बुधवार, ११ जानेवारी, २०१२

आयेम ए रेबेल

ती वेगळी होती. तिच्या सगळ्याच बाबतीत स्वतंत्र संकल्पना होत्या, ध्येयं होती, स्वप्नं होती आणि पुस्तकी भाषेत मांडता येईल असं बरंच काही होतं! पण सगळं सगळं स्वतंत्र आणि वेगळं.. जाणवण्याइतपत वेगळं. एकटी राहायची, मोजका जनसंपर्क, घरात असली तर एका हातात पुस्तक आणि दुस-या हातात कॉफी मग अशा अवतारात. एखाद्या स्त्रीने ज्या पद्धतीने समाजात राहू नये असं म्हणतात त्या पद्धतीनेच ती राहायची. बंडखोर प्रवृत्ती,बक्कळ पैसा..लोकांनी काढलेल्या चित्रांची प्रदर्शनं मांडून आणि ती विकून कमवलेला. पस्तीशी मध्ये देखील एखाद्या तरुणीला लाजवेल अशी फिगर.. मी तिच्याकडे जायला लागलो तेव्हा मला या गोष्टी कळत नव्हत्या असं नव्हतं. पण ते नक्कीच तिकडे जायचं कारण नव्हतं! दरवाजावर तीन नॉक आणि एक थाप मारली तरच दरवाजा उघडला जायचा आणि हे सगळ्यांना माहिती देखील नव्हतं.

ती आधी आमच्या सोसायटीत राहायची. लेटर बॉक्स मधून लाईट बिल्स कलेक्ट करायचं सौजन्य सुद्धा दाखवायची नाही. ३-४ महिन्यांची लाईट बिल्स (तेव्हा आतासारखी एका महिन्यात लाईट कट व्हायचा प्रकार नव्हता, 'एमेसिबी' कधीच महावितरण एवढं कडक नव्हतं ब्वा!), कुठल्या तरी प्रदर्शनं, एग्झिबिशनच्या आमंत्रणांनी तो लेटर बॉक्स ओसंडून वाहायला लागला तेव्हा मीच एकदा तो सगळा कचरा गोळा करून तिच्या दरवाजात गेलो.. जनरल एटीकेट्सनुसार तीनदा नॉक केलं आणि माझ्या हातातून तो पसारा खाली कोसळला! आधार घ्यायला मी दरवाजाला हात लावला आणि अशा पद्धतीने मी पहिल्यांदा ती अलिबाबाची गुहा योगायोगाने उघडण्यात यशस्वी झालो! सगळंच नाटकी!

तिने दरवाजा उघडला तेव्हा मी तो पसारा गोळा करत होतो..
"तुमची पत्रं येतात खाली..एवढी आलीयेत"
"हौ डू यू नो द अक्सेस कोड?"
"व्हॉट अक्सेस कोड? आय डोन्ट नो एनी अक्सेस कोड"
ती विचलित झाली आणि दुस-या क्षणी सावरत मला म्हणाली "कम ऑन इन.."
मग आम्ही बराच वेळ बोललो..गप्पा मारल्या. मस्त होती बोलायला... त्यानंतर मग कधीही एकटं एकटं वाटलं,कंटाळा आला, कोणाशी बडबड करावीशी वाटली, चर्चा करायची खुमखुमी आली, गप्पा माराव्याश्या वाटल्या कि मी बिनधास्त तीन नॉक्स आणि एक थाप मारून माहितीचे दरवाजे उघडू लागलो..

