात सोहमही हे प्रकरण विसरून गेला.कधी नयना घरी गेली आणि तिचा फोन आला तर आकांक्षा सोहमशी बोलायची.. आणि 'मला तुझे जोक्स ऐकण्यासाठी तरी पुण्यात यायचं आहे' म्हणायची.. स्वाईन फ्लूच्या काळात मात्र एकदा तिचा "काळजी घे" टाईप चा मेसेज आला होता. तेवढाच..


नंतर एकदा नयना म्हणाली "दीदी पुण्यात येणारेय आता.. काहीतरी करायचं म्हणतेय.."
"म्हणजे? कायमस्वरूपी?"
"बघू.. ते अजून नाही ठरलं.."
"कधीपासून येणारेय?"
"बहुतेक पुढच्या महिन्यात.."

आकांक्षाचं पुण्यातलं पुनरागमन आणि सोहमला कंपनीच्या कामानिमित्त मुंबईला जावं लागणं हे काहीस एकत्रच आलं.. म्हणजे तो मुंबईला गेला त्याच्या बरोब्बर तिस-या दिवशी आकांक्षा पुण्यात आली.. प्रोजेक्ट कमिशनिंग स्टेजपर्यंत जायला किमान सहा-आठ महिने तरी लागणार होते.

तब्बल १५ दिवसानंतर तो पुन्हा पुण्यात आला. अंकिता त्याला भेटायला आसुसली होती. याला अचानक तडकाफडकी जावं लागलं आणि अंकिताला जायच्या आधी भेटता सुद्धा आलं नव्हतं.
"तुला काहीच वाटत नाही ना रे ? एव्हढा कसा तू स्टोन हार्टेड?" कप्पाळ! आता या प्रश्नाला तो काय उत्तर देणार?
"चल,McD मध्ये जाऊ.. तुला मस्त चिकन बर्गर खाऊ घालतो.. "
"ए काय रे.. '
"ठीकेय, फ्रेंच फ्राईज आणि कोक पण!! आता तरी येशील ?"
"तू सुधारणार नाहीस.. चल"

जे एम रोडच्या McDonald's मधून रस्त्याचा व्ह्यू दिसतो त्यामुळे बोलण्यात आणि खाण्यात लक्ष लागत नाही अस अंकिताचं लॉजिक! त्यामुळे तिने आतली जागा अडवली असणार हे माहिती असल्याने सोहम हातातला ट्रे सावरत जिन्यावरून उजवीकडे वळला..

"सोह sss म! हे बघ कोण आहे.." अंकिताच्या आवाजाने सोहमचीच नाही तर अख्ख्या जनतेच्या नजरा तिच्याकडे वळल्या..
तिथे आकांक्षा आणि प्रणील होते..
"अरे नयना गेली आत्ताच" प्रणील म्हणाला.. "पिक्चरची तिकिट्स काढलीयेत तिच्या मित्राने,आणि त्याचा प्लान कॅन्सल झाला, आम्ही विचारच करत होतो २ तिकिटांचं काय करायचं! पण आता ठरलं!"
"म्हणजे? मी पण येतोय?" सोहमने विचारलं..
"मग? अंकीने डिसिजन दिलेला आहे.. प्लान डन आहे.. आता गुपचूप चलायचं!" इति प्रणील!
"हम्म,आलिया भोगासी.." सोहमने म्हणताच अंकिताने त्याला रट्टा दिला.. सगळे हसायला लागले..

ब-याच दिवसांनी भेटल्यामुळे आकांक्षा आणि सोहमच्या पुन्हा गप्पा रंगल्या..
"ए चला,ती तिकडे वैतागली असेल.. शेवटी मलाच बोलणी खायला लागतात.." प्रणीलने सगळ्यांना उठवले.
आकांक्षा प्रणीलच्या बाईक वर बसली आणि अंकिता सोहम बरोबर.. नयना ने सगळ्यांना रिसीव्ह केलं.

"३ ईडियट्स" सुद्धा धमाल होता..

