शुक्रवार, २७ जुलै, २०१२

अपुले मरण पाहिले म्या डोळा! : उत्तरार्ध

पूर्वार्ध :
आपली भडक लाल पिशवी नाचवत नाचवत रस्ता क्रॉस करत असताना भर रस्त्यातून शोधत येवून बैलोबाने यांनाच ढुशी दिली आणि साधी-सुधी नाही. शिंग डायरेक्ट पोटाच्या आतमध्ये आणि आतडं पोटाच्या बाहेर!!! शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यावर त्याला जे वाटलं असेल तेच फिलिंग गणपतरावांनी घेतलं असणार यात शंकेला वावच नाही. फक्त 'दगा दगा' ओरडत बसायची गणपतरावांची ताकद नव्हती. त्याऐवजी ते तत्क्षणी बेशुद्ध पडले.
हॉस्पिटलात डॉक्टर लोकांनी त्यांचं आतडं होतं तसं कोंबून पोटाला टाके घातले आणि त्यांच्या खिशाचे टाके मात्र उसवले! शुद्धीवर आल्यावर ते स्वतःच सांगायला लागले. लोक म्हणत होते, 'अहो एवढं रक्त गेलं वाहून.. आम्हाला वाटलं आता जगता कि नाही'
तर म्हणे " मी कसला मरतो? अजून पंधरा वर्ष आहेत माझी.. काही केलं नसतत ना तरी हातावर आतडं घेऊन जगलो असतो." कसंनुस हसत गणपतराव म्हणाले. (मला कल्पनेने शिसारी आली आणि )लोकांना पश्चाताप झाला. गणपतरावांना हॉस्पिटल मध्ये भरती केल्याचा आणि त्यापेक्षा त्यांचे पैसे वाया घालवल्याचा!

त्यात्क्षणी त्यांना साक्षात्कार झाला असावा कि 'मृत्यू माहित असताना कशाला मेंढरासारखं घाबरत घाबरत जगायचं?' मग तर काय विचारूच नका.. दरम्यानच्या काळात गणपराव उठसुठ ब-याच ठिकाणी धडपडले, अपघातातून वाचले, जिवावरच्या संकटातून बचावले.. विश्वास बसणार नाही पण मध्येच एकदा  श्वानदंशातूनही कोणतेही इंजेक्शन न देता विनाविषबाधा सुखरूप सुटले.
"हे अति झालं गणपतराव" मी म्हटलं..
"काही होत नाही हो मला"
"असं कसं, आता साधा कुत्रा होता म्हणून वाचला असाल.. उद्या पिसाळलेला कुत्रा चावला तर? बर आता इंजेक्शनही फ्री असतं सरकारी हॉस्पीटलात!"
"चौदाच्या चौदा? बेंबीत घ्यायची असतात ती ?"
"अहो हल्ली तीनच असतात.. आहात कुठे आणि हल्ली 'नेहमीच्या ठिकाणी' देतात.. कशाला उगीच रिस्क घेता?" मी म्हटलं. गणपतरावांनी मान हलवली पण त्यांनी काही ते फारसं मनावर घेतलं नाही असं वाटलं.
गणपतराव आता 'हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी' वगैरे सरंडर करत होते..
"बरोब्बर पंचाहत्तराव्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स घेणार आणि मोठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पण घेणार accident रायडर सोबत.. बसायचा तो बसूदेत प्रीमिअम. काय चिंता नाही!" गणपतराव म्हणायचे..
ते आता उजवीकडे-डावीकडे न बघता रस्ता ओलांडत होते..रियल इस्टेट मध्ये गुंतवणुका करत होते. बिनधास्त रिस्क घेत होते... ओ एन जी सी सारख्या १०-२० वर्षात ग्रोथ होणा-या ऑईल कंपन्यांचे शेअर्स घेत होते.. फार्मा कंपन्यांच्या स्टेक्समध्ये आर्थिक उलाढाल करत होते.. कशाची आणि कोणाची तमा बाळगत नव्हते.. कोणी काही म्हणालं तर सांगायचे "अजून बरीच वर्ष आहेत हो जायला मला, तो पर्यंत बायका मुलांची तजवीज करून घेतो!" तर थोडक्यात मृत्यू ची वेळ माहित असल्याचा ते पुरेपूर लाभ घेत होते.

