मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

आर्टी

आर्टी म्हणजे आर टी.. हे त्याचे इनीशीयल्स नव्हते बरं का.. आर टी म्हणजे रोख-ठोक. माणूसच तसा! एकदम सडेतोड. तसा तो पेशाने डॉक्टर. लोक त्याला डॉक्टर म्हणूनच ओळखत आणि हाक ही अशीच मारत.. "ओ डॉक्टरसाहेब!" अशी.. पण मी त्याला आर्टीच म्हणत असे..सावंतवाडीच्या कॉलेजातून बीएएमएस (मुंबई) केलं होतं त्याने. (पूर्वी मुंबई युनिवर्सिटी ही डिग्री द्यायची; हल्ली नाशिक युनिवर्सिटी देते. त्यामुळे कंसात काहीतरी मेन्शन करावं लागतं म्हणे!) मी शाळेत होतो तेव्हा आमच्या नात्यातला एकजण- एक दादा तिथे शिकत होता. त्याचा हा मित्र. त्याच्याबरोबर तो आमच्या घरी यायचा. सुट्टीच्या दिवशी घरचं जेवण जेवायला. घरात लगेच मिक्स होऊन गेला तो. त्या दिवसातसुद्धा संस्कृत आणि इंग्लिश मध्ये लिखाण असणारी मोठी मोठी पुस्तकं,ग्रंथ वाचायचा..आणि मला उपदेशाचे डोस द्यायचा! मला तर आधी वाटायचं, याला हे सगळं त्या संस्कृत श्लोकांमधूनच समजतं कि काय! :) पण नाही!.. ते रसायनच अजब होतं.

आर्टीचं बीएएमएस झाल्यावर त्याने त्याच्या गावात दवाखाना टाकला. तो चांगला चालायलासुद्धा लागला. मग त्याचं आमच्याकडे येणं जवळजवळ थांबलं. पण मग मी माझ्या आजोळी गेलो कि आवर्जून त्याच्याकडे जायला लागलो. दवाखाना म्हटलं कि एकतर पांढरीफटक किंवा मळकट निळसर,हिरवट असे आजारीपणाचं  फिलिंग देणारी खोली डोळ्यासमोर येते, त्यात डेटॉल,फिनाईल किंवा तत्सम जंतूनाशकाचा दर्प,वेगवेगळ्या विकारांचे पोस्टमार्टेम करणारे फोटो किंवा पोस्टर असं काहीतरी भयंकर डोळ्यासमोर येतं. पण आर्टी वेगळा होता. प्रचंड स्वच्छ दवाखाना,आकर्षक रंगसंगती, कुठून तरी आणलेलं सुंदर वासाचं जंतुनाशक, थोड्या थोड्या वेळाने हवेत स्प्रे होणारे सुवासिक स्प्रीन्क्लर्स असा त्याचा थाट होता. का नाही येणार पेशंट्स? तिथे आल्या आल्या त्यांना निम्म बरं वाटत असेल!

तो पेशंटशी बोलत असताना फार कमी लोकांना तिथे थांबण्याची परमिशन होती. मी त्यातलाच एक सुदैवी!
"काय होतंय काका?"
"बर नाय वाटत हाय..गळून गेल्यासारक वाटत हाय..विन्जेक्षण द्या!!"  मी आश्चर्यचकित!
"ताप,खोकला, अंग दुखी वगैरे?"
"बाकी काय नाय,"
"काका,शेती केलीत ना आता? त्यानं थोडफार होतं असं.."
"तुमी ते विन्जेक्षण द्याना डागतर.त्यांनी बरं वाटतंय" गावातले लोक त्याच्याशी 'शुद्द आणि सपष्ट' बोलायचा प्रयत्न करीत असत!
"बरं.. या इथे बेडवर..चप्पल काढून ठेवा.." वगैरे वगैरे.. मी गुपचूप पणे बघत होतो..

