मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

आज्जी..


"रे असो काय करतं? वायच ह्यो निवळ घे नि मग जा खंय तो.." मी शाळेतून घरी आल्यानंतर लगेच कुठे बाहेर पडायला लागलो कि आजीचा डायलॉग ठरलेला. दुपारचं जेवण करायच्याआधी साधारण ११.३०-१२ वाजता तांदळाची पेज पिणे हा शिरस्ता होता. ती स्किप करता उपयोगाची नाही. या पेजेतला तांदळाचा भात वगळता वरचं पाणी म्हणजे "निवळ". पेज नको म्हटली तर "निवळ" तरी घ्यावा हा आजीचा आग्रह. त्या पाण्यात सगळी पोषक तत्व आलेली असतात असं तिचं म्हणणं असे. " नको.. माका जावचा हा आता सायकल मारीत.. निवळ घेतलंय तर पोटात डूचमाळता..." माझं तिचा आग्रह मोडण्यासाठीचं ठरलेलं उत्तर. " हळू चलव हां रे सायकल.. नि लवकर ये.. गरम करून ठेवतंय पेज"

माझी आज्जी.. बाबांची आई.लहानपणी माझं विश्व होतं ते.. लहानपणापासून मी तिच्याबरोबरच असायचो आणि ती माझ्या बरोबर. तिच्या ख-या नावाने हाक मारणारं कोणीच हयात नव्हतं. आजोबा सुद्धा. मी साधारण पहिली दुसरीत होतो जेव्हा आजोबा गेले. ते काकांकडे राहायचे. आजीला कळलं तेव्हा ती धाय मोकलून रडत होती आणि तिला तसं पाहून मी हसत होतो. त्याआधी तिला रडताना कधी पाहिलंच नव्हत मी. मग मात्र ती थांबेचना म्हटल्यावर मीही रडायला सुरुवात केली असं धूसर धूसर आठवतंय..

मी "अहो आज्जी" असं संबोधन वापरायचो तिच्याशी बोलताना. पण इतरांशी बोलताना तिचा एकेरी उल्लेखच असे. आता करतोय तसा.

जाम लाड करायची माझे.. आणि फक्त माझेच हां. दादाचे नाही. नाही म्हणजे माझ्याइतके तरी नाही.माझे मात्र तिला शक्य होतील ते सगळे हट्ट पण पुरवायची. "आज्जी,माका चिटक्यांची उसळ व्हयी वाटाणे घालून.. तुमी करतास तशी.." असं नुसतं म्हटल्यावर "करतंय हां माजे बाय.." म्हणत ती नऊवारी साडीचा पदर खोचून गवार मोडायला घ्यायची त्याचवेळी काळे वाटाणे भिजत घातले जायचे. दुपारी आई ऑफिसमधून आली कि वैतागायची..
"काय आई, कशाला करता सगळं? मी आल्यावर करेन ना..!"
"गो.. गप -हंव हां, तुज्यासाठी नाय करुक हां.. हेका खावशी वाटली म्हणान करतंय.."
आई माझ्याकडे खाऊ कि गिळू नजरेने बघत स्वत:चं आणि बाबांचं ताट वाढून घ्यायची.. माझं आणि दादाचं ताट आजीच वाढायची आणि मग मला भरवायचीसुद्धा अगदी चौथीपर्यंत.. भुकेपेक्षा दोन घास कमी खावे हा सिद्धांत आजीला कधीच पटला नाही .. पोटाच्या क्षमतेपेक्षा दोन घास जास्तच खावे हे तिचं समीकरण. "वाढत्या आंगाची पोरा तुमी.. कसली कसली थेरा काढतास" म्हणत ती 'डाएट' वर टीका करत असे. तिने केलेलं केळ्याच शिकरण तर मला प्रचंड आवडत असे.. शाळेतून आलो की आठवड्यातून दोन तीनदा तरी माझा हा शौक मी आजीकडून पूर्ण करून घेत असे.

