मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

बाईक रायडींग स्कूल! -उत्तरार्धपूर्वार्ध:
माझ्याचकडून फी चे पैसे घेऊन हा माणूस मलाच "तुमची निवड झाली आहे" असं सांगतो? कमाल आहे!!
विचार करत करत वाड्याला वळसा घालून मागच्या बाजूला असलेल्या वर्गावर मी पोहोचलो. हो.. वर्गावरच! बेंचेस,फळा, प्रोजेक्टर,रोलिंग व्हाईट बोर्ड असा जामानिमा असणा-या खोलीमध्ये. माझ्यासारखे मोजके लोक वर्गात बसले होते. अगदी शाळकरी मुलं बसतात तसे. वह्या-पेन घेऊन!! मी दबकत एका मोकळ्या बेंच वर जाऊन बसलो. नोटपॅड आणि काही स्टडी मटेरियल बेंचवर ठेवण्यात आल होतं. ते चाळायला सुरुवात करायच्या आधी मी शक्य तितका कुत्सित स्वर आणून आणि नकारार्थी उत्तराची अपेक्षा ठेऊन, समोर बसलेल्या निळसर कुर्ता परिधान केलेल्या व्यक्तीला प्रश्न केला.
"इथे वर्गात शिकवणार का गाडी?"
" आमास्नी काय म्हायती नाय बा..पर आसत्याल. पुन्यातला कलास हाय ह्यो. इद्येच म्हाएरघर म्हनत्यात ह्ये.. शिकवत आस्त्याल वर्गात गाडीबी!!"
"कुठले तुम्ही?" मी निरखून त्याचे कपडे पाहिले. मगाशी निळसर वाटणारा कुर्ता मुळात पांढरा असावा. नीळ टाकून टाकून त्याने शेवटी हा रंग धारण केला असावा हे जाणवलं..
"आं"
"म्हणजे गाव कोणतं?"
"आस्स व्हय? आमी सतारकडल.. ३० -४० किलोमीटर वरती हाय गाव आमचं.."
"पुण्यापासून?"
"आवं.. सतारपासून ..तुमी कुनीकडचं म्हनायचं.."
"कोकणातला"
"बारं.. तवाच हिथ आलायसा." गडी हसत हसत म्हणाला.. "म्या बी लय ट्रायल मारून पायला हितं गाडी चालवायचा.. पर काय जमना.. आवं.. आट आट टनाचा टरक न्हेतोया मी बाजारला गेल्या धा वर्साधरनं.. पर हितं पुन्यात -हायला आल्यापासू दोन-चाकी चालवाय तरास होतु.. जरा फुडं ग्येलो कि ह्यो इकडून घुसतोय, त्येला वाचवाय ग्येलो तर त्ये बेनं तिकडून घुस्तंय.. च्या मायला इट आला सगळ्याचा.. त्येच्यात आमची बुलेट पाचशेवाली. मागं कुत्रं आलतं चाकाखाली.. आयच्यान सांगतु.. 'क्याक' कराया बी टायम नाय घावला त्येला!! हालीच ह्या कलासबद्दल कळालं तवा म्हनल मानूस चाकाखाली येयच्या आत कलास लावून शिकू तरी पुन्यात कशी काय चालवायची ती गाडी.. "

माझ्यासारखाच होता हा बहाद्दर पण! म्हणजे सगळे नॉन-पुणेकर असणार होते.तेवढ्यात तरातरा चालत वर्गात तांडवकर सरांनी एन्ट्री केली. हा मगासचाच खडूस म्हातारा.. पण त्यांनी आपली ओळख "मी तांडवकर सर" अशी करून दिली! याला झेलायचंय? पण नाविलाज को क्या इलाज?? झेललं पाहिजे!