"आर्टी.. लोक इंजेक्शन द्या म्हणाले कि तू देतोस? कमाल आहे!" पेशंट गेल्यावर मी म्हटलं..
"ग्लुकोजचं इंजेक्शन असतं रे ते..या लोकांना थकवा येतो शेतीभाती करून. ग्लुकोज ने थोडी तरतरी येते.."
"च्यायला, म्हणून तू ३० ३० रुपयांना नाडतोस?"
"काहीही काय बोलतोस? मी नाही दिलं तर ते तिकडे त्या डॉक्टर शानभाग कडे जाऊन तेच इंजेक्शन घेणार.. मला ३० रुपये देतात ते त्याला जावून ५० देणार.. वरून 'या डॉक्टरला  काय जमत नाही' असं म्हणणार ते वेगळंच! गावातले लोक आहेत बाबा हे.. सगळं जपावं लागतं. पेशंट गमावून चालणार नाही मला."
"हो,शेवटी तुझा पैसा त्यांच्या खिशातूनच येतो.." मी टोमणा मारला
" तू लहान आहेस अजून आणि माझा लाडका म्हणून मी हे ऐकून घेतो हां!" drawer उघडत आर्टी म्हणाला "या माझ्या सगळ्या पेशंट्सच्या फाईल्स आणि केस पेपर्स. इतक्यांचा स्टडी आहे माझा,त्यांच्या हिस्टरी सकट. कोणाला कशाची allergy आहे इथपासून कोणत्या औषधाला कोण कसं react करतं इथपर्यंत. म्हणून त्यांनी लक्षणं सांगितली कि मी लगेच डायग्नोस करतो काय झालंय ते.  एक पेशंट गमावला कि ही फाईल म्हणजेच त्याच्यामागचे माझे प्रयत्न, सगळं वाया गेलं! समजलं?"

नजरेत जरब, वागण्याबोलण्यात शून्य गोडवा असा हा प्राणी.
"नाही आवडत मला गुलझार! लोकांना आवडतो म्हणून मला आवडलाच पाहिजे का?"
"तसं नाही.." माझी सारवासारव
"मला नाही कळत उर्दू.. आणि त्याचं तर नाहीच नाही. मी म्युझीकपेक्षा लिरिक्स ऐकणारा माणूस आहे. गाणी ऐकून म्हणायला आवडतात मला.. त्यामुळे असेल कदाचित. आता त्या 'छैय्या छैय्या' गाण्यातलं 'गुलपोश कभी इतराए कहीं, महके तो नज़र आ जाये कहीं ताबीज़ बना के पहनू उसे आयत की तरह मिल जाए कहीं' हे किंवा 'यार मिसाले ओस चले पांव के तले फिरदौस चले कभी डाल डाल कभी पात पात' हे वाक्य! काय अर्थ आहे सांग? अजून तुझं ते साथियातलं गाणं 'बर्फ गिरी हो वादी में और हंसी तेरी गूंजी उन में लिपटी सिमटी हुयी बात करे धुवां निकले.. गर्म गर्म उजला धुवां नर्म नर्म उजला धुवां' या वाक्याचा रीलेवंस काय? एखादी गोष्ट नाही कळत तर नाही कळत! तशीच इंग्लिश गाणी! तीपण नाही झेपत.त्याच्यात शब्द महत्वाचे नसतात म्युझिक महत्वाचं असतं.. मी vernacular मिडीयमचा आहे.लोकांमध्ये शायनिंग मारण्यासाठी मी इंग्लिश पिक्चर बघतो,इंग्लिश गाणी ऐकतो असं सांगणं मला नाही जमायचं.. मला इंग्लिश पिक्चर आवडतात पण हिंदी मध्ये डब केलेले. इंग्लिशमध्ये बघताना एक डायलॉग कळेपर्यंत पुढचे बरेचसे मिस होतात.. मग काय उपयोग ते बघण्याचा?"
"त्यानं इंग्लिश सुधारतं असं म्हणतात!" मी ऐकीव माहिती दिली..
"मेडिकलला इंग्लिशमधूनच शिकलोय रे मी आणि international कॉनफरंसेस अटेंड करतो मी ते बघतोस ना? माझं active पार्टीसिपेशन असतं माहितीये ना? माझं इंग्लिश पुरेसं आहे माझ्या कामासाठी!" असं त्यानं म्हटलं कि मी बापडा काय वाद घालणार?