पाचवीपासून मी दुपारच्या शाळेत जायला लागलो तेव्हा सकाळी आजीची कोण लगबग असे. अगदी देवासाठी कंपाउंडमधल्या फुलझाडांची फुलं आणण्यापासून ते बंबासाठी जळण आणण्यापर्यंत! आईबाबांनी ऑफिससाठी ९:३० ला घर सोडलं कि आज्जी पूर्ण ताबा घेत असे. मग माझ्यासाठी दादासाठी आणि स्वत:साठी आंघोळीच पाणी तापवणे, चहापाण्याची छोटी भांडी आणि कप धुऊन टाकणे वगैरे छोटी मोठी कामं ती अगदी तन्मयतेने करत असे. मी आणि दादा तिला फुलझाडांच्या उंच वाढलेल्या फांद्या काठीने खाली वाकवून देणे, बंबात किंवा चुलीत सारखी काठी ढोसून निखा-यांवरची राख झटकून टाकणे, तिच्यासाठी गरम पाण्याची बादली बाथरूमपर्यंत नेऊन देणे अशी कमी कष्टाची आणि निरुपद्रवी कामं करत असू! दादाची शाळा जवळच होती त्यामुळे तो सायकल घेऊन जायचा पण मी स्कूलबसच कंटिन्यू केली होती. संध्याकाळी आलो की आजी दरवाज्यावर बसलेली असे माझी वाट पहात. मग पुन्हा चहा,आईने लपवून ठेवलेलं फरसाण आणि हव्या असतील तर गरम केलेल्या चपात्या असा दणकून नाश्ता व्हायचा. मग मी खेळायला जायला मोकळा!

घरात सगळ्यात जास्त काळ आम्हीच एकत्र असायचो. मोकळ्या वेळात आम्ही दोघेजण खूप गप्पा मारत असू. ती प्रौढ साक्षरता वर्गातून थोडंफार शिकली होती. मी शाळेतल्या गमतीजमती तिला सांगायचो आणि तीदेखील त्यात रस घेऊन ते सगळं ऐकायची. बाबा लहानपणी कसे होते,काका काय मजा करायचे शाळेत, वगैरे गोष्टी सांगायला लागायची..त्याचवेळी बाबा आले की मग अजूनच धमाल.
"एकदा आईने जेवण बनवलं होतं. मला इतकं आवडलं की मी पूर्ण फन्ना उडवला.. दोघाजणांचं जेवण फस्त केलं.." बाबा सांगायचे..
"मग आजी, तुमी काय केलास?" माझी उत्सुकता.
"काय करतलंय, सगळा सरताहा बघल्यावर परातीत पीठ भिजौक घेतलंय.. ह्येका एकदम येवढा खावसा वाटात ह्या माका कसा समाजतला?"
"कायव सांगू नुको हां.. तू तेवा कमीच बनवलंलंस. माशे असतनासुदा मी कधी येवडो जेवलंलंय नाय.." बाबांचा बचाव.
"गप -हंव! माशे असले काय तिप्पट ढकलीस ता इसारलंस? स-स चपात्ये एकटो खाय.. अशे जेवनारे तिघे.. हात मोडान येय लाटतना!!"
आजी जेवणाची मापं काढायला लागली की बाबा माघार घेत.. आणि त्याचं भांडण जुंपल की मी आणि दादा मनमुराद मजा लुटायचो.. आईपण सैंपाकघरातून बेडरूमच्या दरवाज्यात येवून कमरेवर हात ठेवून या लटक्या भांडणाची मजा घ्यायची.
"काय गो.. काय ठेवलंहं ग्यासवर?"
"चपाती करत्येय" माझ्या आईला मालवणी बोलता येत नसे
"करपात ती.. जा जवळ -हंव"
"परतून आलेय मी.." असं म्हणेपर्यंत जळल्याचा वास नाकापर्यंत पोचलेला असायचा... आई लगबगीने ओट्याजवळ धावायची..
" शिरा पडली! सांगतंय तरी ऐकना नाय... बघलं? " असं मला म्हणत आज्जी मोठ्याने ओरडायची.. " गोsss माका वाढ हां ती चपातीss"

दादाने जिम जॉईन केल्यावर त्याच्या instructor ने दादाच्या भात खाण्यावर लगाम घालायचा ठरवलं. कोकणातलं घर आणि भाताला नकार?? आजीचं पित्त न खवळतं तरच नवल!!
"काय होणा नाय २ मुद भात खालस म्हणान... अरे भाताचो पिंड आपलो नि भाताकच नाय म्हणतं? कोण हा तो सांगनारो? फटकी रे येवंदे तेच्या तोंडार..." आजीने पट्टा सुरु केला की दादा गुपचूप भात घेत असे. खरतर त्याला भात आवडायचाच पण त्याला कारण हव असे instructor ला सांगायला.. "आज्जी सांगते त्यामुळे खावा लागतो भात!"
आजी सुद्धा भाताचा छोटासा ढीग रचत असे स्वत:च्या ताटात.. मी त्याला डोंगर म्हणायचो आणि तिने वरती थोडासा खळगा करून वरण ओतलं की मी "ज्वालामुखी फुटला..ज्वालामुखी फुटला.." असं आरडाओरडा करायचो आणि आजीचा ओरडा खायचो.. "जेवूक तरी दी सुखान..." म्हणत ती जेवायला लागायची.

