व्यक्तिचित्रण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यक्तिचित्रण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

ताळेबंद-उरलेला

आंतरजालावरून साभार
ताळेबंद: जमेल तेवढा

आमच्या ऑफिसमध्ये घरभाड्याची पावती आणि प्रवासभत्ता (म्हणजे एल्टीये ) यावर करसवलत मिळते. त्यामुळे सरसकट सगळेच कुठूनतरी पावतीपुस्तक आणून पावत्या तयार करून सबमिट करतात. मीपण तसली एक पावती तयार करून त्यावर स्ट्याम्प तिकीट चिकटवत होतो. एक खोटी सही मारली कि पावती तयार!तेवढ्यात आमच्याच हापिसातला एक नुकताच नोकरीला लागलेला पोरगा येउन विचारतो कसा, "हा करता तो भ्रष्टाचार नाही का?" वरून "राजकारणी त्यांच्या लेवल वर भ्रष्टाचार करतात... तुम्ही तुमच्या!" असंही म्हणून गेला! नेमकं त्याचवेळेला माझ्या जिभेवर तिकीट होतं म्हणून वेळ निभावून नेता आली; नाहीतर त्याला काय प्रत्युत्तर द्यायचं हेच मला कळलं नसतं! एक ज्युनिअर येउन अपमान करून जातो म्हणजे काय? तर असो.

बाकी मला अशा ज्युनिअर्सचा, सुनेला सासुरवास करणाऱ्या सासवांचा, बायकोला मारझोड करणाऱ्या नवऱ्यांचा, शिक्षकांना उलट उत्तरं देणाऱ्या पोरांचा, रस्त्यात हुज्जत घालणाऱ्यांचा, बस मध्ये एका दाराने चढून कंडक्टर पोचायच्या आत  त्याच दाराने  उतरणाऱ्यांचा, तिकीट न काढताच लोकल प्रवास करणाऱ्यांचा, बायका-पोरींशी बिंधास  बोलणाऱ्यांचा, ऑफिसमध्ये बसून ऑफिसच्या वेळातच ऑफिसमधल्या लोकांकडे  ऑफिसमधल्या लोकांच्याच कागाळ्या करणाऱ्यांचा अशा अनेक लोकांचा वेळोवेळी प्रचंड आदर वाटत आला आहे. मानतो बुवा आपण त्यांच्या डेरिंग ला!! तसा मी मधून मधून इतर लोकांमागे जाऊन  (चौकात मामा नाहीये याची परत परत खात्री करून) सिग्नल वगैरे तोडतो परंतु यापेक्षा जास्त बंडखोरी या जन्मात जमेल असं  वाटत नाही. पोलिस कशाला अगदी होमगार्ड लोकांची पण मला दहशत वाटते. लहानपणी तर मी खाकी कपड्यामुळे पोष्टमन लोकांना पण घाबरत असे पण पुढे मोठा झाल्यावर टोपी आणि पोट यावरून मी पोलिस आणि पोष्टमन वेगवेगळे ओळखायला लागलो.

छंद म्हणायला गेलात तर तसा काहीच नाही. लहानपणी नाणी जमवायचा प्रयत्न केलेला आठवतोय पण भारतीय नाणी सोडून इतर देशांची नाणी जमवायची म्हणजे खायचं काम नाही हे लक्षात आल्यावर तो नाद सोडून दिला. मग सोपं पडेल म्हणून काड्यापेट्या जमवायला लागलो. त्या मात्र थोड्याफार जमवल्या. पण मी कोणाला माझ्या छंदाबद्दल सांगितले नव्हते. एकदा आमच्या मातोश्रींनी कचरा समजून सगळ्या काड्यापेट्या एकत्र करून त्याला काडी लावली. मी नसताना! मला ते कळल्यानंतर मी रडून धिंगाणा घातला होता. पुढे मोठा झाल्यावर बायोडाटा मध्ये कोणाचं तरी बघून मी 'लिसनिंग म्युझिक' असा छंद लिहायचो. पहिल्याच मुलाखतीत कुठल्या पद्धतीचं संगीत आवडतं ? आणि आवडते संगीतकार कोण वगैरे अवघड असे प्रश्न त्या छंदामुळे पडल्यामुळे माझी विकेट  पडली होती. ताबडतोबीने छंद बदलून मी "रिडिंग" करून टाकला! त्यापुढच्या इंटरव्यूत विचारल्या गेलेल्या "काय वाचायला आवडतं ?"  या  प्रश्नाचं माझं "पेपर" हे उत्तर ऐकून प्रश्नकर्ता गडबडल्याचं  आठवतंय!

व्यसन म्हणायला गेलात तर वडील पैसे देत होते तेव्हा बरीच केली.. 'जे मला पाहिजे ते मी मिळवतोच' ह्या जाहिरातीतल्या खोट्या आवेशापाई मी बरेच दिवस ब्रिस्टल ओढ़त असे.. नंतर मी पैसे कमवायला लागल्यावर फोर स्केअर वर आलो.. लग्न झाल्यावर मात्र व्यसन न करण्याचं व्यसन लागलं.. जेमतेम घरखर्च चालवू शकेन इतपत नोकरी मिळाल्यावर काही महिन्यातच स्थळ सांगून आलं. हे मुला मुलींनी बाहेर भेटायचं फ्याड मला तितकसं पसंत नव्हतं परंतु दोन्ही पार्ट्यां कडून आपण कसे एडवान्स आहोत हे दाखवायची स्पर्धा असल्याने ही नौबत आली होती.. शिवम हॉटेल ही इडली डोसा चापायची आणि सांबर ओरपायची जागा. भविष्याचे आराखडे हे रूपाली-वैशालीत बांधायचे या माझ्या मताला कोणी कसपटाची किंमत दिली नव्हती! "उलट त्या पोरीनेच सुचवलं आहे-थोडं स्वस्त.. थोड़े पैसे वाचवायला शिक.." असं सुनवण्यात आलं. 

मी थोडा भाव खायचा म्हणून उशिराच पोचलो तरी तिचा पत्ता नव्हता. मग काहीतरी चाळा पाहिजे म्हणून एक गुडनगरम मारली तेवढ्यात ती आली..  तिने मला ऑर्कुटवर पाहिलेलं  होतं त्यामुळे ओळखलं,  मी पण तिचा फोटो आधी बघितल्यामुळे(च) तिला ओळखलं. (हिच्या ऑर्कुटवर करीना कपूरचा फोटो लावला होता!) ती माझ्या दिशेने आली आणि हाय हॅलो च्या आधी तिने
"शी बाई हा वास कसला? तुम्ही सिग्रेट पिता की काय?" असा  प्रश्न केला!
कोणतीही मुलगी हे असं डायरेक् विचारू शकते हे मला माहीत नव्हतं..आणि "मुलगा सुस्थापित - निर्व्यसनी" अशी माझी धड़धड़ित खोटी जाहिरात केली गेली होती हे मला मुलीकडून कळलं! 
"आं.. नाही मी ते आपलं हॉल्स आणायला गेलो होतो.. तेव्हा एक मित्र भेटला तो सुट्टा मारत-म्हणजे ते फुकत-आपलं ते हे-सिगरेट ओढ़त होता आणि ते म्हणतात ना.. धूर…  धुर माझ्यावर सोडत होता.." उजव्या हाताची दोन बोटं ओठांसमोर हलवून मी तिला एक्सप्लेनेशन देत होतो आणि डाव्या हातातल्या दोन हॉल्स तिला देत होतो. 
" तेच म्हटलं, मला तर सांगितलं होतं की सुपारीच्या खांडाचंपण व्यसन नाही मुलाला.. मला हा सिग्रेटच्या धुराचा वास अजिबात सहन होत नाही.. लग्नानंतर तुम्ही असल्या मित्रांची संगत सोडाल तरच बोलू आपण पुढे!" आयुष्यात एक गोष्ट मी  स्वत:च्या मताने करत होतो ती पण आता सोडली पाहिजे! 'नाय' म्हटलं तर "मी फुकतो" याची जाहिरात होणार आणि पोरगी स्वतःहुन पटेल असं दाखवण्यासारखं माझ्याकडे काहीही नव्हतं आणि नाही! शाळा कॉलेजात " आपल्याला काय इंट्रेस्ट नाय रे पोरींबिरित! " असं सांगून पोरगी न पटण्याचं शल्य दोघाचौघात जाहिरपणे लपवता येत असे पण आयुष्याच्या शाळेत,आपल्याला फोटो बघून पसंत केलेलं असताना, निव्वळ सिगरेटीच्या मोहापायी आपण ते नाकारावे याची मला हिंमत होईना. पुढचा तास भर तिने माझा इण्टरव्यू घेतला आणि मी आयुष्यभर तिच्या ताटा खालचं मांजर बनून राहू शकतो याची तिने खात्री केल्यावर मी आमचं दोघांचं बिल भरलं.

असो. यथावकाश (वशिल्याने का होईना) नोकरी मिळाली, छोकरी मिळाली आणि छोकरी झाली सुद्धा! तशी ती होईपर्यंत लहान पोरं मला कधीच आवडली नाहीत. मी स्वतः लहान असेपर्यंत "मुले हि देवाघरची फुले" हे वाक्य मला आवडत असे पण मोठा झाल्यावर आणि नातेवाईकांची वगैरे खरोखरीची मुले बघितल्यानंतर वरचे वाक्य साफ खोटे आहे यावर माझा पक्का विश्वास बसला. कोणाच्याही घरी लहान मुल असले आणि मी काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर साधारण ९० टक्के वेळ हा त्या लहान पोराचं/पोरीचं कौतुक ऐकण्यात जातो! त्यात त्या लहानग्याने दाराची कडी कशी लावून घेतली इथपासून टीव्हीचा रिमोट कसा लपवून ठेवला इथपर्यंत सगळ्याचा समावेश असतो.
लहान मुलांनी चष्मा तोडला-कौतुक  ; मोठी चप्पल घातली आणि धडपडली-कौतुक ; घाणेरड्या पायाने गादीवर/सोफ्यावर चढून उडी मारली -कौतुक; पिठाचा डबा सांडला-कौतुक; झोपलेल्या माणसाची मिशी/शेंडी ओढली- कौतुक आणि वरून कित्ती लब्बाड माझं पिल्लू चं पालुपद! वास्तविक पाहता याच गोष्टी जर कुणा मोठ्याने केल्या तर त्याला अद्वातद्वा बोलणाऱ्यांना लहानाने केल्यावर त्याचं काहीच वाटत नाही हे विशेष! !

लग्नानंतर एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. म्हणजे त्याने बोलावलेलं मुलाच्या महिन्याभरानंतर केलेल्या बारशाला, पण स्पष्ट सांगायचं तर मी जेवणाच्या वेळेच्या जरा आधीच जातो. लग्न , मुंजी, वाढदिवस बारशी या सगळ्यात जेवण हाच मुख्य कार्यक्रम असतो.. तर फ्लेक्स वर आधीच छापून आणलेले आणि भिंती आणि पाळण्यावर लटकवलेले नाव बाळाला ठेवण्याचा औपचारिक कार्यक्रम आटपल्यावर आमच्या बायकोने त्याच्या गळ्याच्या शिरा ताणून रडणाऱ्या लहान म्हंजे अगदीच इतकुश्या मुलाला खेळवायला सुरुवात केली. तेवढ्यात मित्राच्या बायकोने तिला हाक मारली तर तिने ते लटांबर (दुपट्या बीपट्या  सकट) माझ्याकडे सोपवलं आणि आत गेली. त्या गोळ्याने रडणं थांबवून जरावेळ माझं निरीक्षण केलं. तोंडातून थुंकी काढून दाखवणे, फुर्रर्र करणे वगैरे शक्य तितके किळसवाणे प्रकार केले आणि एकदम हातपाय हलवायचे थांबला! मला माझं पोट गरम होत जातंय असं  जाणवलं आणि झटक्यात शर्ट ओलेते झाले! मी गडबडून बायकोला हाक मारली. तर तिने येउन "अग्गोबाई, थांब्ला कि रडायचा" वगैरे म्हणून त्या मूढ मंद गोळ्याचंच कौतुक करायला सुरवात केली! वरून मित्राच्या बायकोला बोलावून तिच्या पोराने माझ्या पोटावर फार मोठ्ठा पराक्रम गाजवला आहे अशा पद्धतीने तिला काहीबाही सांगू लागली. माझी अवस्था काय झाली म्हणून सांगू तुम्हाला! एकदा का पाणी कपड्यांच्या आतून पोटाच्या खाली उतरलं कि मग तुम्ही कोणाचे राहत नाही हे काय मी सांगायला हवं? असो! मित्र फिदीफिदी हसत इतरांना त्याचं पोर नेमकं ऑफिसला जायच्या वेळी त्याचे कपडे कसं भिजवतं जे कौतुकाने सांगत बसला.. वहिनींनी मित्राचे शर्ट प्यांट ऑफर केले खरे पण "प्रॉब्लेम बाहेरच्या कपड्यात नाहीये" हे चारचौघात सांगण्याचं अवसान मी काही जमवू शकलो नव्हतो! माझ्या भिडस्तपणामुळे हापिसात मला इतरांना माझंच  काम समजावून सांगत येत नाही, अहो साधं सलून वाल्याला केस कसे कापून हवे आहेत ते सांगता येत नाही. तर इतर कोणाच्या बायकोला एवढ्या अवघड गोष्टी कशा काय सांगणार? दुर्दैव म्हणजे या लहान कार्ट्याना कसा कोण जाणे पण मी आवडतो नाहीतर आईशिवाय कोणाकडेही गेल्यास कर्कश्श आवाजात भोकाड पसरणारी कार्टी माझ्याकडे शांत कशी काय राहिली असती? आमच्या मुलीच्या बाबतीत मी मात्र असं  काही करत नाही. माफक लाड करतो म्हणा.. पण ते वेगळं! आमची पोरगी या बाकीच्या कार्ट्यांसारखी नाहीये मुळी!!

बाकी तसा माझा हा भिडस्तपणा 'झाकली मुठ' सुद्धा ठरला आहे म्हणा! सासुरवाडीला गप्प बसून राहण्यामुळे काही अनपेक्षित गोष्टी पदरात पडल्या आहेत. हापिसात नेमाने दिवाळीला सलग सुट्ट्या मिळत आहेत. सासुरवाडीला पहिल्या दिवाळसणाला अंगठी दिल्यावर मी गप्प बसून राह्यलो तर सासर्च्यांनी 'मी नाराज आहे' असा अर्थ लावून चेन दिली. तरी मी गप्पच बसलो. बायकोने 'ते तस्सेच  आहेत' असं  सांगितलं नसतं तर अजून काहीतरी मिळालं असतं.  पण असो.. थोडक्यात सुख महत्वाचे! माझ्या मागे दागिने करून द्यायला तगादा लावणारी ही मला काही मिळतंय म्हटल्यावर नको म्हणते याचीच मला कमाल वाटली होती!

तर दागिन्यांनंतर आमच्या बायकोला (आणि त्यामुळे मला) कसलं कौतुक असेल तर सिनेमाचं. प्रत्यक्षात तर हिरो वाट्याला आला नाही तर निदान पडद्यावर बघून खुश होऊ हा हेतू असावा तिचा; पण माझी जाम गोची होते. मी एवढा इन्व्हॉल्व्ह होऊन जातो की विचारू नका.. पडद्यावर अमिताबच्चन (हे असंच म्हणतात ना?) ने रडण्यासाठी डोळे लाल केले कि माझ्या डोळ्यातून टीपं गळायला लागतात, कुठल्या सस्पेन्स सिनेमात दरवाजा करकरला कि माझी हवा टाईट होते, कोणी मारामारी करायला लागलं की उसना जोश चढतो! घरात टीव्ही वर पण बातम्या वगळता काही चालू असलं की माझं असं होतं. कितीही कंट्रोल करायचं म्हटलं तरी त्या हिरो च्या जागी स्वतःला बसवल्याशिवाय माझं सिनेमा बघणं पूर्ण होत नाही.  नवीन लग्न झाल्या झाल्या आमची ही 'चला न, पिच्चर्ला जावया' म्हणायची आणि आम्ही जायचो सुद्धा!! पण नंतर एकदा 'धूम थ्री' सिनेमा बघून आम्ही आमच्या हिरो होंडा सी-डी हंड्रेडवरून घरी आलो आणि त्यानंतर तिने परत कधी सिनेमाला जाण्याचा लकडा लावला नाही. का कोण जाणे! मग आम्ही सुद्धा कधी सिनेमा बघायला थेट थेटरात गेलो नाही! हल्ली त्या मैत्रिणी मैत्रिणी मिळूनच जातात. आपला त्याला सुद्धा आक्षेप नाही.. 

तर असं आपला अगदी आत्ताआत्तापर्यंत चा जीवनप्रवास.. जाम म्हणजे जाम बोर. पण लहानपणापासून  लाईफमध्ये तसं पब्लिकला खुलवून खुलवून सांगण्यासारखं काही घडलंच नाही. म्हटलं तर आताच्या तुलनेत गरिबी होती पण माझ्या बरोबरीचे सगळेच तसे होते तर माझ्याच गरिबीचं काय म्हणून मार्केटिंग करणार? 'चालत 4 किलोमीटर शाळेत जात असे' म्हणावं तर माझ्या शाळेतली सगळीच तशी येत असत! आणि शाळा जितकी आवडली नाही तितका जास्त मला तो जाण्यायेण्याचा प्रवास आवडत असे..लहानपणी 'मिणमिणत्या बल्बच्या उजेडात अभ्यास करत असे' म्हणावं तर झगझगीत ट्यूबच्या उजेडात अभ्यास करून मी जीवनात काय असा उजेड पाडणार होतो? माझ्या आयुष्यात घडलेले प्रसंग कित्येकांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने घडलेच असतील पण म्हणून काय मी आत्मचरित्रच लिहायचं नाही काय?

तसं तिशीत गेल्यावर असलं काहीतरी लिहिणं हे अतीच होतं पण मला आताच लहानपणीचे किस्से अंधुक आठवतात तर आत्मचरित्र लिहीणाऱ्या  महान लोकांना सत्तर-ऐंशीव्या वर्षी त्यांच्या बालपणातले प्रसंग जशेच्या तशे कशे काय आठवतात कोण जाणे. आता तसाही महान बिहान होण्याचा माझा चान्स एव्हाना संपल्यातच जमा आहे.. पदरात (बायको आणि बायकोच्या पदरात ) मुलगी आहे. त्यामुळे अगदी काही असामान्य करायचा विचार जरी आला तरी परिस्थितीची जाणीव  कर्तृत्वाला लगाम घालते.. (वा वा! क्या बात है! असली वाक्य ऐकायला बरी वाटतात आणि मला कधी कधी सुचतात याचपण माझं मलाच कौतुक वाटतं.) म्हणून म्हटलं, आठवतंय तेवढं लिहून काढावं. अगदीच चरित्र लिहायचं झालं तर मूळ साचा तयार असावा! त्यातल्याच काही गोष्टी मीठमसाला लावून अजून रंजक करून टाकता येतील. मला उपयोगाला नाही आलं तरी इतरांना-त्यांच्या आत्मचरित्रात!