"तू गर्विष्ठ दिसतोस,वागतोस असं कोणी तुला सांगितलं नाही?" ६-७ वर्षांनी लहान असलो तरी सुदैवाने मी आर्टीला काही म्हणजे काहीही विचारू शकत असे! "पुणेरी भाषेत त्याला माज म्हणतात!" मी हसत म्हणालो.
"कुणी सांगायला कशाला हवं? माहित आहे मला! मी रोज माझा चेहरा आरशात बघतो..!"
"मग? विद्या विनयेन शोभते असं म्हणतात!"
"ते ढ लोक.. म्हणून मी ऐकू? तसं तर 'ठेविले अनंते तैसेची राहावे' असंही म्हणतात! 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असंही म्हणतात!" आर्टी हसत म्हणाला..मी गप्प बसलो.
"का असू नये माज? सांग ना? का असू नये? स्वकर्तृत्वावर इथपर्यंत पोचलोय मी. बाबा दारू पिऊन नेहमी जमीनदोस्त,आई पंचायत समितीत कामाला होती म्हणून शिकलो तरी. त्यात माझ्याकडे जातीच्या प्रमाणपत्रासारख्या कुबड्या नाहीत..'खुला प्रवर्ग' असल्याबद्दल वाईट वाटलं ते तेव्हाच, admission च्या वेळी. आमच्याकडे डोनेशन ची रक्कम नाही,त्यामुळे management कोट्यातून एमबीबीएस ला admission घेण्याचा प्रश्नच नव्हता.. विपरीत परिस्थितीतून एवढे मार्क्स मिळवूनही बीएएमएस शिवाय पर्याय नव्हता. तुला सांगतो..तिथे पण कित्येकजण केवळ वडिलोपार्जित धंदा पुढे चालवायचा म्हणून आलेले! passion अशी नाहीच. बापाचं हॉस्पिटल आहे किंवा क्लिनिक आहे; ते पुढे चालवायला हवं म्हणून आलेले बैल होते ते! जोतावरून बाप निघाला कि तोच जोत खांद्यावर घेणारे!"
"त्यात चूक काय आहे? वडिलांनी दिलेला वारसा पुढे चालवण्यात? बिझनेसमन तेच तर करतात"मी म्हटलं
"अरे पण लायकी तरी हवी ना? डॉक्टरी पेशा हा बिझनेस नाहीये रे. गावात लोक देव मानतात त्यांना. पैसे देवून आणि रिझर्वेशन थ्रू किंवा management कोट्यातून प्रवेश घेवून मग रडत खुरडत पास होत केवळ सर्टीफिकेट मिळवण्यापुरतं डॉक्टर होण्यात काय हशील?"
"भारतातली सगळी एज्युकेशन सिस्टीमच तशी आहे आर्टी.. आपल्याकडे तयार होणारे इंजिनियर्ससुद्धा तसेच आहेत त्याला काय करणार?"
"म्हणूनच म्हणतो कि मी करणार माज! एक ई बी सी सर्टीफिकेट मिळवण्यासाठी वणवण फिरलोय मी.. डोमिसाईल , nationality सारख्या दाखल्यांसाठी लायकी नसणा-या लोकांनी तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारायला लावले आहेत मला. त्यांच्याबद्दल कोणी अवाक्षर नाही उच्चारत! सगळा विनय दाखवायचा तो माझ्यासारख्यांनी..मी नाहीये त्यांच्यातला ..शून्यातून उभारलंय मी सगळं.. एकट्याच्या जीवावर. अभिमान आहे मला त्याचा.स्वाभिमान! मग त्याला कोणी माज म्हणो अथवा गर्व. आणि 'गर्वाचे घर खाली' असेल तर हरकत नाही.. ते घर माझं तरी असेल!"तो म्हणायचा.

त्याला कार या गोष्टीची खूप आवड.. म्हणजे विकत घ्यायचीच असं नव्हे पण चालवायची सुद्धा. विकत घेण्याच्या बाबतीतही अगदी secondhand  मारुती ८००  पासून सुरुवात करत करत साहेब आता शेवरोले क्रुझ पर्यंत पोहोचले आहेत. 
"मक्खन आहे एकदम..डीझेल इंजिन आहे पण बॉनेटला हात लावला तरी कळणार नाही गाडी चालू आहे ते.." तो सांगतो आणि डीझेल इंजिनचे व्हायब्रेशन्स जास्त जाणवतात याचा गंधही नसणारा माणूस किंवा त्याचा एखादा पेशंट "त्यात काय विशेष?" असा चेहरा करून ते ऐकून घेतो!
"मी खरा mechanic व्हायचो पण केवळ तो व्यवसाय एकट्याच्या जीवावर करता येत नाही म्हणून मी डॉक्टर झालो. :)"असं म्हणून "टायमिंग बेल्ट आवाज करतोय, चल सर्विस करून येवू.. किंवा cranking च्या वेळी कसलंतरी हमिंग येतं.." असं काहीतरी जर तो म्हणाला तर मला ते "vascular डेमेंटीया ची केस आहे त्यामुळे शहरात जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागेल" या वाक्याइतकंच अगम्य वाटत असे!