"तुम्ही.."
"मला एकेरी हाक मार"
"मी तुमच्यापेक्षा लहान आहे वयाने" मी म्हटलं.. 'तुमचं वय जास्त आहे' हे स्त्रीला डायरेक्टली सांगायचा हा दुसरा चांगला मार्ग!
"आई सुद्धा मोठी असते न? आणि मावशी ? आत्याला काय म्हणतोस? ताईला?"
"...."
"आपलं यातलं कुठलंच नातं नसलं तरी फक्त वयामुळे तू मला अहो जाहो करावंस हे मला मुळीच पटत नाही, अगं म्हटलंस तरी चालेल मला.."
"बरं... तू इथे देवपूजा करत नाहीस?"
"नाही.."
"कंटाळा आहे कि तू नास्तिक आहेस?"
"माहित नाही"
"म्हणजे?"
"देव आहे कि नाही मला माहित नाही"
"हे सगळं निर्माण करणारा कोणीतरी असेलच ना ? ती शक्ती म्हणजे 'देव' असं मानायला काय हरकत आहे?"
"मी एक विचारू?"
"विचार..पण जास्त कठीण नको.." मी म्हटलं
"चांगलं वागणा-या बरोबर तुझा देव चांगलं वागतो आणि वाईट वागणा-याला अद्दल घडवतो,बरोबर?"
"हो.." मी मान तुकवली
"मग माणसात आणि देवात फरक तो काय? आपली न्यायव्यवस्था तर तेच करत असते!"
"...."
"जर देव असेल तर तो वाईट गोष्टी मुळातच का होऊ देईल? स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला? हे धर्म , फॉलोअर्स आहेत तोपर्यंत ठीक आहे पण त्यांच्या प्रसारासाठी जिहाद,क्रूसेड्स , धर्मयुद्ध.. हे कुठला देव सांगतो आणि का? जो मला मानत नाही तो काफिर, तो सैतान असं अल्ला कसं काय म्हणत असेल? प्रोटेस्टन्ट, रोमन कथेलिक वगैरे प्रकार कशाला असले असते? हिंदूंमध्ये कोट्यावधी देव कसे काय असले असते? दोन वेगवेगळ्या धर्मातली युद्धं एकवेळ परवडली पण एकाच धर्मात दुजाभाव? मग कसा आणि का विश्वास ठेवायचा देवावर?"
"..." माझं ज्ञान तिची उत्तरं द्यायला फारच तोकडं होतं,किंबहुना मी असा तिरकस विचार केला नव्हता. स्पष्टच सांगायचं झालं तर डेअरिंग झालं नव्हतं देवाबद्दल अशा जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करायचं!
"धर्म बापा ज्याचा त्यांनी,प्रिय मानावा प्राणाहुनी,परी विधर्म्याच्या ठिकाणी, अलोट प्रेम धरावे! या मताची आहे मी.."
"मस्त आहेस तू!" मी दिलखुलास प्रतिक्रिया देऊन टाकली.

"मी आणि मीच" हे तिचं जीवनसूत्र होतं बहुतेक. ना नातेवाईकांची बंधनं, ना कोणाच्या आणाभाकांचं गुंतलेपण! तिचा flat सुखवस्तू या कॅटेगिरित मोडत होता.. सगळ्या वस्तूंची रेलचेल. पण तिच्या घरातली मला आवडणारी गोष्ट म्हणजे मोठ्ठ्या बिन bags! कुठून आणल्या होत्या कोणास ठाऊक! सगळ्याच गोष्टी ती सांगायची असंही नाही.विचारल्या तरी! पण दोघांनाही असणा-या फावल्या वेळात जेव्हा तिच्याकडे जाणं व्हायचं तेव्हा त्या bags वर आरामात रेलून बसायचं आणि काहीबाही खात,टीव्ही बघत गप्पा कुटायच्या. ऑसम फिलींग!!

