बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

बाईक रायडींग स्कूल ! -पूर्वार्ध

वयाच्या बरोब्बर अठराव्या वर्षी मी 'मोटारसायकल विथ गियर'चं लायसन्स काढलं. आधी चारेक वर्ष विना लायसन्स गाडी चालवलीच होती. त्यामुळे लायसन्स काढल्यावर तर 'अख्ख्या भारतात आपण कुठेही बाईक चालवू शकतो' असा  आत्मविश्वास कम अभिमान मला वाटू लागला होता. पण लवकरच हा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे हे मला कुठे माहित होतं? पुण्यात बाईक घेवून आल्यावर स्वारगेट पासून अलका थीएटर पर्यंतच्या पहिल्याच फेरीत माझा अभिमान, पोटावर आधीच ताणला गेलेल्या लेंग्याची नाडी तुटल्यावर जसा लेंगा पडावा, अगदी तस्साच पूर्णपणे गळून पडला. रों रों करत, इकडून तिकडून हव्या तश्या जाणा-या, वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या गाड्यांनी निरनिराळ्या पद्धतीने घाबरवून सोडत मला ब्रम्हांड आठवायला भाग पाडलं!!  'घरी धडपणे पोचलो तरी पुरे' अशी माफक अपेक्षा घेवून मी गाडी कशीबशी घेवून राहण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचलो. मुठीत धरलेला जीव सोडल्यानंतर मला माझे गाडी शिकतानाचे दिवस आठवले..

बाईक (कशीबशी) चालवायला मी साधारण सहावी-सातवीमध्ये शिकलो. पाचवीच्या मे महिन्यातल्या सुट्टीमध्ये आमच्या एमेटीची (फार पुरातन काळात बजाजचं m 80 या विचित्र नावाचं वाहन होतं ) आणि आमची स्वतःची हाडं (आधी नुसतं पडल्यामुळे आणि नंतर घरी मार पडल्यामुळे) काहीवेळा खिळखिळी झाल्यानंतर मला मोपेड चालवता यायला लागली. 'एक गाडी आली कि बाकीच्या लगेच येतात' या विधानातला फोलपणा त्या कालखंडात मला उमगला होता. उगाच भस्सकन हे शिकायचं असं न ठरवता स्टेप बाय स्टेप जायचं अशी आमच्या मामाश्रींची शिकवण (खरतर इच्छा)  असल्यामुळे मी प्रथम सायकल शिकलो. इयत्ता दुसरी मध्ये दोन चाकांची सायकल चालवणारा मी आमच्या एरियात काही काळासाठी का होईना कौतुकाचा विषय होतो. लोकांना फक्त सायकल चालवणारा मीच दिसत असे पण माझी सोललेली कोपरं आणि खरचटलेली ढोपरं दिसत नसत. तशी दिसू नयेत याची मीच पुरेपूर दक्षता घेत असे. उगीच इम्प्रेशन कशाला खराब करा? वय वर्ष ९-१० च्या दरम्यान म्हणजेच चौथीच्या मे महिन्यात मामाने कुठूनशी एक रिक्षा पैदा केली जी रात्री आमच्या (म्हणजे मामाच्या) ताब्यात असे, त्या रिक्षाने आम्हाला (आदरार्थी एकवचन! चौथीत गाडीचं ज्ञान म्हणजे आदर दिलाच पाहिजे!! ) हातातले गियर्स, क्लच, अक्सलरेटर,ब्रेक वगैरे प्राथमिक गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून दिलं.  सीटवर मामा स्वतः बसत असे आणि आम्ही handle आणि सीटच्या मधल्या  मोकळ्या आणि चिंचोळ्या जागेत उभे राहत असू. पायातला ब्रेक मामा दाबणार आणि पुढचा ब्रेक आधीच डिसेबल्ड!! तरीपण अथक प्रयत्नांती मी रिक्षा शिकलो. आता सायकल येते आणि रिक्षाही येते म्हटल्यावर एमेटी आलीच पाहिजे अस साधं लॉजिक.. पण ते आमच्या अंगवळणी पडलं नाही. आधीच म्हटल्याप्रमाणे ब-याचदा धडपड केल्यानंतर ती जमायला लागली. तीच कथा बाईकची! एमेटी आली म्हणून पायातले गियर्स जमतील याची काय शाश्वती देता येत नाही (आणि माझ्या बाबतीत तर मुळीच नाही!) मात्र तुलनेने कमी कष्टात मला बाईक जमू लागली.

