सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

निरुत्तर

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून हनुमान टेकडीकडे म्हणजे मी राहायचो तिकडे जायचं म्हणजे चालत अवघं वीस-पंचवीस मिनिटांचं अंतर.. पण संध्याकाळी मला तेही नको वाटायचं. म्हणून मी ३०१ क्रमांकाच्या बसची वाट बघत थांबायचो..रांगेतून बस मध्ये चढायचं सुख मुंबईत अनुभवता येतं... ती मजा पुण्यात नाही! मुंबईत कितीही गर्दी असली तरी लोक रांगेतूनच चढणार. बस भरली कि गुपचूप पुढच्या बसची वाट बघत उभे राहणार.. पुढची बससुद्धा आज्ञाधारक असल्याप्रमाणे कोणताही दगाफटका न करता १० मिनिटात येणार आणि पुन्हा हे चक्र चालत राहणार. मला कोण कौतुक वाटायचं या सगळ्याचं! अर्ध्या रस्त्यावर येवून थांबणारे लोक नाहीत... बस थांब्याच्या पुढे फर्लांगभर अंतरावर बस थांबवणारे उन्मत्त ड्रायव्हर्स नाहीत..गुळाच्या ढेपेला झोंबणा-या मुंगळ्यान्सारखी दरवाजाशी झटापट करणारी बेशिस्त गर्दी नाही कि कोलमडलेल वेळापत्रक नाही. सगळं कसं शिस्तबद्ध आणि सुरळीत!

मी विचारात असतानाच बस आली आणि माझा नंबरही आला..मी बसमध्ये चढणार तोच एक युवती अचानक प्रकट झाली आणि मला बाजूला ढकलत बसमध्ये चढू लागली.. आता तरुण पोरीने धक्का दिला म्हटल्यावर माझ्यासारख्याचा तोल ढळणं स्वाभाविकच  आहे नाही का? मी आधारासाठी काहीतरी धरलं.. ते काहीतरी म्हणजे तिची ओढणी होती हे माझ्या लक्षात येईपर्यंत ती वळून वस्सकन माझ्या अंगावर ओरडू लागली..
"कुछ तमीज है के नही आपको.."
सगळा प्रकार सेकंदाच्या कितव्याश्यातरी भागात घडला असेल पण मी भांबावून गेलो..तरी सावरून मी म्हटलं..
"सॉरी,पण मी मुद्दाम नाही केलं.. तुम्ही मध्ये घुसलात.. त्यामुळे माझा balance गेला.."
"ए गपे.. मी ओळखते तुमच्यासारख्या लोकांना.. हात लावायला चान्स शोधत असता. हो की नाही?" तिने रणरागिणीचा अवतार धारण केला. नसत्या बालंटमुळे मी सर्दच झालो..
तेवढ्यात माणुसकी मदतीला धावून आली. रांगेत मागे उभे असणारे लोक मोठ्याने तिला सांगू लागले..
"ए मुली.. एकतर तू लाईन तोडून घुसलीस आणि वरून त्यांना बोलतेस? गुपचूप आत हो नाहीतर खाली येवून उभी राहा.. "
याचा मला अपेक्षित होता तो परिणाम झाला.ती आत गेली..मीही बसमध्ये चढलो तर दुर्दैवाने हे बया शेजारीच उभी! मी जरा अंग चोरून उभा राहिलो..बसायला जागा मिळाल्यानंतर मी चोरून तिच्याकडे कटाक्ष टाकला तर मला जाणवलं की ती रोखून (कि खजील होऊन?) माझ्याकडे बघत होती. मी नजर वळवली आणि खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. माझा शेवटचा stop होता. मी उतरताना बसमध्ये नजर टाकली तर ती नव्हती..सुटलो! म्हणत मी माझ्या मुक्कामावर पोचलो.

