सोमवार, ८ जुलै, २०१३

संस्कृत=करंबेळकर मॅडम


कमी वेळात इतरांच्या मनात स्थान निर्माण करण्याची कला फार कमी जणांना अवगत असते. आमच्या करंबेळकर मॅडम निर्विवाद्पणे त्यापैकी एक.इयत्ता आठवी ते दहावी एवढ्या तीन वर्षात त्यांनी शाळेच्या दहा वर्षात एखादा शिक्षक पाडू शकला नसता एवढा प्रभाव आमच्यावर पाडला.

करंबेळकर मॅडम जरी जुन्या लोकांमध्ये पी ई आणि मराठीसाठी फेमस असल्या तरी सातवी मधल्या मार्कांच्या आधारावर आठवीमध्ये पूर्ण संस्कृतची तुकडी तयार झाली तेव्हाच त्यांच्याशी आमचा संपर्क आला.पण त्यांच्याबद्दल ब-याच आख्यायिका ऐकल्या होत्या. उंचीने कमी असल्या तरी गडबड करणा-या उंच मुलांना उडी मारून किंवा खुर्चीवर चढून त्यांची कानशिलं शेकवून, त्यांनी कसं वठणीवर आणलं होतं, त्याच्या सुरस कथा रंगवून रंगवून सांगितल्या जात. वर्णन सांगताना प्रत्येकजण आपला मीठ मसाला घालून ते अधिक रंजक कसं होईल याची काळजी घेत असे.त्यामुळे आमच्यासाठी तरी एक ’कडक शिक्षिका” अशी त्यांची ख्याती होती.

आठवीमध्ये गेल्यावर जेव्हा एका छोट्या खोलीत संस्कृतचे वर्ग सुरु झाले तेव्हा मॅडम वर्गावर आल्या.त्यापण आपल्यासारखंच छोटेखानी पुस्तक घेउन! अभ्यासक्रमाचं सोडून इतर पुस्तक घेउन वर्गात प्रवेश करणा-या त्या पहिल्याच शिक्षिका.अर्थात,ती होती ’शब्दधातुरुपावली’.. संस्कृतच्या शब्दांची निरनिराळी रूपं ,विभक्ती,प्रत्यय वगैरे पूर्ण ऐवज त्यात खचाखच भरला होता.या पुस्तकाने संस्कृतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला साथ दिली असेल असं म्ह्टलं तर ते वावगं ठरणार नाही.फ़क्त अभ्यासक्रम आहे म्हणून न शिकविता संस्कृत एक भाषा म्हणून शिकवण्याकडे करंबेळकर मॅडमचा कल होता.पण खरंच त्यांचा दरारा होता.एकतर वर्गातली मुलं ब-यापैकी हुशार या कॅटेगरीत मोडणारी असत,वरुन संख्यापण अगदी लिमिटेड असे त्यामुळे त्यांच्या तासाला दंगा चालू आहे असं चित्र सापडणं दुरापास्तच.

आल्या आल्या त्यांनी आम्हाला ’शब्दधातुरुपावली’घ्यायला सांगितली. त्यानंतर सुरु झाले आमचे संस्कृतचे वर्ग. सुरुवातीला त्यांनी आम्हाला सुभाषितमाला शिकवली.एखादा विषय शिकवायचा म्हणजे त्यातलं इन्साईड आउट माहित असलं पाहिजे असं त्यांचं धोरण होतं. त्यांना कोणतीही शंका विचारली की त्या अगदी तपशिलवार त्याचं निरसन करीत.त्यांचा भाषाशुद्धीवर प्रचंड भर होता.’श’आणि ’ष’यातला फरक, जहाज मधला ’ज’आणि जीवन मधला ’ज’, चमच्यातला च आणि चिमट्यातला’च’असे भाषेचे अनेक बारकावे त्या उलगडून सांगत.त्यानंतर कित्येकदा डिक्टेशनमधे मॅडम च्या नुसत्या उच्चारावरून आम्हाला -हस्व किंवा दीर्घ वेलांटी,उकार समजत असत.

एकदा शीघ्रकवी कालिदासाला राजाने ठंठंठठंठंठठठंठठंठ: हा शब्द दिला त्याने आपल्या प्रतिभेने तो कवितेत बसवला अशा अर्थाची एक कथा आम्हाला होती. जेव्हा मी हा शब्द पहिल्यांदा वाचला तेव्हा माझी तुमच्यासारखीच अवस्था झाली होती. परंतु करंबेळकर मॅडमनी त्याचं विभाजन करुन तो अश्या पद्धतीने शिकवला कि अजुनही मला ते वाक्य जसंच्या तसं आठवतं.
सोपानमार्गे करोति शब्दं..ठंठं-ठ-ठंठं-ठठ-ठंठ-ठंठ:!

