गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

फॉर्म १६ आणि अनामिका

फॉर्म १६ नुसार "सरल" भरून रिटर्न्स फाईल करणं हे नोकरदार वर्गाला नव्याने सांगायला नको. जुलै आला कि लोकांची धावपळ सुरु होते..
"आपल्या ओळखीचा आहे एक.. त्याने भरून दिला फुकट.."
"काय नाय रे.. सोप्पं असतं.. फॉर्म १६ बघायचा आणि कॉलम भरत जायचे..."
"तुझा इकडे नाय सबमिट होणार.. प्रभात रोड च्या ऑफिस ला जावं लागेल.. आपला झाला. माझा मित्र आहे त्याची वट आहे.त्याने परस्पर पाठवला.."
"ऑफिस मध्ये येतो ना तो अकौंटंट.. सोडायचे २०० रुपये.. डोक्याला ताप नाही.."
इत्यादी संवाद हमखास कानावर पडतातच..
नोकरीचं पहिलं वर्ष सरेपर्यंत आपला ह्या भानगडींशी काही संबंध नसतो.  अचानक आलेल्या या गोष्टी दुर्बोध वाटायला लागतात आणि त्यामुळेच ‘ती’ माझ्या आयुष्यात आली.
तसं बघायला गेलं तर अपघातानेच आणि खरंतर "इन्कमट्याक्स" वाल्यांच्या कृपेने!

"रिटर्न्स फाईल करने थे ना.. त्याच्यामुळे उशीर झाला" तिची ही मिश्र भाषा ऐकून पहिल्यांदा मी तिच्याकडे पाहिलं. कॉन्फीडन्ट चेहरा, सावळी त्वचा,लक्षवेधक बांधा, ओव्हरऑल आकर्षक बाह्यरूप आणि कंपोज्ड व्यक्तिमत्व असं तिचं थोडक्यात वर्णन! 'तिलक' (अर्थात सदाशिवेतल प्रसिद्ध नाश्ता सेंटर, उच्चारी टिळक!) वर ती फोनवर कोणाशीतरी बोलत होती. 'रिटर्न्स', 'फाईल' वगैरे शब्द कानावर पडल्यावर मी वड़ापाव खाता खाता जरा सावध झालो.
"हाय! तू रिटर्न फाईल करतेस का? माझेपण करायचेत" मी तिरमिरित जाऊन बोललो.. माणूस परिस्थितीने गांजलेला असला कि इतर कसला उदाहरणार्थ लाज,लज्जा,भावना यांचा विचार करत नाही. मीपण त्यातलाच!!
माझ्या कडे विचित्र नजरेने पाहत ती जरा बाजूला झाली..
"सॉरी..पहचान न होने पर भी बात कर रहां हूँ  पर मुझेभी आय टी रिटर्न्स भरने थे.. आप कि फीस बता दिजीयेगा..लेकीन मुझे करवाने ही है.." मी भानावर येत आजुबाजुला पाहत विचारलं. न जाणो हिच्या आजुबाजुला एखादा सांड चहा आणायला गेलेला असायचा आणि त्याचा गैरसमज व्हायचा!
"कर दुंगी ना..बट आय चार्ज १०० रुपीज पर फॉर्म!" ती म्हणाली.
"अम्म्म... मेरे औरभी कलीग्ज है .उनके भी करने थे.." ती एकटीच आहे याचा एव्हाना मला अंदाज आला होता त्यामुळे मघाशी एकवटलेलं धैर्य वापरून मी पुन्हा तोंड उघडलं.
"ठीकाय, करते मी. पाचसहा असतील तर आय वोन्ट चार्ज फॉर यू ..आय मीन योर्स विल बी फ्री ऑफ कॉस्ट " डायरेक्ट बिझनेस ऑफर? तीपण मराठीत? मीपण चाट पडलो!
"तुला मराठी येतं?"
"मराठीच आहे अरे मी.. कामानिमित्त हिंदी इंग्लिश बोलावं लागतं.."
"कुठे काम करतेस?"
"राठी and असोसीएट्स"
"आणि तुझं नाव ?"
"अरे,किती प्रश्न विचारशील? सांस भी लेने दोगे या नही?"
आमची पहिली ओळख ही अशी.. नाव विचारलं ते मोबाईल नंबर एक्स्चेंज करतानाच.