त्याच्याबरोबर लाँग ड्राईव्ह ला जायचा मजा औरच.
"घे चल गाडी!आपल्याच गाडीवर बिनधास्त शिकशील" असं म्हणत त्यानं मला कार शिकवली..
"माझी उंची कमी आहे रे अजून..बॉनेट दिसतपण  नाही. पूर्ण वाढ झाली कि शिकेन.. " मी घाबरायचो.
"इथे शरीराची उंची लागत नाही रे,मेंदूची लागते..तुझी ती उंची पुरेशी आहे..बारावीत म्हणजे लायसन्सचं वय आहे तुझं.. तुझ्याइतका असताना मी कुठलीपण गाडी चालवू शकत होतो. मला तर अशी आयती गाडी पण कोणी देत नव्हतं. 'जजमेंट' एवढी एकाच गोष्ट महत्वाची आहे. ती स्टीअरिंग हातात घेतल्याशिवाय नाही यायची."
लवकरच मी गाडी शिकलो.नंतर मग मी कधी त्याच्याकडे गेलो कि आम्ही गाड्यांच्या टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने ब-याच गाड्या चालवल्या. सिटीमधल्या वेगवेगळ्या शोरूम्सना त्याची '+' चिन्ह असणारी कार घेऊन दाबात जायचं आणि आम्हाला हवी ती गाडी फिरवून कमेंट्स टाकून परत यायचं असले उद्योगही आम्ही केले! सिटीमध्ये ओळख नसल्याने बाकी कसला प्रश्न नव्हता.. हल्ली हल्ली ऑडी , निसान अशा कंपन्या appointment शिवाय प्रवेश देत नाहीत हे देखील मला त्याच्यामुळेच कळलं!
'डॉक्टरच्या वरचढ झालेत हे शोरूम्स वाले' असला शेलका शेरा टाकून आम्ही परतायचो!
"एक लक्षात ठेव.. जोपर्यंत आपण गाडी शिकत असतो तेव्हा आपल्याला गाडी येत नाही असं समजायचं आणि सावध राहायचं.. एकदा शिकलास की इतरांना गाडी येत नाही असं समजायचं आणि सावध राहायचं..थोडक्यात काय तर.."
"..तर गाडी चालवताना आपण नेहमी सावध राहायचं.." मी वाक्य पूर्ण करायचो आणि तो हसायचा..

त्याच्या आयुष्यातली मुलगी देखील गोड होती.त्यावेळी ती इंजिनियर होत होती.. तिची ओळख त्याने 'तुझी वहिनी' अशी करून दिली होती. इंजिनियरिंगला जाताना तिने  इंजिनियरिंगचा अभ्यास कसा करावा यावर मला मार्गदर्शन केलं होतं (जे अंमलात आणायची वेळ कधीच आली नाही!! )छान होती वहिनी. (आणि हो..इंजिनियरिंगला 'अभ्यास' वगैरे करणारी माझ्या बघण्यातली एकमेव इंजिनियर!!) त्याने तिला  लिहिलेल्या काही प्रेमपत्रांचं मी प्रुफ रीडिंग करायचो आणि तिच्या पत्रांचं नुसतं रीडिंग! मला जाम हसू यायचं पण तो हळवा व्हायचा त्यामुळे तेव्हा हसून त्याला दुखवावंसं नाही वाटायचं! पण शेवटी जगातल्या असंख्य मुला-मुलींप्रमाणे हा गडी सुद्धा प्रेमभंगाच्या गर्तेत सापडला! दोघांनीही प्रत्यक्ष आणि पत्रातून, प्रेमाच्या आणाभाका घेवून आणि शेवटपर्यंत एकमेकांची साथ द्यायच्या आणि एकमेकांशिवाय न जगण्याच्या शपथा-बिपथा घेवून नंतर तिच्या पालकांनी परवानगी नाकारल्यामुळे त्याच्या प्रेमकहाणीचा शेवट लग्नात होऊ शकला नाही. तरीसुद्धा हे दोघेही जिवंत आहेत आणि धडधाकटही आहेत त्यामुळे या असल्या शपथा काही ख-या नसतात हे मात्र मला पटलं!असो..