मे महिन्याच्या सुट्टीत तिची काकांच्या गावाला ट्रीप ठरलेली.. महिनाभर काकांकडे राहायची. तिथे माझ्या चुलत भावावर प्रेमाचा वर्षाव करायची. जून आला की आमची शाळा सुरु व्हायच्या वेळी ती पुन्हा घरी डेरेदाखल! माझ्याविना तिला करमत नसे हेच खरं. पण तेव्हा मला या गोष्टी कळत नसत.
दहावीनंतर मी पुण्याला जायचा निर्णय घेतला.. तेव्हा आजी काकांकडे होती. ती परत आल्यावर मी तिला हे सांगितलं. तिला धक्का बसला असावा. काही बोलली नाही पण तिच्या जीवाची घालमेल जाणवत होती मला. २ दिवसानंतर मी एकटा बसलेलो असताना ती आली.
"रे.. जावकच व्हया काय भायर?"
"होय ओ.. थय माका इलेक्ट्रोनिक्स घेवक मिळताहा.. हंयसर तो ऑप्शन नाय हा.."
तिला फारसे काही कळले नसावे.. पण माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढे मात्र कळले..
"तुजो बापूस म्हणत होतो की हयसुदा इंजिनयर होऊचा कालेज आसा.." ती बाबांकडून चौकशी करून आली होती..

"माजे बाय... तो फुड्चो प्रश्न हा.. मी आता अकरावी बारावी करुक चल्लहंय पुण्यात.." ती त्यावर गप्प राहिली.. मी जाणारच आहे हे मात्र तिला कळलं..

मी पुण्यात निघताना तिचे डोळे पाण्याने भरले... "आज्जी.. मी येतलय महिन्या दोन महिन्यान.. तवसर कळ काढा.. " मी समजूत घालत होतो पण माझ्या मनातही भावनांचे कढ येत होते. आजीची इतक्या वर्षाची सोबत सोडून जायचे म्हणजे काय... पण माझे मित्रसुद्धा गाव सोडून जात होते. मी एकटा काय करणार होतो? आणि कधी ना कधी.. निदान २ वर्षांनी तर जावे लागणारच होते. नाहीतरी गावातलं इंजिनियरिंग कॉलेज तेव्हढंसं रेप्यूटेड नव्हतं.

पहिले काही दिवस तिच्याशिवाय काढायचे म्हणजे प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास झाला.. आंघोळीला टॉवेल नेण्यापासून, घालायचा शर्ट निवडण्यापासून ते अगदी सर्दी झाल्यावर नाकाला विक्स चोळण्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट आजीची आठवण करून देऊ लागली,एवढा डीपेंडन्ट होतो का मी? कधी जाणवलच नव्हत आतापर्यंत!! आठवड्यातून एकदा मी घरी फोन करायचो बूथवरून तेव्हा आजीची न चुकता चौकशी करायचो आणि तिच्याशी बोलायचो पण... घरी गेलो की तिचा आनंद गगनात मावत नसे. मी पण तिला पुण्यातल्या गमतीजमती सांगायचो. तिची चेष्टा मस्करी करायचो आणि सूचनांची मोठी यादी ऐकून परत पुण्याला जायचो. पुण्यात आजारी पडलो की तिचा कांद्याचा काढा आठवायचा आणि त्यातून सुटका झाली याचा आनंदही व्हायचा!

तरुणपणी जसजसं आपण एखाद्यापासून दूर होत जातो तसतसं आपण त्याच्याविना जगायची सवय होते.. त्या व्यक्तीबद्दलच्या तीव्र भावना हळूहळू बोथट होत जातात. वर्ष दोन वर्षात मीही आजीशिवाय इतरत्र रमायला शिकलो.. पण जुनं हाड वळवावं तसं वाकत नाही. आजीला माझ्याशिवाय मुळीच करमत नसे. त्यात दादाही शिकायला म्हणून रत्नागिरीला गेला.. त्यामुळे ती अजूनच एकटी पडली.. झाडांना पाणी घालणे ,कचरा काढणे वगैरे कामं करून ती दिवसाचा वेळ काढायची. साधारण ८० वर्ष पूर्ण केली असतील तिने.. तिला तिचं जन्मवर्ष वगैरे माहित नव्हतं पण अंदाजाने तिचं वय तेव्हढ असावं..