या भानगडी करता करता त्यांचं घरातून लक्ष उडायला लागलं. मुलाच्या लग्नाचा विषय बाजूलाच पडला. फादरान्ची ही परिस्थिती बघता त्यांच्या कार्ट्याला आपल्या लग्नाचं काही खरं दिसेना. त्याने मग मारून मुटकून प्रेम बीम केलं आणि कुठूनतरी मुलगी पळवून आणली. (मुलीला बघताच 'प्रेम मारून मुटकून' केलेलं असाव यावर कोणाचापण विश्वास बसावा! असो..) मुलाने देवळात हार तुरे घालून लग्न उरकलं आणि दमदार हुंड्याची गणपतरावांची स्वप्न त्याने धुळीला मिळवली. मुलीने पण काही काळातच पोराची चॉईस कशी होती याबद्दलचं इतरांचं म्हणणं खरं ठरवत घरात भांडणं उकरून काढली.

बारीकसारीक कारणांवरून घरात आदळआपट व्हायला लागली. सासू सुनेचं वाजायला लागलं. गणपतराव आणि त्यांचा मुलगा मधल्या मध्ये भरडले जायला लागले.
काही झालं कि बायको त्यांच्याकडे यायची.. " बघा ना अहो.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... कसली भवानी घेऊन आलय कार्टं .. आम्हाला म्हातारपणी छळायला.. कोणास ठावूक? जरा इन्टरेष्ट घेऊन त्याचं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"
मग थोड्या वेळाने मुलगा यायचा.. "ओ पप्पा.. आईला समजावा ओ जरा.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... .. उच्छाद मांडलाय दोघींनी.. जरा इन्टरेष्ट घेऊन माझं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"
मग सूनबाई यायची.. " पप्पा.. कसली सासू मिळाली आहे मला.. अमुक अमुक... तमुक तमुक.. भलतं सलतं... आलतू फालतू... कसा संसार केलात या बाईबरोबर कोण जाणे.. झक मारली आणि लग्न करून इकडे यायची बुद्धी झाली.. तुम्ही तरी सांगायचं तुमची बायको असली आहे ते.. जरा इन्टरेष्ट घेऊन तुमच्या पोराचं पद्धतशीर लग्न लावून दिल असतंत तर हि वेळ आली असती का?"

गणपतरावांच जगणं मुश्कील व्हायला लागलं.. त्यात पोरगी जावयाबरोबर बिनसलं म्हणून परत आली.. जावयाच्या नाकदु-या काढायला त्यांना मुंबईच्या खेपा वाढवायला लागल्या.. प्रचंड त्रास होत होता.. पण इतक्यात मरणार नाही या गृहितकावर गणपतराव सगळ्या गोष्टी आपापल्या परीनं सेट करायचा प्रयत्न करत होते.. तरीही आवाक्याबाहेर गेलेल्या गोष्टी सावरता येत नाहीत.. घरच्या कटकटीना वैतागून मुलानं वेगळा संसार थाटला.. गावातच भाड्याने राहायला लागला. आई वडिलांना एकटं टाकून! त्यांच्या बायकोने आकांत केला.. थयथयाट केला. कोणाला ती आवरता आवरेना.. सर्वांसमक्ष "तू 'आम्हाला' मेलास" म्हणून सांगितलं आणि गणपतरावांना न विचारताच आपल्या बाजूला करून घेतलं..
...जिवंतपणी मरण ते वेगळं काय असतं?

गणपतरावांच्या मागची साडेसाती काही सुटेना.. मुलाच्या उत्पन्नाच्या भरवशावर सगळे पैसे लाँग टर्म प्लान्स मध्ये इन्वेस्ट करून ठेवलेले आणि आता हातात काही नव्हत... बायकोच्या नकळत मुलाच्या दारात जावं लागलं. मुलानेही (त्याला न शोभणारा) समजूतदारपणा दाखवत महिन्याला पैसे द्यायला सुरुवात केली..
सगळं असून गणपतराव सगळं गमावून बसले होते. 'देवा यापेक्षा मरण बरं.. ' ते विनवणी करत होते पण हिशेबाप्रमाणे अजून दहा वर्ष तरी शिल्लक होती.

