सेन्सॉर बोर्डानं किंवा निर्मात्यांनी 'बरंच काही आणि कॉफी' कि 'कॉफी आणि बरंच काही' या नावात घातलेल्या गोंधळामुळं पिक्चरचं पाळण्यातलं नाव आणि शाळेतलं नाव यामध्ये गडबड असली तरी एकदा सिनेमा चालू झाल्यावर त्या गडबडगोंधळाचं नामोनिशाण दिसत नाही. रवि जाधव हा माणूस निर्मात्यांमध्ये असेल तर डोळे झाकून सिनेमाच्या उच्च निर्मितीमुल्यांवर विश्वास दाखवावा एवढं स्टेटस त्यानं जमवलं आहे! तो स्वतः डिरेक्टर नसला तरी!! 'रेगे' वरची त्याची छाप, अभिजित पानसे च्या आडूनही दिसून येते तसंच इथेही झालंय.
अगदीच तरुणपणी नोकऱ्या मिळायला लागल्यानंतर पहिल्यांदा तरुणाई पसरली ती बिपीओ आणि केपीओ मध्ये त्यानंतर आय टी कंपन्यांमध्ये. मग कामाचा लोड, मिळणारा पैसा, प्रोजेक्टच्या अग्रेसिव्ह डेडलाईन्स आणि हायरार्कीत वर चढायची घाई या नादात लग्न, सेटलमेंट, पर्सनल लाईफ, आणि नाती मागे पडत गेली. नेमका याच विषयाला हात घालत याच पार्श्वभूमीचा वापर करत 'कॉफी.. ' तयार व्हायला लागते आणि पुढे पुढे तीची रंगत वाढत जाते.
उपवर परंतु नॉन-लग्नेच्छुक मुलामुलींचा बराच सुकाळ आहे. निदान आताच्या काळात तरी. आपल्याला लग्न करायचं आहे का? किंबहुना आपल्याला का लग्न करायचं आहे? आपल्याला कसा/कशी पार्टनर हवा/हवी आहे? असे असंख्य प्रश्न त्यांना पडलेले असतात परंतु कामाच्या धबडग्यात असेल किंवा इच्छा नसल्यामुळे असेल त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या भानगडीत हे लोक पडत नाहीत. आईवडील मात्र आपल्या कर्तव्य असल्याच्या थाटात किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या मुलांसाठी स्थळ शोधत असतात.
असंच मित्राच्या मुलाचं 'स्थळ' लहानपणीच्या मित्राची (मोठी झालेली) मुलगी बघायच्या कार्यक्रमाला येतं आणि चित्रपट सुरु होतो. लिबरल कुटुंब आणि त्यात मोकळंढाकळं वातावरण असल्यामुळे हा कार्यक्रम काही तितकासा फॉर्मल होत नाही. अरेंज्ड लग्नाला दोघांचाही फारसा सपोर्ट नसतो त्यामुळे जाई (प्रार्थना बेहरे) त्याला- अनिष (भूषण प्रधान) ला आपल्या लाईफ मधल्या घटना सांगत जाते आणि चित्रपट उलगडत जातो. तिची आणि निषादची झालेली पहिली भेट (जी फारशी लक्षात राहण्यासारखी पण नसते) इथपासून ती आजच्या दिवसापर्यंत छोट्या मोठ्या गोष्टींनी भरलेला पेटारा ती अनिषसमोर उघडून टाकते. तिकडे कधी नव्हे ते जाई ला भेटायला बोलावून तिची (वेळेनंतरही) वाट पाहणारा थोडासा अबोल असणारा निषाद (वैभव तत्ववादी) जे घडतंय त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत असतो.