काही काळ तो डिप्रेस्ड होता पण त्याचा रोजच्या कामकाजावर त्याने कधीच परिणाम होऊ दिला नाही .
"नाती ही अपेक्षेतून तयार होतात रे.. काही ना काही अपेक्षा असते. अगदी आई बाप आणि मुलाच नातं सुद्धा.. मुलानं आपल्याला पुढं जाऊन आपलं ऐकावं, आपल्याला सांभाळावं म्हणून लहानपणापासून त्याचं ऐकायचं, त्याला वाढवायचं असा व्यवहार असतो तो. मुलांनी नाही ऐकलं तर हेच आई बाप पोटच्या पोरांना दूषणं देतात. रक्ताचं आणि इतकं जवळचं नातं कधी निरपेक्ष नसतं,तर इतर नात्यांची काय कथा? आणि सगळी दुःखं ही अपेक्षाभंगातून निर्माण होतात.. विचार करून बघ. परीक्षेत चांगले मार्क्स मिळावेत ही अपेक्षा असते,इतरांनी आपल्या मनासारखं वागावं ही अपेक्षा असते, चांगल्या कॉलेज मध्ये एडमिशन मिळावं ही अपेक्षा असते, मनासारखी नोकरी मिळावी ही अपेक्षा असते.."
"पण आर्टी,जर अपेक्षा ठेवल्याच नाहीत तर प्रगती कशी होणार?"
"मी तसं म्हणत नाहीये.. पण या दुःखाचंही डायग्नोसीस केल्यानंतर मला जे जाणवलं ते सांगतोय..गेली ८ -१०  वर्ष जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवलं, ती माझी सहचारिणी नाही बनू शकली. सगळ्याच प्रेमकहाण्यांचं रुपांतर लग्नात नाही होत. तसं व्हावं ही अपेक्षा असते. माझी तशीच अपेक्षा होती. आमच्या पिताश्रींमुळे तिचे आई बाबा तिला आमच्या घरी पाठवायला तयार नाही झाले. आणि संसाराच्या सगळ्या स्वप्नांचं पाणी झालं. मग तिचंही म्हणणं पटलं मला.. 'ज्या आईवडिलांनी इतकी वर्ष सांभाळलं त्यांच्या विरोधात जाऊ मी?' मी अर्थातच 'नाही' म्हटलं.. पण मी आता लग्न नाही करणार. मी प्रेम करूच शकत नाही इतर कुणावर.दुस-या मुलीमध्ये तिचं रूप शोधून मी मला आणि त्या मुलीला फसवू नाही शकणार." त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..

त्याच्या आईला नातवंड हवी होती म्हणून आर्टीने लग्नाची तडजोड अजिबात स्वीकारली नाही. पण त्याने एक गोड मुलगी दत्तक घेतली. लहान आहे तरीसुद्धा बाबाच्याच मुशीत तयार होतेय.. एकदम रोखठोक.. त्याला तिचे पाय पाळण्यात दिसले कि काय कोणास ठाऊक पण त्याने नावही तसंच ठेवलंय.. त्याच्या मी ठेवलेल्या पेटनेमचा अपभ्रंश.. आरती! :)

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

कॉम्प्लीकेटेड : उत्तरार्ध


  
मी सगळं म्हणजे बरचसं सांगितलं जे काही एलीस मला सांगायची त्यापैकी बरचसं.. त्याच्या चेह-यावरचे भाव बदलत होते..तब्बल एक तास अखंड बडबड केल्यानंतर मी थांबलो.दरम्यान पोटात काहीतरी पडल्याने अजून जोर चढला होता.
"थोडक्यात तू तिचं वकीलपत्र घेऊन आला आहेस.." प्लेट मधला शेवटचा घास संपवत विरागने त्याचं मौन सोडलं.
"ते पण एका वकिलाशी भांडायला? मुळीच नाही..यू वोन्ट बिलीव्ह, मी तिच्याशी इतक्या वर्षांची घट्ट असणारी मैत्री तोडून आलोय..कायमची. हि ती एलीस नाहीये जिच्याशी मी मैत्रीचं नातं जोडलं होतं." विराग एकदम शांत झाला. खूप विचार करून त्याने शब्द जमवले. माझ्याशी बोलण्यासाठी तो तयारी करत होता हे मला जाणवलं.
"तू फक्त तिच्याच बाजूने विचार केलायस आत्तापर्यंत. आता माझी बाजूपण ऐक.."

