आंतरजालावरून साभार |
आता मी काही लेखक वगैरे नव्हे त्यामुळे साधं शुद्ध लिहायलाही जमत नाही. पण निदान नेहमी ऐकतो तसच्या तसं लिहायचा प्रयत्न करतो. सिंह शब्द 'सिंव्ह' असा म्हणायचा आणि 'सिंह' असा लिहायचा यामुळे काय साधतं ते मला पण कळलं नाही! (होय ला पद्धतशीर 'होय' लिहायचं पण नाय ला 'नाही' असं का? ते कळत नाय-आपलं-नाही) हल्ली शेजा-याचा तिसरीतला मुलगा किंवा पहिलीतली मुलगी असले प्रश्न विचारतात..उत्तर नाही आलं तरी त्यांचं कौतुक वाटतं. कबूलच करायचं झालं तर मला हा प्रश्न तिने विचारेपर्यंत पडला नव्हता! हल्लीची पिढी खूपच हुशार. जनरेशन ग्याप ला ग्याप म्हणायला लाज वाटावी एवढी मोठी झाली आहे ती..ग्याप कसली दरी आहे मोठ्ठीच्या मोठी.
मी शाळेत असताना, कधीतरी खर्चाला मिळणा-या ५ रुपयाच्या नोटेवर 'मैं धारक को अमुक अमुक रुपये अदा करने का वचन देता हुं' असं का लिहिलेलं असतं हा मला पडलेला आणि कोणाला उत्तर माहित नसलेला कठीण प्रश्न! मला असं प्रश्न पडला आणि पडू शकतो याचा मला कोण अभिमान वाटला होता. त्यानंतर मग कठीण म्हणावा असा प्रश्न पडला नाही. कधी पडलाच तर त्याच उत्तर 'येवढा मोठ्ठा झालास तरी साधं येवढं कळत नाही?' किंवा 'नुसता वाढला रेड्यासारखा पण अक्कल काडीची नाही' किंवा 'गप्प बस' यापैकी एक होतं. तसंही मी प्रश्न विचारतोय आणि समोरच्याने उत्तर देणं अपेक्षित आहे हे प्रसंग सुद्धा माझ्या आयुष्यात मोजकेच आले. अन्यथा बायको, शिक्षक, प्रोफेसर्स, नातेवाईक ,साहेब हा प्रवर्ग अनुक्रमे घर, शाळा,युनवर्सिटी, हॉपीस या ठिकाणी खिंडीत गाठून मलाच प्रश्न विचारण्यासाठी जन्माला आला होता याबद्दल माझ्या मनात अजूनतागायत शंका नाही.
शाळेत शिकलो मराठी मिडीयम मधून पण फक्त म्हणायला आणि इलाज नव्हता म्हणून. अभ्यास वगैरे जेमतेमच केला. आता 'जेमतेम केला' म्हणजे तेवढाच यायचा. जास्त करायचा ठरवला असता तरी मला करता आला नसता. आमची आई तर सुरुवातीला "आमच्या वेळी आम्हाला परिस्थिती मुळे जमलं नाही, तुम्ही शिकून मोट्ठे व्हा' वगैरे डायलॉक्स मारायची. मी खूप इमोश्नल होऊन जायचो आणि तावातावाने पुस्तकाचं पहिलं पान वाचून काढायचो. इंग्रजीचं असेल तर डिक्शनरी वगैरे उघडून बसायचो.पण कितीही इमोशनल झालो तरी माझा उत्साह दीड पानात गळून पडायचा. कांबळी नि तेंडल्याचं करियर जास्त आकर्षक वाटायचं! अशी कित्येक पुस्तकांची पहिली पानं मी कित्येकदा नव्याने वाचली आहेत पण परीक्षेत कधीच पहिल्या पानात उत्तर असणारा प्रश्न कधीच विचारत नाहीत हे इतक्या परीक्षांच्या अनुभवांवरून मी छातीठोकपणे सांगू शकतो! अपवाद आमच्या दहावीत असणारा 'नरिंद्रबासा भेटी अनुसरण' नावाचा टुकार एक पानी धडा! तो अक्खा धडा पाठ असूनही त्यावरच्या एकाही प्रश्नाचं उत्तर धड जमलं नाय बुवा. त्या धड्यावर थोडक्यात उत्तरं असूदेत किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण असुदेत मी जवळपास सगळा धडाच लिहीत असे आणि जमतील तितके मार्क गोळा करीत असे!