तब्बल पाच वर्षानंतर त्यांचा मुलगा घरी परतला. सून सुधारली होती.सासू सुधारायच्या पलीकडे होती पण तिला पण बरंच काही उमगलं होतं. तिच्यासाठी काय! आधी नवरा जिवंत झाला आणि आता मुलगा!

गणपतरावांना हर्षवायू व्हायचाच बाकी होता आणि आनंदाच्या भरात नको ते झालं.. सततच्या विचारांनी शारीरिक आणि मानसिक त्रास वाढला होताच.. आता अचानक हे अस झाल्याने वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी गणपतरावांना paralysis चा attack आला. डायरेक्ट अर्धी बाजूच निकामी. डॉक्टर लोकांनी सांगितलं, " तब्ब्येत खणखणीत आहे..फक्त हातपाय हलवता नाही येणार!"
"म्हणजे मग राहिलं काय?" गणपतरावांनी विचारलं.. पण डॉक्टरांकडे उत्तर नव्हतं ! सगळं सुरळीत होता होता दैवाने डाव टाकला..
"असल्या जगण्यापेक्षा मेलो असतो तर बरं.." गणपतराव उघडउघड म्हणत असत "पण कानात यमराज गुंजतोय ना.. म्हणतो 'अरे याला अठ्ठ्यात्तराव्या वर्षी आणायचा आहे' .. !!"

एकेकाळी मरण लांब आहे म्हणून हर्षोत्सव साजरा करणारा माणूस आता मरणाची आराधना करत होता ! आम्हाला त्यांचे हाल बघवत नव्हते

फ़िजिओथेरपिस्टच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना थोड फार उठता यायला लागलं.. पण स्वतःच्या पायांवर उभ राहता येईल कि नाही याबद्दल शंकाच होती.. दरम्यानच्या काळात बायको,मुलगा आणि सुनेने बरेच उपचार केले.. गणपतरावांच्या गुंतवणुकीचे थोडेफार रिटर्न्सही येवू लागले होते. 'बरोब्बर पंचाहत्तराव्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स' घ्यायचं त्यांचे मनसुबे 'नॉन एलीजीबिलीटी' मुळे उधळले गेले होते.
आयुष्याच्या पुढच्या अध्यायात अधाशासारखे कमावलेले पैसे शेवटच्या काळात संपले होते.. जेवढी गंगाजळी त्यांनी सुरुवातीला जमा करून ठेवली होती तेवढीच आता उरली होती.

हल्लीच गणपतरावांचा जावई आणि मुलगी तिच्या माहेरपणाला आलेली असताना एके दिवशी त्यांचा मुलगा त्यांची कुठल्या तरी गुंतवणुकीचे अनपेक्षितपणे आलेले रिटर्न्स पप्पांना दाखवायला घेऊन आला
"पप्पा किती पैसे मिळालेत बघा.. अमुक एक लाख"
"काय म्हणतोस? " म्हणत गणपतराव चक्क स्वतःहून स्वतःच्या पायावर ते उभे राहिले. अचानक.. "अरे हे बघ काय.." ते ओरडले!!
मुलगा दोन्ही आनंदाच्या बातम्या द्यायला स्वयंपाक खोलीकडे पळाला.. आणि इकडे गणपतराव छाती धरून कोसळले..
आम्ही त्यांच्या जावई आणि मुलाबरोबर जाऊन त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करून आलो..

त्यांच्या घरी आल्यावर गणपतरावांच्या बायकोने सुनेला आमच्यासाठी चहा टाकायला सांगितला.. योगायोगाने वीस वर्षापूर्वी गणपतरावांच्या पहिल्या मृत्युच्या वेळी आम्हीच चार पाच जण असेच आणि इथेच बसलो होतो.. त्या आठवणी निघाल्या. त्यावेळी दणाणलेले धाबे आठवून आम्ही दबकत दबकत हसलो..
गणपतरावांच्या मुलीने चहा आणून दिला..