थोडक्यात एखाद्या सामान्य माणसाचा या वयापर्यन्तचा ताळेबंद थोडाबहुत असाच असेल. आतापर्यंत आयुष्यात जे जे घडलं आहे त्यातलं एवढंच लक्षात आहे त्यामुळे डायरेक 'संपलं' असं म्हणण्यापेक्षा एखाद्या साहित्यिकासारखं 'आटोपतं घेतो'! धन्यवाद...

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

ताळेबंद-जमेल तेवढा

आंतरजालावरून साभार
मी अमुक अमुक..अं हं हं.. लगेच फेसबुकवर शोधू नका.. तुम्हाला वाटतोय तो मी नव्हे. अहो खूपच कॉमन नाव आहे माझं. असो.. आज काय प्रयोजन.. तर तसं काहीच नाही. बोलावसं वाटलं म्हणून बोलतो. जेव्हापासून मला समज आली तेव्हापासून खूपदा हे असं फिलिंग येतं मला, पण घडाघडा बोलून टाकता येत नाही. शाळा कॉलेजात- वर्गात असताना ब-याचदा मला शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर येत असत..पण मी कधी बोललो नाही. गुरुजी बाई म्याडम किंवा सरांनी प्रश्न विचारला आणि 'मला उत्तर येतंय' असं वाटत असलं कि प्रत्येकवेळी 'ह्या..एवढं सोप्प असतं तर थोडीच विचारलं असतं?' किंवा 'त्या हुशार मुलाने/मुलीने हात वर नाय केला मग आपण कसा करायचा?'  किंवा ' सांगितलं आणि चुकलं तर? आणि मग सगळे हसले तर?' हा अधिकचा प्रश्न मला पडायचा आणि मी उत्तर देणं टाळायचो. नंतर कोणीतरी उत्तर दिलं आणि ते माझ्या उत्तराशी जुळत असलं कि हळहळ वाटायची.. तेव्हा आज ठरवलं कि वाटतंय न मग बोलून टाकूया..ऐकायचं ते ऐकतील.नाय ते सोडून देतील. इथे मार्क थोडी ना आहेत..

आता मी काही लेखक वगैरे नव्हे त्यामुळे साधं शुद्ध लिहायलाही जमत नाही. पण निदान नेहमी ऐकतो तसच्या तसं लिहायचा प्रयत्न करतो. सिंह शब्द 'सिंव्ह' असा म्हणायचा आणि 'सिंह' असा लिहायचा यामुळे काय साधतं ते मला पण कळलं नाही! (होय ला पद्धतशीर 'होय' लिहायचं पण नाय ला 'नाही' असं का? ते कळत नाय-आपलं-नाही) हल्ली शेजा-याचा तिसरीतला मुलगा किंवा पहिलीतली मुलगी असले प्रश्न विचारतात..उत्तर नाही आलं तरी त्यांचं कौतुक वाटतं. कबूलच करायचं झालं तर मला हा प्रश्न तिने विचारेपर्यंत पडला नव्हता! हल्लीची पिढी खूपच हुशार. जनरेशन ग्याप ला ग्याप म्हणायला लाज वाटावी एवढी मोठी झाली आहे ती..ग्याप कसली दरी आहे मोठ्ठीच्या मोठी.

मी शाळेत असताना, कधीतरी खर्चाला मिळणा-या ५ रुपयाच्या नोटेवर 'मैं धारक को अमुक अमुक रुपये अदा करने का वचन देता हुं' असं का लिहिलेलं असतं हा मला पडलेला आणि कोणाला उत्तर माहित नसलेला कठीण प्रश्न! मला असं प्रश्न पडला आणि पडू शकतो याचा मला कोण अभिमान वाटला होता. त्यानंतर मग कठीण म्हणावा असा प्रश्न पडला नाही. कधी पडलाच तर त्याच उत्तर 'येवढा मोठ्ठा झालास तरी साधं येवढं कळत नाही?' किंवा 'नुसता वाढला रेड्यासारखा पण अक्कल काडीची नाही' किंवा 'गप्प बस' यापैकी एक होतं. तसंही मी प्रश्न विचारतोय आणि समोरच्याने उत्तर देणं अपेक्षित आहे हे प्रसंग सुद्धा माझ्या आयुष्यात मोजकेच आले. अन्यथा बायको, शिक्षक, प्रोफेसर्स, नातेवाईक ,साहेब हा प्रवर्ग अनुक्रमे घर, शाळा,युनवर्सिटी,  हॉपीस या ठिकाणी खिंडीत गाठून मलाच प्रश्न विचारण्यासाठी जन्माला आला होता याबद्दल माझ्या मनात अजूनतागायत शंका नाही.

शाळेत शिकलो मराठी मिडीयम मधून पण फक्त म्हणायला आणि इलाज नव्हता म्हणून. अभ्यास वगैरे जेमतेमच केला. आता 'जेमतेम केला' म्हणजे तेवढाच यायचा. जास्त करायचा ठरवला असता तरी मला करता आला नसता.  आमची आई तर सुरुवातीला "आमच्या वेळी आम्हाला परिस्थिती मुळे  जमलं नाही, तुम्ही शिकून मोट्ठे व्हा' वगैरे डायलॉक्स मारायची. मी खूप इमोश्नल  होऊन जायचो आणि तावातावाने पुस्तकाचं पहिलं पान वाचून काढायचो.  इंग्रजीचं असेल तर डिक्शनरी वगैरे उघडून बसायचो.पण कितीही इमोशनल झालो तरी माझा उत्साह दीड पानात गळून पडायचा. कांबळी नि तेंडल्याचं करियर जास्त आकर्षक वाटायचं! अशी कित्येक पुस्तकांची पहिली पानं मी कित्येकदा नव्याने वाचली आहेत पण परीक्षेत कधीच पहिल्या पानात उत्तर असणारा प्रश्न कधीच विचारत नाहीत हे इतक्या परीक्षांच्या अनुभवांवरून मी छातीठोकपणे सांगू शकतो! अपवाद आमच्या दहावीत असणारा 'नरिंद्रबासा भेटी अनुसरण' नावाचा टुकार एक पानी धडा! तो अक्खा धडा पाठ असूनही त्यावरच्या एकाही प्रश्नाचं उत्तर धड जमलं नाय बुवा. त्या धड्यावर थोडक्यात उत्तरं असूदेत किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण असुदेत मी जवळपास सगळा धडाच लिहीत असे आणि जमतील तितके मार्क गोळा करीत असे!

तर एवढा(स्सा) अभ्यास करूनपण आईचं  तेच पालुपद!  "आमच्या वेळी आम्हाला परिस्थितीमुळे जमलं नाही आणि हे कार्टं  बघा!" एवढाच काय तो वाक्यात बदल. त्यामुळे मी माझं बरचसं लहानपण मी खूप मोठ्ठ्या भावनिक दबावाखाली काढलं. पण इतरांना आणि त्यावेळी मलादेखील ते कळलं नाही. जरा मोठं झाल्यावर एकदा मला बाहेरून परीक्षा देता येतात ते कळलं. मला वाटलं आईसाठी हि चांगली संधी आहे. पुढे एकदा तिने तो पठडीतला डायलॉक मारल्यावर मी म्हटलं कि "आई, आता तू अभ्यास करून बाहेरून परीक्षा देऊ शकतेस!" तर जी भडकली म्हणता! पाठीचं धीरड  होईपर्यंत धोपटलं  मला. जाम रडलो होतो तेव्हा. त्यानंतर समजलं कि   मला निव्वळ इमोशनल ब्ल्याकमेल करण्यासाठीच तिला ते वाक्य आवडायचं कारण त्यानंतर तिने कधीच हे वाक्य माझ्यावर फेकलं नाही!

बाबांनी तर मला जाम धुतला आहे. माझ्याच वस्तू मोडणे, हरवणे, वापरण्याच्या लायकीच्या न ठेवणे, नवीन वस्तूंसाठी हट्ट करणे, बेहिशेबी मालमत्ता जमवण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या लक्षात येईल इतका जास्त वेळ खेळणे अथवा घराबाहेर घालवणे, अभ्यास न करणे इत्यादी (माझ्या दृष्टीने) किरकोळ गुन्ह्यांकरता त्यांनी आपला हात साफ करून घेतला आहे. कधी कधी तर त्यांना फक्त खुमखुमी आली म्हणूनही फालतू कारण उकरून काढून धोपटला असावा असा माझा कयास आहे! मी मोठा झालो आणि सरकार-मध्यमवर्ग, पोलीस-मोर्चेकरी, सरकारी अधिकारी- गरजू व्यक्ती याची नाती बघतो तेव्हा कळतंय कि उलट मारू न शकणाऱ्याला असंच धोपटण्यात कोणालाही मजाच येत असावी! आमचं  कुठलं एवढं सुदैव?

आता जेमतेम तिशीचा आहे मी.. थोड इकडे तिकडे..(खरंतर बराचसा तिकडेच) पण आताच 'आमच्या काळात हे असं होतं' म्हणण्यासारखी परिस्थिती बदलली आहे.  काय महाग झाल्याहेत वस्तू. सोनं 30000 रुपये तोळा झालंय म्हणे.. जेमतेम 3000 रुपये तोळा असतानाचे दिवस माहित आहेत आहेत मला.. पेट्रोल तर 10 रुपयाने होतं. आमची आजी लहानपणी 'आमच्या काळात 300 रुपयाने होतं सोनं' वगैरे गोष्टी सांगायची पण त्या हिशेबाने मी सत्तरीत पोचल्यावर आताचे रेट असणं अपेक्षित होतं पण काहीतरी गंडलंय खरं. महागाई वाढली असं म्हणायला गेलो तर परवा टीव्ही  घेतला, आमच्या बाबांनी दहा-पंधरा वर्षापूर्वी घेतला होता त्याच किंमतीत आणि  त्याच्यापेक्षा कैकपट भारी. काय पिक्चर क्वालीटी आहे म्हणून सांगू..

लहानपणी या टीव्ही वरची 'मम्मी' बघून मला शिवाजी महाराजांसारखं  'अशीच अमुची आई असती वगैरे वाटायचं'  पण आमच्या आईकडून तर बहुतेकदा मार आणि रोजच्या दोन वेळच्या जेवण्याव्यतिरिक्त इतर काही खायलाही मिळालंही नाही..  मॅगी वगैरे तर लांबची गोष्ट! तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराज आणि त्यांच्यासारख्या मोठ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींना ते मोठे झाल्यावर महत्व आलं असावं. कारण एकदा एका १ ऑगष्टला टिळकांवरती बाकीच्यांनी केलेल्या भाषणं प्रेरित होऊन, मी वर्गात 'मी कागद फाडला नाही मी कपटे उचलणार नाही असं सांगितलं होतं' पण त्याला कोणीच 'बाणेदारपणा' वगैरे म्हटलं नाही. बाईंनी २५ उठाबशा काढायला लावल्या आणि झाडू घेऊन सगळा व्हरांडा झाडायला लावला होता. तेव्हापासून माझी हि समजूत दृढ होत गेली आहे.

'उच्च' शिक्षणासाठी (म्हणजे बी ए) मुंबईत गेल्यानंतर कॉलेजामधली एकंदर परिस्थिती बघता मला मराठी मिडीयम मधून शिकल्याची तशी लाजच वाटायची. बाहेरच्या राज्यातून आलेली मुलं हिंदी इंग्रजी बोलून एकमेकांवर ,शिक्षकांवर आणि विशेषकरून मुलींवर छाप पडत असत. आलेल्या मुलांवर मी उगीच हिंदीतून बोलून इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करायचो. ती पोरं हिंदीतून बोलायची तेव्हा मला कधी मराठी बोलावसं वाटलं नाही. मला वाटायचं कि असं केलं तर पोरं मलाच हसतील.आणि फ़क्त मीच असा नव्हतो..बरेच होते.. 'इंग्रजी बोलता न येण्याचा न्यूनगंड फ़क्त हिंदी बोलून दूर सारता येतो' या मताचे.. त्यामुळे माझं इंग्रजी तसंच राहिलं आणि मराठी असल्याचा सुगावा इतरांना लागू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहिलो..आईवडिलांनी इंग्लिश मिडीयम च्या शाळेत न घातल्याबद्दल त्यांना दूषणं  देत बसलो!बरेचसे तसंच करायचे.

एक मात्र होतं, कॉलेजात गुजराती पोरं एकमेकांशी गुजरातीतून बोलत, आंध्रची तेलुगुतून, केरळची मल्याळीतून परंतु हीच मुलं शिक्षकांशी, जमत असेल तर अस्खलित, नसेल तर तोडक्या मोडक्या इंग्रजीतून बोलत.. आम्ही मराठी मात्र एकमेकांशीही हिंदीतून बोलत असू आणि शिक्षकांशीही.. मराठी वापरली ती फ़क्त शिव्यांपुरती! मराठी शिकू पाहणाऱ्या परप्रांतियांना शिकवल्या त्या मराठी शिव्या! त्या मुलांना कधी मराठीमुळे अडेल अशी वेळच येऊ दिली नाही.. कायम त्यांचा भाषान्तरकार म्हणून वावरलो.पण मी मिक्स नाही होउ शकलो.. खरतर त्यानाच मी कितपत हवा होतो काय माहीत! त्यांच्या ग्रुप मध्ये मी असताना ते एकमेकांशी त्यांच्या भाषेत बोलत असत; मला समजत नाही याचा विचार न करता.. परंतु मी मात्र, ग्रुपमध्ये एखादाही मराठी न समजणारा असा कोणी असेल तर त्याला कळावं  म्हणून न चुकता हिंदीतून बोलत असे. सहिष्णुता कि सगळा व्हरन्याक असल्याचा परिणाम! कोण जाणे? असो.. आता मुलीला इंग्रजी मीडियम शाळेत घालून पापक्षालन करीन म्हणतो..

शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी फार आटोकाट प्रयत्न केले..  पण स्वतःची पब्लिसिटी करणं मला जमलंच नाही. 'मी आहे तसाच मला घ्या आणि मला हव्या त्या पगारावर ते पण मुंबईतच!!' हा मित्रांच्या टोळक्या बरोबर जमवलेला उसना एट्टीट्यूड पहिल्या काही मुलाखतीत गळून पडला.. "तुम्ही म्हणाल ते आणि पडेल ते काम करायला तयार आहे..काही महीने फुकट करतो हवं तर! तेही कुठेपण" इथपर्यंत माझं ट्रांझिशन व्हायला काहीच दिवस पुरले. बाबांच्या वशिल्याने मी पुण्यात आता आहे तिथे नोकरीला लागलो. तिथपासून आजवर केवळ नोकरी टिकवणे हा माझा उद्देश राहिला आहे. नोकरीवरुन तड़काफड़की काढू नये आणि शक्यतो सुट्टीच्या दिवशी सुट्टी मिळावी या दोन माफक अपेक्षा घेऊन मी पाट्या टाकत आहे! 

घरी आलो की मात्र नेमाने दमल्याची ऍक्टिंग करतो.. ते पण मला सुरुवातीला माहित नव्हतं पण नवीन लग्न झाल्यानंतर  पहिले काही दिवस  ऑफिसातून आल्यावर बायको ' दमला असाल ना, चहा करते' असं म्हणत असे.. दिवसातला तो तासभर बसल्या बसल्या चहा मिळतो, कुठे जायचा धोशा मागे लागत नाही, हवं ते चॅनल बघता येतं, कसल्या घरगुती तक्रारी सांगितल्या जात नाही, डोळा लागला तरी खपून जातं या आणि अशा विविध फायद्यांची जाणीव झाल्यामुळे मी ती एक्टिंग करायला लागलो आणि नंतर ती अंगवळणीच पडली! नाहीतर दिवसभर खुर्चीत बसून कसला आलाय थकवा? माझ्या बघण्यातला बैठं काम करणारा कोणीही नोकरदार दिवसभर मान मोडून फक्त काम करतोय आणि खरोखर 'दमलाय-बिमलाय' असे पाहण्यात नाही.. पण वर्षानुवर्षे ऑफिसमधून येणाऱ्या नोकरदार पुरुषवर्गाला घरात हक्काने मिळणारा परंपरागत वेळ आपण का उपभोगू नये हे आपले माझे मत! अर्थात कच्चेच! 

नोकरीच्या ठिकाणी सुद्धा माझी फारशी पक्की मतं नसतात. त्याक्षणी त्यावेळी मला जे पटेल तेच माझं त्यावेळचं मत असतं.  आता बघा, सरकारी लोक, राजकारणी हे लोक करत असणाऱ्या करप्शन विरोधात मी कधीकधी तावातावाने बोलतो  (म्हणजे अजूनपर्यंत तीनदा बोललोय) आणि माझा राग व्यक्त करतो. सगळीकडेच. परवा तर म्हणजे गंमतच झाली....

ताळेबंद : उरलेला

गुरुवार, १५ जानेवारी, २०१५

वर्दीतले सर

याला ‘एस एम’ मधे घाला असं खामकर सरांनी माझ्या बाबांना सांगितलं आणि पहिलीपासून माझा ‘एसेम’मधला प्रवास सुरू झाला.अगदी दहावीपर्यंत. खामकर सर हे एस. एम. हायस्कूल मधल्या कित्येकांसारखे माझेदेखील आद्य गुरु! तरीही या सुखद प्रवासात काही असे शिक्षक भेटले ज्यांचाशिवाय हा प्रवास नक्कीच साहसी आणि रंजक झाला नसता..

