सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०

मुन्नी बदनाम हुई: एका खंडकाव्याचे रसग्रहण

भारतीय सांगीतिक इतिहासात उलथापालथ घडवून आणण्याची ताकद असणा-या "मुन्नी बदनाम हुई" या खंडकाव्यावर भारतातील आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख येणं तर सोडाच पण या काव्याची साहित्यविश्वाने साधी दखलही घेऊ नये याचं आम्हांस फार वैषम्य वाटलं म्हणूनच या काव्याला (ज्याला सामान्य लोकांनी 'गाणं गाणं' म्हणून हिणवलं) सदर मीमांसा अर्पण!
या कवितेतील वाक्य-वाक्यात दडलेल्या परिपूर्ण प्रतिभेचा रसास्वाद घ्यायचा आम्ही एक क्षीण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीपासून स्टार्ट  करू!

मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

मुन्नी म्हणतेय कि हे प्रियतम, फक्त तुझ्यासाठी ही मुलगी जिला सगळे लाडाने मुन्नी म्हणत असावेत,तिची बदनामी झाली.. ती कशी झाली याचं उत्तर गाण्यात सापडतं का ते आपण पाहूया. येथे डार लिंग हा शब्द डार्लिंग या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश असावा. त्यावरून मी 'प्रियतम' हा सर्वांना समजेल असा सुटसुटीत शब्द योजला आहे. या पहिल्या वाक्याचं समर्थन करताना ती पुढे म्हणते,

मुन्नीके गाल गुलाबी,नैन शराबी,चाल नवाबी रे....
..मुन्नीने नेहमीप्रमाणे मेकअप केला आहे त्यामुळे तिच्या गालावर त्याची गुलाबी छटा पसरली आहे, तसेच ती बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी,ज्या पद्धतीने मलायका अरोरा या गाण्यात नाचली आहे त्यावरून कोणी आमच्या विधानाला हरकत घेईल असे वाटत नाही. आणि पुढे पहा.. अल्कोहोल चा ओव्हरडोस झाल्यावर पावलं राजेशाही थाटात पडणं साहजिकच आहे नाही का? तो थाट वर्णन करताना तिनं म्हटलंय कि माझं चालणं असं आहे कि जणू नवाब लोकांचा थाटच ! ती पुढे म्हणते..

ले झंडू बाम हुई, डार लिंग तेरे लिये..
म्हणून हे प्रियतम, तुझ्यासाठी मी 'झंडू बाम' झाले. म्हणजे अर्थातच तुझ्या सगळ्या दुखण्यावरचा उपाय झाले. फक्त एवढाच मर्यादित अर्थ नाहीये या ओळीचा;तर मतितार्थ लक्षात घ्या. बाम ही वस्तू डोकेदुखी दूर करण्यासाठी वापरली जाते, तसेच 'कमर मे मोच,पीठदर्द,घुटनों में दर्द' साठी प्रभावी उपचार म्हणून याचा प्राथमिक वापर होतो. माझं गाणं ऐकून होणारी डोकेदुखी, किंवा माझ्यासारखं नाचताना लचक आली तर त्यापासून सुटका कशी करायची? तर या ओळीतून मुन्नीने सर्वांसाठी इलाज सुचवला आहे.
पुढच्या नवरात्रात किंवा गणपतीत हे गाणं जेव्हा जोरजोरानं वाजेल तेव्हा म्हाता-या लोकांना डोकेदुखी हमखास सुरु होणारच. या वर्गाला होणारा स्मृतीभ्रन्शाचा विकार विचारात घेता सुनेला जेव्हा ते हाक मारतील तेव्हा त्यांना सोयीस्कर जावं यासाठी मुन्नी त्यांना ब्रांड देखील सुचवते. गाणं ऐकताच ते म्हणू शकतील "सुनबाई, जरा झंडू बामची बाटली आण गं!"
हेच या गाण्याचं धृवपद आहे. केवढी मोठी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून हे गाणं लिहिलं गेलं आहे याची कल्पना ऐरागैरा करूच शकणार नाही!

शिल्पासा फिगर बेबो सी अदा , बेबो सी अदा...
ती म्हणते माझा बांधा शिल्पा (ही शेट्टयांची असावी, कारण शिरोडकरांचा बांधा जाहीर उल्लेख करण्यासारखा राहिला नाहीये!) सारखा कमनीय आहे. वा! वा ! शब्दा-शब्दातून सौंदर्याचे नवीन मापदंड कसे उभे केले आहेत ते पहा.. माझ्या अदा म्हणजे नटणं मुरडणं हे कपूरांच्या करीनासारखं आहे. बहुधा सध्याच्या काळात तिची दखल घेण्याजोगी ही एकच गोष्ट असावी. तिची फिगर मुन्नीच्या नजरेतून कशी सुटली हा मात्र संशोधनाचा विषय होऊ शकतो.असो! तर मुन्नी म्हणते..

है मेरे झटके में फ़िल्मी मज़ा रे फ़िल्मी मज़ा...
मुळात 'फ़िल्मी मज़ा' हा काय प्रकार असतो हे माहित नसल्यास या वाक्यातून काही अर्थबोध होणार नाही. आम्ही संशोधनाअंती असा निष्कर्ष काढला कि भारतीय भाषेत फिल्मी म्हणजे 'आभासी'! त्यामुळे प्रत्येकाच्या कल्पनेमध्ये 'मजा' या शब्दाचा जो 'अर्थ' ऐकणा-याला अभिप्रेत आहे, तो त्याने घेतला कि या वाक्यातली मजा कळेल! (आधी हे वाक्य कळलं का बघा!) मुन्नीने अंगाला दिलेल्या प्रत्येक झटक्याबरोबर तुम्हाला 'ती मजा' घ्यायची असेल तर कल्पनाशक्तीला जेव्हढा वाव देता येईल तेवढा चांगलं! पण हे समजणारे फार थोडे लोक असतात आणि याची मुन्नीलादेखील जाणीव आहे बरं का? म्हणूनच ती पुढे म्हणते..

हाय तू न जाने मेरे नखरे पे..... हाय तू न जाने मेरे नखरे पे लाखों रुपैया उड़ा..
ज्याना ही उपरोल्लेखित 'मजेची जाण' आहे त्या सुजाण लोकांनी लक्षावधी रुपये या मुलीवर उधळले आहेत अशी कबुली ती स्वतःच देते. यावरून तिच्या व्यवसायाची साधारण कल्पना येते.

वे मैं टकसाल हुई , डार लिंग तेरे लिये..

म्हणजे पहा.. नुसत्या नख-यावर खो-याने पैसा ओढणारी ही (बार)बाला स्वतःला टांकसाळीची समर्पक उपमा देते. यावरून प्रियकर म्हणून तिचा रोख साधारण बारमालकाकडे अथवा तो फारच वयस्कर असल्यास त्याच्या मुलाकडे असावा असे वाटते. इथे मुन्नीच्या प्रतिभेला दाद द्यावी तितकी थोडी! पुढे मुन्नी म्हणते..