आता एवढे कष्ट घेवून गाडी शिकलो तर निव्वळ पुण्यातल्या इतर चालकांना घाबरून आपण गाडीच चालवणं  सोडायचं कि काय? छे छे! हा तर पळपुटेपणा होईल.. म्हणून त्यानंतरचे आठ-दहा दिवस मी पुण्याच्या रस्त्यांवरून सुरक्षितपणे दुचाकी चालवण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला. पण छे.. पहिले पाढे पंचावन्न!
एका चौकात सिग्नलला (लाल रंग पाहून) उभा राहिलो. तर मागून एक कारवाला पों पों असा हॉर्न वाजवायला लागला. (खरं म्हणजे असा आवाज पी एम टी च्या हॉर्नचा येतो पण मला सोयीस्कर शब्द सापडले नाहीत म्हणून पों पों!). मला समजेना. समोर तर लाल दिवा होता. मी मागे वळून पाहिलं.
"ए.. चल की.."
"लाल सिग्नल आहे म्हणून थांबलो."मी म्हणालो.
"इथे थांबायचं असतं का?" त्याने ओरडून विचारलं.
"आमच्या आर टी ओ ने दिलेल्या तक्त्यात तरी असंच सांगितलं होतं!" मी निरागसपणे म्हणालो. पण माझा हा निरागसपणा त्याला उर्मटपणा वाटला की काय कोण जाणे. तो रागारागाने गाडी माझ्या साईडने पुढे काढत "काय च्यायला त्रास आहे.. कुठून कुठून येतात कोण जाणे."  असं मला ऐकू येईल अशा बेताने म्हणत सिग्नल लाल असतानाच निघून गेला. त्याच्या पाठोपाठ आणखी काही दुचाकीस्वार गेले. यथावकाश सिग्नल हिरवा झाल्यावर मी आणि बरोबर थांबलेले तुरळक लोक निघाले.
मग मात्र मी धसका घेतला. आपण काहीतरी वेगळं करतोय याची जाणीव पावलापावलाला होऊ लागली आणि कोणीतरी हे सगळ शिकवण्याची,समजावून सांगण्याची गरज प्रकर्षाने भासू लागली.

एके दिवशी मी ठरवलं की आता बास! काही झालं तरी सकाळी लवकर उठून पुण्यात बाईक शिकवणार स्कूल शोधायचंच! मी पहाटे ५ चा अलार्म लावला. डिजिटल डायरीत "मिशन रायडींग स्कूल सर्च" असा 'मेमो विथ अलार्म' तयार करून ठेवला . लवकर उठून तयार होऊन लगेच शोधमोहीम सुरु करायची असं ठरवून मी रात्री (नेहमीपेक्षा काही मिनिटं) लवकर झोपलो.