त्यानंतर या ना त्या निमित्ताने तिचा contact होतच राहिला आणि मग तो तसा होणं हा दिवसाचा अविभाज्य भाग बनला.
"फक्त काम असतानाच फोन नाही करत मी.." अस मला म्हणून बोलायला सुरुवात करायची ही तिची सवय! पण "तुझ्याकडे कुठला नवीन पिक्चर आहे का?" अश्या विचारणेपासून "मला तुझा पेन ड्राईव्ह हवा आहे रे... दोन चार दिन के लिये" अशा अधिकारवाणीच्या बोलण्यापर्यंतचा तिचा प्रवास अगदी एखाद्या महिन्यातच झाला.. एखादी मैत्रीण आपल्या मैत्रिणीसाठी जे काही करू शकते ते सर्व आपल्या मित्रासाठी करू शकते का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी देण्याइतकी जाणीव तिने करून दिली.

"अरे बच्चा.. तुझी टोटल इन्व्हेस्टमेंट आणि बाकीचं कॅल्क्युलेशन बघता तुझे फक्त ६००५ रुपये ईअर्ली taxable आहेत, उतना ही कर इन्व्हेस्ट" म्हणून तिने माझा एलआयसी चा कमीत कमी प्रीमिअम किती असावा हा मला बरेच दिवसांपासून पडलेला प्रश्न चुटकीसरशी सोडवून दिला होता. (आणि जेव्हा नंतर tax कॅल्क्युलेशन ची शीट आली तेव्हा तो आकडा अचूक होता यावर शिक्कामोर्तब ही झाल!) ती बी कॉम करत होती आणि जॉबही. पण सांभाळायची दोन्ही! अर्थात कॉलेज ला दांडी मारणं जास्त फ्रीक्वेंट असायचं.
"मला आवडतं हे tax वगैरेचं काम करायला. यू गेट टू अप्लाय योर नॉलेज इन लाईफ एन यू अर्न मनी अल्सो!" ती जस्टीफीकेशन द्यायची. मला खरतर कशावरही ऑब्जेक्शन नव्हतं आणि का असावं? माझा देखील फायदाच होत होता त्यात. तिने माझा विनाकारण कट झालेला tax मिळवून दिला होता, माझं जराजीर्ण झालेलं pancard रिन्यू करून दिलं होतं आणि बरंच काही!

"हलो"
"हाय बच्चा!"  कायपण नाव ठेवलं होतं माझं! बच्चा!
"काय करतेयस गं?"
"कुछ नही..लंच के बाद सोयी थी..अभी नींद खुल गयी थोडी देर पहले.. तू बता.."
"रिसेप्शन ला चाललो होतो कात्रज च्या जैन मंदिरात.... एका मित्राचं लग्न झालंय. तुमच्यातलाच आहे...मारवाडी. येणारेस?" मी आपलं विचारायचं म्हणून विचारलं..
"ए मी मारवाडी नाहीये हां.. जैन आहे. आणि तो पण जैनच असणार.. आणि तू मला न्यायला येशील?"
मी अवाक! "म्हणजे तू येणारेस?"
"येते ना.. आय लाईक सच फंक्शंस .."
मी गुपचूप तिला आणायला गेलो.. ही बया सजून धजून तयार!!
"अग ए.. लग्न माझ्या मित्राचं झालंय!! तुझं नाही.."
" जैन आहे म्हणालास ना? तिथे असचं जाव लागतं. and व्हॉट इज धिस?.. जीन्स? यू गॉन mad ऑs व्हॉट? चेंज कर पहिलं.."
" ए तू नको येऊ हव तर पण मी असाच जाणार आहे"
"गपचूप बाईक ने तुझ्या flat कडे आणि चेंज करून ये. मी खाली वाट बघते."
इलाज नव्हता! स्वतःच्या पायावर मी कु-हाड मारून घेतली होती!!
...रिसेप्शन नंतर मित्राने स्वतः फोन करून मी नक्की लग्न वगैरे केलं नाहीये ना त्याची खातरजमा करून घेतली!!

ती माझी tax कन्सलटन्ट झाली,इन्व्हेस्टमेंट advisor झाली,माझी fashion डिझायनर झाली, मी गाडीमुळे प्रॉब्लेममध्ये असताना माझी ड्रायव्हर सुद्धा झाली.. "मैत्री" हा शब्द अपुरा वाटायचा आमच्या नात्याला. तिला बॉयफ्रेंडही होता. अगदी प्रेमळ -म्हणजे तिच्यासाठी! माझ्याशी पण बोलायचा तिच्या फोनवरून. मी त्याला निरुपद्रवी वाटत असेन कदाचित! आम्ही कित्येकदा भेटायचं ठरवलंही होतं पण तो योग जुळून आला नाही. आमचा संपर्क असायचा तो तिच्याच थ्रू. त्याला अगदी बित्तंबातमी असायची; कुठे काय खरेदी केली इथून कोणता पिक्चर पाहिला आणि तो कसा आहे  इथपर्यंत. "सगळं सांगते मी त्याला.. आयेम गोन्ना बी हिज बेट्ट हाफ" हे वरून!! पण नंतर मला त्याची सवय झाली होती. मीही तिच्या जीवनात काही भूमिका निभावल्या पण त्या तेवढ्याश्या कृशुअल नव्हत्या. तिचं सगळं व्याख्यान ऐकून घ्यायचं. सल्ले द्यायचे, तिची गुपितं ऐकून ती विसरून जायची," मिटवलंच पाहिजे नाहीतर ही ब्याद माझ्या गळ्यात पडायची" असं जाहीर करून बॉयफ्रेंडशी भांडण झालं की मिटवायचं.अमका कसा हिच्याशी फ्लर्ट करतो, तमकी कशी हिच्याबद्दल जेलस फील करते वगैरे तिच्या न पाहिलेल्या इतर मित्र-मैत्रिणीविषयीच्या कागाळ्या ऐकायच्या इत्यादी इत्यादी.

कमला नेहरू पार्क हे तिचं आवडतं ठिकाण. कॉलेज, ऑफिस आणि हॉस्टेल यापैकी कुठे ती नसेल तर मोस्ट ऑफ द टाईम्स ती तिथे असायची.
"के एन पी पे हूँ.. आ रहा है क्या चाय पिलाने??" तिचा फोन यायचा.
मुलीने दिलेलं आमंत्रण कोणी टाळतं का? "आलोच.." हे माझं उत्तर असायचं आणि कृतीही! उभ्या उभ्या तिथला बासुंदीयुक्त मसाला चहा पीत मी तिच्या गोष्टी ऐकत राहायचो आणि तिला उगीच सल्ले देणं, तिच्या बोलण्याला उगीचच response देणं वगैरे गोष्टी करायचो. कमला नेहरू पार्क ला गेल्यावर आपल्या बरोबर असणा-याच मुलीकडे सोडून इतरत्र नजर न वळवणा-या मुलाने फार फार कठोर तपश्चर्या वगैरे केलेली असली पाहिजे असं माझं (वैयक्तिक असलं तरी) ठाम मत आहे!! तिच्या हे लक्षात यायला फार वेळ लागायचा नाही.हातावर चापटी बसली की ग्लास हिंदकळायचा.
"थांब गं!चहा सांडेल ना!!"
"लक्ष कुठेय तुझं ?"
"तुझ्याकडेच आहे.. काय म्हणालीस ते सांगू का ?"
"कान असतात माझ्या बोलण्याकडे.. डोळे कुठे भिरभिरतायत ते विचारत्येय.."
मी लाचार हास्य चेह - यावर आणायचो.. दुसरं काय करणार??
"आटप पटकन,या दत्त मंदिरात जाऊन येऊ.. चांगले विचार तरी येतील तुझ्या मनात!" तिचं हे भाबडं मत होतं आणि "सब लडके एक जैसे होते है" हे पालुपद! मी तिच्यामते कोणतही "गैरकृत्य" केलं उदाहरणार्थ मुलींकडे पाहणे,त्यांच्या सौंदर्याची तारीफ करणे, एखादी कमेंट (अर्थात त्या मुलीला ऐकू जाणार नाही अशा बेताने! कारण तेवढ आमच धैर्य कुठल?!) करणे वगैरे वगैरे कि हे पालुपद ती आळवायची. "चूप कर.. हे भगवान.. सब लडके एक जैसे होते है!" इत्यादी इत्यादी. आता जिथे इंद्र,मदन हे देव आमच्या "भगवान" लोकांमध्ये येतात तिथे 'भगवान'कडे तक्रार करून भागणार नाही हे या जैन मुलीला कोण समजावणार ? मी आपला तिच्या समाधानासाठी शेजारच्या दत्त मंदिरात जायचो..

माझ्या मित्रांच्या ग्रुपशी मी तिची कधी ओळख करून दिली नाही,ना तिने कधी आपल्या मैत्रिणींची इंट्रो करून दिली. तशी गरजही पडली नाही. त्यामुळे फ्रेन्डशिप डे ला वगैरे आमचे नेहमीच्या मित्रांसोबतचे कार्यक्रम आटपले की रात्री ९.३०/१० वाजता आम्ही भेटायचो. के एन पी च्या शेजारी किंवा करिष्मा गार्डन च्या इथे कॅड बी खाता खाता दिवसभरात काय केलं याचा हालहवाल एकमेकांना दिला घेतला जायचा.

ओळख जुनी होत गेली की 'अतिपरिचयात अवज्ञा' होते. 'टेकन as ग्रांटेड' अर्थात गृहीत धरलं जाणं होत जातं. यथावकाश आमचंही नातं जुनं होत गेलं. बारीकसारीक गोष्टींवरून खटके उडणे..वाद विवाद होणे या गोष्टी नवरा-बायकोत,बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड मध्येही होतच असतात.. आमच्या नात्याला तर नावच नव्हतं. तिथे तर हे होणं आलंच! शॉपिंग ला जायचं म्हटल्यावर एका पायावर तयार असणारी ती "कंटाळा आला" चं कारण पुढे करू लागली. "पिक करायला ये" म्हटल्यावर मीही "आज रिक्षा ने ये ना.. मी आताच चेंज केलंय"वगैरे सांगू लागलो. सदाशिव पेठ ते के एन पी हे अंतर मला अचानक लांब वाटू लागायचं तर रात्री ९.४५ म्हणजे तिला फार्र फार्र उशीर वाटू लागायचा. काही भांडण झालंच तर कोणा एखाद्याने माघार घेऊन समजावणीचा सूर आळवणे हे सुरुवातीसुरुवातीला व्हायचं पण त्यातली inconsistency वाढत गेली.. "मी का करू..?तुझी चूक आहे" वगैरे वगैरे

मग फायनली एका वर्षी पुन्हा फॉर्म १६ भरायची वेळ आली.तिला फोन करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी आणि माझ्या कलीग्ज चे फॉर्म्स तिला नेऊन दिले.
"पुढच्या आठवड्यात देते करून. पैसे तुझ्याचकडे ठेव. रिसीट्स दुंगी तब दे देना"
"ठीकाय, पण झाले की कळव हां नक्की! यावेळेला २० फॉर्म्स आहेत."
"हो रे.. कित्ती घाई?"
"नाही अगं. मला नाहीये.ज्यांनी दिलेत त्यांना आहे!"
"देते मग.."

आठवडा गेला.. २ आठवडे झाले.. तिचा काही रिप्लाय नाही.
"ए मुली.. कधी देणारेस?" माझा तिला कॉल!
"देते रे.. झालंच आहे.. फक्त आय टी ऑफिस ला सबमिट करायचे आहेत.दो मिनट का काम है.. करेगा क्या? "
"नको बुवा.. कर तूच..!"

होता होता महिना लोटला.. फॉर्म दिलेल्यांनी तगादा लावला..
"काय? करणार आहे ना काम नक्की तुझी ती 'मैत्रीण'? ख्या ख्या ख्या"
"आमचे व्हिसा रिजेक्ट होतील हां तिच्या नादात"
"अरे हे काम आधी कर, बाकीची नंतर"
" माझा फॉर्म परत दे.. मी दुसरीकडून घेतो करून.."
"तुझ कमिशन किती यात? ही ही ही..." अश्या कमेंट्स ऐकल्यावर माझंही डोकं गरम व्हायला लागलं.

"नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतं तुझ्यामुळे. कधी देणार आहेस ?" माझा पुन्हा कॉल..
"अरे फक्त सबमिटच करायचे आहेत आय टी ऑफिस ला. मला पण वेळ नाहीये. आणून देते. कर तू.."
"म्हणजे काय? पैसे घेतेस ना वाजवून प्रत्येक फॉर्म मागे की उपकार खात्यात करून घेतोय.... फुकट मध्ये? महिना झाला तरी 'सबमिटच करायचेत..सबमिटच करायचेत..' " मी तिला वेडावत म्हणालो..
"हे बघ मला वेळ नाही.." तिचा आवाज हळू हळू चढायला लागला होता.
"महिनाभर वाया घालवून आता सांगत्येस तुला वेळ नाही? याचा अर्थ हाच ना की तुला गरज नाहीये आता आणि तुला... " मी पट्टी तिच्यापेक्षा वर नेली.
"तुला काढायचा तो अर्थ काढ.. आएम नॉट योर मेड टू लिसन योर ऑर्डर्स .. वन मोर थिंग..."
मी फोन कट केला .. मला त्या वन मोर थिंग मध्ये अजिबात स्वारस्य नव्हत.. माझी कामं आता ऑर्डर्स वाटायला लागली काय हिला? गेली उडत!