दुस-या दिवशीच्या संध्याकाळी मी stop वर उभा राहिलो तर ती मुलगी मला पुन्हा दिसली. यावेळी मात्र रांगेत होती.खरतर ती रोजच असायची त्या दरम्यान तिथे, पण आम्ही कधी एकमेकांना नोटीस नव्हतं केलं.. रांगेत असताना प्रत्येकजण बसचीच वाट पाहत असतो;फार क्वचित रांगेत कोण आहे ते पाहतो आणि दहा मिनटांनी बस अशी फ्रिक्वेन्सी असेल तर कधी ती आधी निघून जाणं किंवा मी आधी निघून जाणं असं होत असावं.. तिनेही मला पाहिलं. मी उभा राहताच ती आपला नंबर सोडून माझ्या मागे येवून उभी राहिली. कालच्या प्रसंगाची आठवण झाल्यामुळे मी उगाचच कॉशस झालो..
"हलो मिस्टर..  " ती माझ्याशीच बोलत होती..
"अं? "
"एम सॉरी..कालच्या इन्सीडन्सबद्दल.."
"इट्स ओके..." पोरगी स्वतःहून माफी मागतेय म्हटल्यावर माफ करायची संधी कशाला सोडा? नाहीतरी माझ्या बाबतीत असले प्रसंग वारंवार येत नाहीत..
"मी काल जरा घाईत होते.."
'म्हणून चारचौघात माझी इज्जत काढायची..?' ओठांवर आलेले शब्द मी महत्प्रयासाने रोखून धरले.. "हरकत नाही.. होतं असं कधी कधी.. पण नसतीच आफत आणली होती तुम्ही काल.." मी प्रकटपणे बोललो..
"सॉरी वन्स अगेन.. पण तुम्ही मला माफ केलंय ना?"
"हो.." वास्तविक 'चल..केलं तुला माफ' असं स्टाईलमध्ये मला म्हणायचं होतं पण ते अगदीच पुस्तकी वाटलं असतं...तिच्या प्रश्नासारखच!

तिच्याशी बोलताना मला अवघडायला झालं होतं. भूकही लागल्यासारखी वाटत होती.
"मी जरा काहीतरी खाऊन येतो.. भूक लागली आहे"  मी निमित्त काढून रांग सोडून शेजारच्याच हॉटेलात गेलो. डोश्याची ऑर्डर देऊन  सरकणा-या रांगेकडे पाहत स्वस्थ बसून राहिलो. भिरभिरत्या नजरेने तिने इकडे तिकडे पाहिलं. हॉटेल तिथून दिसत होतं आणि तिथे बसलेला मीही! परत एकदा नजरानजर होताच मी ओळखीचं हसू चेह-यावर आणलं. तिने स्माईल देत नजर वळवली आणि काहीतरी विचार करून माझ्याच दिशेने चालत यायला लागली!! माझे धाबे दणाणले.. काल काहीच केलं नव्हतं तर पब्लिकमध्ये तिने माझी बेइज्जती केली होती आज तर तिच्याशी बोललो होतो आणि आता तिला पाहून मी चक्क हसलो होतो! काय च्यायला ब्याद आहे...
'उठून पळून जावं का?' असा विचार करत मी बुड खुर्चीवरून उचललं तर वेटर डोसा आणून ठेवू लागला.. अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीला जर जीव असता तर तिच्या चेह-यावर जे भाव आले असते सेम टू सेम भाव माझ्या चेह-यावर तेव्हा आले असावेत.. कारण माझी ती केविलवाणी अवस्था बघून "सर,वॉशरूम जाना है क्या?" असं वेटर आगाऊपणे विचारू लागला!
जवळ आल्यावर मोहक हास्य चेह-यावर आणत ती म्हणाली.. "मलाही अक्चुअलि कॉफी प्यावीशी वाटली होती मगाशी.. आय वॉज सर्चीन फॉर अ कंपनी.. इफ यु डोन्ट माईंड देन कॅन आय..?"खुर्ची सरकवत तिने विचारलं..
"येस..शुअर..प्लीज"  मी तिला बसण्यासाठी खाणाखुणा केल्या..
"भैया,एक कॉफी लाना..फिल्टर्ड "
मला प्रचंड भूक लागली होती.. ऑफिसमधलं जेवण खास नव्हतं त्यामुळे जास्त जेवलोही नव्हतो. पण डोश्याला हात लावायचा कसा? एकतर ती समोर बसल्यामुळे मला प्रचंड ऑकवर्ड वाटत होतं. आणि काट्याचमच्यांशी खेळत डोसा खायचा माझा खरच मूड नव्हता. पण जाऊ दे.. उगीच इम्प्रेशन डाऊन नको करायला.. मी डाव्या हातात फोर्क घेऊन चमच्याने डोश्याचे ताटलीबाहेर पसरलेले पंख आत मुडपत तिला ऑफर दिली..
"यू कॅन have धिस..इफ यू विश.."
"या.. आयल have ओन्ली वन बाईट.."  कमालय! कालचीच ओळख असूनही जुन्या मित्राशी बोलावं तशी ती बोलत होती..
"मला नाही बुवा हे काट्याचमच्याने खाणं जमत!"म्हणत तिने हातानेच घास मोडला..
"मलाही!!" फोर्क बाजूला ठेवता ठेवता सुटकेचा निःश्वास सोडत मी बोललो.. जरा कम्फर्टेबलही झालो.
मग औपचारिक ओळख झाली. कुठे काम करतो,कुठे राहतो वगैरे जुजबी माहिती विचारून झाली.. माझ्या वाटेवरच कुठेतरी ती राहत होती.
"इफ यु डोन्ट माईंड तर आपण चालतचालत जायचं का?" बाहेर पडताना तिनेच विचारलं.
"हरकत नाही.. सोबत कोणीतरी असेल तर काहीच वाटत नाही..एकट्यानं चालायचं म्हणजे जीवावर येतं बुवा"