सिने माहॉल हुई , डार लिंग तेरे लिये..
म्हणजे संधीविग्रह केल्यानंतर हे वाक्य "सिनेमा हॉल हुई" असं असावं. मल्टीप्लेक्स मध्ये एंटरटेनमेंट ट्याक्सच्या नावाखाली ओढला जाणारा प्रचंड पैसा लक्षात घेता ते पैसा छापण्याच मशीन बनलं आहे यात शंका नाही. नेमका हाच मुद्दा उचलून मुन्नीने स्वतःच स्वतःला ती उपमा दिली आहे. 'मी नाचगाण्यातून  किती पैसा मिळवते आहे ते पहा, आणि ही गोष्ट विचारात घेता तू इकडे आकर्षित व्हायला काहीच हरकत नसावी' असे मुन्नीला येथे म्हणायचे असावे!

पुढील कडव्याला स्पर्श करण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते!
वास्तवात मुलींशी साधे बोलायचे देखील गट्स नसणारा एखादा नवखा खेळाडू, सोशल नेट्वर्किंग साईटवर मुलींचे प्रोफ़ाईल्स चाळून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी फोटोजवर "u look cool " "nic snap dear ! " "beutiful dear.. " "gorgius " अश्या (अशुद्ध लेखन असणा-या) कमेंट्स देऊन नंतर "माझ्यशी मैत्री कर्नर क ?" किंवा "wana b my frend?" वगैरे विचारतो. इथे खुल्ली ऑफर देणा-या मुन्नीने तिच्याबद्दल एवढ सांगितल्यानंतर तिथे असणा-या एखाद्याला तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली नाही तरच नवल! असाच एक जण लगेच आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो..
ओ मुन्नी रे, ओ मुन्नी रे..
तेरा गली गली में चर्चा रे...

कॉलेजात एखादी नवीन मुलगी आली तर ती गेटमधून बिल्डींगमध्ये पोहोचेपर्यंत तिची चर्चा वर्गावर्गात सुरु झालेली असते तर इथे स्वतः मुन्नीने घसा फोडून सांगितल्यानंतर तिची चर्चा कुठे होणार नाही हे शक्य आहे का? तेच इथे सांगितलं जातंय.. मुन्नीला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जातेय कि गल्ली गल्ली मध्ये तुझ्या नावाची चर्चा चालू आहे. याच भावना पूर्वी शम्मी कपूरने "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे" या गाण्यातून व्यक्त केल्या होत्या.पुढे हा आशिक म्हणतो..

है जमा इश्क दा इश्क दा परचा रे जमा इश्क दा इश्क दा परचा रे ...
ओ मुन्नी रे !!

या ओळींवर (खालची मुन्नीला दिलेली हाळी वगळता ) आमचे अजूनही संशोधन चालू आहे.. काव्य प्रकाशित झाल्यानंतरदेखील हा लेख प्रकाशित करायला एवढा वेळ झाला या मागचं मुख्य कारण ह्या दोन ओळीच आहेत. भान हरपल्यानंतर मनुष्य काहीबाही बरळत सुटतो त्यापैकी हा प्रकार असावा असे आमचे प्रथमदर्शनी मत आहे. यातून खरेच काही अर्थबोध होत असल्यास त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी आमची विनंती आहे!

असे कितीतरीजण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात म्हणून मुन्नीने काय सगळ्यांनाच फ्रेंड लिस्ट मध्ये add करायचं की काय? छे छे.. अश्या लोकांशी कस वागायचं हे मुन्नीला चांगलंच ठाऊक आहे! म्हणून ती लगेच म्हणते..
कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा.......हो कैसे अनाडी से पाला पड़ा जी पाला पड़ा...
या कडव्यात मुन्नीला एक गहन प्रश्न पडला आहे कि या कसल्या निर्बुद्ध माणसाशी आपली गाठ पडली आहे? तिला तो बेअक्कल का वाटावा? तर त्याचं उत्तर तिनं लगोलग देऊन टाकलं आहे.
बिना रुपैये के आके खड़ा मेरे पीछे पड़ा...
एखाद्या बारबालेच्या मागे लागणं तेदेखील हातात/खिशात एकही छदाम नसताना? हे निर्बुद्धपणाचेच लक्षण नव्हे काय? मुन्नीने ते बरोबर जोखले आहे म्हणून त्या मूर्खाचा पोपट असा उल्लेख करून ती म्हणते..
पोपट न जाने मेरे पीछे वो सैफू...
एखाद्याला हातोहात मूर्ख बनवला, किंवा त्याला वेड्यात काढला कि त्याचा 'पोपट' केला असं म्हणतात. तोच अर्थ मुन्नीला घ्यायचा असावा. आंबटशौकीन श्रोत्यांच्या डोक्यात जर चटकन कोणताही दुसरा अर्थ आला असेल तर त्यांनी तो लगेच काढून टाकावा ही विनंती आहे. ती म्हणते माझ्यापाठी सैफु लागलाय... सैफु म्हणजे सैफ अली खान, बरं का? तो तिच्या मागे आहे; तर या सगळ्या बिन पैसेवाल्या भिकारी लोकांनी त्यांच्या हद्दीत राहावं असा तिचा स्पष्ट सल्ला आहे! आता पहिल्या कडव्यात करीनाचा उल्लेख केल्यावर सैफ अली खानला अनुल्लेखाने टाळणे म्हणजे त्याचा घोर अपमान! याचं पातक डोक्यावर घ्यायचं मुन्नीनं खुबीनं टाळलंय. तिची ही शिताफी लक्षात येताच कोणालातरी दाद दिल्याशिवाय राहवत नाही..दबक्या आवाजात तो ओरडतो
हाय हाय मारही डालोगी क्या..
पण त्याला न जुमानता मुन्नी त्यालाही त्याची औकात (मराठीत..लायकी) दाखवून देते..
पोपट न जाने मेरे पीछे सैफू से लेके लम्बू खड़ा...
म्हणजे नुसता सैफच नव्हे तर लंबूही तिच्या मागे आहे. लंबू म्हणजे अमिताभ बच्चनच असावा यात डाउट नाही. बॉलीवूडच्या शहेनशाहचा 'लंबू' असा अपमानास्पद उल्लेख करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे. इतिहासाची पाने चाळल्यास गोविंदानेदेखील आपल्या नायिकेला भुलवण्यासाठी 'जो तू होती जया भादुरी.. हम भी तो लंबू होते... गोरी तेरे नैनो में हम बस जाते!' असं म्हणून अमिताभला लंबू म्हटले आहे. आता अमिताभची उंची आहे जरा जास्त म्हणून काय त्याचा सारखा सारखा असा उल्लेख करून त्याला पदोपदी हिणवायचं? आपल्याला नाही बुवा आवडलं! पण हे आमचं वैयक्तिक मत आहे. जाऊ दे.. विषय भरकटला.. तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील..

आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..
आयटम यह आम हुई , डार लिंग तेरे लिये..

