मला कळायचंच नाही कि या निबंधमाला लिहिणाऱ्या 'नवनीत'ला हा ऋतू आवडूच कसा शकतो! तळकोकणातला पाऊस म्हणजे पुण्यामुंबईतला 'आल्हाददायक' या शब्दात वर्णन करता येणाऱ्या पावसाच्या सरीचा शिडकावा नसायचा. चुकूनमाकून त्यानं ते कौतुक करायचं जरी ठरवलं तरी पहिला अर्धा दिवसच. ढग दाटून आले कि प्रचंड गरम व्हायचं. तेही घुसमटवून टाकणारं. झाडाचं पान हलेल तर शप्पथ. मग कोणतरी 'येतलोसा वाटता' ची सगळयांनाच माहित असलेली भविष्यवाणी करायचं आणि त्यानंतर सुरु व्हायची ती त्याची झोडपणी. अगदी मोठा आवाज करत आणि मोठमोठ्या थेंबांची. पुस्तकातल्या निबंधासारखी तेव्हा जर चातक पक्षाने 'पेरते व्हा' म्हणत उडायची नाटकं केली तर त्या थेंबांनी तो पक्षी जागच्या जागी बेशुद्ध पडावा अशी. मग तो सतत धो धो कोसळायचा. जवळजवळ रोज. पहिल्या चेंडूवर बाउंड्री मारून सुरुवात करणाऱ्या बॅट्समन सारखे, पहिल्या आठवड्यात पुढच्या चार महिन्यांचे इरादे स्पष्ट करायचा.
विहिरी काही आधी अगदीच तळ दाखवत नसायच्या पण पाऊस सुरु झाल्यावर तिसरया दिवशी त्या तुडुंब भरून जायच्या. चेष्टा नाही पण रहाट आणि दोरी वापरून काढावं लागणारं पाणी, कठड्यावर गुडघे टेकून काढता यावं इतक्या काठोकाठ! मग सुरु व्हायचे बेडकांचे किरटे कर्कश्श आवाज आणि जागॊजागी वाहणारे पाण्याचे प्रवाह. कधी पाऊस थांबला तर हे प्रवाह थांबतील तर तसं नाही, ते आपले चालूच. मातीचं लाल गढूळ पाणी घेऊन वाहताहेत आपले. जमिनीला कुठून कुठून नवे उमाळे फुटून तिथूनही झरे चालू व्हायचे. आणि हो, पाऊस थांबायचा-बिंबायचा नाहीच.. विश्रांती घ्यायचा. मग अव्याहतपणे ओतत असायचा.
बरं त्या वेळात घरात बसून त्याचं हे बरसणं एन्जॉय करावं तर ते ही भाग्य नाही! शाळा सुरु होण्याचा हंगाम हाच! शाळेत जायचा प्रसंग मोठा बाका असायचा, 'पाऊस थांबेल मग जाऊ' वगैरे विधानं हे तर स्वप्नरंजन समजलं जायचं. कित्येकदा थेंब एवढ्या जोरात यायचे कि चेहऱ्याला, हाताला ते टोचतात कि काय असं वाटायचं. छत्री, रेनकोट इत्यादी उपकरणं केवळ मनाचं समाधान म्हणून जवळ बाळगायचो. ढगातून कोसळणारं पाणीच एवढं असायचं कि एखादी गाडी बाजूने गेली तर अंगावर उडणारं पाणी, हे खड्ड्यातलं उडालंय, रस्त्यावरचं उडालेलं कि प्रत्यक्ष गाडीवरचं उडालंय तेही कळायला मार्ग नसायचा. छत्री असेल तेव्हा केवळ डोकं थोडंफार भिजायचं शिल्लक राहायचं. पावसात वाऱ्याने उलटी होणारी छत्री उलट दिशेला करून हात न लावता परत सुलटी करणं हे एक स्किल होतं. एकच छत्री न हरवता, न मोडता दुसऱ्या वर्षीपर्यंत टिकलीच तर त्या छत्रीच्या कापडातून देखील पाणी झिरपायला लागायचं. शाळेतले मित्र तर एका छत्रीत एकजण ही चैन समजायचे. त्यामुळे त्यांच्याबरोबर मधल्या सुट्टीत बाहेर पडलो कि एका बाजूचा खांदा आणि बाह्या भिजायचे. बाकी कितीही पाऊस पडत असला तरी मधल्या सुट्टीत गुपचुप वर्गात बसणे किंवा शाळेच्या इमारतीच्या आत थांबणे हा 'फाऊल' का धरला जायचा ते अजूनही न सुटलेलं कोडं आहे.
