शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

व्हाय डोन्ट यू ....? पूर्वार्ध

गुड्डू प्रेमात पडलीये!! तिनेच मला हे सांगितलं.. कॅबमध्ये माझ्याशेजारी बसलेली हि गुड्डू आता कोणाचीतरी गुड्डू होणार..अर्थात मला काय फरक पडणारे म्हणा! माझ्यासाठी ती आधीपण गुड्डू होती आणि नंतर तिचं लग्न होऊन तिला पोरंबाळं झाली तरी गुड्डूच राहणार.. पण खरंच ती रिलेशनशिप मध्ये असणारेय ? तिच्या आयुष्यातला हा एवढा मोठा डिसिजन आणि मी त्यात अप्रत्यक्षपणे का होईना, इन्व्होल्व सुद्धा नाही? असं कसं होऊ शकतं यार?



तिची आणि माझी ओळख कशी झाली तेपण सुस्पष्ट आठवतंय. मी साडे-अकरावीत असताना नव्या पेठेतल्या विठ्ठलमंदिराजवळच्या 'लोकमान्य' लायब्ररीत आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि बोललो. पण मी बोललो त्याचं कारण ती दिसायला छान होती हेच असावं! पुन्हा एकदा वाचावी म्हणून मी मुद्दाम सांगून ठेवलेली 'बटाट्याची चाळ' तिला हवी होती आणि मी ती द्यायला तयार नव्हतो. पण तिने "प्लीज" म्हणताना असा काही मोहक चेहरा केला कि मी त्यावेळी 'चाळ' रूमवर न्यायची माझी इच्छा मारून टाकली! कारण एका शाळकरी का असेना पण आकर्षक मुलीसाठी पुस्तकाचा त्याग न करायला सोळा सतरा हे काही अगदीच लहान वय नव्हे!! खरं सांगायचं तर त्याच वयात 'मुलगी' या संज्ञेचा अर्थ कळायला लागतो.

जेव्हा लायब्ररीच्या इंसीडन्सनंतर आमची नुसती 'हाय हलो' वाली ओळख होती तेव्हा म्हणजे एखाद्या आठवडाभरातच एकदा भर पावसाळ्यात डेक्कनच्या बस stop वर या ma'am उभ्या होत्या..मी तिला ओळखलं.. भर पावसाळा जरी असला तरी तो पुण्यातला असल्याने मी जर्किन अथवा छत्रीचं ओझं बाळगायचे देखील कष्ट घेतले नव्हते. मी रिक्षाने हॉस्टेलपर्यंत जायचा विचार करत होतो तेवढ्यात छत्री घेतलेली ती मला तिथे दिसली. मी हाक मारली तेव्हा माझ्याकडे पाहिलं नि पाठमोरी झाली. एकंदरीत दिसणा-या चित्रावरून ma'am मुसमुसत होत्या हे नक्की! मी जवळ गेलो "काय झालंय? काही मदत करू का?"
"जस्स लिव्ह मी अलोन.." माझं वाक्य तोडत ती म्हणाली.. मी चकित होऊन शुंभासारखा तिथंच उभा राहिलो. एकतर छत्री पण नव्हती आणि वरून संततधार पाऊस..
'झक मारली आणि इथे भिजत आलो. च्यायला या पोरी पण ना.. कोण आपलेपणाने विचारतोय तर त्याला फाट्यावर मारतील आणि कोणी भाव देत नसेल तर त्याच्या मागे मागे करतील.. आपण कशाला नसत्या लफड्यात पडा. त्याच्यात परत त्या इंग्लिश मिडीयमवाल्या असल्या तर जास्तच तोरा मिरवतात इंग्लिश झाडून.. आम्हाला पण येतं बरं का? पण तुमचा तो accent नाय जमत..लहान आहे तर एवढा माज,मोठी झाल्यावर तर बघायलाच नको..' मनातल्या मनात असं बरंच काही म्हणत मी 'रिक्षा' असा आवाज दिला.. रिक्षावाला येवून उभा राहिला,मी रिक्षात बसणार इतक्यात "मी येऊ?" असं हुंदक्यात लपलेल्या आवाजात विचारत ma'am पाठोपाठ उभ्या. माझी झालेली चिडचिड मी दाबून ठेवली..
"बस,चटकन..मी हॉस्टेल ला चाललोय,तुला कुठे सोडू?"
"नीलायम च्या इकडे. माझ्या घरी."
"क्काय? कुठे?"
"हो.."
"निर्लज्ज!!" पुन्हा एकदा मी स्वगत म्हटलं! मघाचंच "झक मारली..." चं फिलिंग पुन्हा आलं!!
"अगं कित्ती हेलपाटा पडेल मला माहितीये? त्यापेक्षा असं करू, मी एस पी ला उतरतो.. तू रिक्षा घेऊन पुढे जा. तिथपर्यंत चे पैसे मी देतो पुढचे तू दे." मी अगदीच अरसिक नव्हतो पण हॉस्टेल लाईफमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये 'रिक्षा' ही गोष्ट 'चैन' या प्रवर्गामध्ये मोडली जायची.
ती परत मुसमुसायला लागली.
"त्याच्यात काय रडायचं ?? मी हॉस्टेल वर राहतो अगं.." पुन्हा एकदा "झक मारली..." चं फिलिंग!!
"माझ्याकडे तितके पैसे नाहीयेत.माझी पर्स चोरली बसमध्ये कोणीतरी.." अच्छा..तर हे कारण होतं तर.. मग 'जस्स लिव्ह मी अलोन.' ची मस्ती कशासाठी होती मघाशी?
पाकीट उघडून दहा रुपये आणि चील्लरचा खुर्दा तिला दाखवत मी म्हटलं.."एवढ्यात पोहोचू ?"
"आरामात!" ती खुलली.. "आपण घरी जाऊ, मी तुला पैसे देते मग तू तिथून हॉस्टेल वर जा"
हे काहीतरी मला पटण्यासारखं होतं..