तेवढ्यात चार पाच जणांच एक टोळकं अंगणात येवून टपकलं.. वरच्या आळीतले होते ते सगळे. गणपत बारशिंगेच्या इथले. हा गणपत बारशिंगे सुद्धा साधा माणूस. कोणाच्या फारसा अध्यात मध्यात नसलेला. मुख्य म्हणजे आमच्या उठण्या बसण्यात नसलेला! असो.. तर तो स्वतः सुद्धा त्यांच्याबरोबर होता.

" काय गं  मुली.. पप्पा कुठे आहेत?' गणपतरावांच्या  मुलीला त्या ग्रुपमधल्या एका वयस्कर माणसाने विचारलं.
" पप्पांची तब्ब्येत बिघडलीय काका,  हस्पिटलात भरती केलंय..हे आणि दादा तिकडेच आहेत. हेपण गेले होते सगळे.. आताच आले."
आम्ही सगळेच अवाक होऊन एकमेकांची तोंडं बघायला लागलो! सेम टू सेम संवाद वीस वर्षापूर्वी घडला होता.. यावेळी जरी आम्ही दर्शक असलो तरी त्यावेळी आम्हीच त्या संवादाचे कर्ते होतो ! एखाद्या सिनेमाचा रिमेक बघावा अशी आमची अवस्था झाली होती. गणपत बारशिंगे आमच्याकडे बघून 'बघितलात? मी सांगत होतो ना?' या अर्थाने सूचक हसला आणि हळूच त्याच्या शेजारी उभ्या असणा-याच्या कानात पुटपुटला. तो काय बोलला असणार ते मी ताडलं!! तो नक्कीच बोलला असणार कि 'माझ्या मर्तिकाचं सामान परत नका करू, परस्पर इकडे आणायला सांगा..' कारण वीस वर्षापूर्वी हेच शब्द आमच्या गणपतरावांनी माझ्या कानात सांगितले होते! मी पुढचा प्रसंग आठवला आणि कानात जीव गोळा करून बसलो.. आता फोनची रिंग अपेक्षित होती. आणि तेच झालं.. कोणी काही बोलणार एवढ्यात फोन वाजला..सून लगबगीने आत गेली आणि थोड्या वेळाने तोंडावर पदर दाबून बाहेर आली.
"पप्पा गेले.. यांचा होता फोन.."

गणपतरावांच्या बायकोने आकांत करून गाव गोळा केला.. सून सैरभैर झाली. पोरगी पहिल्या वेळेसारखीच सुन्न  होऊन बसली..
तर अशा त-हेने अत्यंत नाटकी पद्धतीने गणपतराव ढू ss म झाले.. मी बारशिंगेच्या मंडळींकडे गेलो आणि शांतपणे म्हटलं.. " चिता रचलेली असेल तर विस्कटायला सांगू नका! आटपून टाकू तिथेच. जवळचे  इथेच आहेत आणि नातेवाईक पण पोचतील अर्ध्या एक तासात."
ते सगळे चकित होऊन माझ्याकडे बघत राहिले. 
काहीही असो पण मला राहून राहून एकच प्रश्न पडतोय कि सारखं सारखं कन्फ्यूज होणा-या त्या यमदूताला यमराजाने नोकरीवरून डिसमिस केलं असेल का?

(समाप्त )

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

अपुले मरण पाहिले म्या डोळा!: पूर्वार्ध

गणपतराव ढूssssम झाले. 'ढूssssम' म्हणजे गेले वर! हि खरं म्हणजे महत्व देण्यासारखी बातमी नाही. आता वय वर्ष अठ्ठ्याहत्तर म्हणजे आजकालच्या जमान्यात खूप झालं. हल्ली सत्तरीतच अर्ध्या गोव-या मसणात गेलेल्या असतात पब्लिकच्या.. त्यामानाने गणपतरावांनी बरेच पावसाळे पाहिले. मग मी का सांगतोय हे सगळं? तर सांगण्यामागच कारण हे कि, माणसं एकदाच मरतात परंतु आमचे गणपतराव दुस-यांदा मेले!!