रेनकोट हा तर वेगळाच प्रकार होता. मेणकापडासारख्या बनलेल्या कापडाने अतिशय विद्रुप दिसतील अशा प्रकारे वन पीस रेनकोट्स बनत असत. रेनकोट घालून त्या पावसातून गेलं कि त्याची बटणं लावतो तिथून पूर्ण पुढच्या बाजूला, टोपीवरून वाट काढत मानेवरून खाली असं पावसाचं पाणी रेनकोटच्या आत घुसायचं आणि सायकल वरून जाताना तर प्रत्येक पॅडल बरोबर रेनकोट गुडघ्यापर्यंत सरकून तिथेच अडकून राहत असल्याने पायही भिजायचे. जिथं पावसाचं पाणी पोहोचू शकत नसे तो शरीराचा इतर भाग घामाने चिंब व्हायचा. नित्यनेमाने. रेनकोट उतरला कि चालताना पायातले स्लीपर्स पॅन्टच्या मागच्या बाजूला आपलं नक्षीकाम सुरु करायचे. रेनकोट्स ची बटणं आणि अडकवायची काज हि पण रेनकोटमध्येच कोरून काढले असावेत असे असायचे. एखादं बटन तुटलं किंवा रेनकोट जर कुठे फाटला तर शिवून परत दुरुस्त करायची पण काही सोय नव्हती. अशा प्रकारे पावसाळ्यातलं शाळा-शिक्षण हे चातुर्मासातलं एखादं कडक व्रत घेतल्यासारखं ओल्या कपड्यानिशी व्हायचं.
बरं, हे कपडे वेळेत सुकतील तर शप्पथ. कपडे सुकायला चार चार दिवस लागायचे आणि घरातली इतर जागा पण व्यापली जायची. पण पावसासाठी म्हणून लगेच मोठं घर थोडी ना बांधतो आपण! बांधता येतात त्या दोऱ्या. एक एक करत वाढत जात या दोऱ्यांचं जाळं विणलं जायचं, जिथून शक्य आहे तिथून आणि शक्य आहे तिथपर्यंत! खिडकीचे गज असोत , ग्रील असोत वा कडी! आणि घालायला एवढे कपडे आणणार कुठून ? मागच्यावर्षीचे लहान झालेले कपडे केवळ पावसाळ्यातल्या अशा वेळात वापरता येतील या दूरदृष्टीने बोहारणीला दिलेले नसत, तेच अशा वेळी बाहेर येत.
पाऊस चालू असताना गावातल्या कौलारू घरात, कौलांमधून घरात पाणी गळायची शक्यता गृहीतच धरलेली असायची. कौलं फुटकी असायची असं नाही पण दोन चांगल्या कौलांच्या फटीतून कधीतरी पाणी वाट काढायचं आणि मग तिथून झिरपून ते थेम्ब थेंब गळायला लागायचं. बऱ्याचश्या घरांमध्ये छतापर्यंत पोहोचणारे बांबू असत. त्या बांबूने नेमकी ती कौल वर ढकलून पुन्हा अड्जस्ट व्हायला दिली कि ते बंद होत असे. एखाद्यावेळी कौल फुटलेलं असलं तर ते पावसाळ्यातच लक्षात यायचं. मग बादली किंवा असं काहीतरी ठेऊन पर्जन्यमापन करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच राहायचा नाही. फक्त कौलारू घरांची छतं गळत तर तसं नव्हे , जिथे कुठे छत असेल मग ते कसलंही छत असेल तरी ते गळायला लावण्याची ताकद होती त्या पावसात ! मग ते घराचं स्लॅब चं छत असो वा बसचं! पावसातला प्रवास म्हणजे गळक्या छतांच्या गाड्या, गळक्या खिडक्या आणि ओले कपडे, ओल्या छत्र्या घेऊन गाडीत चढणारे सहप्रवासी! इतर वेळी खिडकीवरून एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्यांची मनं अशा प्रवासात खिडकीची मिळालेली जागा इतरांना देण्याइतकी मोठी होत!