विराग:
'एला आणि मी क्लोज आलो ते आमच्या गावांमुळे. आम्ही कितीतरी जणांना ओळखत होतो. "हि माहितीये का? याला ओळखतोस का?" असल्या बारीकसारीक चौकश्यामधून आमची फ्रेन्डशिप वाढली आणि घट्ट झाली. मी पण गावातून आलेलो. आमच्या इथे शाळेत 'मुलींशी बोलणं' म्हणजे पाप असल्यासारखी परिस्थिती. जरा कोणी बोलले कि चिडवाचिडवी सुरु! त्यात माझे बाबा वकील.म्हणून रेपो जपणंही मस्ट होतं. त्यामुळे पुण्यात गेल्यानंतर एखादी मुलगी स्वतःहून बोलतेय त्याचंच मला कोण कौतुक होतं. एला माझी ख-या अर्थाने पहिली "मैत्रीण" झाली. कित्ती बोलायचो आम्ही सुरुवातीसुरुवातीला.तिच्यामुळेच मी मुलींशी कसं बोलायचं, काय बोलायचं ते शिकलो. त्यानंतर त्याच शिदोरीवर ब-याच मैत्रिणी झाल्या पण त्यावेळी हि आयुष्यातली पहिलीच मुलगी. थोडा पझेसिव्हनेससुद्धा होता तिच्याबद्दल. त्यामुळे खूप काळजी करायचो तिची. कोणाशी ती जास्त क्लोज झालेली मला खपायची नाही. तिच्या सगळ्या गोष्टी ऐकायचो,इन द फिअर ऑफ लुजीन्ग हर as ए फ्रेंड. माझी बेस्ट फ्रेंड होती ती. तुला माहितीच आहे कसा स्वभाव आहे तिचा. ती माझ्यात गुंतत गेली. पण एका बाजूला मला जाणवत होता कि हे सगळं चुकीचं करतोय मी..तुला कदाचित माहित नसेल पण मी कधीच तिला प्रपोज नाही केलं. पण तिचं तिनेच सगळं गृहीत धरलं होतं.. मलाही कधी तिचा भ्रम तोडवासा वाटला नाही.."
"म्हणजे? तुझं कधी तिच्यावर प्रेम नव्हतंच? तिच्या सांगण्यावरून मी स्वतः तू पाठवलेले टेडी बेअर ,गिफ्ट्स कलेक्ट केले आहेत कुरियरच्या ऑफिस मधून, तिला पाठवलेले आय लव यू चे मेसेजेस.."
"ते तू वाचलेस? हि पोरगी काही पर्सनल ठेवत नाही.." विराग डिस्टर्ब झाला. त्याला एक कॉल आला."मी तुला नंतर कॉल करतो, व्हेअ आ यू? एम ऑन मागरथ रोड..ऑलराईट" अस काहीतरी बोलून त्यानं पुन्हा विचारलं "तू ते मेसेजेस वाचलेस?"
" चुकून वाचला मी तो. आणि एकच.. मला दुसरं काहीतरी चेक करायचं होतं तिच्या सेलवर, तेवढ्यात तुझा मेसेज आला आणि माझ्याकडून तो ओपन झाला.. बरं..ते आता महत्वाच नाहीये..पण त्याचा अर्थ काय?" मी सावरून घेतलं..