नमस्कार चमत्कार आणि ओळखीपाळखी झाल्यावर सरांनी "पुण्यात गाडी शिकण्यासाठी मुळात तुम्हाला पुणेकर होणे गरजेचे आहे" असे सांगून बॉम्ब टाकला. वर्गात कुजबुज सुरु झाली."व्वा,क्लास हवा तर असा!","त्याच फी मध्ये हे पण ट्रेनिंग मिळतंय तर नकोय कोणाला?","हे काय आता नवीन?","असं कसं काय होणार..?"," बोललं कि होतं का?" "नको बाई!" दबक्या आवाजात अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या..

"मला माहित आहे तुम्हाला ते शक्य नाही.." बिनधास्त हसत ते म्हणाले. "पण पुणेकरांचे काही गुण तर अंगी बाणवू शकता ना? गाडी चालवण्यासाठी त्याची आपल्याला गरज पडणार आहे" असं म्हणून 'पुणेकर' या विषयावर त्यांनी एक लेक्चर घेतले. स्वाध्याय म्हणून 'पुलं' च्या 'तुम्हाला कोण व्हायचंय?मुंबईकर ,पुणेकर कि नागपूरकर?' या लेखाचे वाचन करा असे सांगितले. काळजीपूर्वक वाचून त्यातील "पुणेकर होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शब्दात समोरच्याचा अपमान करता येणे गरजेचे आहे" यांसारखी वाक्ये लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले! तांडवकरांनी "मला माहित आहे तुम्हाला पुणेकर बनणे शक्य नाही.." हे सांगून सोदाहरण या वाक्याचे स्पष्टीकरणही दिले होते.

सकाळच्या सेशन मध्ये थियरी शिकवण्यात आली त्यात वेगवेगळ्या क्लृप्त्या शिकवल्या गेल्या.आम्ही महत्वाचे मुद्दे नोंदवून घेतले..
'पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गावी शिकलेले आर टी ओ चे नियम पुण्यात लागू नाहीत.. कागदोपत्री असतील पण पुणेकर ते मानत नाहीत. त्यामुळे तुम्हालाही ते विसरावे लागतील..'
'इथे गाडी चालवताना लांबचा विचार करायचा नाही..जवळचे विचार करायचे.. स्पष्ट सांगायचं झालं तर 'घरी पोचणे' हा झाला लांबचा विचार.. आणि समोरच्या वाहनाच्या पुढे जाणे हा झाला जवळचा विचार. पुण्यातल्या रस्त्यांवर हा विचार जो करेल तो यशस्वीपणे गाडी चालवेल, जो करणार नाही तो मागे पडेल!'
'हॉर्न हे महत्वाचे साधन आहे.. गाडीला एकवेळ ब्रेक नसला तरी चालेल पण हॉर्न हवा आणि तो वाजणारा हवा.. त-हेवाईक आवाज असणं केव्हाही चांगलंच!आणि न विसरता एका ठरावीक कालावधीनंतर हॉर्न वाजवत राहावा.'
' इंडिकेटर्स,आरसे, हेल्मेट आणि लेनची शिस्त या गोष्टी नसतील तेवढ जास्त सोयीस्कर!'
"उजवीकडून केलेला ओवरटेक फाउल धरला जातो."
"गर्दीच्या वेळी डिव्हायडर नसणारा रस्ता हा जाणा-या येणा-या वाहनांसाठी अर्धा-अर्धा विभागला न जाता साधारणत: पाऊण-पाव या प्रमाणात विभागला जातो"
"सिग्नल ला जरा कौंटडाऊन असेल तर आकडा 0 होऊन सिग्नल हिरवा होण्याची वाट न पाहता आकडा 6 वरून 5 वर येवून ब्लिंक करू लागताच गाडी पुढे दामटणे श्रेयस्कर! आणि जोश असा हवा कि सगळ्यात पुढे जाणा-याला स्वतः राष्ट्रपती त्यांच्या नावाचं पदक देऊन गौरवणार आहेत.. हे विसरलात तर पुण्यात बाईक चालवणं देखील विसरा.. "
"बाईक ने कारच्या मागे थांबणं हा बाईकचासुद्धा अपमान आहे आणि पुण्याचासुद्धा! शक्यतो कारच्या डाव्या साईडला थांबावं. ती रस्त्यात कुठेही असेल तरी!!"
"दुकानात जसं गि-हाईक सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट आहे तशीच रस्त्यांवर पादचारी.. त्याला हॉर्नने अथवा तोंडाने जोरात आवाज देऊन घाबरवण्याचा प्रयत्न करावा..यु विल बी द मोस्ट सक्सेसफुल बाईक रायडर!!"
सर एकापाठोपाठ एक फंडे देत होते आणि आम्ही अचंबित होऊन ऐकत होतो. दोन वाजता लंच ब्रेक झाला तत्पूर्वी सरांनी त्यांच्या ५१ अफलातून 'आयडीयाज आणि थिय्रीज-मेड इन पुणे' सांगून संपल्या असल्याच जाहीर केलं.