आठवड्याभरात माझ्या नावाचं कुरियर ऑफिसच्या पत्त्यावर आलं. सगळ्यांचे 'सरळ' भरलेले 'सरळ' फॉर्म होते त्यात.. माझ्याव्यतिरिक्त!! माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. चेह-यावर पाण्याचा हबकारा मारून मी शांत झालो. इतरांचा पाहून मी माझाही फॉर्म भरला. आय टी ऑफिस ला सबमिट करायला त्यांच्यातलाच एक 'गरजू' गेला. त्याचा व्हिसा इंटरव्यू होता २ दिवसांनी! काय करतो बिचारा! तो पावत्या घेऊन आल्यावर मी त्याला काय काय केलं ते विचारलं. "काहीच नाही' हे त्याच उत्तर ऐकून मी मनातल्या मनात पुन्हा तिला आणि मग स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहिली.

त्यानंतर तिचा संग सुटला तो कायमचाच. नंतर तिची खबरबातही राहिली/मिळाली नाही, मीही पेठेतून दुसरीकडे राहायला गेलो. एकही कॉमन फ्रेंड नसल्यामुळे संपर्क पूर्णपणे तुटला.

फॉर्म १६ मुळे सुरु झालेलं नातं फॉर्म १६ मुळेच संपलं!! पण आजही जेव्हा आय टी रिटर्न्स फाईल करायची वेळ येते तेव्हा तिची राहून राहून आठवण येते आणि वाटतं एखाद्या संध्याकाळी तिचा मेसेज येईल .." गुड इविनिंग बच्चा... मै के एन पी पे हूँ.. कॅन वी मीट? व्हॉट इज योर डीनर का प्लान?"

१२ टिप्पण्या:

  1. "आलोच.."

    ही खरी कहानी आहे का रे.....?



    ~अजित...

    उत्तर द्याहटवा
  2. too good man..MYSTIC,INCREADIBLE!!!do u knw wat???very few people are blessed with such creativity,innovative,imaginary,
    beautiful,serene thoughts...n they can actually pen them down...n YOU R THE ONE!!! keep going...its AMIABLE...GDTC

    उत्तर द्याहटवा
  3. Nakalat phulaat jaanare naate ase achanak ka bare komejun jave??
    uchal to phone ani laav tila phone!
    A1 :) khup chaan lihila ahes

    उत्तर द्याहटवा
  4. मला कुणी माझ्या आयुष्यातल्या घटना विचारल्या तरी मला एवढ्या व्यवस्थित, मुद्देसूद आणि घडलेल्या क्रमाने कधी च सांगता येणार नाहित...
    प्रत्येक वेळी एखादी तरी लिंक सुटणार माज्या कडून एवढा नक्की..
    पण हा माणुस अचाट आहे...एक च गोष्ट १० वेळा विचारली तरी प्रत्येक वेळी एक ही बदल न करता सांगू शकतो...
    याचे २ अर्थ निघू शकतात ..एकतर तुमची स्मरणशक्ति खुप च चांगली पाहिजे किंवा मग या घटना खर च तुमच्या स्वतः च्या आयुष्यातल्या असणार...
    पण या माणसाची स्मरणशक्ति पण अफाट असल्या ने वरील घटना "त्याच्याच " आयुष्यातली आहे या माझ्या उक्ति ला पुष्टि मिळू शकत नाही... :)
    असो....लवकर च प्रकरणा चा छड़ा लावण्यात येईल आणि वाचका पर्यंत सत्या पोचविन्यात येईल :)

    उत्तर द्याहटवा
  5. @ अजित;vinod;pal : आपल्या शंकानिरसनासाठी डिस्क्लेमर टाकण्यात आले आहे. त्यातून काही प्रश्नांची अस्पष्ट उत्तरे मिळतील!
    @milind sir; vasudha; gaurav ; sarita; gauri : कौतुकाच्या शब्दांबद्दल मनापासून आभार
    @Raghu: तुझ्या प्रतिक्रियेवरचा अभिप्राय व्यक्तिगतरित्या पोचता केला जाईल जेणेकरून छडा लावण्याचे कष्ट तुला पडू नयेत!

    उत्तर द्याहटवा
  6. khup sundar :)
    achanak ekhad chhan naat sutun jaat hatatun,mala purnapane umaju shakat he....tu he phar chhan mandal aahes matra!!!

    उत्तर द्याहटवा
  7. @Saki : कौतुकाबद्दल धन्यवाद! डिस्क्लेमर वाचलं असशीलच अशी अशा करतो. आपल्या नेहमीच्या वागण्याबोलण्यात बरीच माणसं येत असतात, ज्यांच्यामध्ये एक्स्ट्राऑर्डीनरी असं काहीच नसतं तरीदेखील आपल्यासाठी ती दखलपात्र असतात. अश्याच एका सर्वसामान्य व्यक्तिरेखेच रेखांकन करण्याचा हा प्रयत्न.. प्रयत्न आवडला हे वाचून बरं वाटलं!

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!