सोमवार, ८ जुलै, २०१३

संस्कृत=करंबेळकर मॅडम


कमी वेळात इतरांच्या मनात स्थान निर्माण करण्याची कला फार कमी जणांना अवगत असते. आमच्या करंबेळकर मॅडम निर्विवाद्पणे त्यापैकी एक.इयत्ता आठवी ते दहावी एवढ्या तीन वर्षात त्यांनी शाळेच्या दहा वर्षात एखादा शिक्षक पाडू शकला नसता एवढा प्रभाव आमच्यावर पाडला.

करंबेळकर मॅडम जरी जुन्या लोकांमध्ये पी ई आणि मराठीसाठी फेमस असल्या तरी सातवी मधल्या मार्कांच्या आधारावर आठवीमध्ये पूर्ण संस्कृतची तुकडी तयार झाली तेव्हाच त्यांच्याशी आमचा संपर्क आला.पण त्यांच्याबद्दल ब-याच आख्यायिका ऐकल्या होत्या. उंचीने कमी असल्या तरी गडबड करणा-या उंच मुलांना उडी मारून किंवा खुर्चीवर चढून त्यांची कानशिलं शेकवून, त्यांनी कसं वठणीवर आणलं होतं, त्याच्या सुरस कथा रंगवून रंगवून सांगितल्या जात. वर्णन सांगताना प्रत्येकजण आपला मीठ मसाला घालून ते अधिक रंजक कसं होईल याची काळजी घेत असे.त्यामुळे आमच्यासाठी तरी एक ’कडक शिक्षिका” अशी त्यांची ख्याती होती.

आठवीमध्ये गेल्यावर जेव्हा एका छोट्या खोलीत संस्कृतचे वर्ग सुरु झाले तेव्हा मॅडम वर्गावर आल्या.त्यापण आपल्यासारखंच छोटेखानी पुस्तक घेउन! अभ्यासक्रमाचं सोडून इतर पुस्तक घेउन वर्गात प्रवेश करणा-या त्या पहिल्याच शिक्षिका.अर्थात,ती होती ’शब्दधातुरुपावली’.. संस्कृतच्या शब्दांची निरनिराळी रूपं ,विभक्ती,प्रत्यय वगैरे पूर्ण ऐवज त्यात खचाखच भरला होता.या पुस्तकाने संस्कृतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला साथ दिली असेल असं म्ह्टलं तर ते वावगं ठरणार नाही.फ़क्त अभ्यासक्रम आहे म्हणून न शिकविता संस्कृत एक भाषा म्हणून शिकवण्याकडे करंबेळकर मॅडमचा कल होता.पण खरंच त्यांचा दरारा होता.एकतर वर्गातली मुलं ब-यापैकी हुशार या कॅटेगरीत मोडणारी असत,वरुन संख्यापण अगदी लिमिटेड असे त्यामुळे त्यांच्या तासाला दंगा चालू आहे असं चित्र सापडणं दुरापास्तच.

आल्या आल्या त्यांनी आम्हाला ’शब्दधातुरुपावली’घ्यायला सांगितली. त्यानंतर सुरु झाले आमचे संस्कृतचे वर्ग. सुरुवातीला त्यांनी आम्हाला सुभाषितमाला शिकवली.एखादा विषय शिकवायचा म्हणजे त्यातलं इन्साईड आउट माहित असलं पाहिजे असं त्यांचं धोरण होतं. त्यांना कोणतीही शंका विचारली की त्या अगदी तपशिलवार त्याचं निरसन करीत.त्यांचा भाषाशुद्धीवर प्रचंड भर होता.’श’आणि ’ष’यातला फरक, जहाज मधला ’ज’आणि जीवन मधला ’ज’, चमच्यातला च आणि चिमट्यातला’च’असे भाषेचे अनेक बारकावे त्या उलगडून सांगत.त्यानंतर कित्येकदा डिक्टेशनमधे मॅडम च्या नुसत्या उच्चारावरून आम्हाला -हस्व किंवा दीर्घ वेलांटी,उकार समजत असत.