'चमू' हे तिच्यासाठी असणारं माझं नाव!! मला अजिबात आवडायचं नाही! ओळख झाली तेव्हाचा आठवडा..फार फार तर महिनाभर आम्ही एकमेकांना आमच्या ख-या नावांनी हाक मारली असेल.. मग याच .. म्हणजे ती मला चम्या आणि मी तिला गुड्डू. कारण घरी तिला 'गुड्डू' च म्हणत असत. ज्यादिवशी तिला घरी सोडलं तेव्हाच मला कळलं ते.
"ममा , माझी पर्स चोरीला गेली गं.." आईच्या गळ्यात पडून रडत तिने आईला सांगितलं. लहानपणी हि एक मस्त आयडिया असते.. स्वतःची चूक असेल तर स्वतःच गळा काढायचा मग मोठी माणसं ओरडत तरी नाहीत.
"उगी उगी रे गुड्डू.." आईची काळजी.. आईपण गोरीपान, घारे डोळे. बघताक्षणी कोकणस्थ ब्राह्मण ते हेरावं कोणीपण!
"हा होता म्हणून पोचले घरापर्यंत.. " मला कीव आली. कित्ती बाऊ करावा एखाद्या गोष्टीचा? फारफार तर पाऊण तासाचा वॉक असेल डेक्कन ते नीलायम. 'हा होता म्हणून पोचले' म्हणे!!
"thanks रे बाळा.. नाव काय तुझं?" मी माझं नाव सांगितलं..
"पूर्ण नाव काय?" त्यांना आडनाव हवंय ते मला कळलं. :) मी आडनाव सांगितलं आणि म्हणालो.. "आम्ही मराठा, कोकणातले" काकू हसल्या. "नाही रे,तसं काही नाही. मी असंच विचारलं."
तोपर्यंत तिचे बाबा बाहेर आले. त्यांना मी कोण, तिच्या कसा ओळखीचा झालो, आता घरी येण्यामागचं प्रयोजन काय वगैरे सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला..
"नाव काय म्हणालास तुझं?" यावेळी मी पूर्ण नाव सांगून मी ब्राह्मण नाही, मराठा आहे वगैरे पुराण सांगितलं. तरीही ते इम्प्रेस झालेले दिसले!!
"पपा... त्याला त्याच्या हॉस्टेलवर सोडाल? इथेच एस पी च्या हॉस्टेलवर."
"हो हो.. का नाही? चहा घेऊन निघू.. काय राजे? चालेल का?"
मी होकारार्थी मान हलवली..कारण अर्थातच हॉस्टेल लाईफमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये 'चहा' फुकट मिळत असेल तर कोण कशाला नकार देईल? सोबतीला आईबाबांचं गुड्डूपुराण होतंच. लाडकी दिसत होती एकंदरीत. . गुड्डू ची मोठी बहिणपण होती. 'चिंगी'!! तिची सुद्धा ओळख झाली.चहा बिस्कीट खात असताना आमच्या सगळ्यांच्याच ब-याच गप्पागोष्टी झाल्या. संध्याकाळ अनपेक्षितरित्या खूप चांगली गेली. मला सोडल्यानंतर काकांनी 'येत जा सुट्टीच्या दिवशी किंवा असाच अधूनमधून..' असं निमंत्रणही दिलं..

