बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

काळ आला होता..


व्हर्व्ह चा शेवटचा दिवस होता. हा इव्हेंट म्हणजे कॉलेजच्या पोरांचा वार्षिक उत्सवच! त्यात सहभागी कलाकारांची सर्टिफिकेट्स, संयोजकांकडून घेऊन येऊन दुसऱ्या दिवशी पोरांना वाटली की "विप्र"ची जबाबदारी संपली! पुष्क्या जाम खुश होता.
' आज येशील का माझ्याबरोबर?' त्याने विचारलं. 
' हट च्यायला' मी लगेच उस्फुर्तपणे जबाबदारी झटकून टाकली. 
'साल्या चल ना.. कोणाला भेटायचं ते पण मला माहित नाही, दोघेजण असू तर पटकन उरकेल. आणि तुला माहित्ये? सुनिधी चौहान पण येणारे.तिचा कॉन्सर्ट आहे'
'ए चले.. सुनिधी चौहान च्या कॉन्सर्टसाठी मला तंगड्या तोडायला लावू नको इतक्या लांब!' मी म्हटलं...
त्याबरोबर पुष्करचं तोंड पडलं..
 ... आमचा विद्यार्थी प्रतिनिधी पुष्कर हा व्हर्व्ह साठीच्या पथनाट्यात काम करत होता त्यामुळे ऍक्टर आणि विप्र (विद्यार्थी प्रतिनिधी ) या दोन्ही जबाबदाऱ्यांचा  काटेरी मुकुट त्या बिचाऱ्याला वागवावा लागत होता. पथनाट्यात बसवताना डिरेक्टरच्या आणि बाकीच्या डान्सर्स , आर्टीस्ट अशा वेगवेगळ्या कलाकरांपैकी, 'कल्ला'कारांच्या दुहेरी शिव्या खाऊन बिचाऱ्याची त्रेधा तिरपीट उडत होती. खरंतर त्याचा या सगळ्यात उत्साहच इतका होता कि आर्ट सर्कलच्या मीटिंग मध्ये त्याला गृहीत धरूनच त्याच्यावर विप्र पदाची जबाबदारी ढकलण्यात आलेली होती!
'बरं बरं जाऊया.. पण थोबाड सरळ कर आधी,च्यायला मागचे दोन तीन महिने तुला असं बघून, खरा कसा दिसतोस तेच विसरायला झालंय.' मी म्हटलं. तो जरासा हसला.
'हां, जास्त खुश होऊ नको, ही अण्णाची बिलं.. सगळ्या आर्टिस्ट पोरांनी फुकटचा ब्रेकफास्ट चापलाय त्याची. मॅडम ना सांगून बजेट मध्ये बसवून माझे पैसे मोकळे करून दे' त्याचं तोंड परत होतं तसं करून मी तिथून निघालो. 
"तुझी ती लाल शोल्डरबॅग घेऊन ये . ती बरी मोठी आहे सगळी सर्टिफिकेट्स आडवी ठेवता येतील. ओके? मी आता सिटीत जाणार आहे, तिकडून डायरेक्ट  जाईन ऍग्रीकल्चर कॉलेजला. तुझी वाट बघतो ग्राऊंडच्या गेटवर, ७ वाजता!" ओरडून त्याने सूचना केली.

झेरॉक्सवाल्या कडून नोट्स  न्यायला म्हणून सकाळीच माझी शोल्डरबॅग नदीम घेऊन गेला होता. त्याचा अजून  पत्ता नव्हता,नेहमीच्या टपरीवर कटिंग मारायला गेलो तेवढ्यात तिथे नदीम आला, 
'कुठे फिरतोए  तू? ही बॅग द्यायला रूमवर जाणार होतो पण बरं झालं तू इथंच भेटलास.'
" खरं तर बरं झालं तू आलास, माझी शोल्डरबॅग तरी मिळाली. मला ऍग्रीकल्चर कॉलेज ला जायचंय आणि आत्ता मला जाम कंटाळा आलाय, पण जायलाच हवं" मी वाकडं तोंड करून त्याला सगळं ऐकवलं. पण नदीमचा मूड चांगला निघाला ! 
"चल, आपण जावया,मी सोडतो तुला बाईकवर, नंतर मी मोमीनपुऱ्याला जाईन,मित्रांकडे राहायला. तसाही उद्या जाणार होतो पण आजच जाईन!" तो म्हणाला.

