सोमवार, ५ मार्च, २०१२

वधू पाहिजे अर्थात आम्ही लग्नेच्छुक...!

(पुरुष वाचक असाल तर) डिस्क्लेमर : या ढोबळमानाने काढलेल्या कॅटेगरीज (मराठीत-क्याटेग-या) आहेत. उगीच स्वतःला यापैकी कुठेतरी फिट करून बघण्याचा अजिबात प्रयत्न करू नये आणि मुळातच सदर मतं फारशी मनाला लावून घेऊ नयेत. कारण वाचणा-याच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी (हसण्याव्यतिरिक्त इतर) काहीच करू शकत नाही.
आम्ही उपवर -१
आम्ही पहिल्या प्रवर्गात मोडतो.. याला सर्वसामान्य (आणि सर्व) लोक अतिसामान्य असं म्हणतात. आम्हाला याचं कधी कधी वाईट वाटतं पण ब-याचदा काही फरक पडत नाही.. कारण तसंही लहानपणापासून आम्ही काही विशेष केलेलं नसतं.

आमच्या (स्वभावाने गरीब असणा-या) आई बाबांच्या आमच्याकडून काही अपेक्षा होत्या कि नाही ते कळेकळेपर्यंतच आम्ही प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत गेलो.. हुशार बिशार असलोच तरी मोजकेच. म्हणजे कसं आहे कि पहिल्या पाचात नंबर वगैरे आमच्या गोष्टी नव्हेत हे आम्हाला कधी कळलंच नाही. आम्ही आपले अभ्यास कर कर करून थकलो पण आधी मिळवलेल्या मार्कांच्या एक दोन टक्के..कधी मधी पाच सात टक्के प्रगती झाली पण तेवढे टक्के आमच्या आधीच्या नंबरच्या पुढे जायलाही उपयोगी पडले नाहीत!! पहिल्या पाचाचा तर विषयच सोडा.. अगदीच ढ जरी नसलो तरी अभ्यासाचं गणित काही सहजासहजी जमलं नाही हेही खरंच.

गुरुजी अथवा बाईंनी शाळेत कधी आम्हाला उत्तरं द्यायला उभं केलं नाही किंवा छडी मारल्याचंही आठवत नाही.
कदाचित त्यांना त्याचा फारसा फरक पडत नसावा.. कधी कधी ते आमचं नाव घेत असत पण आम्ही त्यांच्या खिजगणतीत आहोत हेच बघून तेव्हा आमची छाती फुलून येत असे.

मैत्रीच्या बाबतीत ही तेच.. त्या त्या क्षणाला आम्ही ज्या ज्या लोकांबरोबर होतो ते लोक मित्र असे आम्ही समजत गेलो. शाळा, कॉलेज, नोकरी यानुसार आमचे मित्र बदलत गेले. 'जानी दोस्त' असा नसेच आणि असला तर प्रत्येक वेळी वेगळा असे!

तर आम्ही चारचौघांसारखं शिकून नोकरीला लागतो. थोडे हातपाय मारल्यावर,थोड्या खस्ता खाल्ल्यावर चांगली नोकरी मिळते. शाळा कॉलेजात असताना देखील 'मुली' हा विषय आम्हाला तसा वर्ज्यच.. बोलणं वगैरे तर लांब. नंतरसुद्धा ती गोष्ट कधी जमली नाही आणि भविष्यात सुद्धा जमेल असं वाटत नाही. आमचा मित्रमंडळींचा गोतावळाही साधारण याच स्वरूपाचा असतो त्यामुळे मुलींबरोबर बोलणारा मुलगा देखील आम्हाला बोल्ड वाटतो! इतर लोक आम्हाला उद्देशून मुलींबद्दल आमच्यासमोर काही बोलले तर आम्ही कावरेबावरे होतो, लाजतो किंवा असंच काहीतरी करतो कारण आम्हाला त्या बोलण्याला कसं react करायचं हेच मुळी माहित नसतं..

अरेंज पद्धतीचं लग्न हे आमच्यासारख्या लोकांसाठी खरंच वरदान आहे.. नशीब असलं काहीतरी आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलंय आणि 'वधू-वर सूचक मंडळ' वाल्यांनी हि परंपरा पुढे चालू ठेवलीय!! नाहीतर आमच्यासारख्या मंडळींची लग्न झाली असती की नाही हे देवालाच ठाऊक... अप्पा आणि आक्का (आमच्या आई वडिलांना ब-याचदा आम्ही असंच काहीतरी म्हणतो!!), तुम्हाला मुलगी पसंत तर आम्हालाही पसंत!!

आम्ही उपवर -२

आमचा प्रवर्ग हा सामान्य मध्ये गणला जात असावा.. कारण आमच्यासारखे आम्हाला बरेच सापडतात. दर १० माणसातले ६ जण भेटल्यावर आम्हाला वाटतं कि 'अरे हे ध्यान आपल्यासारखंच आहे. आम्ही शिक्षण क्षेत्रात जरी भरीव कामगिरी केली नसली तरी वाईट तरी केलेली नसते. आमचे पालक चारचौघात आमचे नाव (अभिमानाने जरी नसले तरी) घेऊ शकतात असं आम्हाला तरी वाटत असतं.