गुड्डू आणि मी तेव्हापासून 'हाय-बाय' वरून प्रमोट होऊन चांगले दोस्त बनलो आणि आता घरच्यांना मी माहित असल्यामुळे आम्हाला..खरतर तिला काहीच इश्श्यू असण्याचं कारण नव्हतं.पुणे शहर नसानसात भिनलं होतं तिच्या. दहावीत होती तरी पण बिनधास्त फिरायची इकडे तिकडे.
"तुला अभ्यासाचं टेन्शन नाही येत?"
"मुळीच नाही.. आमच्या batch पासून दहावीची मेरीट लिस्ट बंद होणारे.. फिलिंग रीलीव्ड.."
"पुढे काय करणारेस?"
"काही विशेष नाही.. यशवंतकडे कच्छी दाबेली खाऊ मग हॉंगकॉंग लेन मध्ये फेरफटका मारू. ए.. बेल्ट्स चांगले मिळतात का रे तिथे? तू पण घे एक.हा कित्ती जुना झालाय.. ए मलापण एक रिस्ट बेल्ट घ्यायचा आहे..कानातले पण बघेन.."
"श्श्... दहावीनंतर काय करणार आहेस?" मी त्रासिक चेहरा केला.
"माहित नाही... आणि ए यार.. घरात पण हेच विचारात असतात सगळे. तू मित्र आहेस कि माझे पपा?" मी गप्प बसलो कारण बारावीतल्या पोरांना असलं बोलणं हास्यास्पद वाटतं.
"आणि तू ट्वेल्थला आहेस..माझ्यापेक्षा फक्त दोन वर्ष पुढे.. डू यू रिमेम्बर?"
"असेन,पण मला तुझ्याएवढा असताना निदान सायन्स ला जायचंय एवढं तरी माहित होतं.. किंबहुना आताही मला पुढे इंजिनियरिंग करायचंय हे माहित आहे. माझं व्होकेशनल सायन्स आहे."
"तुम्ही काय बाबा.. हुशार लोक.."
मी गप्प बसलो.
"मी आर्ट्स ला जाणारे."ती म्हणाली मी चेहरा कसनुसा केला.. आयआयटी मधून बी टेक करणारी पोरं 'गेट' देऊन आयआयटी मधूनच एम टेक करणा-या मुलांकडे पाहून जसा चेहरा करतात तसाच चेहरा इंजिनियरिंग करणारी पोरं एम ए आर्ट्स वाल्यांकडे बघून करतात.. ते एक्स्प्रेशन लिहिता नाही येत पण त्यात एक वेगळीच भावना असते. जरी कागदोपत्री 'मास्टर्स' हि डिग्री मोठी असली तरीसुद्धा!
"का? नववीत चांगले मार्क्स आहेत न तुला.. काकू सांगत होत्या तू कित्ती कित्ती हुशार आहेस ते."
"म्हणून मी आर्ट्स ला जाऊ नये? आय लाईक टू ब्रेक द रुल्स. सायकलने येते ना शाळेत तेव्हा सिग्नलचे नियम पण पाळत नाही मी."
"याला अतिशहाणपणा म्हणतात."
"असतील.. मला आवडतं. आय लाईक टू रीड बुक्स,स्टोरीज, नोवेल्स ..पेपर्स.. एवरीथिंग."
"अगं पण आर्ट्स म्हणजे तेवढंच नसतं. तुला त्यांचा अभ्यास करावा लागतो.. ज्यावेळी तुला तुझ्या आवडत्या गोष्टीवरसुद्धा प्रश्न विचारून त्याची उत्तरं लिहिण्याची अपेक्षा ठेवली जाते तेव्हा ते बोरिंग होतं. इतिहास मी आता जितक्या इंटरेस्टने वाचतो तेव्हा दहावीपर्यंत नाही वाचू शकलो. कारण त्याचा अभ्यास करावा लागत होता..पण तरीही तुला इतकीच आवड असेल तर जायला हरकत नाही आर्टसला."
"हो ना? मला खरंच आर्टसला जायचं आहे रे.. एक काम करेगा? व्हाय डोन्ट यू टेल धिस टू माय पेरेंट्स?"
"मी? बघू..."