ऑफिसमधला पहिला प्रोजेक्ट संपल्यावर आणि रिसोर्स रीअलोकेशन झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव जाणवायला लागते. सिनेमाचा प्रभाव असणा-या आपल्यावर 'हंसी तो फंसी' किंवा 'प्यार है तो पलट के देखेगी' असल्या बालिश कल्पना म्हणजे प्रेम असलं काहीबाही जे बॉलीवूड ने ठसवलं आहे ते या दोघांच्याही डोक्यात आहे. तसलं काहीही वास्तव जीवनात होत नसल्यानं, जे होतंय ते प्रेम आहे कि नुसतं infatuation आहे हेच त्या दोघांनाही कळत नाही. जाईला एकदम मेमरेबल 'प्रपोज' हवाय आणि निषादला माहितीये कि त्याचं लाईफ ,त्याचा स्वभाव फिल्मी नाहीये. त्याला साधं I like you बोलणंही कठीण जातं तर प्रेमाचा खुल्लमखुल्ला इजहार करणं तर दूरची गोष्ट!! त्यामुळे कोणीही व्यक्त होत नाही आणि त्यामुळेच गोष्टी अडकून पडलेल्या असतात. त्यांना या प्रेमाची कोणीतरी जाणीव करून दिली पाहिजे ना? तशी जाणीव कोणी करून देतं का ? नुसती मैत्री आणि मैत्रीपलीकडचं नातं यातल्या सीमारेषा तशाच राहतात कि पुसल्या जातात? या प्रश्नांची उत्तरं सिनेमागृहात जाऊन शोधायला पाहिजेत.
संपूर्ण सिनेमात कुठेही 'कथा' नावाखाली कोंबलेला मेलोड्रामा नाही, भावनांचे विनाकारण हसू रडू आणणारे हिंदोळे नाहीत, खलनायक किंवा प्रेमाच्या विरोधात असणारे आई-बाबा नाहीत, 'दुनिया कि कोई भी ताकत' च्या विरोधात लढणारे नायक नायिका नाहीत, समाजासाठी संदेश वगैरे तर नाहीच नाही तरी ही कंटेपररी पद्धतीने खुलत जाणारी लव्ह स्टोरी आहे! निखळ, हलकीफुलकी, रोमेंटिक!
फक्त निषाद आणि जाईच नव्हे तर सिनेमातले इतरही लोक आपली छाप सोडतात. विशेष करून आभा! (नेहा महाजन) तिने तिची वैचारिक दृष्ट्या 'मोठी' असणारी लहान बहिण मस्त साकारली आहे. दरवेळी नव्या मुलीच्या प्रेमात पडून नंतर तोंडावर पडणाऱ्या सुयश टिळकने निषादचा मावसभाऊ-निलेश म्हणून उत्तम काम केलं आहे. तो इनोसंटली देत असणारे सल्ले चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाहीत! बोजड संवाद आणि उदात्त तत्त्वज्ञान न सांगणा-या पटकथेमुळे सिनेमा आजूबाजूला घडणा-या घटना असल्यासारखाच वाटतो.
वैभव तत्ववादी च्या वाट्याला पहिल्यांदा 'अमर प्रेम' सारखी टुकार सिरियल आणि त्यानंतर 'तुझ माझ जमेना' कि अशाच काहीतरी नावाची डेली सोप आली होती! त्याचं आणि टीव्ही सिरियलचं काही जमलं नाही पण या सिनेमात पहिल्यांदाच त्याला खरा अभिनय वगैरे करायची संधी मिळाली असं वाटतंय, त्याने चीज केलंय. प्रार्थना बेहरे का कोण जाणे , क्लोज अप शॉट मध्ये बऱ्याचदा ('मितवा' मधेही ) ऐश्वर्या राय सारखी दिसते असं वाटतं. पण तिनेही चब्बी मराठी मुलगी खूप छान साकारली आहे. पुण्यातली टिपिकल फमिली साकारण्यात दिग्दर्शक नव्वद टक्के तरी यशस्वी ठरला आहे हे मान्य करायलाच हवं!
सिनेमात दिसणारं ऑफिस असो, घर (जाईच्या भाषेतला साधा थ्री बी एच के चा flat !) असो कि कॉफी शॉप… प्रत्येक लोकेशनला एक प्रकारचा फ्रेशनेस आहे. तीच गोष्ट लागू होते charactersच्या कपड्यांच्या रंगसंगतीला! संपूर्ण सिनेमा संपेपर्यंत ते फ्रेश वातावरण प्रत्येक प्रसंगाला वेगळ्या उंचीवर नेउन ठेवतं. 'रंग हे नवे नवे' हे मल्टीलिंग्वल गाणं तर खासच!! एकूणच काय तर मुलगा असो व मुलगी , स्त्री असो व पुरुष , आई असो व बाबा किंवा अशाच जोड्यांपैकी कोणीही असो, प्रत्येकाने किमान एकदा जाऊन या 'फिल्टर्ड' कॉफीचा आस्वाद घ्यायलाच हवा!!