ठरल्याप्रमाणे उठून पहाटे लवकर मी कुठे 'बाईक रायडींग इन पुणे' अशी 'इस्पेश्यल' सर्विस देणारं स्कूल सापडतंय का पाहत चालू लागलो. सदाशिव पेठेतून नारायण पेठेत गेलो. तिथून शुक्रवार पेठेच्या दिशेने बराच वेळ चालत होतो..सगळीकडे नन्नाचा पाढा वाचला जात होता.
कुठे 'बाईक शिकवली जाईल पण पूर्ण फी भरावी लागेल' अस ठेवणीतलं उत्तर तर कुठे 'स्पेशल पुण्यासाठी? काय येडे कि काय तुम्ही?" असा सुस्पष्ट अपमान झेलत मी मार्गक्रमणा करत होतो. पुढे पुढे तर तंद्रीत चालत कुठे पोहोचलो मलाच कळेना.. कुठली पेठ होती तेही धड कळत नव्हतं. शुक्रवारेतून बुधवार पेठेकडे जाणारा रस्ता धरला कि काय अशी शंका मनाला चाटून गेली. अल्मोस्ट निर्जन रस्ता.. चढणारं उन..सकाळपासून काहीच पोटात पडलं नव्हतं. माझा घसा कोरडा पडला होता.पायही दुखायला लागल्यासारखे वाटत होते. पण सगळ्या घरांचे,हाटेलांचे दरवाजे बंद!! कुठल्या गल्लीत घुसलोय काहीच समजेना.तेवढ्यात लांबून एक माणूस येताना दिसला
"हा कुठला एरिया आहे हो? मला वाटतं मी रस्ता चुकलोय." मी म्हटलं. त्याला माझी शोधक नजर कळली असावी.
"काय शोधतोयस बाळ?"
डायरेक्ट  'बाळ' ? कमालय!
"पुण्यात बाईक चालवायची कशी हे शिकवणारी एखादी शाळा!" माझ्या उत्तरावर तो छद्मी किंवा कुत्सित यापैकी कसंतरी हसला..
"एवढा मोठा झालास तरी बाईक येत नाही?" त्याने खोचक प्रश्न केला
"तशी येते ओ..पण मागच्या काही दिवसात मला बाईक चालवता येते यावर आता माझाच विश्वास बसेनासा झालाय !" मी रडवेला चेहरा करून सांगितलं. त्या माणसाचं हृदय द्रवलं असावं.
"म्हणजे तुला बाईक येते ना? मग शिकायचंय काय ?" काय शॉट आहे हा माणूस? तोंडी परीक्षा घेत होता जणू!
"गाडी चालवण्याच मला असलेलं ज्ञान इथे कसं वापरायचं हे सांगणारं कोणीतरी!!" मीही इरेला पेटलो होतो.
प्रश्नावली थांबवून तो माणूस अंतर्मुख होऊन विचार करू लागला. नंतर त्याने कोणाला तरी फोन लावला "हलो.. देव बोलतोय रे..  एक मेंबर आहे.. अं?.. त्याला पुण्यात बाईक शिकायची आहे..अं?.. हो.. अं?.. बरर्र..अं? " असं म्हणत त्यांची थोडी गहन चर्चा झाली.
"एक पत्ता सांगतो. त्या ठिकाणी जा.. इथून जवळच आहे.."
"बरं.." मी म्हणालो. परत थोडा विचार करून साहेब म्हणाले ,"चल.. मीच तुला सोडतो तिथे.." आणि थोड्या वेळाने  पेठेतल्या कुठल्याश्या वाड्याच्या दरवाज्यात आम्ही पोचलो. कुठला भाग होता समजायला काहीच मार्ग नव्हता.. ना "सदाशिव पेठ- घ. नं. अमुक अमुक ते तमुक तमुक" असले बोर्ड, ना दुकानांवर अमकी आळी तमकी गल्ली असल्या खुणा. इतक्या वर्षात हा भाग कसा बघायचा राहिला याचंच मला आश्चर्य वाटत होतं तेवढ्यात हे सद्गृहस्थ बोलले,
"आत जाऊन "मी पाठवलंय " म्हणून सांग" त्या माणसाने मला तिथे सोडलं आणि तो आल्या पावली परत चालू लागला आणि वाड्याच्या भिंतीपलीकडे उजवीकडे वळलासुद्धा.
"अहो.. अहो..कोणी पाठवलंय म्हणून सांगू? अहो.. तुमचं नाव काय?" मी त्याच्या मागे गेलो तर हा भाई गायब! "च्यायला.. म्हातारा खूपच फास्ट चालतो.. काय नाव बरं त्याचं..? आडनाव तरी 'देव' होतं!
मगाशी फोनवर बोलताना तो तेच म्हणाला होता..साला माझं नाव जाणून घ्यायचे कष्टसुद्धा न घेता हा माणूस निघून गेला.. काय च्यायला माणसं असतात एक एक!