शाळांमध्ये आम्ही हुशार, एवरेज, ढ,अति-ढ अशा सर्व प्रकारच्या क्याटेगरीत आढळून येतो.तसंच कॉलेजातपण आमचे मित्र बित्र ठरलेले असतात. पण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातले लोक समाविष्ट असतात. आम्ही आधीच्या गाळीव प्रवर्गाच्या तुलनेत बरेच active असतो. म्हणजे शाळा कॉलेजात असताना शिक्षणा व्यतिरिक्त आम्ही इतर ब-याच activities मध्ये सहभागी होतो जसे कि मुलामुलींच्या जोड्या जुळवणे, कुठल्यातरी पोरीच्या मागे लागणे (आणि तिला नको जीव होईपर्यंत छळणे) , कोणाबद्दलतरी गॉसिप्स करणे आणि पसरवणे वगैरे वगैरे. परंतु दुर्दैवाने त्याला शिक्षणसंस्थांचे पुरेसे पाठबळ न मिळाल्यामुळे या activities - एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये गणल्या गेल्या नाहीत.

कालमानानुसार आम्ही वेगवेगळ्या वयात त्या त्या वयाच्या मुलींच्या प्रेमात पडतो. आणि ही गोष्ट ब-याचदा ती मुलगी वगळता इतर सगळ्यांना माहित असते. काही तोंडफाटक्या मित्र अथवा मैत्रिणींच्या गोतावळ्याला जवळ केल्यामुळे क्वचित मुलीला सुद्धा ते समजतं पण ती मुलगी
१) आम्हाला अजिबात भाव देत नसल्यामुळे किंवा
२) (आमच्यालेखी) एका अतिशय फडतूस आणि अतिप्रचंड फालतू अशा मुलावर प्रेम करत असल्यामुळे किंवा
३) ती 'तसली' (म्हणजे कसली याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही) नसल्यामुळे किंवा
४)आमच्या भावना (आणि विचार) कधीच तिच्यापर्यंत पोहोचू आणि पोहोचवू शकत नसल्यामुळे

आमच्या प्रेमात पडत नाही! असे धक्के पचवून आम्ही शाबूत राहतो. नोक-या करतो,धंदे चालवतो परंतु हातपाय मारायचे काही सोडत नाही. कधी खुलेआम, कधी लपूनछपून. पण शेवटपर्यंत नौका काही किना-याला लागत नाही.

आमचे पालक अगदीच 'वधू-वर सूचक' पर्यंत पोचत नाहीत तरीपण नात्यातली मुलगी शोधायचे सगळे प्रयत्न करतात. आमचे सर्वसामान्य गुण 'युनिक' असल्यासारखं दाखवत मार्केटिंग करतात. उदाहरणार्थ मुलगी पटवण्यात आम्हाला आलेलं अपयश त्यांच्या जमेत नसल्यामुळे ते- हि गोष्ट 'संस्कार आहेत हो आमचे' अशा अर्थाने घेतात. आता सगळ्याच आई बापांना आपलं कार्टं हे 'बाब्या' वाटणं साहजिकच! त्याचा दोष त्यांना का द्यायचा? असो तर त्यांची (आर्थिक) पुण्याई, आमची (कवडीमोलाची) पदवी आणि (त्यामानाने तुटपुंजी) कमाई हे अग्रेसिव्ह मार्केटिंगचं त्याचं प्रमुख अस्त्र. अनोळखी, आर्थिक सुबत्तेच्या आधारावर घरात यायचं कि नाही ते ठरवणारी मुलगी, आणि आमचं तिच्या कुटुंबियांसमोर उभारलं जाणारं तद्दन भंपक चित्र... आम्हाला मनातून वाटत असतं हे सगळं चुकतंय पण आमच्याकडेही हे 'बरोबर' करायचा मार्ग नसतो. त्यातूनही ओळखीतली मुलगी मिळाली नाहीच तर 'मंडळं' आहेतच!

आम्ही उपवर-३

आम्ही असामान्य! म्हणजे काय? आहोतच! लग्नाला उभे राहिलो म्हणून पहिल्या दोन वर्गात गणना केलेली खपायची नाही हो आम्हाला! लहानपणापासून की काय ते माहित नाही पण समजायला लागल्यापासून मुलगी या समस्त वर्गावर प्रेम करणारे! कसे शिकलो कधी शिकलो ते कळत नाही पण जमतं बुवा ते.. आमचा प्रवर्ग त्यामुळे नेहमीच मुलींच्याच नव्हे तर मुलांच्यादेखील कुतूहलाचा विषय ठरतो..