लोकलची गर्दी चुकली म्हणून मला झालेला आनंद अवर्णनीय होता! संध्याकाळी आम्ही पोचलो तेव्हा आमचे 'विद्यार्थी प्रतिनिधी' भिरभरल्यासारखे इकडेतिकडे फिरत होते!
"तू बाहेर काय करतोयस ?जायचं ना आत?'  नदीम बाइक पार्क करून येईपर्यंत मी त्याच्यावर राग काढायला सुरुवात केली.
"काय यार, मला वाटलं, मी पुढे येऊन फॉर्मलिटी पूर्ण करेन, पण कसचं काय? प्रचंड गर्दी झालीय आत. बाहेरचं जनरल पब्लिक येऊ नये म्हणून कॉलेजचं आयकार्ड बघितल्याशिवाय सोडत नाहीयेत गेटवरचे बाऊन्सर्स.मग म्हटलं नको जायला.  नाहीतर आपली परत चुकामुक व्हायची आणि तुला काय कारणच हवं असणार. गर्दी बघून तू परत गेलास तर? म्हणून इथेच थाम्बलो वाट बघत." डोळा मारत तो म्हणाला. 
"घ्या...! म्हणजे मी एवढा आलो तर मलाच टोमणे मारतोयस. तू जर कारण द्यायची वेळ आणली नसतीस तर एवढ्यात परतीच्या वाटेवर असलो असतो आपण"  नदीम घेऊन येत असलेली माझी शोल्डरबॅग दाखवत मी म्हटलं. 'च्यामारी, काय गर्दीए रे...  बाईक किती लांब लावली माहितीए?' त्याने विचारलं.
'जाऊ दे रे, नंतर तुला एकट्यालाच जायचंय!' आम्ही म्हटलं आणि ग्राऊंडकडे निघालो.
'सेल्फीश आहात तुम्ही, आणि स्पेशली तू!' माझ्याकडे बोट दाखवत तो म्हणाला आणि खांद्याला लावलेली माझी बॅग सरळ करत त्यानेही आमच्याबरोबर कूच केले.

अंधार वाढत चालला होता, ग्राऊंडच्या गेटवर तोबा गर्दी झाली होती. गेटचे मुख्य दरवाजे बंद होते आणि मुख्य दरवाजाला चिकटून असणाऱ्या सर्व्हिस दरवाज्यापाशी  पुष्करने म्हटल्याप्रमाणे खरोखरच बाऊन्सर्स कॉलेजच्या  आयडी शिवाय आत सोडत नव्हते. आम्ही एकमेकांचे हात धरुन होतो. मेटलचं मुख्य प्रवेशद्वार,जे बहुधा मोठ्या गाड्या किंवा ट्रक्स साठीच उघडलं जात असावं, त्याला चिकटून एक छोटं दरवाजा, तेवढाच उंच पण रुंदीने कमी,ही जुन्या-अंग्रेजोके जमानेके- कॉलेजेसच्या गेट बांधणीची ठराविक पद्धत होती. गेटमधून समोर मोकळं मैदान आणि त्या टोकाला असणारं स्टेज दिसत होतं. वाढत्या अंधाराला छेद देण्यासाठी हॅलोजन लॅम्पस  बसवले होते, त्यांचा उजेड मैदानाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे आमच्यावर- गर्दीवर पडत होता. गेटच्या दोन्ही बाजूला स्पॉन्सरर्सच्या मोठ्या कमानी उभारलेल्या होत्या. इंडियन एक्सप्रेस व्हर्व्ह '06असं मोठया अक्षरात लिहून, बाकी छोट्या छोट्या जाहिरातदारांच्या नावांनी, लोगोजनी बहरुन गेलेल्या. मोठमोठ्या डॉल्बी स्पीकर्स च्या भिंतींवर  छाती हादरवून टाकणाऱ्या आवाजात रेकॉर्डेड गाणी वाजायला सुरुवात झाली होती. लांबलांब फोकस फेकणाऱ्या हलत्या स्पॉटलाईट्सचं टेस्टिंग चालू होतं. सुनिधी गाणार होती की नाचणार कोण जाणे!! पण यांचं नेहमीच असं असतं! मागच्या वेळी पण त्या शिवमणी च्या कन्सर्ट च्या वेळी तो ड्रम बडवतोय आणि यांनी स्पॉटलाईटचे खेळ सुरु केले होते. वाजवायचं  थांबवून काय वाईट चिडला होता तो!

