मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

मी आणि रस्त्यांची कामं!


माझं आणि रस्त्याच्या कामांचं काहीतरी पटत नाही हे नक्की!  लहानपणी जिथं राहत होतो तिथं सगळं चांगलं होतं. पण नंतर कुंडलीतला ग्रह कुठे सरकला आणि तिथेच अडकून बसला काही कळायला मार्ग नाही. आम्ही मग स्वतःचं घर बांधायचं ठरवलं. जिथे जागा घेतली तिथे पक्क्या रस्त्याचं काम व्हायचं होतं.. म्हणजे खरंतर तिथून एसटी जायची त्यामुळे ‘रस्ता तिथे एसटी’ हे गृहीतक खरं धरलं तर ज्यावरून एसटी जायची त्याला रस्ता म्हणायला हरकत नसावी. थोडक्यात हायवेपासून आमच्या घरापर्यन्त जाणारा रस्ता हा  अर्धवट तयार झालेला होता. तो पूर्ण रस्ता पक्का नव्हता. तिथून तांबडी माती उडवत ट्रक किंवा एसटी जायची आणि त्यामुळे लांबून इंजिनाचा आवाज आला कि आम्ही इकडे तिकडे तोंडं फिरवून शक्य तेवढी धूळ टाळायचा प्रयत्न करायचो. शाळेत जाता येताना स्कुल बस होती तेव्हा नुसत्या खिडक्या बंद केल्या कि तात्पुरती सुटका व्हायची पण स्कुलबस च्या स्टॉप पर्यंत जाताना किंवा तिथून घरापर्यंत येताना जो जाच होत असे त्याला इलाज नव्हता. दरवर्षी 'या वर्षी हा रस्ता पक्का होणार आहे' अशी आवई उठायची , उगाच काही कंत्राटी कामगार रस्त्याच्या इकडे तिकडे मातीचा ढीग जमवून बसायचे आणि नंतर पावसाळा यायचा आणि कोकणातल्या मुसळधार पावसाच्या आवाजात ते मातीचे ढीग वाहून जायचे आणि पाठोपाठ ती आवईही विरून जायची. अशी काही वर्ष लोटली.

नंतर कशात सुख आहे हे न कळण्याचं आणि स्वतःचं खरं करण्याचं वय आलं तेव्हा शाळेची बस सेवा झुगारून स्वतःची सायकल घ्यायची अवदसा आठवली. शाळेत जायचं साधन बदललं पण जायचा यायचा रस्ता तोच. जेव्हा त्या रस्त्याचा वापर करायची प्रत्यक्ष वेळ होती नेमकं तेव्हाच  त्याचं काम सुरु झालं आणि जेवढी वर्ष मला तो रस्ता रोज वापरायचा होता तेव्हढीच वर्षं ते चाललं.  ग्रामपंचायतीला  खडीकरणासाठीचा शुभमुहूर्त मिळाल्यावर तासनतास रस्त्यावर डंपर्स आडवे लावून, आमच्या कडेकडेने जायच्या सायकलच्या वाटेवर त्यांनी खडीचे ढिगारेच्या ढिगारे उभारून ठेवले. त्या ढिगाऱ्यानी काही पावसाळे पाहून बरंचसं 'वेट लूज' केल्यानंतर कोणाला तरी जाग आली आणि मला पुरेशी गैरसोय होत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं असावं कारण लगोलग काम चालू झालं.. आधी काही वर्ष खडीकरण, मग कित्येक वर्ष डांबरीकरण , मातीधोंडेकरण या प्रकारात माझी शाळेची वर्षंपण संपली! रोज सायकल घेऊन मध्ये उतरत, मध्ये खडीतून ढकलत असा मी घरून शाळेत आणि शाळेतून घरी पोचायचो.  मी पुण्यात जायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कधीतरी आमच्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम पूर्ण झालं!

