शुक्रवार, २७ जून, २०१४

अनुत्तरीत प्रश्न : उत्तरार्ध


पूर्वार्ध:

साव्याच्या थेट हल्ल्याने ते निष्प्रभ झाले..
"नाही.. म्हणजे आम्ही राहिलो भाड्याच्या घरात नंतर मग हल्ली घेतलं घर. मुलगी भाड्याच्या घरातच लहानाची मोठी झाली तर आता स्वतःच्या घरातून परत भाड्याच्या घरात पाठवायची म्हणजे.." ते लाचार हसत म्हणाले..
"आता लग्नानंतर 'आमचं' घर असणार म्हणजे आमच्या दोघांचे परिश्रम नकोत का घर उभारणीसाठी?"
"पण आधीच घर असतं तर.. आमची अटच आहे अशी.." वडिलांनी नेहमीचा सूर आळवला..
साव्या उठला , मला उठायची खूण केली..
"म्हणजे थोडक्यात तुमच्या मुलीसाठी मी घर घेऊन ठेऊ आणि तुमची मुलगी तिथे आयती राहायला येणार असं म्हणणं आहे तुमचं..बरोबर? "
"अरे मग? आम्ही लग्नात वरदक्षिणा देऊ कि घसघशीत" निर्लज्जपणे ते म्हणाले
"त्यापेक्षा 'हुंडा देणार नाही' अशी अट ठेवायला हवी होती तुम्ही. आमची मुळात तसली अपेक्षा नाहीच आहे पण मुलीने माझ्या सोबतीने संसार उभा  करावा एवढीच माफक अपेक्षा होती आमची. पण कणाहीन वडिलांच्या मुलीकडून काय अपेक्षा करायच्या?" साव्याने सवाल केला. एवढं मराठी त्यांच्या डोक्यावरून गेलं असावं. ते तसेच हसत राहिले होते.  "तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जावई मिळो " अशा शुभेच्छा देऊन  आम्ही बाहेर पडलो.

मी हसलो. "अरे ते आपण गेलो होतो सिंहगड रोड ला ते स्थळ आठवलं" साव्याच्या प्रश्नार्थक चेह-याला मी उत्तर दिलं. तो सुद्धा हसला
"बघ ना? त्या बापाला माझा स्वभाव कसा आहे, लहानपणापासून जपलेल्या मुलीला मी समजून घेऊ शकतो का?  त्यांच्या जीवनात मी adjust होऊ शकतो का याच्याशी काडीमात्र देणंघेणं नव्हतं.माझा पगार किती आहे आणि माझं फुकटचं घर आहे कि नाही यातच त्यांना इन्टरेस्ट होता!"
आम्ही दोघेही खळखळून हसलो.
"आणि ती सातारकर आठवते का तुला? माझ्या चुलतमामाचं इंटरकास्ट लग्न आहे म्हणून आठवडाभरानंतर नकार देणारी?" आम्ही पुन्हा तसेच हसलो.
"अजून त्या नगरच्या पोरीच्या कोण कुठल्या मावशीने तर 'सगळं चांगलं आहे पण पत्रिकेत फक्त साडेसतरा गुण जुळतात' म्हणून नाही म्हटलं होतं माहितीये ना?"
एका पाठोपाठ एक आठवणी जाग्या होत होत्या.. प्रत्येक आठवणीनंतर साव्या खिन्न होत होता.

"चुकलंच माझं.." सिलिंग fan कडे एकटक पाहत साव्या म्हणाला.. " हुशार, सरळसाधा  मुलगा हि इमेज जपण्याच्या प्रयत्नात प्रेमात पडण्याचं टाळलं. जाणीवपूर्वक. तीच चूक झाली.. आई वडील आपल्यामुळे नसत्या झेंगटात  पडू नयेत म्हणून कुठल्या पोरीकडे मान वेळावून पाहिलं नाही. नाकासमोर चाललो. शाळा कॉलेजात जेव्हा मला कुठली मुलगी साधी बोलायला आवडली तरी तेव्हा 'हे काय प्रेम करायचं वय नव्हे' असा प्रौढत्वाचा विचार केला. जेव्हा अनघा attract होतेय असं वाटलं तेव्हा मी स्वतःहून तिला झिडकारून लावलं.. का? तर केवळ मला प्रेमात पडायचं नव्हतं म्हणून!" तो पुन्हा खिन्न हसला..

