शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०११

कॉम्प्लीकेटेड : पूर्वार्ध

मी:
एलीसचं लग्न ठरलंय..अ प्युअर अरेंज्ड marriage !! माझ्या टेबलवर आयव्हरी रंगांच्या कागदावर गोल्डन रंगात अक्षरं चमकत होती.. 'एलीस वेड्स ऑल्वीन ...द ब्राईड and ग्रूम होस्ट द वेडिंग.. द ऑनर ऑफ योर प्रेझेन्स इज रिक्वेस्टेड at द marriage ऑफ.... ' मला पुढे वाचवेना.. मी डोळे मिटले..मन झरझर मागे गेलं. तब्बल दोन वर्ष! स्मृतीपटलावरून काही गोष्टी खोडाव्याश्या वाटल्या तरी पुसून टाकता येत नाहीत..

"बट वी ब्रोक अप बाय म्युचुअल understanding .. " दीड दोन तासांच्या माझ्या समजावणीनंतर ती पुन्हा म्हणाली आणि फ्रायडे इव्हिनिंगच्या माझ्या मूडचा पूर्णपणे सत्यानाश झाला!
"काय? ब्रोक अप बाय 'म्युचुअल understanding '? एलीस.. अगं.. 'ब्रोक अप' आणि 'म्युचुअल understanding ' या दोन फ्रेझेस कॉन्ट्राडीक्टरी आहेत असं वाटत नाही तुला? जर तुम्हा दोघात थोडं तरी 'म्युचुअल understanding ' असतं तर इतक्या वर्षांनंतर ब्रेकअपची वेळ आली असती का?"
"व्हॉटेव्हर... बट वी आर नो मोर टुगेदर..and वी कॅनॉट बी..व्हाय आर यू हर्टीन्ग योर्सेल्फ?"
"बिकॉझ यू बोथ आर माय फ्रेंड्स.. and आय विटनेस्ड इट.. मला माहितीये बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल झालाय. तसं रिलेशन असण्यात गैर काहीच नाहीये पण वाटेल तितके दिवस मजा करायची आणि मन भरलं कि एकमेकांना डच्चू द्यायचा जो ट्रेंड रूढ होतोय ना...."
"माईंड योर.. सॉरी.. बट यू ऑल्सो आर हर्टीन्ग मी...कंट्रोल योर इमोशन्स."
"देअर विल बी नो नीड ऑफ इट हेन्सफोर्थ..धिस इज अवर लास्ट talk . वी आर नॉट इव्हन फ्रेंड्स एनिमोर एलीस. आय हेट पीपल लाईक यू" मी तिथून निघून आलो.

मी डोळे उघडले.. दोन वर्षांपूर्वीचे ते दोन दिवस विसरायचे आहेत मला... मी माझे दोन खूप चांगले फ्रेंड्स गमावले आहेत त्या दिवसात. अगदी ठरवून! आणि हो.. माझा प्रत्यक्ष संबंध नसतानादेखील. मी पुन्हा डोळे मिटले..खुर्चीत थोडा जास्तच रेलून बसलो..

त्या फ्रायडेला रात्रीच मी विराग ला कॉल केला होता...
"विराग.. अरे काय चाललंय तुमचं?"
"कोणाचं? कशाबद्दल बोलतो आहेस?" त्यानं विचारलं.
"उगीच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. आय वॉन्ट टू मीट यू..मला तुला भेटायचंय.."
"कसं भेटणार? मी इथे बंगलोरला तू पुण्यात..मी रात्री कॉल करतो. skype वर बोलू फेस टू फेस"
"नाही... आपण प्रत्यक्ष भेटू शकतो..मी येतोय बंगलोरला.--उद्याच"
"क्काय? आर यू नट्स? नथिंग that मच सिरीयस man .. इट्स बिटवीन मी एन हर.. आय नो यू आर हर--रादर our गुड फ्रेंड..बट.."
"मी विजयानंदचं तिकीट बुक केलंय आता ऑनलाईन..उद्या सकाळी मी पोचतोय.मग सांग हे सगळं"
विरागने सुस्कारा सोडला.. "बरं.. ये. पोचलास कि सांग..मी येतो पिक करायला."

उशिराची बस असूनही मला झोप येत नव्हती.. एकेकाळी दोघेही चांगले फ्रेंड्स होते माझे.. खरतर बियॉंण्ड फ्रेंड्स आहेत ते.. काही वर्षांपूर्वी बारीकसारीक गोष्टींमध्ये ,निर्णयांमध्ये त्यांचं मत महत्वाचं होतं. जॉब सुरु झाला आणि बरीचशी समीकरणं बदलली. पण दोघांचं नातं तसंच राहिलं. किंबहुना दृढ झालं. माझीच दृष्ट लागली कि काय? आणि आता जे नातं वाचवायची मी पराकाष्ठा करतोय त्यांना खरंच ही गरज आहे का?

एलीस:
एलीस काही वेळासाठी माझ्याबरोबर एका मेसमध्ये होती.काहीवेळा आणि काहीजणांशी मैत्री व्हायला कारणं लागत नाहीत. बोलणं कसं सुरु झालं ते आठवत नाही पण जेव्हा मैत्री नवीन होती तेव्हा पासून आमचं जे ट्युनिंग जुळलं होतं ते शेवटपर्यंत - अगदी त्या शुक्रवारपर्यंत तसंच होतं. विरागची आणि माझी ओळख आधी 'मैत्री' वगैरे म्हणण्याइतकी नव्हती. एलिसनेच एकदा एका मल्टीप्लेक्समध्ये की कुठेतरी 'तिचा मित्र' अशी ओळख करून दिली मग आमचं बोलणं वाढलं आणि मैत्रीपण झाली पण तरी त्यावेळी एलीस आणि माझ्या मैत्रीइतकी ती 'गेहरी' नक्कीच नव्हती.तो तिच्या जवळपासच्या गावातलाच होता. मोठ्या शहरांमध्ये घराजवळचं जरी नसेल तरी गाव, तालुका अगदी जिल्ह्यातलं जरी कोणी भेटलं तरी आपलेपणा वाटतो आणि जवळीकही वाढते.

"काय रे..मेसवर यायच्या आधी फोन करायला सांगितलाय ना तुला.. इफ यू आर नॉट देअर, देन अलोन आय have टू इट.." तिने एकदा तक्रार केली.
"मी काय करू? बघावं तेव्हा तुझा फोन बिझी असतो. मला भूक लागते. आणि काय गं हल्ली कोणाशी बोलत असतेस इतका वेळ ? "
"विरागशी"ती बोलून गेली आणि मग तिने जीभ चावली..
"ओ हो.. हम्म.. प्रेमात-बिमात पडलीयेस कि काय त्याच्या?" मी खिजवायला विचारलं..
"आय थिंक येस!" एलिस चक्क लाजली!
"काय? खरंच? कसं काय?" मी जवळ जवळ ओरडलोच!
"अरे हळू..केवढ्याने ओरडतोस?" तिने इकडे तिकडे पाहत विचारलं..
"मला सांगणारेस तू.. ते पण आत्ताच्या आत्ता." माझी एक्साईटमेंट आणि कुतूहल मला लपवता येईना..
अर्धा पाऊण तास सगळं कसं झालं, काय झालं, कधी झालं ते सांगितल्यानंतर ती म्हणाली,
"आय थिंक ही इज द वन आयेम लुकिंग फॉर.. कित्ती केअरिंग आहे.. admirable टू.. ही इज टू मच लविंग या.. सतत माझी चौकशी करत असतो.. खाल्लं का? , जेवलीस का? बरं नसलं तर डॉक्टरकडे गेलीस का पासून गोळ्या घेतल्यास का पर्यंत.. व्हाय शुडन्ट आय फॉल फॉर हिम? इन fact व्हाय शुडन्ट एनी गर्ल फॉल फॉर हिम? " दुर्गा कॅफेच्या समोर उभा राहून मी तिची कथा ऐकत होतो.. माझा एक्साईटमेंटचा भर एव्हाना ओसरला होता.
"गुड या.. यू have फाउंड द वन यू आर लुकिंग फॉर.. आएम happy फॉर यू. . पण भविष्याचा विचार केला आहेस? इथे वेगवेगळ्या जातींमध्ये लग्न होताना नाकीनऊ येतात तुमचे तर धर्म वेगळे आहेत. "
"देखेंगे यार.. मला तो आवडतो,त्याला मी आवडते मग झालं ना?"
"हो.. शेवटी मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी.. हो कि नाही?" आम्ही दोघेही खळखळून हसलो..
"बरं.. त्याने तुला प्रपोज कधी केलं? एवढी बडबड केलीस पण ते तर सांगितलच नाहीस" मी म्हणालो.
"कुठे केलंय अजून? पण समजतं ना..आणि रिलेशनशिप स्टार्ट व्हायला प्रपोज करायलाच हवं का? ते सगळं सिनेमात वगैरे असतं रे..ए पण तू केलं होतंस ना रे प्रपोज?"
"हो मग? अर्थातच..म्हणून तर विचारलं.. अगं मी केलं आणि आपल्याला होकारच द्यायचा आहे हे माहित असूनही तिने किती वेळ घेतला होता सांगितलंय ना मी तुला?" मी म्हटलं..
"हो.. बोलला होतास तू कि तेरा चैन खो गया था.. तेरी रातों की नींद लुट गयी थी..एट्सेट्रा !" आम्ही पुन्हा एकदा हसलो.
एलिसचं पहिल्यापहिल्यांदा जाणवण्याइतपत चालणारं विरागस्तवन नंतर माझ्याही अंगवळणी पडलं..त्यानंतर मी आणि विरागपण आधीपेक्षा क्लोज आलो. विरागला एलीसबद्दल काही बोललं कि तो फक्त हसायचा..