एकदा शीघ्रकवी कालिदासाला राजाने ठंठंठठंठंठठठंठठंठ: हा शब्द दिला त्याने आपल्या प्रतिभेने तो कवितेत बसवला अशा अर्थाची एक कथा आम्हाला होती. जेव्हा मी हा शब्द पहिल्यांदा वाचला तेव्हा माझी तुमच्यासारखीच अवस्था झाली होती. परंतु करंबेळकर मॅडमनी त्याचं विभाजन करुन तो अश्या पद्धतीने शिकवला कि अजुनही मला ते वाक्य जसंच्या तसं आठवतं.
सोपानमार्गे करोति शब्दं..ठंठं-ठ-ठंठं-ठठ-ठंठ-ठंठ:!

सुभाषितमाला शिकवल्यानंतर ती मोठ्याने समूहाने म्हणण्याचा प्रघात त्यांनी घालून दिला होता. एकतर रोजच्या सरावामुळे सगळ्यांचे पाठांतर होईल आणि मुख्य म्हणजे एक वर्ग संपून दुसरा वर्ग सुरु होईपर्यंतचा मुलांकडे असणारा दंगा घालण्याचा हक्काचा वेळ सत्कारणी लागेल हे दोन हेतू त्या मनात बाळगून असाव्यात.
साहित्यसंगितकलाविहिन: साक्षात्पशु:पुच्छविषाणहीन:।
तृणन्नखादन्नपि जीवमान: तत भागदेयं परमं पशुनाम॥ यासारखं लांबलचक सुभाषित त्यांनी आम्हाला
भविष्य मेनू  आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान।
पंचांग सोपे सुमंगल स्वभावे, भिंतीवरी कालनिर्णय असावे.. या चालीवर शिकवून एकदम सोपं करुन टाकलं इतकं कि कधी त्याचा अर्थ : "साहित्य,संगीत,कलेची आवड नसणारा (मनुष्य) हा शेपूट नसणारा प्रत्यक्ष पशू होय, तो जगण्यासाठी गवत खात नाही हे तर खरोखर पशूंचं भाग्य आहे " असा लिहितानाही विचार करावा लागला नाही किंवा अंगी बाणवतानाही!
आजही काही सुभाषितांचे नुसते सुरुवातीचे शब्द कोणी म्हटले तर पूर्ण सुभाषित आपसूक तोंडातून बाहेर पडतं.

’मॅडम कडक होत्या’हे सुरुवातीचं माझं विधान खोटं मात्र नक्कीच नव्हतं.आठवीपर्यंत आम्ही व्याकरण शिकत असू परंतु त्यांच्याच तासाला आम्ही व्याकरण चालवायला शिकलो! (एखाद्या शब्दाची विभक्ती प्रत्यय असणारी एकवचन, द्विवचन आणि बहुवचन अशी रुपं म्हणणे म्हणजे त्या शब्दाचं व्याकरण चालवणं) करंबेळकर मॅडमनी ’राम चालवा’ असं फ़र्मान सोडलं कि’रामा’सारख्या अयोध्येच्या राजाला करंबेळकर मॅडम च्या दरबारात सगळी शस्त्रं म्यान करून गपगुमान चालावं लागत असे.संस्कृतची मुलं-मुली त्याला ’अकारान्त पुल्लिंगी शब्द” एव्हढाच मान देत असत आणि प्रत्येक तासाला  "रामहा रामौ रामाहा प्रथमा...."असं म्हणून, वनवासात सोसावा लागला नसेल एवढा त्रास त्या बिचा-या रामाला देत असत. ’नदी’ वास्तविक जीवनात कितीही खळाळत वाहत का असेना मॅडम च्या तासाला तीही ’ईकारान्त स्त्रीलिंगी शब्द’बनून न 'वाहता' निमूटपणे 'चालत'च  असे!