च्यायला.. म्हणजे मी विचारल्यावर प्रत्येकवेळी  'तसं काही  नाही , वी आर जस्ट फ्रेंडज, तुला उगाच तसं वाटतं' म्हणणारा साव्या तिच्या प्रेमात होता तर. ती शेजारच्याच flat मध्ये राहायची. तिचं त्याच्यावर असणारं प्रेम ही तर अगदीच उघड गोष्ट होती. पण तिचं लग्न ठरलेलं नसतानाही त्याने स्थळं बघायला सुरुवात केली तेव्हा मीही तो विषय 'खरंच तसं काही नाही' म्हणून सोडून दिला होता.

अनघाचं मागच्या वर्षीच लग्न झालं होतं. साव्या आला नव्हता. मी त्याचा आणि माझा आहेर  घेऊन गेलो होतो. अनघा काही बोलली नाही मला पण तिचं कसनुसं हसणं मला बरंच काही सांगू पाहतंय असं वाटत होतं.. प्रत्येकवेळी 'ओल्या बैठकी'त छेडल्यानंतर तिचा विषय शिताफीने टाळणारा साव्या आता फ्रस्ट्रेशन मध्ये चुकून खरं काय ते बोलून गेला होता.

"तू तिच्या प्रेमात होतास?'
"आत्ता जाणवतंय रे मला ते.. घरी आल्यावर माझ्याकडून मी तिला घेऊन फिरायला जावं अशी अपेक्षा बाळगणारी तरी नव्हती रे ती.  तिचं बोलणं ऐकण्यात मला इन्टरेस्ट असायचा. कित्ती वाचायची ती.बाप रे! इतकी माहिती असायची तिच्याकडे. मुलींशी बोलताना इतका लाजणारा मी.  तिच्या नजरेला नजर न भिडवता बोलायचो तिच्याशी. तरीपण मी काय सांगायचो त्यात तिला इन्टरेस्ट असायचा. निदान तसं दाखवायची तरी. मी काही बोललो आणि माहिती नसेल तर लगेच सगळं वाचून माहिती करून घ्यायची."
साव्या सिलिंग कडे एकटक बघत होता.

"नवरा म्हणून माझ्या याच अपेक्षा आहेत रे आधीपासून..  दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं, त्यांना एकमेकांच्या बोलण्यात इन्टरेस्ट असावा यापलीकडे मी काही एक्स्पेक्ट करत नव्हतो आणि नाही. नुसतं बाह्य सुख महत्वाचं असतं तर ते पैसे फेकून मिळतं. "
 मी काहीच बोलू शकलो नाही.
"जोक्स अपार्ट  पण मला सांगून आलेल्या स्थळांपेक्षा कित्येकपट सुंदर choices होत्या बँकॉक ला माहितीये ?"
 "साव्या , जोक्स चा विषय नाहीये हा. लाईफ पार्टनरला त्यांच्याशी कम्पेअर करतोयस तू ?" मी करवादलो
"मुळीच नाही. पण मुलींचे बाप आणि स्वतः मुली मला एटीएम  मशीनशी कम्पेअर करताहेत हे नक्की!"
 " अरे त्यांच्या पण काही डिफीकल्टीज असतील. घर, उच्च डिग्री म्हणजे पर्यायाने पुरेसे पैसे हे त्यांच्यासाठी तुझी stability मोजायचे  क्रायटेरिया असतील कदाचित."