पण मी त्याच्या जितका जवळ येत गेलो तितका मला दोघांच्या स्वभावातला फरक जाणवत गेला. विराग एकदम मितभाषी, त्याच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये असणारा, करीअर ओरिएन्टेड, समाजाचा विचार करणारा, सगळ्यांशी अदबीने वागणारा आणि रिझर्व्हड याउलट एलिस कुणाशीही पटकन बोलायला लागणारी, अनोळखी लोकांमध्येही लगेच मिक्स होणारी, त्यांनादेखील आपलसं करणारी, भविष्याचा जास्त वेध न घेणारी, सडेतोड आणि स्वच्छंद जगणारी, 'माय लाईफ इज ओपन बुक' प्रकारची.. दोघंही दोन प्रकारचे..बंध कसे जुळले कळत नाही बुवा. अश्या कित्येक जोड्या आपण पाहत असतो आणि म्हणतोदेखील "काय पाहिलं तिने त्याच्यात काय माहित?" किंवा "त्याला ती कशी काय बुवा आवडली, कोणास ठाऊक? " तर ही जोडी त्यातली,विसंगत.. दोघांच्या उंचीत डोळ्यांना स्पष्ट जाणवण्याइतका  फरक, तो गव्हाळ आणि ती अतिप्रचंड गोरी, ती जास्त नाही पण थोडीशी हेल्दी आणि तो ठीक ठाक..आवडीनिवडीत तर प्रचंड तफावत.. म्हणजे जेवणखाण तर सोडाच पण अगदी कपडे जरी घेतले तरी ती कॅज्युअल वेअरची भोक्ती आणि हा फॉर्मल्सचा fan!  फॉर मी इट वॉज अ परफेक्ट mis-match!! आणि हो,तो बंगलोरला आणि ही पुण्याला! पुण्यातल्या बीकॉम नंतर लॉ करण्यासाठी तो बंगलोरला गेला, 'बंगलोर इंस्टीटयूट ऑफ लीगल स्टडीज' की कुठेतरी आणि हिला तिच्या बीएस्सी मायक्रोबायोलॉजीनंतर त्यातच काम आणि रिसर्च करायचा होता त्यामुळे ती पुणे युनिवर्सिटीतच राहिली.

सगळं सुरळीत चाललं असताना एकदा आम्ही भेटलो. मी आणि एलिस. माझ्यावरून सुरु झालेला चिडवाचिडवीचा विषय विराग वर येवून थांबला.. एलिस एकदम गंभीर झाली.
"त्याला मी कोणाशी बोललेलं नाही आवडत.."
"याला पझेसिव्हनेस म्हणतात.. मुलांना एक भीती वाटत असते कि ही आपल्यावर इम्प्रेस झाली तशी इतर कोणावर झाली तर!!" मी हसत हसत म्हटलं.
"मला आवडायचा त्याचा पझेसिव्हनेस पण..."
"पण काय?"
"...त्याला मी तुझ्याशीदेखील बोललेलं आवडत नाही."
"क्काय?" इट वॉज अ शॉक फॉर मी..!
"याला पझेसिव्हनेस म्हणतात? असला कसला पझेसिव्हनेस? हि नोज,यु आर माय बेस्ट बडी.."
"असतो अगं एकेकाचा स्वभाव" मी सावरून घेतलं " बोलेन मी त्याच्याशी यावर.. आणि तू एक काम कर. उगीच माझ्याबद्दल सांगत जाऊ नकोस त्याला काही. आता आपण पुण्यात आहोत म्हणजे भेटणं बोलणं तर होणारच ना आपलं? आणि आपली मैत्री तुमच्या रिलेशनपेक्षा जुनी आहे. मी स्वतःही कमीटेड आहे निदान त्याचा तरी विचार करायचा त्याने. पण असो..मी बोलेन त्याच्याशी"
"मी बोलले म्हणून सांगू नको अदरवाईज.. "
"नाही गं.. तेवढं कळत मला. बरोबर विषय काढेन मी.."
"प्रश्न ट्रस्टचा आहे. तू तुझ्या रिलेशनशिपमध्ये असा डाउट घेत असतोस? किंवा ती घेते? आता तिचा कॉल होता तेव्हा तू तिला माझ्याबरोबर आहेस असं सांगितलंस,बरोबर? 'ठीकाय' म्हणून तिने फोन ठेवला."
"तुला 'हाय' पण सांगितला ना.."
"तेच रे.. पण काय करतोयस तिथे, तिच्याबरोबरच कशाला आहेस,कुठे फिरताय वगैरे विचारलं का तिने?"
"तेव्हढी understanding आहे आमच्यात .."
"that इज व्हॉट.. ही निड्झ an एक्सप्लेनेशन and that टू ऑन द स्पॉट. मी मैत्रिणी बरोबर असले आणि तसं सांगितलं तरी त्यांचा आवाज ऐकवावा लागतो, घरी असले तर पेरेंट्सचा.. सुरुवाती सुरवातीला मस्त वाटायचं कि समबडी इज केअरिंग फॉर मी सो मच पण आता ते बंधन वाटतंय.."
"सवय होईल गं..आणि पहिल्यांदा सगळं त्याला सांगायचं थांबव.."
"द प्रॉब्लेम इज आय कान्ट.. आय जस्ट कान्ट! हि वूड बी माय बेटर हाफ इन लीटरल सेन्स. आय शेअर इच and एवरी स्मॉल थिंग विथ हिम.. आता मी कुठेय,काय करतेय इथपासून माझ्या सगळ्या पर्सनल गोष्टी. इतक्या पर्सनल की यू कान्ट imagine ! सगळं म्हणजे अगदी सगळं.. आता युनिवर्सिटीतले रस्ते सुद्धा पाठ झालेत त्याचे.." शुष्क हसत ती म्हणाली..
"हे बघ,तो आहे तो असा आहे.. मग आता कुठेतरी कॉम्प्रमाईज करावं लागेलच ना? आता त्याच्याशी इतकं आणि एवढं 'सगळं म्हणजे सगळं' शेअर करतेस म्हटल्यावर आणि महत्वाचं म्हणजे तोही हे' सगळं म्हणजे अगदी सगळं' ऐकून घेतो म्हणजे यू बोथ मस्ट बी टू मच सिरीयस अबाउट इच अदर, राईट?"
"आय थिंक सो..at least आय एम..मी त्याला हजबंड मानते रे, अजून काय हवं?"
"यू विल गेट युज्ड टू ऑफ इट..शेवटी नर्चरिंग रिलेशन इज डूइंग सम adjustment and कॉम्प्रमायजिंग ऑन फ्यु थिंग्स..कारण आफ्टर ऑल एवरी रिलेशन कान्ट बी परफेक्ट. आणि पुन्हा एकदा सांगतो, असं हे सगळं सगळ्यांना सांगायचं थांबव"
"सगळ्यांना म्हणजे? यू आर माय बेस्ट फ्रेंड"
"असेन पण बॉयफ्रेंड्स हेट देअर गर्ल्स बेस्ट फ्रेंड्स, हू आर बॉय्ज, दो दे डोन्ट शो इट! आस्क मी!! तो आणि तू काय बोलता, काय काय शेअर करता याच्याशी माझं किंवा इतरांचं काय देणं घेणं ? कशाला सांगायचं त्यांना? इफ यू कान्ट कीप योर सिक्रेट्स, डोन्ट एक्स्पेक्ट अदर्स टू कीप देम.. अंडरस्टूड? "