गर्दी प्रचंड वाढत होती. वीस एक मिनिटं झाली तरी आम्ही पुढे सरकतोय की जागेवर उभं आहोत हेसुद्धा कळत नव्हतं. आमचे आवाज एकमेकांपर्यंत देखील पोचत नव्हते. गर्दीत जीव कासावीस व्हायला लागला..
"मागे जाऊया का?"
माझ्या हाताला हिसका देत नदीमने ओरडून विचारलं. 
"आँ?? काss य?" मी ओरडून उलट प्रश्न केला. नदीमने पुन्हा ओरडून तेच विचारलं.. 
"पुष्कsssर..परत जायचं काsss? नंतर येऊ वाटल्यास..."मी नदीम चा प्रश्न पुष्कर कडे पास ऑन केला..  
" मागे बsssघ"  भुवया उंचावून चेहरा वर करत तो म्हणाला.  
मी मान वळवून मागे बघितलं. नजरेची रेंज जात होती तिथपर्यंत मुलंच मुलं दिसत होती. कदाचित सुनिधी चौहानचा फ्री कॉन्सर्ट बघायला मिळणार म्हणून लांबलांबून मुलं येत होती. पाठोपाठ येणाऱ्या लोकल्स मधून, बसेस मधून आणि इतर बाकीच्या वाहनांमधून मुलांचे लोंढे येत होते. गर्दीचे थवेच्या थवे मागोमाग जोडले जात होते..  पुढे असणाऱ्या लोकांच्या सहा सात पट लोक आमच्यामागे होते. एवढी गर्दी कापत मागे जाण्यापेक्षा पुढे जाणं त्यातल्या त्यात योग्य निर्णय ठरला असता. मी डोळ्यांनीच नदीम ला मागे बघायला सांगितलं, त्याने बघितलं आणि तो मला काय म्हणायचं होतं ते समजला.. आता माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं एवढा कोलाहल चालू होता.

गेटवर बराच गदारोळ उठला होता. चोहोबाजूने घेरलेले गेलो असल्यामुळे आम्ही कुठल्या दिशेने सरकत होतो तेही कळत नव्हतं. मी ज्यांचे हात धरले होते ते त्या दोघांचेच हात होते की नाही अशी मला शंका यावी एवढी मुलं आमच्या मध्ये होती. गेटवर च्या अकार्यक्षम बाऊन्सर्स वर पोरं राग काढायला लागली होती. आयकार्ड नसणाऱ्या पोरांना एन्ट्री नाकारल्यावर त्यांना मागे जायला देखील रस्ता उरला नव्हता. ती तिथंच बाजूला राहून पुन्हा घुसण्याचा प्रयत्न करत असावी बहुतेक.. थोडी थोडी मुलं आत जात होती पण आम्ही काही गेटपर्यंत पोहचत नव्हतो. आता गेटवर उघड उघड बाचाबाची होऊ लागली. 
"मोठं गेट उघडा, बडा गेट खोलो, ओपन मेन एन्ट्रन्स " च्या सूचना वाढल्या. 
"ओपन द गेट SS ओपन द गेट SS " असा गजर सुरू झाला. आतमधूनही गर्दीचा वाढता आवाका बघून मुख्य प्रवेशद्वार उघडायचा निर्णय घेतला असावा. कारण पुढून तशी बातमी मागे पसरत गेली. गर्दीचा लोंढा छोट्या दरवाजाकडून मुख्य दरवाजाकडे वळला. आम्हीही आपोआपच तिकडे ओढले गेलो. आता आमची पावलं आमची दिशा ठरवत नव्हती तर गर्दीचा ओघ ते ठरवत होती. पुष्करचा हात केव्हाच हातातून सुटला होता. खांद्याला लावलेली बॅग सावरण्यासाठी नदीम ला माझा हात सोडावा लागला होता. मी पुष्करच्या आणि नदीम माझ्या शर्टची कॉलर बघत गर्दीबरोबर पुढे पुढे सरकत होतो.