विराम चिन्हांचं आणि शुद्धलेखनाचं  महत्व अर्ध्या अर्ध्या मार्कांनी मॅडमनी पटवलं म्हणून आजही 'पाणी' आणि 'पाणि' मधली वेलांटी शब्दांचे अर्थ बदलते हे कळलं. जेव्हा आनी , पानी  अशा भाषेत इतर कोणी बोलतं तेव्हा त्यांची कीव येते आणि त्यांना  करंबेळकर मॅडम  सारख्या शिक्षिका मिळाल्या नाहीत याचं वाईट वाटतं!

आमची नववी संपत आलेली असताना मॅडम रिटायर्ड होणार अशी चर्चा सुरु झाली होती. मी मधल्या सुट्टीत  त्यांना गाठून त्या आमची दहावी होईपर्यंत रिटायर्ड होणार नाहीत ना याची खातरजमा करून घेतली. आता  मॅडम रिटायर्ड झाल्या म्हणून आमची शाळा दहावीच्या संस्कृत च्या मुलांना वा-यावर नक्कीच सोडणार नव्हती परंतु "संस्कृत = करंबेळकर मॅडम"  हे समीकरण डोक्यातून जाणं,  एक वर्षात नक्कीच शक्य नव्हतं.

आज शाळा सोडून जवळपास एक तप उलटलंय..........
.............पण अजूनही तेच समीकरण डोक्यात तसंच फिट्ट  आहे!!

मंगळवार, ७ मे, २०१३

मी दुःख मागेन तेव्हा..

पार्श्वभूमी : असाध्य विकाराने ग्रासलेल्या एका गरीब तरुणाच्या प्रेमात एक सुंदर तरुणी पडते. कोणताही मोह, अभिलाषा मनात न बाळगता.  'आपलं आयुष्य काही फार नाही' याची त्या तरुणाला जाणीव असते. ती आपल्यावर जे जीवापाड प्रेम करतेय, ते चूक कि बरोबर हे त्याला उमजत नाही ,उमगत नाही…
'त्या'च्या नजरेतून त्याचा  आजार , आयुष्य आणि 'ती' !! 
---------------------------------------------------------------------------------------------------------

मी दुःख मागेन तेव्हा..
तू आनंदाचा जल्लोष उडवत चालली असशील..
मी गंध मागेन तेव्हा..
तू उमलू पाहणा-या कळया घेउन उभी असशील...

प्रकाशाच्या फ़ुटत्या गोळ्याचा रोख दाखव म्हणतो तेव्हा तू..
अंधाराचं वस्त्र लपेटून गच्च उभी असशील..
दीप्तीचा मार्ग तर्जनी दाखवत असेल तेव्हा..
तुझी मध्यमा काळाच्या कराल दाढा दाखवत असेल..

मी एकटाच चाललो असेन अंधारात..
नको म्हणत कुणाची संगत साथ..
तेव्हा तू माझ्या मागून माझंच एकलेपण कवटाळत येत असशील..

मी दुःख मागेन तेव्हा 'तू' ..
दुःखाचा रिकामा कलश सांभाळत उभी असशील..
मी गंध मागेन तेव्हा 'तू'..
उमलून सुकलेली फ़ुलं घेउन उभी असशील..

मी दुःख मागेन तेव्हा... 

--दीपक परब

मंगळवार, २६ मार्च, २०१३

कोणा वांगडा कशी करू संसाराची साथ


कोणा वांगडा कशी करू संसाराची साथ
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात ।।

आंब्या वयल्यान चढान तुया तोरा दिल्लंस पाडून ।
माडा वयल्यान चढान तुया शेळी दिल्लंस काढून ।।
कोणाच्या शेल्याक कशी बांधू आता पदरगाठ ।
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात ।।

पुळणी वयल्यान फिरत तुया म्हणस गोड गाणी ।
वांगडा इलय नाय तर तुझ्या डोळ्याक येय पाणी ॥
आता कसो इसारलंस नी सोडूक सांगतंस साथ ।
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात ।।

पोरांची काळजा म्हणजे आसा खोल डबरो ।
तेतूर दिसता जेचा रूप तोच तेचो नवरो ॥
तुयाच सांगलंस आणि आता फिरवतंहस पाठ ।
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात ।।

मिया जातंय तुझी माया तुका लखलाभ ।
जाग्यार पडल्या धोंड्यापासून होवचो नाय लाभ ॥
इचारल्यान जर कोणी सांग मेला अकस्मात ॥
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात...

