कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ७ मे, २०१३

मी दुःख मागेन तेव्हा..

पार्श्वभूमी : असाध्य विकाराने ग्रासलेल्या एका गरीब तरुणाच्या प्रेमात एक सुंदर तरुणी पडते. कोणताही मोह, अभिलाषा मनात न बाळगता.  'आपलं आयुष्य काही फार नाही' याची त्या तरुणाला जाणीव असते. ती आपल्यावर जे जीवापाड प्रेम करतेय, ते चूक कि बरोबर हे त्याला उमजत नाही ,उमगत नाही…
'त्या'च्या नजरेतून त्याचा  आजार , आयुष्य आणि 'ती' !! 
---------------------------------------------------------------------------------------------------------

मी दुःख मागेन तेव्हा..
तू आनंदाचा जल्लोष उडवत चालली असशील..
मी गंध मागेन तेव्हा..
तू उमलू पाहणा-या कळया घेउन उभी असशील...

प्रकाशाच्या फ़ुटत्या गोळ्याचा रोख दाखव म्हणतो तेव्हा तू..
अंधाराचं वस्त्र लपेटून गच्च उभी असशील..
दीप्तीचा मार्ग तर्जनी दाखवत असेल तेव्हा..
तुझी मध्यमा काळाच्या कराल दाढा दाखवत असेल..

मी एकटाच चाललो असेन अंधारात..
नको म्हणत कुणाची संगत साथ..
तेव्हा तू माझ्या मागून माझंच एकलेपण कवटाळत येत असशील..

मी दुःख मागेन तेव्हा 'तू' ..
दुःखाचा रिकामा कलश सांभाळत उभी असशील..
मी गंध मागेन तेव्हा 'तू'..
उमलून सुकलेली फ़ुलं घेउन उभी असशील..

मी दुःख मागेन तेव्हा... 

--दीपक परब

मंगळवार, २६ मार्च, २०१३

कोणा वांगडा कशी करू संसाराची साथ


कोणा वांगडा कशी करू संसाराची साथ
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात ।।

आंब्या वयल्यान चढान तुया तोरा दिल्लंस पाडून ।
माडा वयल्यान चढान तुया शेळी दिल्लंस काढून ।।
कोणाच्या शेल्याक कशी बांधू आता पदरगाठ ।
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात ।।

पुळणी वयल्यान फिरत तुया म्हणस गोड गाणी ।
वांगडा इलय नाय तर तुझ्या डोळ्याक येय पाणी ॥
आता कसो इसारलंस नी सोडूक सांगतंस साथ ।
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात ।।

पोरांची काळजा म्हणजे आसा खोल डबरो ।
तेतूर दिसता जेचा रूप तोच तेचो नवरो ॥
तुयाच सांगलंस आणि आता फिरवतंहस पाठ ।
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात ।।

मिया जातंय तुझी माया तुका लखलाभ ।
जाग्यार पडल्या धोंड्यापासून होवचो नाय लाभ ॥
इचारल्यान जर कोणी सांग मेला अकस्मात ॥
ल्हानपणापासून मेल्या दिल्लंस हातात हात...

---दीपक परब ३० जून १९७७
-----------------------------------------------------------
स्वैर भाषांतरित शब्दार्थ :
वांगडा : सोबत
तोरा : कैरी
शेळी  : शहाळी
डबरो  : खड्डा

मंगळवार, ५ मार्च, २०१३

तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी..



तारका म्हणाली हसून तुज ना भीती ?
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

त्या कळ्या फ़ुले अन वेली तुझ्या धरतीवर।
ती प्रभात संध्या निशा नित्य वाटेवर॥
कां फ़ुकाच करशी मजवर नाहक प्रीती ।
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

ती साग्रसंगीता सरीता तुझिया संगे ।
ते लक्ष तंव गिरी डोलती तुझिया रंगे ॥
कां उगीच आर्त ते नमनही माझ्या साठी ।
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

तुज बोलवती ते तरुवरांचे हात ।
ते पक्षी निघाले तुझेच गीत ही गात ॥
तव आशा परी कां फिरते माझ्या भवती।
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

नीत पाहत राहावी पाया खालील माती ।
ही तुझी मानवा रीती आणिक नीती ॥
तू एकलाच कां बदलशील ही भीती ।
तू मानव आम्ही चंद्र लोकीचे साथी ॥

बुधवार, २८ मे, २००८

माझ्या भावना...