मी:
"गाडी पांच मिनट रूकेगी, चाय पानी के लिये और बाथरूम जानेका है तो लोग उतर सकते है.." रात्री उशिरा गाढ झोपलेल्या लोकांची जबरदस्तीने झोपमोड करणा-या क्लीनरच्या कर्कश्श आवाजाने माझी तंद्री भंग पावली.
कोणासाठी करतोयस हे सगळं? काय गरज आहे तुला? व्यक्तींसाठी की त्या एका नात्यासाठी? विचारांची चक्र काही थांबायला तयार नव्हती. रात्री खूप उशिरा मला झोप लागली.

बंगलोर मध्ये मी उतरलो तेव्हा दुपार होत होती. कबूल केल्याप्रमाणे विराग पोचला होता..
"फ्रेश होणारेस?"
"नुसता चेहरा धुवेन.. वॉल्वो मध्ये प्रवासाचा थकवा अजिबात जाणवत नाही..त्यात एग्झीक्यूटिव्ह सीट मिळाली होती. झोप पण मस्त झाली"
"वाटलंच.. कारण वाटत नाहीये तुझ्याकडे बघून की तू एवढा प्रवास करून आला आहेस.."

मागरथरोड वरच्या गरुडा मॉल मध्ये एका फारशी गर्दी नसणा-या रेस्टोरंट आम्ही स्थिरावलो. विराग कसलीतरी ऑर्डर देवून आला.. मला त्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता.
"बोल.." मी बोललो.
"कशाबद्दल आणि काय? तुला काय अपेक्षित आहे माझ्याकडून?"
"पुस्तकी प्रश्न विचारू नकोस, डायरेक्टली कमिंग टू द पॉइन्ट, व्हाय डिड यू डीसाईड टू ब्रोक अप? "
"ऑलऱाईट.. लेट्स स्टार्ट ऑन इट.. व्हॉट डू यू नो अबाउट our रिलेशन?" त्याने विचारलं

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०११

व्हाय डोन्ट यू ....? उत्तरार्ध


पूर्वार्ध:
"डेटिंग? म्हणजे काय असतं? तीच मला म्हणाली की.."
"सो..यु डोन्ट नो व्हॉट डेटिंग इज..तिने घरी सांगितलं की कॉलेजच्या ग्रुप बरोबर ती मुव्हीला चालली आहे."
"अगं, हि काय इश्यू करण्यासारखी गोष्ट आहे का? मागे 'आरएचटीडीएम' ला सुद्धा आम्ही दोघेच आलो होतो.." मला अवघडल्यासारखं व्हायला लागलं..
"तेव्हा तुम्ही खूप लहान होता म्हणून मी काही बोलले नाही.. आता तुम्ही लहान नाही.."
"काय बोलतेयस तू चिंगी? मागच्या वर्षीची तर गोष्ट आहे ही.. एका वर्षात एवढे मोठे झालो का आम्ही?" मी विचारलं.
"हाय दीदी" गुड्डू आली आणि तिने मुव्हीचं इतकं प्रचंड कौतुक केलं की चिंगीला तो विषय नाईलाजाने तिथेच सोडावा लागला. पण तिची रोखून पाहणारी नजर मला सतत छळत राहिली..

माझं द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि गुड्डूची बारावी या दोन्ही परीक्षांच महत्व आमच्या लेखी तितकंसं नसल्याने त्या काळात आमची मैत्री अधिक खोल होत गेली. त्यातच माझ्या हातात मोबाईल आला.. १२ रुपये पर मिनिट इनकमिंग वरून कॉल रेट्स ५० पैसे पर मिनिट इनकमिंगपर्यंत घसरले होते आणि वरून भविष्यात इनकमिंग फ्री होणार अशी वदंताही होती..
"कशाला पैसे उधळतोस? एवढ्या पैशात काय काय करता आलं असतं माहितीये?"
"असू दे..शायनिंग मारायला घेतला आहे. मी उचलत नाही कॉल्स. फक्त घरचेच उचलतो! माझ्या आणि तुझ्या.करत तर नाहीच नाही!! आणि बाकीचे फालतूचे खर्च कट ऑफ केले आहेत मी."
ती खळखळून हसली..
".." मी शांत बसलो.
"काय झालं ? अचानक असा का केलास चेहरा?" तिने विचारलं.
"चिंगीला आपल्या भेटण्यावर अजूनही ऑब्जेक्शन आहे का? तिला सांग कि देअर इज नथिंग फिशी"
"सोड रे.. आपल्याला माहितीये ना ते? मग झालं तर. आणि हे बघ.. तुला चिंगीबद्दल काही वाटत असेल तर व्हाय डोन्ट यू टेल धिस टू माय पेरेंट्स? " ती म्हणाली.
माझ्या मनात तिच्याबद्दल काही फीलींग्ज होत्या कि नव्हत्या हे मला स्पष्ट सांगता येत नव्हतं.आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काही फीलींग्ज होत्या कि नव्हत्या हे मला कळत नव्हतं.

तिचे बारावीचे रिझल्ट्स चांगले आले होते पण हल्ली सगळं सीईटी वर अवलंबून असतं.
"ए चम्या, माझे सी ई टी चे रिझल्ट्स आलेत. लेडीज रिझर्वेशनमधून कुठल्या पण इंजिनियरिंग कॉलेजला अडमिशन मिळू शकतं. पण मला नाही करायचं. मम्मीपप्पांच्या खूपच एक्स्पेक्टेशन्स आहेत रे.." तिने तिच्या पहिल्या मोबाईलवरून मला ही बातमी दिली..
"पहिल्यांदा मला चम्या म्हणायचं बंद कर यार..आणि सांग ना त्यांना कि तुला एयर होस्टेसच व्हायचं आहे म्हणून.." मी म्हटलं..
"चम्या यार, तुला कळतं हे सगळं..त्यांना कसं समजावू? तू येशील का या सनडेला? मी नसताना तू त्यांना भेट. प्लीज याSSS प्लीज.." तिने गळ घातली. यावेळेला मात्र मी तिचं "व्हाय डोन्ट यू.." चं साकडं ऐकायचं ठरवलं!