तर एवढा(स्सा) अभ्यास करूनपण आईचं तेच पालुपद! "आमच्या वेळी आम्हाला परिस्थितीमुळे जमलं नाही आणि हे कार्टं बघा!" एवढाच काय तो वाक्यात बदल. त्यामुळे मी माझं बरचसं लहानपण मी खूप मोठ्ठ्या भावनिक दबावाखाली काढलं. पण इतरांना आणि त्यावेळी मलादेखील ते कळलं नाही. जरा मोठं झाल्यावर एकदा मला बाहेरून परीक्षा देता येतात ते कळलं. मला वाटलं आईसाठी हि चांगली संधी आहे. पुढे एकदा तिने तो पठडीतला डायलॉक मारल्यावर मी म्हटलं कि "आई, आता तू अभ्यास करून बाहेरून परीक्षा देऊ शकतेस!" तर जी भडकली म्हणता! पाठीचं धीरड होईपर्यंत धोपटलं मला. जाम रडलो होतो तेव्हा. त्यानंतर समजलं कि मला निव्वळ इमोशनल ब्ल्याकमेल करण्यासाठीच तिला ते वाक्य आवडायचं कारण त्यानंतर तिने कधीच हे वाक्य माझ्यावर फेकलं नाही!
बाबांनी तर मला जाम धुतला आहे. माझ्याच वस्तू मोडणे, हरवणे, वापरण्याच्या लायकीच्या न ठेवणे, नवीन वस्तूंसाठी हट्ट करणे, बेहिशेबी मालमत्ता जमवण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या लक्षात येईल इतका जास्त वेळ खेळणे अथवा घराबाहेर घालवणे, अभ्यास न करणे इत्यादी (माझ्या दृष्टीने) किरकोळ गुन्ह्यांकरता त्यांनी आपला हात साफ करून घेतला आहे. कधी कधी तर त्यांना फक्त खुमखुमी आली म्हणूनही फालतू कारण उकरून काढून धोपटला असावा असा माझा कयास आहे! मी मोठा झालो आणि सरकार-मध्यमवर्ग, पोलीस-मोर्चेकरी, सरकारी अधिकारी- गरजू व्यक्ती याची नाती बघतो तेव्हा कळतंय कि उलट मारू न शकणाऱ्याला असंच धोपटण्यात कोणालाही मजाच येत असावी! आमचं कुठलं एवढं सुदैव?
आता जेमतेम तिशीचा आहे मी.. थोड इकडे तिकडे..(खरंतर बराचसा तिकडेच) पण आताच 'आमच्या काळात हे असं होतं' म्हणण्यासारखी परिस्थिती बदलली आहे. काय महाग झाल्याहेत वस्तू. सोनं 30000 रुपये तोळा झालंय म्हणे.. जेमतेम 3000 रुपये तोळा असतानाचे दिवस माहित आहेत आहेत मला.. पेट्रोल तर 10 रुपयाने होतं. आमची आजी लहानपणी 'आमच्या काळात 300 रुपयाने होतं सोनं' वगैरे गोष्टी सांगायची पण त्या हिशेबाने मी सत्तरीत पोचल्यावर आताचे रेट असणं अपेक्षित होतं पण काहीतरी गंडलंय खरं. महागाई वाढली असं म्हणायला गेलो तर परवा टीव्ही घेतला, आमच्या बाबांनी दहा-पंधरा वर्षापूर्वी घेतला होता त्याच किंमतीत आणि त्याच्यापेक्षा कैकपट भारी. काय पिक्चर क्वालीटी आहे म्हणून सांगू..
लहानपणी या टीव्ही वरची 'मम्मी' बघून मला शिवाजी महाराजांसारखं 'अशीच अमुची आई असती वगैरे वाटायचं' पण आमच्या आईकडून तर बहुतेकदा मार आणि रोजच्या दोन वेळच्या जेवण्याव्यतिरिक्त इतर काही खायलाही मिळालंही नाही.. मॅगी वगैरे तर लांबची गोष्ट! तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराज आणि त्यांच्यासारख्या मोठ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींना ते मोठे झाल्यावर महत्व आलं असावं. कारण एकदा एका १ ऑगष्टला टिळकांवरती बाकीच्यांनी केलेल्या भाषणं प्रेरित होऊन, मी वर्गात 'मी कागद फाडला नाही मी कपटे उचलणार नाही असं सांगितलं होतं' पण त्याला कोणीच 'बाणेदारपणा' वगैरे म्हटलं नाही. बाईंनी २५ उठाबशा काढायला लावल्या आणि झाडू घेऊन सगळा व्हरांडा झाडायला लावला होता. तेव्हापासून माझी हि समजूत दृढ होत गेली आहे.
'उच्च' शिक्षणासाठी (म्हणजे बी ए) मुंबईत गेल्यानंतर कॉलेजामधली एकंदर परिस्थिती बघता मला मराठी मिडीयम मधून शिकल्याची तशी लाजच वाटायची. बाहेरच्या राज्यातून आलेली मुलं हिंदी इंग्रजी बोलून एकमेकांवर ,शिक्षकांवर आणि विशेषकरून मुलींवर छाप पडत असत. आलेल्या मुलांवर मी उगीच हिंदीतून बोलून इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करायचो. ती पोरं हिंदीतून बोलायची तेव्हा मला कधी मराठी बोलावसं वाटलं नाही. मला वाटायचं कि असं केलं तर पोरं मलाच हसतील.आणि फ़क्त मीच असा नव्हतो..बरेच होते.. 'इंग्रजी बोलता न येण्याचा न्यूनगंड फ़क्त हिंदी बोलून दूर सारता येतो' या मताचे.. त्यामुळे माझं इंग्रजी तसंच राहिलं आणि मराठी असल्याचा सुगावा इतरांना लागू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहिलो..आईवडिलांनी इंग्लिश मिडीयम च्या शाळेत न घातल्याबद्दल त्यांना दूषणं देत बसलो!बरेचसे तसंच करायचे.