"सेईंग आय लव यू and बीइंग इन लव आर कम्प्लीटली डिफरन्ट थिंग्ज डूड.. मला तिला दुखवायचं नव्हतं.. दिवसातून दहा वेळा 'आय लव यू' म्हणायची, लाडाचे मेसेज पाठवायची, त्याला रिप्लाय देणं चुकीचं आहे का? दोघांनाही मेसेजेस फुकट ,कॉलिंग फुकट मग जोपर्यंत हे नुसतं चाललं होतं तोपर्यंत मी कशाला तिला हर्ट करू? मी पण पाठवायचो तिला तसलेच मेसेज. तिच्याच "आय लव यू " ला एडीट करून "आय लव यू टू" करायचो आणि तिलाच फॉरवर्ड करायचो. बोलतानाही तेच.. ती खुश होत असेल तर का करू नये? मला काय एक्स्ट्रा पैसे पडत नव्हते की माझी एनर्जी वाया जात नव्हती.गिफ्ट्सचं ही तेच.. सारखं मला "हे आवडतं, ते आवडतं" सांगायची मग एकदोनदा पाठवली  गिफ्टसपण.. पण ती जेव्हा संसाराची स्वप्न बघायला लागली,घरात असं करू आणि तसं करू; मुलगा झाला तर हे नाव ठेवू आणि मुलगी झाली तर ते नाव ठेवू वगैरे वगैरे.. तेव्हा तिला दिली ना मी जाणीव करून? उगीच लग्नाचं आमिष तर दाखवलं नाही?"
"साल्या.. इतकी वर्ष तिला खुश ठेवण्याच्या नादात तिच्या भावनांशी हवं तसं खेळून आता हे बोलतोयस तू? फॉर हर, इट वॉजन्ट जस्ट बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड रिलेशनशिप विराग,टू सेंड यू "आय लव यू " मेसेजेस.. अरे नवरा मानत होती ती तुला.म्हणून हे सगळं बोलायची ना ती? तिच्या सगळ्या फ्रेंड सर्कलला माहित होतं हे इन्क्लुडिंग मी.."

"मग मी काय करू?" विरागचा तोल ढळत होता..तेवढ्यात त्याचा फोन खणखणला.. "आय एम इन सिरीयस मिटिंग या..डोन्ट कीप ऑन कॉलिंग.. व्हॉट happened ? यू बेटर कम डाऊन टू गरुडा मॉल" त्याने फोन कट केला..पण त्या फोनमुळे तो मघापेक्षा जरा सावरला होता.तरीपण तोच टेम्पो राखत तो बोलायला लागला.. "हां.. सांग ना.. मी काय करू? करू तिच्याशी लग्न? ख्रिश्चन आहे ती. घरात घेतील तिला माझ्या? ती येईल? इंग्लिश बोलते ती जास्त..मराठी नाही.. होईल का adjust ? बरं पळून जाऊन करू लग्न, घरच्यांच्या विरोधात.. मग पुढे खायचं काय? तिच्या प्रेमाने पोट भरणार आहे का? तिला मायक्रोबायोलॉजीत रिसर्चच करायचा आहे. मी नवखा वकील. इथे जेमतेम स्वतःला पोसण्याइतक्या दमड्या कमावतोय. आमचं तुम्हा इंजिनियर लोकांसारखं नसतं, नोकरीला लागलं की महिन्याकाठी पैसे जमा! रेपो बिल्ड करायचा म्हणजे आयुष्य लोटतं.. बाबांनी रेप्युटेशन कमावून ठेवलंय.. चेंबर आहे त्यांचा तिकडे गावाकडे,माझ्यासाठीपण चेंबर उघडण्याची व्यवस्था केलीय त्यांनी, त्याचं काय करू? त्यांनी सांगून ठेवलंय..सून वकील म्हणजे वकीलच पाहिजे..इथे आमची दोघांची फिल्ड्स कम्प्लीटली वेगळी. कसं आणि काय पटवून देवू मी घरच्यांना? "
"अरे हे सगळं आधी कळत नव्हतं का तुम्हाला? मी वेळोवेळी जाणीव करून दिली होती कि नाही? तरीपण कशाला सगळ्यांना..."