"तू अशी का राहतेस? एकटी एकटी? सोसायटीतल्या लोकांत जावं, इथल्या चारचौघात मिसळावं, मिटींग्ज अटेंड कराव्यात, मतं मांडावीत असं नाही वाटत तुला?"
"नाही"
"का?"
"कारण मला सहानुभूतीच्या नजरा नको आहेत.."
"कोण तुला कशाला सहानुभूती दाखवेल?"
"तू लहान आहेस अजून.."
"तुझी देव-धर्माविषयीची मतं ऐकून पचवणा-याला तू लहान म्हणतेस?"
"..."
"कोण दाखवतं तुला सहानुभूती?"
"पुरुष"
"..." मी निःशब्द...
"एक या वयातली स्त्री एकटी राहते म्हटल्यावर एकजात या जमातीच्या नजरा आपोआपच वळतात.. त्या वळणारच. स्वाभाविकच आहे ते. पण आता सवय झालीये.आय इग्नोर इट..बट आय डोन्ट वॉन्ट टू गिव्ह देम अ channel !"
"तुझ्या कोणी प्रेमात नाही पडलं? किंवा तू कोणाच्या?"
ती मंद हसली. पण एव्हाना तिच्या हास्यातून जो अर्थ अपेक्षित असतो तो नसतो हे मला कळून चुकलं होतं. मी तो अर्थ शोधण्याच्या भानगडीत पडलो नाही!
"मी नाही पडले कोणाच्या प्रेमात.. माझ्या प्रेमात कित्येकजण पडले... पण मला काय करायचंय यापेक्षा काय करायचं नाही ते आधीपासूनच माहित होतं.."
"आई-बाबा?नातेवाईक?"
"बाबा एक्स्पायर. माझ्या लहानपणीच. आणि त्यामुळे आई कोलमडलेली, आयुष्यभर देव देव करत होती, कोणाकोणाचं म्हणून वाईट केलं नाही बिचारीने. तरीसुद्धा तिला काय काय भोग भोगावे लागले.. "
"म्हणून तुझा देवावर विश्वास नाही?"
"तेही कारण असेल कदाचित..तू काय माझा इन्टरव्यू घेतोयस का?" ती हसत म्हणाली.."माझ्या आईने आयुष्यभर देवाचं केलं तर तिने नको नको ते भोगलं, मी नाही केलं तरी मी सुखात आहे. राजकारणी लोक, गुंड लोक भ्रष्टाचार करून मोठ्ठाली देवळं उभारतात, संगमरवरी देवघर बांधतात, देवस्थानांना मोठमोठ्या देणग्या देतात! करू शकतोस तू हे सगळं एक्स्प्लेन?"
"मागच्या जन्माची पापं असतील..म्हणजे अशीही एक थियरी आहे..." मी चाचरत म्हणालो
तू पुन्हा हसली."असल्या थियरिज मांडून आपण आपलंच समाधान करून घेत असतो असं नाही वाटत तुला?"
मी-अर्थातच- गप्प बसायचो!!

आर्टीस्ट लोकांच्या आर्टला प्रदर्शनांची दालनं उघडी करून देणं हे तिचं काम! कुठून कशी ती या व्यवसायात शिरली ते देवालाच ठाऊक..नव्हे तिलाच ठाऊक..त्या बिचा-याने सुद्धा एवढं दुर्लक्ष करणारी व्यक्ती पाहून तिच्यात काडीमात्र इन्टरेस्ट ठेवला असेल असं मला वाटत नाही! पण अगदी टांकसाळ असल्यासारखे पैसे अक्षरशः छापत होती.खर्च स्वतःवर होईल तितकाच..काम तिला हवं तेव्हाच आणि हवं तितकंच.. बहुतेक मीटींग्ज बाहेर चांगल्याश्या हॉटेल किंवा लाउंज मधेच होत असत त्यामुळे घरी कोणी येण्याचा आणि घरच्या गोष्टींमध्ये दखल देण्याचा प्रश्नच मिटला होता.