गावाकडून पुण्याचा प्रवास साधारण दहा तासाचा होता. रात्री जेवून बिवून उशिरा बसमध्ये बसलं कि पहाटे पहाटे पुण्यात, एवढं सोपं गणित  होतं ते! पण कुंडलीतल्या ग्रहाला याचा सुगावा लागला आणि सुवर्णचतुष्कोणाचा पुणे ते बंगलोर रस्ता बनवायचा घाट घातला गेला. दिवसरात्र डंपर , जेसीबी अर्थमुव्हर्सची खाटखूट, आधीच जेमतेम असणाऱ्या रस्त्यावर, गाड्यांसाठी कधी शेतातून,  तर कुठे गावकुसातून केलेली डायव्हर्जन्स वगैरेनी बसमधल्या झोपेची वाट लावली. बस मध्ये खिडकीकडे बसलो तर माझ्याच डोक्याला टेंगळं यायचे चान्सेस 100 टक्के असत, मधल्या सीटवर किंवा एका बाजूला बसलो तर शेजारच्यांनी आपापल्या टाळक्यानं माझे खांदे शेकवायचे चान्सेस तर शंभर टक्के ओलांडून गेले.  आता दहा तासाचा वेळ १४ तासावर गेला. संध्याकाळचा चहा घेऊन बस मध्ये बसलं तरच सकाळच्या चहाला पेठेत पोहोचता यायला लागलं आणि मार खाऊन आल्यासारखं दुखरं अंग दोन दिवस  वागवावं लागायचं , यात पाच सहा वर्षं गेली.

बरं, रस्ते दुरुस्तीचा त्रास पुण्यात येईपर्यंतच किंवा पुण्यातून घरी जाईपर्यंत असता तर तसंही नव्हे कारण तो प्रवास आठवड्यातून एकदा होत असे असं नाही. आठवड्यातून एकदा रविवारी पुण्याच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या मामाकडे जायचो.  मुठा नदीवर औंधात एक पूल होता. तो इतका खाली होता, कि एरवी नाल्यासारख्या दिसणाऱ्या मुठा नदीला, पावसाळ्यात 'नदी' वगैरे म्हणण्यासारखं पाणी आलं कि हा पूल पाण्याखाली जायचा. त्या काळी असणारी 'जनता बस'  त्या पुलावरून जात असे , अपवाद पावसाळ्यातले ते काही 'अतिप्रवाही' दिवस. त्या दिवशी मात्र बस डी पी रोडवरच्या 'नवीन पूल ' या जेनेरिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या उंच पुलावरून जात असे. खरंतर कॉलेजच्या हॉस्टेल वरून मामाच्या घरी जायचा  बसप्रवास हा जेमतेम ३०- ३५ मिनिटांचा होता पण 'नवीन' पुलावरून गाडी गेली कि हाच प्रवास तासाभराचा होत असे कारण पुलावर पाणी असलं तरी पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे प्रवासी थांबा होता , त्यामुळे बसने जरी कशीही, अगदी होडीतून, नदी क्रॉस केली असती तरी त्या त्या स्टॉपवरचे प्रवासी घेणं अथवा सोडणं भागच होतं. पण ही वेळ अपवादात्मक वेळा, तेही फक्त पावसाळ्यात ओढवत असल्याने त्याही परिस्थितीला माझी ना नव्हती. 

पण दुर्दैवाचा फेरा एवढ्यात सुरूही झाला नव्हता. कदाचित मी आता पुण्यात येतोय याची चाहूल लागल्यामुळे असेल पण पुण्यातला माझा  पहिला पावसाळा संपतो ना संपतो तोवर तो जुना पूल पाडून तिथे एक ' द ऑल न्यू नवीन पूल' बांधायचा प्रकल्प आखला गेला आणि एकदम तत्परतेने त्यावर कामसुद्धा सुरु झालं आणि हा आधीच्या जुन्या 'नवीन पूला' चा -तास भर लागणारा मार्ग आता नेहमीचा झाला. म्हणजे बस अशी पुलापर्यंत यायची, आपल्याला बसमधून पुलाच्या पलीकडचा स्टॉप खिडकीतून  दिसायचा आणि ही तोंड फिरवून मागे जायची! त्यानंतर मग कुठून कुठून वळसे घेत नवीन पुलावरून नदीच्या पलीकडे पोचायची. तिकडून मागे वळून बघितलं तर अर्ध्या तासापूर्वी पोचलेला मघाशी घेतलेला स्टॉप दिसायचा.. थोडक्यात दरवेळी तेच ते औंध गावठाण एक्सप्लोर करण्यात अर्ध्या तासाचा विनाकारण चुराडा झालेला असायचा!