"मान्य , शंभर टक्के मान्य पण आयुष्यात आपण एका अनोळखी व्यक्तीबरोबर राहणार आहोत त्याची निवड करताना होमवर्क नको का पुरेसं? उच्च डिग्री म्हणजे नेहमीच पुरेसे पैसे  नसतात. एकट्यानेच घर घेतलं कि आर्थिक गणितं बिघडतात हे कळायला नको त्यांना? संपवून टाक!"
शेवटचं वाक्य मला (म्हणजे ग्लासातल्या द्रव्याला) उद्देशून होत हे कळायला मला वेळ लागला.

"कंटाळलोय रे मी. आयुष्याची ऐन उमेदीची चार -पाच वर्ष लग्न या विषयासाठी नाहक वाया दवडली असं  वाटतंय. जो तो स्थळं सुचवतो. हे हे वधू-वर सूचक मंडळं  चालवणारे लोक, मुलीचे काही अतिशहाणे नातेवाईक, 'माझं भलं करतोय' असा आव आणून माझ्या पर्सनल प्रश्नात नाक खुपसणारे आमचे नातेवाईक अश्या या सगळ्या  लायकी नसणा-या लोकांकडून मला सल्ले ऐकून घ्यावे लागताहेत. बरं, मी नाराजी दाखवली तर, 'कसला attitude  आहे,त्यामुळेच लग्न नाही जुळत ' नाहीतर 'आम्हाला शहाणपण शिकवणार का तू? ' वगैरेचा भडीमार,शुंभासारखा राहिलो तरी  'आतातरी हातपाय हलव, स्वत:ची स्वत:च बघितली असतीस तर ही वेळ  आली नसती' किंवा 'तुलाच इंटरेस्ट  नाही म्हणून हे असं आहे' वगैरे जावईशोध लावतात ते वेगळंच."

मी गप्प राहिलो.
"आता सहन होत नाही सगळं. मित्रांमध्ये जीव रमवावा म्हटला तर मित्र पण बदलले रे त्यांची लग्न झाल्यापासून. बायकोचंच जास्त ऐकतात. त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. आता कुटुंबाला प्रायोरिटी दिली पाहिजे. तुला सांगू, तू एकटा आहेस जो लग्नानंतर पण तसाच राहिलाय "

"खरंतर मी सुद्धा बदललोय." मी कबुली दिली " मोजके लोक आहेत… तुझ्यासारखे… ज्यांच्यासाठी मी तसाच आहे. अदरवाईज मीपण family लाच प्रायोरिटी देतो. द्यावीच लागते. आपण  समाजात राहतो. त्या समाजाचे काही अलिखित नियम आपल्याला पाळावेच…  "
" समाज… आय हेट धिस सोसायटी " माझं वाक्य मधेच तोडत तो म्हणाला. " या लग्नाचं लचांड या समाजानेच मागे लावून दिलंय माझ्या. मी एक साधा सरळ माणूस आहे. मला सांग कशासाठी करू लग्न ? आयुष्यात एक companion पाहिजे असं  म्हटलं तर मी बघतोय कि लग्नानंतरचा काही काळ वगळला तर त्यानंतर अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत नवरा बायकोचं पटत नसतं एकमेकांशी. पन्नाशी साठीतलं  कपल एकमेकांशी गुजगोष्टी करतंय , आयुष्यभराचे जमाखर्च मांडतंय असं चित्र मी एकतर सिरियल्स मध्ये बघितलंय नाहीतर 'बागबान'सारख्या सिनेमांमध्ये ! "

माझ्याकडे अर्थात समर्पक उत्तर नव्हतं.

"कित्येकांच्या घरात आई वडिलांची धुसफूस चालू असते हे ते सांगतात तेव्हा कळतं. अगदी माझ्या घरात पण काही वेगळी परिस्थिती नाही." तो पुढे म्हणाला " असंच जर लाईफ होणार असेल तर कशाला हवं लग्न करायला? मी काही वंश वाढवण्यासाठी हपापलेलो नाही. कशासाठी करावं लग्न?"