मी गेलो.. टिपिकल कान्देपोह्याचा नाश्ता झाल्यावर मी इकडून तिकडून विषय वळवत सफाईने गुड्डूच्या करिअरबद्दलच्या विषयाला हात घातला.आईचा प्रचंड विरोध सुरुवातीपासूनच जाणवत होता. काका निर्विकार भाव चेह-यावर आणून बसले होते.
"काकू,अहो लाखांमध्ये कमावेल ती. वरून प्रेस्टीज आहे ते आहेच. तुम्हाला पण बेनिफिट्स आहेत."
"आम्हाला नकोत ते पैसे.. आम्हाला ती इथे पाहिजे. लहानपणापासून तिला सांभाळलं. आणि हि म्हणते आता हिला एअर होस्टेस व्हायचंय. किती रिस्की आहे ते.. हल्ली कित्ती बातम्या येतात विमानांच्या एक्सिडन्टच्या.." त्यांचा आवाज कातर झाला.
"अहो काकू.." मी काकांकडे मोर्चा वळवला.." काका..तुम्हीच सांगा शेवटचा विमान एक्सिडन्ट झाल्याची बातमी कधी वाचलीयेत तुम्ही?" काका शांत बसले..थोडा वेळ असाच शांततेत गेला.
"पण राजे.. कशासाठी वेगळा रस्ता चोखाळायचा? तुझ्यासारखी इंजिनियर बनली तर आमच्या डोळ्यासमोरच राहील ना?" विचार करून ते बोलले.
"काका,काकी अहो एवीतेवी लग्न झालं की जाणारच आहे ना ती तुमचं घर सोडून? मग आधीच करूदेत ना तिला काय करायचंय ते. सपोज नाही जमलं तिला तर परत तुमच्याचकडे येईल ना ती? आणि तुम्ही तिला माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तिचा हट्टी स्वभाव तुम्हालापण माहितीये. नाही म्हटलंत तरी ती करणार आणि अगदीच जरी नाही केलं तरी शंभरदा तुम्हाला ते ऐकून दाखवणार. हो की नाही? वरून सपोज नवरा किंवा सासर ऑर्थोडॉक्स निघालं तर आयुष्यभर हि सल तिच्या मनात राहील की 'तेव्हा आई बाबांनी परमिशन दिली असती तर..' तुम्हाला ते आवडेल का ?"
"आता तू इंजिनियर होणार आहेस म्हणून हे बोलतोयस.." काकू म्हणाल्या.
"अहो काकू, मला बाकीचे पर्याय माहितीच नव्हते. मी लहानपणापासून पुण्यात किंवा इतर कुठल्याही मोठ्या शहरात असतो तर कदाचित मी दुसरं करीअर निवडलं असतं..पण मुळात मला आवड होती आणि तिला ती आवड नाहीये हे सत्य स्वीकारायला हवंच. ती इंजिनियरसुद्धा बनेल पण तिच्या इच्छेविरुद्ध.जे तिलाच काय तुम्हालापण नाही आवडणार!"

घरातून बाहेर पडता पडता मी गुड्डूला फोन केला.
"गुड्डू, कुठेयस?"
"जिम.."ट्रेडमिल वर ती धावून धावून लागलेली धाप मला ऐकू येत होती..
"घरी बोललो मी तुझ्या..."
"मग?.."
"बोथ आर कन्वीन्स्ड !!"
"..."
"ऐकलंस का?"
"ये SSSSS ..यू आर द man.. लव यू चमू..thanks thanks अ लॉट. तू पराग ला ये..तुला पार्टी!!" ती प्रचंड एक्साईटमेंट मध्ये होती.

लाल बहादूर शास्त्री मार्ग अर्थात एटी फिट रोडवरच्या हॉटेल पराग गार्डनला फुकटात मिळालेल्या दोन आलू पराठ्यांचा फन्ना उडवताना मी तिला तिच्या घरची स्टोरी ऐकवली. तिचा चेहरा प्रचंड खुलला होता आणि डोळ्यातून कृतज्ञता ओसंडून वाहत होती
"frankfinn ची चौकशी करून आलेय मी, एविएशन,हॉस्पिटलीटी आणि travel management चा डिप्लोमा करू शकते मी. माय personality सूट्स फॉर इट.."
"ओह ओके..सो जिम बीम त्यासाठीच की काय?" मी विचारलं
"चल रे..ते माझ्यासाठीच. तुला काय वाटतं? मी आपोआप मेंटेन राहते?"
"मी एवढा विचार कधी नाही केला.. आणि तुझ्या फिगरचा तर नाहीच नाही!"
"मग कर आता.. स्वतःला ग्रूम करण्यात वाईट काय आहे? माणसाने नेहमी प्रेझेंटेबल दिसावं. मुलगा असो किंवा मुलगी."
"ग्रूम म्हणजे? हे असं आतमध्ये घालायचं बाहेर दिसलं आणि पायात घालायच्या कपड्यांनी पायाचा शेप दाखवला की ग्रुमिंग झालं का?" मी तिला डिवचायला बोललो.
"एक्स्युज मी !! त्याला हॉल्टर नेक म्हणतात and धिस इज लेगीन्स!!" ती सांगायला लागली..
"सोड यार.. हे बघ,माणूस त्याच्या अंगातल्या गुणांनी प्रसिद्ध पावतो. गांधीजी बघ. नुसता पंचा नेसून असायचे.."
"तू गांधीजी आहेस का?"
".." मी गप्प बसलो.. काहीजणांशी वाद म्हणजे बाष्कळ बडबड असते!
"ओह गॉड !! डोन्ट मेक फेसेस..लेट मी एक्स्प्लेन.. बरं.. नॉर्थ साईड ची मुलं बघितलीस? कशी राहतात? अप टू डेट असतात की नाही? आपल्या महाराष्ट्रीयन मुलांनाच कंटाळा का असतो ते कळत नाही. तू तसा राहायला लागल्यावर लोक तुझ्याशी हिंदी बोलायला लागतात!! नोटीस कर हवं तर... कारण मराठी मुलगा असा छान राहू शकतो यावर इथल्या कोणाचाच विश्वास नाहीये. पिक अप नाईस आउटफिट्स, ट्रिम हेअर्स नाईसली..डू पिअर्सिंग इफ नीडेड! चांगल राहावं,चारचौघात इम्प्रेसिव्ह दिसावं हे आपल्या लोकांना कधी कळणार काय माहिती? इतरांना कशाला? माझ्या पुढ्यात बसलेल्या चम्याला जरी ते कळलं तरी मला पुरे!! "
"असू दे.. मी स्वतःचं स्वतः कमवायला लागलो की करेन ग्रूमिंग.. डोन्ट वरी.. आता पुढे काय करणार आहेस?"
"appointment आहे माझी शिला'जला, इथे सागर आर्केड मधेच आहे. काही नाही..आयब्रोज आणि रेग्युलर क्लीनअप. भारी आहे ती.इतक्यावेळा गेलेय पण, तुला सांगते, एकदापण स्कीनवर rash उमटला नाहीये अजूनपर्यंत!!" मी डोक गच्च धरलं!! कधी कधी मी गुड्डूला का सहन करतो हा प्रश्न मला प्रचंड छळत असे!
"माझ्या माते..पुढे काय करणार म्हणजे घरी मम्मी पप्पांना या कोर्सबद्दल कधी सांगणार आहेस?" मी विचारलं.
"देखेंगे! अब तू है तो फ़िक्र नहीं! चल, सध्याला तरी मला drop कर गुडलक चौकात.appointment चुकली तर परत घ्यावी लागते. त्याआधी गुडलक मधेच अर्ध अर्ध बन आम्लेट खाऊ. ट्रेडमिल वर ब-याच कॅलरिज बर्न केल्यात. थोड्या अर्न पण करते" डोळा मारत ती म्हणाली.
तिला सोडून जाताना मनात विचारांचं काहूर माजलं होतं. जेवढा मी तिला टाळू पाहत होतो तेवढं तेवढं ते मला कठीण जात होतं!

वर्षभरातच गुड्डूने माझ्या शब्दांचं,स्वतःच्या कॉन्फीडन्सचं आणि आई बाबांच्या विश्वासाचं चीज केलं. पगार आणि फ्लाईट अलौन्स मिळून महिना सत्तरऐंशी हजाराचा गल्ला जमवणा-या एमिरेट्सच्या केबिन क्रू मध्ये ती प्लेस झाली. माझं लास्ट इअर इंजिनियरिंगच अडमिशन आणि तिचं प्लेसमेंट एकदम झालं! काका काकूंनी माझे उगीचच आभार मानले. ती तिच्या टाईट शेड्युल मध्ये बिझी झाली तरी तिचा संपर्क होताच. लास्ट इअरला असताना मलापण "औकात" मधला जॉब मिळाला. नवीन जॉबचं नाविन्य, नवे सहकारी, कार्पोरेट लाईफ यांच्याशी जुळवून घेता घेता दोन वर्ष कशीच निघून गेली. दरम्यान चिंगी बोहल्यावर चढली. पण मी आउट ऑफ स्टेशन असल्याने मला लग्नाला जाता आलं नाही.बरं झालं.. नाहीतर नक्कीच मला तिने तिच्या बोचणा-या नजरांनी घायाळ करून सोडलं असतं!! गुड्डूने पण 'एमिरेट्स' वरून कतार एअरवेज जॉब स्वीच केला.