पुढे मग दोन वर्षांनी इंजिनीअरिंग साठी पिंपरी-चिंचवड भागात जायची वेळ आली. आता इथे मी किमान चार वर्ष काढणार याची कुणकुण त्या अनामिक ग्रहाला लागली नसती तरच नवल. जुन्या मुंबई-पुणे हायवेचं नूतनीकरण करण्यासाठी याहून योग्य मुहूर्त असणार नाही अशी सरकारदरबारी खात्री पटली होती. आणि मग माझं कॉलेजला जायचं वेळापत्रक पक्कं झाल्यावर कधीतरी त्या कामासाठी पहिली कुदळ पडली. फोर  लेन काय,  ग्रेड सेपरेटर काय, निगडी ते पुणे २५ मिनिटं काय, नुसती स्वप्नं ! ऍडमिशन साठी राहत्या ठिकाणावरून तीस  एक मिनिटात पोचलेलो मी.. त्यानंतरची चार वर्ष दीड-दोन तासापेक्षा कमी वेळाचा एका बाजूचा प्रवास केलेला आठवत नाही. ग्रेड सेपरेटर च्या निमित्ताने पिंपरी चौक आणि चिंचवड चौक भागात तर आता अगदी हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती शोधून काढतात कि काय असं वाटावं इतकं उत्खनन चालू होतं. होता होता ते काम पूर्णत्वाला जातंय असं  दिसायला लागलं, ग्रेड सेपरेटर म्हणजे काय ते मूर्त रूपात दिसायला लागलं तर त्या रस्त्यावरून प्रवास करायच्या आधीच पहिल्या नोकरीनिमित्त मुंबईत - म्हणजे नव्या मुंबईत जायची वेळ आली.

सुदैवाने मुंबई ते पुणे हा एक्सप्रेसवे झालेला होता आणि त्यावर काही काम चालू नव्हतं पण तो माझा नेहमीच मार्गही नव्हता. एकदा मुंबईत पोचलो कि रोजचा प्रवास कल्याण ते वाशी. मुंबई बाहेरच्या कुणाला मी मुंबईला असतो हे सांगायला लाज वाटावी असा तो प्रवास. धूळ आणि माती एवढी उडायची कि एकतर खिडकी उघडी ठेवता यायची नाहीतर डोळे. खिडकीची सीट  मिळाली नाही आणि शेजारच्याने खिडकी उघडी ठेवली तर नंतर चेहरा धुताना एवढी  धूळ निघायची कि निष्कारण शंका काढणाऱ्या एखाद्याला , पार्वतीने अंगावरच्या मळापासून गणपती कसा बनवला होता याचंदेखील उत्तर सापडावं!  शिळफाट्यावर तर एवढे मोठे मोठे खड्डे होते  कि पावसाळ्यात बसने जाण्यापेक्षा बोटीने गेलो तर लवकर आणि सुरक्षित पोचू असं वाटायचं. 'या रस्त्याचं काम चालू आहे'  असं नुसतं ऐकलं होतं , मी सकाळी लवकर आणि रात्री उशिरा - बघण्यासारखं काही नसल्याने डोळे मिटून, आणि खडखडाट ऐकण्यापेक्षा इअरफोनवर गाणी ऐकत - प्रवास करत असल्याने दिसलं तर नाहीच. पण मी स्वतः त्या रस्त्याने जात येत होतो त्यामुळे ते असणारच असा गाढ विश्वास होता. लवकरच पुण्यात परत आल्याने त्या सिंदबादच्या गलबताची  'सफर' सुटली.. 

मात्र आता इकडे पुणे-बंगलोर हायवेचं काम पूर्ण होत आलेलं होतं हा दिलासा होताच. आता घरी जायचा वेळ १४ वरून ८ तासांवर आला होता. पण पुण्यात सुटका व्हायची नव्हतीच. कारण त्यानंतर मग पुण्यात राहायचं ठिकाण आणि ऑफिस यावरच्या रस्त्यावर काम सुरु असायचं , नसलं तर सुरु व्हायचं! मी कोथरूड ला राहायला गेलो तर नळस्टॉपच्या फ्लायओव्हरचं बांधकाम सुरु झालं , विमाननगर ला राहायला गेलो तर पालिकेच्या बांधकाम खात्याने  पाटील इस्टेट वरून फ्लाय ओव्हर बांधायला घेतला. मग ऑफिस चिंचवड ला गेलं आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. ज्या रस्त्याचं काम बघत बघत पूर्ण शिक्षण संपलं होते त्या रस्त्याचा वापर करायची वेळ शेवटी दैवाने दिली होती.  पण बघतो तर काय, तेवढ्यातच कोणत्यातरी नतद्रष्टाला-निगडी-पुणे २५ मिनिट-वाल्या मार्गावर बीआरटी करायची आयडिया सुचलेली! झालं, एवढा चांगला चार लेनचा रस्ता खोदून बी आर टी चे स्टॉप, बीआरटीसाठी लेन सेपरेटर वगैरे थाट मांडला जात होता.जितकी वर्ष चिंचवड ऑफिसला होतो तितकी वर्ष बी आर टी प्रोजेक्ट रडतखडत चालू होता. मी आपला नेहमी धुळीने माखलेलाच. 