एकदा मी न कळवता अचानक घरी गेलो.. सरप्राईज द्यायला.. सगळे खुश झाले..
बाबा आजीला म्हणायला लागले.. "इलो बघ.. शोधीत हुतस न काल.."
"मग मी सांगत होतंय ना.. तो कालच इलोहा.. होय ना रे झिला?" आजी म्हणत होती.
मला भानगड कळेना. मग आईने खुलासा केला. काल तिला स्वप्न पडलं किंवा भास झाला की मी आलोय आणि तिला हाक मारून कुठेतरी लपून बसलोय.. मला शोधून दमली;आई बाबांना सांगून थकली. कोणीच ऐकेना. आणि नेमका दुस-या दिवशी मी आलो होतो! इंट्यूशन म्हणतात ते हेच का? तेव्हा मोबाईल हा प्रकार ही नव्हता; लगेच मला फोन करून कन्फर्म करायला वगैरे. लहानपणी मी असाच तिला हाक मारून लपून बसायचो. तिच्यासाठी मी तेवढाच लहान होतो अजूनपण!

१-२ वर्ष झर्रकन गेली. मी इंजिनीरिंग सुद्धा पुण्यातच करणार हे तिला समजलं होतं. तिनं दोन महिनेच नव्हे तर तब्बल दोन वर्ष कळ सोसूनही मी तिला दिलेला शब्द पाळला नव्हता... तिचं वार्धक्य आता प्रकर्षाने जाणवू लागलं होतं. नाव विसरणं, काळ विसरणं वगैरे वार्धक्याच्या खुणा स्पष्ट दिसून येत होत्या. २ महिन्यांनी वगैरे गेल्यावर तिच्यातला बदल ठळकपणे जाणवायचा..

"खानास नाय कित्या?" मी विचारायचो
"हाडां हत नुसती.. तेंका कितीसा व्हया खाउक?" म्हणत ती विषय हसण्यावारी न्यायची.. तिच्या लहानपणाच्या गोष्टी सांगायची. तिच्या अर्थात आमच्याही नातेवाईकांनी हिच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन केलेल्या गोष्टी सांगायची..
"कामाक व्हये म्हणून मागल्यान रे तेनी ते कागद.. परस्पर जमीन तेंच्या नावावर करून घेतल्यानी.. माका वाचूक येयात असता तर?तेच्यानंतर जाऊन मोठ्यांच्या शाळेत बसाक लागलंय. पण काय उपयोग.. जमीन तुमच्या चुलत चुलत्यांच्या नावावर झाली ती झालीच.. माजीच चूक झाली.." म्हणत स्वतःच्या कर्माला दोष द्यायची..
वस्तुत: या गोष्टीचा मला काय उपयोग होणार ते तिचं तिलाच माहित.. पण तिला बहुतेक कुठल्याच बंधनात म्हणा,आरोपात म्हणा अडकायचं नव्हतं.

इंजिनीरिंगला असताना एकदा काहीतरी भयानक स्वप्न पडून मी जागा झालो. दुपारी बूथ वर जाऊन घरी फोन केला. आईने उचलला..
"हलो.. तू कशी काय घरी?"
"काही नाही.. रजा काढली होती आज. अचानक कसा काय केलास फोन?"
"असंच.. कसे आहेत सगळे? आजी?"
"बरे आहेत.."
एवढ त्रोटक उत्तर? काहीतरी चुकत होतं खास..!! २ दिवसांनी मी पुन्हा फोन केला.. "आई एक्स्पायर झाल्या रे काल.. " आई मुसमुसत होती..
काळजात धस्स झालं.. मला वाटलंच होतं. पुन्हा एकदा इंट्यूशन मिळूनही...श्या!!  "मी निघू का लगेच? परवा केला फोन तेव्हाच कि काय ?"
"तेव्हा नाही. तेव्हा सिरिअस होत्या..कालच गेल्या सगळे इथेच होते काका वगैरे. त्यामुळे फ्युनरल केलं कालच. तू आता कार्याला ये.. " आईने तसाच फोन ठेवला. आजी आता या जगात नव्हती.. माझे डोळे ओलावले.. जुने दिवस आठवून अश्रूंना बांध घालण कठीण होऊ लागलं. 'ती तिकडे आहे असंच समज' मन माझी समजूत घालत होतं पण ते तेव्हढ सोपं असतं का?