आयटम म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेत 'अनेकात एखादी'. 'आयटम' या शब्दाच्या प्रत्येकाच्या संज्ञा वेगवेगळ्या असू शकतात! जश्या कि 'लाखात एखादी' 'हजारात एखादी' इत्यादी इत्यादी.
तर ढोबळमानाने असणारा 'चारचौघात लक्ष वेधून घेणारी' हा अर्थ आपण घेऊ तर तो मुन्नीवर अन्याय होईल. 'सैफ' वगैरे म्हणजे जरा जास्तच पातळी आहे त्यामुळे इथे 'त्या' लेव्हलची बाला 'आम' झाली.. आता बघा.. इथे भाषेतला शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेलाय त्याला महत्व आहे. हा 'आम' खायचा नाही.. आय मीन..हा 'आम' खायचा 'आम' नाही. आम म्हणजे अतिसामान्य.. 'आम जनता' मध्ये असलेला अर्थ. या भाषेची हीच तर खासियत आहे! ही देखणी, लावण्यवती (असताना ती ) अतिसामान्य झाली.. आता आधीच्या वाक्याचा संदर्भ घेतला तर मुन्नी म्हणते कि सैफ अमिताभ सारख्या थोरामोठ्यांची नजर तिच्यावर असताना देखील.. ही खास आयटम जनसामान्यांसाठी उपलब्ध झाली (श्रोत्यांनी आणि वाचकांनी इथे आपल्या कल्पनाशक्तीला थोडासा लगाम घालावा..) कारण, हे प्रियतम फक्त तू आणि तुझ्यासाठी! बघा बघा.. अपूर्व त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण घालून दिलेलं आहे मुन्नीने! याला म्हणत असावेत खरखुर आकर्षण! आणि त्यामुळेच ती पुन्हा आठवण करून देते कि बाबा खरंच...
मुन्नी बदनाम हुई, डार लिंग तेरे लिये..

एवढं सगळं म्हटल्यानंतर (तेदेखील एका सुस्वरूप मुलीने !) कोणाच हृदय द्रवलं नाही तरच नवल!
है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा ..है तुझमें पूरी बोतल का नशा,बोतल का नशा...
इथे मुन्न्याची एन्ट्री झालेली आहे.. आम्ही पहिल्यांदा केलेल्या 'मुन्नी बहुधा जरा जास्तच व्होडका पिऊन आली असावी' या विधानाला पुष्टी देणारी वाक्य तो स्वतः इथे फेकत आहे पहा.. 'तुझ्यामध्ये पूर्ण बाटली पिल्यानंतर जेवढी नशा चढते तेवढीच नशा आहे' असा या वाक्याचा जरी वरवरचा अर्थ असला तरी छुप्या अर्थाकडे कोणाचं लक्ष जाणार नाही म्हणून स्पष्ट करत आहे.. 'एका बाटलीमुळे जेवढी नशा चढते तेवढी नशा तुला चढली आहे..झेपत नाही तर कशाला प्यायची एवढी' अशी मुन्नाला तिच्याबद्दल वाटणारी काळजी त्यातून व्यक्त होते.

कर दे बुढापे को कर दे जवाँ रे कर दे जवाँ...
आता तरणीताठी पोरगी बेधुंद होऊन जर बेफाम नाचायला लागली तर त्यापासून स्फूर्ती घेऊन म्हाता-याकोता-यांनादेखील नाचावेसे वाटेल यात शंका नाही. याच अर्थाने मुन्नाने, मुन्नीच्या नशेची महती वर्णन करण्यासाठी एक दाखला म्हणून हे वाक्य उच्चारले असावे! तुझी नशा एवढी आहे कि म्हातारपणालासुद्धा तरुणाईत बदलायची असीम ताकद आहे त्यात! केवढ हे कौतुक.. केवढी ही स्तुती आणि उतू जाणारं प्रेम! यापुढे मुन्ना आणि मुन्नीची प्रेमकहाणी फक्त या एका काव्यामुळे लैला-मजनू, हीर-रांझा, सोनी-महिवाल अगदी आताच्या काळातले राधे-निर्झरा, वीर-झारा यांच्या बरोबरीने अजरामर होणार ही काळ्या दगडावरची (खडूने मारलेली पांढरी) रेघ आहे!!
पुढे मुन्ना फॉर्मात येऊन म्हणतो..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली, हाये..
वा वा! ओठांवर शिव्या तुझ्या डोळ्यात दोन रंग.. बहुधा दारूमुळे लालपिवळे झालेले तिचे डोळे मुन्नाने अचूक हेरले असावेत.. आणि शिव्या हा अल्कोहोलचा काऊन्टर इफेक्ट आहे हे जाणकार श्रोत्यांना कळले असेलच! म्हणजे हे गाणं ऐकताना नुसते कान नव्हेत तर भानही हवे. तो पुढे म्हणतो कसा..
होंठों पे गाली तेरी आँखें दुलाली रे दे है जिया...
तू आयटम बॉम्ब हुई, डार लिंग मेरे लिए...
इथे आयटम हा शब्द atom या अर्थी योजला आहे.. एकाच शब्दाचा उपयोग दोन वेगवेगळ्या अर्थांनी करायची किमया इंग्रजी भाषेनंतर बॉलीवूडच्या गीतकारांनी साधली आहे यावर कोणाचेच दुमत नसेल! तू माझ्यासाठी जणू अणुबॉम्ब झालीस! प्रतिभा पहा.. 'बॉम्ब' हा शब्द तरुण मुलं कोणत्या अर्थाने वापरतात हे त्यांना तर सांगायला नको पण लेडीज वाचकांवर अन्याय नको म्हणून मी जरा सोज्वळ शब्दात हे संकल्पना सांगतो.. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर जर पाहणा-याच्या मनामध्ये संमिश्र भावनांचा (म्हणजे सर्व भावना एकाचवेळी एकत्र! ) कल्लोळ माजला (जसा बॉम्ब फुटल्यावर माजतो) तर ती व्यक्ती 'बॉम्ब' आहे असं म्हणायला हरकत नाही!सहसा या विशेषणाचा वापर मुलींकरिताच केला जातो असा समज आहे. नुसता बॉम्ब म्हटलं तर एवढा कल्लोळ तर 'आयटम बॉम्ब' म्हणजे काय असेल याची तर कल्पनाच न केलेली बरी! मुन्नाने हे विशेषण मुन्नीला देऊन तिच्या नटण्या मुरडण्याचा, मेकपचा, नाचाचा, दारू पिऊन घातलेल्या धिन्गाण्याचा, थोडक्यात तिच्या ओव्हरऑल कार्याचा यथायोग्य सन्मान केलेला आहे असे आम्हास प्रामाणिकपणे वाटते.

मुन्नी बदनाम हुई,
मुन्ना आणि मुन्नी यांचा एक दुर्मिळ फोटो!
डार लिंग मेरे लिये..
मुन्नीके गाल गुलाबी,
नैन शराबी,चाल नवाबी रे....
ले झंडू बाम हुई,
डार लिंग तेरे  लिये..
मुन्नी बदनाम हुई,
डार लिंग तेरे लिये..

