मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

प्रेमाची (नवीन, टवटवीत आणि वेगळी) गोष्ट!!

चित्रपटसृष्टीत काही नावं उदाहरणार्थ राजकुमार हिरानी, आमिर खान, सतीश राजवाडे , अतुल कुलकर्णी वगैरे अशी असतात कि डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवावा आणि पैसे खर्च करून सिनेमाला जावं.. हमखास वसुली होण्याची हमी आणि चुकुनमाकून भ्रमनिरास झालाच तर अगदीच 'पैसे वाया गेले' असं म्हणण्याइतपत तरी दुःख होत नाही.. .. मात्र 'प्रेमाची गोष्ट' तुमचे पैसे वसूल करते हे नक्की!

आता सिनेमा म्हटला कि अवखळ नायिका आणि क्युट नायक यांची प्रेमकथा. बहुतेकदा 'पुरी दुनिया के कोई भी ताकत के साथ लडके झगडके ' वगैरे वगैरे नायिका नायकाला मिळते आणि सिनेमा संपतो.. प्रेमकथा संपते.. प्रेमाची गोष्ट संपते आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सुरु होते.. लग्न या विषयामध्ये फारसं रंजक काही नसावं त्यामुळे लग्न झालं कि नायक नायिकेमधलं हलकं फुलकं, खेळीमेळीच नातं लोप पावतं आणि पडद्यावर दाखवण्याइतकं काही नसतं या समजामुळे बरेचसे सिनेमे तिथेच संपत असावेत..

पण जिथे नेहमीचे सिनेमे संपतात अगदी तिथूनच 'प्रेमाची गोष्ट' सुरु होते.. 'डिवोर्सी'ज हे हलक्याफुलक्या प्रेमकथेचे नायक-नायिका होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं पण हा सिनेमा हा समज खोटा ठरवतो. फेल गेलेले लग्न जुळवून ठेवण्याची पराकाष्ठा करणारा नायक आणि लग्न टिकवण्यासाठी दोन वेळा प्रयत्न करूनही यश न मिळाल्यामुळे 'आपलं काय चुकलं' याचा शोध घेणारी नायिका यांची कौन्सिलर ऑफिसमध्ये (अगदीच चुकीच्या पद्धतीने) भेट होते आणि तिथून चित्रपटाची सुरुवात होते.

काही जोड्या मुळातच एकमेकांसाठी बनलेल्या नसतात.. पण नायकाला हे पटत नसतं आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना (इव्हन प्रेक्षकांना) हे उमजत असतं. मुळात लेखक असणारा नायक त्याच्या प्रतिभेने नवनवीन वाक्यं तयार करून त्याचा मुद्दा मांडू पाहत असतो आणि इतर लोक त्याला वास्तव जीवनात राहून , प्रत्यक्ष आयुष्याचे धडे शिकवत असतात.. ओघाओघानेच चित्रपटाची नायिका सेक्रेटरी म्हणून लेखकाच्या जीवनात येते आणि अप्रत्यक्षपणे ते एकमेकांमध्ये गुंतत जातात.. संपूर्ण चित्रपटात हा गुंता अजून वाढत जातो आणि शेवटच्या क्षणाला तितक्याच हळूवारपणे सोडवलाही जातो...

हि सहजता संपूर्ण चित्रपटभर आपल्याला दिसत राहते.. ' दोघेही घटस्फोटीत.. च्यायला म्हणजे बौद्धिकं असणार. सिरियस असणार सगळं' असा सुरुवातीला होणारा ग्रह किती फोल आहे याचा प्रत्यय जसजसा पिक्चर पुढे सरकत जातो तसतसा आपल्याला येत जातो. प्रेमात पडल्यावरही त्याची कबुली स्पष्टपणे द्यायचा गोंधळ.. लिहित असलेल्या स्क्रीनप्लेच्या माध्यमातून आपली मतं पटवून द्यायची नायक नायिकेची धडपड, दोघांचेही पार्टनर्स असताना त्यांना भेटल्यावर होणारी तगमग अतिशय यथार्थपणे पडद्यावर चितारण्यात आली आहे.