... मुख्य प्रवेशद्वाराचा डावीकडचा दरवाजा उघडतो ना उघडतो तोपर्यंत गर्दीचा पहिला लोट आत घुसला.. अचानक पुढे असणारी माणसं कमी झाल्यामुळे आम्ही पुढे लोटलो गेलो. आजूबाजूची मुलं मध्ये ओढली गेल्यामुळे आमच्या तिघातलं अंतर खूपच वाढलं. आता मी पुष्करचं आणि कदाचित नदीम माझं डोकं बघत एकमेकांना फॉलो करण्याचा प्रयत्न करत होतो. 

...क्षणार्धात परिस्थिती पालटली. 

डावीकडचा दरवाजा उघडला गेल्यामुळे उजवीकडचा दरवाजा बंद राहण्यासाठीचा जमिनीत असणारा बोल्ट तुटला आणि तो दरवाजा सुद्धा उघडला गेला.. त्या दरवाजावर रेलून राहिलेली मुलं बेसावध असताना अचानक आत लोटली गेली. मागच्या गर्दीमध्ये दोन्ही दारं उघडली गेल्याचा हाकारा झाला आणि मागून ढकलणाऱ्या पब्लिकचा फोर्स वाढला. मुलांचा एवढा मोठ्ठा जमाव अनकंट्रोलेबल झाला.. मागून येणाऱ्या लोंढ्याला तोंड देण्यासाठी प्रत्येकानं पुढच्याला ढकलायला सुरुवात झाली. आणि हे सगळं काही क्षणात झालं, मला काही कळासवरायच्या आधी मी पुढे ढकलला जात होतो.. काहीतरी विपरीत घडायला लागलंय हे मला जाणवायला लागलं होतं, आजूबाजूला आधारासाठी कोणाला पकडायला जावं तर तेच आपल्याला आधार म्हणून पकडायला बघताहेत आणि खेचताहेत असं वाटत होतं. सगळे आपोआप पुढे लोटले जात होते. आणि एवढ्या बेशिस्त गर्दीतून वाकडंतिकडं सरकताना जी भीती वाटत होती तेच झालं..  आपला तोल सावरता ना आल्यामुळं काही मुलं पुढे पडली!! फ्लॅश लाईटच्या पलीकडे असणाऱ्या अंधारात त्यांच्यामागून धावणारे त्यांना अडखळून त्यांच्यावर पडले.. स्पॉन्सरर्सच्या कमानीत पाय अडकून काही जण पडले, काहींनी आधारासाठी त्या कमानी पकडल्या पण पाठमागून येणाऱ्या लोंढ्याच्या जोराला सहन करण्याइतकी त्या कमानींची ताकद नव्हती. त्यांचे फ्लेक्स फाटले, लाकडाच्या फ्रेम कचकड्याच्या खेळण्यासारख्या तुटल्या आणि त्या फ्रेम्स मुलांच्या लोंढ्यावर आडव्या पडल्या..  मागून येणाऱ्या गर्दीला पुढे काय होतंय ते समजत नव्हतं. प्रत्येकजण प्रत्येकाला पुढे ढकलत होता.. 

पुष्कर त्या पडणाऱ्या लोकांतून जेमतेम सुटून गेला आणि नेमका त्याच्यामागे कोणीतरी जमिनीवर लोटांगण घातलं. अगदी माझ्या नजरेच्या टप्प्यात! तो उठायचा प्रयत्न करत होता तेवढ्यात त्याला मागच्याचा धक्का बसला आणि तो पूर्ण आडवा झाला.. त्याच्यावर ज्याचा धक्का लागला तो..  पाठोपाठ अजून काही...  त्याच्या आणि माझ्या मध्ये असणारी सगळी मुलं एकापाठोपाठ एक पडत गेली आणि मग मी सुद्धा.. पडणाऱ्याला उठण्याची  संधीही न देता, उलट तसेच तुडवून मागचे ते, त्या प्रयत्नात अडखळून मागचे अजून काहीजण पडत होते.. पडत जाणाऱ्या लोकांचा एक अर्धचंद्र होत गेला.  काही समजाउमजायच्या आत मी त्या स्टॅम्पेड मध्ये सापडलो होतो!! 