आम्ही एकतर..
१)खूप देखणे,क्युट किंवा असेच काहीतरी...
२)खूप हुशार,स्मार्ट किंवा असेच काहीतरी...
३)कोणत्या न कोणत्यातरी कलेत, खेळात प्राविण्य मिळवलेले किंवा असेच काहीतरी...
४)बोलण्यात लाघवी,गोड किंवा असेच काहीतरी
किंवा वरीलपैकी काही कलागुणांच उपजतच मिश्रण असणारे असतो.

शाळा, कॉलेजात असताना आमच्या मागे (मागावर या अर्थी) काही मुली असतात पण आम्ही मात्र ठराविक मुलीच्या मागे असतो. ती मुलगी आम्हाला कधी मिळते कधी कधी मिळत नाही. मिळाली नाही तर आम्ही प्रयत्न करून, बोलबच्चन देऊन किंवा इतर प्रकारे इम्प्रेस करून ती (किंवा आम्हाला शोभेल अशी) मुलगी मिळवतोच. (इतर लोक त्याला पटवणे किंवा कटवणे असं शब्द वापरतात आणि आमच्याकडे सल्ला मागतात पण हि गोष्ट T-ट्वेंटी म्याच सारखी असते हे आम्ही त्यांना सांगू शकत नाही.तुमचा दिवस असला तर सगळं 'ओके' नाहीतर तुम्हीच 'ओकेबोके'! ) पण मग त्यामुळे आम्हाला प्रेम, नातं वगैरे या गोष्टींचा 'एहसास' कि काय म्हणतात तो झालेला असतो. आम्ही बाकीच्यांमध्ये मिसळणारे असलो तर आम्हाला मित्र लोकांमध्ये भलताच भाव-बिव मिळतो. आणि तसे नसलोच तर आमच्या गर्लफ्रेंडमुळे आम्हाला त्या गोष्टीची चिंता वाटत नाही. आम्ही त्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो आणि ती सुद्धा तसं करत असते.(असं आम्हाला वाटतं असतं!)

जीवनाच्या ज्या टप्प्यावर आम्हाला आधाराची खरी गरज असते त्या वेळीच आमची सखी आम्हाला डिच देते.. (ब्रेक-अप नंतरच आम्ही हे असं काहीतरी बोलायला शिकतो.. बरं का!) मग स्वतःहून नवीन मुलगी शोधायचं आमचं धैर्य होत नाही किंबहुना आम्ही तसं करूच शकत नाही किंवा मग तिच्या तुलनेत वरचढ अशी कोणी भेटत नाही म्हणून मग पेरेंट्सच्या तोंडाकडे बघून आम्ही बोहल्यावर उभे राहतो.एकेकाळी आवडीची असणारी गोष्ट कधीकधी मनात इतकी घृणा निर्माण करते कि ती गोष्ट पाहिल्यावर तुमच्या मनात तिरस्काराशिवाय इतर कोणतीही भावना येत नाही, (मगाशी म्हटलं न.. असलं अवजड बोलायला आम्हाला फार कष्ट पडत नाहीत!) तसंच काहीसं आमचं 'मुलगी' या बाबतीत झालेलं असतं.

उलटपक्षी काहीवेळा आम्हीही नीच असतो. पटत नाही,विचार जुळत नाही,योग्यतेची नाही किंवा इतर काही अव्यवहार्य कारणांमुळे आम्हीही कल्टी डॉट कॉम चा आधार घेतो. कधी एकदा तर कधी कित्येकदा.. कधी एकीबरोबर तर कधी निरनिराळ्या मुलींबरोबर. इतरांना वाटतं कि आम्ही चीSSS प आहोत. पण मुळातच तो आमचा स्वभाव असतो. मुरड घालायची म्हटली तरी घालता येत नाही. ज्यावेळी खरोखर लग्न करायची वेळ येते तेव्हा आधीच्या अनुभवांवरून आम्हाला स्वतः मुलगी शोधायचं किंवा घरच्यांना सांगायचं डेअरिंग होत नाही.(असतो आम्ही भाकड!) पुर्वेतिहासानुसार पुढे जाऊन उगीच अंदाज चुकला तर काय घ्या? म्हणून आम्ही आई-वडिलांकडे हे काम सोपवतो.

प्रत्यक्षातली मुलगी असो किंवा matrimonial वरची.. या बाबतीत आम्ही पूर्णतः तटस्थ असतो!!

आमच्या पराक्रमामुळे नातेवाईकांचा आणि जवळच्या मित्रमंडळींचा तर पत्ताच कटलेला असतो. तरीपण आमचे mom - dad (अगदीच तर मम्मी पप्पा) साईटस वर आमच्या नावाने रजिस्ट्रेशन करून वधू संशोधन करत असतात ब्वा!! आता काय.. आम्हाला म्हणावच लागतं... यु आर राईट. यु नो मी बेटर than एनीबडी डू.. तुम्ही सांगाल त्या मुलीशी आम्ही लग्न करायला तयार आहोत. long live matrimonials !!

इत्यास्तु!!