मध्यंतरात E-Square च्या जिन्यावरून उतरता उतरता आकांक्षाने सोहम ला विचारलं.. "अंकिता तुझी गर्लफ्रेंड आहे का?" त्याने थबकून तिच्याकडे पाहिलं.ती त्याच्याकडे न पाहता जिना उतरत होती..
"नाही गं, वी आर जस्ट गुड फ्रेंड्स..का गं?"
"काही नाही असंच"
"म्हणजे तुला असं का वाटलं? कि ती माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून?"
"असंच.."
सोहमचा प्रचंड राग राग झाला.. अर्धवट काहीतरी बोलून विषय सोडून द्यायचा म्हणजे काय.. श्या! पण हिला कस काय बोलणार..?
"तुला गर्लफ्रेंड आहे?" परत तिने विचारलं..
"का माझ्या गर्लफ्रेण्डच्या मागे पडली आहेस? मला जर गर्लफ्रेंड असती तर मला असं सुखाने फिरू दिलं असतं का तिने?" दोघेही या वाक्यावर खळखळून हसले..
"तुला बॉयफ्रेंड ..."
"तो विषय काढू नकोस.."
"सॉरी.."
"..."
"आणि माझ्यासारख्याला कसली मिळणारे गर्लफ्रेंड?"
"ए चल.. in fact, मुलींना तुझ्यासारखीच मुलं आवडतात!"

कॉम्प्लिमेंट?? सोहम मनातल्या मनात खुश झाला!

…पिक्चरचा सेकंड हाफ सुरु झाला..
पण सोहम चं लक्षच लागेना.. खरच तिचे आणि त्याचे खूप विचार जुळत होते.. प्रत्येक विषयातलं तिचं नॉलेज त्याच्याच तोडीचं होतं. पुरोगामी विचार, पारंपरिक संस्कृतीचीसुद्धा जपणूक, टापटीप राहणी,आदबशीर बोलणं. दिसायला सुद्धा अगदी अप्सरा नसली तरी उठून दिसणारीच होती चारचौघात.. लाईफ़ पार्टनर हवी तर अशी! नाहीतरी आपल्या घरातले लोक काही बुरसटलेल्या विचारांचे नाहीयेत,आणि आपणही नाही आहोत.. त्या त्या कोण सिंधी कि मारवाड्यासारखे..

आणि मागे एकदा जापनीज गार्डन मध्ये म्हणत होती ती कि "पैसा वगैरे नसतं रे सगळंच.. खूप पाहिला पैसा त्याच्या बरोबर असताना.. रोज कुठली ना कुठली तरी कार घेऊन यायचा तो.. हे कानातलं ५ हजाराचं आहे! Tommy Hilfigher.. "

सोहमने निरखून बघितलं.. ५ रुपये सुद्धा जास्त वाटले असते त्या तथाकथित कानातल्याचे.. हि पोरगी आपल्या रेंजच्या बाहेर आहे अस तेव्हा त्याला वाटूनही गेलं होतं..
"५ हजार? भारी आहे!" आपल हसू आवरत तेव्हा त्याने म्हटलं होतं...
….जाऊ दे!

म्हणजे फक्त आणि फक्त पैश्यापाठीच पळणारी आहे असं म्हटलं तर तसंही नाहीये, आता पेक्षा कित्येकपट जास्त पैसा पाहिलंय तिने..
जेवण होईपर्यंत ते या ना त्या विषयांवर बोलतच होते.. तो रात्रीच जाणार होता परत मुंबईला.
"विल मिस यू.." ती पुटपुटली..
ती खरच असं बोलली की आपल्याला भास झाला की आपल्यालाच असं म्हणायचं होतं? सोहम पुरता गोंधळून गेला..
"ए.. “मेड फॉर ईच अदर”! चला आवरा.. बाकीच्या दुनियेला इतरही काम आहेत म्हटलं!" अंकिताने गुलुगुलू बोलणा-या नयना–प्रणीलच्या प्रेमी युगुलाला वास्तवात आणलं.. " ए दीदी, आमची जोडी मस्त जमते की नाही गं?" नयनाने विचारलं..

"हो.. एकदम परफेक्ट!" आकांक्षा म्हणाली!
"तुला विषाची परीक्षा घ्यायला आवडत का? मला १०० वेळा आणि अंकिला १००० वेळा विचारलं असशील हे.." सोहम म्हणाला.
"आय थिंक यू कॅन मेक अ गुड पेअर" प्रणील अचानक बोलला.. " दीदी and यू! तुमचं understanding सुद्धा चांगलं आहे.."
......सन्नाटा!!
"सोहम.. आणि पेअर?? impossible !" अंकिता म्हणाली, "तो practical माणूस आहे! म्हणजे थोडक्यात मशीन! फक्त श्वास वगैरे घेतो म्हणून माणूस म्हणायचं त्याला! बघ ना.. मला न भेटता गेला मुंबईला आणि त्याला त्याचं काहीच नाहीये.."
"ए बाई चल.. पुरे तुझं रडगाणं.. नंतर ऐकव तुझी दर्दभरी कहाणी!! मला रात्रीचीच बस पकडायचीये.."
सोहम विषय आवरता घेत म्हणाला खरा पण त्याच्या डोक्यात मात्र किडा वळवळायला लागला..