बरं फक्त लग्न, घटस्फोट आणि त्या अनुषंगाने तोच तो विषय चघळून चघळून त्यातला इंटरेस्ट निघून जाणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे हे विशेष. लेखक असलेल्या नायकाच्या तोंडी असलेले 'कितीही मोठा लेखक असला तरी कोरा कागद समोर आला कि मन बधिर होतंच'  किंवा
'सिनेमा म्हणजे काय गं ? आपल्या आजूबाजूच्या घटना...'
'देवाचा प्रत्यय तेव्हाच येतो जेव्हा तुमची त्याच्यावर गाढ श्रद्धा असते' असे संवाद आपले वाटून जातात..
'हे सिनेमावाले इमोशनल सीन इतके मेलोड्रामाटिक करतात कि आपल्याला रडण्याऐवजी हसू येतं आणि विनोदी सीनला जणू डोक्यावर बंदूक ठेवून 'हसा' म्हणतात'
'तूच म्हणायचास ना , कि ती तुझी बायको झाली पण मैत्रीण नाही होऊ शकली.'
'लग्न म्हणजे प्रोडक्ट नव्हे एक्सपायरी डेट असायला..'
'जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात आणि तरीही जुळवायचंच म्हटलं तर संसार होतो.. सहवास नाही' अथवा 'भांडण करून, नाती तोडून, वेगळं होऊन प्रश्न सुटत नाहीत' अशासारखे संवाद विचार करायला लावतात. (कदाचित संदर्भ नसल्यामुळे इथे वाचताना त्यांचा अर्थ लागणार नाही पण सिनेमा बघताना नक्कीच कळेल..)

'अतुल कुलकर्णीने नायक अगदी ताकदीने उभारला आहे' वगैरे कोणीही म्हणणं म्हणजे काजव्याने सूर्याची प्रतिभा जोखण्यासारखं आहे .. प्रचंड कॅलिबरच्या या अभिनेत्याने निर्विवादपणे अपेक्षांची पूर्ती केली आहे.. भूमिकेच्या, कथानकाच्या, दिग्दर्शकाच्या आणि प्रेक्षकांच्याही !! सागरिका घाटगेला पदार्पणातच सतीश सारखा दिग्दर्शक आणि अतुल सारखा सहकलाकार लाभला हे तिचं (आणि आपलंही ) भाग्य.. तिच्या फ्रेश आणि टवटवीत लूक मुळे अख्खा मूवी रीफ्रेशिंग होतो हे सुद्धा नाकारून चालणार नाही.. रोहिणी हट्टंगडीने मराठमोळ्या घराघरातून दिसणारी आई सर्वार्थाने साकारली आहे पण सासू म्हणून तिच्या इतका समजूतदारपणा फार कमी सापडेल.. :) सतीश राजवाडे हा उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या जोडीने उत्तम अभिनेता आहे हे ही दिसतं.. थोडक्यात सगळेच कलाकार आपल्या भूमिका जगले आहेत.

'ओल्या सांजवेळी' सारखं मुळातच सुंदर शब्दरचना असणारं गीत स्वप्नील आणि बेलाने आपल्या सुरेल आवाजाने जिवंत केलं आहे. कैलाश खेरनं देखील सागरिका घाटगेसारखी मराठीतल्या पदार्पणातच दमदार सेन्चुरी मारली आहे.. एकंदर म्युझिक आणि गाणी संपूर्ण चित्रपटात कुठेही उपरी वाटत नाहीत. आणि नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रायोजकांच मन न मोडता चित्रपटात केलेली एका प्रोडक्ट ची जाहिरात! यासाठी दिग्दर्शकाला मनापासून दाद द्यावीशी वाटते! ('आम्ही सातपुते' वाला सचिन पिळगावकर यातून नक्कीच काही 'आयडीयेची कल्पना' घेईल अशी भाबडी आशा!!)

तर अशी ही 'प्रेमाची गोष्ट'! प्रोमोजमध्ये  म्हटल्याप्रमाणे सहज,साधी,सोपी नसली तरी सुंदर आणि हळुवार तरी नक्कीच. सिनेमागृहातून बाहेर पडताना तुम्हाला अपेक्षित संदेश मिळत नसेल कदाचित पण एक समाधान मिळतं आणि तुमच्या असलेल्या / नसलेल्या लाईफ पार्टनरसाठी गुणगुणायला एक सुंदर गाणं..
"ओल्या सांजवेळी..उन्हे सावलीस बिलगावी..तशी तू जवळी ये जरा..
को-या कागदाची कविता अन जशी व्हावी.. तशी तू हलके बोल ना..."