---दीपक परब ३० जून १९७७
-----------------------------------------------------------
स्वैर भाषांतरित शब्दार्थ :
वांगडा : सोबत
तोरा : कैरी
शेळी  : शहाळी
डबरो  : खड्डा

मंगळवार, १२ मार्च, २०१३

टीव्ही आणि प्रत्यक्ष

जिलेट ची आई : बेटे, (शेविंग क्रीम ची) एक ट्यूब काफी है ?
जिलेट : हाँ माँ .. एक ट्यूब महीनों चलती है ।

खरा मुलगा : ए आई, तुला यातलं काय कळतं का?
_____________________________________________________________

पियर्स ची आई : हे काय आहे?
पियर्स : उन!!
पियर्स ची आई : उन ? (गायला लागते ) याय याय याय .. इथे तिथे...सांगा सांगा सांगा..लपवायचं कुठे ??

खरी आई : उन ? (हसायला लागते) कुठे शिकलीस हे वेडे चाळे ?
______________________________________________________________

फ़ेअर and लव्हली (विंटर) ची मैत्रीण : (कोल्ड क्रीम घेऊन फ़ेअर and लव्हली मागे धावत ) ए हे लाव ना..आधी तर थंडीमध्ये हेच लावायचीस.. आता का नको?
फ़ेअर and लव्हली (विंटर) : आता नाही.. आता माझ्याकडे आहे फ़ेअर and लव्हली विंटर क्रीम

खरी मुलगी : तुला काय करायचंय? नाय लावायचं म्हटलं ना एकदा? आणि आता हे मागे धावणं बंद कर,.. बरं नाही दिसत ते.. लोक उगीच आपल्यावर संशय घेतील!
_______________________________________________________________
क्लोज अप मुलगा : (तोंडातून उच्छवास सोडत ) हा SSS ... पास आओ... पास आओ..
क्लोज अपची मैत्रीण : (वासाने धुंद होउन डोळे वगैरे मिटून घेते.. आणि त्याच्याबरोबर नाचायला लागते..)

खरी मैत्रीण : ' ए तोंड धुऊन आला नाहीस का स्वच्छ ? अजून पण पेस्ट चा वास येतोय!! यक्क !!
________________________________________________________________
बोर्नव्हीटा : दुधात बोर्नव्हीटा घाला यामुळे (आईकडे बघतो)
बोर्नव्हीटा ची आई : .. (अगतिकपणे) दुधातलं कॅल्शियम वेस्ट नाही होत..

खरी आई : (रागावून) आता तू मला शिकवणार? गुपचूप पी दिलंय तसं दुध.. थंड झालं तर परत गरम नाही करणार..
________________________________________________________________

फ़ेअर and लव्हली (फेयरनेस ट्रीटमेंट ) : एक दोन तीन.. झाली फेयरनेस ट्रीटमेंट.. पुढची appointment कधी?
फ़ेअर and लव्हली (फेयरनेस ट्रीटमेंट ) ची मैत्रीण : (ट्यूब हातात नाचवत )आता पुढची appointment माझ्या घरी..
फ़ेअर and लव्हली (फेयरनेस ट्रीटमेंट ) : (लाडीकपणे) ए.. परत दे परत दे..