"जेवणानंतरच्या सेशनमध्ये लोकांना झोप येते त्यामुळे शंकानिरसन आणि त्या अनुषंगाने सांगता येण्यासारखे काही असले तर सांगूयात" हि सरांची कल्पना आम्ही विद्यार्थ्यांनी (इतर काही पर्याय नसल्यामुळे) मान्य केली. पहिलाच प्रश्न 'सिग्नल' संबंधी होता.
"सर,इथल्या सिग्नलच्या बाबतीत माझं नेहमी कन्फ्युजन होतं. तुम्ही 'पुण्यातले सिग्नल्स' हा विषय जरा सविस्तरपणे समजावून सांगाल का?"प्रश्नकर्त्याने जणू काही माझ्या तोंडाचा प्रश्नच पळवून नेला होता.
"नक्कीच!" सरांच्या चेह-यावर हास्य खुललं. "पण त्या आधी सिग्नलच्या रंगाचे तुम्हाला माहिती असणारे अर्थ कोणी सांगेल का?" बरेचसे हात वर गेले.
"सर, हिरवा म्हणजे जा, भगवा म्हणजे आपला स्पीड कमी करा आणि लाल म्हणजे थांबा" एका जाड भिंगाच्या चष्मेवाल्या मुलाने पुस्तकी उत्तर दिलं.
सर कीव आल्यासारखे हसले.. "हे नियम आर टी ओ च्या कार्यालयात आणि इतर शहरांमध्ये लागू होतात." सर म्हणाले.. "पुण्यात हिरवा म्हणजे जा, भगवा म्हणजे जोरात जा आणि लाल म्हणजे थांबा पहा व जा!!" वर्गात कुजबुज सुरु झाली.
"सर म्हणजे सिग्नलला थांबायचंच नाही का? "
"थांबायचं ना! पण समोर मामा असेल तर.. मामा हा शब्द ट्राफिक पोलिसाला उद्देशून असतो हे वेगळे सांगणे न लगे. कुठल्या सिग्नलला थांबायचं आणि कुठल्या नाही हे अनुभवाने तुमच्या लक्षात येईल..." सर पुढे सांगू लागले "जर एखाद्या चौकातून डावीकडे वळायचे असेल तर सिग्नलचा नियम अस्सल पुणेकरांस मान्य नाही.. त्यामुळे डावीकडे जायचे असतानादेखील तुम्ही जर सिग्नल पडण्याची वाट बघत असाल आणि मागून कोणी हॉर्न वाजवू लागले तर तो दोष सर्वस्वी तुमचा असेल. म्हणून योग्य सवय अंगी बाणावलेलीच बरी!" सर सांगत होते.."तुम्हाला जे स्टडी मटेरियल दिले गेले आहे त्यामध्ये बरेचसे चौक,मुख्य रस्ते आणि तिथे अपेक्षित असणारे तुमचे वर्तन याचा तक्ता बनवला आहे...." फडाफडा पानं परतल्याचे आवाज येवू लागले..