तू निघून जातेस तेव्हा
मन नेहमी सैर भैर होतं...
वेटरनं आणून ठेवलेलं बिल
डोळ्यासमोर फेर धरतं...

तू फ़ोन ठेवतेस तेव्हा
एकटेपण खायला उठतं...
फ़ोन बिलाच्या अंदाजानं
काळजात एकदम धस्स होतं...

तुला घरी सोडल्यानंतर
सतत तुझी उणीव भासते...
पेट्रोलच्या किमती खूपच वाढल्यात
याची सारखी जाणीव होते...

तुझ्यासोबत shopping करताना
तुझ्या choiceला दाद देतो ...
credit card ची due date कधी ?
हाच प्रश्न छळत राहतो...

तुझ्या बरोबर असताना
वेळ चटकन निघून जातो...
खर्चाचा ताळमेळ जुळवताना मात्र...
माझा प्राण कंठाशी येतो...

-- तुझाच 'हैराण' अखिलेश !!

शुक्रवार, ७ मार्च, २००८

दाढी....!!

परवाच दाढी करताना चुकून ब्लेडचा अंदाज चुकला!
अन्.. आई गं!! गालावर जखमेचा मोठ्ठा ओरखडाच उठला!!

जखमेच्या व्रणातून हळूहळू रक्त येऊ लागलं होतं!
त्याचवेळी नेमकं माझं आफ्टर शेव संपलं होतं!!

हताशपणे मी येउन आरशासमोर उभा राहिलो..
वाहणारं रक्त पाहण्याचा असफल प्रयत्न करू लागलो..

पण, अहो आश्चर्यम!! रक्तातून चक्क जीन बाहेर आला!
'जो हुकुम मेरे आका' म्हणत कमरेत वाकू लागला!!

मी दचकलो , भानावर आलो आणि त्याला विचारलं..
हे इथून, अन् अचानक येण कसं काय बुवा झालं !?

म्हणे,'तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला देवानंच दिलंय!
तुमची एक इच्छा पूर्ण करायला त्यानं मला पाठवलंय!!'

हे मागू की ते मागू असं मला होऊन गेलं!
काय सांगू तुम्हाला?अहो काय काय मनात येऊन गेलं !!

बंगला मागू ऐटदार, की भली मोठ्ठी गाडी?
की मागू सुंदर बायको, नेसून लफ्फेदार साडी?

सगळयांवरती मिरवायाला थोडी जादा मागू का अक्कल?
जीन्स की शूज? नको; त्यापेक्षा पैसाच मागतो बक्कळ !!

पैसा कितीही सांभाळला तरी चुटकीसरशी सरतो..
त्यापेक्षा एका बड्या कंपनीची ओनरशिपच मागतो..

गोष्टींमध्ये ईसापनीतीच्या तर तीन इच्छा पूर्ण करतात..
माझ्याच बाबतीत मग देवा ,चिक्कूपणा का दाखवलात ?

शेवटी 'ऐसा करो' म्हणत मी जीन कड़े वळलो जेव्हा
जीन नव्हता जागेवर; 'छू' झाला होता केव्हाच!

समजेना काहीच, की हा गायब कुठे झाला?
आता होता इथेच, क्षणात नाहीसा कुठे झाला?

कळलं मला लगेच, की 'I missed my chance'
मिळाली होती संधी तेव्हा केला नाही डान्स!!

माझी विचारशृंखला बराच काळ लांबली होती
तोपर्यंत रक्त सुकून जखमेवर खपली धरली होती!!

जीन गेला, सोबत गेल्या माझ्या स्वप्नातल्या जीन्स
I couldn't get him back by any means!!

म्हणून सांगतो तुम्हाला, ठरवून ठेवा एक इच्छा !!
ब्लेड लागून रक्त येवो,यासाठी माझ्या शुभेच्छा !!

:अखिलेश परब