खरी मुलगी : ए भवाने.. एकदा वापरायला दिली म्हणून लंपास करतेस कि काय .. हवी असली तर विकत आण.. कित्ती महाग आहे माहितीये?
_________________________________________________________________
रेड लेबल चे आजोबा : तू 'आह आह' (डंबेल्स उचलतानाचा आवाज ) करून तब्येत बनवतोस आणि मी 'आह आह' (चहा पितानाचा आवाज ) करून..
रेड लेबल : कसं काय ?
रेड लेबल ची आई : या चहा मध्ये आहे तुळशी आणि अमुक तमुक..
रेड लेबल : (आश्चर्याने) हो का?

खरा मुलगा : ओ आजोबा.. कैपण कै ? सिक्स प्याक बनवायचे म्हणून जास्त चहा प्याल आणि डायबेटीस व्हायचा. आणि ए आई, ऐकून घेतो म्हणून कैपण सांगशील का? आणि नसत्या सवयी लावू नको तू सगळ्यांना!
__________________________________________________________________

सर्फ एक्सल : लिंबू ब्लू ब्लीच द्या..
सर्फ एक्सल विक्रेती : आता आईला सांग याची काही गरज नाही .. सर्फ एक्सल वापर..

खरी विक्रेती : तुझं वय किती... तू बोलतो किती.. आं ? एकाच दुकानात हे सगळं मिळतं का?
_________________________________________________________________
हार्पिक गृहिणी : अय्या! हुसेन SSS !!
हार्पिक विक्रेता : तुमची जीभ नाकाला लागते का ? तुमच्या टॉयलेट मध्ये अशा काही जागा असतात जिथे सामान्य टॉयलेट क्लिनर पोचू शकत नाहीत..
हार्पिक गृहिणी : (जीभ नाकाला लावण्याचा निष्फळ प्रयत्न करते)

खरी गृहिणी : बरं मग? पहिल्या प्रश्नाचा आणि नंतरच्या उत्तराचा अर्थार्थी काय संबंध ? मला तर बाई वाटलं तू आता जिभेने टॉयलेट साफ करायचं असं काही बोलतो कि काय ? आणि काय रे? नेमका जेवायच्या वेळेला तू का घेऊन येतो हे हार्पिक ?
____________________________________________________________________
मोठी बोर्नव्हीटा : पण कॅल्शियम साठी काय करतेस ?
मोठ्या बोर्नव्हीटा ची मैत्रीण : दुध देते..
मोठी बोर्नव्हीटा : पण कॅल्शियम साठी काय करतेस ?
मोठ्या बोर्नव्हीटा ची मैत्रीण : दुध देते ना ..
मोठी बोर्नव्हीटा : पण कॅल्शियम साठी काय करतेस ?
मोठ्या बोर्नव्हीटा ची मैत्रीण : आताच सांगितलं ना दुध देते म्हणून?

खरी मैत्रीण : ए तू जरा मंद आहेस का कि तुला ऐकू येत नाही? एकच प्रश्न शंभरदा काय विचारतेस? एकदा सांगितलेलं कळत नाय का? म्याड!!
______________________________________________________________________
कोलगेट : हाय बेटा !
कोलगेट ची मुलगी : हाय बाबा, (सफरचंदासदृश काहीतरी खाते. हिरड्यातून येणारं रक्त बापाला दाखवत) बाबा , हे बघा!
कोलगेट : हि नवीन कोलगेट-अमुक अमुक टूथपेस्ट वापर.. (तेच सफरचंदासदृश काहीतरी खाउन दाखवतो) हे बघ..
कोलगेट ची मुलगी : ओह। Thank you बाबा !! (निघून जाते)

खरी मुलगी : म्हणजे ? बाबा, तुम्ही घरात आमच्यापासून लपवून वेगळी टूथपेस्ट वापरता ? थांबा… आता आईलाच सांगते तुमचं नाव !
______________________________________________________________________
सर्फचे आजोबा : आम्ही लवकर परत येऊ… माझे बूट कुठे सापडत नाहीत.
सर्फ : (बूट शोधून काढून , त्यावर पॉलीश चोपडून आजोबाना देतो.) हे घ्या आजोबा.
सर्फचे आजोबा : अरे!! याच्या हातात तर जादू आहे.
सर्फची आजी : (सुनेकडे बघत ) पण याने तुझ्या हातांचं काम वाढवलं.
सर्फची आई : ठीक आहे आई. नवीन सर्फ मध्ये आहे दहा हातांची शक्ती.. जी देते अमुक तमुक अलाणं फलाणं !!