त्यानंतर मग दर संध्याकाळी तिला अंधेरी सीप्झ वरून national पार्कपर्यंत यायला तिच्या कंपनीची बस असायची आणि त्या stop पासून तिच्या सोसायटीच्या लेनपर्यंत माझी कंपनी!

ती मूळ मुंबईची नव्हती तरी तिला इथे बरीच वर्ष झाली होती. शिक्षणासाठी म्हणून दहावीनंतर ती या मायानगरीत आली होती. आधी कोणा नातेवाईकांकडे राहायची मग रूममेट्स बरोबर राहायला लागली. जॉब करायला लागूनही काही वर्ष झाली होती. त्यामुळे तिचे 'लुक्स'ही एखाद्या अस्सल मुंबईकर मुलीइतकेच मॉड होते. बोलायला खूप आवडायचं बहुधा तिला. काय काय आवडतं, काय काय करता येतं, छंद, मित्र मैत्रिणी, नातेवाईक माती धोंडे एक ना दोन ! एकदा सुरु झाली कि सांगतच राहायची! एकवरून दुसरा दुस-यावरून तिसरा असे विषय निघायचे..पण निव्वळ गॉसिप्स नव्हे तात्विक,वैचारिक चर्चाही झडायच्या.. पण कसंही करून आर्ग्युमेंट जिंकणं तिला आवडायचं. खरं म्हणजे समोरच्याला निरुत्तर करणं तिला आवडायचं!

स्त्री-पुरुष यांच्यातली नाती हा तिचा खास जिव्हाळ्याचा विषय. विश्वातल्या सर्व महत्वाच्या गोष्टी याच्याशीच रिलेटेड असतात हा तिचा सिद्धांत होता.. रामायण सीतेमुळे, महाभारत द्रौपदीमुळे अगदी पहिलं महायुद्ध फ्रांझ फर्डिनांड च्या गर्लफ्रेंड मुळे कसं घडलं हे सांगून ती तिच्या सिद्धांताची सिद्धता मांडत असे आणि माझ्यासमोर निरुत्तर होण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय राहत नसे!