पावसाळ्याचे चार महिने सूर्याचं दर्शन केवळ आपलं अस्तित्व दाखवण्यापुरतंच असायचं. आपल्या किरणांनी अवघी सृष्टी उजळून टाकू सारख्या उदात्त साहित्यिक विचारांनी किंवा उन्हाने सगळं वाळवून टाकूया अशा सारख्या प्रॅक्टिकल विचाराने तो कधीच झपाटलेला नसायचा. म्हणजे आपल्याला लोक विसरून बिसरून जातील म्हणून हजेरी लावायला यायचा. बऱ्याचदा दाट काळोखी ढगातून चंद्रासारखा पण दिसायचा बिचारा.. दया यायची.
पावसाळ्यातल्या सनलाईट इतकी अजून एक अनियमित गोष्ट म्हणजे घरातली लाईट! वादळाने वायर तुटणे, झाड कोसळणे, कुठेतरी शॉर्ट सर्किट होणे, किंवा यापैकी काहीतरी होईल या 'एमेसीबी' ला वाटणाऱ्या निव्वळ भितीपोटी हमखास लाईट जात असे! पाऊस जss रासा कमी झाला तर ते दुरुस्ती करत असत पण त्यांनाही तो चान्स लवकर मिळत असेच असं नाही. बरं, आपल्याला जरासा कमी वाटणारा पाऊस त्यांना तसा वाटत असेलच असं पण नाही त्यामुळे रात्रीची लाईटची पर्यायी व्यवस्था करावीच लागत असे. रिचार्जेबल दिवे, इन्व्हर्टर्स हे प्रकार दूर होते तेव्हा पण कसलेही दिवे असले तर वेगवेगळे कीटक उच्छाद मांडायचे. लाइट गेल्यामुळे फॅन नसला तर खेळत्या हवेसाठी घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या लागायच्या आणि मग या कीटकांना फ्री हॅन्ड मिळत असे. लहानपणीच्या गाढ झोपेत ते तसे त्रासदायक वाटत नसत पण काही कीटक झोपेत अंगाखाली येऊन चिरडले जात असत आणि जर ते उघड्या त्वचेला लागले तर होणारे परिणाम जीवघेणे नसले तरी दिसायला वाईट असत आणि चेष्टेचा विषय ठरत.. दरवर्षी हे कीटक कुठूनतरी पावसाळ्यातच येत आणि घरातल्या दिव्यांवर त्यांची आणि त्यांच्या शेअरहोल्डर्सची ऍन्युअल जनरल मिटिंग भरवत असत. मग ती ट्यूबलाईट असो, बल्ब असो वा मेणबत्ती!
तळकोकणातली सृष्टी हि पहिल्यापासून हिरवी असल्यामुळे, तिने ल्यायलेल्या हिरव्या शालूचं कोणाला काय कौतुक ? आमच्याकडच्या पावसात भिजलेल्या सृष्टीला न्हाऊन आलेल्या स्त्रीचं रूपक योजण्यापेक्षा आंबोलीच्या धबधब्याखाली बनियानवर भिजणाऱ्या पर्यटकाची उपमा जास्त चपखल बसली असती. नुसत्या धो धो कोसळणाऱ्या प्रवाहात सावरता ना येणारे कपडे आणि अवयव कसेबसे सावरत हसरी पोज देण्याचा प्रयत्न करणारा!