या ओळींचा अर्थ आधी दिलेलाच आहे.. तसेच यातील धृवपद आधीच स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान वगैरे वगैरे!

बात ये आम हुई, डार लिंग तेरे लिये..
इतकावेळ "मुन्नी बदनाम हुई, मुन्नी बदनाम हुई" ओरडून सांगितल्यानंतर 'रोज मरे त्याला कोण रडे' या उक्तीप्रमाणे तिच्याभोवती फुकटात नाचणा-या पब्लिक ला त्याचं कौतुक वाटेनासं होतं त्यामुळे ते तशी स्पष्ट कबुली देऊन टाकतात. यासाठी सुद्धा धैर्य लागतं बरं!! ते म्हणतात 'मुन्नी बदनाम हुई' हि आता सामान्य गोष्ट झालीये आम्हाला काहीतरी नवीन हवंय.. चलाख मुन्नीला याचा सुगावा लागताच प्रसंगावधान राखून ती म्हणते..
बे-हिंदुस्तान हुई, डार लिंग तेरे लिये..
दुर्दैवाने या वाक्याचासुद्धा आम्हास अर्थ लागला नाही! येथे 'बे' हा शब्द दोन या अर्थी आहे कि बे-घर होणे या अर्थी आहे हे कळायला पुरेसा वाव नाही. दुसरा अर्थ जरी थोडासा अर्थपूर्ण वाटतो पण तो अर्थ घेतल्यास असंबद्धपणा जरा जास्तच वाढतो त्यामुळे हे वाक्यसुद्धा सध्यातरी ऑप्शन ला टाकल्याचे आम्ही जाहीर करत आहोत. जरी ते चुकीचे वाटत असले तरीपण इथे मुन्नीने प्रसंगावधान राखून तोच तोच पणा टाळल्याबद्दल तिचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे

अमिया से आम हुई,डार लिंग मेरे लिये..
इथे 'आम' हा शब्द आधी सर्व ठिकाणी उपयोजल्याप्रमाणे 'सामान्य' या अर्थी नसून आंबा या अर्थी असावा.. कारण कैरीपासून जसा आंबा होतो तसा अमिया पासून आम होत असावा. मुन्नीला अभिप्रेत असणा-या विचारापर्यंत आम्हाला पोचता आले नाही याबद्दल आम्ही खेद व्यक्त करीत आहोत.
ले झंडू बाम हुई, डार लिंग मेरे लिये..
सिने माहॉल हुई , तेरे तेरे तेरे लिए..

ओळींचा अर्थ आधी दिलेला आहे.. (म्हणजे परत परत सांगितला जाणार नाही!) धृवपदही स्पष्ट करून सांगितले आहे.. सामाजिक जाणिवेच भान, पैश्याची खाण वगैरे वगैरे!

आ ले बदनाम हुई हांजी हाँ तेरे लिए..
ले सरेआम हुई, डार लिंग तेरे लिये..डार लिंग तेरे लिये..

शेवटची ओळ पुन्हा एकदा ऑप्शनला! (इंजिनियरिंगची सवय! सुंभ जळला तरी पीळ जात नाही! काय करणार?)


तर आम्ही आमच्या परीने या अफलातून गाण्या(जनसामान्यांचा शब्द)चे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदीचा अपुरा व्यासंग आणि भाषेची व्याप्ती या दोन गोष्टींमुळे काही ठिकाणी बंधने आली आहेत. तरीदेखील इतरांनी दुर्लक्षिलेल्या गोष्टीचा अभ्यास करणं (आणि करायचा त्यांचा न करणं) याची सुरुवातीपासूनच आवड असल्याने आम्ही हे संशोधन केले आहे. या संबंधात काढलेली टाचणं, टिपणं, संदर्भग्रंथ आमच्या अभ्यासिकेत उपलब्ध आहेत. अभ्यासूंनी वैयक्तिकरित्या संपर्क केल्यास ती त्यांच्यासाठी उपलब्धही करून दिली जातील.


सरतेशेवटी सांगायचे झालेच तर..आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात या गाण्याने एका नवा मैलाचा दगड उभा केला आहे यात तिळमात्र शंका नाही आणि याबाबत कोणताही वाद असण्याचा प्रश्नच नाही!

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

जिम पोरी जिम.. कपाळाची जिम!

 इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला आमच्या रूमवर व्यायाम करण्याचं फॅड आलं.. अरर्र.. प्रस्तावना राहिली!

मुलं वयात यायला लागली कि त्यांच्यात काय काय बदल होतात हे बायोलॉजीच्या पुस्तकांमधून आणि पेपरांमधून (बायोलॉजीच्या नव्हे,, नेहमी वाचायच्या!) आपल्याला माहितीच आहे.. जसे कि 'तारुण्यसुलभ' सारखे अतिनाजूक किंवा 'पौगंडावस्था' वगैरेसारखे भारी भारी शब्द असणारे लेख..त्या मुलामुलींनी काय करायचं, त्यांच्यासाठी पालकांनी कसं वागायचं याचे सल्ले इत्यादी इत्यादी.. मला 'पौगंड' म्हणजे कित्येक दिवस कमीपणाचा शब्द वाटायचा.. त्याच्या 'न्यूनगंड' या शब्दाशी असणा-या साधर्म्यामुळे! तर माझ्या चष्म्यातून (ख-या नव्हे.. जीवनाकडे पहायच्या) पाहिले असता वयात आल्यानंतर मुलं ही स्वतःच्या दिसण्याला,बाह्य सौंदर्याला जास्त महत्व देतात.. याचाच कॉन्सिक्वेंस म्हणून मुली वळतात आरसा, मेकअप बॉक्स आणि इतर सौंदर्य प्रसाधनांकडे आणि मुलगे वळतात.... अर्थात मुलींकडे! आता ही बिचारी मुलं (मुलगे या अर्थी!!) मेकप तर करू शकत नाहीत मग आणखी काय करणार? बोलबच्चन लोकांना तोंड उघडलं कि मुली वश होतात पण जनसामान्यांचं काय? त्यासाठी मग खूळ निघतं बॉडी बिल्ड करायचं! वय वर्ष १८ गाठलं कि बरीचशी मुलं या वेडाने पछाडली जातात.. सलमान खान, संजय दत्त किंवा अगदीच आताच्या काळात सोनू सूद,शाहीद कपूर वगैरे त्यांचे हिरो बनतात. पण ही 'बरीचशी' मुलं वगळता इतर त्यांच्याहून 'बरीचशी' मुलं मात्र स्थितप्रज्ञ असतात. त्यांना 'आमीर खान अभिनय चांगला करतो' किंवा 'हृतिक रोशन हॉलीवूड स्टार सारखा दिसतो' इत्यादी साध्या आणि फालतू कारणासाठी आवडत असतात. त्यांना शाहरुखने पोटाला सहा बिस्कीटं आणली तरी फरक नाही पडत आणि आमीरने आठ आणली तरीही नाही! सिक्स नाही,एट नाही यांचा आपला वन प्याक आणि असलाच तर जास्तीत जास्त बनपाव! मी अर्थातच दुस-या क्याटेगरितला!