खरी आई : बघा ना! हात माझे मोडून येतात. अकलेच्या नावाने बोंब आहे या पोराची नुसती!! धपाक sss धपाकsss (धपाट्यांचा आवाज ) नव्या शर्टाची वाट लावली. पुढे जाऊन बूटपॉलिश चा धंदा करायची लक्षणं दिसताहेत कार्ट्याची.. धपाक sss धपाकsss( भ्यां ssss पोराच्या रडण्याचा आवाज--आजी आजोबांची गुपचूप कल्टी--वगैरे वगैरे !! )

मंगळवार, ५ मार्च, २०१३

तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी..तारका म्हणाली हसून तुज ना भीती ?
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

त्या कळ्या फ़ुले अन वेली तुझ्या धरतीवर।
ती प्रभात संध्या निशा नित्य वाटेवर॥
कां फ़ुकाच करशी मजवर नाहक प्रीती ।
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

ती साग्रसंगीता सरीता तुझिया संगे ।
ते लक्ष तंव गिरी डोलती तुझिया रंगे ॥
कां उगीच आर्त ते नमनही माझ्या साठी ।
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

तुज बोलवती ते तरुवरांचे हात ।
ते पक्षी निघाले तुझेच गीत ही गात ॥
तव आशा परी कां फिरते माझ्या भवती।
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

नीत पाहत राहावी पाया खालील माती ।
ही तुझी मानवा रीती आणिक नीती ॥
तू एकलाच कां बदलशील ही भीती ।
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

सोमवार, ४ मार्च, २०१३

बाबांचं लिखाण..

मागच्या पिढ्यांमध्ये सुद्धा कित्येक उस्फुर्त लेखक, सुरस काव्यरचनाकार आहेत.. फक्त सर्वांनाच ब्लॉग सारखं व्यासपीठ मिळू शकलं नाही..माझे बाबा त्यातलेच एक..
त्यांच्या तरुणपणात बिल गेट्स जन्माला यायचा होता. त्यामुळे कम्प्युटर हे एक 'निषिद्ध फळ' होतं.
कामाच्या धबडग्यात, आपल्या काव्य-नाट्य-विनोदाच्या हौशी  त्यांच्या परीने पूर्ण करताना कम्प्युटर 'शिकणं' दुरापास्तच झालं त्यांच्यासाठी..
पण केवळ त्यामुळे त्याचं लिखाण अप्रकाशित राहू नये असं मला वाटत होतं. म्हणून याच ब्लॉगवर प्रकाशित करत आहे.. माझ्या बाबांचं लिखाण… लवकरच… 

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

प्रेमाची (नवीन, टवटवीत आणि वेगळी) गोष्ट!!

चित्रपटसृष्टीत काही नावं उदाहरणार्थ राजकुमार हिरानी, आमिर खान, सतीश राजवाडे , अतुल कुलकर्णी वगैरे अशी असतात कि डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवावा आणि पैसे खर्च करून सिनेमाला जावं.. हमखास वसुली होण्याची हमी आणि चुकुनमाकून भ्रमनिरास झालाच तर अगदीच 'पैसे वाया गेले' असं म्हणण्याइतपत तरी दुःख होत नाही.. .. मात्र 'प्रेमाची गोष्ट' तुमचे पैसे वसूल करते हे नक्की!