"चम्या, मी प्राडा घेतला" मी मुंबईला गेलो असताना एकदा मला गुड्डूचा फोन आला.
"हे काय आहे ?"
"अरे ब्रांड आहे मोबाईलचा, इटलीतला ब्रांड आहे fashionमधला लीडिंग. दुबई मध्ये घेतला. फंक्शनिंग झेपत नाहीये..शिकवशील ना मी येईन तेव्हा?"
"मला झेपलं तर आणि तू भेटलीस तर शिकवेन.."
"ए मी तुझ्या भरवशावर घेतलाय काय हा फोन कारण तुम्ही काय बाबा हुशार लोक.." मी हसलो. काही जुने क्षण आठवले.
"पण आपण भेटलो तर ना? ऑर्कुट नसतं तर तू कशी दिसतेस ते सुद्धा विसरून गेलो असतो मी एव्हाना!"
ती दिलखुलास हसली."धिस टाईम वी विल मेक इट याSSS समहाऊ." हल्ली तिच्या वागण्याबोलण्यात मच्योरीटी जाणवत असे म्हणून बालीशपणा पूर्ण गेला होता असंही नव्हतं.
"कुठेयस आता?" मी विचारलं.
"दोहा.."
"हे काय आहे?" मी जोक करावा म्हणून विचारलं. ती पुन्हा हसली.
"अरे,हॉल्ट आहे. वन stop फ्लाईट आहे आमची. आपल्याकडच्या संध्याकाळी मुंबईत land करणारे."
"मी मुंबईतच आहे अगं, रात्री निघणार आहे पुण्याला जायला..तिकीट बुक केलंय मी."
"काय म्हणतोस? आपण भेटू. कॅन्सल कर तिकीट. वी विल हायर अ कॅब. होम drop मिळेल. मला ऑफ आहे आता पंधरा दिवस.. यावेळी कशाला आजच भेटू. नक्की.."

सांताक्रूझला मी तिला रिसीव्ह करायला गेलो. फोन वरून जरी आमचं बोलणं असलं तरी तब्बल दोन-अडीच वर्षानंतर आम्ही प्रत्यक्ष भेटत होतो. ती नखशिखांत बदलली होती. आधी सुंदर होतीच आता तर अजूनच छान दिसत होती ती! फोटोपेक्षाही !!
"चमू.. man यू आ चेंज्ड..." तीच मला म्हणाली!
"आय शुड से धिस टू यू गुडड्या.. and आय चेंज्ड as in? इन विच सेन्स?"
"ओहो.. इंग्लिश हां!! गुड गुड..चेंज्ड as in , लुकिंग बेटर, स्मार्टर and लेट इट बी..एम नॉट गोइंग टू प्रेज यू मोर!! बट लेट मी कन्फेस. चमू नेम डजन्ट सूट यू एनिमोर.."
"ग्रुमिंग ग्रुमिंग.. यू नो.." मी हसत म्हटलं.
"सो यू स्टील रिमेम्बर द कॉनवर्सेशन वी हेल्ड at पराग?" तिने विचारलं. मी एक स्माईल दिली आणि म्हणालो "ऑफकोर्स!! आणि हो.. लोक खरंच हिंदीत बोलतात माझ्याशी! आफ्टर फोर ईअर्स युर थ्योरी अबाउट 'मराठी माणूस' होल्ड्स ट्रू and १००% valid !"
"मग? म्हटलेलं ना? असो.. बाकी? घरी गेला होतास इतक्यात?" मस्त हसत तिने विचारलं
"मागच्या महिन्यात जाऊन आलो."
"आणि माझ्या?"
"गेलो होतो तीन चार महिन्यापूर्वी तेव्हा काकू एकट्याच होत्या पण हल्लीच काका भेटले होते..साधारण आठवडाभरापूर्वी, रेणुकादेवी शाळेच्या गल्लीत.."तिने तिरकस नजरेने बघितलं " मी पण जात होतो तिकडून तेव्हा क्रॉस झाले, मी हाक मारली.मग बोललो. माझी चौकशी केली. कुठे असतो,काय करतो वगैरे..'घरी येत जा' म्हणत होते. इट सिम्स, हि इज फिलिंग लोनली विदाउट हिज डॉटर्स"
"आय नो.. हि लव्हज अस टू मच .."

कॅब मध्ये बसल्यावर आमचं बोलणं कंटिन्यू झालं.. कारण 'प्राडा' काही फारसा वेगळा नव्हता, उगीच पैसे वाया घालवायची कामं! बाकी काही नाही.
"चिंगी 'दिल्या घरी सुखी' वगैरे आहे असं दिसतंय एकंदरीत. तुला उजवली कि ते मोकळे झाले अशा भाषेत बोलत होते काका त्या दिवशी.."
गुड्डूने माझ्या खांद्यावर एक चापटी मारली. " ए गप रे.."
"मला पण विचारत होते लग्नाचं काय चाललंय म्हणून.. आणि काही चाललंय का म्हणूनही! म्हटलं काही नाही एवढ्यात."
"आणि माझ्याबद्दल काही बोलले नाहीत?"
"नाही.. म्हणजे माझ्या ओठांवर आला होता प्रश्न तुझ्या लग्नाबद्दल.. पण मीच आवरलं स्वतःला.." आपल्याला काही गोष्टी ऐकायच्याच नसल्या तर तसली सिच्युएषन आपण स्वतःहून टाळतो,त्यातला तो प्रकार होता,पण मला ते कबूल करायचं नव्हतं!
"काय म्हणतोस? बोलले नाहीत का की तिने स्वतःच एक मुलगा बघितलाय म्हणून?"
"क्काय?"

मी भानावर आलो.. गुड्डू खिडकीतून बाहेर पहात होती..आमचा संवाद माझ्या "क्काय?" वर थांबल्याला आता दीड-दोन तास उलटले होते. कॅब कामशेत च्या जवळपास असावी.. मी ड्रायव्हरला रेडीओ बंद करायची रिक्वेस्ट केली.
"तर तू प्रेमात पडलीयेस !! थोडक्यात हि गुड्डू आता कोणाचीतरी गुड्डू होणार..हम्म.. अर्थात मला काय फरक पडणारे म्हणा! माझ्यासाठी तू आधीपण गुड्डू होतीस आणि नंतर लग्न होऊन तुला पोरंबाळं झाली तरी तू गुड्डूच राहणार.. पण खरंच तू आता रिलेशनशिपमध्ये असणारेस? तुझ्या आयुष्यातला हा एवढा मोठा डिसिजन आणि मी त्यात अप्रत्यक्षपणे का होईना, इन्व्होल्व सुद्धा नाही? असं कसं होऊ शकतं यार?" मी विचारांना वाचा दिली.
"चम्या. अरे असं होईल का? म्हणूनच बोलले ना मी तुला? डायरेक्ट लग्नाला ये म्हणून तर नाही ना सांगितलं? मला तो आणि त्याला मी जरी आवडत असले तरी लग्न वगैरे पुढच्या गोष्टी आहेत रे.."
"हम्म.." माझा चेहरा का पडला मलाच कळलं नाही.
"man ..व्हॉट हम्म?? से समथिंग.. आणि काय म्हणालास मगाशी? मला काय फरक पडणारे? हो ना? मग चेहरा का पडलाय तुझा?"
"..."कॅबमध्ये एक गुदमरवून टाकणारी शांतता पसरली
"व्हॉsssट??" दोन हात दोन्ही बाजूला करून खांदे उडवत तिने विचारलं..
"stop आस्किंग मी that अगेन and अगेन.. मला फरक पडतो समजलं?" मी वैतागून म्हटलं.
ती शांत बसली..
"आय.. आय..i had फीलीन्ग्स फॉर यू गुड्डू; दो यू नेव्हर had इट फॉर मी.. आय जस कुडन्ट से इट.." मी नजर दुसरीकडे वळवली. पापण्यान्पर्यंत आलेलं पाणी आतल्या आत जिरवण्यासाठी मला बाहेर बघणं गरजेचं होतं.