रियली, अशीच बायको शोधत होतास ना तू? अशीच हुशार, जिच्याशी सतत बोलत रहावस वाटेल, जिच्याशी गप्पा मारताना किंवा तिच्या गोष्टी ऐकताना बोअर होणार नाही.. लग्न करायचं ठरलं कि घरच्यांनासुद्धा जातीपातीचा अडसर नाही येणार.. हो.. आकांक्षा सारखीच मिळावी बायको.. मग आकांक्षा सारखी का? आकांक्षाच का नको? बोलून दाखवू का तिला? सोहमच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं..

सोड रे!! तिच्याच मनात नसेल तसं काही. उगीच एकतर्फी विचार करण्यात काय फायदा? तुला काही सिग्नल दिला का तिने? जाऊ दे.. सोहम हा तुझा प्रांत नव्हे! त्याच मन त्याला समजावत होतं..

सोहम ने ऑफिसच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं.. नयनाचा पण contact नको आणि प्रणीलचा पण.. भानगडच नको काही.. गाडी परत रुळावर येत होती पण एके दिवशी सोहमला एका अननोन नंबर वरून मेसेज आला..

..."hi,dis is my new no. b in touch" आकांक्षाच असेल का ही? की आपल्याला असं वाटतंय?
त्याने फोन केला.. अननोन नंबर ला फोन करायची त्याची हि पहिलीच वेळ बहुधा!
"हलो, कोणाचा नंबर आहे हा?"
"माझा! अरे आकांक्षा बोलतेय..काय तू ? मुंबईला गेलास आणि आम्हाला विसरूनच गेलास.."
"अं.. हो.. वर्कलोड होता गं खूपच. जमलंच नाही... आणि न्यू नंबर म्हणजे आधीचा नंबर चेंज केलास कि अजून एक घेतलास?" सोहमने विचारलं.
"म्हणजे? मागच्या महिन्याभरात मला मेसेज वगैरे पोचत नाहीत हे तुझ्या लक्षात नाही आलं? एक महिना झाला मला आधीचा नंबर बंद करून..."
"..."
"आहेस का?"
"हो अगं.. तसं नाहीये पण.. जाऊ दे .. का बदललास नंबर? काही खास कारण?"
"हो काही लोकांचा contact नको होता.. फार कमी जणांना दिलाय मी हा नंबर."
"आणि तुझा तो यामाहा आर १५ वाला मित्र?"
"तुला चेष्टा सुचतेय का? त्या दिवशी नंतर परत contact पण नाही केला मी..ते राहू दे परत कधी येतोयस पुण्यात?"
"मे बी नेक्स्ट वीकेंड.."
"भेट मग तेव्हा जमलं तर.. we will have fun! "
"या शुअर!"
मग पुन्हा आठवडा-दोन आठवडे मेसेजेस,कॉल्सचा सिलसिला सुरु झाला..!

पुढच्या वीकेंडला तो पुण्यात यायला निघणार इतक्यात तिचा फोन आला..
"हाय! कुठे आहेस?"
"पुण्यात येतोय.. "
"कधी पोचणार ?"
"रात्री उशीर होईल.. आता साडे-दहा वाजलेत म्हणजे दादरची वीकेंडची रश बघता आणि मुंबईचं ट्राफिक विचारात घेतलं तर.. "
" दीड-दोन तरी वाजतीलच" तिने वाक्य पूर्ण केलं.." मी राहिलीये मुंबईला.."
"बोल, काय म्हणतेस?" हसत हसतच सोहमनं म्हटलं..
"अं.. मला एक काम आहे उद्या सकाळी. मला सोडायला येशील?"
"किती वाजता?"
"सहा वाजता.."
"किती?? सहा???? सकाळचे सहा? " सोहम गडबडला..
"हो.."
"ऐक ना.. वाईट नको वाटून घेऊ पण मला सकाळी उठणं जमत नाही.. खरच..! तू प्लान पोस्टपोन करून शकतेस का?"
"मला सहा वाजताच जायचं होत.. बघ ना.. ट्राय कर.. मला पुण्यात जास्त काही माहित नाही.. आणि रिक्षावाले तर तुला माहितीच आहेत."
" हो.. तेही खरंच.. ठीकेय मला उठवायला कॉल करशील सकाळी?"
"करते.. चलो बाय गुड नाईट आणि happy journey!"
"thanks"