मी चटकन नजर टाकली..त्यावर त्या चार्ट व्यतिरिक्त
कर्वे रस्यावरून डेक्कन कॉर्नर चौक मार्गे लकडीपूल -> प्रवेश बंद -> गेल्यास अलकाच्या चौकात मामा पावती फाडतात.
कर्वे रस्यावरून डेक्कन कॉर्नर चौक मार्गे गुडलक चौक -> सिग्नल कडे दुर्लक्ष करणे.
अलका चौकातून लक्ष्मी रस्त्याला प्रवेश बंद->कुमठेकर रस्त्यावरून कुलकर्णी पेट्रोलपंपाच्या मागच्या बाजूने पोलिसांना चकवून घुसता येते.
टिळक रोड वरचे सिग्नल आणि गर्दी टाळण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या रस्त्याने सरळ जावून बाजीराव रोड च्या अलीकडे उजवीकडे वळणे.
लालबहादूर शास्त्री रोड वरील लोकमान्य नगरचा सिग्नल वगळता इतर सिग्नलकडे दुर्लक्ष करणे.
असल्या काही प्रबोधनात्मक टीपा होत्या.
त्याचप्रमाणे "स्त्रियांचे वाहन कौशल्य","वृद्ध पादचा-यांचे रस्त्यांवरचे वर्तन","कार आणि बसवाल्यांशी हुज्जत" या विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारले गेले. त्यावर सरांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

'हुज्जत' या विषयावर १५-२० मिनिटं छोटेखानी व्याख्यान दिल्यावर सरांनी आमच्याकडून"बधीर" "माजोरी कुठचा!" "आंधळ्या" ,"बहि-या" हे शब्द आणि "रस्ता काय तुझ्या बापाचा समजलास काय रे मंद, कुठून कुठून गर्दी करायला पुण्यात येतात कोण जाणे.." हे वाक्य घोटवून मुखोद्गत करून घेतलं."हे वाक्य परवलीचं असल्याने कोणत्याही भांडणाचा शेवट करताना हे वाक्य मोठ्याने उच्चारावे व चटकन निघून जावे" असा सल्ला सरांनी दिला. तो आम्ही नोट डाऊन करून घेतला. 'इतरांनी याचाच प्रयोग आपल्यावर करू नये म्हणून कानात सदैव ईअरफोन्स असणे चांगलं म्हणजे इतरांच्या शिव्या,हॉर्न्स ऐकू येत नाही आणि आपल्याला एकाग्रता साधणं सोप जातं !' असं सुचावायलाही ते विसरले नाहीत!
तोपर्यंत चहापानाचा ब्रेक झाला.

ब्रेकमधेही सर व आमच्यात या ना त्या विषयावर चर्चा रंगत गेली. "प्रवेश बंद चा फलक केवळ शो साठी असतो" हाही सल्ला त्यांनी जाता जाता दिला. "कमीत कमी पैशात ट्राफिक पोलीस पासून कशी सुटका करून घ्यायची" याच्या १०१ क्लृप्त्या सर सांगणार होते पण त्यासाठी वेगळे पैसे पडतील हे कळल्यावर सगळे पांगले.. त्या भानगडीत माझ्या हातातला चहाचा कप गार झाला! मग काय करणार? गुपचूप चहा तिथल्याच झाडाच्या कुंडीत ओतून मी वर्गात जाऊन बसलो. तांडवकरांनी यावेळी स्वतःचं शब्दांचं त्यांच्या जिभेवर चालणारं तांडवनृत्य थांबवून प्रोजेक्टरवर एक व्हीडीओ चालू केला. त्यामध्ये पुण्यातल्या दुचाकीचालकांच्या सवयी रेकॉर्ड केलेल्या होत्या.. "नीट लक्ष देऊन बघा, खूप शिकण्यासारखं आहे यात.." सर सांगत होते. आधीच चहा झाला नव्हता आणि त्यात रेकॉर्डेड व्हीडीओ... माझ्या डोळ्यांवर झोपेनं गारुड केलं नसतं तरच नवल! प्रयत्न करूनही पापण्या एकमेकांपासून विलग व्हायला तयार नव्हत्या.शेवटी वर्गात जी ट्रिक वापरून मी काही मिनिटं निद्रादेवीसाठी अर्पण करत असे तीच मी इथेही वापरायचं ठरवलं. हनुवटी डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवून बोटांनी डोळ्यांना आडोसा करून मी डोळे मिटले.