मी कर्र कर्र करणारा दरवाजा उघडून आत शिरलो. ओसरीवर केस वाढवलेला एक म्हातारासा  माणूस आणि त्याच्या आजूबाजूच्या खुर्च्या अडवून इतर काही लोक बसले होते.मला पाहताच त्याने डोके वहीत खुपसले आणि त्याने विचारलं
"बोला, काय काम आहे?"
"बाईक शिकायची आहे"
"क्काय?" त्याने आधी चमकून माझ्याकडे पाहिलं मग इतरांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं आणि तो फिदीफिदी हसला. बाकीच्यांनीही त्याचं अनुकरण केलं..
"त्यात हसण्यासारख काय आहे? बाईक चालवता येते मला.. मला पुण्यात बाईक चालवायची कशी ते शिकायचं आहे" मी त्रासिक चेहरा करून म्हटलं..
त्याचा चेहरा गंभीर झाला.. इतरांना हाताने पांगायची खूण करत त्याने मान पुढे काढत विचारलं "कोणी पाठवलं?"
"देव" मी म्हणालो
"काय शिंचा त्रास आहे.. तेहतीस कोटींपैकी कोणता देव ?"
"तुम्हाला आत्ता फोन केला होता त्यांनी.."
"अच्छा,शि-याने पाठवलं होय? काय राव, आधी बोलायचं ना?" आता साठ पासष्ठीच्या माणसाचं नाव "शि-या" इतकं ताजं(तवान) असेल हे कोणाला पटेल काय?
"बसा..अहो श्रीयुत श्रीकृष्ण देव आमचे बालमित्र.. शेजारीच राहतो. असो.. मुद्द्याकडे येऊ.. आमचा crash course आहे. एका दिवसाचा..आता सुरु केल कि संध्याकाळपर्यंत शिकाल."
"इतक्या लगेच ?" आणि त्या घाई लागलेल्या म्हाता-याचं नाव "श्रीकृष्ण देव"? ख-या देवांची नावं जितकी विचित्र नसतात तेवढी माणसांची असतात.. माझ्या चेह-यावर स्मित उमटलं. पण ते पाहताच समोरच्याच्या चेह-यावर आठी उमटली..
"तुम्हाला बाईक आधीच येते.. इथे ते ज्ञान कसं वापरायचं.तेवढंच शिकायचंय ना?"
"हो"
"बरं मग हा फॉर्म भरा. या लोकांना पण शिकायची आहे गाडी. आता सुरूच करणार होतो पण तुमच्यासाठी खोळंबलो होतो." मी गुपचूप फॉर्म आणि पैसे भरले.


नाव, वय, लिंग, सध्याचा पत्ता याव्यतिरिक्त फॉर्ममधले काही इन्टरेस्टिंग कॉलम. केवळ नमुन्यादाखल:
मी जिथे गाडी शिकलो ते गाव: अ) पुणे ब) इतर क)यापैकी नाही ________
पुण्यात कोणती गाडी शिकायची आहे? (हा पर्याय वरील 'लिंग' या कॉलमनुसार व दिलेल्या पर्यायापैकीच निवडावा )
पुरुषांसाठी/मुलांसाठी: अ) स्कूटर ब)मोटारसायकल क) यापैकी नाही________
स्त्रियांसाठी/मुलींसाठी: अ)सनी, स्कूटी,स्पिरीट किंवा तत्सम ब) activa ,डीओ किंवा तत्सम क) गाडीचे नाव माहित नाही/आठवत नाही_________
मागील पानावर सूचना होत्या. त्यापैकी काही निवडक नियम येणेप्रमाणे:
१) येथे फक्त पुण्यात गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.यासाठी आपणास पुणे वगळता इतरत्र गाडी चालवता येणे मुळात गरजेचे आहे.
२) आपले गाव पुण्याव्यतिरिक्त इतर असणे गरजेचे आहे. (पुणेकर असल्यास हे ज्ञान आधीपासून असते त्यामुळे त्यांच्यासाठी प्रवेश वर्ज्य! )
३) वर्गामध्ये शांतता राखावी. आपले वर्तन इतरांस त्रास होईल असे नसावे. वैयक्तिक सवयींवर नियंत्रण ठेवणे (उदा वायु-परीमार्जन जसे कि ढेकर,जांभया व इतर,मोठ्याने हसणे वा बोलणे,)
याव्यतिरिक्त, 'प्रवेश नाकारण्याचे अथवा घेतलेला प्रवेश रद्द करण्याचे अधिकार संचालकांकडे राखीव'; 'कोणत्याही कारणास्तव फी परत मिळणार नाही' वगैरे टिपिकल नियम होतेच!  नमनाला घडाभर तेल , नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न, चार आण्याची कोंबडी-बारा आण्याचा मसाला कि आणखी कोणती म्हण या crash course साठी सूट होईल याचा विचार मी करत असतानाच तब्बल अर्धा तास आतल्या खोलीत घालवून आलेल्या त्याच महाशयांनी माझी एखाद्या ड्रीम जॉब साठी निवड केल्याच्या आवेशात 'तुमची निवड झाली आहे' असे सांगितले. थोड्याच वेळात 'वर्ग' सुरु होणार होता..