"मी काय करू? बोल ना, सगळ्यांना माहितीये त्याला मी काय करू ? मी कध्धी माझ्या फ्रेंड सर्कलला सांगितलं नाही की 'एला आणि मी रिलेशनशिप मध्ये आहोत' म्हणून..तिलाच जगजाहीर करायची हौस होती तर त्याला मी काय करणार? तिने जरी आधी मला लग्नाबद्दल विचारलं असतं तरी मी तिला हेच सांगितलं असतं की "वी कॅनॉट कॅरी फॉरवर्ड धिस रिलेशन फॉर लाईफटाईम " पण तिने कधी विचारलंच नाही! सांगितलं ना,तिने स्वतःच गृहित धरल्या होत्या ब-याच गोष्टी म्हणून? आणि आमचे जे कॉमन फ्रेंड्स आहेत - तुझ्यासारखे - त्या सगळ्यांना तिनेच तर सांगितलंय हे.. कन्फर्म कर हवं तर! तिलाच हौस होती 'हा माझा बॉयफ्रेंड,हा माझा बॉयफ्रेंड' म्हणून मिरवायची! तिच्या ब-याचश्या मित्रमैत्रिणींशी मी बोलायचो,तुझ्याशी पण बोलायचो पण कधी तुला मी सांगितल्याचं आठवतंय, की 'एला इज माय गर्लफ्रेंड' म्हणून? जे काही नातं होतं ते पर्सनल ठेवायचं होतं मला पण तोंडात तीळपण भिजत नाही तिच्या.कित्ती वेळा सांगून झालं तिला हे..पण नाही! तिला वाटायचं की आपण त्या 'जब वी मेट' मधल्या त्या 'गीत' सारखे आहोत.."
"तिला 'गीत' सारखं वाटत होतं की काय वाटत होतं ते माहित नाही पण तू मात्र त्या 'गीत'च्या 'अंशुमन' सारखा निघालास हे नक्की! तुला माहितीये? तुझ्या स्वभावामुळे असेल किंवा वागणुकीमुळे असेल तिच्या मैत्रीणीना तू कधीच आवडला नाहीस; कदाचित त्यांनी तुला बरोबर जोखला असेल.. पण ती नेहमी तुझीच बाजू सावरून घ्यायची.. तिच्या फ्रेंड सर्कल मधला फक्त मी असेन जो नेहमी तुला सपोर्ट करत राहिलो.. कारण आय नो व्हॉट रिलेशनशिप इज..एनीवे मूर्ख होती ती एलीस, टू बी इन हर ओन wonderland.. आय डोन्ट फील पीटी फॉर हर.."

"हा..य.. ही आहे तुझी सिरिअस मीटिंग?" लांबून एका मुलीने आमच्या दिशेने येता येता विचारलं.
"हे. हाय.. धिस इज अनु.. अडव्होकेट अनुप्रीता, एकत्रच सनद घेतली आम्ही. शी इज माय कलीग, माय फ्रेंड.. "
"एम आय योर "जस्ट" फ्रेंड?" दोन हाताच्या दोन-दोन बोटांनी "जस्ट" भोवतीच्या डबल कोट्स दाखवत अनुप्रिताने विरागला विचारलं..आणि मला चटकन सगळ्याचा उलगडा झाला..अनुत्तरीत असणारी सगळी समीकरणं तिच्या त्या एका प्रश्नासरशी सुटली होती.. तिकडे दुर्लक्ष करत विराग ने माझ्याकडे हात करत म्हटलं..
"यू आर लॉट मोर than that अनु, बट फर्स्ट मीट माय व्हेरी गुड फ्रेंड फ्रॉम पुणे.."
"वी आर नो मोर फ्रेंड्स विराग.." मी म्हटलं आणि तिथून बाहेर पडलो.. रिक्षाने मी व्हीआरएल चं ऑफिस गाठलं आणि दुस-या दिवशी पुणे...

मी:
दोघेही चुकले, दुस-याला पटवण्यासाठी कोणा एकाची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. वाईट वाटलं ते मी त्यांना ओळखण्यात चूक केली याचं.. पण आत्ता पटलं कि खोट्या नात्याला विनाकारण कुरुवाळत राहण्यापेक्षा एकटं असणं परवडलं.. बीइंग सिंगल इज अ लॉट वायजर than बीइंग इन राँग रिलेशनशिप!!  आल्या आल्या मी सेलमधून दोघांचेही नंबर्स डिलीट केले. शॉवरखाली बराच वेळ आंघोळ केली आणि वाहत्या पाण्याबरोबर दोघांबरोबर असणा-या माझ्या सगळ्या आठवणी वाहून जाऊ देण्याचा असफल प्रयत्नही केला.

मोबाईलच्या मेसेज रिंगटोन ने मला भूतकाळातून वर्तमानात आणलं. कसलातरी डिस्काउंट की ऑफर चा  फालतू मेसेज आला होता.. विचार झटकण्याचा प्रयत्न करत, खुर्चीतून उठून मी समोर पडलेलं इन्व्हिटेशन कार्ड उचललं आणि एकटक त्या चमकणा-या अक्षरांकडे पाहत बसलो..असो.. दोन वर्षानंतर का होईना पण शेवटी हेच खरंय कि एलीसचं लग्न ठरलंय..अ प्युअर अरेंज्ड marriage!