तर सांगत काय होतो.. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला आमच्या रूमवर हे फॅड आलं.. रूमही मस्त होती. मोठीच्या मोठी आणि प्रशस्त खोली,त्यात पुन्हा दोन खिडक्या, एक बाल्कनी आणि खोलीएवढाच मोठा ओपन टेरेस! मालकाने ज्या भाड्यात आम्हाला ती खोली राहायला दिली होती ते पाहता तो लॉसमध्ये जात असला पाहिजे यात शंका नाही. कारण आधीच्या वर्षाला त्या ओपन टेरेसच्या भागाचा वापर कपडे वाळत घालण्याव्यतिरिक्त अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठीही आम्ही करत असू,एवढा तो मोठा होता! वरून तेवढ्या मोठ्या खोलीत फक्त ३ जण. ते सुद्धा आम्ही दोघंच जण राहणार होतो पण तिसरा आमचा मित्रच.. साला 'मी पण येतो,मी पण येतो' करत जबरदस्तीने घुसला! असो.. मित्र म्हटल्यावर व्हायचंच असं.. तिघांच्या कॉट्स तीन भिंतीना चिकटून ठेवल्या कि खोलीत बरीच मोकळी जागा उरायची.

शिवाय सर्वांना अभ्यासाची आवड इतकी प्रचंड होती कि एकच टेबल तिघांना पुरत असे. तिघे तीन वेगवेगळ्या शाखांचे असून सगळ्यांची पुस्तकं त्या टेबलावरच असायची. (तरीही टेबलवरही मोकळी जागा उरायची! आता बोला!!) तर या मधल्या मोकळ्या जागेत (अर्थात जमिनीवरच्या!) धूळ फार साठते असा एकदा रिकाम्यावेळी चाललेल्या चर्चासत्रातून अहवाल निघाला. राहायला आल्यानंतर तब्बल एक ते दीड वर्षांनी या सत्याची आम्हाला जाणीव झाली! रोजचा कचरा काढणं तर होत नाही तर हि जागा वापरात आल्याशिवाय धूळ साठणं कमी होणार नाही या तात्पर्यापर्यंत आम्ही तिघेही पोहोचलो. एवढ्याश्या जागेत कबड्डी तर खेळता येणार नाही मग काय करणार बुवा? 'अभ्यासाला तिथे बसू' हा पर्याय एकमताने ठोकरला गेल्यानंतर (कारण अभ्यासाला बसण्याची फ्रिक्वेन्सी विचारात घेतली तर धूळ साठण कमी न होता वाढलंच असतं) तिथे पत्ते खेळू, इस्त्री करू, पेपर वाचायला तिथे बसू यापलीकडे कोणाला काही सुचेना.. तेवढ्यात आमच्यापैकी एकाच्या सुपीक डोक्यात एक विचार आला तो असा.. " जर इथे सूर्यनमस्कार घातले तर अंग जमिनीला चिकटत जाईल (धूळ अंगाला चिकटेल हा गर्भितार्थ!). रोजचे कपडे तर आपण धुतोच; त्यामुळे जागाही स्वच्छ राहील आणि आपला व्यायामही होईल. हा ठराव मात्र २ विरुद्ध १ या फरकाने आणि चढ्या आवाजी मतदानाने संमत झाला. अर्थात एकमेव विरोधी मत माझं होतं हे वेगळं सांगायला नकोच!

दुस-या दिवशीपासून जी रणधुमाळी उडाली ती काय विचारता? दोघेजण वॉर्म अप वगैरे करून जोर मारणे, बैठका काढणे वगैरे प्रकार त्या मोकळ्या जागेत करू लागले. दोन-चार दिवसांमध्येच मला फरक दिसू लागला! त्या जागेवर धूळ वगैरेचं नामोनिशाण राहिलं नाही!! दोघांनी सकाळी उठून जोरजोरात श्वास बाहेर सोडत व्यायामाला सुरुवात केली कि मी पांघरुणातून डोळे किलकिले करून पहात असे आणि अंगावरची चादर डोक्यावर घेऊन पुन्हा झोपी जात असे.. एखादा जर जास्तच जोश मध्ये आला तर उगीच मला येऊन पार्श्वभागावर लाथ घालून,किंवा कॉट गदागदा हलवून शक्तीप्रदर्शन करत असे, जणू काही याची बॉडी आर्नोल्ड श्वाझनेगरला लाजवेल अशीच झालीये! पण माझ्यावर शष्प फरक पडला नाही. एक मात्र झालं, दोन-तीन आठवड्यातच टेबलावरच्या मोकळ्या जागेत श्रीयुत हनुमंतरावांचा फोटो आला (त्यामुळे टेबलही स्वच्छ झालं) आणि रूमवर दुधाचा रतीबही सुरु झाला. मग मला जराशी भुरळ पडली. दुधातला थोडा वाटा मला मिळावा यासाठी मी त्यांच्या मिन्नतवा-या सुरु केल्या पण दोघांनीही 'व्यायाम न करणा-याला थेंबभरही दूध मिळणार नाही' असे एकमताने जाहीर केले. माझ्यासारखा मुलुखाचा आळशी माणूस काही स्वतः जाऊन दुध आणणार नाही याची त्या दोन्ही तथाकथित पैलवानांना पूर्ण शाश्वती होती त्यामुळे हा क्रूरपणा! मग नाईलाज म्हणून मीही व्यायामाला सुरुवात केली.

माझ्या एन्ट्री नंतर दोघांचा उत्साह दुणावला. माझा पहिलाच प्रयत्न असल्याने जो तो मला कशा पद्धतीने एक्सरसाईज करायची ते समजवू लागला. मीही 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' या उक्तीप्रमाणे आचरण सुरु ठेवले! त्यात एक रेग्युलरली जिमला जाणारा आमचा एक चौथा मित्र रूमवर आला आणि आमच्या व्यायामाचा सुगावा लागताच 'मशीन नाही तर काही फरक पडणार नाही, डम्बेल-बिम्बेल तरी मारा' असा अनाहूत सल्ला देऊन गेला.. झालं! "तिघेही करतोच आहोत तर अमक्याकडे डम्बेल्स नुसत्या पडून आहेत.. तमक्याकडे ५ पौंडाच्या प्लेट्स आणि बार गंजत पडलाय.." अशा कुठून कुठून बातम्या आणून त्या वस्तूंची रवानगी आमच्या जागेत करण्यात ते दोघेही यशस्वी ठरले. त्या वस्तूंच्या मालकांनी 'किती दिवस करताय पाहू' असं म्हणून त्यांच्या उत्साहाला आवर घालायचा प्रयत्न केला पण हे पठ्ठे बधले नाहीत.मग सुरु झाली मशीन एक्सरसाईज! उपकरणं : प्रत्येकी साडेसात पौंडाच्या दोन डंब-बेल्स, एक बार, दोन -५ पौंडाच्या आणि दोन -अडीच पौंडाच्या प्लेट्स, आंब्याच्या रिकाम्या पेट्या (अर्थात मीच नेलेले आंबे!) रद्दी पेपर्स वगैरे.. आंब्याच्या रिकाम्या पेट्या रुंदींच्या बाजूने एकमेकांना जोडून त्यावर रद्दी पेपर्स ठेवून बेंच तयार केला गेला आणि त्यावर उताणं झोपून बार खालीवर करायचा असा तो प्रकार होता. याला बेंच प्रेस असे नाव असते हे माझ्या गावीही नव्हते! हा सरंजाम मात्र कॉलेज संपेपर्यंत टिकला.. म्हणजे त्या दोघांनी टिकवला पण माझा उत्साह ३-४ महिन्यात--सॉरी आठवड्यातच ओसरला! 'ह्या दुधात पाणी जास्त असतं' असलं तद्दन भिकार कारण देऊन मी झोपून राहायला लागलो..