"बघ, माझ्याकडेही याचं तुला पटेल असं उत्तर नाहीये. आणि तू म्हणतोस तशी  असते परिस्थिती पण अगदीच एकांगी विचार नको करू. काहीजण  अगदी छान गोडीगुलाबीने राहतात पण. निदान इतरांना तसं  दाखवतात तरी."

"तेच ना. मी स्वतः शोधायचा प्रयत्न केला, खूप जणांशी चर्चा केली तर त्यांनी कधी हा विचारच केला नव्हता. वरून कधी कधी तर  मारून मुटकून  स्वतःचा कसाबसा सेट केलेला संसार मुलांच्या लग्नानंतर, सुनेच्या आगमनानंतर मात्र  विस्काटायची वेळ आलेले लोक भेटले "
साव्या गडगडाटी हास्य करत म्हणाला!
"कसं असतं लोक या गोष्टी चारचौघात बोलत नाहीत म्हणून आपल्याला कळत  नाही एवढंच!!"

मी शांत बसलो. पर्याय नव्हता. उपाय नव्हता. मी काही करून त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मदत करू शकेन असा काही मार्ग नव्हता. खूप वेळ आम्ही एकमेकांशी न बोलता त्या स्कोटलॆन्ड मेड एजेड व्हिस्किचे छोटे घोट रिचवत राहिलो.. झोपेचं चिन्ह दिसत नव्हतं. तो सांगत होता त्यात अतिरंजित असं काहीही नव्हतं.

मुलींचं कमी होणारं प्रमाण , पुरुष जाती विषयीचा वाढलेला तिरस्कार, लग्नाचं बाजारू स्वरूप , हुंडाबळी,  जातीव्यवस्था, मुलीकडच्या वाढलेल्या अपेक्षा, स्त्री सबलीकरण हे असले विषय निबंधां साठी नाहीतर चर्चासत्र भरवण्यासाठी बरे वाटतात पण जेव्हा त्यामध्ये नाहक होरपळणारे असे असंख्य साव्या बघितले कि या विदारक सत्याची जाणीव होते. स्त्री दाक्षिण्याचं  भान बाळगणा-या  या लग्नाच्या बाजारातल्या उमेदवारांना समाजात राहण्यासाठी शेवटी आपल्या मूल्यांशीच  तडजोड करावी लागते. तेही माहित नसलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करण्यासाठी!!

"सो… कमिंग back टू द स्क्वेअर वन… मी लग्न न करण्याच्या माझ्या निर्णयावर सध्यातरी ठाम आहे. ज्यावेळी लग्न का करावं याचं थोडं तरी समाधानकारक उत्तर मिळेल तेव्हा कदाचित मी माझ्या निर्णयाचा फेरविचार करेन. नैतिकता बाजूला ठेवली आणि तथाकथित समाजाला फाट्यावर मारलं तर इतर सगळ्यासाठी बँकॉक आहेच!"  पुन्हा एकदा गडगडाटी हसून साव्याने माझी विचारशृंखला तोडत टाळी साठी हात पुढे केला.

 सकाळी उठून मी भणभणतं डोकं घेऊन घरी पोचलो. तो पूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवल्यानंतर माझं रुटीन सुरु झालंय. आज  प्रॉपर्टी प्रदर्शनातल्या त्याच्या stall ला भेट द्यायला चाललोय पण जाताजाता साव्याला देण्यासाठी माझ्याकडे उत्तर नाही हे सुद्धा कबुल करायलाच हवं… 