प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्यदिन हे एस एम च्या मुख्य ‘सणां’पैकीचे दिवस.लहानपणी माझे हे दोन्ही दिवस आई-बाबांच्या ऑफिस मधेच साजरे होत असत.पाचवीमधला स्वातंत्र्यदिवस हा माझा शाळेत साजरा होणारा पहिलाच स्वातंत्र्य दिवस होता. सात वाजायला अजून अवकाश होता तरीपण स्कूलबस च्या वेळेनुसार शाळेसमोरच्या प्रांगणात सगळी मुलं जमली होती. आमचे पी ई चे शिक्षक जरब दाखवून मुलांना शांत बसवत होते पण मुलांची चुळबूळ काही थांबत नव्हती. एक-दोन जणांनी फटके सुद्धा खाल्ले असावेत. तरीही हळू आवाजात गोंगाट चालूच होता. तो काही पूर्ण शमत नव्हता. त्याचवेळी एका बाजुला खाकी पोशाखधारी मुलांचा एक चमू उभा होता. शांत आणि शिस्तीत.सगळ्य़ांच्या पायात काळे कुट्ट चकाकणारे लेदरचे शूज,त्यात काळे सॉक्स,खाकी (आणि  ओवरसाईज्ड) हाफ पँट्स, त्यावर आमचे पट्टे असत त्याच्या तिप्पट रुंदीचे पट्टे,पूर्ण बाह्यांचे पण कोपरापर्यंत दुमडलेले शर्टस,खांद्यावर पिवळ्या रंगाची अक्षरं मिरवणारे लाल बिल्ले. डोक्यावर एका बाजूला कललेली कॅप आणि त्यावर लाल लोकरीचा गोंडा! त्यांच्यातलाच एक मुलगा त्यांना ऑर्डर्स देत होता आणि तो पूर्ण ग्रूप त्याप्रमाणे वागत होता. मी शेजारीपाजारी चौकशी करून घेतली. तेव्हा कळलं हि ‘एन सी सी’! त्यांचे सर अजून यायचे होते.तरीपण मुलं अजिबात दंगा करत नव्हती. शहाण्या मुलासारखी वागत होती. आमच्या वयाच्या मुलांसाठी ही खरंच कौतुकाची बाब होती.

तेवढ्यात त्यांचे सर आले. तसाच खाकी परंतु पूर्ण पोशाख आणि कडक भासणारा अवतार. आपली जागा घेउन त्यांनी हुकुम सोडला ‘परेssssड साव्धान’! आणि पुढच्या क्षणापासून ती जवळपास पन्नासजणांची पलटण कोणताही गडबड गोंधळ न घालता त्यांच्या सुचनेबरहुकुम वागू लागली. मला तेव्हा वाटलं होतं कि हि व्यक्ती बाहेरून फक्त एन सी सी च्या मुलांसाठी एस. एम. मध्ये येते परंतु नंतर  कळलं कि ते इथेच शिक्षक आहेत. ए एन पाटील सरांचं माझ्यावर पडलेलं पहिलंच इम्प्रेशन असं होतं. या व्यक्तिला पाहून कोणी आणि का भारावून जाउ नये? त्यावेळेपासून मला आपलंही एन सी सी मध्ये सिलेक्शन व्हावं असं प्रकर्षाने वाटत राहिलं.

मी सहावीमध्ये असताना आमच्या बंधुराजांचं एन सी सी मध्ये सिलेक्शन झालं आणि आमच्या घरात तो ड्रेस आला.शूज आले.गोंड्यावाली टोपी आली. सगळं  सगळं शाळेकडून मिळतं हे माझ्यासाठी अजून आश्चर्यजनक होतं. तेव्हा कळलं कि सर शुक्रवारी आणि शनिवारी शाळा सुटल्यानंतर थांबून मुलांकडून हे सगळं करून घेतात. मग कधी शाळेत थांबून मी दादा कशी practise करतो ते बघत असे.शाळा सुटल्यावर मैदानावर जमलेली --एन सी सी ची -- ग्रुप ग्रुप ने गप्पा मारत असणारी मुलं, सरांनी मैदानावर येत ‘फॉssssल इन’ अशी गर्जना केली कि उंचीनुसार एका रेषेत उभी रहात असत. ‘परेssssड साव्धान..विश्राम..’ एकापाठोपाठ एक ऑर्डर्स सुटत असत आणि मुलं न चुकता त्या फॉलो करत असत.

आठवीमध्ये `एन सी सी इच्छुकांनी ए एन पाटील सरांशी संपर्क साधावा अशी नोटीस फिरल्यानंतर लगोलगच्या सुट्टीत त्यांना जाऊन भेटणा-यांमध्ये मी होतो.  वरकरणी कडक वाटणारे सर प्रत्यक्षात बरेच सौम्य आहेत हे तेव्हा कळलं.  सरांनी उंची,वजन यासारखे बेसिक सिलेक्शन क्रायटेरिया लाऊन काही मुलं सिलेक्ट केली पण नंतर  "माझ्याकडे झालं म्हणून फायनल सिलेक्शन झालं असं नसतं. बटालियन चे ऑफिसर येउन फायनल करणार. "  सरांनी सांगितलं. त्याप्रमाणे  ऑफिसर्स आले त्यांनी ३०-४० इच्छुकांपैकी १८-20 जणांना घेतलं.   सुदैवाने मी त्यात  होतो परंतु ब-याच जणांचा भ्रमनिरास झाला.  काहींना  मनापासून आवड होती तरीही त्यांचं  सिलेक्शन होऊ शकलं नव्हत अशावेळी सरांनी स्वतःचे अधिकार  वापरून त्या मुलांना समाविष्ट करून घेतलं.   ज्या मुलांना त्यांनी घेतलं  त्यांचा ना  कोणामार्फत वशिला  होता , ना  सरांशी घरोब्याचे संबंध.  तरीही  केवळ नियमावर बोट न ठेवता मुलांची आवड मारली जाऊ नये म्हणून सरांनी त्यांच्यासाठी  निर्बंध थोडे शिथिल केले.

मग सुरु झाला फाईव्ह महाराष्ट्र बटालियन चा सराव. सरांची कदमताल ची ऑर्डर आली कि अजुनपण पोटात गोळा येतो..  'कदम्ताल एक.. दो.. एक.. दो..लेफ्ट राय्ट..लेफ्ट राय्ट..डावा. ..उजवा..डावा.. उजवा..एक.....एक..’ म्हणत मध्ये मध्ये एखाद्याला ‘लल्या... पाय कमरेपर्यंत उचलायचे..हे बघ.. हात हलता नयेत.. एक दो..एक दो..’ म्हणत स्वतः करुन दाखवत असत. आता लल्याला ते पहिल्या प्रयत्नात जमलं तर ठिक नाहीतर त्याला ते बरोबर जमेपर्यंत बाकिच्यांच्या कदमांचा ताल चुकायचा धोका निर्माण होत असे.  तरीही मुलं सरावाला  आवडीने हजर राहत असत.  कधी कधी  ट्रूपला  अगदीच मरगळ आली आहे असं वाटलं  कि सर मोठ्याने सांगत असत , 'काय रे हळू हळू चालताय? ती अमुक अमुक इयर ची batch अजून लक्षात आहे माझ्या .. ती पोरं चालायला लागली कि धुळीचा लोळ उठायचा.  अगदी बिल्डींग च्या वरपर्यंत जायचा .. आणि तुम्ही . बुटांवर पण धूळ बसत नाही तुमच्या !!" मग आम्ही अजून जोशात येउन  practice करायचो.  सर अगदी 'शर्टच्या स्लीव्हज कश्या फोल्ड करायच्या' इथपासून 'चालताना हात कुठपर्यंत  वर गेला पाहिजे' इथपर्यंत सगळ्या गोष्टी सांगत असत.

सव्वीस जानेवारी आला कि आमची practice अजून जोर धरायची . विद्यामंदिरच्या मुलांसमोर आपण उठून दिसलो पाहिजे हे एक परंपरागत कारण होतंच परंतु एन सी सी चा ड्रेस  घालून, प्रभातफेरीमधून कणकवली मध्ये  फिरायची ती एक संधी असे. कुठेही झेंडावंदन असलं तरी एन सी सी वाल्यांना सर्वात पुढे उभे राहता येत असे  आणि एएनपी या मानाचे मानकरी असत .  अशावेळी आम्हाला आमचाही अभिमान वाटत असे आणि सरांचाही!

National Integration Camp साठी सरांनी सार्जंट  आणि लान्स कार्पोलर  या नात्याने   मला आणि सुजित गवईला  बंगलोर ला पाठवलं होतं तेव्हा ते जातीने कोल्हापूरपर्यंत  सोडायला आले होते.  तिथुन पुढे  आमच्याबरोबर कोल्हापूर  च्या  शाळेतले सर सोबत करणार  होते. ते  सर त्यांच्या अपरोक्ष आमच्या सरांचं कौतुक  करत होते ते ऐकून खूप बरं  वाटलं होतं  .  पुढे मी तिथून बेस्ट कॅडेट रनर अपचं बक्षीस  घेऊन आलो तेव्हा सरांचा चेहरा कौतुकाने फुललेला अजूनही आठवतोय .  दुस-या  दिवशी वर्गातून नोटीस फिरली होती . एन सी सी संदर्भातल्या प्रावीण्याची तोपर्यंतची ती पहिली आणि एकमेव नोटीस.

त्यानंतरही  Annual Training Camp ला आम्हाला सर सोडायला तर आले  होते पण आमची राहायची व्यवस्था न लावताच गायब झाले. bag आणायला म्हणून गेले ते आलेच नाहीत. आम्ही त्यांना शोधलं  पण कुठे गेले काहीच कळेना. आम्ही नववीतली मुलं .  बरीचशी पहिल्यांदाच घराबाहेर  आलेली.  त्यात  पुन्हा त्या अथांग मैदानात इतक्या शाळांमधली मुलं.  एवढ्या गर्दीत काय करायचं सुचेना.. अखेर इकडे तिकडे चौकशी  करून आम्ही आमची व्यवस्था करून घेतली . तो एक  शिकण्यासारखा अनुभव होता.  पण तेव्हा मी मनातून  सरांवर खूप रागावलो होतो.  कॅम्प वरून परत आल्यावर मी सरांकडे याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनीही ते ऐकून घेतलं आणि म्हणाले " माझी चूक झाली खरी पण माझी bag ,आपण सगळे  गेलो होतो त्याच  गाडीत राहिली होती आणि ती गाडी परत गेली होती . त्यामुळे मी तिथेच एका सरांना तुमची  व्यवस्था करायला सांगून  bag आणायला गेलो. तिथून पुन्हा यायला काही साधन नव्हतं,  त्यामुळे मला परत येतापण आलं नाही ."  वास्तविक पाहता एका शिक्षकाकडून चुकीची स्पष्ट  कबुली आणि एवढ्या पारदर्शकतेची  अपेक्षा ठेवणेही गैर असते परंतु  या गोष्टीने त्यांच्या बद्दलचा  आदर मात्र दुणावला.

पुढे एम सी सी चा देखावा उभा  राहिला आणि शाळेत  खाकी वर्दिबद्दलचं कुतूहल तितकसं उरलं नाही.

पण फक्त एन सी सी हाच  त्यांचा विषय होता असं नव्हे .  दोन वर्ष ते आमचे क्लास टीचरदेखील होते. कोणाच्याही दबावाला बळी न पडता किंवा न जुमानता वर्गात सगळ्यांना समान न्यायाने वागवणारे जे मोजके शिक्षक होते त्यात ए एन पाटील सरांचं  नाव वरती होतं. आम्हाला ते एका वर्षी बीज-गणित शिकवत. त्यांचा शिकवण्यापेक्षा त्यांच्या वर्गातलं मोकळं ढाकळं  वातावरण मला जास्त आवडत असे.. वर्गात मुलांच्या शेजारी बेंचवर बसणारे देखील ते एकटेच आणि शाळेत येताना प्लेझंट वासाचं परफ्युम लावून येणारेदेखील ते एकटेच!  आम्ही आमच्या मित्र मंडळींना ज्या टोपण नावाने हाक मारत असू त्याच नावाने तेही  हाक मारत असत..  उदाहरणार्थ सिद्धेश ला सिद्धया , रमेश ला रम्या  वगैरे ! एखाद्या एन सी सी  कॅडेटने वर्गात बीज-गणिताच्या तासाला ग्राफ वरचे  बिंदू छोटे मोठे काढले  किंवा लाईन किंचीतशी जाड-बारीक झाली कि ते चिडत. " अरे लेका, एन सी सी  कॅडेट तू.. शिस्त कशी काय विसरतोस?  एकदा लावून घेतलेली शिस्त अंगात मुरली पाहिजे.."

त्यांनी कधी कोणाला ओरडून  'शांत बस ' असे म्हटलेले आठवत नाही ; परंतु त्यांच्या तासाला दंगा करण्याही  कोणाची हिम्मत झालेलीही आठवत नाही !
पुण्यात मी आणि रमेश सावंत, दोघेही  एस एम चेच विद्यार्थी तेव्हा एकाच कंपनीत होतो.  एकदा ऑफिस चं आउटिंग आटपून आम्ही परतत होतो .  .  आउटिंगच्या निमित्ताने शाळेच्या वनभोजनाचा ,सहलींचा, कॅम्प चा विषय निघाला. तेव्हा ए एन पाटील सरांचा देखील बोलण्यात उल्लेख झाला .  शास्त्री रोड वरून राहायच्या ठिकाणी  येत  असताना एका पी एम टी  stopवर सरांसारखं कोणीतरी दिसलं . आम्ही एकमेकांकडे पाहिलं. थबकून आम्ही पुन्हा पाहिलं तर प्रत्यक्ष सरच होते! तोच फिटनेस , तीच personality ! योगायोगाचं यापेक्षा चांगलं उदाहरण काय  असू शकेल ? ते काही कामानिमित्त पुण्यात मुलीकडे आले होते . आम्ही आग्रह केल्यावर  आमच्या बरोबर ते घरी आले , मनसोक्त गप्पा मारल्या,मन मोकळं  केलं आणि गेले.  शिक्षकांच्या हाताखालून  शेकडो मुलं दरवर्षी तयार होऊन निघत असतात तरी देखील इतक्या वर्षांनी अनपेक्षित ठिकाणी अचानक भेटूनही सरांनी आम्हाला नावानिशी ओळखले  हि आमच्यासाठी अभिमनाची  बाब होती.

आता सर रिटायर्ड झाले आहेत, कणकवली सोडून तांच्या  मूळ  गावी स्थायिक झाले आहेत.. कणकवलीत आल्यानंतर अजूनही एन सी सी मधली मुलं दिसतात..  एस एम च्या मैदानात  आताही परेडस होत असतील,  आताही ऑर्डर्स घुमत असतील, आताही धुरळा उडत असेल,  पण....

.... ए एन पाटील सरांशिवाय एस एम च्या  एन सी सी ची कल्पना करणंही अवघड हे देखील तितकच सत्य !!

शुक्रवार, २७ जून, २०१४

अनुत्तरीत प्रश्न : उत्तरार्ध


पूर्वार्ध:

साव्याच्या थेट हल्ल्याने ते निष्प्रभ झाले..
"नाही.. म्हणजे आम्ही राहिलो भाड्याच्या घरात नंतर मग हल्ली घेतलं घर. मुलगी भाड्याच्या घरातच लहानाची मोठी झाली तर आता स्वतःच्या घरातून परत भाड्याच्या घरात पाठवायची म्हणजे.." ते लाचार हसत म्हणाले..
"आता लग्नानंतर 'आमचं' घर असणार म्हणजे आमच्या दोघांचे परिश्रम नकोत का घर उभारणीसाठी?"
"पण आधीच घर असतं तर.. आमची अटच आहे अशी.." वडिलांनी नेहमीचा सूर आळवला..
साव्या उठला , मला उठायची खूण केली..
"म्हणजे थोडक्यात तुमच्या मुलीसाठी मी घर घेऊन ठेऊ आणि तुमची मुलगी तिथे आयती राहायला येणार असं म्हणणं आहे तुमचं..बरोबर? "
"अरे मग? आम्ही लग्नात वरदक्षिणा देऊ कि घसघशीत" निर्लज्जपणे ते म्हणाले
"त्यापेक्षा 'हुंडा देणार नाही' अशी अट ठेवायला हवी होती तुम्ही. आमची मुळात तसली अपेक्षा नाहीच आहे पण मुलीने माझ्या सोबतीने संसार उभा  करावा एवढीच माफक अपेक्षा होती आमची. पण कणाहीन वडिलांच्या मुलीकडून काय अपेक्षा करायच्या?" साव्याने सवाल केला. एवढं मराठी त्यांच्या डोक्यावरून गेलं असावं. ते तसेच हसत राहिले होते.  "तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जावई मिळो " अशा शुभेच्छा देऊन  आम्ही बाहेर पडलो.

मी हसलो. "अरे ते आपण गेलो होतो सिंहगड रोड ला ते स्थळ आठवलं" साव्याच्या प्रश्नार्थक चेह-याला मी उत्तर दिलं. तो सुद्धा हसला
"बघ ना? त्या बापाला माझा स्वभाव कसा आहे, लहानपणापासून जपलेल्या मुलीला मी समजून घेऊ शकतो का?  त्यांच्या जीवनात मी adjust होऊ शकतो का याच्याशी काडीमात्र देणंघेणं नव्हतं.माझा पगार किती आहे आणि माझं फुकटचं घर आहे कि नाही यातच त्यांना इन्टरेस्ट होता!"
आम्ही दोघेही खळखळून हसलो.
"आणि ती सातारकर आठवते का तुला? माझ्या चुलतमामाचं इंटरकास्ट लग्न आहे म्हणून आठवडाभरानंतर नकार देणारी?" आम्ही पुन्हा तसेच हसलो.
"अजून त्या नगरच्या पोरीच्या कोण कुठल्या मावशीने तर 'सगळं चांगलं आहे पण पत्रिकेत फक्त साडेसतरा गुण जुळतात' म्हणून नाही म्हटलं होतं माहितीये ना?"
एका पाठोपाठ एक आठवणी जाग्या होत होत्या.. प्रत्येक आठवणीनंतर साव्या खिन्न होत होता.

"चुकलंच माझं.." सिलिंग fan कडे एकटक पाहत साव्या म्हणाला.. " हुशार, सरळसाधा  मुलगा हि इमेज जपण्याच्या प्रयत्नात प्रेमात पडण्याचं टाळलं. जाणीवपूर्वक. तीच चूक झाली.. आई वडील आपल्यामुळे नसत्या झेंगटात  पडू नयेत म्हणून कुठल्या पोरीकडे मान वेळावून पाहिलं नाही. नाकासमोर चाललो. शाळा कॉलेजात जेव्हा मला कुठली मुलगी साधी बोलायला आवडली तरी तेव्हा 'हे काय प्रेम करायचं वय नव्हे' असा प्रौढत्वाचा विचार केला. जेव्हा अनघा attract होतेय असं वाटलं तेव्हा मी स्वतःहून तिला झिडकारून लावलं.. का? तर केवळ मला प्रेमात पडायचं नव्हतं म्हणून!" तो पुन्हा खिन्न हसला..

च्यायला.. म्हणजे मी विचारल्यावर प्रत्येकवेळी  'तसं काही  नाही , वी आर जस्ट फ्रेंडज, तुला उगाच तसं वाटतं' म्हणणारा साव्या तिच्या प्रेमात होता तर. ती शेजारच्याच flat मध्ये राहायची. तिचं त्याच्यावर असणारं प्रेम ही तर अगदीच उघड गोष्ट होती. पण तिचं लग्न ठरलेलं नसतानाही त्याने स्थळं बघायला सुरुवात केली तेव्हा मीही तो विषय 'खरंच तसं काही नाही' म्हणून सोडून दिला होता.