जॉब सुरु झाला तेव्हा खोली सोडून मी ब्लॉक संस्कृती स्वीकारली.. आणि माझ्या दुर्दैवाने माझ्या रूममेट्सनी सुद्धा! दुर्दैवाचा आणखी मोठा घाला म्हणजे आमच्या जिमवाल्या मित्राने आम्हाला जॉईन व्हायचं ठरवलं.. आमच्या कॉलेजने आम्हा चौघांनाही 'ब-या' म्हणता येतील अशा नोक-या मिळवून दिल्याने काहीजणांच्या नशिबात पहिली नोकरी मिळेपर्यंतचा जो मुबलक वेळ असतो तो आमच्या पदरात पडला नाही! पहिल्या जॉबच्या उत्साहात आणि आपल्याला इतरांपेक्षा जास्त काम कसं असतं हे पटवून देण्याच्या भानगडीत नवखं पब्लिक जास्त वेळ ऑफिस मध्ये घालवतं. आमच्याही बाबतीत काहीसं तसंच झालं होतं. एकमेकांशी ऑफिस (आणि तिथल्या सुंदर मुली) सोडून इतर गोष्टींवर बोलायला सुद्धा वेळ मिळत नव्हता! यथावकाश सगळं स्थिरस्थावर होवू लागलं आणि काही काळानंतर आम्ही चौघेहीजण पुन्हा ‘माणसात’ आलो. त्याला कारणही तसंच होतं! आमच्या समोरच्या सदनिकेत काही मुली राहायला आल्या. सुंदर असाव्यात. असाव्यात यासाठी म्हटलं की आमच्यापैकी सगळेच इंजिनियर! त्यामुळे जनरली मुलगी दिसली की ती सुंदर असणे-नसणे अशा दुय्यम गोष्टीना आमच्या जीवनात स्थान नव्हते! ज्या दिवशी त्या मुली चौकशी करून गेल्या त्या दिवशीपासून कोणी न कोणी ऑफिस मधून लवकर येऊन कानोसा घेऊन लागला आणि एका रविवारच्या प्रसन्न सकाळी ४ मुलींचा ग्रुप त्या घरात डेरेदाखल झाला!

आम्ही चौघे, त्याही बरोब्बर चौघी! वास्तविक एखाद्या सिनेमात अशी सिच्युएशन आली की सिनेमाच्या नायकाला सर्वात सुंदर आणि त्याच्या मित्रांना मग उरलेल्यांपैकी (अर्थात त्याही सुंदरच असतात) एक एक अशी विभागणी होते. पण वास्तवात तसलं काही होत नाही याची जाणीव त्या रविवारी प्रकर्षाने झाली! आम्हा चौघांनाही त्यांच्यापैकी एकच मुलगी आवडली! बाकीच्याही चांगल्या होत्या पण ती सुहास्यवदना इतरांपेक्षा सरस आहे यावर कधी नव्हे ते सगळ्यांचं एकमत झालं.सगळेचजण स्वतःला सिनेमाचा नायक समजत असल्यामुळे असेल कदाचित! त्या सोमवारपासून सगळ्यांचे पाय सहाच्या ठोक्याला घरात पडू लागले. जणू काही ती आमच्यासाठी चहाच बनवून ठेवत होती!

तिला इम्प्रेस कसं करावं यावर खल सुरु झाले..पण काही मार्ग सुचेना.सरळ जावून बोलायची तर कोणाचीच छाती होईना.. आणि हाय रे कर्मा! त्या तिघांपैकी कोणाच्या तरी डोक्यातून कल्पना आली कि 'जिम लावूया'.. 'आपण जिमला जाताना किंवा तिकडून येताना ती बघेल आणि आपल्या फिजीकवर इम्प्रेस होईल' अस सरळ साधं गणित त्यांनी मांडलं.. बरं..वेळही सत्कारणी लागेल हे आणिक वरून! पुन्हा बहुमताने निर्णय! त्यामुळे मी एकटा पडलो.
बॉडी बिल्डींगचे लोकांचे हेतू काय काय आणि किती सकारात्मक असतात.. चांगली पर्सन्यालीटी,निरोगी जीवन, वाढलेला आत्मविश्वास वगैरे वगैरे.. आणि आमचे हेतू काय? तर जमीन साफ करणे, मुलीवर (त्यापण एकाच!) इम्प्रेशन मारणे, वेळ घालवणे इत्यादी! असं असल्यावर कोण तयार होईल? मी नकार कळवला. (जिमला जाण्यासाठी). पण मी एकटा राहून तिला पटवेन कि काय या भीतीने माझा नकार ग्राह्य धरला गेला नाही आणि जिमला येण्याची बळजबरी केली गेली. जर नकार कायम राहिला तर असहकार चळवळ पुकारली जाईल अशी जाहीर धमकीही देण्यात आली. दुस-या दिवशीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.सायलेंट ट्रीटमेंट मिळण्याच्या भीतीने मी या धमकीला बळी पडलो आणि पुन्हा एकदा नाइलाजाने माझ्या व्यायामाचा दुसरा स्पेल सुरु झाला!