"तुझा उद्देश काय आहे या सगळ्यामागचा?" maggi खाता खाता एकदा ती कसे पैसे कमवते आणि कशी उधळते हे सांगत असताना मी तिला विचारलं.."
"म्हणजे ?"
"म्हणजे सामान्य लोकांचे पैसे कमवण्याचे उद्देश असतात चांगली जीवन-शैली, भविष्यात चांगलं कुटुंब,मुलं, त्यांची शिक्षणं,लग्न वगैरे वगैरे"
"मग बरोबर आहे ना? माझा उद्देश आहे चांगली जीवनशैली..बास! मी वर्तमानात जगतेय, माझ्या स्वतःसाठी, वाटलंच तर इतरांसाठीही.. माझं घर आहे, गाडी आहे, ऐशोराम आहे, ही पुस्तकं आहेत ती माझी मित्र आहेत,प्रदर्शनातून थोरामोठ्यांचा सहवास मिळतो..नेहमी वेगवेगळी माणसं भेटतात, मला वाटतं त्या लोकांना मी भेटू शकते, माझं कामाचं स्वरूप सांगितल्यावर भल्या भल्या कलाकारांना मला टाळणं शक्य होत नाही!! मी मात्र मला नको त्या लोकांना टाळू शकते.. पाहिजे ती गोष्ट,पाहिजे त्या वेळी पाहिजे तिथे मला मिळते..अजून काय हवं? नाहीतर म्हातारपणी हेच म्हणावं लागेल न कि जिवंत होते पण जगायचं राहून गेलं?"
"तरीपण...स्वतःचा संसार वगैरे..." मी चाचरत म्हणालो..
"मला नको आहेत ही बंधनं..मुळात माझा सामान्य समाजाशी संपर्कच कमी आहे..त्यामुळे त्या समाजासाठी असल्या गोष्टींमध्ये गुंतून पडण्यात मला स्वारस्य नाही. आता त्या लॉ कॉलेज रोड वर एक अनाथालय आहे, तिथे मी देते देणगी.. ३ मुलांसाठी.."
ती उठून आत गेली आणि हातात कसलेसे कागद घेऊन बाहेर आली. ती प्रगती पुस्तकं होती. एक एव्हरेज प्रगती दाखवणारं आणि उरलेली दोन बिलो एव्हरेज!!
"लोक इथे देणगी देतात आणि आपण पोसत असलेल्या मुलानं पहिलंच यावं अशी अपेक्षा ठेवतात! बाबांनो तुम्ही कधी एखाद्या इयत्तेत तरी पहिले आलात?" ती छद्मी हसली.."मी या मुलांना पोसते.. कोणतीही अपेक्षा न ठेवता.. 'तुम्ही तुमचं जीवन तुमच्या पद्धतीनं जगा' एवढंच सांगणं असतं माझं त्यांना! "
"पण.."
"कशाला हवेत रे 'पण' आणि 'परंतु'? मी जगतेय तसं मला जगू देण्यात जगाला कसला त्रास आहे ते कळत नाही.. तू माझा सगळ्यात लहान सल्लागार आणि आई सगळ्यात मोठी! "
"सल्ला नाही पण लोक काहीबाही बोलत राहतात..इव्हन आपल्या सोसायटीत..."
"बोलेनात का? अभिरुचीसंपन्न जगात वावरत राहिलं ना तर कदाचित गॉसिप्स,चारित्र्य,लग्न,मुलंबाळं यामधलं - माझ्या भाषेत- या दुय्यम गोष्टीमधलं स्वारस्य कमी होतं आणि माझ्या बाबतीत तेच झालंय. व्हू सेज व्हॉट अबाउट मी--आय जस्ट डोन्ट केअर!"खांदे उडवत ती म्हणाली "तू इथे येतोस तेव्हा तुझ्याबद्दल कोणी काही बोलत नाही आणि माझ्याबद्दल बोलतात यावरून सिद्ध काय होतं? हा लायकी नसणारा समाज नेहमी बाईलाच वाईट चालीचा ठरवतो.. हो कि नाही?" ती पुन्हा हसली..मी गडबडलो.अगदी मुळापासून हललो!

तिने सदाशिवेत एका महागड्या प्रोजेक्टमध्ये रेडी पझेशन flat बुक केला हि न्यूज आमच्या सोसायटीत वा-यासारखी पसरली आणि त्यापेक्षा वेगाने फुटलं तिच्याबद्दलच्या अफवांचं पेव..! इतकं की तिच्या घरात जाणा-या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने जणू स्वखुशीने घेतली होती. माझ्यासारख्या 'सामान्य' माणसाने आपलं स्वतःचं चारित्र्य आणि भविष्य जपायचं असेल तर तिच्या घरी न गेलेलं आणि तिच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल इतरांकडे न बोललेलंच बरं हे माझं मीच ठरवून घेतलं. ती कधी समोर दिसली तर नजर टाळून कसं जाता येईल याकडे माझं लक्ष असायचं..

एकदा तिने मला थांबवलं.. "इतरांचं एक्स्पेक्टेड होतंच..पण माझे सगळे फंडे माहित असताना देखील निदान तुझ्याकडून अशा वागण्याची मला अपेक्षा नव्हती.पण तू सुद्धा..."
"माझं मन मला खात होतं, पण तू म्हणतेस त्या समाजाच्या कक्षा तोडायचे गट्स नाहीयेत गं माझ्यात.. तुझ्यासारखं उच्च अभिरुची असणा-या लोकांत मला वावरायचं नाहीये..मला या सामान्य कुवतीच्या लोकांमध्येच रहायचंय.. तू इथे असताना त्यांना विरोध करून मी राहू शकेनही कदाचित पण पुढे तू इथून गेल्यावर काय?"
"बरोबर आहे.. मी उद्याच निघतेय.."
"तुझा नवीन पत्ता..."
"लिहून घेतोस?"
"अं..नको.. तू इथे पत्र पाठव कधीतरी..." मी माझ्याच नकळत सेफ मार्ग शोधत होतो..एव्हाना वॉचमन पासून लहान मुलांबरोबर असणा-या बायकांपर्यंत सगळ्यांच्याच नजरा मला बोचायला लागल्या होत्या.. ती पुन्हा हसली..मी एक formality म्हणून पत्ता विचारलाय हे तिने ताडलं.. माझ्याबद्दलची कीव तिच्या त्या हास्याच्या लकेरीतून दिसत होती.

ती निघून गेली. अपेक्षेप्रमाणे नंतर तिचं काही पत्र वगैरे आलं नाही. त्यानंतरच्या काही दिवसांत सोसायटीतल्या काहीजणांनी माझ्याकडे पिंका टाकून तिचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. मीही त्यांच्यातलाच असल्याचं भासवलं. भासवलं कशाला? होतोच. मला तरी कुठे काय माहित होतं? आधीच म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी ती, एनीवेज, विचारल्या तरी नाही सांगायची.आयुष्यातल्या एका अवचित स्त्रीचा अध्याय संपला पण त्यानंतर जाणवलं कि आपल्यालाही असंच जगणं जगायचं होतं; जे स्वैर नसेल पण स्वच्छंद असेल, जे कोणीतरी जुन्या काळात ठरवलेल्या किचकट नियमांनी बांधलेलं नसेल पण स्वतंत्र असेल,जे भविष्याची निष्कारण काळजी करणारं नसेल पण वर्तमानाचा यथेच्छ आनंद लुटणारं असेल.. नाहीतर पुढे जाऊन हेच म्हणावं लागणार आहे की जिवंत तर होतो पण सालं जगायचं राहूनच गेलं!!

३० टिप्पण्या:

  1. @Pradnya : मोजक्या (दोनच) शब्दातल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !! chat दरम्यान वापरलेली वाक्यंही प्रतिक्रिया म्हणून टाकली असतीस तर चाललं असतं! :)

    उत्तर द्याहटवा
  2. Are mula, tu khup chhan, refreshing lihitos.wachu lagle aani wachatach sutle. khuup chhan. Keep it up.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लिहिले आहेस....एका क्षणाला मन हळवे झाले होते....ती डोळ्यापुढे उभी राहिली होती....खरच खंबीर मनाची आहे हि नायिका....she is a rebel.....

    उत्तर द्याहटवा
  4. एकदम जिवंत चित्रण केल आहेत 'तिच' .. अशाही स्त्रिया असतात हा एक दिलासाच आहे एका अर्थी :-)

    उत्तर द्याहटवा
  5. राम राम मित्रा,
    नेहेमीप्रमाणे उत्तम जमले आहे. पण का कुणास ठाउक, गेल्या काही लेखांमध्ये लेखक आणि पात्रांमधली शाब्दिक देवाण-घेवानच दिसते आहे. सुरुवात इंग्रज पासून, मध्ये फंडू आला, राजू आला आणि आता आयेम ... हे माझे स्वःमत आहे. हा तुझ्या लिहिण्याचाच एक भाग असेल कदाचित. बाकी एकदा सुरुवात झाली कि शेवटपर्यंत पकड व्यवस्थित ठेवतोस.

    विनायक

    उत्तर द्याहटवा
  6. @madhuri : कौतुकाबद्दल तुझे आभार कसे मानावे ते कळत नाही पण माझ्या ब्लॉगचं तू सलग वाचन केलंस हे (एकापाठोपाठ एक दिलेल्या) प्रतिक्रियांवरून जाणवलं.. खूप खूप धन्यवाद... तुझ्यासारखे वाचक लिहिण्याचा उत्साह मेंटेन करतात.प्रत्येकवेळी नवीन लिखाण असेलंच याची शाश्वती देता येत नसली तरीदेखील वरचेवर भेट देत राहा.. :)
    @श्रिया (मोनिका): नाव लेखाला सूट होत आहे म्हणायचं एकंदरीत!! श्रिया,ब्लॉग वर मनापासून स्वागत आणि पुनःपुन्हा येत राहावे हे आमंत्रण!!
    @aativas : लिखाणाला अशी पावती दिल्याबद्दल आभारी आहे ativas ! आणि खरंय हे म्हणणं.. सर्वच नाही पण निदान स्त्री जन्माचं रडगाणं गाणा-या स्त्रियांसाठी तरी हा दिलासा असावा!!
    @vin : इंग्रज, फंडू, राजू आणि आत्ताची रेबेल हे आणि यांसारखे लेख 'व्यक्तीचित्रण' या सदराखाली अंकित आहेत.. आता व्यक्तिचित्रण म्हटल्यावर दोन व्यक्तिंमधलं संभाषण,पात्रांमधली शाब्दिक देवाण-घेवाण अपरिहार्यच आहे नाही का? (वाचणा-याला कंटाळा यायच्या आत लेख आवरता घेणं ही मर्यादा असल्यानं,वर्णन करत राहण्यापेक्षा संभाषणातून व्यक्तिमत्व उभं करणं सोयीस्कर ठरतं. जसं ativas ला वाटलं तसं प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने ते व्यक्तिमत्व जिवंत करू शकतो..) कदाचित तू मागील काही लेख (उदाहरणार्थ 'गद्धेपंचविशी') वाचले नसावेस म्हणून तुला असं वाटलं असेल.. कथा, विनोदी ,ललित वगैरे सदराखाली इतर पद्धतीचं लिखाण वाचायला मिळेल..

    उत्तर द्याहटवा
  7. अभिनंदन. छान लिहितो आहेस. अस्सच लिहित राहा. पुढील लिखणासाठि हार्दिक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  8. thanks रे गिरीश.. ब्लॉग वरील इतर लेखही वाचून पाहशील ही अपेक्षा! :)

    उत्तर द्याहटवा
  9. छान लिहितो आहेस. ती डोळ्यापुढे उभी राहते .....!
    keep it up...
    ashok.karambelkar@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  10. धन्यवाद करंबेळकरकाका.. प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार.. ब्लॉगवर येत राहा..

    उत्तर द्याहटवा
  11. खुप खुप छान लिहील आहे ....
    पात्र इतक जिवंत वाटत कि जणु काही ती आपल्या ओळखीचीच आहे ..आपल्या अवती भोवती आहे असं वाटत.
    फक्त एक प्रश्न पडतो कि नायक तिला थेट कसा विचारू शकतो, कि तू देवपूजा करते कि नाही ते..
    म्हणजे त्यांच्या गप्पानमधून जर हा विषय सुरु झाला असता तर कथा अजून realistic वाटली असत..
    पण overall कथा चांगली आहे...
    पुढील लिखाणास हार्दिक शुभेच्छा ....