पहिल्या मरणापूर्वी जगण्याव्यतिरिक्त त्यांनी आयुष्यात काही काही म्हणून केलं नाही. काहीतरी थातुरमातुर शिक्षण. मग कुणाच्यातरी वशिल्याने सरकारी नोकरीत चिकटले. इमानेइतबारे त्यांनी ती नोकरी केली. त्यांच्या बायकोने दोन मुलांना जन्म दिला. त्यासाठी केलेली मेहनत हेच काय ते त्यांचे तरुणपणातले कष्ट!! बाकी ती पोरं आपोआप वाढली. मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मोठा झाला. शिक्षणाच्या बाबतीत ठोंब्या. एकदम बापाच्याच वळणावर गेला होता. त्यामुळे गणपतरावांनी हातपाय हलवण ओघाने आलंच. बापाचं कर्तव्य समजून ते मात्र त्यांनी पार पाडलं. नोकरीची दोन वर्ष शिल्लक असताना तब्ब्येतीच्या कारणास्तव त्यांनी व्हॉलन्टरी रिटायरमेंट घेतली. अनुकंपा तत्वावर मुलगा त्यांच्या जागी जॉईन झाला. मुलीला त्यांनी व्यवस्थित मुलगा बघून दिला. मुंबईला माहीमजवळ चांगलं दोन खोल्यांचं 'घर' असणारा जावई होता त्यांचा. पण हे सगळं दुस-या जन्मात..! पहिल्यात कर्तव्याच्या मानाने भोपळा होता..

तसं अंगावर आलंच तर गणपतराव काम करायचे. अगदीच नाही असं नाही. पण स्वतःहून जावून काय करतील तर शपथ. 'सांगकाम्या आणि हो नाम्या' म्हणतात न तसला प्रकार.पहिल्यांदा त्यांची गणपत नावाने ओळख होती. 'ए गणपत या फाईल्स उरकून टाक,आज मला घरी लवकर जायचंय' म्हणून कोणी सांगितलं कि गणपत करायचा, चकार शब्द न काढता. पण कोण अती करायला लागलं तर 'हो हो' म्हणून करायचाच नाही. शेवटी ते त्याचं काम नसायचं त्यामुळे त्याला साहेब बोलू शकत नसे. त्याने कधीही साहेबाकडे जावून प्रमोशन मागितलं नाही कि वाढीव महागाई भत्ता. सरकारच्या कृपेने आणि देवाच्या दयेने ते त्याला मिळत गेलं.

तर हा गणपत सरळ मार्गी जगत होता. गेला दिवस आपला म्हणत होता. आयुष्यात काही अनपेक्षित घडत नव्हतं आणि घडावं अशी त्याची अपेक्षा सुद्धा नव्हती. त्याची लाख नसेल पण नियतीची हवी ना?

वय वर्ष अठ्ठावन्न असताना गणपतला हार्ट attack आला. अचानक. झोपेत असताना. आणि गणपत गेला. आम्हाला सकाळी सात वाजता कोणीतरी बोलवायला आलं. आम्ही धावत पळत गेलो. बायको धाय मोकलून रडत होती. दोन्ही पोरं- तरुणपणातली- सुन्न होऊन बसली होती. पोरगी रडून थकली होती आणि पोराच्या चेह-यावरचं भविष्याबद्दलचं प्रश्नचिन्ह ठळकपणे उठून दिसत होतं.

"सकाळी पाणी मागितलं हो साडेपाच वाजता.." गणपतच्या बायकोच्या रडव्या हेलांमधून मी शब्द टिपून काढत होतो.. "मी म्हटलं उठा आणि जाऊन घ्या स्वतःच्या हातांनी.." पुन्हा टिपेचा स्वर "गेले पिऊन आले आणि झोपले.. साडेसहाचा गजर बंद करायला त्यांना उठवलं तेव्हा उठेचनात....." स्वर टिपेचा... आर्ततेचा... वाईट वाटलं.
'भला माणूस..'
'कधी कोणाचं मागून खाल्लं नाही,पाच पैशाची उधारी नाही, कोणाला दुखावलं नाही मग इतक्यात कसं व्हावं असं?'
'....पोरांचं काय होणार?'
आणि विशेषतः
'...पोरीचं कसं होणार?'
वगैरे पठडीतल्या आणि 'असल्या'वेळी करायच्या गावगप्पा सुरु झाल्या. नेहमी 'असल्या' कामात पुढाकार घेणा-या लोकांनी तिरडी बांधली, मर्तिकाचं सामान मागवलं/आणलं गेलं. गणपतचे नातेवाईक मोजकेच आणि जवळच्या गावातलेच होते. गणपत गेल्याचा सांगावा पोचताच अर्ध्या पाऊण तासात सगळा गोतावळा त्याला पोचवायला जमला म्हणजे बघा.