तिच्या दहावीने नसलं तरी माझ्या बारावीने आमचं भेटणं बोलणं मर्यादित ठेवलं होतं.तेव्हा तर मोबाईल वगैरे या गोष्टी बिझनेसमन लोकांच्या 'बस कि बात' होत्या.
"तुझा हॉस्टेलचा नंबर दे.."
"कशाला?"
"मला फोन करायचा असेल तर?"
"तू काय वेडी आहेस का? मी करत असतो न तुला फोन मध्ये मध्ये?"
"ते तुला बोलायचं असतं तेव्हा.. व्हॉट इफ आय want टू स्पीक टू यू??"
"नको..मी मुलांच्या हॉस्टेलला राहतो आणि मला आपल्या मैत्रीला कसली लेबलं लावायची नाहीयेत."
"कसली लेबलं?"
"ए..तुला नाही समजणार.. तू शाळेत आहेस अजून.. समजलं ना?"
"ए हट..उगाच मोठा असल्यासारखा वागू नको हां.. दोन वर्ष म्हणजे खूप मोठा नाहीयेस काही.." अर्थात तिच्या असल्या बोलण्यानंतरही मी काही तिला नंबर देण्याच्या फंदात पडलो नाही.

मी इंजिनियरिंगला गेलो तोपर्यंत हिला एस पी मधेच सायन्सला प्रवेश मिळाला होता.. माझं अडमिशनचं चालू होतं त्या दरम्यान हिच्या कॉस्मेटिक्सच्या शॉपिंग साठी आम्ही फिरत होतो.
'चिंगीला का नाही घेऊन फिरत? मला याच्यातलं काही कळतं का?"
"तिला ऑब्जेक्शन असतं.. तुला कळत नाही म्हणून तू थांबवत तरी नाहीस! बाय द वे,दीदी माझ्यासाठी क्लासेसची चौकशी करायला गेलीये. फिजिक्स सुमंत, केम पी डी के, बायो पत्की आणि maths प्रभुदेसाई.. सगळे इथल्या इथे! टेस्ट सिरीज सुद्धा सुधीर्स चे लावेन.."
"तू तर आर्ट्स घेणार होतीस ना?" मला माहित असूनही मी मुद्दाम तिला खिजवण्यासाठी विचारलं..
"तर तर.. तुझी घरच्यांशी भेट करून दिली हीच चूक झाली माझी..सारखं तुझं एग्झाम्पल देऊन 'तो बघ तो बघ ' करत मला सायन्स ला अडमिशन घ्यायला लावली. आय आस्क्ट यू टू हेल्प मी बट यू डिन्ट.."
मी हसलो.. "पुढे काय?"
"काय सारख पुढे काय पुढे काय.. काय पुढे? कायपण केलं तरी लग्न करून एक संसारी बाईच होणारे मी समजलं? ही हुशारी बिशारी काय कामाची नाही.."
"वेडी आहेस का? कितीतरी बायका पुढे काय काय करतात संसार सांभाळून.."
"कोण कोण माहितीये तुला?"
'इंदिरा गांधी, किरण बेदी अं अं.."
"दोनच? त्यापैकी माझ्या इतक्या दिसायला सुंदर कोणी आहेत का?" आयला! काय point काढला होता पोरीने!
"तू कोण समजतेस ग स्वतःला? ऐश्वर्या राय?" मला राग आला.."हां ऐश्वर्या राय.. ती तुझ्यापेक्षा नक्कीच सुंदर दिसते.." मला अचानक सुचलं.
"तिला सुंदर दिसायचेच पैसे मिळतात..मी जाऊ का मॉडेल म्हणून rampwalk करायला? नाहीतर हिरोईन म्हणून?"
"ही..ही..मराठी सिरीयल मध्ये तरी घेतात का बघ!"
"हलो..चक इट! डोन्ट अंडरएस्टिमेट मी..ओके?"
"बाय द वे, तू एअर होस्टेस का नाही होत?"
"गुड ऑप्शन..आय स्वेअर, आय अल्रेडी have थॉट अबाउट इट.. व्हाय डोन्ट यू टेल धिस टू माय पेरेंट्स?"
"मी? अं.. फेअर & लवली ची मोठ्ठी ट्यूब घे ना..पैसे तरी वाचतील. एवढी गोरी आहेस तरी कशाला लावायला पाहिजेत असली क्रीम्स? आणि हा डव्ह चा शाम्पू पण असतो ? मागच्या वेळी pantene का कुठलातरी होता.." मी विषय बदलायला म्हणून काहीतरी बोललो!
"आय नो यू आर ट्रायिंग टू अव्हॉईड द टॉपिक बट एनीवे फेअर & लवलीमध्ये ट्रिपल सन स्क्रीन आहे.. उन्हात चेहरा प्रोटेक्ट होतो.. बाकी अंगासाठी सन स्क्रीन लोशन आहे घरी त्यामुळे tanning नाही होत. आणि हे बघ.. pantene चं ते प्रो व्ही स्टफ.. इट जस डझन्ट सूट्स मा हेअर यू नो.. डव्ह मध्ये कसं.. नॉन ग्रीसी natural आमंड आणि मिनरल ऑइल्स असतात...त्यामुळे...." हा जरा जास्तच बोरिंग विषय होता.
"ए..लाईफबॉय म्हणजे स्वस्त साबण आणि लेसॉनसी आणि मोती म्हणजे भारी--म्हणजे महागातले साबण एवढंच मला कळतं. क्रीम, शाम्पू ,त्यांच्यातले कन्टेन्ट्स...मला हे काही झेपत नाही. तू खरेदी आटप म्हणजे लवकर निघू आपण.." तिने उगाचच चेहरा वाकडातिकडा केला आणि गुपचूप खरेदी आटपली.