'सालं का होतं असं सगळं..? मी लांब पळायला बघतोय तितका त्यात ओढला जातोय..' सोहमला माहित होतं प्रत्यक्ष देवाने मनात आणलं तरी सकाळी सहा वाजता जाग येणं कठीण होतं.. आणि रात्री २ ला झोपल्यावर तर अशक्यच!

अलार्म क्लॉक, मोबाईल,मित्र आणि आकांक्षा सगळ्यांनी प्रयत्न करून देखील आठ वाजेपर्यंत त्याचा डोळा उघडला नाही.. मोबाईल वर ११ मिस्ड कॉल्स!! तो तिला पुन्हा कॉल ट्राय करत होता पण तिने काही फोन उचलला नाही... 'सॉरी' चे मेसेज पाठवूनही काही फरक पडला नाही!

एवढं काय वाईट वाटून घ्यायचं तिनं? मित्र या नात्यानं मी आधीच कल्पना दिली होती कि मला जमणार नाही.. ‘येतो’ असं कन्फर्म सांगून ऐनवेळी के एल पी डी तर केला नाही? तरी हे नाटक? गेली उडत.. साला किती विचार करायला लावते ही पोर.. विनाकारण आपल्या डोक्याला शॉट! सोहम मनातल्या मनात स्वतःला आणि आकांक्षाला शिव्या घालत होता.. वीकेंडला ती त्याला भेटली नाही हे वेगळे सांगणे न लगे! अंकिताला चेहरा दाखवून तो पुन्हा कामावर रुजू झाला..

“पुन्हा तीच मुंबई.. पुन्हा तोच क्लायंट, पुन्हा तेच काम थोडक्यात पुन्हा तेच रुटीन. पण आकांक्षाबद्दलचे विचार जात नाहीत मनातून.. खरोखरच काहीतरी वाटतंय तिच्याबद्दल आपल्याला...पण तिला काहीच नाही वाटत! च्यायला!! होतं असं कधी कधी.. अंकिता नाही का हेच बोलत आपल्याबद्दल?” त्याने झरझर तिच्याबद्दलचे त्याचे विचार कागदावर उतरून काढले.. “हम्म आता जरा कुठे ओझं उतरल्यासारखं वाटतंय.. देऊन टाकावा का हा कागद? जास्तीत जास्त "नाही"च म्हणेल ना? पण "नाही" म्हणाली तर? सहन करता येईल का मला?”

कित्येक दिवस तो डायलेमा मध्येच होता.. हिय्या करून त्याने एके दिवशी तिला मेसेज पाठवला.. पण.. "delivery report: failed "

नंबर बदलला वाटतं हिने.. त्याने नंबर ट्राय केला.. बंद!! साला.. आपण काहीतरी ठरवतो आणि कसा ना कसातरी त्याचा विचका होतो.. आता काय करायचं?? काहीच नाही.. तिला जर थोड तरी काही वाटत असेल तर करेल ती आपणहून contact..

२ महिने असेच गेले.. मुंबईचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं होतं... अजून एखादा आठवडा मग पुण्याला परत! त्याच्या डोक्यातून आकांक्षा काही गेली नव्हती पण कामापुढे तिला वेळही देता येत नव्हता.. आणि कसा देणार? तिचा नंबरही बंद होता. अशातच पुन्हा एकदा त्याला एका अननोन नंबरवरून मेसेजेस आले.. मैत्री वगैरेबद्दल! त्याने नेहमीप्रमाणे "who is this" वगैरे विचारायचं सौजन्य सुद्धा दाखवलं नाही.. ४-५ मेसेजेस नंतर त्याच नंबर वरून आलेल्या एका मेसेज खाली –Dr. Akanksha अशी सिग्नेचर दिसताच तो मनोमन खुश झाला. त्याच रात्री त्याने फोन लावला..