...मी ज्याच्यावर पडलॊ होतो तो कदाचित मला शिव्या घालत होता... मोठमोठ्याने गुरासारखा हंबरत होता... आणि मग काही क्षणातच असहाय आवाजात 'हट जाओ ना यार प्लि sss ज" च्या विनवण्या करीत मोठा हंबरडा फोडून रडू लागला...  जिवाच्या आकांताने मी ओरडत होतो. तश्याच पद्धतीने माझ्या पाठीवर पडलेल्या मागच्याला शिव्या घालत होतो... रडत भेकत उठण्याची विनवणी करत होतो. .पण तोही काही आमच्यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत नसावा. समोर ,स्टॅम्पेडमध्ये न सापडता केवळ सुदैवाने सुटून गेलेला पुष्कर, तशा काहीजणांबरोबर उलटा उभा राहून घाबरलेल्या आवाजात बाऊंसर्स ना गेट बंद करायला सांगत होता. पण त्या गोंधळात त्याचा आवाज इतक्या लांब पोहोचण्याची सुतराम शक्यता  नव्हती. त्याच्या डोळ्यादेखत आम्ही त्या चेंगराचेंगरीत अडकलो होतो. त्याने माझ्या नावाचा पुकारा लावला होता. त्याने माझ्या मदतीसाठी, मला बाहेर खेचण्यासाठी हात पुढे करताच माझ्याखाली पडलेल्या कित्येकांचे वीस पंचवीस हात त्याला पकडत होते. त्याचा हात माझ्यापर्यंत पोचायच्या आधीच! आणि मी तरी कुठून त्याचा हात पकडणार होतो ? माझे दोन्ही हात खालीच होते. पडण्याआधी आधारासाठी समोरच्याच्या पाठीवर ठेवलेले!! माझं  फक्त डोकं मोकळं राहिलं  होतं. पाठीमागे मानेपासून टाचेपर्यंतच्या आणि गळ्यापासून पायांच्या अंगठ्यापर्यंतचा शरीराचा संपूर्ण भाग कोणा ना कॊणालातरी चिकटला होता. शरीराचा ए-कू-ण ए-क भाग! माझं सर्वांग अगदी दबून गेलं होतं. तो भार एवढा होता कि माझ्या छातीच्या बरगड्या आता तुटतील कि काय असं वाटत होतं. माझ्या अंगावरही किती जण पडले होते कोण जाणे? मला माझा हातही सोडवता येत नव्हता.  छाती आणि पोट दोन्ही अतिप्रचंड प्रेशरने दबले गेल्यामुळे नाकाने घेतलेला श्वास नाकापुड्यांच्या आतही पोचत नव्हता... मी जोरजोरात श्वास घ्यायचा प्रयत्न करत होतो. ओरडण्याइतका दम  राहिला नव्हता. डोळ्याच्या उजवीकडच्या कोपऱ्यातून तसाच रडणा भेकणारा नदीम दिसत होता...

"बंद करो ना गेट" "लोक मेले इकडे" "थांबा थांबा" " मला सोडवा" चे आक्रोश एकमेकांमध्ये मिसळून जात होते...

...वाटलं... आता संपलं सगळं! एवढी हतबलता याआधी कधीच आली नव्हती. श्वास घ्यायला नाक हवं असतं माहितीये पण ती प्रोसेस व्हायला छाती आणि पोट सुद्धा एवढं महत्वाचं असतं याची कल्पनाच नव्हती आपल्याला! हात बांधून ठेवले, पाय हलवता येत नसले तर एवढा असहाय होतो माणूस? इथे अडकलेल्या सगळ्यांना  हि परिस्थिती नको असूनही कोणी काहीच करू शकत नाही?  इथून काही सेकंदात आपणच नसू इथे! एकेक क्षण प्रचंड मोठा वाटत होता. जोर लावायचंही  त्राण राहिलं नव्हतं. गरम झालेल्या कानातला कोलाहल आता अस्पष्ट होत होता. आपल्याला हात पाय आहेत कि नाहीत तेही कळत नव्हतं. मैदानावरच्या नाचणाऱ्या स्पॉटलॅम्प्स चा , गाण्यांचा प्रचंड राग येत होता! इथे काही माणसं  मरणार  आहेत आता आणि हे....!!  समोर लांब आकाशात दिसणारा चंद्र धूसर होत चालला... कदाचित अजून काहीच वेळ. मी निपचितपणे  समोरच्याच्या पाठीवर हनुवटी टेकवली.... 

.... एवढ्यात पाठीवरचं प्रेशर जरासं कमी झाल्यासारखं जाणवलं.

