परवाच दाढी करताना चुकून ब्लेडचा अंदाज चुकला!
अन्.. आई गं!! गालावर जखमेचा मोठ्ठा ओरखडाच उठला!!
जखमेच्या व्रणातून हळूहळू रक्त येऊ लागलं होतं!
त्याचवेळी नेमकं माझं आफ्टर शेव संपलं होतं!!
हताशपणे मी येउन आरशासमोर उभा राहिलो..
वाहणारं रक्त पाहण्याचा असफल प्रयत्न करू लागलो..
पण, अहो आश्चर्यम!! रक्तातून चक्क जीन बाहेर आला!
'जो हुकुम मेरे आका' म्हणत कमरेत वाकू लागला!!
मी दचकलो , भानावर आलो आणि त्याला विचारलं..
हे इथून, अन् अचानक येण कसं काय बुवा झालं !?
म्हणे,'तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला देवानंच दिलंय!
तुमची एक इच्छा पूर्ण करायला त्यानं मला पाठवलंय!!'
हे मागू की ते मागू असं मला होऊन गेलं!
काय सांगू तुम्हाला?अहो काय काय मनात येऊन गेलं !!
बंगला मागू ऐटदार, की भली मोठ्ठी गाडी?
की मागू सुंदर बायको, नेसून लफ्फेदार साडी?
सगळयांवरती मिरवायाला थोडी जादा मागू का अक्कल?
जीन्स की शूज? नको; त्यापेक्षा पैसाच मागतो बक्कळ !!
पैसा कितीही सांभाळला तरी चुटकीसरशी सरतो..
त्यापेक्षा एका बड्या कंपनीची ओनरशिपच मागतो..
गोष्टींमध्ये ईसापनीतीच्या तर तीन इच्छा पूर्ण करतात..
माझ्याच बाबतीत मग देवा ,चिक्कूपणा का दाखवलात ?
शेवटी 'ऐसा करो' म्हणत मी जीन कड़े वळलो जेव्हा
जीन नव्हता जागेवर; 'छू' झाला होता केव्हाच!
समजेना काहीच, की हा गायब कुठे झाला?
आता होता इथेच, क्षणात नाहीसा कुठे झाला?
कळलं मला लगेच, की 'I missed my chance'
मिळाली होती संधी तेव्हा केला नाही डान्स!!
माझी विचारशृंखला बराच काळ लांबली होती
तोपर्यंत रक्त सुकून जखमेवर खपली धरली होती!!
जीन गेला, सोबत गेल्या माझ्या स्वप्नातल्या जीन्स
I couldn't get him back by any means!!
म्हणून सांगतो तुम्हाला, ठरवून ठेवा एक इच्छा !!
ब्लेड लागून रक्त येवो,यासाठी माझ्या शुभेच्छा !!
:अखिलेश परब