रविवार, १ जून, २०१४

अनुत्तरीत प्रश्न : पूर्वार्ध


वामन सावंत उर्फ साव्याचा फोन म्हटला कि नेहमीच माझं मन द्विधा अवस्थेत जातं.. बोलायचं खूप असतं पण त्याचा फोन हमखास अशा वेळी येतो कि मनसोक्त बोलताच येत नाही. उदाहरणार्थ घरात असलो तर जेवत असताना, सकाळी उठल्या उठल्या, ऑफिस मध्ये मिटिंग चालू असताना  किंवा बॉस  शेजारी येउन गोष्टी सांगत असताना .. वगैरे वगैरे.. मला अशीही दाट शंका आहे कि त्याला मला फोन करावासा वाटला कि माझ्या साहेबाला माझ्याशी काही बोलण्याची हुक्की येत असावी.. किंवा मी मिटिंग रिक्वेस्ट एक्सेप्ट केली रे केली कि आमचे एच आर साव्याला फोन करून माझं शेड्युल कळवत असावेत! असो...

ऑफिस जवळच्या एका चहाच्या टपरीवर तो नेहमी येत असे. सिगारेट फुकणा-यांच्या त्याच्या कंपूत तो एकटाच फुकत नसे. (त्यामुळेच तो माझ्या लक्षात राहिला!) चहाचे घुटके घेत तो त्यांच्या थट्टा मस्करीत दंग असे. एकदा शनिवारी किंवा रविवारी मी कामानिमित्त ऑफिस ला गेलो. एकटाच . दुपारी मी टपरीवर गेलो तर नेमका साव्या तिथे होता. तेव्हा माझी आणि त्याची पहिली आणि फॉर्मल  ओळख झाली. काहीजणांशी आपलं ट्युनिंग पहिल्या भेटीतच जुळतं आणि काहीजणांशी आयुष्याच्या शेवटपर्यंत जुळत नाही . साव्या  पहिल्या टाईपचा होता. एकदम चांगला दोस्त बनला तो माझा.

साव्या हा त्याच्या काळात प्रचंड हुशार विद्यार्थी. माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा असेल पण लहानपणापासून ब-याच मुलांना त्यांचे आई वडील आदर्श घालून देण्यासाठी काही विशिष्ट मुलांचा यथेच्छ वापर करतात (उदाहरणार्थ , "बघ बघ तो सावंतांचा वामन बघ.. आणि तू.. कार्ट्याला खेळ सोडून दुसरं काही दिसतच नाही इ.) त्यापैकी साव्या एक! 'साला हा अभ्यास करतो आणि अव्वल येतो त्याच्यामुळे आम्हाला ऐकून घ्यावं लागतं आणि खेळ सोडून आम्हालापण अभ्यास करावा लागतो' असं म्हणून कित्येक मुलांनी आपल्या लहानपणात त्याला मनोमन शिव्या घातल्या असतील.

तसा तो काही फार गरीबीतून वगैरे पुढे आलेला किंवा पेपरची लाईन टाकून शिक्षण पूर्ण करणारा वगैरे नव्हे. जात ओपन क्याटेगरीत  मोडणारी! आई वडील साधे, सरळ, प्रेमळ, मनमिळाऊ वगैरे वगैरे आणि त्यात सुद्धा पद्धतशीर जिवंत आणि ठणठणीत,. म्हणजे समाजाची सहानुभूती मिळवण्याचा अगदीच काही स्कोप नव्हता! एक सरळ साधा मध्यमवर्गीय कुटुंबाचा मध्यमवर्गीय  मुलगा. पण उपजत हुशार. आई वडिलही 'मला डॉक्टर बनायचं होतं पण पैसे नसल्यामुळे जमलं नाही. आता तू माझं स्वप्न पूर्ण कर' अशा टायपाची तद्दन भंपक आणि स्वार्थी स्वप्नं बघून ती पूर्ण करण्यासाठी  पोराच्या इच्छा-आकांक्षांची होळी करणारे नव्हते. त्यामुळे 'तुला काय वाटतं ते कर' असं सांगितल्यावर त्याने  आर्कीटेक्ट व्हायचं ठरवलं होतं आणि तसा तो झालाही होता.