सुभाषितमाला शिकवल्यानंतर ती मोठ्याने समूहाने म्हणण्याचा प्रघात त्यांनी घालून दिला होता. एकतर रोजच्या सरावामुळे सगळ्यांचे पाठांतर होईल आणि मुख्य म्हणजे एक वर्ग संपून दुसरा वर्ग सुरु होईपर्यंतचा मुलांकडे असणारा दंगा घालण्याचा हक्काचा वेळ सत्कारणी लागेल हे दोन हेतू त्या मनात बाळगून असाव्यात.
साहित्यसंगितकलाविहिन: साक्षात्पशु:पुच्छविषाणहीन:।
तृणन्नखादन्नपि जीवमान: तत भागदेयं परमं पशुनाम॥ यासारखं लांबलचक सुभाषित त्यांनी आम्हाला
भविष्य मेनू  आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान।
पंचांग सोपे सुमंगल स्वभावे, भिंतीवरी कालनिर्णय असावे.. या चालीवर शिकवून एकदम सोपं करुन टाकलं इतकं कि कधी त्याचा अर्थ : "साहित्य,संगीत,कलेची आवड नसणारा (मनुष्य) हा शेपूट नसणारा प्रत्यक्ष पशू होय, तो जगण्यासाठी गवत खात नाही हे तर खरोखर पशूंचं भाग्य आहे " असा लिहितानाही विचार करावा लागला नाही किंवा अंगी बाणवतानाही!
आजही काही सुभाषितांचे नुसते सुरुवातीचे शब्द कोणी म्हटले तर पूर्ण सुभाषित आपसूक तोंडातून बाहेर पडतं.

’मॅडम कडक होत्या’हे सुरुवातीचं माझं विधान खोटं मात्र नक्कीच नव्हतं.आठवीपर्यंत आम्ही व्याकरण शिकत असू परंतु त्यांच्याच तासाला आम्ही व्याकरण चालवायला शिकलो! (एखाद्या शब्दाची विभक्ती प्रत्यय असणारी एकवचन, द्विवचन आणि बहुवचन अशी रुपं म्हणणे म्हणजे त्या शब्दाचं व्याकरण चालवणं) करंबेळकर मॅडमनी ’राम चालवा’ असं फ़र्मान सोडलं कि’रामा’सारख्या अयोध्येच्या राजाला करंबेळकर मॅडम च्या दरबारात सगळी शस्त्रं म्यान करून गपगुमान चालावं लागत असे.संस्कृतची मुलं-मुली त्याला ’अकारान्त पुल्लिंगी शब्द” एव्हढाच मान देत असत आणि प्रत्येक तासाला  "रामहा रामौ रामाहा प्रथमा...."असं म्हणून, वनवासात सोसावा लागला नसेल एवढा त्रास त्या बिचा-या रामाला देत असत. ’नदी’ वास्तविक जीवनात कितीही खळाळत वाहत का असेना मॅडम च्या तासाला तीही ’ईकारान्त स्त्रीलिंगी शब्द’बनून न 'वाहता' निमूटपणे 'चालत'च  असे!

विराम चिन्हांचं आणि शुद्धलेखनाचं  महत्व अर्ध्या अर्ध्या मार्कांनी मॅडमनी पटवलं म्हणून आजही 'पाणी' आणि 'पाणि' मधली वेलांटी शब्दांचे अर्थ बदलते हे कळलं. जेव्हा आनी , पानी  अशा भाषेत इतर कोणी बोलतं तेव्हा त्यांची कीव येते आणि त्यांना  करंबेळकर मॅडम  सारख्या शिक्षिका मिळाल्या नाहीत याचं वाईट वाटतं!

आमची नववी संपत आलेली असताना मॅडम रिटायर्ड होणार अशी चर्चा सुरु झाली होती. मी मधल्या सुट्टीत  त्यांना गाठून त्या आमची दहावी होईपर्यंत रिटायर्ड होणार नाहीत ना याची खातरजमा करून घेतली. आता  मॅडम रिटायर्ड झाल्या म्हणून आमची शाळा दहावीच्या संस्कृत च्या मुलांना वा-यावर नक्कीच सोडणार नव्हती परंतु "संस्कृत = करंबेळकर मॅडम"  हे समीकरण डोक्यातून जाणं,  एक वर्षात नक्कीच शक्य नव्हतं.

आज शाळा सोडून जवळपास एक तप उलटलंय..........
.............पण अजूनही तेच समीकरण डोक्यात तसंच फिट्ट  आहे!!