कधीतरी बोलता बोलताच आमच्या पहिल्या भेटीबद्दल उल्लेख झाला..
"तुला आठवतं ना.. तू बसमध्ये चढत असताना मी घुसले... " झालं.. मी झालेला अपमान विसरण्याचा प्रयत्न करतोय तर ही पुन्हा पुन्हा जखमेवर मीठ चोळतेय..
"मला त्या रांग तोडून मध्ये घुसण्याबद्दल काहीच नाही बोलायचं अगं.. पण 'चान्स शोधत असतोस'  असं काहीतरी बोललीस वाटतं. हे असले आरोप म्हणजे जरा.."
"सॉरी ना अरे.. पण आत्तापर्यंतचे अनुभव इतके आलेत ना मला लोकांच्या नजरांचे..लोकल, बस, हॉटेल कुठेही जा; बायका, मुली सगळ्यांकडे असे वखवखलेल्या नजरेने बघत असतात पुरुष.."
"काहीजण असतीलही पण म्हणून अख्ख्या 'पुरुष' या जमातीला एकाच तागडीत तोलायचं का?"
"का नाही.? ओल्याबरोबर सुकंही जळणारच ना?"
"२५ टक्के तरी चांगले असतीलच ना? त्यांच्यावर का अन्याय?" मी विचारलं
"२५? जास्तच बोलतोयस तू अरे! फारफारतर १० टक्के असतील.."
"एवढे कमी तर मुळीच नसतील.. माझ्या मते वाईट पुरुष वीसेक टक्के असतील.. नाहीतर छेडछाड, विनयभंग, बलात्कार यांच्या 'बातम्या' होणं बंद झालं असतं..." मी म्हटलं.
"म्हणजे?"
"आय मीन, बातम्या अश्याच गोष्टींच्या होतात ना ज्या सरसकटपणे सगळीकडेच होत नाहीत? सामान्य माणूस जगतोय ती बातमी नाही होत किंवा तो वृद्धापकाळाने मेला तरी ती बातमी नाही होत पण एखादा तेविसाव्या वर्षी हार्टफेल ने गेला, किंवा कधीतरी अपघातात गेला तर त्याची बातमी होते कारण ही घटना नेहमी नेहमी घडणारी नाही.. तसंच त्या गोष्टींचही आहे." मी स्पष्टीकरण दिलं.
"मी सांगतेय ती कॅटेगरी वेगळी आहे.. शंभरातले २० पुरुष असतील वाईट असं गृहीत धरू तुझ्या अनुमानाप्रमाणे. मी म्हणतेय ते चांगले १० टक्केही सोडू पण म्हणून बाकीचे ७० टक्के सभ्य असतातच असं नाही..कदाचित त्यांच्यात गट्स नसतात! ते संधीच्या शोधत असतात. तूच बघ ना..मगाशी म्हणालास त्याच 'बातम्या' चवीने वाचता ना तुम्ही लोक? हेडलाईन वाचल्यानंतर पूर्ण बातमी कशासाठी वाचतो आपण? त्याचे डीटेल्स मिळावे म्हणून.. इथे काय डीटेल्स अपेक्षित असतात तुम्हाला?"
मी निरुत्तर झालो.. खरं होतं तिचं म्हणणं. काय डीटेल्स हवे असतात? वर्णनच ना? शी..मला स्वतःचीच घृणा आली.पण माघार घ्याची नाही असं मी ठरवलं होतं. आता मी नुसता 'मी'च नव्हतो तर अख्ख्या पुरुषवर्गाचा प्रतिनिधी होतो!
"हं.. हेही खरंच म्हणा..मी कधी हा विचारच नव्हता केला. आपल्या इथे स्त्री-पुरुष,मुलगा-मुलगी या संबंधांना समाजाने इतकं टोकाचं निषिद्ध बनवून ठेवलंय की केवळ कुतूहल शमवायाच्या इच्छेपोटीच हे प्रकार होत असावेत अजूनही.. पण मुलीही यात मागे नसतात. त्यांनीसुद्धा कपड्यांचं, राहणीमानाचं, तारतम्य बाळगलं पाहिजे कि नको?"
"म्हणजे ? मुलींनी काय आपली आवड मारायची? हिरोईन्स घालतात तेव्हा चालतं तुम्हाला.पण तीच fashion आम्ही केली कि बोचणा-या नजरांचा सामना करावा लागतो"
"हिरोईन्सना तरी कोण चांगल्या नजरेने बघतं? फक्त पडद्यावर असतात म्हणून त्यांना त्या नजरा नाही टोचत! पण मला सांग.. पुरुषांचे कपडे कधी पाहिलेस का तू? सेमी ट्रान्सपरन्ट, गळा, पाठ दाखवणारे कपडे का नसतात त्यांचे? त्यांच्या शरीराची वळणं का दिसत नाहीत शर्ट मधून ? पिक्चरमध्ये हिरो देखील उघडे फिरतात म्हणून वास्तवात सगळे तसं करत नाहीत..मुलींना सुद्धा लक्ष वेधून घ्यायची खुमखुमी असेलच ना? आता हेच बघ,मुलींचा सलवार कुडत्यासारखा सुसभ्य पंजाबी पोशाख पण त्यातला सलवार, आता घोळ असणारा चुडीदार किंवा पटियाला  न राहता पायाचा पूर्ण आकार दाखवतो..ओढणी राहायला पाहिजे तिथे न राहता गळ्याबरोबर जाते. कमीजचे साईडला असणारे कट्स कमरेपर्यंत पोहोचलेत, या तुझ्या  top वरच बघ, या असल्या लक्षवेधक कोट्स असतात.  मग पुरुष चळले तर पूर्ण दोष त्यांनाच नाही ना देता येणार?"
"हे बघ.. आकर्षक दिसणं आम्हा मुलींना आवडतं कारण तो त्यांचा अंगभूत गुण आहे आणि मुलांना तसं वाटत नाही त्याला कोण काय करणार?"
तिच्या या विधानासरशी मी शरणागती पत्करली आणि तिच्याबरोबरच्या आधीच्या इतर असंख्य आर्ग्युमेंट्सप्रमाणे हाही वादविवाद मी हरलो! पण पुरुषवर्गाबद्दल असणारा तिचा हेटाळणीचा सूर कशाने आला असावा याचं मात्र मी उत्तर शोधत राहिलो..