आता सिनेमा म्हटला कि अवखळ नायिका आणि क्युट नायक यांची प्रेमकथा. बहुतेकदा 'पुरी दुनिया के कोई भी ताकत के साथ लडके झगडके ' वगैरे वगैरे नायिका नायकाला मिळते आणि सिनेमा संपतो.. प्रेमकथा संपते.. प्रेमाची गोष्ट संपते आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सुरु होते.. लग्न या विषयामध्ये फारसं रंजक काही नसावं त्यामुळे लग्न झालं कि नायक नायिकेमधलं हलकं फुलकं, खेळीमेळीच नातं लोप पावतं आणि पडद्यावर दाखवण्याइतकं काही नसतं या समजामुळे बरेचसे सिनेमे तिथेच संपत असावेत..

पण जिथे नेहमीचे सिनेमे संपतात अगदी तिथूनच 'प्रेमाची गोष्ट' सुरु होते.. 'डिवोर्सी'ज हे हलक्याफुलक्या प्रेमकथेचे नायक-नायिका होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं पण हा सिनेमा हा समज खोटा ठरवतो. फेल गेलेले लग्न जुळवून ठेवण्याची पराकाष्ठा करणारा नायक आणि लग्न टिकवण्यासाठी दोन वेळा प्रयत्न करूनही यश न मिळाल्यामुळे 'आपलं काय चुकलं' याचा शोध घेणारी नायिका यांची कौन्सिलर ऑफिसमध्ये (अगदीच चुकीच्या पद्धतीने) भेट होते आणि तिथून चित्रपटाची सुरुवात होते.

काही जोड्या मुळातच एकमेकांसाठी बनलेल्या नसतात.. पण नायकाला हे पटत नसतं आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना (इव्हन प्रेक्षकांना) हे उमजत असतं. मुळात लेखक असणारा नायक त्याच्या प्रतिभेने नवनवीन वाक्यं तयार करून त्याचा मुद्दा मांडू पाहत असतो आणि इतर लोक त्याला वास्तव जीवनात राहून , प्रत्यक्ष आयुष्याचे धडे शिकवत असतात.. ओघाओघानेच चित्रपटाची नायिका सेक्रेटरी म्हणून लेखकाच्या जीवनात येते आणि अप्रत्यक्षपणे ते एकमेकांमध्ये गुंतत जातात.. संपूर्ण चित्रपटात हा गुंता अजून वाढत जातो आणि शेवटच्या क्षणाला तितक्याच हळूवारपणे सोडवलाही जातो...

हि सहजता संपूर्ण चित्रपटभर आपल्याला दिसत राहते.. ' दोघेही घटस्फोटीत.. च्यायला म्हणजे बौद्धिकं असणार. सिरियस असणार सगळं' असा सुरुवातीला होणारा ग्रह किती फोल आहे याचा प्रत्यय जसजसा पिक्चर पुढे सरकत जातो तसतसा आपल्याला येत जातो. प्रेमात पडल्यावरही त्याची कबुली स्पष्टपणे द्यायचा गोंधळ.. लिहित असलेल्या स्क्रीनप्लेच्या माध्यमातून आपली मतं पटवून द्यायची नायक नायिकेची धडपड, दोघांचेही पार्टनर्स असताना त्यांना भेटल्यावर होणारी तगमग अतिशय यथार्थपणे पडद्यावर चितारण्यात आली आहे.