कार्यवाल्या भटजींनी गणपतच्या मुलाला 'काय कसं' वगैरे सूचना दिल्या. तो आणि आम्ही तिघे असे आमच्या खांद्यावर गणपतला घेऊन स्मशानात गेलो. भलताच जड होता तो आणि ऐन गृह्स्थाश्रमाच्या वयात आउट झाल्यामुळे सुमसुमीत सुद्धा होता! पण गेलेल्या माणसाबद्दल असलं भलतं सलतं बोलू नये म्हणून मी जिभेला आवर घातला.

लाकडं रचलेली होती. गणपतला तिथे ठेवला, भटजी ने गरुड पुराणातले वेचे म्हटले.. गणपतच्या मुलाने भोक पडलेलं मडकं घेऊन फे-या मारल्या आणि चितेला आग लावणार इतक्यात चमत्कार झाला!

गणपत चितेवरच उठून बसला!!

भटजीच्या तोंडाला बुडबुडे आले.. गणपतची बायको झीट येवून पडली, पोरीची वाचा बसली आणि पोरगा हातातल्या पेटत्या लाकडासकट धूम पळाला. फटाका पेटवल्यावर लहान मुलं पळतात अगदी जसाच्या तसा.. त्याला बघून गर्दीसुद्धा 'होय्य..होय्य.. पळा पळा..भूत भूत' करत सैरावरा पळत सुटली.. साहजिकच त्यात मीसुद्धा होतो..

जरा लांब गेल्यावर काही लोकांच्या जीवात जीव आला.. परिस्थितीचं भान आलं. त्यातही मी होतो! आम्ही काहीजण थांबलो. एव्हाना गणपत स्वतःच्या पायांनी चितेवरून खाली उतरला आणि लोकांना ओरडून काही सांगण्याच्या भानगडीत न पडता (ओरडून बोलणं हा त्याचा पिंडच नव्हता म्हणा!) आडव्या पडलेल्या बायको आणि थरथरत बसलेल्या पोरीकडे गेला. "अगं मी जिवंत आहे" त्यांना तो सांगत होता. "मेलो होतो पण आता जिवंत आहे मी. भूत नाहीये मी. बघ हात लावून." पण हात लावायला कोणी धजावेना. मी पाहिलं. गणपतचे पाय आमच्यासारखेच होते! मग मीच पुढे झालो आणि हात लावला. तो त्याच्या शरीराला अडला.. अंगपण गरम होतं. गणपत खरंच जिवंत होता. थोड्यावेळाने त्याची बायको शुद्धीवर आली, पोरगी बोलायला लागली.. मुलगा पण न पेटलेल्या चितेकडे परतला. सगळ्यांना गोळा करून आम्ही त्याच्या घरी गेलो.

बहुतेक बंद पडलेलं हृदय कशामुळे तरी चालू झालं असावं. धक्क्यामुळे बंद पडलेलं घड्याळ चालू होतं तसं.पण गणपतकडे वेगळीच स्टोरी होती.