ती निःशब्द झाली होती.माझ्याकडेही बोलायला अजून शब्द उरले नव्हते. भयाण शांततेत कॅब चा आवाज एखाद्या ट्रकसारखा वाटत होता..
"चमू..लिसन.. आय नो यू.. आय नो यू सिन्स इअर्स नाऊ.. यू नो व्हॉट? यू ट्राय अ लॉट, बट यूअर व्हॉईस कॅन नॉट लाय.. सो आय ऑलरेडी नो that यू लव मी..फ्रॉम लास्ट मेनी इअर्स.. "
"स्टील? स्टील यू सेड 'येस' टू समबडी एल्स, गुड्डू? माझा एकदा..निदान एकदा साधा विचारपण नाही आला तुझ्या मनात? एवढं सगळं माहित असूनसुद्धा?" माझा आवाज हळवा बनला.
"माझं पूर्ण ऐकून तर घेशील?"
"नो गुड्डू.. आय जस्ट कान्ट! यु आर नॉट माईन एनिमोर..रादर आय डोन्ट have that राईट..समबडी एल्स has it." पुन्हा एकदा जीवघेणी शांतता पसरली..अजून काही क्षण तसेच गेले असते तर माझ्या अश्रूंनी माझं सांगणं ऐकलं नसतं तेवढ्यात शांतताभंग करत तिने विचारलं.."व्हॉट इफ आय से that समबडी एल्सेस नेम इज मिस्टर चमेश?"
माझा कानांवर विश्वास बसत नव्हता.. पुन्हा एकदा शांतता. पण यावेळी ती जीवघेणी नक्कीच नव्हती! "मी?"

ती खुदकन हसली..
"माय बेबी लुक्स क्युट व्हाईल स्मायलिंग!"
मी हसलो.. मला परिस्थितीची जाणीव व्हायला काही क्षण लागले.. साला..आत्ता पटलं! चिंगी बरोबर होती!! मी उगीच खार खाऊन राहिलो तिच्यावर.. 'नथिंग फिशी' वगैरे मनाची समजूत होती फक्त!! एवरीथिंग वॉज फिशी.. and शी स्मेल्ट इट वेल इन advance ! चिंगी,यू आर सिम्पली ग्रेट!! राहा राहा,बाई.. दिल्या घरी तू सुखी राहा!!
"मी सांगितलं मम्मी पप्पांना.. की डोन्ट सर्च फॉर एनीबडी, आणि मग मी तुझ्याबद्दल सांगितलं.त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये...पण त्यांना बोलले होते मी कि मी स्वतःच त्याच्याशी बोलेन यावर म्हणून.."
त्याक्षणी मी जगातला सगळ्यात सुखी प्राणी होतो..काही गोष्टी अनपेक्षितपणे मनासारख्या घडल्या तर त्यातला आनंद काही औरच असतो..
"मी आजच घरी सांगतो माझ्या..सो व्हेन युअर पेरेंट्स विल अप्रोच इन फ्युचर ,इट शुड नॉट बी अ शॉक फॉर देम!"
'मग आपण असं करूया, मग तसं करूया' म्हणत मी खूप काही बोललो..
"अरे हो हो.. किती एक्साईटमेंट ती..आणि मला काय सांगतोयस हे सगळं?" तिने विचारलं आणि पुढे ती म्हणाली " and लिसन नो चमू.. शाल आय आस्क यू समथिंग?"
"येस.. शुअss.." माझे प्राण कानात आणून मी आतुरतेने तिच्या शब्दांची वाट पाहत होतो.. माझ्या कानांभोवती हातांची ओंजळ करत हळुवार आवाजात तिने विचारलं.."व्हाय डोन्ट यू टेल धिस ऑल टू माय पेरेंट्स?"
(समाप्त)

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

व्हाय डोन्ट यू ....? पूर्वार्ध

गुड्डू प्रेमात पडलीये!! तिनेच मला हे सांगितलं.. कॅबमध्ये माझ्याशेजारी बसलेली हि गुड्डू आता कोणाचीतरी गुड्डू होणार..अर्थात मला काय फरक पडणारे म्हणा! माझ्यासाठी ती आधीपण गुड्डू होती आणि नंतर तिचं लग्न होऊन तिला पोरंबाळं झाली तरी गुड्डूच राहणार.. पण खरंच ती रिलेशनशिप मध्ये असणारेय ? तिच्या आयुष्यातला हा एवढा मोठा डिसिजन आणि मी त्यात अप्रत्यक्षपणे का होईना, इन्व्होल्व सुद्धा नाही? असं कसं होऊ शकतं यार?तिची आणि माझी ओळख कशी झाली तेपण सुस्पष्ट आठवतंय. मी साडे-अकरावीत असताना नव्या पेठेतल्या विठ्ठलमंदिराजवळच्या 'लोकमान्य' लायब्ररीत आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि बोललो. पण मी बोललो त्याचं कारण ती दिसायला छान होती हेच असावं! पुन्हा एकदा वाचावी म्हणून मी मुद्दाम सांगून ठेवलेली 'बटाट्याची चाळ' तिला हवी होती आणि मी ती द्यायला तयार नव्हतो. पण तिने "प्लीज" म्हणताना असा काही मोहक चेहरा केला कि मी त्यावेळी 'चाळ' रूमवर न्यायची माझी इच्छा मारून टाकली! कारण एका शाळकरी का असेना पण आकर्षक मुलीसाठी पुस्तकाचा त्याग न करायला सोळा सतरा हे काही अगदीच लहान वय नव्हे!! खरं सांगायचं तर त्याच वयात 'मुलगी' या संज्ञेचा अर्थ कळायला लागतो.

जेव्हा लायब्ररीच्या इंसीडन्सनंतर आमची नुसती 'हाय हलो' वाली ओळख होती तेव्हा म्हणजे एखाद्या आठवडाभरातच एकदा भर पावसाळ्यात डेक्कनच्या बस stop वर या ma'am उभ्या होत्या..मी तिला ओळखलं.. भर पावसाळा जरी असला तरी तो पुण्यातला असल्याने मी जर्किन अथवा छत्रीचं ओझं बाळगायचे देखील कष्ट घेतले नव्हते. मी रिक्षाने हॉस्टेलपर्यंत जायचा विचार करत होतो तेवढ्यात छत्री घेतलेली ती मला तिथे दिसली. मी हाक मारली तेव्हा माझ्याकडे पाहिलं नि पाठमोरी झाली. एकंदरीत दिसणा-या चित्रावरून ma'am मुसमुसत होत्या हे नक्की! मी जवळ गेलो "काय झालंय? काही मदत करू का?"
"जस्स लिव्ह मी अलोन.." माझं वाक्य तोडत ती म्हणाली.. मी चकित होऊन शुंभासारखा तिथंच उभा राहिलो. एकतर छत्री पण नव्हती आणि वरून संततधार पाऊस..
'झक मारली आणि इथे भिजत आलो. च्यायला या पोरी पण ना.. कोण आपलेपणाने विचारतोय तर त्याला फाट्यावर मारतील आणि कोणी भाव देत नसेल तर त्याच्या मागे मागे करतील.. आपण कशाला नसत्या लफड्यात पडा. त्याच्यात परत त्या इंग्लिश मिडीयमवाल्या असल्या तर जास्तच तोरा मिरवतात इंग्लिश झाडून.. आम्हाला पण येतं बरं का? पण तुमचा तो accent नाय जमत..लहान आहे तर एवढा माज,मोठी झाल्यावर तर बघायलाच नको..' मनातल्या मनात असं बरंच काही म्हणत मी 'रिक्षा' असा आवाज दिला.. रिक्षावाला येवून उभा राहिला,मी रिक्षात बसणार इतक्यात "मी येऊ?" असं हुंदक्यात लपलेल्या आवाजात विचारत ma'am पाठोपाठ उभ्या. माझी झालेली चिडचिड मी दाबून ठेवली..
"बस,चटकन..मी हॉस्टेल ला चाललोय,तुला कुठे सोडू?"
"नीलायम च्या इकडे. माझ्या घरी."
"क्काय? कुठे?"
"हो.."
"निर्लज्ज!!" पुन्हा एकदा मी स्वगत म्हटलं! मघाचंच "झक मारली..." चं फिलिंग पुन्हा आलं!!
"अगं कित्ती हेलपाटा पडेल मला माहितीये? त्यापेक्षा असं करू, मी एस पी ला उतरतो.. तू रिक्षा घेऊन पुढे जा. तिथपर्यंत चे पैसे मी देतो पुढचे तू दे." मी अगदीच अरसिक नव्हतो पण हॉस्टेल लाईफमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये 'रिक्षा' ही गोष्ट 'चैन' या प्रवर्गामध्ये मोडली जायची.
ती परत मुसमुसायला लागली.
"त्याच्यात काय रडायचं ?? मी हॉस्टेल वर राहतो अगं.." पुन्हा एकदा "झक मारली..." चं फिलिंग!!
"माझ्याकडे तितके पैसे नाहीयेत.माझी पर्स चोरली बसमध्ये कोणीतरी.." अच्छा..तर हे कारण होतं तर.. मग 'जस्स लिव्ह मी अलोन.' ची मस्ती कशासाठी होती मघाशी?
पाकीट उघडून दहा रुपये आणि चील्लरचा खुर्दा तिला दाखवत मी म्हटलं.."एवढ्यात पोहोचू ?"
"आरामात!" ती खुलली.. "आपण घरी जाऊ, मी तुला पैसे देते मग तू तिथून हॉस्टेल वर जा"
हे काहीतरी मला पटण्यासारखं होतं..