कॉलेजला गेल्या वर तिचे ग्रुप्स वाढले, कॉलेजमध्ये फिरायचा,आर्ट सर्कलवाला,ट्रेकचा असे एक ना दोन असंख्य ग्रुप्स झाले..मित्र मंडळही वाढलं पण मी जरी दूर गेलो असलो तरी तिच्या जवळच होतो.



"ए आपण 'साथीया'ला जायचं?" मी एकदा फोन केला तेव्हा तिने विचारलं.
"मी इतक्या लांब येवू? तुझे बाकीचे फ्रेंड्स तयार नाहीत वाटतं.." मी उगीच टोमणा मारला..
"मला फक्त तुझ्याबरोबरच जायचं असेल तर?" तिला माझ्या बोलण्याचा काही फरकच पडत नसे.
"तर काय? कधी कुठे आणि किती वाजता ते सांग..परत उद्या फोन करतो.."
सिटीप्राईड, जे तेव्हा फक्त सातारा रोड लाच होतं, मुलींसाठी सेफ मानलं जायचं. त्यामुळे तिथेच आम्ही तो मुव्ही पाहिला..साल्या या एका मुव्हीमुळे 'आपणपण कुणाच्या ना कुणाच्यातरी प्रेमात पडावं' असा फील कित्येक मुलामुलींच्या मनात आला असावा अशी मला दाट शंका आहे.
बाहेर पडताना गुड्डू वॉशरूमला गेली आणि चिंगीने मला किंवा मी चिंगीला पाहिलं.. तिरक्या नजरेने ती माझ्याकडेच पाहत होती. मी वेव्ह करताच ती तिच्या मैत्रीणीना सोडून माझ्याकडे आली..
"ए.. तू इथे काय करतेयस? सॉल्लीड होता ना मुव्ही? कसा वाटला? " मी विचारलं..
"आर यु डेटिंग हर?"
"क्काय?"
"आय आस्क्ट, आर यु डेटिंग गुड्डू?" आवाजात जोर आणून तिने विचारलं.
उत्तरार्ध

1 टिप्पणी:

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!