त्यादिवशीपण असाच फोन आला त्याचा. "बोलायचं आहे. अर्जंट . वेळ आहे का?" पहिल्यांदाच असं झालं होतं कि मला वेळ होता. "हो.. बोल"
"फोनवर नव्हे! प्रत्यक्ष भेटून. "
"have यू गॉन मॅड साव्या? वाजलेत बघ किती रात्रीचे पावणेबारा.. टी व्ही बघत होतो म्हणून मी जागा तरी आहे. हि मॅच संपली कि मी झोपणारे.."
" तू ताबडतोब मला पिक करायला ये. मी वाट  बघतोय.. रात्री माझ्याकडेच थांब आज." माझ्याकडे पर्याय न ठेवता तो बोलला..

...मी इतक्या रात्री घराबाहेर चाललो आहे आणि त्यातही रात्री परत येणार नाही हे कळल्यानंतर माझ्या घरात झालेला तमाशा ही एक वेगळी पोस्ट होऊ शकते त्यामुळे तूर्तास ते टाळतो..!

साव्याला मी पुणे एयरपोर्टवरून उचलला. तो बँकॉक-पटाया च्या सफरीवरून आला होता.
"फाईव्ह डेज सिक्स नाईट..मजा करून आलो. अजून २ -४ पोरं होती. बड्या बड्या बापांची..पण चांगल्या घरातली.. धिंगाणा केला.. बँकॉक च्या गल्ल्या न गल्ल्या फिरून आलो! कसल्या आहेत माहितीये?"
त्याच्या राहत्या ठिकाणापर्यंत पोचेपर्यंत  तो मला बँकॉक च्या गोष्टी सांगत होता… चकचकीत एयर पोर्ट, थाई लोकांनी  केलेली प्रगती वगैरे वगैरे.. "नुसत्या पर्यटनावर कुठल्या कुठे पोहोचलाय माहितीये तो देश?" अश्या पद्धतीचे थोडे सवाल जवाब होते :)

घरात पोचल्यानंतर बँकॉक वरून आणलेलं स्कॉचच्या स्वरुपातलं अल्कोहोल ब्यागेतून बाहेर आलं आणि त्याच्या मोक्षस्थानी (म्हणजेच आमच्या पोटात!) जाऊ लागलं… जशी जशी पेग्ज ची संख्या वाढत गेली तशी तशी त्याची गाडी तिथली टापटीप, शिस्त, आतिथ्य, मातृसत्ताक कुटुंब , राजेशाही (आपल्या लोकशाही सारखी), झगमगाट, वगैरे वगैरे वरून  तिथले क्लब्ज, नाईट  लाईफ, मसाज वगैरे वगैरे वर घसरली..
"तीनशे बाहत देऊन फुल बॉडी मसाज करून घेतला, काय मजा आली माहितीये?"
"मला कसं काय माहित असणार?" मी कुतूहलाने विचारलं
"अरे फुल टू धमाल. नंतर 'तसल्या' गल्ल्या बघितल्या"
"तसल्या म्हणजे कसल्या रे?"
"तसल्या रे " मान वाकडी करून मानेला झटके देत आणि भुवया उडवत त्याने सांगितलं
"ओ हो…  तसल्या ?" कल्पनेचा वारू चौखूर उधळवत मी म्हटलं "लिमिट क्रॉस  नाही ना केलंस ?"
"खरतर केलं! आणि त्यासाठीच तुझ्याशी बोलावसं वाटलं… "

इतकावेळ हलकं फुलकं असणार वातावरण अचानक  सिरियस झालं. काही वेळ असाच शांततेत गेला. आम्ही दोघेच होतो.शेंगदाणे आणि वेफर्स च्या कुरुम कुरुम चा आवाजसुद्धा ऐकू येत होता.