दहाव्याला मी गेलो.
"काही त्रास दिला नाही.. त्यादिवशी मला सांगीतलन रजा घ्यायला. दुपारी बोलावलं जवळ आणि मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडले.. तुझी आठवण काढत होती पण तुला मध्येच यायला कसं सांगणार ? " बाबा सांगत होते. मी सुन्नपणे ऐकत होतो. वर्षानुवर्षाचं दुखण -खुपण नाही.. कोणाकडून सेवा करून घेणं नाही कि कोणाला कसला त्रास देण नाही.. आजी निघून गेली होती.. माझी वाट बघून पण मला न सांगताच..

"पिंडाला कावळा शिवत नाहीये.." भटजी सांगत आला.
"थांबा.मी येतो." मी म्हणालो. नदीच्या काठाकाठाने चालत मी पिंडदानाच कार्य चाललं होतो तिथे पोहोचलो.
"इलो हा गेsss तुझो लाडको नातूsss" बाबा आकाशात बघत ओरडले आणि झाडावरच्या कावळ्यांनी "काव काव" करत पिंडाभोवती गर्दी करायला सुरुवात केली...

२२ टिप्पण्या:

  1. Amazing really very touching....wish I could meet your ajji....mala majhya ajjichi athavan zhali...

    उत्तर द्याहटवा
  2. Khupach chan... Wachatana te sagala dolyapudhe disala... ani kahi prasang mazya barobar ghadlya sarkhe watale....

    उत्तर द्याहटवा
  3. khup chaan !!!
    konkani language vachayla milali..mi 4 varsha chiplun la hote, agdi tikde gelyasarkhe vatle..
    good..awesome writing...

    उत्तर द्याहटवा
  4. yaa mr topper
    mala hi mazya aajichi aathavan zali
    its really touching yaar
    well expressed

    उत्तर द्याहटवा
  5. वाचकहो.. प्रतिक्रियांबद्दल आभार! माझं लिखाण आवडलं हे बघून बरं वाटलं. your inspiring words will help me to write even better. keep visiting the blog. पुनःश्च धन्यवाद!!

    उत्तर द्याहटवा
  6. khup chan jitaki bolaki titakich manala chataka lawanari tujjya aajichi goshta.

    उत्तर द्याहटवा
  7. @rishibhai: प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
    @gauri: आभारी आहे.
    @Sneha: आजीच्या वागण्याबोलण्याची तूही साक्षीदार आहेस..नाही का?

    उत्तर द्याहटवा
  8. अखिलेश, आज तुझ्या ब्लॉग ची लिंक मिळाली आणि जवळपास १०० % ब्लॉग अधाशासारखा वाचून काढला. २००७ पासून तुझ्या लिखाणाच्या शैलीचा दर्जा उंचावत गेलाय. पण या लेखाला प्रतिक्रिया देताना मात्र कि बोर्ड दिसत नाहीय, स्क्रीन दाटलेल्या अश्रूंमुळे धूसर झालीय. माझ्या आजीची मला आठवण करून दिलीस. तिची माझी भेट केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीत होत असे पण माझ्या सगळ्या भावंडात ती माझेच लाड जास्त करी.

    तुझ्या हातून असेच दर्जेदार लिखाण घडो.

    उत्तर द्याहटवा
  9. @Pravin : मनापासून धन्यवाद!! 'दर्जेदार' वगैरे विशेषणं लावण्याच्या योग्यतेच माझं लिखाण जरी नसलं तरी आपण तसं म्हटलं यातच सगळं आलं. जरा स्फूर्ती आली.

    शेवटी 'आजी'हे 'आई' सारखंच एक व्यक्तिमत्व आहे. थोड्याफार फरकाने सर्वांसाठी ते सेमच असतं. ज्यांना तिचा सहवास मिळाला त्यांच्यासारखे सुदैवी तेच! तिची आठवण (इतरांसाठी नाही परंतु माझ्यासाठी तरी) जागी ठेवण्याचा हा प्रयत्न होता.

    धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  10. हो..मलाही ते जाणवतं.. खरंच भाग्यवान आहे मी त्या बाबतीत.:)प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.. पण वाचकहो,प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते 'Anonymous' असे येईल. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  11. Chan.. Touching ....

    -- Shailesh Live-Life King-Size

    उत्तर द्याहटवा
  12. chaan...malaa maajhyaa aaji chi aathvan karun dilit Akhilesh saaheb..

    उत्तर द्याहटवा
  13. धन्यवाद शैलेश.
    आभारी आहे लीना.
    सर्व अनामिक वाचकांचे आभार..

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!