"मी वर गेलो. तर गेटवर हि मोठ्ठी लाईन. चित्रगुप्त स्वतः एन्ट-या घेत होता सगळ्यांच्या. यमराज शेजारी राहून बघत होते.. आणि सगळे यमदूत आपापले आत्मे रेडयांवर बसवून लायनीतून पुढे पुढे सरकत होते..एका रेड्यावर दोन आत्मे." गणपतराव सांगत होते.
हो.. याचवेळी गणपतचे गणपतराव झाले असावेत. कारण स्वर्गाचा दरवाजा ठोठावून आलेला माणूस होता तो आता.
"चित्रगुप्त बहुतेक लोकांच्या इथल्या जमिनीवरच्या कार्याचा आढावा घेऊन स्वर्ग कि नरक अशी विभागणी करत होते. मी यांच्या चिंतेत " बायकापोरांकडे बोट दाखवत गणपतराव म्हणाले.
"दोन वर्षांची सर्विस बाकी होती.. एलआयसीच्या पॉलीश्यांचे कागद कुठे ठेवलेत तेसुद्धा हिला सांगितलं नव्हतं.पोरगा नोकरीला नाही..पोरीचं लग्नाचं वय झालंय नुकतं. पस्तिशीनंतर लग्न करण्याचा हा तोटा असतो बघा..रिटायर्ड होईस्तोवर पोरं हातात पण आलेली नसतात.."
"यमदुताच्या रेड्यावर बसून तुम्ही पस्तिशीनंतर केलेल्या लग्नाच्या फायदा तोट्यांवर विचार करत होतात?" न राहवून मी विचारलं.
"नाही नाही.. ते आपलं आता सुचलं म्हणून तुम्हाला सांगितलं" गणपतराव वदले..
"माझा नंबर आल्यावर यमदुताने माझी कारकीर्द सांगायला सुरुवात केली. चित्रगुप्ताच्या चेह-यावरचे भाव बदलत गेले. मलापण कळेना हा कोणाचं कसलं काम सांगत आहे. काहीच माझ्या भूतकाळाशी जुळत नव्हतं"
"मग?" आमचं कुतूहल आत्ताशी चाळवायला लागलं होतं. तोपर्यंत मी 'गणपत येडा झाला' असं कन्क्लूजन काढण्यापर्यंत पोचलो होतो.
"मग काय..चित्रगुप्त भडकला.. म्हणे ' कोणाला उचलून आणलंस ? इतकी वर्ष झाली इथे आणि असली चूक कशी काय करतोस?' मला काहीच समजेना. यमदूत बावरून गेला. यमराज पुढे धावले. चित्रगुप्ताने त्यांना कसले तरी रेकॉर्ड्स दाखवले. ब्यालेंस शीट सारखा काहीतरी प्रकार होता. यमराजांनी आत लक्ष घातलं. आणि यमदुता ला समजावत म्हणाले 'अरे याला अठ्ठ्यात्तराव्या वर्षी आणायचा आहे,इतक्यात कसं काय आणलंस?तुला सांगितलेला तो गणपत वेगळा. यांच्या मागच्या घरातला. यमदूत मान खाली घालून होता. 'याच काय करायचं?' त्याने दबलेल्या आवाजात विचारलं. ' ते मी बघतो.. तू तुझं काम नीट कर' असं म्हणत यमराजाने माझ्या छातीवरच लाथ घातली!" गणपतराव सांगत होते..
"तिथून मी उलट मागच्या बाजूला खाली पडलो तोच जाग आली..! मला वाटलं स्वप्न आहे पण नव्हे खरंच मेलो होतो मी! तुम्ही तर मला जाळायला निघाला होतात' हर्षोल्ल्हासित होऊन गणपतराव सांगत होते..

आम्ही एकमेकांची तोंडं बघायला लागलो. हा माणूस सांगतो ते खरं कि खोटं? शहानिशा कोण आणि कशी करणार? कि खरंच वेड लागलंय? उत्तर लवकर शोधायला हवं होतं नाहीतर आम्हाला वेड लागायची पाळी आली असती! गणपतरावांनी ते ओळखलं.

"खोटं वाटतंय न तुम्हाला?" त्यांनी विचारलं. "मग एक काम करूया.. पाठीमागच्या घरातल्या गणपतला भेटून येवू. चित्रगुप्ताच्या म्हणण्यानुसार त्याची इनिंग संपली आहे" गणपतराव वर जाऊन आल्यापासून स्मार्ट कि काय म्हणतात ना तसे झाले होते!

'काय हरकत आहे. चेक तरी करून घेऊ. ' असा विचार करून आम्ही तिघे चौघे खानविलकरांच्या घरी गेलो.