अनघाचं मागच्या वर्षीच लग्न झालं होतं. साव्या आला नव्हता. मी त्याचा आणि माझा आहेर  घेऊन गेलो होतो. अनघा काही बोलली नाही मला पण तिचं कसनुसं हसणं मला बरंच काही सांगू पाहतंय असं वाटत होतं.. प्रत्येकवेळी 'ओल्या बैठकी'त छेडल्यानंतर तिचा विषय शिताफीने टाळणारा साव्या आता फ्रस्ट्रेशन मध्ये चुकून खरं काय ते बोलून गेला होता.

"तू तिच्या प्रेमात होतास?'
"आत्ता जाणवतंय रे मला ते.. घरी आल्यावर माझ्याकडून मी तिला घेऊन फिरायला जावं अशी अपेक्षा बाळगणारी तरी नव्हती रे ती.  तिचं बोलणं ऐकण्यात मला इन्टरेस्ट असायचा. कित्ती वाचायची ती.बाप रे! इतकी माहिती असायची तिच्याकडे. मुलींशी बोलताना इतका लाजणारा मी.  तिच्या नजरेला नजर न भिडवता बोलायचो तिच्याशी. तरीपण मी काय सांगायचो त्यात तिला इन्टरेस्ट असायचा. निदान तसं दाखवायची तरी. मी काही बोललो आणि माहिती नसेल तर लगेच सगळं वाचून माहिती करून घ्यायची."
साव्या सिलिंग कडे एकटक बघत होता.

"नवरा म्हणून माझ्या याच अपेक्षा आहेत रे आधीपासून..  दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं, त्यांना एकमेकांच्या बोलण्यात इन्टरेस्ट असावा यापलीकडे मी काही एक्स्पेक्ट करत नव्हतो आणि नाही. नुसतं बाह्य सुख महत्वाचं असतं तर ते पैसे फेकून मिळतं. "
 मी काहीच बोलू शकलो नाही.
"जोक्स अपार्ट  पण मला सांगून आलेल्या स्थळांपेक्षा कित्येकपट सुंदर choices होत्या बँकॉक ला माहितीये ?"
 "साव्या , जोक्स चा विषय नाहीये हा. लाईफ पार्टनरला त्यांच्याशी कम्पेअर करतोयस तू ?" मी करवादलो
"मुळीच नाही. पण मुलींचे बाप आणि स्वतः मुली मला एटीएम  मशीनशी कम्पेअर करताहेत हे नक्की!"
 " अरे त्यांच्या पण काही डिफीकल्टीज असतील. घर, उच्च डिग्री म्हणजे पर्यायाने पुरेसे पैसे हे त्यांच्यासाठी तुझी stability मोजायचे  क्रायटेरिया असतील कदाचित."

"मान्य , शंभर टक्के मान्य पण आयुष्यात आपण एका अनोळखी व्यक्तीबरोबर राहणार आहोत त्याची निवड करताना होमवर्क नको का पुरेसं? उच्च डिग्री म्हणजे नेहमीच पुरेसे पैसे  नसतात. एकट्यानेच घर घेतलं कि आर्थिक गणितं बिघडतात हे कळायला नको त्यांना? संपवून टाक!"
शेवटचं वाक्य मला (म्हणजे ग्लासातल्या द्रव्याला) उद्देशून होत हे कळायला मला वेळ लागला.

"कंटाळलोय रे मी. आयुष्याची ऐन उमेदीची चार -पाच वर्ष लग्न या विषयासाठी नाहक वाया दवडली असं  वाटतंय. जो तो स्थळं सुचवतो. हे हे वधू-वर सूचक मंडळं  चालवणारे लोक, मुलीचे काही अतिशहाणे नातेवाईक, 'माझं भलं करतोय' असा आव आणून माझ्या पर्सनल प्रश्नात नाक खुपसणारे आमचे नातेवाईक अश्या या सगळ्या  लायकी नसणा-या लोकांकडून मला सल्ले ऐकून घ्यावे लागताहेत. बरं, मी नाराजी दाखवली तर, 'कसला attitude  आहे,त्यामुळेच लग्न नाही जुळत ' नाहीतर 'आम्हाला शहाणपण शिकवणार का तू? ' वगैरेचा भडीमार,शुंभासारखा राहिलो तरी  'आतातरी हातपाय हलव, स्वत:ची स्वत:च बघितली असतीस तर ही वेळ  आली नसती' किंवा 'तुलाच इंटरेस्ट  नाही म्हणून हे असं आहे' वगैरे जावईशोध लावतात ते वेगळंच."

मी गप्प राहिलो.
"आता सहन होत नाही सगळं. मित्रांमध्ये जीव रमवावा म्हटला तर मित्र पण बदलले रे त्यांची लग्न झाल्यापासून. बायकोचंच जास्त ऐकतात. त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. आता कुटुंबाला प्रायोरिटी दिली पाहिजे. तुला सांगू, तू एकटा आहेस जो लग्नानंतर पण तसाच राहिलाय "

"खरंतर मी सुद्धा बदललोय." मी कबुली दिली " मोजके लोक आहेत… तुझ्यासारखे… ज्यांच्यासाठी मी तसाच आहे. अदरवाईज मीपण family लाच प्रायोरिटी देतो. द्यावीच लागते. आपण  समाजात राहतो. त्या समाजाचे काही अलिखित नियम आपल्याला पाळावेच…  "
" समाज… आय हेट धिस सोसायटी " माझं वाक्य मधेच तोडत तो म्हणाला. " या लग्नाचं लचांड या समाजानेच मागे लावून दिलंय माझ्या. मी एक साधा सरळ माणूस आहे. मला सांग कशासाठी करू लग्न ? आयुष्यात एक companion पाहिजे असं  म्हटलं तर मी बघतोय कि लग्नानंतरचा काही काळ वगळला तर त्यानंतर अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत नवरा बायकोचं पटत नसतं एकमेकांशी. पन्नाशी साठीतलं  कपल एकमेकांशी गुजगोष्टी करतंय , आयुष्यभराचे जमाखर्च मांडतंय असं चित्र मी एकतर सिरियल्स मध्ये बघितलंय नाहीतर 'बागबान'सारख्या सिनेमांमध्ये ! "

माझ्याकडे अर्थात समर्पक उत्तर नव्हतं.

"कित्येकांच्या घरात आई वडिलांची धुसफूस चालू असते हे ते सांगतात तेव्हा कळतं. अगदी माझ्या घरात पण काही वेगळी परिस्थिती नाही." तो पुढे म्हणाला " असंच जर लाईफ होणार असेल तर कशाला हवं लग्न करायला? मी काही वंश वाढवण्यासाठी हपापलेलो नाही. कशासाठी करावं लग्न?"

"बघ, माझ्याकडेही याचं तुला पटेल असं उत्तर नाहीये. आणि तू म्हणतोस तशी  असते परिस्थिती पण अगदीच एकांगी विचार नको करू. काहीजण  अगदी छान गोडीगुलाबीने राहतात पण. निदान इतरांना तसं  दाखवतात तरी."

"तेच ना. मी स्वतः शोधायचा प्रयत्न केला, खूप जणांशी चर्चा केली तर त्यांनी कधी हा विचारच केला नव्हता. वरून कधी कधी तर  मारून मुटकून  स्वतःचा कसाबसा सेट केलेला संसार मुलांच्या लग्नानंतर, सुनेच्या आगमनानंतर मात्र  विस्काटायची वेळ आलेले लोक भेटले "
साव्या गडगडाटी हास्य करत म्हणाला!
"कसं असतं लोक या गोष्टी चारचौघात बोलत नाहीत म्हणून आपल्याला कळत  नाही एवढंच!!"

मी शांत बसलो. पर्याय नव्हता. उपाय नव्हता. मी काही करून त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मदत करू शकेन असा काही मार्ग नव्हता. खूप वेळ आम्ही एकमेकांशी न बोलता त्या स्कोटलॆन्ड मेड एजेड व्हिस्किचे छोटे घोट रिचवत राहिलो.. झोपेचं चिन्ह दिसत नव्हतं. तो सांगत होता त्यात अतिरंजित असं काहीही नव्हतं.

मुलींचं कमी होणारं प्रमाण , पुरुष जाती विषयीचा वाढलेला तिरस्कार, लग्नाचं बाजारू स्वरूप , हुंडाबळी,  जातीव्यवस्था, मुलीकडच्या वाढलेल्या अपेक्षा, स्त्री सबलीकरण हे असले विषय निबंधां साठी नाहीतर चर्चासत्र भरवण्यासाठी बरे वाटतात पण जेव्हा त्यामध्ये नाहक होरपळणारे असे असंख्य साव्या बघितले कि या विदारक सत्याची जाणीव होते. स्त्री दाक्षिण्याचं  भान बाळगणा-या  या लग्नाच्या बाजारातल्या उमेदवारांना समाजात राहण्यासाठी शेवटी आपल्या मूल्यांशीच  तडजोड करावी लागते. तेही माहित नसलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करण्यासाठी!!

"सो… कमिंग back टू द स्क्वेअर वन… मी लग्न न करण्याच्या माझ्या निर्णयावर सध्यातरी ठाम आहे. ज्यावेळी लग्न का करावं याचं थोडं तरी समाधानकारक उत्तर मिळेल तेव्हा कदाचित मी माझ्या निर्णयाचा फेरविचार करेन. नैतिकता बाजूला ठेवली आणि तथाकथित समाजाला फाट्यावर मारलं तर इतर सगळ्यासाठी बँकॉक आहेच!"  पुन्हा एकदा गडगडाटी हसून साव्याने माझी विचारशृंखला तोडत टाळी साठी हात पुढे केला.

 सकाळी उठून मी भणभणतं डोकं घेऊन घरी पोचलो. तो पूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवल्यानंतर माझं रुटीन सुरु झालंय. आज  प्रॉपर्टी प्रदर्शनातल्या त्याच्या stall ला भेट द्यायला चाललोय पण जाताजाता साव्याला देण्यासाठी माझ्याकडे उत्तर नाही हे सुद्धा कबुल करायलाच हवं… 

रविवार, १ जून, २०१४

अनुत्तरीत प्रश्न : पूर्वार्ध


वामन सावंत उर्फ साव्याचा फोन म्हटला कि नेहमीच माझं मन द्विधा अवस्थेत जातं.. बोलायचं खूप असतं पण त्याचा फोन हमखास अशा वेळी येतो कि मनसोक्त बोलताच येत नाही. उदाहरणार्थ घरात असलो तर जेवत असताना, सकाळी उठल्या उठल्या, ऑफिस मध्ये मिटिंग चालू असताना  किंवा बॉस  शेजारी येउन गोष्टी सांगत असताना .. वगैरे वगैरे.. मला अशीही दाट शंका आहे कि त्याला मला फोन करावासा वाटला कि माझ्या साहेबाला माझ्याशी काही बोलण्याची हुक्की येत असावी.. किंवा मी मिटिंग रिक्वेस्ट एक्सेप्ट केली रे केली कि आमचे एच आर साव्याला फोन करून माझं शेड्युल कळवत असावेत! असो...

ऑफिस जवळच्या एका चहाच्या टपरीवर तो नेहमी येत असे. सिगारेट फुकणा-यांच्या त्याच्या कंपूत तो एकटाच फुकत नसे. (त्यामुळेच तो माझ्या लक्षात राहिला!) चहाचे घुटके घेत तो त्यांच्या थट्टा मस्करीत दंग असे. एकदा शनिवारी किंवा रविवारी मी कामानिमित्त ऑफिस ला गेलो. एकटाच . दुपारी मी टपरीवर गेलो तर नेमका साव्या तिथे होता. तेव्हा माझी आणि त्याची पहिली आणि फॉर्मल  ओळख झाली. काहीजणांशी आपलं ट्युनिंग पहिल्या भेटीतच जुळतं आणि काहीजणांशी आयुष्याच्या शेवटपर्यंत जुळत नाही . साव्या  पहिल्या टाईपचा होता. एकदम चांगला दोस्त बनला तो माझा.

साव्या हा त्याच्या काळात प्रचंड हुशार विद्यार्थी. माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा असेल पण लहानपणापासून ब-याच मुलांना त्यांचे आई वडील आदर्श घालून देण्यासाठी काही विशिष्ट मुलांचा यथेच्छ वापर करतात (उदाहरणार्थ , "बघ बघ तो सावंतांचा वामन बघ.. आणि तू.. कार्ट्याला खेळ सोडून दुसरं काही दिसतच नाही इ.) त्यापैकी साव्या एक! 'साला हा अभ्यास करतो आणि अव्वल येतो त्याच्यामुळे आम्हाला ऐकून घ्यावं लागतं आणि खेळ सोडून आम्हालापण अभ्यास करावा लागतो' असं म्हणून कित्येक मुलांनी आपल्या लहानपणात त्याला मनोमन शिव्या घातल्या असतील.

तसा तो काही फार गरीबीतून वगैरे पुढे आलेला किंवा पेपरची लाईन टाकून शिक्षण पूर्ण करणारा वगैरे नव्हे. जात ओपन क्याटेगरीत  मोडणारी! आई वडील साधे, सरळ, प्रेमळ, मनमिळाऊ वगैरे वगैरे आणि त्यात सुद्धा पद्धतशीर जिवंत आणि ठणठणीत,. म्हणजे समाजाची सहानुभूती मिळवण्याचा अगदीच काही स्कोप नव्हता! एक सरळ साधा मध्यमवर्गीय कुटुंबाचा मध्यमवर्गीय  मुलगा. पण उपजत हुशार. आई वडिलही 'मला डॉक्टर बनायचं होतं पण पैसे नसल्यामुळे जमलं नाही. आता तू माझं स्वप्न पूर्ण कर' अशा टायपाची तद्दन भंपक आणि स्वार्थी स्वप्नं बघून ती पूर्ण करण्यासाठी  पोराच्या इच्छा-आकांक्षांची होळी करणारे नव्हते. त्यामुळे 'तुला काय वाटतं ते कर' असं सांगितल्यावर त्याने  आर्कीटेक्ट व्हायचं ठरवलं होतं आणि तसा तो झालाही होता.

त्यादिवशीपण असाच फोन आला त्याचा. "बोलायचं आहे. अर्जंट . वेळ आहे का?" पहिल्यांदाच असं झालं होतं कि मला वेळ होता. "हो.. बोल"
"फोनवर नव्हे! प्रत्यक्ष भेटून. "
"have यू गॉन मॅड साव्या? वाजलेत बघ किती रात्रीचे पावणेबारा.. टी व्ही बघत होतो म्हणून मी जागा तरी आहे. हि मॅच संपली कि मी झोपणारे.."
" तू ताबडतोब मला पिक करायला ये. मी वाट  बघतोय.. रात्री माझ्याकडेच थांब आज." माझ्याकडे पर्याय न ठेवता तो बोलला..

...मी इतक्या रात्री घराबाहेर चाललो आहे आणि त्यातही रात्री परत येणार नाही हे कळल्यानंतर माझ्या घरात झालेला तमाशा ही एक वेगळी पोस्ट होऊ शकते त्यामुळे तूर्तास ते टाळतो..!

साव्याला मी पुणे एयरपोर्टवरून उचलला. तो बँकॉक-पटाया च्या सफरीवरून आला होता.
"फाईव्ह डेज सिक्स नाईट..मजा करून आलो. अजून २ -४ पोरं होती. बड्या बड्या बापांची..पण चांगल्या घरातली.. धिंगाणा केला.. बँकॉक च्या गल्ल्या न गल्ल्या फिरून आलो! कसल्या आहेत माहितीये?"
त्याच्या राहत्या ठिकाणापर्यंत पोचेपर्यंत  तो मला बँकॉक च्या गोष्टी सांगत होता… चकचकीत एयर पोर्ट, थाई लोकांनी  केलेली प्रगती वगैरे वगैरे.. "नुसत्या पर्यटनावर कुठल्या कुठे पोहोचलाय माहितीये तो देश?" अश्या पद्धतीचे थोडे सवाल जवाब होते :)

घरात पोचल्यानंतर बँकॉक वरून आणलेलं स्कॉचच्या स्वरुपातलं अल्कोहोल ब्यागेतून बाहेर आलं आणि त्याच्या मोक्षस्थानी (म्हणजेच आमच्या पोटात!) जाऊ लागलं… जशी जशी पेग्ज ची संख्या वाढत गेली तशी तशी त्याची गाडी तिथली टापटीप, शिस्त, आतिथ्य, मातृसत्ताक कुटुंब , राजेशाही (आपल्या लोकशाही सारखी), झगमगाट, वगैरे वगैरे वरून  तिथले क्लब्ज, नाईट  लाईफ, मसाज वगैरे वगैरे वर घसरली..
"तीनशे बाहत देऊन फुल बॉडी मसाज करून घेतला, काय मजा आली माहितीये?"
"मला कसं काय माहित असणार?" मी कुतूहलाने विचारलं
"अरे फुल टू धमाल. नंतर 'तसल्या' गल्ल्या बघितल्या"
"तसल्या म्हणजे कसल्या रे?"
"तसल्या रे " मान वाकडी करून मानेला झटके देत आणि भुवया उडवत त्याने सांगितलं
"ओ हो…  तसल्या ?" कल्पनेचा वारू चौखूर उधळवत मी म्हटलं "लिमिट क्रॉस  नाही ना केलंस ?"
"खरतर केलं! आणि त्यासाठीच तुझ्याशी बोलावसं वाटलं… "

इतकावेळ हलकं फुलकं असणार वातावरण अचानक  सिरियस झालं. काही वेळ असाच शांततेत गेला. आम्ही दोघेच होतो.शेंगदाणे आणि वेफर्स च्या कुरुम कुरुम चा आवाजसुद्धा ऐकू येत होता.

त्याच्या लग्नासाठी गेल्या ३-४ वर्षांपासून मुली बघण्याचा/स्वतःला मुलींना दाखवण्याचा कार्यक्रम चालू होता. स्वतःच्या लग्नासाठी चार ठिकाणचे पोहे टेस्ट करायचं भाग्य जरी मला लाभलं नसलं तरी साव्यामुळे मी ते सुख अनुभवू शकलो होतो.साव्याच्या आई वडिलांना प्रत्येकवेळी येणं  शक्य नसे त्यामुळे "बघण्याचा कार्यक्रम"  मुलीच्या घरीच असेल तर कधी त्याचा मामेभाऊ तर कधी मावस भाऊ वगैरे बनून मी जात असे. बाहेर असेल तर मित्र म्हणूनच. पण साव्या आणि मुली मधलं तंग वातावरण जरा निवळवून दोघांना कम्फर्टेबल फील करवून देण्याचा माझा जॉब  असे.

"वैतागलोय यार मी आता… आता लग्नच नाही करणार! " साव्या  बोलत होता. दारूच्या नशेत सुद्धा तो नेहमीच सेन्सिबल बोलत असे. मी गप्प राहिलो.
"का करावं  लग्न?" माझ्याकडे तरी या प्रश्नाला उत्तर नव्हतं.
"नुसती शरीराची भूकच महत्वाची असते का? बाकीच्या गोष्टींना काहीच महत्व नाही का रे आपल्या समाजात?"
"..."
" तुला माहितीये, नेहमीच मी एका अशा मुलीच्या शोधात आहे जी खरोखर माझी बायको व्हायला लायक असेल"

"हे वाक्य मी खूपवेळा ऐकलंय. कधी त्याच्या अर्थ समजावून द्यायचा प्रयत्न केलास? निदान मलातरी?" मी विचारलं..  " सगळ्यांना आपली बायको ऐश्वर्या राय सारखीच दिसणारी हवी असते, पण आपण अभिषेक बच्चन सारखे दिसत नाही, सलमान सारखे पिळदार शरीराचे नाही गेलाबाजार विवेक ओबेरॉय सारखे चॉकलेट हिरो नाही याची कोणाला जाणीवच नसते! " मी  पुढे म्हणालो..  "खूप प्रयत्न करून तुम्ही ब्युटीफुल ड्रीम गर्ल शोधली तरी ती हँडसम  ड्रीम बॉय च्या शोधात असेल तर?"

"ही तुझी विधानं मला लागू होताहेत का?" तो म्हणाला
"मी जेनेरिक स्टेटमेन्ट केलं. आताच्या तरुण मुलांच्या बाबतीत… "
" आतापर्यंत फक्त फोटो बघून मुलगी बघायला गेलोय असं  एखादं तरी उदाहरण देशील मला?" मला तोडत तो म्हणाला. कदाचित नसावा! नाहीतर हे वाक्य तो इतक्या कॉनफिडन्टली बोलला नसता!
"उलटपक्षी मुलींच्या अपेक्षाच इतक्या वाढल्या आहेत कि तुझं ते ऐश्वर्या राय चं उदाहरण त्यांना ऐकवायला हवं !!" छद्मी हसत तो म्हणाला!

"ती सुभद्रा आठवते तुला?"
"नाही"
"ती रे सॉफ्टवेअर जॉब  वाली. सुभद्रा म्हणजे... "
"हां… हो आय बी एम मध्ये होती ती ना? सुभद्रा हॉटेलात भेटला होता ना तुम्ही? म्हणून सुभद्रा होय.. आठवते आठवते.. "
"हो… तीच! ती पोरगी काय म्हणाली माहितीये ना? माझा पगार अमुक एक लाख आहे मला तमुक लाख वाला मुलगा पाहिजे"
" अरे पुढे जाऊन इगो प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून ती म्हणाली असेल. तेव्हा 'हट!  नाही तर नाही' अशा भाषेत  तू उडवून लावलं  होतंस. "
"मग काय करू यार? मी तसला  आहे का ? माझा पगार तिच्यापेक्षा कमी म्हणून वाईट वाटून घेणारा? अरे मी आता पहिल्या फेज मध्ये आहे. माझ्या बिझनेस मध्ये माहित आहे ना ग्रोथ कसली आहे ती ?"
"अरे, पण या सगळ्या गोष्टी तिला सांगायच्यास  ना? "
"तिला कळायला नको? सरळ पैशाची फुटपट्टी वापरून मुलगा नाकारणारी मुलगी काय संसार करणार? एखाद्या वर्षी मला लॉस  झाला तर साली मला सावरायच्या ऐवजी मलाच दोष देईल असली पोरगी…"
"…"
"सॉरी  फॉर  that 'साली' "
"इट्स  ओके… पण मला सांग आपण ते 'पांचाली'  मध्ये गेलो होतो ते? ती मुलगी ? ती तर तूच नाकारलीस.   मला तेव्हापासून बोलला नाहीस तू काय कारण होतं ते!"
"हां  यार… ती 'पांचाली' " साव्या हसला "तिला मी विचारलं कि मुलाबद्दल तुझ्या अपेक्षा काय आहेत तर मला म्हणे 'मी बीई  केलं आहे त्यामुळे मला एम ई  किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा हवा… आई बाबा म्हणाले म्हणून मी आले आज. नाहीतर मला इंजिनियर किंवा एम ई मुलगा बघायचा होता… damn  दीज इंजिनियर्स " साव्याने एका झटक्यात 'बॉटम्स अप' मारला…

मला गिल्टी वाटलं…

" तू काही  म्हणाला नाहीस का तिला?"
"म्हणालो ना…. म्हटलं माझ्या बघण्यात जितके इंजिनियर मित्र आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्यांना नोक-या मिळत नाहीत ते लोक एम ई करतात. जे हुशार आहेत ते आयदर एमटेक  करतात किंवा एमएस, एमबीए असलं काहीतरी करतात अदरवाईज त्यांना कुठलीतरी कंपनी उचलतेच…"
"मग?"
"मग काय ? तिने असला विचारच केला नव्हता! मी तिला पुढे म्हटलं तुझ्या त्या कित्येक एम ई लोकांपेक्षा जास्त पगार कमावतो मी महिन्याला… बरोबर ना?"
"हो अर्थात.. पण मग पुढे ?"
"ती गांगरली . गडबडली. मग मीच म्हटलं तुमच्या पुढच्या शोध कार्यासाठी शुभेच्छा. बिल मागवून ते देईपर्यंत तिला एक शब्द सुद्धा सुचला नाही"
"कमाल आहे. काहीच बोलली नाही ती?"
"काय बोलणार? अरे ओळखीने कुठल्यातरी कंपनीत चिकटून खर्डेघाशी करूनही, मुलाबद्दल मात्र असल्या अपेक्षा ठेवणारी मुलगी आयुष्यात काही करेल ही अपेक्षाच बाळगणं व्यर्थ आहे."

मी शांत बसलो.. खरी होती त्याची गोष्ट.
आम्ही एका ठिकाणी मुलगी बघायला गेलो होतो. मुलीपेक्षा वडिलांचेच प्रश्न. "पगार किती, घरी कोण कोण असतं वगैरे नंतर त्यांनी विचारलं पुण्यात घर वगैरे विकत घेतलंय का? "
साव्याने शांतपणे नकारार्थी मान हलवली. " मी भाड्याने राहतो.. विनाकारण एवढी गुंतवणूक एकट्याने करून मी स्वतःचे आर्थिक हाल आणि ओढाताण का करून घेऊ?" हे त्याचं स्पष्टीकरण त्यांना रुचलं नसावं.
"स्वतःचं घर हवं हो आजकाल लग्न करायचं असेल तर.."
"तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं घर होतं का हो?"

उत्तरार्ध

सोमवार, ८ जुलै, २०१३

संस्कृत=करंबेळकर मॅडम


कमी वेळात इतरांच्या मनात स्थान निर्माण करण्याची कला फार कमी जणांना अवगत असते. आमच्या करंबेळकर मॅडम निर्विवाद्पणे त्यापैकी एक.इयत्ता आठवी ते दहावी एवढ्या तीन वर्षात त्यांनी शाळेच्या दहा वर्षात एखादा शिक्षक पाडू शकला नसता एवढा प्रभाव आमच्यावर पाडला.

करंबेळकर मॅडम जरी जुन्या लोकांमध्ये पी ई आणि मराठीसाठी फेमस असल्या तरी सातवी मधल्या मार्कांच्या आधारावर आठवीमध्ये पूर्ण संस्कृतची तुकडी तयार झाली तेव्हाच त्यांच्याशी आमचा संपर्क आला.पण त्यांच्याबद्दल ब-याच आख्यायिका ऐकल्या होत्या. उंचीने कमी असल्या तरी गडबड करणा-या उंच मुलांना उडी मारून किंवा खुर्चीवर चढून त्यांची कानशिलं शेकवून, त्यांनी कसं वठणीवर आणलं होतं, त्याच्या सुरस कथा रंगवून रंगवून सांगितल्या जात. वर्णन सांगताना प्रत्येकजण आपला मीठ मसाला घालून ते अधिक रंजक कसं होईल याची काळजी घेत असे.त्यामुळे आमच्यासाठी तरी एक ’कडक शिक्षिका” अशी त्यांची ख्याती होती.

आठवीमध्ये गेल्यावर जेव्हा एका छोट्या खोलीत संस्कृतचे वर्ग सुरु झाले तेव्हा मॅडम वर्गावर आल्या.त्यापण आपल्यासारखंच छोटेखानी पुस्तक घेउन! अभ्यासक्रमाचं सोडून इतर पुस्तक घेउन वर्गात प्रवेश करणा-या त्या पहिल्याच शिक्षिका.अर्थात,ती होती ’शब्दधातुरुपावली’.. संस्कृतच्या शब्दांची निरनिराळी रूपं ,विभक्ती,प्रत्यय वगैरे पूर्ण ऐवज त्यात खचाखच भरला होता.या पुस्तकाने संस्कृतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला साथ दिली असेल असं म्ह्टलं तर ते वावगं ठरणार नाही.फ़क्त अभ्यासक्रम आहे म्हणून न शिकविता संस्कृत एक भाषा म्हणून शिकवण्याकडे करंबेळकर मॅडमचा कल होता.पण खरंच त्यांचा दरारा होता.एकतर वर्गातली मुलं ब-यापैकी हुशार या कॅटेगरीत मोडणारी असत,वरुन संख्यापण अगदी लिमिटेड असे त्यामुळे त्यांच्या तासाला दंगा चालू आहे असं चित्र सापडणं दुरापास्तच.

आल्या आल्या त्यांनी आम्हाला ’शब्दधातुरुपावली’घ्यायला सांगितली. त्यानंतर सुरु झाले आमचे संस्कृतचे वर्ग. सुरुवातीला त्यांनी आम्हाला सुभाषितमाला शिकवली.एखादा विषय शिकवायचा म्हणजे त्यातलं इन्साईड आउट माहित असलं पाहिजे असं त्यांचं धोरण होतं. त्यांना कोणतीही शंका विचारली की त्या अगदी तपशिलवार त्याचं निरसन करीत.त्यांचा भाषाशुद्धीवर प्रचंड भर होता.’श’आणि ’ष’यातला फरक, जहाज मधला ’ज’आणि जीवन मधला ’ज’, चमच्यातला च आणि चिमट्यातला’च’असे भाषेचे अनेक बारकावे त्या उलगडून सांगत.त्यानंतर कित्येकदा डिक्टेशनमधे मॅडम च्या नुसत्या उच्चारावरून आम्हाला -हस्व किंवा दीर्घ वेलांटी,उकार समजत असत.

एकदा शीघ्रकवी कालिदासाला राजाने ठंठंठठंठंठठठंठठंठ: हा शब्द दिला त्याने आपल्या प्रतिभेने तो कवितेत बसवला अशा अर्थाची एक कथा आम्हाला होती. जेव्हा मी हा शब्द पहिल्यांदा वाचला तेव्हा माझी तुमच्यासारखीच अवस्था झाली होती. परंतु करंबेळकर मॅडमनी त्याचं विभाजन करुन तो अश्या पद्धतीने शिकवला कि अजुनही मला ते वाक्य जसंच्या तसं आठवतं.
सोपानमार्गे करोति शब्दं..ठंठं-ठ-ठंठं-ठठ-ठंठ-ठंठ:!

सुभाषितमाला शिकवल्यानंतर ती मोठ्याने समूहाने म्हणण्याचा प्रघात त्यांनी घालून दिला होता. एकतर रोजच्या सरावामुळे सगळ्यांचे पाठांतर होईल आणि मुख्य म्हणजे एक वर्ग संपून दुसरा वर्ग सुरु होईपर्यंतचा मुलांकडे असणारा दंगा घालण्याचा हक्काचा वेळ सत्कारणी लागेल हे दोन हेतू त्या मनात बाळगून असाव्यात.
साहित्यसंगितकलाविहिन: साक्षात्पशु:पुच्छविषाणहीन:।
तृणन्नखादन्नपि जीवमान: तत भागदेयं परमं पशुनाम॥ यासारखं लांबलचक सुभाषित त्यांनी आम्हाला
भविष्य मेनू  आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान।
पंचांग सोपे सुमंगल स्वभावे, भिंतीवरी कालनिर्णय असावे.. या चालीवर शिकवून एकदम सोपं करुन टाकलं इतकं कि कधी त्याचा अर्थ : "साहित्य,संगीत,कलेची आवड नसणारा (मनुष्य) हा शेपूट नसणारा प्रत्यक्ष पशू होय, तो जगण्यासाठी गवत खात नाही हे तर खरोखर पशूंचं भाग्य आहे " असा लिहितानाही विचार करावा लागला नाही किंवा अंगी बाणवतानाही!
आजही काही सुभाषितांचे नुसते सुरुवातीचे शब्द कोणी म्हटले तर पूर्ण सुभाषित आपसूक तोंडातून बाहेर पडतं.

’मॅडम कडक होत्या’हे सुरुवातीचं माझं विधान खोटं मात्र नक्कीच नव्हतं.आठवीपर्यंत आम्ही व्याकरण शिकत असू परंतु त्यांच्याच तासाला आम्ही व्याकरण चालवायला शिकलो! (एखाद्या शब्दाची विभक्ती प्रत्यय असणारी एकवचन, द्विवचन आणि बहुवचन अशी रुपं म्हणणे म्हणजे त्या शब्दाचं व्याकरण चालवणं) करंबेळकर मॅडमनी ’राम चालवा’ असं फ़र्मान सोडलं कि’रामा’सारख्या अयोध्येच्या राजाला करंबेळकर मॅडम च्या दरबारात सगळी शस्त्रं म्यान करून गपगुमान चालावं लागत असे.संस्कृतची मुलं-मुली त्याला ’अकारान्त पुल्लिंगी शब्द” एव्हढाच मान देत असत आणि प्रत्येक तासाला  "रामहा रामौ रामाहा प्रथमा...."असं म्हणून, वनवासात सोसावा लागला नसेल एवढा त्रास त्या बिचा-या रामाला देत असत. ’नदी’ वास्तविक जीवनात कितीही खळाळत वाहत का असेना मॅडम च्या तासाला तीही ’ईकारान्त स्त्रीलिंगी शब्द’बनून न 'वाहता' निमूटपणे 'चालत'च  असे!

विराम चिन्हांचं आणि शुद्धलेखनाचं  महत्व अर्ध्या अर्ध्या मार्कांनी मॅडमनी पटवलं म्हणून आजही 'पाणी' आणि 'पाणि' मधली वेलांटी शब्दांचे अर्थ बदलते हे कळलं. जेव्हा आनी , पानी  अशा भाषेत इतर कोणी बोलतं तेव्हा त्यांची कीव येते आणि त्यांना  करंबेळकर मॅडम  सारख्या शिक्षिका मिळाल्या नाहीत याचं वाईट वाटतं!

आमची नववी संपत आलेली असताना मॅडम रिटायर्ड होणार अशी चर्चा सुरु झाली होती. मी मधल्या सुट्टीत  त्यांना गाठून त्या आमची दहावी होईपर्यंत रिटायर्ड होणार नाहीत ना याची खातरजमा करून घेतली. आता  मॅडम रिटायर्ड झाल्या म्हणून आमची शाळा दहावीच्या संस्कृत च्या मुलांना वा-यावर नक्कीच सोडणार नव्हती परंतु "संस्कृत = करंबेळकर मॅडम"  हे समीकरण डोक्यातून जाणं,  एक वर्षात नक्कीच शक्य नव्हतं.

आज शाळा सोडून जवळपास एक तप उलटलंय..........
.............पण अजूनही तेच समीकरण डोक्यात तसंच फिट्ट  आहे!!

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

आयेम ए रेबेल

ती वेगळी होती. तिच्या सगळ्याच बाबतीत स्वतंत्र संकल्पना होत्या, ध्येयं होती, स्वप्नं होती आणि पुस्तकी भाषेत मांडता येईल असं बरंच काही होतं! पण सगळं सगळं स्वतंत्र आणि वेगळं.. जाणवण्याइतपत वेगळं. एकटी राहायची, मोजका जनसंपर्क, घरात असली तर एका हातात पुस्तक आणि दुस-या हातात कॉफी मग अशा अवतारात. एखाद्या स्त्रीने ज्या पद्धतीने समाजात राहू नये असं म्हणतात त्या पद्धतीनेच ती राहायची. बंडखोर प्रवृत्ती,बक्कळ पैसा..लोकांनी काढलेल्या चित्रांची प्रदर्शनं मांडून आणि ती विकून कमवलेला. पस्तीशी मध्ये देखील एखाद्या तरुणीला लाजवेल अशी फिगर.. मी तिच्याकडे जायला लागलो तेव्हा मला या गोष्टी कळत नव्हत्या असं नव्हतं. पण ते नक्कीच तिकडे जायचं कारण नव्हतं! दरवाजावर तीन नॉक आणि एक थाप मारली तरच दरवाजा उघडला जायचा आणि हे सगळ्यांना माहिती देखील नव्हतं.

ती आधी आमच्या सोसायटीत राहायची. लेटर बॉक्स मधून लाईट बिल्स कलेक्ट करायचं सौजन्य सुद्धा दाखवायची नाही. ३-४ महिन्यांची लाईट बिल्स (तेव्हा आतासारखी एका महिन्यात लाईट कट व्हायचा प्रकार नव्हता, 'एमेसिबी' कधीच महावितरण एवढं कडक नव्हतं ब्वा!), कुठल्या तरी प्रदर्शनं, एग्झिबिशनच्या आमंत्रणांनी तो लेटर बॉक्स ओसंडून वाहायला लागला तेव्हा मीच एकदा तो सगळा कचरा गोळा करून तिच्या दरवाजात गेलो.. जनरल एटीकेट्सनुसार तीनदा नॉक केलं आणि माझ्या हातातून तो पसारा खाली कोसळला! आधार घ्यायला मी दरवाजाला हात लावला आणि अशा पद्धतीने मी पहिल्यांदा ती अलिबाबाची गुहा योगायोगाने उघडण्यात यशस्वी झालो! सगळंच नाटकी!

तिने दरवाजा उघडला तेव्हा मी तो पसारा गोळा करत होतो..
"तुमची पत्रं येतात खाली..एवढी आलीयेत"
"हौ डू यू नो द अक्सेस कोड?"
"व्हॉट अक्सेस कोड? आय डोन्ट नो एनी अक्सेस कोड"
ती विचलित झाली आणि दुस-या क्षणी सावरत मला म्हणाली "कम ऑन इन.."
मग आम्ही बराच वेळ बोललो..गप्पा मारल्या. मस्त होती बोलायला... त्यानंतर मग कधीही एकटं एकटं वाटलं,कंटाळा आला, कोणाशी बडबड करावीशी वाटली, चर्चा करायची खुमखुमी आली, गप्पा माराव्याश्या वाटल्या कि मी बिनधास्त तीन नॉक्स आणि एक थाप मारून माहितीचे दरवाजे उघडू लागलो..

"तुम्ही.."
"मला एकेरी हाक मार"
"मी तुमच्यापेक्षा लहान आहे वयाने" मी म्हटलं.. 'तुमचं वय जास्त आहे' हे स्त्रीला डायरेक्टली सांगायचा हा दुसरा चांगला मार्ग!
"आई सुद्धा मोठी असते न? आणि मावशी ? आत्याला काय म्हणतोस? ताईला?"
"...."
"आपलं यातलं कुठलंच नातं नसलं तरी फक्त वयामुळे तू मला अहो जाहो करावंस हे मला मुळीच पटत नाही, अगं म्हटलंस तरी चालेल मला.."
"बरं... तू इथे देवपूजा करत नाहीस?"
"नाही.."
"कंटाळा आहे कि तू नास्तिक आहेस?"
"माहित नाही"
"म्हणजे?"
"देव आहे कि नाही मला माहित नाही"
"हे सगळं निर्माण करणारा कोणीतरी असेलच ना ? ती शक्ती म्हणजे 'देव' असं मानायला काय हरकत आहे?"
"मी एक विचारू?"
"विचार..पण जास्त कठीण नको.." मी म्हटलं
"चांगलं वागणा-या बरोबर तुझा देव चांगलं वागतो आणि वाईट वागणा-याला अद्दल घडवतो,बरोबर?"
"हो.." मी मान तुकवली
"मग माणसात आणि देवात फरक तो काय? आपली न्यायव्यवस्था तर तेच करत असते!"
"...."
"जर देव असेल तर तो वाईट गोष्टी मुळातच का होऊ देईल? स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला? हे धर्म , फॉलोअर्स आहेत तोपर्यंत ठीक आहे पण त्यांच्या प्रसारासाठी जिहाद,क्रूसेड्स , धर्मयुद्ध.. हे कुठला देव सांगतो आणि का? जो मला मानत नाही तो काफिर, तो सैतान असं अल्ला कसं काय म्हणत असेल? प्रोटेस्टन्ट, रोमन कथेलिक वगैरे प्रकार कशाला असले असते? हिंदूंमध्ये कोट्यावधी देव कसे काय असले असते? दोन वेगवेगळ्या धर्मातली युद्धं एकवेळ परवडली पण एकाच धर्मात दुजाभाव? मग कसा आणि का विश्वास ठेवायचा देवावर?"
"..." माझं ज्ञान तिची उत्तरं द्यायला फारच तोकडं होतं,किंबहुना मी असा तिरकस विचार केला नव्हता. स्पष्टच सांगायचं झालं तर डेअरिंग झालं नव्हतं देवाबद्दल अशा जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करायचं!
"धर्म बापा ज्याचा त्यांनी,प्रिय मानावा प्राणाहुनी,परी विधर्म्याच्या ठिकाणी, अलोट प्रेम धरावे! या मताची आहे मी.."
"मस्त आहेस तू!" मी दिलखुलास प्रतिक्रिया देऊन टाकली.

"मी आणि मीच" हे तिचं जीवनसूत्र होतं बहुतेक. ना नातेवाईकांची बंधनं, ना कोणाच्या आणाभाकांचं गुंतलेपण! तिचा flat सुखवस्तू या कॅटेगिरित मोडत होता.. सगळ्या वस्तूंची रेलचेल. पण तिच्या घरातली मला आवडणारी गोष्ट म्हणजे मोठ्ठ्या बिन bags! कुठून आणल्या होत्या कोणास ठाऊक! सगळ्याच गोष्टी ती सांगायची असंही नाही.विचारल्या तरी! पण दोघांनाही असणा-या फावल्या वेळात जेव्हा तिच्याकडे जाणं व्हायचं तेव्हा त्या bags वर आरामात रेलून बसायचं आणि काहीबाही खात,टीव्ही बघत गप्पा कुटायच्या. ऑसम फिलींग!!

"तू अशी का राहतेस? एकटी एकटी? सोसायटीतल्या लोकांत जावं, इथल्या चारचौघात मिसळावं, मिटींग्ज अटेंड कराव्यात, मतं मांडावीत असं नाही वाटत तुला?"
"नाही"
"का?"
"कारण मला सहानुभूतीच्या नजरा नको आहेत.."
"कोण तुला कशाला सहानुभूती दाखवेल?"
"तू लहान आहेस अजून.."
"तुझी देव-धर्माविषयीची मतं ऐकून पचवणा-याला तू लहान म्हणतेस?"
"..."
"कोण दाखवतं तुला सहानुभूती?"
"पुरुष"
"..." मी निःशब्द...
"एक या वयातली स्त्री एकटी राहते म्हटल्यावर एकजात या जमातीच्या नजरा आपोआपच वळतात.. त्या वळणारच. स्वाभाविकच आहे ते. पण आता सवय झालीये.आय इग्नोर इट..बट आय डोन्ट वॉन्ट टू गिव्ह देम अ channel !"
"तुझ्या कोणी प्रेमात नाही पडलं? किंवा तू कोणाच्या?"
ती मंद हसली. पण एव्हाना तिच्या हास्यातून जो अर्थ अपेक्षित असतो तो नसतो हे मला कळून चुकलं होतं. मी तो अर्थ शोधण्याच्या भानगडीत पडलो नाही!
"मी नाही पडले कोणाच्या प्रेमात.. माझ्या प्रेमात कित्येकजण पडले... पण मला काय करायचंय यापेक्षा काय करायचं नाही ते आधीपासूनच माहित होतं.."
"आई-बाबा?नातेवाईक?"
"बाबा एक्स्पायर. माझ्या लहानपणीच. आणि त्यामुळे आई कोलमडलेली, आयुष्यभर देव देव करत होती, कोणाकोणाचं म्हणून वाईट केलं नाही बिचारीने. तरीसुद्धा तिला काय काय भोग भोगावे लागले.. "
"म्हणून तुझा देवावर विश्वास नाही?"
"तेही कारण असेल कदाचित..तू काय माझा इन्टरव्यू घेतोयस का?" ती हसत म्हणाली.."माझ्या आईने आयुष्यभर देवाचं केलं तर तिने नको नको ते भोगलं, मी नाही केलं तरी मी सुखात आहे. राजकारणी लोक, गुंड लोक भ्रष्टाचार करून मोठ्ठाली देवळं उभारतात, संगमरवरी देवघर बांधतात, देवस्थानांना मोठमोठ्या देणग्या देतात! करू शकतोस तू हे सगळं एक्स्प्लेन?"
"मागच्या जन्माची पापं असतील..म्हणजे अशीही एक थियरी आहे..." मी चाचरत म्हणालो
तू पुन्हा हसली."असल्या थियरिज मांडून आपण आपलंच समाधान करून घेत असतो असं नाही वाटत तुला?"
मी-अर्थातच- गप्प बसायचो!!

आर्टीस्ट लोकांच्या आर्टला प्रदर्शनांची दालनं उघडी करून देणं हे तिचं काम! कुठून कशी ती या व्यवसायात शिरली ते देवालाच ठाऊक..नव्हे तिलाच ठाऊक..त्या बिचा-याने सुद्धा एवढं दुर्लक्ष करणारी व्यक्ती पाहून तिच्यात काडीमात्र इन्टरेस्ट ठेवला असेल असं मला वाटत नाही! पण अगदी टांकसाळ असल्यासारखे पैसे अक्षरशः छापत होती.खर्च स्वतःवर होईल तितकाच..काम तिला हवं तेव्हाच आणि हवं तितकंच.. बहुतेक मीटींग्ज बाहेर चांगल्याश्या हॉटेल किंवा लाउंज मधेच होत असत त्यामुळे घरी कोणी येण्याचा आणि घरच्या गोष्टींमध्ये दखल देण्याचा प्रश्नच मिटला होता.

"तुझा उद्देश काय आहे या सगळ्यामागचा?" maggi खाता खाता एकदा ती कसे पैसे कमवते आणि कशी उधळते हे सांगत असताना मी तिला विचारलं.."
"म्हणजे ?"
"म्हणजे सामान्य लोकांचे पैसे कमवण्याचे उद्देश असतात चांगली जीवन-शैली, भविष्यात चांगलं कुटुंब,मुलं, त्यांची शिक्षणं,लग्न वगैरे वगैरे"
"मग बरोबर आहे ना? माझा उद्देश आहे चांगली जीवनशैली..बास! मी वर्तमानात जगतेय, माझ्या स्वतःसाठी, वाटलंच तर इतरांसाठीही.. माझं घर आहे, गाडी आहे, ऐशोराम आहे, ही पुस्तकं आहेत ती माझी मित्र आहेत,प्रदर्शनातून थोरामोठ्यांचा सहवास मिळतो..नेहमी वेगवेगळी माणसं भेटतात, मला वाटतं त्या लोकांना मी भेटू शकते, माझं कामाचं स्वरूप सांगितल्यावर भल्या भल्या कलाकारांना मला टाळणं शक्य होत नाही!! मी मात्र मला नको त्या लोकांना टाळू शकते.. पाहिजे ती गोष्ट,पाहिजे त्या वेळी पाहिजे तिथे मला मिळते..अजून काय हवं? नाहीतर म्हातारपणी हेच म्हणावं लागेल न कि जिवंत होते पण जगायचं राहून गेलं?"
"तरीपण...स्वतःचा संसार वगैरे..." मी चाचरत म्हणालो..
"मला नको आहेत ही बंधनं..मुळात माझा सामान्य समाजाशी संपर्कच कमी आहे..त्यामुळे त्या समाजासाठी असल्या गोष्टींमध्ये गुंतून पडण्यात मला स्वारस्य नाही. आता त्या लॉ कॉलेज रोड वर एक अनाथालय आहे, तिथे मी देते देणगी.. ३ मुलांसाठी.."
ती उठून आत गेली आणि हातात कसलेसे कागद घेऊन बाहेर आली. ती प्रगती पुस्तकं होती. एक एव्हरेज प्रगती दाखवणारं आणि उरलेली दोन बिलो एव्हरेज!!
"लोक इथे देणगी देतात आणि आपण पोसत असलेल्या मुलानं पहिलंच यावं अशी अपेक्षा ठेवतात! बाबांनो तुम्ही कधी एखाद्या इयत्तेत तरी पहिले आलात?" ती छद्मी हसली.."मी या मुलांना पोसते.. कोणतीही अपेक्षा न ठेवता.. 'तुम्ही तुमचं जीवन तुमच्या पद्धतीनं जगा' एवढंच सांगणं असतं माझं त्यांना! "
"पण.."
"कशाला हवेत रे 'पण' आणि 'परंतु'? मी जगतेय तसं मला जगू देण्यात जगाला कसला त्रास आहे ते कळत नाही.. तू माझा सगळ्यात लहान सल्लागार आणि आई सगळ्यात मोठी! "
"सल्ला नाही पण लोक काहीबाही बोलत राहतात..इव्हन आपल्या सोसायटीत..."
"बोलेनात का? अभिरुचीसंपन्न जगात वावरत राहिलं ना तर कदाचित गॉसिप्स,चारित्र्य,लग्न,मुलंबाळं यामधलं - माझ्या भाषेत- या दुय्यम गोष्टीमधलं स्वारस्य कमी होतं आणि माझ्या बाबतीत तेच झालंय. व्हू सेज व्हॉट अबाउट मी--आय जस्ट डोन्ट केअर!"खांदे उडवत ती म्हणाली "तू इथे येतोस तेव्हा तुझ्याबद्दल कोणी काही बोलत नाही आणि माझ्याबद्दल बोलतात यावरून सिद्ध काय होतं? हा लायकी नसणारा समाज नेहमी बाईलाच वाईट चालीचा ठरवतो.. हो कि नाही?" ती पुन्हा हसली..मी गडबडलो.अगदी मुळापासून हललो!

तिने सदाशिवेत एका महागड्या प्रोजेक्टमध्ये रेडी पझेशन flat बुक केला हि न्यूज आमच्या सोसायटीत वा-यासारखी पसरली आणि त्यापेक्षा वेगाने फुटलं तिच्याबद्दलच्या अफवांचं पेव..! इतकं की तिच्या घरात जाणा-या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने जणू स्वखुशीने घेतली होती. माझ्यासारख्या 'सामान्य' माणसाने आपलं स्वतःचं चारित्र्य आणि भविष्य जपायचं असेल तर तिच्या घरी न गेलेलं आणि तिच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल इतरांकडे न बोललेलंच बरं हे माझं मीच ठरवून घेतलं. ती कधी समोर दिसली तर नजर टाळून कसं जाता येईल याकडे माझं लक्ष असायचं..

एकदा तिने मला थांबवलं.. "इतरांचं एक्स्पेक्टेड होतंच..पण माझे सगळे फंडे माहित असताना देखील निदान तुझ्याकडून अशा वागण्याची मला अपेक्षा नव्हती.पण तू सुद्धा..."
"माझं मन मला खात होतं, पण तू म्हणतेस त्या समाजाच्या कक्षा तोडायचे गट्स नाहीयेत गं माझ्यात.. तुझ्यासारखं उच्च अभिरुची असणा-या लोकांत मला वावरायचं नाहीये..मला या सामान्य कुवतीच्या लोकांमध्येच रहायचंय.. तू इथे असताना त्यांना विरोध करून मी राहू शकेनही कदाचित पण पुढे तू इथून गेल्यावर काय?"
"बरोबर आहे.. मी उद्याच निघतेय.."
"तुझा नवीन पत्ता..."
"लिहून घेतोस?"
"अं..नको.. तू इथे पत्र पाठव कधीतरी..." मी माझ्याच नकळत सेफ मार्ग शोधत होतो..एव्हाना वॉचमन पासून लहान मुलांबरोबर असणा-या बायकांपर्यंत सगळ्यांच्याच नजरा मला बोचायला लागल्या होत्या.. ती पुन्हा हसली..मी एक formality म्हणून पत्ता विचारलाय हे तिने ताडलं.. माझ्याबद्दलची कीव तिच्या त्या हास्याच्या लकेरीतून दिसत होती.

ती निघून गेली. अपेक्षेप्रमाणे नंतर तिचं काही पत्र वगैरे आलं नाही. त्यानंतरच्या काही दिवसांत सोसायटीतल्या काहीजणांनी माझ्याकडे पिंका टाकून तिचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. मीही त्यांच्यातलाच असल्याचं भासवलं. भासवलं कशाला? होतोच. मला तरी कुठे काय माहित होतं? आधीच म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी ती, एनीवेज, विचारल्या तरी नाही सांगायची.आयुष्यातल्या एका अवचित स्त्रीचा अध्याय संपला पण त्यानंतर जाणवलं कि आपल्यालाही असंच जगणं जगायचं होतं; जे स्वैर नसेल पण स्वच्छंद असेल, जे कोणीतरी जुन्या काळात ठरवलेल्या किचकट नियमांनी बांधलेलं नसेल पण स्वतंत्र असेल,जे भविष्याची निष्कारण काळजी करणारं नसेल पण वर्तमानाचा यथेच्छ आनंद लुटणारं असेल.. नाहीतर पुढे जाऊन हेच म्हणावं लागणार आहे की जिवंत तर होतो पण सालं जगायचं राहूनच गेलं!!

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११

'राजू' नाम मेरा..

ही व्यक्ती पहिल्यांदा मला देवळात भेटली. नाही नाही.. भक्ती रसात लीन वगैरे नाही! तर आदल्यादिवशी मदिरा रसात तल्लीन होऊन घरी परतताना अचानक पाऊस आल्यामुळे देवळाचा आश्रय घेतला होता त्याने!!  मी रविवारी (कधी नव्हे ती सक्काळी-)सकाळी अंघोळ करून चहा ढोसण्यासाठी  जात असताना, वाटेवरच्या गणपती मंदिरात गेलो. देवाला नमस्कार केल्यानंतर परतताना जरावेळ टेकल्यासारखं करायचं म्हणून मी तिथेच झोपलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसलो. एक नजर फिरवली तर तो एक धष्टपुष्ट तरुण होता. मी बसल्याची चाहूल लागताच तो उठून बसला..
"मित्रा,वाजलेत किती?" चेह-यावरून आणि केसांवरून हात फिरवून ते नीट केल्यानंतर त्याने मला विचारलं.
"साडेनऊ" मी त्रोटक उत्तर देवून शांत बसलो.
"इथे जवळ कुठे चहाची टपरी आहे?"
"आहे पुढे कॉर्नरवर. इथून सरळ गेलं कि चौकात डावीकडे वळायचं आणि दुस-या गल्लीच्या सुरुवातीलाच आहे" मी हातवारे करत माहिती पुरवली पण तो कन्फ्युज झाला असावा.
"जरा दाखवशील का? बाईक वर जाऊ. मी तुला drop करतो इथेच पुन्हा."
"किती सिम्पल आहे. इथेच तर आहे"
"पटकन दाखव आणि चटकन येवू मागे.."
"मला पण चहा प्यायचा होता" मी म्हटलं.
"मग चल ना.. तेव्हढीच कंपनी होईल एकमेकांना" आम्ही त्याच्या बाईकवर टांग मारली.
ही आमची पहिली आकस्मिक भेट..
मग आम्ही टपरीवर गेलो. त्याला आदल्या दिवशी कोणीतरी कसं पार्टीला बोलावलं, तो कशी थोडीशीच व्होडका प्यायला, मग वा-यामुळे त्याला ती कशी चढली आणि तो कसा देवळात झोपला वगैरे स्टोरी मी ऐकून घेतली आणि चहा क्रीम रोल खाता खाता दोन चार 'अनुभवाच्या गोष्टी' मी पण ऐकवल्या.
"चांगलं वाटलं तुला भेटून" मला drop करताना तो म्हणाला. तेव्हाच मला जाणवलं कि या माणसाचा आपल्या आयुष्यातला मुक्काम लांबणार!
अर्थात झालंही तसंच..

त्यानंतरच्या रविवारीच असेल बहुधा.. हो.. रविवारच होता. एका मित्राला लायब्ररी लावायची हुक्की आली म्हणून मी त्याच्याबरोबर एका वाचनालयात गेलो. तर हे महाशय तिथे उभे!
"आयला! तू कसा काय इथे?" मला  आश्चर्य लपवता आलं नाही
"अरे मी इथे कामाला आहे"
"नाव काय तुझं?"
"मी राज" तो म्हणाला.
"फिल्मी आहे रे नाव! तू काय इथे लायब्रेरियन म्हणून की..?"
"नाही रे..पुस्तकं द्यायला घ्यायला." मी बुचकळ्यात पडलो ते त्याने हेरलं. त्याने पुन्हा चहाचं आमंत्रण दिलं. आणि त्याच्या सरांची म्हणजे तिथल्या लायब्रेरियनची परवानगी घेऊन तो मला घेऊन बाहेर पडला. माझा मित्र त्याचं काम झाल्यावर जायला गेला त्यामुळे आम्हाला खुलेपणाने बोलताही आलं.
 
अनाथालयात वाढलेला पण मोठा झाल्यावर तिथून पळून आलेला वगैरे- अशी happening पार्श्वभूमी असणारा तो पोरगा होता.त्याचं खरं नाव राजू. मी विचारलं तेव्हा मला त्याने "राज" असं सांगितलं होतं खरं. पण नंतर 'अनाथालय' वगैरे प्रकार सांगितल्यावर मला शंका आली.
"तुझं राज-बीज असं नाव कसं काय ठेवलं बुवा?" मी निरसन करून घ्यायला शंका विचारली .
तेव्हा त्याने सांगितलं "नाही रे.. खरं नाव राजू.. पण हल्ली हिंदी मराठी पिक्चर वाल्यांनी राजू बिजू ही नावं नोकरांची करून टाकली आहेत त्यामुळे ते जरा डाऊनमार्केट का काय म्हणतात ना तसं वाटतं. म्हणून मी राज असं सांगतो. तेव्हढंच जरा बरं इम्प्रेशन.."


नंतर आम्ही ब-याचदा भेटलो. कधी असेच अचानक तर कधी ठरवून. तो माझ्या मोबाईलवर फोन करायचा आणि भेटीचं ठिकाण ठरायचं!
वाचनाची आणि पुस्तकांची क्रेझ. पण मराठीच. पळून गेला तेव्हापासून त्याने वेगवेगळ्या वाचनालयात काम केलं.
"प्राथमिक शाळेत  मी शिकलो तेव्हाच पुस्तकांची आवड होती मला.सगळी अनाथालयाची कृपा..!" तो सांगायचा.." पुस्तक मिळाली कि पहिल्यांदा इतिहासाच्या पुस्तकातले धडे, गोष्टी समजून वाचून काढायचो. मग अभ्यास वगैरे. आमच्या मागे तुम्हा लोकांसारखे आईबाबा नव्हते 'अभ्यास कर अभ्यास कर' म्हणून धोशा लावणारे! त्यामुळे मी ठरवीन ती पद्धत! असा सगळा मामला होता. सामान्य कुवतीचा मुलगा होतो मी आणि अजूनही आहे."
तो स्वतःचं आधीच रंजक असणारं लाईफ अजून रंगवून सांगायचा. ऐकणा-याला ऐकतंच राहावंसं वाटायचं.
"किती शिकलास? आणि सगळ फुकटफाकटचं मिळत असताना पळून का गेलास तिथून?"
"शिकलो दहावीपर्यंत. पण नंतर वैतागलो. मला आमच्या गुरुजी आणि बाईंमुळे उगीचच वाटायचं कि मी दहावी झालो कि मी सुशिक्षित म्हणवला जाणार, सगळी सुखं पायाशी लोळण घेणार वगैरे वगैरे.. पण निकालानंतरच्या काही दिवसातच कळलं कि या शिक्षणावर जास्तीत जास्त वॉचमन होऊ शकेन!"
आम्ही दोघेही हसलो.
"अनाथालयात माझ्याकडून फारश्या अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे मी पळून गेल्याने त्याचं काही गेलं नाही. काही कायदेशीर कटकटी झाल्या असतील तेवढंच.. मग मी ठरवलं आपलं लाईफ आपल्या पद्धतीने जगायचं. चो-यामा-या करायची मुळातच प्रवृत्ती नव्हती त्यामुळे आधी पुस्तकांच्या दुकानात नोकरी मिळते का ते बघितलं. नाही मिळाली. पण नंतर एका लायब्ररी मध्ये काम मिळालं. पुस्तकं द्यायचं नव्हे तर साफसफाईचं!तिथून मग सरांशी गोड बोलून,माझी आवड सांगून ते काम मिळालं. मग त्यांच्या ओळखीने थोड अजून जास्त पैसे असणा-या लायब्ररीत लागलो.असं करत करत आता सध्याच्या लायब्ररीत आहे.." त्यानं सांगितलं.
मजा होती कि नाही? शून्यातून विश्व निर्माण करणा-या मोठ्या लोकांच्या जीवनातले चढउतार, उन्हाळे पावसाळे अश्या गोष्टींवर ठिकठिकाणी चर्चा झडतात,भारंभार विश्लेषणं होतात, कौतुकं होतात. पण शून्याच्याही मागून सुरुवात करून सामान्य जीवन जगणा-या राजू कडे आपलं कधी लक्षही जात नाही..

"ए तू कुठे राहतोस?" एकदा असंच,त्याचा ठावठिकाणा  माहित असावा म्हणून मी विचारलं.
"इथेच राहतो..चल येणार?" मी मान डोलावली.
त्याच्या बाईकवरून आम्ही निघालो..
"गाडी माझी नाहीये ही.. मित्राची आहे. रूममेटची. अगदी गरजेच्या वेळेलाच घेतो मी. त्यालाही ते माहित आहे त्यामुळे त्याची कधी ना नसते.."
"तू हॉस्टेल वर राहतोस?"
"एक flat आहे. हल्लीच तिथे आलोय आम्ही राह्यला. मी आणि अंकित. आधी कॉट बेसिस वर राहयचो. त्याचा  मित्र राहत होता त्या flat वर २ जणांसाठी जागा होती. मग आम्ही गेलो तिकडे.."
"बर्र.."
"अंकितने  तुझ्यासारखंच इंजिनियरिंग केलंय. तो पहिल्या वर्षाला होता तेव्हापासून आम्ही पार्टनर्स आहोत. आता त्या पाळीव प्राण्यांच्या कंपूत नोकरी  करतो तो ."
"पाळीव प्राण्यांच्या कंपूत? राणीच्या बागेत आहे कि काय?"
"नाही रे.. हिंजवडीत..आय टी पार्क मध्ये! गळ्यात पट्टा घालून जातो आणि तसाच येतो.. म्हणून पाळीव प्राणी! "
"हा हा हा.." मी खळखळून हसलो.." सहीये सहीये कन्सेप्ट! पाळीव प्राणी..मी पण त्यातलाच रे..."
"असू दे रे.. त्याला चिडवायला मी म्हणतो.बाकी काही नाही!"
आम्ही त्याच्या flat वर पोचलो..
"काय काका कसे आहात? काकू पाय काय म्हणतोय? पिंकी, परीक्षा आहे ना खेळतेयस काय? जा चल अभ्यास कर नायतर पप्पांना नाव सांगेन हां!"  वगैरे सोसायटीतल्या शक्य तितक्या सगळ्यांची हजेरी घेत तो मला घेऊन दुस-या मजल्यावर पोचला.

घरात बसल्यावर आमच्या ब-याच गप्पा झाल्या. लायब्ररी व्यतिरिक्त सकाळी सहा ते नऊ आणि रात्री सहा ते नऊ तो जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करत असे!
त्याच्या धिप्पाड शरीरयष्टी बद्दल मी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं.
"हे बघ, मला ना कोणी आगे न पिछे.. जे करायचं ते स्वतःसाठी. बरोबर?"
"हम्म.." मी मान डोलावली.
"मला कपड्यालत्त्यांची, गाडीघोड्याची आवड नाही. म्हणजे मुळात सगळ्या मुलांना असते तशी असली तरी ती कालौघात मेली असेल.  खाऊन पिऊन थोडे पैसे उरायला लागले ते मी साठवत गेलो. आणि एकदा या अंकितच्या नादानेच जिम लावली. त्याने  हौस फिटल्यावर सोडली पण मला व्यसन लागल्यासारखं झालं.मग तिथल्या ओळखी बनल्यानंतर मला कन्सेशन मिळायला लागलं. मग सरांच्या सांगण्यावरून सर्टीफिकेशन केलं. 'तिथेच ट्रेनर म्हणून काम करेन' या बोलीवर सरांनी पैसे सुद्धा भरले. चांगली माणसं मिळाली मला काही काही. खरतर जी चांगली माणसं मिळाली ती मी सोडली नाहीत."
मी अवाक होऊन ऐकत होतो.
"पाच पैशाचं सेविंग कि काय म्हणतात ना ते नाही माझं! पण हो पाच पैशाची उधारीपण नाही हां!"
जीवन अक्षरशः जगत होती ही व्यक्ती.. त्याला आवडणारी कामं आणि त्यातून अर्थप्राप्तीसुद्धा.. मर्यादित गरजांमुळे हव्यासही नाही! सुख सुख म्हणजे अजून काय असतं?

कधीतरी एकदा मी त्याला पहिल्याच भेटीतल्या दारू बद्दल विचारलं होतं..
"मी पितो, पण कोणी आग्रह केला तरच. आता तुला पण माहितीये माझी परिस्थिती कशी आहे ते. मी कुणाला 'दारू पाजेन' असली आश्वासन देत नाही कि स्वतःहून कोणाला सांगत नाही. जर कोणी ऑफर केली तरच.. मी खोटा आव आणत नाही. काय आहे माहितीये का, कधी कधी लोकांना मन मोकळं करायला असा एक माणूस लागतो जो कधी चुकूनमाकून सुद्धा त्यांच्या आयुष्यात येणार नसतो."
"काय सांगतोस? असं कसं शक्य आहे?"
"कधी जाणवलं नाही तुला हे? बस रेल्वे मधून प्रवास करताना तुझ्याकडे कोणी कधी काहीच बोललं नाही? कोणी स्वतःचं कर्तृत्व किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्सचं विश्लेषण करून सांगितलं नाही?"
मी विचार केला.. ब-याच जणांनी सांगितलं होतं खरं, आणि मला नावं तर सोडाच, चेहरे पण नव्हते आठवत..
"हो रे..खरंच!" मला कमाल वाटली!
"मग? मी या लोकांचा 'तो अनोळखी' माणूस आहे.कोणाचं दुःख ऐकून सांत्वन करायला किंवा कोणाचा आनंद घेऊन तो उधळायला; थोडक्यात कोणाच्या सुखाचा सोबती व्हायला अथवा दुःखाचा वाटेकरी व्हायला मला पैसे नाही पडत ना!"
मी हसलो..फारच पुस्तकी बोलायचा कधी कधी! तरीही हे मान्य करावंच लागायचं की काहीवेळा आपली विचार करायची पद्धतच वेगळी असते. निदान याच्यासारखी तरी नसते!

"तुला कधी तुझ्या जन्मदात्यांचा शोध घ्यावासा नाही वाटला?"
"हिंदी सिनेमातल्यासारखा ?" त्याने विचारलं आणि हसून मला टाळी दिली.."सत्य आहे ते स्वीकारावंच लागतं रे.. जिवंत नसतील तर प्रश्नच मिटला आणि असतील तरी तेव्हा त्यांना मी नको होतो म्हणूनच टाकून दिला असेल ना? आणि आता त्यांना शोधून काढलं तरी काय साध्य होणार आहे? मला गरज होती तेव्हा तर ते मिळालेच नाहीत.. महाभारत वाचलंयस ना? एवढ्या कर्तृत्ववान कर्णाची कुंतीने केलेली भावनिक पिळवणूक बघितली तर वाटतं कुठल्याच अनाथ किंवा अनौरस मुलाला त्याचे खरे आई-बाबा कळू नयेत.. निदान त्या मुलाचे तरी हाल नाही होणार."
"पण तूच म्हणतोस ना, कि सत्य स्वीकारावं लागतं?"
"शब्दात पकडू नकोस रे.. अज्ञानात सुख असतं हेही खरंच आहे ना? कशाला जीवनातल्या सगळ्या सत्यांची ओळख करून घ्यायची?"
पटला तो विचार मला.. "आणि सत्य खरं असतं,सत्याचा विजय होतो वगैरे पुस्तकात ठीक वाटतं! वास्तविक जीवनात ज्याचा विजय होतो त्यालाच सत्य सत्य म्हणून गौरवलं जातं!" तो म्हणाला.
"इतिहास बघितला तर हेही पटेल बघ तुला..रामायण,महाभारतात रावण, कौरव वगैरे मंडळी जिंकली असती तर कदाचित इतिहास वेगळा असता.. अर्जुनाच्या सुभद्रेबरोबरच्या लग्नाची, द्रौपदीच्या सांसारिक हालांची, धर्माच्या नरो वा कुंजरो वा या विधानाची, द्यूत खेळणा-या आणि त्यात बायकोला देखील पणाला लावणा-या पांडवांची बाजू घेताना मन कचरलं असतं.. दुस-या महायुद्धात हिटलर जिंकला असता तर इतिहासाची पानं निराळ्या शब्दात लिहिली गेली असती.जर युद्धात विजयश्री नसती तर अमेरिकेच्या अणुबॉम्ब हल्ल्याचं समर्थन सुद्धा होऊ शकलं नसतं! युद्धात नेहमी जेते- युद्ध जिंकणारेच  इतिहास लिहितात आणि तो कधीच निरपेक्ष नसतो हेच खरंय.."  आणि खरंच होतं ते.. तटस्थ  विचार करणा-या व्यक्तीला हे पटेलही कदाचित!
मराठीबद्दल अतिशय दुराग्रही.. खरंतर  त्याच भाषेवर त्याचं प्रभुत्व होतं म्हणून असेल; पण सगळ्यांशी हट्टाने मराठीतूनच बोलायचा.. त्याची तब्ब्येत समोरच्या माणसावर फरक पाडत असेल बहुधा, पण ज्यांना येत नसे ते लोक सुद्धा तोडकं मोडकं मराठी बोलत त्याच्याशी!
"आपली मराठी मरत नाही रे.." कधी भाषेवर विषय घसरला तर तो सांगायचा.. " मराठी लोक महाराष्ट्र सोडून इतर देशी गेले तसे हे बिहारी, युपीवाले महाराष्ट्रात येतात.. त्याचा एवढा बाऊ कशाला करायचा? विश्व भोजपुरी किंवा उडिया साहित्य संमेलन होतं असं ऐकलंयस का तू आतापर्यंत? पण मराठी होतं ना? अमेरिकेत काय, जपानमध्ये काय, सगळीकडे महाराष्ट्र आणि मराठी मंडळं आहेत..एवढ्यात काय मरत नाही मराठी.. फक्त समृद्ध होत जातेय इतकंच.. आता प्राकृत मराठी आणि आताची मराठी यात फरक आहेच ना रे? तसंच आहे ते.. पुढची पिढी जरा इंग्रजाळलेलं मराठी बोलेल पण ते मराठीच! आता मला इंग्रजी येत नाही तरी कितीतरी इंग्रजी शब्द मी वापरतोच ना? मग? पण आपण सगळ्यांनी मराठी बोलण्याची जी लाज वाटते ती सोडली कि झालं.. मी बघतो वाचतो कि इतर प्रांतातले मग ते साउथ मधले असोत कि गुजरात मधले एकत्र भेटले कि त्यांच्या भाषेत संवाद सुरु करतात आणि महाराष्ट्रातले? हिंदीत! त्यांना काय कमीपणा वाटतो कोणास ठाऊक! असो.. पण मला वाटत मी जिवंत आहे तो पर्यंत तरी मराठी मरत नाही.. आणि मरतानासुद्धा हे सुख असेल कि मी भाषा जगवायला फुल ना फुलाच्या पाकळीचं तरी कॉन्ट्रीब्यूशन केलं!" मी टाळ्या वाजवल्या..

मी मोबाईल नंबर बदलला त्यानंतर सहा एक महिन्यानंतर माझ्या लक्षात आलं कि मी राजूला हा नंबर दिला नाहीये..कामाच्या धबडग्यात त्याचा संपर्क राहिला नव्हता..एकदा वेळ काढून मी त्याच्या सोसायटीत गेलो तेव्हा कळलं  कि राजू आता तिथे राहत नाही,  तो flat विकला गेला होता, आणि नवीन मालकाने तिथे भाडेकरू ठेवले होते.. अंकितला भेटायच्या किंवा निदान त्याची माहिती तरी विचारायच्या फंदात मी कधी पडलो नाही त्याचा मला पश्चाताप झाला. लायब्ररीत गेलो तर राजू 'काही अपरिहार्य कारणास्तव' ती लायब्ररी सोडून गेल्याचं कळलं. तिथल्या सरांनी एक नंबर दिला पण तो अजुनतागायात लागला नाही..तो कुठल्या जिम मध्ये जात होता त्याचं साधं नाव विचारायच्या भानगडीत देखील मी पडलो नव्हतो. फेसबुक आणि इंटरनेट च्या जगात केवळ तो त्यांच्या संपर्कात नसल्यामुळे मी त्याचा शोध घेऊ शकत नाहीये...पाण्यासारखा तो..जो कोणी त्याच्यात मिसळेल त्याचा रंग घेणारा. कोणी दुसरा 'मी' भेटला असेल त्याला..तरीही विसरणं मुश्कील आहे त्याला.

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

आर्टी

आर्टी म्हणजे आर टी.. हे त्याचे इनीशीयल्स नव्हते बरं का.. आर टी म्हणजे रोख-ठोक. माणूसच तसा! एकदम सडेतोड. तसा तो पेशाने डॉक्टर. लोक त्याला डॉक्टर म्हणूनच ओळखत आणि हाक ही अशीच मारत.. "ओ डॉक्टरसाहेब!" अशी.. पण मी त्याला आर्टीच म्हणत असे..सावंतवाडीच्या कॉलेजातून बीएएमएस (मुंबई) केलं होतं त्याने. (पूर्वी मुंबई युनिवर्सिटी ही डिग्री द्यायची; हल्ली नाशिक युनिवर्सिटी देते. त्यामुळे कंसात काहीतरी मेन्शन करावं लागतं म्हणे!) मी शाळेत होतो तेव्हा आमच्या नात्यातला एकजण- एक दादा तिथे शिकत होता. त्याचा हा मित्र. त्याच्याबरोबर तो आमच्या घरी यायचा. सुट्टीच्या दिवशी घरचं जेवण जेवायला. घरात लगेच मिक्स होऊन गेला तो. त्या दिवसातसुद्धा संस्कृत आणि इंग्लिश मध्ये लिखाण असणारी मोठी मोठी पुस्तकं,ग्रंथ वाचायचा..आणि मला उपदेशाचे डोस द्यायचा! मला तर आधी वाटायचं, याला हे सगळं त्या संस्कृत श्लोकांमधूनच समजतं कि काय! :) पण नाही!.. ते रसायनच अजब होतं.