'चमू' हे तिच्यासाठी असणारं माझं नाव!! मला अजिबात आवडायचं नाही! ओळख झाली तेव्हाचा आठवडा..फार फार तर महिनाभर आम्ही एकमेकांना आमच्या ख-या नावांनी हाक मारली असेल.. मग याच .. म्हणजे ती मला चम्या आणि मी तिला गुड्डू. कारण घरी तिला 'गुड्डू' च म्हणत असत. ज्यादिवशी तिला घरी सोडलं तेव्हाच मला कळलं ते.
"ममा , माझी पर्स चोरीला गेली गं.." आईच्या गळ्यात पडून रडत तिने आईला सांगितलं. लहानपणी हि एक मस्त आयडिया असते.. स्वतःची चूक असेल तर स्वतःच गळा काढायचा मग मोठी माणसं ओरडत तरी नाहीत.
"उगी उगी रे गुड्डू.." आईची काळजी.. आईपण गोरीपान, घारे डोळे. बघताक्षणी कोकणस्थ ब्राह्मण ते हेरावं कोणीपण!
"हा होता म्हणून पोचले घरापर्यंत.. " मला कीव आली. कित्ती बाऊ करावा एखाद्या गोष्टीचा? फारफार तर पाऊण तासाचा वॉक असेल डेक्कन ते नीलायम. 'हा होता म्हणून पोचले' म्हणे!!
"thanks रे बाळा.. नाव काय तुझं?" मी माझं नाव सांगितलं..
"पूर्ण नाव काय?" त्यांना आडनाव हवंय ते मला कळलं. :) मी आडनाव सांगितलं आणि म्हणालो.. "आम्ही मराठा, कोकणातले" काकू हसल्या. "नाही रे,तसं काही नाही. मी असंच विचारलं."
तोपर्यंत तिचे बाबा बाहेर आले. त्यांना मी कोण, तिच्या कसा ओळखीचा झालो, आता घरी येण्यामागचं प्रयोजन काय वगैरे सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला..
"नाव काय म्हणालास तुझं?" यावेळी मी पूर्ण नाव सांगून मी ब्राह्मण नाही, मराठा आहे वगैरे पुराण सांगितलं. तरीही ते इम्प्रेस झालेले दिसले!!
"पपा... त्याला त्याच्या हॉस्टेलवर सोडाल? इथेच एस पी च्या हॉस्टेलवर."
"हो हो.. का नाही? चहा घेऊन निघू.. काय राजे? चालेल का?"
मी होकारार्थी मान हलवली..कारण अर्थातच हॉस्टेल लाईफमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये 'चहा' फुकट मिळत असेल तर कोण कशाला नकार देईल? सोबतीला आईबाबांचं गुड्डूपुराण होतंच. लाडकी दिसत होती एकंदरीत. . गुड्डू ची मोठी बहिणपण होती. 'चिंगी'!! तिची सुद्धा ओळख झाली.चहा बिस्कीट खात असताना आमच्या सगळ्यांच्याच ब-याच गप्पागोष्टी झाल्या. संध्याकाळ अनपेक्षितरित्या खूप चांगली गेली. मला सोडल्यानंतर काकांनी 'येत जा सुट्टीच्या दिवशी किंवा असाच अधूनमधून..' असं निमंत्रणही दिलं..

गुड्डू आणि मी तेव्हापासून 'हाय-बाय' वरून प्रमोट होऊन चांगले दोस्त बनलो आणि आता घरच्यांना मी माहित असल्यामुळे आम्हाला..खरतर तिला काहीच इश्श्यू असण्याचं कारण नव्हतं.पुणे शहर नसानसात भिनलं होतं तिच्या. दहावीत होती तरी पण बिनधास्त फिरायची इकडे तिकडे.
"तुला अभ्यासाचं टेन्शन नाही येत?"
"मुळीच नाही.. आमच्या batch पासून दहावीची मेरीट लिस्ट बंद होणारे.. फिलिंग रीलीव्ड.."
"पुढे काय करणारेस?"
"काही विशेष नाही.. यशवंतकडे कच्छी दाबेली खाऊ मग हॉंगकॉंग लेन मध्ये फेरफटका मारू. ए.. बेल्ट्स चांगले मिळतात का रे तिथे? तू पण घे एक.हा कित्ती जुना झालाय.. ए मलापण एक रिस्ट बेल्ट घ्यायचा आहे..कानातले पण बघेन.."
"श्श्... दहावीनंतर काय करणार आहेस?" मी त्रासिक चेहरा केला.
"माहित नाही... आणि ए यार.. घरात पण हेच विचारात असतात सगळे. तू मित्र आहेस कि माझे पपा?" मी गप्प बसलो कारण बारावीतल्या पोरांना असलं बोलणं हास्यास्पद वाटतं.
"आणि तू ट्वेल्थला आहेस..माझ्यापेक्षा फक्त दोन वर्ष पुढे.. डू यू रिमेम्बर?"
"असेन,पण मला तुझ्याएवढा असताना निदान सायन्स ला जायचंय एवढं तरी माहित होतं.. किंबहुना आताही मला पुढे इंजिनियरिंग करायचंय हे माहित आहे. माझं व्होकेशनल सायन्स आहे."
"तुम्ही काय बाबा.. हुशार लोक.."
मी गप्प बसलो.
"मी आर्ट्स ला जाणारे."ती म्हणाली मी चेहरा कसनुसा केला.. आयआयटी मधून बी टेक करणारी पोरं 'गेट' देऊन आयआयटी मधूनच एम टेक करणा-या मुलांकडे पाहून जसा चेहरा करतात तसाच चेहरा इंजिनियरिंग करणारी पोरं एम ए आर्ट्स वाल्यांकडे बघून करतात.. ते एक्स्प्रेशन लिहिता नाही येत पण त्यात एक वेगळीच भावना असते. जरी कागदोपत्री 'मास्टर्स' हि डिग्री मोठी असली तरीसुद्धा!
"का? नववीत चांगले मार्क्स आहेत न तुला.. काकू सांगत होत्या तू कित्ती कित्ती हुशार आहेस ते."
"म्हणून मी आर्ट्स ला जाऊ नये? आय लाईक टू ब्रेक द रुल्स. सायकलने येते ना शाळेत तेव्हा सिग्नलचे नियम पण पाळत नाही मी."
"याला अतिशहाणपणा म्हणतात."
"असतील.. मला आवडतं. आय लाईक टू रीड बुक्स,स्टोरीज, नोवेल्स ..पेपर्स.. एवरीथिंग."
"अगं पण आर्ट्स म्हणजे तेवढंच नसतं. तुला त्यांचा अभ्यास करावा लागतो.. ज्यावेळी तुला तुझ्या आवडत्या गोष्टीवरसुद्धा प्रश्न विचारून त्याची उत्तरं लिहिण्याची अपेक्षा ठेवली जाते तेव्हा ते बोरिंग होतं. इतिहास मी आता जितक्या इंटरेस्टने वाचतो तेव्हा दहावीपर्यंत नाही वाचू शकलो. कारण त्याचा अभ्यास करावा लागत होता..पण तरीही तुला इतकीच आवड असेल तर जायला हरकत नाही आर्टसला."
"हो ना? मला खरंच आर्टसला जायचं आहे रे.. एक काम करेगा? व्हाय डोन्ट यू टेल धिस टू माय पेरेंट्स?"
"मी? बघू..."