त्याच्या लग्नासाठी गेल्या ३-४ वर्षांपासून मुली बघण्याचा/स्वतःला मुलींना दाखवण्याचा कार्यक्रम चालू होता. स्वतःच्या लग्नासाठी चार ठिकाणचे पोहे टेस्ट करायचं भाग्य जरी मला लाभलं नसलं तरी साव्यामुळे मी ते सुख अनुभवू शकलो होतो.साव्याच्या आई वडिलांना प्रत्येकवेळी येणं  शक्य नसे त्यामुळे "बघण्याचा कार्यक्रम"  मुलीच्या घरीच असेल तर कधी त्याचा मामेभाऊ तर कधी मावस भाऊ वगैरे बनून मी जात असे. बाहेर असेल तर मित्र म्हणूनच. पण साव्या आणि मुली मधलं तंग वातावरण जरा निवळवून दोघांना कम्फर्टेबल फील करवून देण्याचा माझा जॉब  असे.

"वैतागलोय यार मी आता… आता लग्नच नाही करणार! " साव्या  बोलत होता. दारूच्या नशेत सुद्धा तो नेहमीच सेन्सिबल बोलत असे. मी गप्प राहिलो.
"का करावं  लग्न?" माझ्याकडे तरी या प्रश्नाला उत्तर नव्हतं.
"नुसती शरीराची भूकच महत्वाची असते का? बाकीच्या गोष्टींना काहीच महत्व नाही का रे आपल्या समाजात?"
"..."
" तुला माहितीये, नेहमीच मी एका अशा मुलीच्या शोधात आहे जी खरोखर माझी बायको व्हायला लायक असेल"

"हे वाक्य मी खूपवेळा ऐकलंय. कधी त्याच्या अर्थ समजावून द्यायचा प्रयत्न केलास? निदान मलातरी?" मी विचारलं..  " सगळ्यांना आपली बायको ऐश्वर्या राय सारखीच दिसणारी हवी असते, पण आपण अभिषेक बच्चन सारखे दिसत नाही, सलमान सारखे पिळदार शरीराचे नाही गेलाबाजार विवेक ओबेरॉय सारखे चॉकलेट हिरो नाही याची कोणाला जाणीवच नसते! " मी  पुढे म्हणालो..  "खूप प्रयत्न करून तुम्ही ब्युटीफुल ड्रीम गर्ल शोधली तरी ती हँडसम  ड्रीम बॉय च्या शोधात असेल तर?"

"ही तुझी विधानं मला लागू होताहेत का?" तो म्हणाला
"मी जेनेरिक स्टेटमेन्ट केलं. आताच्या तरुण मुलांच्या बाबतीत… "
" आतापर्यंत फक्त फोटो बघून मुलगी बघायला गेलोय असं  एखादं तरी उदाहरण देशील मला?" मला तोडत तो म्हणाला. कदाचित नसावा! नाहीतर हे वाक्य तो इतक्या कॉनफिडन्टली बोलला नसता!
"उलटपक्षी मुलींच्या अपेक्षाच इतक्या वाढल्या आहेत कि तुझं ते ऐश्वर्या राय चं उदाहरण त्यांना ऐकवायला हवं !!" छद्मी हसत तो म्हणाला!