    उत्तर द्याहटवा
  12. @Dinesh : रास्त शंका!! 'रास्त' यासाठीच कि या मुद्द्यावर मी विचार केला होता.. :) तिच्या एकंदर वागणुकीवरून ती देवपूजा करत नसावी असा आडाखा बांधता येईल असं मला वाटलं.. 'मला तिच्या घरात देव्हारा दिसला नाही' किंवा 'बाल्कनीत तुळशीचं रोप दिसलं नाही' असं लिहायच्या विचारात मी होतो पण 'ती माझ्याशी सुद्धा अंतर राखून आहे' अशा पद्धतीने व्यक्तिचित्रण करायचा विचार केल्याने मला तो विचार प्रत्यक्षात आणता आला नाही. बाकी बारकाईने वाचून बारकावे टिपल्याबद्दल काय बोलू? :) बरं वाटलं! बाकीचे लेख सुद्धा वाच.. झालेल्या चुका पुढील लिखाणातून सुधारण्याचा प्रयत्न करेन.. :)

    उत्तर द्याहटवा
  13. नेहमीप्रमाणेच हा लेख पण तितकाच सर्रास ठरतो बाकीच्या लेखनाप्रमाणे ....वाटते की या गोष्टी खरंच घडल्या आहेत तुझ्यासोबत...आणि यातले (देवा बद्दलचे) विचार त्या समोरच्या व्यक्तीचे असोत किंवा तुझे ,विचार करायला लावणारे आहेत...
    चाबूक...
    अभिनंदन..

    आपली नियमित वाचक,

    उत्तर द्याहटवा
  14. i always felt being a rebellion is always good but when it comes to accept the fact about societies mindset and crack that hard nut.......it's really difficult.......anyways really amazing story... :-)

    उत्तर द्याहटवा
  15. ho me khupach mojkya shabdat comments dilya..as u know khup aalashi ahe..chat madhye sangitalya var i thought tya tuzya paryant pohochlya..mhanun punha ethe type nahi kele..:) mafi asavi

    उत्तर द्याहटवा
  16. वपुंची "सखी "आठवली...सखीच्या आयुष्याच्या वाटेत अशी नाजूक वळणं अनेकदा येतात..सखी सराईत पणे ती वळणं पार करते...
    बघणाऱ्यांच्या नजरेत तिची वाट किती निसरडी आहे याबद्दल कुतूहल...संकुचित विचारसरणीच्या पुरुषाला हा तिचा कधी प्रवास मानवणारच नाही...मस्त लिहिले आहेस.

    उत्तर द्याहटवा
  17. धन्यवाद Sudha.. यावर आपलं बोलणं देखील झालं आहे.
    सरिता : लेखावरच्या काही पर्टीक्युलर पॉइंट अधोरेखित करणा-या अशा प्रतिक्रिया वाचायला छान वाटतात. आभार.. येथे अधूनमधून नजर टाकत राहा.
    Annonymus : While thinking in such matters we usually think about or see only one side of the coin. Anyway,प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.वाचकहो,प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते 'Anonymous' असे येईल.
    राहुल : :) धन्यवाद रे मित्रा..तुझ्या लेखनप्रवासासाठी शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  18. RUPAL.mast aahe ha blog ...aani pudhehi ashacha navin vishyavr vachayla bheten aashi aasha hi aahe ...all the best

    उत्तर द्याहटवा
  19. एकदम छान लिहिल आहेस .. पुढील पोस्ट ची वाट बघतोय ..

    उत्तर द्याहटवा
  20. Jabardast ahe mitra !keep it up ! I have made a bookmark of ur blog on my browser !

    Thanks
    Bhagyesh Penkar.
    http://www.facebook.com/pages/Bhagyesh-Penkar-Photography/200473903319699

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!