नैसर्गिकरित्या मी पुन्हा श्वास घ्यायचा प्रयत्न केला! शरीरात केवढं  प्रचंड ऑटोमेशन असतं  ना? कितीतरी वेळाने छातीत हवा गेली असावी, मान हलवायला जागा मिळाली. श्वास घेतल्याबरोबर जराशी तरतरी आली तेवढ्यात माझ्या डोक्यावर कोणाचा तरी पाय पडला.. माझ्या मागच्या कोणीतरी आमच्या सगळ्यांच्या अंगाखांद्यांवरुन सरपटत पुढे गेला. बाजूला बघितलं तर हळू हळू लोक तसेच सरकत होते. मी होती नव्हती तेवढी शक्ती एकवटली आणि जोर लावला. माझे हात मोकळे झाले! हातांची सगळी हाडं आतून दुखत होती पण जीवावर बेतण्यापेक्षा दुखणं  परवडलं. मी माझ्या खाली अडकलेल्या मुलाचे खान्दे पकडून वर सरकलो तेवढ्यात माझ्या अंगावर पाय देऊन अजून कुणीतरी गेलं. आता बऱ्यावाईटाचा, चूक-बरोबर याचा विचार करायचा वेळच नव्हता. जीव महत्वाचा!  मी मागे बघून अंदाज घेतला आणि पूर्ण ताकदीनिशी माझं शरीर वर खेचलं. एक पाय बाहेर येताच कोणाच्या तरी अंगावर डावा गुढगा टेकून दुसरा पाय ओढला! मी मोकळा झालो होतो. तसाच माझ्या खाली अडकलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर एक पाय आणि कोणाच्यातरी पाठीवर दुसरा पाय देऊन मी जेमतेम उभा राहिलो आणि उतारावर धावत सुटावं तसं  पुढच्या दिशेनं शरीर झोकून दिलं. कोणाच्या बेसावधपणे उठू पाहणाऱ्या डोक्यावर,कोणाच्या हातांच्या बोटांवर, कोणाच्या मानेवर,  तर बेशुद्ध झालेल्या कोणाच्यातरी कानावर निर्दयपणे पाय ठेवत मी झपाझप पुढच्या बाजूला उतरलो आणि कोलमडून पडलो. डाव्या घोट्यातून एक कळ डोक्यात गेली. उजवा गुडघा आणि मांडी दुखत होते. दोघाजणांनी मला आधार देऊन उभं केलं आणि जवळच एका ठिकाणी नेलं.

मला त्यांच्या आधाराशिवाय उभंही  राहता येत नव्हतं. कळतच नव्हतं कि आता मी त्या- जवळपास बेशुद्ध- लोकांच्या जथ्यातून कसा काय धावत आलो?  त्या व्हॉलंटीअर्सनी मला मैदानावरच कुठंतरी आडवं करून ठेवलं 'आर यू ओके ?' त्यांनी विचारलं "माहित नाही पण बाकीच्यांना सोडवा" मी म्हटलं. आपण तर या परिस्थितीत कोणाला वाचवू शकत नाही पण हेल्पलेस लोकांच्या अंगाखांद्यावरून पाय देऊन येतानाचा गिल्ट घालवण्यासाठी तेवढं तरी करूया असं वाटून गेलं. आडवं पडताक्षणी बहुतेक मला ग्लानी आली..

... डोळे उघडले तेव्हा पुष्कर शेजारी बसून कोणाशीतरी बोलत होता. "बरं  वाटतंय का?" त्याने विचारलं. "जिवंत आहे तेच नशीब आहे मित्रा!" मी म्हटलं. "नदीमला बघितलंस का? मी विचारलं.
"हो, तोपण  आहे जिवंत! नको काळजी करू!" त्याने सांगितलं.
"बरेच बेशुद्ध झाले होते..सातजण गेले म्हणतात." मी जिवंत आहे म्हटल्यावर पुष्करने अधिकची माहिती पुरवली आणि काय झालं कसं  झालं  ते त्याने अगदी 'पिटा'तला प्रेक्षक बनून 'याची देहा यांची डोळा' पाहिलं असल्यामुळे त्याचं साग्रसंगीत वर्णन करून मॅनेजमेंट ला यथेच्छ शिव्या घातल्या. वरून मी जर वेळीच उठलो नसतो आणि तिथून सुटलो नसतो तर कसा "आठवा" झालो असतो आणि "आठवावा" लागलो असतो यासारखे परिस्थितीचं गांभीर्य कमी करण्याकरिता जोक केले. कदाचित मला तो त्या धक्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता.
मग त्याने आधाराने मला उठवलं. आणि खुरडत मी उठलो. " पाय मोडला वाटतं माझा. डावा घोटा  तर फ्रॅक्चर आहे शुअर" मी म्हटलं. नदीमपर्यंत पोहोचलो त्याची परिस्थिती काही वेगळी नव्हती.