टिंक टिंक...टिंक टिंक... टेबल क्लॉकचा अलार्म वाजत होता. मी हात लांब करून गजर बंद केला. ..आणि चपापलो. मी आडवा झोपलोय? खाडकन झोप उडाली.मी उठून बसलो. 'कुठेय मी?' मी माझ्याच बेडवर होतो. घड्याळात पाहिलं. सकाळचे पाच वाजले होते. "मिशन रायडींग स्कूल सर्च" डायरी लाईट ब्लिंक करत मेमो दाखवू लागली. म्हणजे ते स्वप्न होतं तर..माझं डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. मी लाईट ऑन केला.

काय सालं स्वप्न होतं! अक्षरशः जगलो मी ते.. fan बंद करताच गादीवरच पडलेल्या नोटपॅडची पानं फडफडायची थांबली. "नोटपॅड? हे तर माझं नाहीये.." मी पुटपुटत ते उचलून बघितलं.. आतमध्ये माझ्याच हस्ताक्षरातल्या नोट्स होत्या.. आश्चर्यचकित होऊन मी त्या वाचायला लागलो..

'गावी शिकलेले आर टी ओ चे नियम पुण्यात लागू नाहीत..'
'गाडी चालवताना लांबचा विचार करायचा नाही..जवळचे विचार करायचे..'
'गाडीला हॉर्न हवा आणि न विसरता एका ठरावीक कालावधीनंतर हॉर्न वाजवत राहावा.'
'चालकाकडे इंडिकेटर्स,आरसे, हेल्मेट आणि लेनची शिस्त या गोष्टी नसाव्यात!'
मी अवाक झालो! काही सुचेना.. मी पूर्ण चक्रावून गेलो.

...समोरच असलेल्या टेबलावरचा भिंतीच्या आधाराने उभा केलेला देवांचा फोटो घसरून आडवा पडला होता. मी विचार करत तो उभा केला.. पण का कोण जाणे फोटोतला श्रीकृष्ण नेहमीपेक्षा जरा जास्तच हसत असल्यासारखा वाटत होता आणि फोटोतल्या शंकरानेदेखील मांडीची घडी बदलल्यासारखी दिसत होती!!
समाप्त.
(निर्विवादपणे पूर्णतः काल्पनिक!)

९ टिप्पण्या:

 1. its amiable...there is lot of humour in the post.
  ata signals che meanings parat shikayala have asa vatatay:-p...

  उत्तर द्याहटवा
 2. हाहाहा पुणेरी ड्रायविंग स्कूल चालवायला हरकत नाही आता तुम्ही...

  उत्तर द्याहटवा
 3. @Pankaj : इथेच होतो रे!! आता सापडलो ना? मग भेट देत राहा अधूनमधून!! follower झाल्याबद्दल धन्यवाद!

  @Sudha :thanQ गं!

  @Vikrant : प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मित्रा!

  @मुक्त कलंदर: हो.. आता असा विचार करायला हरकत नाही!! :)

  उत्तर द्याहटवा
 4. good imagination.. :) :)
  punyat gaadi chalavtana he sagla lakshat astach..
  pan sang mhantla tar evdha sangta yenar nahi..
  hats off..
  :):)
  sagla point-to-point lihilyabaddal..!!
  :):)
  :P:P

  उत्तर द्याहटवा
 5. @madhuri : हा काय प्रश्न झाला?
  उत्तर:
  लेखाबद्दल असेल तर : अर्थातच!!
  माझ्याबद्दल असेल तर लेखात दडलेलं आहे! हा हा!!

  उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!