क्रमशः

उत्तरार्ध

१३ टिप्पण्या:

  1. yeh!!!! i read ur blog atleast full(3/4th u can say) but u write nice, though some words i didnt understand the actual meaning, i enjoyed it :) this is the first time i hv read ur post :) u write well!!! and i see how irritated u were with the way ppl ride in pune :)

    उत्तर द्याहटवा
  2. मस्त लिहतोस मित्रा.
    आत्ता ४-५ लेख वाचुन काढले, छान वाटले एकदम.
    वारंवार आणि भरपुर लिहीत जा, लिहीत रहा ...

    अवांतर :
    एक विनंती, ह्या काळ्या रंगाच्या बॅक-ग्राउंड थीममुळे वाचताना डोळ्याला त्रास होतो आहे, ती बदलता आली तर कृपया ते करावे. कारण आत्ता डोळे त्रास द्यायला लागल्याने मी तुझ्या ब्लॉगचे वाचन आजच्या दिवसापुरते थांबवत आहे. :)

    - छोटा डॉन

    उत्तर द्याहटवा
  3. Hi dear friend ,
    Are same condition mazi hoti.me 6th std la 1st time gadi shikat hote tevva.asech scooty varun eka utaravarun farfatt gele.tyanantar gadichihi vat. ani mazihi vat lagli. aai ,pappachya nustya sivya padayachya .nantar pleasure ghetali.ajun lihavas vattay pan aata khup zop yetey. nantar sangen.ha ajun ek tu aata ky krts eduction ki ajun kahi rly must dont forget.bye bye ....................
    @RIDDHI LOKARE@

    उत्तर द्याहटवा
  4. @Marie: Thanks for reading this! It's a bit lengthy and few phrases were not that easy to understand e.g. "पहिले पाढे पंचावन्न" etc!! Still you managed to read thorough it.. Efforts are appreciated.. claps! claps!! claps!!!

    @Rohan: पुढचा भाग वाचल्यानंतर तू तुझा फायनल निर्णय घे! तू माझ्या लिखाणाचा हक्काचा वाचक असल्याने आभार मानायची औपचारिकता मुद्दामच दाखवत नाहीये. गैरसमज नसावा!

    @छोटा डॉन: मिपा आणि तुझा ब्लॉग यावर तुझे लिखाण मी वाचत असतो (पण केवळ वाचनमात्र राहून!). त्या लिखाणाची उंची,रुंदी अथवा खोली काहीही पाहता तुला माझं लिखाण 'मस्त' वाटलं यातच भरून पावलो!!
    तुझी विनंती ही आज्ञेसामान मानून ताबडतोब थीम "पांढ-यावर काळी" केली आहे. मित्रांनी लोडिंग टाईम बद्दल तक्रार केली असल्याने आधीची शक्य तितकी लाईट थीम बरेच दिवस ठेवली होती.
    सूचनेबद्दल आभार!

    @Riddhi : सगळ्यांच्या बाबतीत ही धडपड होतच असावी. तुझ्या शेवटच्या प्रश्नाचा रोख कळला नाही तरी उत्तर येणेप्रमाणे - मी सध्या नोकरी करतो.