पहिल्या स्पेलपेक्षा हा जरा मोठा आणि नाही म्हणायला प्रॉडक्टीव होता.. ग्लोव्हज, स्पोर्ट्स गियर वगैरेची खरेदी झाली. आठवडाभरातच वॉर्म-अप एक्सरसाईजेस वरून मेनस्ट्रीम एक्सरसाईजेसवर गाडी सरकली! त्या तिघांचा इंस्ट्रक्टर वेगळा. कारण त्यांची जराशी बिल्ड आधीच होती. राहुल हा माझा ट्रेनर..
"जिम केलीय का आधी?" मेनस्ट्रीमच्या पहिल्याच दिवशी त्याने प्रश्न केला.
"अं.. नाही.. म्हणजे हो... म्हणजे.." मी चाचरत म्हणालो.मला वाटलं कि आयुष्यात कधी जिम केली नाही असं सांगितलं कि हा माझ्यावर हसणार!
"हो-नाही काय? इथल्या इंस्ट्रूमेंट्स ची नावं माहित आहेत का? उद्या 'पेक डेक' मार जा म्हटलं तर जाशील का?" राहुलने विचारलं
"नाही.." मी ओशाळून म्हटलं,
“ठीकाय.. थ्री-बॉडी करू उद्यापासून..” मी प्रश्नार्थक चेहरा करत मान हलवली.
माझा व्यायाम आटपल्यावर मी आमच्या त्रिकुटापैकी कोणी दिसतंय का पाहायला लागलो तर हे लोक सापडेनात. थोडावेळ इकडे तिकडे बघतो तर हे लोक ट्रेडमिल च्या मागे नंबर लावून उभे!
"साल्यांनो.. तीन तीन ट्रेडमिल्स असताना एकाच ठिकाणी का नंबर लावला आहात?"
"शू sss " तिघांनी एकदम आवाज केला!जरा निरखून बघतो तर हे तिघेही जण तिथल्या खिडकीतून बाहेर बघताहेत! आणि बाहेर..? ..बाहेर एक अतिशय सुंदर ललना मानेला हलकेच झटके देत वॉर्म-अप करत होती!

आता आमची जिम जोरदार सुरु झाली.. जिमला जाण्यासाठी जीमबाहेरही कारण होतं आणि जिममध्येही! अर्थात त्यापैकी वैध एकही नव्हतं हा भाग अलाहिदा!
डम्बेल्स आणि बारबेल्स च्या बरोबरीने बेंचप्रेस, पेकडेक, लेगप्रेस इत्यादी शब्द तोंडात रुळले..
‘जोर’ च्या ऐवजी डिप्स म्हटलं जाऊ लागलं.. ‘बैठका मारणं’ डाऊन मार्केट वाटायला लागलं त्याऐवजी मी ‘सीटअप्स’ मारू लागलो.
स्कॉट्स,ल्याटरल/ व्हर्टिकल पूल डाऊन, कार्डीओ,क्रन्चेस असले भयंकर उच्चार करताना जीभ अजिबात अडखळेनाशी झाली.
बायसेप्स,ट्रायसेप्सच्या जोडीला रिस्ट्स, back ,शोल्डर, चेस्ट,थाईज वगैरे अवयवांनाही पुरेसा मान द्यायला शिकलो. 'ह्यामस्ट्रिंग' का काहीतरी आपल्या (आणि इतरांच्याही) अंगात असतं हे मला तिकडे जायला लागल्यावर कळलं! (तोपर्यंत अंगात फक्त 'माज' असतो यावरच माझा विश्वास होता!)
"सपोर्ट दे रे,ट्वेंटी-फ़ाईव्ह च्या प्लेट्स आहेत" किंवा "विंग्सवर जाम प्रेशर आलं रे आज" वगैरे वाक्य आम्ही जरा जोशात फेकायला लागलो.. विशेषतः ती ललना जवळ असल्यावर..!
शनिवारी शक्तीची देवता हनुमंताची प्रार्थना करताना तिच्या बाजूला (म्हणजे ललनेच्या; देवतेच्या नव्हे !) जागा मिळावी यासाठी धक्काबुक्की व्हायची आणि व्यायामानंतरच्या स्ट्रेचच्या सेशनसाठी तर जास्तच! कुशन म्याटवर आडव पडून क्रंचेस आणि abs झाल्यानंतर हात पसरून वेस्ट आणि लेग स्ट्रेचेस असत. ललना नेहमी सावध असायची पण तरीही चुकून तिच्या बोटांचा ओझरता स्पर्श शेजारच्या व्यक्तीच्या बोटांना होतच असे. आता शेजारच्या व्यक्तीने स्वतःचे हात जर्रा जास्तच ताणले तर हे होणं साहजिकच आहे नाही का? असो! अर्थात शेजारच्या व्यक्ती या ब-याचदा आम्हा चौघांपैकी दोघे असत हे वेगळे सांगणे न लगे!

इकडे आम्ही घरी परतताना आमची सुहास्यवदना आणि कधी कधी तिच्या मैत्रिणी खिडकीत बसलेल्या असत. जिन्यावरून पहिलं तिच्यासमोर कोण येणार यावरून कॉम्पीटीशन लागत असे. तीदेखील चेहरा हसरा ठेवून कोणाशी न कोणाशीतरी फोनवर बोलत बसलेली असायची. 'ती आज कोणाकडे बघून हसली' यावर आमच्यात डिस्कशन रंगायच. तिच्या ते खिजगणतीत तरी होतं कि नाही कोण जाणे!
"आपले बायसेप्स बघितलेस का? बघत अश्णारच ती! " एकाच कॉन्फीडन्सयुक्त बोलणं.
"बायसेप्स आधी दिसतात कि चेस्ट?" दुस-याचा युक्तिवाद..
"बॉडी फिटिंग टी-शर्टस घालत चला माझ्यासारखे मग फक्त चेस्ट किंवा फक्त बायसेप्स दाखवावे लागणार नाहीत!!" तिसरा या दोघांना क्रॉस करत असे..
मी मात्र सुरुवातीला शांतपणे हा वाद ऐकत बसायचो. माझे ना बायसेप्स तयार झाले होते, ना चेस्ट .आतासं माझ्या शरीराला कुठे वळण लागत होतं!साधारण दोन-अडीच महिने होताच मीपण असल्या वादांमध्ये उडी घ्यायला लागलो!

"च्यायला, आमचं अंग म्हणजे आधी पोतं होतं, आता कुठे शेप यायला लागलाय आणि ती इथे आली तेव्हापासून तिचे सगळे कर्व्ज एकदम कोरल्यासारखे, असं कसं काय?" मी एकदा वैतागून त्या मुलीकडे निर्देश करून राहुलला विचारलं होतं..
"अरे ती तुझ्यासारखी म्हातारपणी जागी नाही झाली! आधी ती एन्ड्यूरन्सची मेंबर होती,मेंबरशिप संपली म्हणून ही जिम ट्राय करायला म्हणून लावलीये. पण तीन महिने कम्प्लीट झाल्यावर फक्त एका महिन्याचीच रिन्युअल घेतलीये तिने ."
"म्हणजे? हा महिना संपला कि ती जाणार?"
"बहुतेक.. पण तुला काय करायचंय? तिच्यासाठी आलास कि स्वतःसाठी?"
राहुलला खर सांगण्यात काही अर्थ नव्हता नाहीतर माझं सभासदत्व धोक्यात आलं असतं!
एके दिवशी मला जिमला जायला जमलं नाही.. ऑफिस मधून अर्धा-पाउण तास उशिरा घरी आलो तर सगळे निघून गेले होते. जायचा प्रचंड कंटाळा आला. साडेतीन महिन्यांच्या व्रतामधला पहिला खंड.. काय कन्सिस्टन्सी होती! वा! पण जाऊ दे.. तसाच सोफ्यावर रेलून बसलो. पेपर उघडता उघडता खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या घरात काहीतरी हालचाल दिसली. एक शर्ट दिसत होता.. असेल.. मी नजर पेपरमध्ये वळवली.. आणि चमकलो! शर्ट? तो सुद्धा समोरच्या घरात? म्हणजे कोणी पुरुष आलाय का? मी पडद्याआड उभा राहून हेरगिरी सुरु केली. कोणी दोघेजण बोलत होते.. घरात बहुधा इतर कोणी नसावं. त्यांची खिडकी, आमच्या घरातून वगळता इतर कुठूनही दिसत नसे. पेठेतल्या घरांची संरचनाच अशी असते. आमच्याही घरात यावेळी जनरली कुणी नसतं त्यामुळे बहुधा खिडकी पूर्णपणे बंद करायची तसदी त्या मुलींनी घेतली नव्हती. किंवा एक कवाड कदाचित वा- यामुळे उघडलंही असेल. पण आतमध्ये ती सुहास्यवदना आणि एक मुलगा! आईशप्पथ... मुलगा? मी सतर्क झालो..