"या तुझ्या हॅन्डबॅग मुळे अडकलोए मी " नदीम सांगायला लागला." कोणीतरी पडताना आधारासाठी ही माझ्या खांद्याला लटकणारी बॅग पकडली आणि मी फसलोए. नशीब बेहत्तर म्हणून वाचलोए.अम्मी अब्बू चे चेहरे आठवत नमाज पढायला लागलेलो.. म्हटलं मेलो आता"

मी शुद्धीत येईपर्यन्तच्या  काळात सुदैवाने परिस्थिती कंट्रोल मध्ये आली होती. पुढे चेंगराचेंगरी झाल्याचं समजताच बाउंसर्स आणि काही व्हॉलंटीअर्सनी मिळून गेट बंद केलं होतं. पुढे लोकांचे जीव गेले अशासारख्या अफवा पसरताच मागून लोटणारा गर्दीचा रेटा थांबला.. सुनिधी चौहान पेक्षा जीव महत्वाचा समजून मुलं  मागे फिरली असावीत.  आलो त्या गेट कडे परत जायलापण भीती  वाटत होती. 'मौका-ए-वारदात' वर सँडल्स चपला बुटांचा खच पडला होता. माझा डावा बूट गुमशुदा झाला होता.. गेट बंद केलं होतं. दुसरीकडच्या गेटने अजून एक मित्राच्या आधाराने खुरडत खुरडत आणि नंतर  रिक्षा पकडून आम्ही हर्डीकर हॉस्पिटलला  गेलो.


तिथे तुफान गर्दी उसळली होती. माझा नम्बर येईतो दीड दोन तास उलटले. सुदैवाने लिगामेंट स्ट्रेच आणि स्वेल होण्यापलीकडे काही झाले नव्हते. आठ दिवसाच्या कंप्लिट बेड रेस्टच्या तोंडी आश्वासनावर हर्डीकरच्या डॉक्टरांनी एकही रुपया ने घेता माझी सुटका केली. एरवी पराचा कावळा करून सांगणाऱ्या मीडियाने - इंडियन एक्सप्रेस या माध्यमसमूहाने स्पॉन्सर केलेला हा इव्हेंट असल्याने कदाचित-  याची अजिबात दखल  घेतली नाही. नाही म्हणायला एनडीटीव्ही ने काही काळासाठी हि बातमी दाखवली होती, जी बघून माझ्या घरच्यांनी मला फोन केला होता. परंतु नंतर ती तिथूनही निघून गेली. , त्यात आमच्यापैकी काही जणांची हाडं  वगळता इतर काही 'ब्रेकिंग' नसावं बहुधा! 'जिवावरचं संकट' वगैरे वाक्प्रचारांचा आणि 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' वगैरे म्हणींचा अर्थ नव्याने उमगून आला!

चौदा वर्षं झाली या गोष्टीला पण आज इतक्या वर्षांनंतरही जेव्हा स्टँपेड संदर्भातली बातमी वाचतो तेव्हा हा प्रसंग आठवून अंगावर शहारा येत नाही असे होत नाही!

३ टिप्पण्या:

  1. हे काल्पनिक आहे असावं अशी आशा आहे. लेखनशैली खिळवून ठेवणारी आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. दुर्दैवाने स्वानुभव आहे.. इतर कोणाला हा अनुभव येऊ नये या सदिच्छा. लेखन आवडलं हे पाहून छान वाटलं

      हटवा
  2. Good Evening Sir! This is Kimantu Omble-Sarkar. We published your stories with Aanandrutu Publication. We started now one devoted ebook publication house. Named Cloud Corner publications Private Limited. I would like to introduce ideas and publish your stories and articles as I always loved what you write. Could we talk here on facebook voice call when you will free?

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!