" काय वहिनी.. आजोबा कुठे आहेत?' त्यांच्या सुनेला आम्ही विचारल.
" बाबांची तब्ब्येत बिघडलीय भावजी, हस्पिटलात भरती केलंय काल.हे तिकडेच आहेत. मी नुकतीच आले."
आम्ही एकमेकांची तोंडं बघायला लागलो! गणपतराव आमच्याकडे बघून सूचक हसले.
"माझ्या मर्तिकाचं सामान परत नका करू, परस्पर इकडे आणायला सांगा.." ते हळूच माझ्या कानात पुटपुटले. तेवढ्यात फोन वाजला..वहिनी लगबगीने आत गेल्या आणि थोड्या वेळाने तोंडावर पदर दाबून बाहेर आल्या.
"बाबा गेले.. यांचा होता फोन." आम्ही तिकडून गुपचूप हॉस्पिटल मध्ये गेलो.

गणपतरावांना जिवंत जाळण्याचा अघोरी प्रकार टळल्यापासूनच्या अर्ध्या तासात ही पुढची न्यूज होती. त्यामुळे एकाला सूचना देवून स्मशानातली रचलेली चिता कोणी विस्कटणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलं. मघाचेच सोपस्कार पुन्हा झाले. या गणपतरावांचे नातेवाईक एव्हाना झाल्या प्रकारातून स्थिरावले होते. त्यांना गणपतरावांनी सगळी कथा नव्याने सांगून अचंबित करून टाकलं. मग त्यांनीच 'गणपतराव-दुसरे' यांच्या कार्याला गर्दी केली. चितेजवळ मात्र सगळे दबकूनच राहिले. न जाणो हा पण उठला तर!! पण तस काही झालं नाही..

गणपतराव पहिले स्वर्ग बघून आले होते हे नक्की.. मग ताबडतोब त्यांनी हालचाली करायला सुरुवात केली. तब्ब्येतीच्या कारणावरून त्यांनी रिटायरमेंट मागितली. साहेबांना सुद्धा त्यांनी हि कहाणी सुनावली असणारच! साहेबांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला वरून मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायचं कबूल केलं.

मुलगी तर अशीही ह्याच्या त्याच्या बरोबर उंडारत होतीच.. त्यामुळे तिला लग्नासाठी तयार करायला त्यांना फारसे कष्ट पडले नाहीत! एका पायावर तयार होती मुलगी.प्रश्न होता तो मुलाचा.. त्यासाठी त्यांना अतिप्रचंड कष्ट पडले.त्यांना हवा तसा जावई शोधायला त्यांनी ब-याच चपला झिजवल्या.. काही ठिकाणी पोरीची थेरं कानावर आली म्हणून पोरगी नाकारली, काही ठिकाणी पोराच्या अपेक्षा जास्त होत्या. सरतेशेवटी मुंबई चा जावई मिळाला. त्याला गावाबद्दल (आणि मुख्यत्वे मुलीबद्दल) जास्त माहिती नव्हती आणि इंटरेस्ट ही नव्हता. गणपतरावांचा दुसरा जन्म भरून पावला.

मुलीच्या लग्नाचा उपद्व्याप संपतो न संपतो तोपर्यंत मुलगा लग्नाला आला.. पण गणपतरावांची पुंजी कमी झाली होती त्यामुळे त्यांनी आणि मुलाने थोडी कळ काढायचं ठरवलं. तरीही मुलीच्या वेळी झाली तशी गडबड होवू नये म्हणून त्यांनी आधीच चाचपणी करायला सुरुवात केली. कोणाची मुलगी लग्नाची आहे असं कळलं कि गणपतराव स्वतःहून चौकशीला जात. इतरांच्या अध्यात मध्यात न पडणारा माणूस लोकांची लग्नं जुळवायला पुढे पुढे करू लागला. गेल्या साठ वर्षात केली नसेल इतकी धावपळ त्यांनी त्यापुढच्या चार पाच वर्षांमध्ये केली!! एकाच आशेपायी - न जाणो त्या लग्नाच्या बाजारात आपला मुलगा सुद्धा खपला तर! मुलीसाठी दाबून हुंडा दिल्यानंतर त्याची वसुली होईल असं एक पण स्थळ त्यांना सापडत नव्हतं. पण शोध जोरात चालू होता.

असंच एक स्थळ बघून येत असताना गणपतरावांना बैलाने उडवलं!!
उत्तरार्ध: