मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११

'राजू' नाम मेरा..

ही व्यक्ती पहिल्यांदा मला देवळात भेटली. नाही नाही.. भक्ती रसात लीन वगैरे नाही! तर आदल्यादिवशी मदिरा रसात तल्लीन होऊन घरी परतताना अचानक पाऊस आल्यामुळे देवळाचा आश्रय घेतला होता त्याने!!  मी रविवारी (कधी नव्हे ती सक्काळी-)सकाळी अंघोळ करून चहा ढोसण्यासाठी  जात असताना, वाटेवरच्या गणपती मंदिरात गेलो. देवाला नमस्कार केल्यानंतर परतताना जरावेळ टेकल्यासारखं करायचं म्हणून मी तिथेच झोपलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसलो. एक नजर फिरवली तर तो एक धष्टपुष्ट तरुण होता. मी बसल्याची चाहूल लागताच तो उठून बसला..
"मित्रा,वाजलेत किती?" चेह-यावरून आणि केसांवरून हात फिरवून ते नीट केल्यानंतर त्याने मला विचारलं.
"साडेनऊ" मी त्रोटक उत्तर देवून शांत बसलो.
"इथे जवळ कुठे चहाची टपरी आहे?"
"आहे पुढे कॉर्नरवर. इथून सरळ गेलं कि चौकात डावीकडे वळायचं आणि दुस-या गल्लीच्या सुरुवातीलाच आहे" मी हातवारे करत माहिती पुरवली पण तो कन्फ्युज झाला असावा.
"जरा दाखवशील का? बाईक वर जाऊ. मी तुला drop करतो इथेच पुन्हा."
"किती सिम्पल आहे. इथेच तर आहे"
"पटकन दाखव आणि चटकन येवू मागे.."
"मला पण चहा प्यायचा होता" मी म्हटलं.
"मग चल ना.. तेव्हढीच कंपनी होईल एकमेकांना" आम्ही त्याच्या बाईकवर टांग मारली.
ही आमची पहिली आकस्मिक भेट..
मग आम्ही टपरीवर गेलो. त्याला आदल्या दिवशी कोणीतरी कसं पार्टीला बोलावलं, तो कशी थोडीशीच व्होडका प्यायला, मग वा-यामुळे त्याला ती कशी चढली आणि तो कसा देवळात झोपला वगैरे स्टोरी मी ऐकून घेतली आणि चहा क्रीम रोल खाता खाता दोन चार 'अनुभवाच्या गोष्टी' मी पण ऐकवल्या.
"चांगलं वाटलं तुला भेटून" मला drop करताना तो म्हणाला. तेव्हाच मला जाणवलं कि या माणसाचा आपल्या आयुष्यातला मुक्काम लांबणार!
अर्थात झालंही तसंच..

त्यानंतरच्या रविवारीच असेल बहुधा.. हो.. रविवारच होता. एका मित्राला लायब्ररी लावायची हुक्की आली म्हणून मी त्याच्याबरोबर एका वाचनालयात गेलो. तर हे महाशय तिथे उभे!
"आयला! तू कसा काय इथे?" मला  आश्चर्य लपवता आलं नाही
"अरे मी इथे कामाला आहे"
"नाव काय तुझं?"
"मी राज" तो म्हणाला.
"फिल्मी आहे रे नाव! तू काय इथे लायब्रेरियन म्हणून की..?"
"नाही रे..पुस्तकं द्यायला घ्यायला." मी बुचकळ्यात पडलो ते त्याने हेरलं. त्याने पुन्हा चहाचं आमंत्रण दिलं. आणि त्याच्या सरांची म्हणजे तिथल्या लायब्रेरियनची परवानगी घेऊन तो मला घेऊन बाहेर पडला. माझा मित्र त्याचं काम झाल्यावर जायला गेला त्यामुळे आम्हाला खुलेपणाने बोलताही आलं.
 
अनाथालयात वाढलेला पण मोठा झाल्यावर तिथून पळून आलेला वगैरे- अशी happening पार्श्वभूमी असणारा तो पोरगा होता.त्याचं खरं नाव राजू. मी विचारलं तेव्हा मला त्याने "राज" असं सांगितलं होतं खरं. पण नंतर 'अनाथालय' वगैरे प्रकार सांगितल्यावर मला शंका आली.
"तुझं राज-बीज असं नाव कसं काय ठेवलं बुवा?" मी निरसन करून घ्यायला शंका विचारली .
तेव्हा त्याने सांगितलं "नाही रे.. खरं नाव राजू.. पण हल्ली हिंदी मराठी पिक्चर वाल्यांनी राजू बिजू ही नावं नोकरांची करून टाकली आहेत त्यामुळे ते जरा डाऊनमार्केट का काय म्हणतात ना तसं वाटतं. म्हणून मी राज असं सांगतो. तेव्हढंच जरा बरं इम्प्रेशन.."


नंतर आम्ही ब-याचदा भेटलो. कधी असेच अचानक तर कधी ठरवून. तो माझ्या मोबाईलवर फोन करायचा आणि भेटीचं ठिकाण ठरायचं!
वाचनाची आणि पुस्तकांची क्रेझ. पण मराठीच. पळून गेला तेव्हापासून त्याने वेगवेगळ्या वाचनालयात काम केलं.
"प्राथमिक शाळेत  मी शिकलो तेव्हाच पुस्तकांची आवड होती मला.सगळी अनाथालयाची कृपा..!" तो सांगायचा.." पुस्तक मिळाली कि पहिल्यांदा इतिहासाच्या पुस्तकातले धडे, गोष्टी समजून वाचून काढायचो. मग अभ्यास वगैरे. आमच्या मागे तुम्हा लोकांसारखे आईबाबा नव्हते 'अभ्यास कर अभ्यास कर' म्हणून धोशा लावणारे! त्यामुळे मी ठरवीन ती पद्धत! असा सगळा मामला होता. सामान्य कुवतीचा मुलगा होतो मी आणि अजूनही आहे."
तो स्वतःचं आधीच रंजक असणारं लाईफ अजून रंगवून सांगायचा. ऐकणा-याला ऐकतंच राहावंसं वाटायचं.
"किती शिकलास? आणि सगळ फुकटफाकटचं मिळत असताना पळून का गेलास तिथून?"
"शिकलो दहावीपर्यंत. पण नंतर वैतागलो. मला आमच्या गुरुजी आणि बाईंमुळे उगीचच वाटायचं कि मी दहावी झालो कि मी सुशिक्षित म्हणवला जाणार, सगळी सुखं पायाशी लोळण घेणार वगैरे वगैरे.. पण निकालानंतरच्या काही दिवसातच कळलं कि या शिक्षणावर जास्तीत जास्त वॉचमन होऊ शकेन!"
आम्ही दोघेही हसलो.
"अनाथालयात माझ्याकडून फारश्या अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे मी पळून गेल्याने त्याचं काही गेलं नाही. काही कायदेशीर कटकटी झाल्या असतील तेवढंच.. मग मी ठरवलं आपलं लाईफ आपल्या पद्धतीने जगायचं. चो-यामा-या करायची मुळातच प्रवृत्ती नव्हती त्यामुळे आधी पुस्तकांच्या दुकानात नोकरी मिळते का ते बघितलं. नाही मिळाली. पण नंतर एका लायब्ररी मध्ये काम मिळालं. पुस्तकं द्यायचं नव्हे तर साफसफाईचं!तिथून मग सरांशी गोड बोलून,माझी आवड सांगून ते काम मिळालं. मग त्यांच्या ओळखीने थोड अजून जास्त पैसे असणा-या लायब्ररीत लागलो.असं करत करत आता सध्याच्या लायब्ररीत आहे.." त्यानं सांगितलं.
मजा होती कि नाही? शून्यातून विश्व निर्माण करणा-या मोठ्या लोकांच्या जीवनातले चढउतार, उन्हाळे पावसाळे अश्या गोष्टींवर ठिकठिकाणी चर्चा झडतात,भारंभार विश्लेषणं होतात, कौतुकं होतात. पण शून्याच्याही मागून सुरुवात करून सामान्य जीवन जगणा-या राजू कडे आपलं कधी लक्षही जात नाही..

"ए तू कुठे राहतोस?" एकदा असंच,त्याचा ठावठिकाणा  माहित असावा म्हणून मी विचारलं.
"इथेच राहतो..चल येणार?" मी मान डोलावली.
त्याच्या बाईकवरून आम्ही निघालो..
"गाडी माझी नाहीये ही.. मित्राची आहे. रूममेटची. अगदी गरजेच्या वेळेलाच घेतो मी. त्यालाही ते माहित आहे त्यामुळे त्याची कधी ना नसते.."
"तू हॉस्टेल वर राहतोस?"
"एक flat आहे. हल्लीच तिथे आलोय आम्ही राह्यला. मी आणि अंकित. आधी कॉट बेसिस वर राहयचो. त्याचा  मित्र राहत होता त्या flat वर २ जणांसाठी जागा होती. मग आम्ही गेलो तिकडे.."
"बर्र.."
"अंकितने  तुझ्यासारखंच इंजिनियरिंग केलंय. तो पहिल्या वर्षाला होता तेव्हापासून आम्ही पार्टनर्स आहोत. आता त्या पाळीव प्राण्यांच्या कंपूत नोकरी  करतो तो ."
"पाळीव प्राण्यांच्या कंपूत? राणीच्या बागेत आहे कि काय?"
"नाही रे.. हिंजवडीत..आय टी पार्क मध्ये! गळ्यात पट्टा घालून जातो आणि तसाच येतो.. म्हणून पाळीव प्राणी! "
"हा हा हा.." मी खळखळून हसलो.." सहीये सहीये कन्सेप्ट! पाळीव प्राणी..मी पण त्यातलाच रे..."
"असू दे रे.. त्याला चिडवायला मी म्हणतो.बाकी काही नाही!"
आम्ही त्याच्या flat वर पोचलो..
"काय काका कसे आहात? काकू पाय काय म्हणतोय? पिंकी, परीक्षा आहे ना खेळतेयस काय? जा चल अभ्यास कर नायतर पप्पांना नाव सांगेन हां!"  वगैरे सोसायटीतल्या शक्य तितक्या सगळ्यांची हजेरी घेत तो मला घेऊन दुस-या मजल्यावर पोचला.

घरात बसल्यावर आमच्या ब-याच गप्पा झाल्या. लायब्ररी व्यतिरिक्त सकाळी सहा ते नऊ आणि रात्री सहा ते नऊ तो जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करत असे!
त्याच्या धिप्पाड शरीरयष्टी बद्दल मी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं.
"हे बघ, मला ना कोणी आगे न पिछे.. जे करायचं ते स्वतःसाठी. बरोबर?"
"हम्म.." मी मान डोलावली.
"मला कपड्यालत्त्यांची, गाडीघोड्याची आवड नाही. म्हणजे मुळात सगळ्या मुलांना असते तशी असली तरी ती कालौघात मेली असेल.  खाऊन पिऊन थोडे पैसे उरायला लागले ते मी साठवत गेलो. आणि एकदा या अंकितच्या नादानेच जिम लावली. त्याने  हौस फिटल्यावर सोडली पण मला व्यसन लागल्यासारखं झालं.मग तिथल्या ओळखी बनल्यानंतर मला कन्सेशन मिळायला लागलं. मग सरांच्या सांगण्यावरून सर्टीफिकेशन केलं. 'तिथेच ट्रेनर म्हणून काम करेन' या बोलीवर सरांनी पैसे सुद्धा भरले. चांगली माणसं मिळाली मला काही काही. खरतर जी चांगली माणसं मिळाली ती मी सोडली नाहीत."
मी अवाक होऊन ऐकत होतो.
"पाच पैशाचं सेविंग कि काय म्हणतात ना ते नाही माझं! पण हो पाच पैशाची उधारीपण नाही हां!"
जीवन अक्षरशः जगत होती ही व्यक्ती.. त्याला आवडणारी कामं आणि त्यातून अर्थप्राप्तीसुद्धा.. मर्यादित गरजांमुळे हव्यासही नाही! सुख सुख म्हणजे अजून काय असतं?

कधीतरी एकदा मी त्याला पहिल्याच भेटीतल्या दारू बद्दल विचारलं होतं..
"मी पितो, पण कोणी आग्रह केला तरच. आता तुला पण माहितीये माझी परिस्थिती कशी आहे ते. मी कुणाला 'दारू पाजेन' असली आश्वासन देत नाही कि स्वतःहून कोणाला सांगत नाही. जर कोणी ऑफर केली तरच.. मी खोटा आव आणत नाही. काय आहे माहितीये का, कधी कधी लोकांना मन मोकळं करायला असा एक माणूस लागतो जो कधी चुकूनमाकून सुद्धा त्यांच्या आयुष्यात येणार नसतो."
"काय सांगतोस? असं कसं शक्य आहे?"
"कधी जाणवलं नाही तुला हे? बस रेल्वे मधून प्रवास करताना तुझ्याकडे कोणी कधी काहीच बोललं नाही? कोणी स्वतःचं कर्तृत्व किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्सचं विश्लेषण करून सांगितलं नाही?"
मी विचार केला.. ब-याच जणांनी सांगितलं होतं खरं, आणि मला नावं तर सोडाच, चेहरे पण नव्हते आठवत..
"हो रे..खरंच!" मला कमाल वाटली!
"मग? मी या लोकांचा 'तो अनोळखी' माणूस आहे.कोणाचं दुःख ऐकून सांत्वन करायला किंवा कोणाचा आनंद घेऊन तो उधळायला; थोडक्यात कोणाच्या सुखाचा सोबती व्हायला अथवा दुःखाचा वाटेकरी व्हायला मला पैसे नाही पडत ना!"
मी हसलो..फारच पुस्तकी बोलायचा कधी कधी! तरीही हे मान्य करावंच लागायचं की काहीवेळा आपली विचार करायची पद्धतच वेगळी असते. निदान याच्यासारखी तरी नसते!

"तुला कधी तुझ्या जन्मदात्यांचा शोध घ्यावासा नाही वाटला?"
"हिंदी सिनेमातल्यासारखा ?" त्याने विचारलं आणि हसून मला टाळी दिली.."सत्य आहे ते स्वीकारावंच लागतं रे.. जिवंत नसतील तर प्रश्नच मिटला आणि असतील तरी तेव्हा त्यांना मी नको होतो म्हणूनच टाकून दिला असेल ना? आणि आता त्यांना शोधून काढलं तरी काय साध्य होणार आहे? मला गरज होती तेव्हा तर ते मिळालेच नाहीत.. महाभारत वाचलंयस ना? एवढ्या कर्तृत्ववान कर्णाची कुंतीने केलेली भावनिक पिळवणूक बघितली तर वाटतं कुठल्याच अनाथ किंवा अनौरस मुलाला त्याचे खरे आई-बाबा कळू नयेत.. निदान त्या मुलाचे तरी हाल नाही होणार."
"पण तूच म्हणतोस ना, कि सत्य स्वीकारावं लागतं?"
"शब्दात पकडू नकोस रे.. अज्ञानात सुख असतं हेही खरंच आहे ना? कशाला जीवनातल्या सगळ्या सत्यांची ओळख करून घ्यायची?"
पटला तो विचार मला.. "आणि सत्य खरं असतं,सत्याचा विजय होतो वगैरे पुस्तकात ठीक वाटतं! वास्तविक जीवनात ज्याचा विजय होतो त्यालाच सत्य सत्य म्हणून गौरवलं जातं!" तो म्हणाला.
"इतिहास बघितला तर हेही पटेल बघ तुला..रामायण,महाभारतात रावण, कौरव वगैरे मंडळी जिंकली असती तर कदाचित इतिहास वेगळा असता.. अर्जुनाच्या सुभद्रेबरोबरच्या लग्नाची, द्रौपदीच्या सांसारिक हालांची, धर्माच्या नरो वा कुंजरो वा या विधानाची, द्यूत खेळणा-या आणि त्यात बायकोला देखील पणाला लावणा-या पांडवांची बाजू घेताना मन कचरलं असतं.. दुस-या महायुद्धात हिटलर जिंकला असता तर इतिहासाची पानं निराळ्या शब्दात लिहिली गेली असती.जर युद्धात विजयश्री नसती तर अमेरिकेच्या अणुबॉम्ब हल्ल्याचं समर्थन सुद्धा होऊ शकलं नसतं! युद्धात नेहमी जेते- युद्ध जिंकणारेच  इतिहास लिहितात आणि तो कधीच निरपेक्ष नसतो हेच खरंय.."  आणि खरंच होतं ते.. तटस्थ  विचार करणा-या व्यक्तीला हे पटेलही कदाचित!
मराठीबद्दल अतिशय दुराग्रही.. खरंतर  त्याच भाषेवर त्याचं प्रभुत्व होतं म्हणून असेल; पण सगळ्यांशी हट्टाने मराठीतूनच बोलायचा.. त्याची तब्ब्येत समोरच्या माणसावर फरक पाडत असेल बहुधा, पण ज्यांना येत नसे ते लोक सुद्धा तोडकं मोडकं मराठी बोलत त्याच्याशी!
"आपली मराठी मरत नाही रे.." कधी भाषेवर विषय घसरला तर तो सांगायचा.. " मराठी लोक महाराष्ट्र सोडून इतर देशी गेले तसे हे बिहारी, युपीवाले महाराष्ट्रात येतात.. त्याचा एवढा बाऊ कशाला करायचा? विश्व भोजपुरी किंवा उडिया साहित्य संमेलन होतं असं ऐकलंयस का तू आतापर्यंत? पण मराठी होतं ना? अमेरिकेत काय, जपानमध्ये काय, सगळीकडे महाराष्ट्र आणि मराठी मंडळं आहेत..एवढ्यात काय मरत नाही मराठी.. फक्त समृद्ध होत जातेय इतकंच.. आता प्राकृत मराठी आणि आताची मराठी यात फरक आहेच ना रे? तसंच आहे ते.. पुढची पिढी जरा इंग्रजाळलेलं मराठी बोलेल पण ते मराठीच! आता मला इंग्रजी येत नाही तरी कितीतरी इंग्रजी शब्द मी वापरतोच ना? मग? पण आपण सगळ्यांनी मराठी बोलण्याची जी लाज वाटते ती सोडली कि झालं.. मी बघतो वाचतो कि इतर प्रांतातले मग ते साउथ मधले असोत कि गुजरात मधले एकत्र भेटले कि त्यांच्या भाषेत संवाद सुरु करतात आणि महाराष्ट्रातले? हिंदीत! त्यांना काय कमीपणा वाटतो कोणास ठाऊक! असो.. पण मला वाटत मी जिवंत आहे तो पर्यंत तरी मराठी मरत नाही.. आणि मरतानासुद्धा हे सुख असेल कि मी भाषा जगवायला फुल ना फुलाच्या पाकळीचं तरी कॉन्ट्रीब्यूशन केलं!" मी टाळ्या वाजवल्या..

मी मोबाईल नंबर बदलला त्यानंतर सहा एक महिन्यानंतर माझ्या लक्षात आलं कि मी राजूला हा नंबर दिला नाहीये..कामाच्या धबडग्यात त्याचा संपर्क राहिला नव्हता..एकदा वेळ काढून मी त्याच्या सोसायटीत गेलो तेव्हा कळलं  कि राजू आता तिथे राहत नाही,  तो flat विकला गेला होता, आणि नवीन मालकाने तिथे भाडेकरू ठेवले होते.. अंकितला भेटायच्या किंवा निदान त्याची माहिती तरी विचारायच्या फंदात मी कधी पडलो नाही त्याचा मला पश्चाताप झाला. लायब्ररीत गेलो तर राजू 'काही अपरिहार्य कारणास्तव' ती लायब्ररी सोडून गेल्याचं कळलं. तिथल्या सरांनी एक नंबर दिला पण तो अजुनतागायात लागला नाही..तो कुठल्या जिम मध्ये जात होता त्याचं साधं नाव विचारायच्या भानगडीत देखील मी पडलो नव्हतो. फेसबुक आणि इंटरनेट च्या जगात केवळ तो त्यांच्या संपर्कात नसल्यामुळे मी त्याचा शोध घेऊ शकत नाहीये...पाण्यासारखा तो..जो कोणी त्याच्यात मिसळेल त्याचा रंग घेणारा. कोणी दुसरा 'मी' भेटला असेल त्याला..तरीही विसरणं मुश्कील आहे त्याला.

४ टिप्पण्या:

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!