आर्टीचं बीएएमएस झाल्यावर त्याने त्याच्या गावात दवाखाना टाकला. तो चांगला चालायलासुद्धा लागला. मग त्याचं आमच्याकडे येणं जवळजवळ थांबलं. पण मग मी माझ्या आजोळी गेलो कि आवर्जून त्याच्याकडे जायला लागलो. दवाखाना म्हटलं कि एकतर पांढरीफटक किंवा मळकट निळसर,हिरवट असे आजारीपणाचं  फिलिंग देणारी खोली डोळ्यासमोर येते, त्यात डेटॉल,फिनाईल किंवा तत्सम जंतूनाशकाचा दर्प,वेगवेगळ्या विकारांचे पोस्टमार्टेम करणारे फोटो किंवा पोस्टर असं काहीतरी भयंकर डोळ्यासमोर येतं. पण आर्टी वेगळा होता. प्रचंड स्वच्छ दवाखाना,आकर्षक रंगसंगती, कुठून तरी आणलेलं सुंदर वासाचं जंतुनाशक, थोड्या थोड्या वेळाने हवेत स्प्रे होणारे सुवासिक स्प्रीन्क्लर्स असा त्याचा थाट होता. का नाही येणार पेशंट्स? तिथे आल्या आल्या त्यांना निम्म बरं वाटत असेल!

तो पेशंटशी बोलत असताना फार कमी लोकांना तिथे थांबण्याची परमिशन होती. मी त्यातलाच एक सुदैवी!
"काय होतंय काका?"
"बर नाय वाटत हाय..गळून गेल्यासारक वाटत हाय..विन्जेक्षण द्या!!"  मी आश्चर्यचकित!
"ताप,खोकला, अंग दुखी वगैरे?"
"बाकी काय नाय,"
"काका,शेती केलीत ना आता? त्यानं थोडफार होतं असं.."
"तुमी ते विन्जेक्षण द्याना डागतर.त्यांनी बरं वाटतंय" गावातले लोक त्याच्याशी 'शुद्द आणि सपष्ट' बोलायचा प्रयत्न करीत असत!
"बरं.. या इथे बेडवर..चप्पल काढून ठेवा.." वगैरे वगैरे.. मी गुपचूप पणे बघत होतो..

"आर्टी.. लोक इंजेक्शन द्या म्हणाले कि तू देतोस? कमाल आहे!" पेशंट गेल्यावर मी म्हटलं..
"ग्लुकोजचं इंजेक्शन असतं रे ते..या लोकांना थकवा येतो शेतीभाती करून. ग्लुकोज ने थोडी तरतरी येते.."
"च्यायला, म्हणून तू ३० ३० रुपयांना नाडतोस?"
"काहीही काय बोलतोस? मी नाही दिलं तर ते तिकडे त्या डॉक्टर शानभाग कडे जाऊन तेच इंजेक्शन घेणार.. मला ३० रुपये देतात ते त्याला जावून ५० देणार.. वरून 'या डॉक्टरला  काय जमत नाही' असं म्हणणार ते वेगळंच! गावातले लोक आहेत बाबा हे.. सगळं जपावं लागतं. पेशंट गमावून चालणार नाही मला."
"हो,शेवटी तुझा पैसा त्यांच्या खिशातूनच येतो.." मी टोमणा मारला
" तू लहान आहेस अजून आणि माझा लाडका म्हणून मी हे ऐकून घेतो हां!" drawer उघडत आर्टी म्हणाला "या माझ्या सगळ्या पेशंट्सच्या फाईल्स आणि केस पेपर्स. इतक्यांचा स्टडी आहे माझा,त्यांच्या हिस्टरी सकट. कोणाला कशाची allergy आहे इथपासून कोणत्या औषधाला कोण कसं react करतं इथपर्यंत. म्हणून त्यांनी लक्षणं सांगितली कि मी लगेच डायग्नोस करतो काय झालंय ते.  एक पेशंट गमावला कि ही फाईल म्हणजेच त्याच्यामागचे माझे प्रयत्न, सगळं वाया गेलं! समजलं?"

नजरेत जरब, वागण्याबोलण्यात शून्य गोडवा असा हा प्राणी.
"नाही आवडत मला गुलझार! लोकांना आवडतो म्हणून मला आवडलाच पाहिजे का?"
"तसं नाही.." माझी सारवासारव
"मला नाही कळत उर्दू.. आणि त्याचं तर नाहीच नाही. मी म्युझीकपेक्षा लिरिक्स ऐकणारा माणूस आहे. गाणी ऐकून म्हणायला आवडतात मला.. त्यामुळे असेल कदाचित. आता त्या 'छैय्या छैय्या' गाण्यातलं 'गुलपोश कभी इतराए कहीं, महके तो नज़र आ जाये कहीं ताबीज़ बना के पहनू उसे आयत की तरह मिल जाए कहीं' हे किंवा 'यार मिसाले ओस चले पांव के तले फिरदौस चले कभी डाल डाल कभी पात पात' हे वाक्य! काय अर्थ आहे सांग? अजून तुझं ते साथियातलं गाणं 'बर्फ गिरी हो वादी में और हंसी तेरी गूंजी उन में लिपटी सिमटी हुयी बात करे धुवां निकले.. गर्म गर्म उजला धुवां नर्म नर्म उजला धुवां' या वाक्याचा रीलेवंस काय? एखादी गोष्ट नाही कळत तर नाही कळत! तशीच इंग्लिश गाणी! तीपण नाही झेपत.त्याच्यात शब्द महत्वाचे नसतात म्युझिक महत्वाचं असतं.. मी vernacular मिडीयमचा आहे.लोकांमध्ये शायनिंग मारण्यासाठी मी इंग्लिश पिक्चर बघतो,इंग्लिश गाणी ऐकतो असं सांगणं मला नाही जमायचं.. मला इंग्लिश पिक्चर आवडतात पण हिंदी मध्ये डब केलेले. इंग्लिशमध्ये बघताना एक डायलॉग कळेपर्यंत पुढचे बरेचसे मिस होतात.. मग काय उपयोग ते बघण्याचा?"
"त्यानं इंग्लिश सुधारतं असं म्हणतात!" मी ऐकीव माहिती दिली..
"मेडिकलला इंग्लिशमधूनच शिकलोय रे मी आणि international कॉनफरंसेस अटेंड करतो मी ते बघतोस ना? माझं active पार्टीसिपेशन असतं माहितीये ना? माझं इंग्लिश पुरेसं आहे माझ्या कामासाठी!" असं त्यानं म्हटलं कि मी बापडा काय वाद घालणार?

"तू गर्विष्ठ दिसतोस,वागतोस असं कोणी तुला सांगितलं नाही?" ६-७ वर्षांनी लहान असलो तरी सुदैवाने मी आर्टीला काही म्हणजे काहीही विचारू शकत असे! "पुणेरी भाषेत त्याला माज म्हणतात!" मी हसत म्हणालो.
"कुणी सांगायला कशाला हवं? माहित आहे मला! मी रोज माझा चेहरा आरशात बघतो..!"
"मग? विद्या विनयेन शोभते असं म्हणतात!"
"ते ढ लोक.. म्हणून मी ऐकू? तसं तर 'ठेविले अनंते तैसेची राहावे' असंही म्हणतात! 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असंही म्हणतात!" आर्टी हसत म्हणाला..मी गप्प बसलो.
"का असू नये माज? सांग ना? का असू नये? स्वकर्तृत्वावर इथपर्यंत पोचलोय मी. बाबा दारू पिऊन नेहमी जमीनदोस्त,आई पंचायत समितीत कामाला होती म्हणून शिकलो तरी. त्यात माझ्याकडे जातीच्या प्रमाणपत्रासारख्या कुबड्या नाहीत..'खुला प्रवर्ग' असल्याबद्दल वाईट वाटलं ते तेव्हाच, admission च्या वेळी. आमच्याकडे डोनेशन ची रक्कम नाही,त्यामुळे management कोट्यातून एमबीबीएस ला admission घेण्याचा प्रश्नच नव्हता.. विपरीत परिस्थितीतून एवढे मार्क्स मिळवूनही बीएएमएस शिवाय पर्याय नव्हता. तुला सांगतो..तिथे पण कित्येकजण केवळ वडिलोपार्जित धंदा पुढे चालवायचा म्हणून आलेले! passion अशी नाहीच. बापाचं हॉस्पिटल आहे किंवा क्लिनिक आहे; ते पुढे चालवायला हवं म्हणून आलेले बैल होते ते! जोतावरून बाप निघाला कि तोच जोत खांद्यावर घेणारे!"
"त्यात चूक काय आहे? वडिलांनी दिलेला वारसा पुढे चालवण्यात? बिझनेसमन तेच तर करतात"मी म्हटलं
"अरे पण लायकी तरी हवी ना? डॉक्टरी पेशा हा बिझनेस नाहीये रे. गावात लोक देव मानतात त्यांना. पैसे देवून आणि रिझर्वेशन थ्रू किंवा management कोट्यातून प्रवेश घेवून मग रडत खुरडत पास होत केवळ सर्टीफिकेट मिळवण्यापुरतं डॉक्टर होण्यात काय हशील?"
"भारतातली सगळी एज्युकेशन सिस्टीमच तशी आहे आर्टी.. आपल्याकडे तयार होणारे इंजिनियर्ससुद्धा तसेच आहेत त्याला काय करणार?"
"म्हणूनच म्हणतो कि मी करणार माज! एक ई बी सी सर्टीफिकेट मिळवण्यासाठी वणवण फिरलोय मी.. डोमिसाईल , nationality सारख्या दाखल्यांसाठी लायकी नसणा-या लोकांनी तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारायला लावले आहेत मला. त्यांच्याबद्दल कोणी अवाक्षर नाही उच्चारत! सगळा विनय दाखवायचा तो माझ्यासारख्यांनी..मी नाहीये त्यांच्यातला ..शून्यातून उभारलंय मी सगळं.. एकट्याच्या जीवावर. अभिमान आहे मला त्याचा.स्वाभिमान! मग त्याला कोणी माज म्हणो अथवा गर्व. आणि 'गर्वाचे घर खाली' असेल तर हरकत नाही.. ते घर माझं तरी असेल!"तो म्हणायचा.

त्याला कार या गोष्टीची खूप आवड.. म्हणजे विकत घ्यायचीच असं नव्हे पण चालवायची सुद्धा. विकत घेण्याच्या बाबतीतही अगदी secondhand  मारुती ८००  पासून सुरुवात करत करत साहेब आता शेवरोले क्रुझ पर्यंत पोहोचले आहेत. 
"मक्खन आहे एकदम..डीझेल इंजिन आहे पण बॉनेटला हात लावला तरी कळणार नाही गाडी चालू आहे ते.." तो सांगतो आणि डीझेल इंजिनचे व्हायब्रेशन्स जास्त जाणवतात याचा गंधही नसणारा माणूस किंवा त्याचा एखादा पेशंट "त्यात काय विशेष?" असा चेहरा करून ते ऐकून घेतो!
"मी खरा mechanic व्हायचो पण केवळ तो व्यवसाय एकट्याच्या जीवावर करता येत नाही म्हणून मी डॉक्टर झालो. :)"असं म्हणून "टायमिंग बेल्ट आवाज करतोय, चल सर्विस करून येवू.. किंवा cranking च्या वेळी कसलंतरी हमिंग येतं.." असं काहीतरी जर तो म्हणाला तर मला ते "vascular डेमेंटीया ची केस आहे त्यामुळे शहरात जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागेल" या वाक्याइतकंच अगम्य वाटत असे!

त्याच्याबरोबर लाँग ड्राईव्ह ला जायचा मजा औरच.
"घे चल गाडी!आपल्याच गाडीवर बिनधास्त शिकशील" असं म्हणत त्यानं मला कार शिकवली..
"माझी उंची कमी आहे रे अजून..बॉनेट दिसतपण  नाही. पूर्ण वाढ झाली कि शिकेन.. " मी घाबरायचो.
"इथे शरीराची उंची लागत नाही रे,मेंदूची लागते..तुझी ती उंची पुरेशी आहे..बारावीत म्हणजे लायसन्सचं वय आहे तुझं.. तुझ्याइतका असताना मी कुठलीपण गाडी चालवू शकत होतो. मला तर अशी आयती गाडी पण कोणी देत नव्हतं. 'जजमेंट' एवढी एकाच गोष्ट महत्वाची आहे. ती स्टीअरिंग हातात घेतल्याशिवाय नाही यायची."
लवकरच मी गाडी शिकलो.नंतर मग मी कधी त्याच्याकडे गेलो कि आम्ही गाड्यांच्या टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने ब-याच गाड्या चालवल्या. सिटीमधल्या वेगवेगळ्या शोरूम्सना त्याची '+' चिन्ह असणारी कार घेऊन दाबात जायचं आणि आम्हाला हवी ती गाडी फिरवून कमेंट्स टाकून परत यायचं असले उद्योगही आम्ही केले! सिटीमध्ये ओळख नसल्याने बाकी कसला प्रश्न नव्हता.. हल्ली हल्ली ऑडी , निसान अशा कंपन्या appointment शिवाय प्रवेश देत नाहीत हे देखील मला त्याच्यामुळेच कळलं!
'डॉक्टरच्या वरचढ झालेत हे शोरूम्स वाले' असला शेलका शेरा टाकून आम्ही परतायचो!
"एक लक्षात ठेव.. जोपर्यंत आपण गाडी शिकत असतो तेव्हा आपल्याला गाडी येत नाही असं समजायचं आणि सावध राहायचं.. एकदा शिकलास की इतरांना गाडी येत नाही असं समजायचं आणि सावध राहायचं..थोडक्यात काय तर.."
"..तर गाडी चालवताना आपण नेहमी सावध राहायचं.." मी वाक्य पूर्ण करायचो आणि तो हसायचा..

त्याच्या आयुष्यातली मुलगी देखील गोड होती.त्यावेळी ती इंजिनियर होत होती.. तिची ओळख त्याने 'तुझी वहिनी' अशी करून दिली होती. इंजिनियरिंगला जाताना तिने  इंजिनियरिंगचा अभ्यास कसा करावा यावर मला मार्गदर्शन केलं होतं (जे अंमलात आणायची वेळ कधीच आली नाही!! )छान होती वहिनी. (आणि हो..इंजिनियरिंगला 'अभ्यास' वगैरे करणारी माझ्या बघण्यातली एकमेव इंजिनियर!!) त्याने तिला  लिहिलेल्या काही प्रेमपत्रांचं मी प्रुफ रीडिंग करायचो आणि तिच्या पत्रांचं नुसतं रीडिंग! मला जाम हसू यायचं पण तो हळवा व्हायचा त्यामुळे तेव्हा हसून त्याला दुखवावंसं नाही वाटायचं! पण शेवटी जगातल्या असंख्य मुला-मुलींप्रमाणे हा गडी सुद्धा प्रेमभंगाच्या गर्तेत सापडला! दोघांनीही प्रत्यक्ष आणि पत्रातून, प्रेमाच्या आणाभाका घेवून आणि शेवटपर्यंत एकमेकांची साथ द्यायच्या आणि एकमेकांशिवाय न जगण्याच्या शपथा-बिपथा घेवून नंतर तिच्या पालकांनी परवानगी नाकारल्यामुळे त्याच्या प्रेमकहाणीचा शेवट लग्नात होऊ शकला नाही. तरीसुद्धा हे दोघेही जिवंत आहेत आणि धडधाकटही आहेत त्यामुळे या असल्या शपथा काही ख-या नसतात हे मात्र मला पटलं!असो..

काही काळ तो डिप्रेस्ड होता पण त्याचा रोजच्या कामकाजावर त्याने कधीच परिणाम होऊ दिला नाही .
"नाती ही अपेक्षेतून तयार होतात रे.. काही ना काही अपेक्षा असते. अगदी आई बाप आणि मुलाच नातं सुद्धा.. मुलानं आपल्याला पुढं जाऊन आपलं ऐकावं, आपल्याला सांभाळावं म्हणून लहानपणापासून त्याचं ऐकायचं, त्याला वाढवायचं असा व्यवहार असतो तो. मुलांनी नाही ऐकलं तर हेच आई बाप पोटच्या पोरांना दूषणं देतात. रक्ताचं आणि इतकं जवळचं नातं कधी निरपेक्ष नसतं,तर इतर नात्यांची काय कथा? आणि सगळी दुःखं ही अपेक्षाभंगातून निर्माण होतात.. विचार करून बघ. परीक्षेत चांगले मार्क्स मिळावेत ही अपेक्षा असते,इतरांनी आपल्या मनासारखं वागावं ही अपेक्षा असते, चांगल्या कॉलेज मध्ये एडमिशन मिळावं ही अपेक्षा असते, मनासारखी नोकरी मिळावी ही अपेक्षा असते.."
"पण आर्टी,जर अपेक्षा ठेवल्याच नाहीत तर प्रगती कशी होणार?"
"मी तसं म्हणत नाहीये.. पण या दुःखाचंही डायग्नोसीस केल्यानंतर मला जे जाणवलं ते सांगतोय..गेली ८ -१०  वर्ष जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवलं, ती माझी सहचारिणी नाही बनू शकली. सगळ्याच प्रेमकहाण्यांचं रुपांतर लग्नात नाही होत. तसं व्हावं ही अपेक्षा असते. माझी तशीच अपेक्षा होती. आमच्या पिताश्रींमुळे तिचे आई बाबा तिला आमच्या घरी पाठवायला तयार नाही झाले. आणि संसाराच्या सगळ्या स्वप्नांचं पाणी झालं. मग तिचंही म्हणणं पटलं मला.. 'ज्या आईवडिलांनी इतकी वर्ष सांभाळलं त्यांच्या विरोधात जाऊ मी?' मी अर्थातच 'नाही' म्हटलं.. पण मी आता लग्न नाही करणार. मी प्रेम करूच शकत नाही इतर कुणावर.दुस-या मुलीमध्ये तिचं रूप शोधून मी मला आणि त्या मुलीला फसवू नाही शकणार." त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..

त्याच्या आईला नातवंड हवी होती म्हणून आर्टीने लग्नाची तडजोड अजिबात स्वीकारली नाही. पण त्याने एक गोड मुलगी दत्तक घेतली. लहान आहे तरीसुद्धा बाबाच्याच मुशीत तयार होतेय.. एकदम रोखठोक.. त्याला तिचे पाय पाळण्यात दिसले कि काय कोणास ठाऊक पण त्याने नावही तसंच ठेवलंय.. त्याच्या मी ठेवलेल्या पेटनेमचा अपभ्रंश.. आरती! :)