ख्यालीखुशाली विचारून झाल्यानंतर त्याने विचारलं..
"नंबर बदललास का पुन्हा? मी आधीच्या नंबर वर ट्राय केला होता आणि अननोन नंबर्सना मी भाव देत नाही हे सांगितलंय ना तुला मी एकदा?"
"हो माहितीये.. मी तुझी टेस्ट घेत होते.." -आकांक्षा
"कसली टेस्ट? आणि पास झालो का मी?" इति सोहम
"आता झालास पण मागे एकदा फेल झाला आहेस.."
"कधी ग?"
"मला गरज होती तेव्हा सोडायला नाही आलास तू.. माझी केवढी धांदल उडाली माहितीये त्या दिवशी?"
"सॉरी अगं.. माझा weak point आहे सकाळी उठणं हा.. म्हणून मी तुला काहीच कमीट सुद्धा नव्हतं केलं"
"ठीकेय ठीकेय.. बाकी काय म्हणतोस?"

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने तो पुन्हा पुण्यात जातोय हे तिला सांगितलं. पण नेमकी त्या आठवड्यात ती घरी जाणार होती त्यामुळे लगेचच भेटणं शक्य होणार नव्हतं..
“ठीक आहे ‘सब्र का फल मीठा होता हैं’ असं म्हणतात.. पाहू..”
मात्र या वेळेला तिला तो कागद तरी द्यायचाच हे त्याने ठरवलं होतं.. “बोलायचं तर धारिष्ट्य नाहीये.. लिहूनच सांगू..” पण हे एकतर्फीच आहे का सगळं? या प्रश्नाचा त्याला उलगडा होत नव्हता..

त्याला प्रसंग आठवू लागले..
"काय रे मला जे मेसेजेस पाठवतोस तेच नयनाला पण पाठवतोस का?" मागे एकदा तिने विचारलं होतं..
"म्हणजे आधी पाठवायचो एकत्र पण हल्ली नाही पाठवत.."
"डोन्ट डू इट.. मला नाही आवडत ते.."
"अगं हल्ली नाही पाठवत.. पूर्वी पाठवायचो अगदीच ओळख नवी होती तेव्हा.."
"ठीके ठीके"

का पझेसिव्ह आहे ही इतकी माझ्याबद्दल? केवळ मित्र म्हणून? "यू कॅन मेक अ गुड पेअर" असं प्रणीलनं म्हटल्यावर त्याला हसून दाद देणारी तीच होती.. आपणच जरा कावरे बावरे झालो होतो तेव्हा..

तिने फोन कट केला कधी तर " सॉरी स्वीट्स" सारखा रिप्लाय एखादी मुलगी आपल्या ‘नुसत्या’ मित्राला देते? अंकीने कधी नाही म्हटलं असं अजून! इतर मैत्रीणीपैकीही कोणी असं बोललं नाही..
जर तिला काहीच नसतं वाटत,तर एकदा धोका दिल्यावर सुद्धा का पुन्हा पुन्हा नंबर देतेय ती तिचा?

"रात्री झोपताना ब्रश करत जा' अशा सूचना करणारे मेसेज आपण कोणाला उभ्या जन्मात फॉरवर्ड केले नाहीत पण तिने मात्र आपल्याला पाठवलेत.. तिचा पझेसिवनेस तर जाणवतो आहेच. हे सिग्नल नाही तर काय आहे? "पेरेंट्स बरोबर आहे.. बोलू शकत नाही म्हणते" म्हणजे असं काय बोलायचं असतं? पेरेंट्स बरोबर असताना "नुसत्या मित्रांशी" आपण बोलू शकतो ना? मग आपल्याला ती कोणी "नुसत्या मित्रांपेक्षा" वेगळा समजते का? सोहम च्या मेंदूत विचारांनी थैमान घातलं होतं..

आपल्यालाच ते सिग्नल कळत नाहीयेत का? कि आपण ते मुद्दाम तिला कळू देत नाहीये? कोणाला फसवतोय आपण? तिला, इतरांना कि स्वतःलाच ??

ठरलं तर मग.. या वेळेला भेटू तेव्हा सांगायचंच.. "मला तू आवडतेस.. या माझ्या तुझ्याबद्दलच्या भावना..तुझा विचार काय तो कळव!"

क्रमश:

अंतिम भाग

1 टिप्पणी:

  1. offo!!!parat, to be continued:-p...u have good skills to increase an anxiety of people...to anxious to knw abt the END!!hey n i got ur thanks giving msg from our comman frnd..u r WELCOME!!n ur track is going FABULOUS!!!keep goin..gdtc

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!