त्यानंतर कधीतरी नाशिकला जावं लागलं. तो प्रवास जेमतेम काही महिनेच असेल  पण तेवढयातल्या तेवढ्यात नाशिक -पुणे मार्गावर काम खोदून काढलं गेलं. भोसरी,  भूगाव अशा निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे फ्लायओव्हर बांधायचे प्रकार एवढे सुरु झाले कि प्रवासात गचके बसत असताना  तोंडातून निघणारी  'भ'ची बाराखडी थांबूच नये ! चार तासाचा वेळ सहा  तासावर गेला.. नशीब! अजून काय? मग परत कामानिमित्त परत मुंबई ला बाडबिस्तरा हलवला आणि इकडे हे फ्लायओव्हर कम्प्लिट झाल्याची बातमी काही नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या सहकार्यांनी  कळवली! 

त्यानंतर जेव्हा काही महिन्यात परत पुण्यात आलो तर नव्या कंपनीचं ऑफिस हिंजवडी मध्ये होतं. त्यामुळे माझा जाण्यायेण्याचा रस्ता वाहतूकयोग्य असून चालेलच कसा? ताबडतोबीने औंध रावेत रस्त्याचं काम करायला घेतलं गेलं. मी आपला जातोय धूळ खात. कित्येक वर्षांनी ते पूर्ण होतंय असं वाटलं, आता त्या रस्त्याचा आनंद घ्यावा म्हटला तर तिथेही बीआरटी प्रकरण करायचं ठरलं.. परत खोदाखोद,  डिव्हायडर वगैरेंनी उच्छाद मांडला. काही वर्षांनी ते काम पूर्ण झाल्यानंतर थोडे दिवस सुसाट त्या रस्त्यावरून गाडी दामटल्यावर थोडा  चुकचुकलोच!  

यापेक्षा काही रस्त्याची वाट लावता येणार नाही असं मला मनातून वाटत होतं  पण तेवढ्यातच ज्या देवतेनं पुणे पी डब्लू डी खात्याला, जिथे चौक होते तिथे फ्लायओव्हर बांधायचा दृष्टांत दिला होता तीच, पिंपरी चिंचवड पी डब्लू डी खात्याच्या स्वप्नात गेली आणि तिने एक्झॅक्ट तोच दृष्टांत त्यांनादेखील दिला! मग काय ? रुंद , गुळगुळीत औंध रावेत रोडवर चौकाचौकात पत्रे रचून रुंद रस्ते छोटे केले गेले, बी आर टी स्टॉप उध्वस्त करून बसेस परत बीआरटी मार्गातून पुन्हा त्या अरुंद रस्त्यांवर येऊन आपल्याला पुरेशी गैरसोय होईल ना याची व्यवस्था केली गेली तेव्हा कुठे मला माझं नेहमीचं रुटीन चालू झाल्यासारखं वाटलं.

मग हिंजवडीच्या  मार्गावर अंडरपास करायचा  ठरला, दोन लेन चं ट्राफिक एकाच लेनला वळवून बरोबर सोमवार ते शुक्रवार 9 ते 5 या वेळात ते काम चालू झालं, आता मेट्रो प्रकल्प मग अजून काय तर अजून काय..  बरं पुणे बंगलोर हायवे वरून 8 तासात जायचं सुख या सगळ्या दुःखावर फुंकर घालेल अशी अपेक्षा करावी तर तोही सिक्स लेन करायचा प्रोजेक्ट चालू झाला.. परत तीच डायव्हर्जन्स,  खाचखळगे , अर्थमूव्हर्स चे शब्दात न पकडता येणारे आवाज! 

हल्लीच घरी जाऊन आलो , घराचा रस्ता ठीकठाकच आहे पण मुख्य गावातून जाणारा कित्येक वर्ष सिंगल लेन असणारा मुंबई-गोवा हायवे आता चार लेन्स चा करायचा कार्यक्रम चालू आहे, गावाच्या वरून फ्लायओव्हर होतोय, त्यामुळे मुख्य चौकात पिलर्स आले आहेत, मूळ रस्ता ओळखूही येऊ नये असा दिसेनासा झालाय . कधी उजवीकडून जा तर कधी डावीकडून जा अशा सूचना ठिकठिकाणी लिहिलेल्या आहेत. मात्र इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर आता मी अजिबात वैतागत नाही, मी कुंडलीतल्या त्या अनोळखी ग्रहाकडे तिरपा कटाक्ष टाकतो आणि धुळीत माखायला सज्ज होतो !