बरं फक्त लग्न, घटस्फोट आणि त्या अनुषंगाने तोच तो विषय चघळून चघळून त्यातला इंटरेस्ट निघून जाणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे हे विशेष. लेखक असलेल्या नायकाच्या तोंडी असलेले 'कितीही मोठा लेखक असला तरी कोरा कागद समोर आला कि मन बधिर होतंच'  किंवा
'सिनेमा म्हणजे काय गं ? आपल्या आजूबाजूच्या घटना...'
'देवाचा प्रत्यय तेव्हाच येतो जेव्हा तुमची त्याच्यावर गाढ श्रद्धा असते' असे संवाद आपले वाटून जातात..
'हे सिनेमावाले इमोशनल सीन इतके मेलोड्रामाटिक करतात कि आपल्याला रडण्याऐवजी हसू येतं आणि विनोदी सीनला जणू डोक्यावर बंदूक ठेवून 'हसा' म्हणतात'
'तूच म्हणायचास ना , कि ती तुझी बायको झाली पण मैत्रीण नाही होऊ शकली.'
'लग्न म्हणजे प्रोडक्ट नव्हे एक्सपायरी डेट असायला..'
'जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात आणि तरीही जुळवायचंच म्हटलं तर संसार होतो.. सहवास नाही' अथवा 'भांडण करून, नाती तोडून, वेगळं होऊन प्रश्न सुटत नाहीत' अशासारखे संवाद विचार करायला लावतात. (कदाचित संदर्भ नसल्यामुळे इथे वाचताना त्यांचा अर्थ लागणार नाही पण सिनेमा बघताना नक्कीच कळेल..)

'अतुल कुलकर्णीने नायक अगदी ताकदीने उभारला आहे' वगैरे कोणीही म्हणणं म्हणजे काजव्याने सूर्याची प्रतिभा जोखण्यासारखं आहे .. प्रचंड कॅलिबरच्या या अभिनेत्याने निर्विवादपणे अपेक्षांची पूर्ती केली आहे.. भूमिकेच्या, कथानकाच्या, दिग्दर्शकाच्या आणि प्रेक्षकांच्याही !! सागरिका घाटगेला पदार्पणातच सतीश सारखा दिग्दर्शक आणि अतुल सारखा सहकलाकार लाभला हे तिचं (आणि आपलंही ) भाग्य.. तिच्या फ्रेश आणि टवटवीत लूक मुळे अख्खा मूवी रीफ्रेशिंग होतो हे सुद्धा नाकारून चालणार नाही.. रोहिणी हट्टंगडीने मराठमोळ्या घराघरातून दिसणारी आई सर्वार्थाने साकारली आहे पण सासू म्हणून तिच्या इतका समजूतदारपणा फार कमी सापडेल.. :) सतीश राजवाडे हा उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या जोडीने उत्तम अभिनेता आहे हे ही दिसतं.. थोडक्यात सगळेच कलाकार आपल्या भूमिका जगले आहेत.

'ओल्या सांजवेळी' सारखं मुळातच सुंदर शब्दरचना असणारं गीत स्वप्नील आणि बेलाने आपल्या सुरेल आवाजाने जिवंत केलं आहे. कैलाश खेरनं देखील सागरिका घाटगेसारखी मराठीतल्या पदार्पणातच दमदार सेन्चुरी मारली आहे.. एकंदर म्युझिक आणि गाणी संपूर्ण चित्रपटात कुठेही उपरी वाटत नाहीत. आणि नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रायोजकांच मन न मोडता चित्रपटात केलेली एका प्रोडक्ट ची जाहिरात! यासाठी दिग्दर्शकाला मनापासून दाद द्यावीशी वाटते! ('आम्ही सातपुते' वाला सचिन पिळगावकर यातून नक्कीच काही 'आयडीयेची कल्पना' घेईल अशी भाबडी आशा!!)

तर अशी ही 'प्रेमाची गोष्ट'! प्रोमोजमध्ये  म्हटल्याप्रमाणे सहज,साधी,सोपी नसली तरी सुंदर आणि हळुवार तरी नक्कीच. सिनेमागृहातून बाहेर पडताना तुम्हाला अपेक्षित संदेश मिळत नसेल कदाचित पण एक समाधान मिळतं आणि तुमच्या असलेल्या / नसलेल्या लाईफ पार्टनरसाठी गुणगुणायला एक सुंदर गाणं..
"ओल्या सांजवेळी..उन्हे सावलीस बिलगावी..तशी तू जवळी ये जरा..
को-या कागदाची कविता अन जशी व्हावी.. तशी तू हलके बोल ना..."