भाऊ असेल.. मी मनाची समजूत घातली. पण असला तरी असा खेटून बसणार नाही.. कोणीतरी असेल ओळखीचा.. नुसता मित्र. पण म्हणून काय झालं. दरवाजा बंद करून बसायचं? काही जनरीतीचं भान वगैरे? आणि चक्क हातात तिचा हात? भविष्य वगैरे सांगत असेल पण मग दुसरा हात कुठेय त्याचा? तिच्या कमरेभोवती बोटं आहेत ती कोणाची? आयला.. प्रकरण वेगळंच होतं.. वेगळं कसलं नेहमीचंच होतं पण आमच्यासाठी वेगळं! मी पडद्या आडून त्यांच्या हालचाली निरखून बघू लागलो.. कुठे हातातच हात घे;कुठे तिच्या कपाळावरची बटच नीट कर असे प्रेमी युगुलांचे चाळे करत बराच वेळ गुलुगुलू गप्पागोष्टी केल्यावर तो जायला उठला. तीही उभी राहिली आणि खाली वाकून त्याने तिच्या गालावर...

...मी मटकन खालीच बसलो! आम्ही प्रत्येकाने स्वप्नात उभारलेले इमले कोसळले होते. दोनच मिनिटात तो बाहेर पडला. किडकिडीत बांधा. अंगावर जणू शर्ट वाळत घातलाय कि काय असं वाटत होतं. रूपही जेमतेम. तो गेल्यावर ती खिडकीत येऊन बसली आणि तिने त्याला फोन केला. त्यालाच! कारण त्याच्या फोनची रिंग मला ऐकू येत होती. ती नेहमीसारखीच त्याच्याशी बोलत खिडकीत बसली...!

मी सोफ्यावर अंग झोकून दिलं होतं.दरवाजा उघडल्याच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. जिमवरून पार्टनर्स परतले होते.
'माझ्याचकडे बघत होती रे ती.." आमच्या घरातले एक भागीदार..
"हाड.. तू काय शाहीद कपूर समजतोस कि काय? आपल्याकडे सोडून ती बाकी कोणाकडे नजर पण टाकत नाही" दुसरे मित्रवर्य
"तुम्ही नुसत्या गोष्टीच बोलत बसा.. ती माझ्या बाईकच्या मागे बसेल ना तेव्हा कळेल तुम्हाला" तिसरे सहकारी..
"कोणाबद्दल बोलताय?" मी विचारलं.
"तुझ्या वहिनीबद्दल" तिघेही एकदम म्हणाले..
"वहिनी? कुठली?" माझा सवाल.
"अरे क्या येडा बनके पेडा खाता है यार... ही समोरची.. तेरी भाभी! मला फुल न्याहाळत होती; माहितीये?" एकजण म्हणाला..
"आता ती एकच होप आहे यार" दुसरे साहेब उद्गारले!
"का? काय झालं? आपली जिमवाली ललना?" मी गडबडून विचारलं.
"आपली? आपली कधीपासून झाली ती? आमची होती ती.."
"तीच.. ती आहे ना? मग एकच होप काय?" मी सावरून म्हटलं.
"नाय ना.. तिला बॉय फ्रेंड आहे.."
"क्काय?" मी पुन्हा चमकलो " तुम्हाला कसं कळलं?"
"आला होता ना साला आज.. तिला सोडायला. कार घेऊन. काडीपैलवान आहे नुसता! त्याच्यात तिने काय बघितलन कोण जाणे! "
"अरे सोडायला आला म्हणून काय बॉयफ्रेंड होतो? भाऊ असेल..नायतर कोणीतरी असेल ओळखीचा.. नुसता मित्र बित्र" मी माझं मघासचंच लॉजिक अप्लाय करायचा प्रयत्न केला.
"तसा असला तर सोडून जाईल ना लगेच.. ती गाडीमध्ये झुकून त्याच्या ओठांवर... श्या.. मला बोलवत नाही. .तू सांग रे.."
माझ्या अंगातून त्राण गेल्यासारखं वाटलं!
"काही सांगू नका कोणी" मी ओरडलो.
"काय रे? एवढं अपसेट व्हायला काय झालं? अजून एक ऑप्शन आहे ना आपल्याला. उलट बरंच झालं. आता फक्त एकीवरच जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल"
"काही उपयोग नाही! या ऑप्शनवरही कुणीतरी आधीच काट मारलीये!" मी सांगितलं.
मी सगळा प्रकार सांगताच पहिल्यांदा सर्रकन तिघांचेही चेहरे उतरले आणि पाठोपाठ मानेवरून जिमचं भूतही!!

त्यादिवशीनंतर ऑफिसमधला वर्कलोड कसा कोण जाणे पण अचानकच वाढला.. तोही सगळ्यांचा एकदम!! बहुतेक रात्री लगोलग जागतिक बाजारपेठेतून रीसेशन हटलं असावं! कारण 'आज काम आहे रे ऑफिसमध्ये' या कारणाखाली सगळ्यांना घरी यायला रात्र होऊ लागली. त्यामुळे जिम तर बंदच झाली! जिन्यावरून येताना सुद्धा आजकाल सगळे माना खाली घालून येतात. सुहास्यवदना मात्र तशीच बसलेली असते.. सुंदर हास्य चेह-यावर विलसत ठेवून. पण ती कोणाकडे बघून हसली यावर हल्ली डिस्कशन्स मात्र रंगत नाहीत. रविवारची कामवाली बाई येवून साफ सफाई करून जाते त्यामुळे तसा कचराही होत नाही.

अरे हो.. कालच राहुलचा फोन आला होता. कुणी एका नव्या सौंदर्यवतीने जॉईन केलीये म्हणे जिम. 'सहा महिन्याची मेंबरशिप घेतली आहे' अशी अतिरिक्त माहिती सुद्धा पुरवलीये त्याने.. पार्टनर्सना सांगायलाच विसरलो. मी म्हणतो, तिसरा स्पेल चालू करायला काय हरकत आहे?