तिच्याशी बोलणं म्हणजे नॉलेज शेअरिंगचं सेशन असायचं. वेगवेगळ्या संवेदनशील गोष्टी,भावभावनांचे बंध,नात्यांचे कंगोरे हळुवारपणे उलगडत जायचे. पण कधीतरी फारच कठीण काहीतरी बोलायची, जड जड शब्द वापरायची! एवढे की समजून घेताना माझ्या नाकी नाऊ येत. त्यात पुन्हा मधूनच "तुला काय वाटतं?' 'बरोबर की नाही?' 'तू तिथे असतास तर काय केलं असतंस' असले प्रश्न विचारून ती माझं मत आजमावत असे, त्यामुळे तिचं बोलणं पहिल्यापासून काळजीपूर्वक ऐकावं लागे! रूममेट्स,मालकीणबाई ज्यांना ती 'मावशी' म्हणायची आणि तिचे आई-बाबा हे तिच्यासाठी विश्व होतं.वीकडेजमधल्या २० मिनिटांच्या वॉकमध्ये होणा-या बोलण्यात त्यांच्या गमतीजमती,त्यांच्यातली भांडणं, रुसवेफुगवे,  काढलेल्या समजूती याचा उल्लेख नसेल तर मलाच चुकल्याचुकल्यासारखं  वाटायचं! आणि वीकेंडला? मुळीच काही वाटायचं नाही कारण डेली सोप मधला एखादा भाग चुकला तर आपल्याला कुठे फारसा फरक पडतो? नाही का?

एकदा चालता चालता nansy कॉलनी आली तरी ती काहीच बोलत नव्हती. माझ्या बोलण्यालाही react होत नव्हती.
"काय गं, आज अचानक एवढी अबोल का झालीस?"
"अं.. काय?" तंद्री भंग पावल्यासारखी ती बोलली..
"..बरं वाटत नाहीये का?" मी विचारलं.
"आई-बाबा लग्न करायचं म्हणताहेत.."
"परत? आणि या वयात?" मी पीजे टाकला. तेवढाच तिचा मूड ठीक होईल असं मला वाटलं.
"गप रे.. माझं लग्न म्हणतेय.."
"मग मूड ऑफ करून घेण्यासारख काय आहे त्याच्यात? चांगला जीवनसाथी मिळेल ना तुला..कि तू ऑलरेडी कोणी शोधला आहेस?" मी विचारलं.
"..."
"काय गं.. काय झालं?"
"आय had बीन इन्टू द रिलेशनशिप फॉर समटाईम.." ती म्हणाली.माझ्यासाठी नवीन गोष्ट होती ती. एवढं काय काय सांगत असायची पण कधी बोललीही नव्हती ती या विषयाबद्दल..
"मग?"
"वी ब्रोक अप टू इअर्स अगो.."
"हम्म.." मी सुस्कारा सोडून तिला सहानुभूती द्यायचा प्रयत्न केला. "प्रेमात कधी कधी होतं असं..आणि दोन वर्षांपूर्वी ना? मग आता अचानक एवढं काय वाईट वाटून घेतेयस त्याचं? " मी विचारलं.
"काय असतं रे प्रेम म्हणजे? खरंतर तसं काही असतं का याच विचारात आहे मी.. शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम वाटण्याच्या वयात आमचं नातं सुरु झालं." ती सांगायला लागली.
"त्रास होणार नसेल तर दुरावलात कशामुळे ते सांगशील?" मी विचारलं..
"तुला माहितीये का? मुली मुलांपेक्षा दोन वर्षांनी जास्त मच्युअर असतात.." ती तंद्रीत असल्यासारखं बोलायला लागली..
"काय?" नवीनच माहिती कळत होती मला.
"म्हणजे सपोज मुलगा आणि मुलगी१८ वर्षाचे आहेत तर मुलगा २० वर्षाचा असल्यावर जो विचार करू शकतो तोच विचार मुलगी १८व्या वर्षीच करत असते. तिला तेव्हाच समाजाचं,जनरीतींच भान असतं.."
"त्याचा इथे काय संबंध?" ती घालत असलेलं कोडं सोडवायचं की तिचं बोलणं ऐकायचं या दुविधेत मी अडकलो.
"अरे त्याच्यामुळेच तर नैतिकता टिकून राहते स्त्री-पुरुषांच्या नात्यांमधली.." ती सांगत होती.
"म्हणजे?" मी आणखीनच गोंधळात पडलो!
"म्हणजे कुठल्या नात्यात कुठपर्यंत जायचं त्याचं लिमिट मुलींना कळतं..निदान मला तरी कळलं होतं. म्हणूनच मी लांब जायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी तेव्हा प्रेम म्हणजे भावना नव्हत्या त्याला वाटायचं प्रेम म्हणजे नुसतं..." ती दुसरीकडे बघत चालत राहिली. बहुतेक तिच्या डोळ्यात पाणी आलं असावं. त्याक्षणी मन मागे गेलं आणि मला आमची पहिली अपघाती भेट पुन्हा आठवली. त्या सगळ्या गोष्टींचा, तिच्या reactions चा, आमच्या डिस्कशन्सचा उलगडा झाला..तिने समस्त पुरुषवर्गाबद्दलचा तिरस्कार का बाळगला होता याचं उत्तर मला अचानक गवसलं!
"शारीरिक गरजा कोणाला नसतात? अरे..मुलींनासुद्धा त्याच फीलींग्ज असतात किंबहुना मुलांपेक्षा जास्तच.. पण त्यांना सेल्फ कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने माहित असतो.." ती सावरून म्हणाली
"असेलही कदाचित. मी एक मुलगा आहे. त्यामुळे तुझ्या भावना समजून घेणं कठीण जातंय मला.
 काही क्षण शांततेत गेले..
"असो.. आता त्याच्याशी आता काही contact?" मी विचारलं.
"त्याचा फोन येतो. मी म्हणतेय त्या चुका उमगल्यात म्हणतो. सगळ्याची जाणीव झालीय त्याला असं वाटतंय एकंदरीत."
"अगं मग बरंच आहे ना? तुला लग्न पण करायचं आहे आणि यू have युअर man ऑल्सो.."
"हम्म.. पण अरे घरच्यांनीसुद्धा मुलगा बघितला आहे."
"हे बघ.. अ नोन डेव्हिल इज थाउजंड टाईम्स बेटर than द अननोन रास्कल! असा मेसेज आला होता मला.." मी म्हटलं.. ती खळखळून हसली.
"तेही खरंच.. शेवटी लग्न म्हणजे कॉम्प्रोमाईज.. एक तडजोड. नाही का?"तिने विचारलं.
"पण ते अरेंज्ड असेल तर! राईट?? " मी हसत युक्तिवाद केला. ती पहिल्यांदाच निरुत्तर झाली.

मी मुंबई सोडली त्याला काही महिने लोटले. कालांतराने तिचं लग्नही झालं.त्याच्याशीच! दहिसरला त्यांनी संसार थाटला.कामानिमित्त असाच मुंबईला गेलो तेव्हा मित्राबरोबर दहिसरच्या ठाकूर मॉल मध्ये जायचा योग आला. आणि काय योगायोग पहा. या बाईसाहेब आणि त्यांचा नवरा शॉपिंग साठी तिथे आले होते. शॉपिंग आटपली होती आणि ते बहुधा निघायच्या बेतात होते. आमचे मित्रवर्य खरेदीत गुंग होते. मी तिला हाक मारली. तिला आश्चर्याचा धक्का बसला. प्राथमिक चौकशी झाली. तिच्या नव-याला माझी आणि मला आपल्या नव-याशी ओळख करून दिल्यानंतर आम्ही जरावेळ गप्पाटप्पा केल्या. निरोप घेतल्यानंतर तिचा नवरा गाडी काढायला गेला. गेटजवळ आम्ही बोलत थांबलो.
"घरी येऊन जा ना.. आमचा संसार बघ.." ती म्हणाली.
"येईन. वेळ काढून नक्की येईन. बरं... रमलीस ना संसारात?" मी विचारलं. ती हसली आणि म्हणाली.."तू म्हणाला होतास ना की लग्न अरेंज्ड असेल तरच ते कॉम्प्रोमाईज असतं? तर ऐक... कुठलंही लग्न म्हणजे तडजोडच असते.. अरेंज्ड असेल तर ती तडजोड आपण लग्नानंतर स्वीकारतो आणि प्रेमविवाह असेल तर ती आपण आधीच स्वीकारलेली असते! राईट??"
मला पुन्हा एकदा निरुत्तर करून जाणा-या तिच्या पाठमो-या आकृतीकडे मी पाहतच राहिलो.

२२ टिप्पण्या:

  1. hey hi!!!the post is amazing,connecting,n very simple mhunje ase vatat hote ki aaplya aas=pass ch ghadat ahe...good..i wonder y u dnt want to publish it on fb so that every1 cld read it...its a good story line..i hope its not an imaginary 1:-p..baki mala avdali story all the arguments,discussions..everything is flawless..
    gdtc dear.

    उत्तर द्याहटवा
  2. kya fekta hai boss ;-) Hanuman tekdi jane ke liye tum National Park se bus pakadte ho vaha aisa kaunsa hotel hai jaha baithke tum khana khate ho aur queue pe bhi 'nazar' rakhte ho? mumbaikars bus me chadte samay queue follow karte hai OMG are aadhe log to chalti bus bahut pehele hi pakadte hai n last doosri mulaqat me hi vo ladki tumhare sath hotel me aai n even taken a bite of ur masala dosa wah wah sahi story jamai hai btw wher do u stay in Ashokvan?

    उत्तर द्याहटवा
  3. sahi re mitra.. aata jara serious pan lihayla lagla aahes tu..!!! :) :) :) majja aahe.!! :D

    उत्तर द्याहटवा
  4. अखिलेश...रोहन म्हणतो त्याप्रमाणे आता serious पण चांगला लिहायला लागला आहेस...२-३ statements खूप "गेहरी" आहेत...."बातम्या अश्याच गोष्टींच्या होतात ना ज्या सरसकटपणे सगळीकडेच होत नाहीत"....किंवा मग... "अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीला जर जीव असता तर तिच्या चेह-यावर जे भाव आले असते"....जमलाय रे एकदम ...."नुसता च बोल-बच्चन " च्या बऱ्याच स्टेप्स पुढे गेला आहेस...शाब्बास !!!

    उत्तर द्याहटवा
  5. @सर्व वाचकवर्ग: लिखाण आवडलं हे पाहून बरं वाटलं. प्रतिसादकर्त्यांना वैयक्तिकरित्या पोचपावती देण्याचा हा प्रयत्न.
    @सचिन उथळे-पाटील : धन्यवाद!
    @sudha: तुला आधीच सांगितल्याप्रमाणे सदर व्यक्तिचित्रण हे वेगवेगळ्या स्त्री व्यक्तिरेखांचं संक्षिप्त कोलाज आहे. मैत्रिणींशी,मित्रांशी झालेल्या संवादातून ही व्यक्तिरेखा चितारली आहे. woman perspective त्या संवादातूनच समजला आहे! तुझ्या भरभरून केलेल्या कौतुकाबद्दल ऋणी आहे!
    @THE PROPHET :आभारी आहे!
    @Anonymous1 : सर्वप्रथम हे लिखाण म्हणजे अनुभवकथन नव्हे. त्यामुळे ज्या भौतिक बाबींचा विचार आपण प्रतिक्रियेत केला आहे तो मी केला नाही. आपणास ही सत्यकथा वाटली हे माझे यश आहे असे मी मानतो! आपण हिंदी भाषिक असूनही लेख वाचलात आणि प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार!
    @Anup : आभारी आहे मित्रा
    @rohan :थांकू!! (धमकी: माझं लिखाण तुला नेहमीच आवडतं असं यापुढे गृहीत धरलं जाईल!
    @Raghu :शाब्बासकीबद्दल धन्स!! ते जरा "क्रमशः"च बघा जमतंय का!!
    @Santosh :प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
    @Sanjay : कौतुकाबद्दल धन्यवाद.
    @अभिलाष: घटना,पात्रं आणि प्रसंग अंशतः काल्पनिक. आपणास लिखाण आवडलं हे पाहून आनंद झाला.
    @Anonymous3: आभारी आहे. पण वाचकहो,प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते 'Anonymous' असे येईल. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  6. नेहमी तुलाच कश्यारे अश्या ललना भेटतात (काल्पनिक विश्वात का होईना). आम्हाला का बुवा भेटत-दिसत नाहीत. तुझ्या पुढच्या - हिंजेवाडीतल्या ललनेची वाट बघत आहे. लगे रहो...

    विनायक

    उत्तर द्याहटवा
  7. छानच!

    शेवटी सगळी नाती तडजोडीवरच टिकून राहतात. काही तडजोडी आपण आनंदाने करतो म्हणून सुखी आहोत असे म्हणतो ( रादर, तसे म्हणून स्वत:चे समाधान करत राहतो ), काही नाईलाजाने-दु:खाने, परिस्थितीवश होऊन करतो.

    उत्तर द्याहटवा
  8. @vinayak: काही संदर्भ विशिष्ट व्यक्तींना लागू नयेत म्हणून काही ठिकाणं जाणीवपूर्वक बदलावी लागतात! अर्थात माझ्या लिखाणातली ललना प्रत्यक्षात तिथलीच असेल याची शाश्वती मी तरी देऊ शकत नाही! :)
    @भानस: एका ओळीत तात्पर्य/कथासार सांगितलंस! लिखाण वाचल्याबद्दल आणि कौतुकाबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  9. ह्म्म्म्म्म, तडजोड ही खूपवेळा करावीच लागते पण तडजोड करताना आपली घुसमट न होऊ देण योग्य. मस्त झालीय पोस्ट. आवडली...

    उत्तर द्याहटवा
  10. @सुहास : अतिशय योग्य वक्तव्य! लिखाण आवडलं हे पाहून बरं वाटलं..

    उत्तर द्याहटवा
  11. HE SARVA TU LIHITOS KA KUTHUN TARI COPY ANI PASTE KARTOS..
    PRATAP

    उत्तर द्याहटवा
  12. @PRATAP: आपण 'ब्लॉग' या क्षेत्रात फारच नवीन आहात का?
    कारण जर हा प्रश्न, चेष्टा करायच्या हेतूने विचारला असेल तर उत्तर देण्यास मी बांधील नाही.
    'ज्ञानार्जन' हा हेतू असेल तर 'हे सर्व मीच लिहितो' आणि कॉपी पेस्ट करायचे असते तर स्वतःचा ब्लॉग लिहायचे कष्टच घेतले नसते.. लिंक शेअर केली असती. आपणही तसेच करावे.. वाचल्याबद्दल धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  13. are mitra ragavlas kay.. are tu MES madhe astana tujhya pahun kunala hi vatnar nahi ki tu evadha chan lihit asashil..
    bare aso...tujhe articles tujhya pekshya farch mature ahet.. Good...

    by d way halli kuthe ahes?

    Pratap

    उत्तर द्याहटवा
  14. आयला.. प्रताप तू होय?? मला वाटलं कोणतरी टीपी करतोय!! बाय द वे, शिवजयंतीच्या शुभेच्छा!

    आणि प्रतापराव! मुलगा झाला त्याबद्दल अभिनंदन!

    तसंच माझ्या लेखनाचं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. शक्य झाल्यास सहस्रबुद्ध्यांना पण शेअर करा की लिंक.. आणि चेष्टा मस्करी चालू द्या अशीच.. ओळखीच्या लोकांनी केलेली चालते!

    एकाच प्रतिक्रियेत शुभेच्छा, अभिनंदन आणि धन्यवाद सगळंच झालं!
    मी आणि रम्या एकाच कंपनीत आहोत..पण बसतो वेगवेगळ्या बिल्डिंग्जमध्ये.

    उत्तर द्याहटवा
  15. shubhechya baddal dhanyavad....
    baki sarva likhana apratim ahet... tujhya hatun ashich sahitya nirmiti hovo...
    baki to ramya ajun mumbai pune mumbai kartoy ka tithun...

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!