तिच्या दहावीने नसलं तरी माझ्या बारावीने आमचं भेटणं बोलणं मर्यादित ठेवलं होतं.तेव्हा तर मोबाईल वगैरे या गोष्टी बिझनेसमन लोकांच्या 'बस कि बात' होत्या.
"तुझा हॉस्टेलचा नंबर दे.."
"कशाला?"
"मला फोन करायचा असेल तर?"
"तू काय वेडी आहेस का? मी करत असतो न तुला फोन मध्ये मध्ये?"
"ते तुला बोलायचं असतं तेव्हा.. व्हॉट इफ आय want टू स्पीक टू यू??"
"नको..मी मुलांच्या हॉस्टेलला राहतो आणि मला आपल्या मैत्रीला कसली लेबलं लावायची नाहीयेत."
"कसली लेबलं?"
"ए..तुला नाही समजणार.. तू शाळेत आहेस अजून.. समजलं ना?"
"ए हट..उगाच मोठा असल्यासारखा वागू नको हां.. दोन वर्ष म्हणजे खूप मोठा नाहीयेस काही.." अर्थात तिच्या असल्या बोलण्यानंतरही मी काही तिला नंबर देण्याच्या फंदात पडलो नाही.

मी इंजिनियरिंगला गेलो तोपर्यंत हिला एस पी मधेच सायन्सला प्रवेश मिळाला होता.. माझं अडमिशनचं चालू होतं त्या दरम्यान हिच्या कॉस्मेटिक्सच्या शॉपिंग साठी आम्ही फिरत होतो.
'चिंगीला का नाही घेऊन फिरत? मला याच्यातलं काही कळतं का?"
"तिला ऑब्जेक्शन असतं.. तुला कळत नाही म्हणून तू थांबवत तरी नाहीस! बाय द वे,दीदी माझ्यासाठी क्लासेसची चौकशी करायला गेलीये. फिजिक्स सुमंत, केम पी डी के, बायो पत्की आणि maths प्रभुदेसाई.. सगळे इथल्या इथे! टेस्ट सिरीज सुद्धा सुधीर्स चे लावेन.."
"तू तर आर्ट्स घेणार होतीस ना?" मला माहित असूनही मी मुद्दाम तिला खिजवण्यासाठी विचारलं..
"तर तर.. तुझी घरच्यांशी भेट करून दिली हीच चूक झाली माझी..सारखं तुझं एग्झाम्पल देऊन 'तो बघ तो बघ ' करत मला सायन्स ला अडमिशन घ्यायला लावली. आय आस्क्ट यू टू हेल्प मी बट यू डिन्ट.."
मी हसलो.. "पुढे काय?"
"काय सारख पुढे काय पुढे काय.. काय पुढे? कायपण केलं तरी लग्न करून एक संसारी बाईच होणारे मी समजलं? ही हुशारी बिशारी काय कामाची नाही.."
"वेडी आहेस का? कितीतरी बायका पुढे काय काय करतात संसार सांभाळून.."
"कोण कोण माहितीये तुला?"
'इंदिरा गांधी, किरण बेदी अं अं.."
"दोनच? त्यापैकी माझ्या इतक्या दिसायला सुंदर कोणी आहेत का?" आयला! काय point काढला होता पोरीने!
"तू कोण समजतेस ग स्वतःला? ऐश्वर्या राय?" मला राग आला.."हां ऐश्वर्या राय.. ती तुझ्यापेक्षा नक्कीच सुंदर दिसते.." मला अचानक सुचलं.
"तिला सुंदर दिसायचेच पैसे मिळतात..मी जाऊ का मॉडेल म्हणून rampwalk करायला? नाहीतर हिरोईन म्हणून?"
"ही..ही..मराठी सिरीयल मध्ये तरी घेतात का बघ!"
"हलो..चक इट! डोन्ट अंडरएस्टिमेट मी..ओके?"
"बाय द वे, तू एअर होस्टेस का नाही होत?"
"गुड ऑप्शन..आय स्वेअर, आय अल्रेडी have थॉट अबाउट इट.. व्हाय डोन्ट यू टेल धिस टू माय पेरेंट्स?"
"मी? अं.. फेअर & लवली ची मोठ्ठी ट्यूब घे ना..पैसे तरी वाचतील. एवढी गोरी आहेस तरी कशाला लावायला पाहिजेत असली क्रीम्स? आणि हा डव्ह चा शाम्पू पण असतो ? मागच्या वेळी pantene का कुठलातरी होता.." मी विषय बदलायला म्हणून काहीतरी बोललो!
"आय नो यू आर ट्रायिंग टू अव्हॉईड द टॉपिक बट एनीवे फेअर & लवलीमध्ये ट्रिपल सन स्क्रीन आहे.. उन्हात चेहरा प्रोटेक्ट होतो.. बाकी अंगासाठी सन स्क्रीन लोशन आहे घरी त्यामुळे tanning नाही होत. आणि हे बघ.. pantene चं ते प्रो व्ही स्टफ.. इट जस डझन्ट सूट्स मा हेअर यू नो.. डव्ह मध्ये कसं.. नॉन ग्रीसी natural आमंड आणि मिनरल ऑइल्स असतात...त्यामुळे...." हा जरा जास्तच बोरिंग विषय होता.
"ए..लाईफबॉय म्हणजे स्वस्त साबण आणि लेसॉनसी आणि मोती म्हणजे भारी--म्हणजे महागातले साबण एवढंच मला कळतं. क्रीम, शाम्पू ,त्यांच्यातले कन्टेन्ट्स...मला हे काही झेपत नाही. तू खरेदी आटप म्हणजे लवकर निघू आपण.." तिने उगाचच चेहरा वाकडातिकडा केला आणि गुपचूप खरेदी आटपली.

कॉलेजला गेल्या वर तिचे ग्रुप्स वाढले, कॉलेजमध्ये फिरायचा,आर्ट सर्कलवाला,ट्रेकचा असे एक ना दोन असंख्य ग्रुप्स झाले..मित्र मंडळही वाढलं पण मी जरी दूर गेलो असलो तरी तिच्या जवळच होतो."ए आपण 'साथीया'ला जायचं?" मी एकदा फोन केला तेव्हा तिने विचारलं.
"मी इतक्या लांब येवू? तुझे बाकीचे फ्रेंड्स तयार नाहीत वाटतं.." मी उगीच टोमणा मारला..
"मला फक्त तुझ्याबरोबरच जायचं असेल तर?" तिला माझ्या बोलण्याचा काही फरकच पडत नसे.
"तर काय? कधी कुठे आणि किती वाजता ते सांग..परत उद्या फोन करतो.."
सिटीप्राईड, जे तेव्हा फक्त सातारा रोड लाच होतं, मुलींसाठी सेफ मानलं जायचं. त्यामुळे तिथेच आम्ही तो मुव्ही पाहिला..साल्या या एका मुव्हीमुळे 'आपणपण कुणाच्या ना कुणाच्यातरी प्रेमात पडावं' असा फील कित्येक मुलामुलींच्या मनात आला असावा अशी मला दाट शंका आहे.
बाहेर पडताना गुड्डू वॉशरूमला गेली आणि चिंगीने मला किंवा मी चिंगीला पाहिलं.. तिरक्या नजरेने ती माझ्याकडेच पाहत होती. मी वेव्ह करताच ती तिच्या मैत्रीणीना सोडून माझ्याकडे आली..
"ए.. तू इथे काय करतेयस? सॉल्लीड होता ना मुव्ही? कसा वाटला? " मी विचारलं..
"आर यु डेटिंग हर?"
"क्काय?"
"आय आस्क्ट, आर यु डेटिंग गुड्डू?" आवाजात जोर आणून तिने विचारलं.
उत्तरार्ध