एक मात्र होतं, कॉलेजात गुजराती पोरं एकमेकांशी गुजरातीतून बोलत, आंध्रची तेलुगुतून, केरळची मल्याळीतून परंतु हीच मुलं शिक्षकांशी, जमत असेल तर अस्खलित, नसेल तर तोडक्या मोडक्या इंग्रजीतून बोलत.. आम्ही मराठी मात्र एकमेकांशीही हिंदीतून बोलत असू आणि शिक्षकांशीही.. मराठी वापरली ती फ़क्त शिव्यांपुरती! मराठी शिकू पाहणाऱ्या परप्रांतियांना शिकवल्या त्या मराठी शिव्या! त्या मुलांना कधी मराठीमुळे अडेल अशी वेळच येऊ दिली नाही.. कायम त्यांचा भाषान्तरकार म्हणून वावरलो.पण मी मिक्स नाही होउ शकलो.. खरतर त्यानाच मी कितपत हवा होतो काय माहीत! त्यांच्या ग्रुप मध्ये मी असताना ते एकमेकांशी त्यांच्या भाषेत बोलत असत; मला समजत नाही याचा विचार न करता.. परंतु मी मात्र, ग्रुपमध्ये एखादाही मराठी न समजणारा असा कोणी असेल तर त्याला कळावं म्हणून न चुकता हिंदीतून बोलत असे. सहिष्णुता कि सगळा व्हरन्याक असल्याचा परिणाम! कोण जाणे? असो.. आता मुलीला इंग्रजी मीडियम शाळेत घालून पापक्षालन करीन म्हणतो..
शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी फार आटोकाट प्रयत्न केले.. पण स्वतःची पब्लिसिटी करणं मला जमलंच नाही. 'मी आहे तसाच मला घ्या आणि मला हव्या त्या पगारावर ते पण मुंबईतच!!' हा मित्रांच्या टोळक्या बरोबर जमवलेला उसना एट्टीट्यूड पहिल्या काही मुलाखतीत गळून पडला.. "तुम्ही म्हणाल ते आणि पडेल ते काम करायला तयार आहे..काही महीने फुकट करतो हवं तर! तेही कुठेपण" इथपर्यंत माझं ट्रांझिशन व्हायला काहीच दिवस पुरले. बाबांच्या वशिल्याने मी पुण्यात आता आहे तिथे नोकरीला लागलो. तिथपासून आजवर केवळ नोकरी टिकवणे हा माझा उद्देश राहिला आहे. नोकरीवरुन तड़काफड़की काढू नये आणि शक्यतो सुट्टीच्या दिवशी सुट्टी मिळावी या दोन माफक अपेक्षा घेऊन मी पाट्या टाकत आहे!
घरी आलो की मात्र नेमाने दमल्याची ऍक्टिंग करतो.. ते पण मला सुरुवातीला माहित नव्हतं पण नवीन लग्न झाल्यानंतर पहिले काही दिवस ऑफिसातून आल्यावर बायको ' दमला असाल ना, चहा करते' असं म्हणत असे.. दिवसातला तो तासभर बसल्या बसल्या चहा मिळतो, कुठे जायचा धोशा मागे लागत नाही, हवं ते चॅनल बघता येतं, कसल्या घरगुती तक्रारी सांगितल्या जात नाही, डोळा लागला तरी खपून जातं या आणि अशा विविध फायद्यांची जाणीव झाल्यामुळे मी ती एक्टिंग करायला लागलो आणि नंतर ती अंगवळणीच पडली! नाहीतर दिवसभर खुर्चीत बसून कसला आलाय थकवा? माझ्या बघण्यातला बैठं काम करणारा कोणीही नोकरदार दिवसभर मान मोडून फक्त काम करतोय आणि खरोखर 'दमलाय-बिमलाय' असे पाहण्यात नाही.. पण वर्षानुवर्षे ऑफिसमधून येणाऱ्या नोकरदार पुरुषवर्गाला घरात हक्काने मिळणारा परंपरागत वेळ आपण का उपभोगू नये हे आपले माझे मत! अर्थात कच्चेच!
नोकरीच्या ठिकाणी सुद्धा माझी फारशी पक्की मतं नसतात. त्याक्षणी त्यावेळी मला जे पटेल तेच माझं त्यावेळचं मत असतं. आता बघा, सरकारी लोक, राजकारणी हे लोक करत असणाऱ्या करप्शन विरोधात मी कधीकधी तावातावाने बोलतो (म्हणजे अजूनपर्यंत तीनदा बोललोय) आणि माझा राग व्यक्त करतो. सगळीकडेच. परवा तर म्हणजे गंमतच झाली....
ताळेबंद : उरलेला
ताळेबंद : उरलेला