    उत्तर द्याहटवा
  5. अरे वा, थीम बदललेली दिसतेय.
    आनंद वाटला आणि वाचन सुखद झाले, धन्यवाद.
    आजपासुन आम्ही तुमचा ब्लॉग पुन्हा वाचायला घेतला आहे.
    मजा येते आहे, लिहीत रहा ...

    आजचे आवडलेले म्हणजे 'जिम पोरी जिम' ...
    अफाट आहे !!!

    - छोटा डॉन

    उत्तर द्याहटवा
  6. राम राम मित्रा,
    नवा ब्लोग लिहायला फारच वेळ लावलास. चक्क ३ महिन्यांची समाधी? वाटले होते की इथे बीटचे अनुभव वाचायला मिळतील, पण तू तर इ. २री पासून सुरुवात केलीस. असो कमीतकमी परत सुरुवात तर केलीस. "नाडी तुटून लेंगा पडणे", "ब्रम्हांड आठवणे" लय भारी. पुढच्या लेखात तुला मागून त्या वृद्ध माणसाने बाईक धक्का मारून शिकवली नाही म्हणजे मिळवले.

    विनायक

    उत्तर द्याहटवा
  7. @छोटा डॉन: डॉन राव, आपल्या आज्ञेवरूनच थीम बदलली आहे! आपल्याला (पक्षी वाचकांना) होणारा आनंद यातच आमचा आनंद!! :)
    आपल्या प्रेरणादायक शब्दांबद्दल धन्यवाद!'जिम पोरी जिम' बद्दलच्या आपल्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे..

    उत्तर द्याहटवा
  8. @vinayak: कामाकडे अपेक्षेपेक्षा जास्त लक्ष दिलं कि असं होतंच! शिवाय गेले काही वीकेंड्स 'बीट'ला मित्रमंडळींकडे नेऊन कौतुकाच्या वर्षावात न्हाऊ घालण्यात खर्ची पडले.त्यामुळे थोडं उशिरा लिहिलं.

    तुला पुढील भागाची असणारी आतुरता लवकरच शमवली जाईल!

    उत्तर द्याहटवा
  9. Siddhesh - are kharach kalpana shakti la jar kharachi zalar dili tar ti asich surekh hote...

    Mitra ekdum chan lihitos...

    why dont you try and write for news papers so that more ppl will enjoy it

    उत्तर द्याहटवा
  10. मस्त आहे ..पुणेरी बेशीष्ट driving,पुणेरी पाट्या यांचा छान ऊलेख केला आहेस तू...
    आणि तू लहानपणापासून च गाडी चालवाय्चास त्याचा अनुभव देखील सुरेख आहे ...
    लाल दिवा दिसला कि लोक थांबत नाहीत याचा बरयाच जणांना अनुभव आला आहे...
    ते पण तू मस्त लिहिले आहे...स कि लोक उलट आपल्यालाच वेडे ठरवतात...
    good attempt the post is marvelous,fabulous n i knw every 1 must have thought ki he aplyasobat pan ghadle ahe..
    मी तुला सकाळ मध्ये colagus mhunun 1 article ahe te vach ase sangat hote,n ho कृतज्ञ he article pan chaan ahe.tuzya 4 wheeler war pan kahitari apekshit ahe:-p
    gdtc:-p

    उत्तर द्याहटवा
  11. @siddhu : कौतुकाबद्दल आभारी आहे.. मी लिखाण स्वतःची खाज मिटवायला करत आलो आहे त्यामुळे पेपर बिपर मधून छापून येण्याची त्याची लायकी आहे कि नाही याबद्दल कल्पना नाही. परंतु तुला ते त्या दर्जाचे वाटले हे माझे यश मानतो!

    @sudha : धन्यवाद अगं! हे सगळे स्वानुभव आहेतच असं नाही. थोडा कल्पनाविलाससुद्धा आहे. पुण्यामध्ये गेल्या १०-११ वर्षापासून आतापर्यंत होत जाणारे बदल मी अनुभवले आहेत त्यावरून हे सुचलं. आणि हो..टू व्हीलर प्रमाणे फोर व्हीलरचे अनुभव किती लोकांना आपलेसे वाटतील हि शंका आहे!

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!