"ती सुभद्रा आठवते तुला?"
"नाही"
"ती रे सॉफ्टवेअर जॉब  वाली. सुभद्रा म्हणजे... "
"हां… हो आय बी एम मध्ये होती ती ना? सुभद्रा हॉटेलात भेटला होता ना तुम्ही? म्हणून सुभद्रा होय.. आठवते आठवते.. "
"हो… तीच! ती पोरगी काय म्हणाली माहितीये ना? माझा पगार अमुक एक लाख आहे मला तमुक लाख वाला मुलगा पाहिजे"
" अरे पुढे जाऊन इगो प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून ती म्हणाली असेल. तेव्हा 'हट!  नाही तर नाही' अशा भाषेत  तू उडवून लावलं  होतंस. "
"मग काय करू यार? मी तसला  आहे का ? माझा पगार तिच्यापेक्षा कमी म्हणून वाईट वाटून घेणारा? अरे मी आता पहिल्या फेज मध्ये आहे. माझ्या बिझनेस मध्ये माहित आहे ना ग्रोथ कसली आहे ती ?"
"अरे, पण या सगळ्या गोष्टी तिला सांगायच्यास  ना? "
"तिला कळायला नको? सरळ पैशाची फुटपट्टी वापरून मुलगा नाकारणारी मुलगी काय संसार करणार? एखाद्या वर्षी मला लॉस  झाला तर साली मला सावरायच्या ऐवजी मलाच दोष देईल असली पोरगी…"
"…"
"सॉरी  फॉर  that 'साली' "
"इट्स  ओके… पण मला सांग आपण ते 'पांचाली'  मध्ये गेलो होतो ते? ती मुलगी ? ती तर तूच नाकारलीस.   मला तेव्हापासून बोलला नाहीस तू काय कारण होतं ते!"
"हां  यार… ती 'पांचाली' " साव्या हसला "तिला मी विचारलं कि मुलाबद्दल तुझ्या अपेक्षा काय आहेत तर मला म्हणे 'मी बीई  केलं आहे त्यामुळे मला एम ई  किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा हवा… आई बाबा म्हणाले म्हणून मी आले आज. नाहीतर मला इंजिनियर किंवा एम ई मुलगा बघायचा होता… damn  दीज इंजिनियर्स " साव्याने एका झटक्यात 'बॉटम्स अप' मारला…

मला गिल्टी वाटलं…

" तू काही  म्हणाला नाहीस का तिला?"
"म्हणालो ना…. म्हटलं माझ्या बघण्यात जितके इंजिनियर मित्र आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्यांना नोक-या मिळत नाहीत ते लोक एम ई करतात. जे हुशार आहेत ते आयदर एमटेक  करतात किंवा एमएस, एमबीए असलं काहीतरी करतात अदरवाईज त्यांना कुठलीतरी कंपनी उचलतेच…"
"मग?"
"मग काय ? तिने असला विचारच केला नव्हता! मी तिला पुढे म्हटलं तुझ्या त्या कित्येक एम ई लोकांपेक्षा जास्त पगार कमावतो मी महिन्याला… बरोबर ना?"
"हो अर्थात.. पण मग पुढे ?"
"ती गांगरली . गडबडली. मग मीच म्हटलं तुमच्या पुढच्या शोध कार्यासाठी शुभेच्छा. बिल मागवून ते देईपर्यंत तिला एक शब्द सुद्धा सुचला नाही"
"कमाल आहे. काहीच बोलली नाही ती?"
"काय बोलणार? अरे ओळखीने कुठल्यातरी कंपनीत चिकटून खर्डेघाशी करूनही, मुलाबद्दल मात्र असल्या अपेक्षा ठेवणारी मुलगी आयुष्यात काही करेल ही अपेक्षाच बाळगणं व्यर्थ आहे."

मी शांत बसलो.. खरी होती त्याची गोष्ट.
आम्ही एका ठिकाणी मुलगी बघायला गेलो होतो. मुलीपेक्षा वडिलांचेच प्रश्न. "पगार किती, घरी कोण कोण असतं वगैरे नंतर त्यांनी विचारलं पुण्यात घर वगैरे विकत घेतलंय का? "
साव्याने शांतपणे नकारार्थी मान हलवली. " मी भाड्याने राहतो.. विनाकारण एवढी गुंतवणूक एकट्याने करून मी स्वतःचे आर्थिक हाल आणि ओढाताण का करून घेऊ?" हे त्याचं स्पष्टीकरण त्यांना रुचलं नसावं.
"स्वतःचं घर हवं हो आजकाल लग्न करायचं असेल तर.."
"तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं घर होतं का हो?"

उत्तरार्ध