पश्चिम घाटाच्या वरती म्हणजे 'घाटावर'चा पावसाळा बघितल्यावर आमचा पाऊस रौद्र होता तो जाणवलं. तो पावसाळादेखील आवडला नाही. आमच्याकडे पाऊस, ढग रीलोड करण्यासाठी काही काळ विश्रांती घेत असे, म्हणजे त्यावेळीपण पाऊस पडतच असे पण तो छत्री रेनकोटाने थोपवता येत असे. त्याला 'खय हा पाऊस?' म्हणजे "कुठंय पाऊस ?" म्हणून तुच्छतेने लेखलं जात असे. अर्थात हे टोमणे ऐकून घ्यायचा पावसाचा मूड जास्त वेळ नसेच त्यामुळे थोड्याच वेळात तो पुन्हा त्याच्या लाईनवर येत असे. पण कमाल म्हणजे याच 'खय हा पाऊस?' टाईपच्या पावसाला पुण्यात चक्क 'मुसळधार पाऊस' सारख्या शब्दांनी पेपरातून गौरवलं जात असे!
कोकणात पाऊसच एवढा असायचा कि डबकी, तळी भरून वाहायची. मात्र सगळीकडून वाहतं पाणी असल्याने चिखल व्हायचा नाही. पुण्यात मात्र त्या गाण्यातल्यासारखी सर धावून येत असे! आणि मग ठिकठिकाणी चिखल करून टाकत असे. छत्री घेऊन चालता चालता पाऊस नसला तरी बाजूने जाणाऱ्या गाड्या भिजवण्याची शक्यता जास्त. तेही पावसाच्या पाण्यापेक्षा काळ्या चिखलाने. पुण्यात एक बरं होतं, 'थोड्या वेळात थांबेल पाऊस' हे कोकणात अशक्य कोटीतलं वाटणारं विधान खरोखर सत्य ठरतं.
बस प्रवासाचंपण तेच. पावसाळा सुरु झाला कि आधीच कोलमडलेलं बसचं वेळापत्रकपण पार झोपतं. ब्रेकडाऊन झालेल्या बसेसमुळे उरलेल्या बसेस तळकोकणात पावसाळ्यात उगवणाऱ्या सूर्याची आठवण करून द्यायच्या. उरल्यासुरल्या बसेसमधली गर्दीपण एवढी वाढलेली असायची कि विचारता सोय नाही. बाकी सहप्रवासी आणि त्यांचं ओलेपण सगळीकडे सारखंच! बाईकवरून जाताना पाऊस येणारच नाही म्हणून तयारी न करता निघावं आणि पावसानं अर्ध्या रस्त्यात गाठावं, आपण पोचेपर्यंत पाऊस येणार नाही म्हणून पूर्ण रेनकोट न घालता निघावं तर थांबता येणार नाही अशा ठिकाणी गाठून पावसाच्या सरीनं भर रस्त्यात उतरून तयारी करायची वेळ आणावी आणि एकदा का रस्त्यात रेनकोटची पॅन्ट चढवण्याचे सोपस्कार पार पाडले कि उरलेल्या प्रवासात सूर्याने आपण ते बरोबर घातलेत ना याचं निरीक्षण करावं, ढगाळ वातावरणामुळे 'आत्ता कधीही पडेल' असा विचार करून रेनकोट घालून निघावं तर त्याने तोंड दाखवू नये आणि आपण मात्र घामानं भिजावं असे प्रसंग वरचेवर येत राहिले. कारने गेलं तर कुठेही पोचायला लागणारा वेळ नेहमीपेक्षा दुप्पट ते इन्फायनाईट या रेंजमधला लागायला लागला. ट्राफिक मध्ये अडकून चिडचिड होत राहिली.
आता गेली काही वर्ष १२ महिने रिपरिप करणारा पाऊस असल्यामुळे थोडं चित्र वेगळं झाल्यासारखं वाटतं पण वाढलेले खड्डे, सगळीकडे असणारी ओल, चिकचिक, गाड्यांच्या ब्रेकडाउन्स मुळे, बायकर्स च्या घसरण्याचा शक्यतेमुळे, स्लो मूव्ह होणारे ट्राफिक , मग होणारं जाम , डेंग्यू मलेरिया विरोधी जनजागृती, सर्दी खोकल्यासारख्या निरनिराळ्या व्हायरल आजारांना निमंत्रणे, घरातल्या जागा व्यापून टाकणारे ओले कपडे, त्यांचा कुंद दर्प, न वापरता येणारी बाल्कनी या सगळ्या गोष्टींमुळे पावसाळा ऋतू म्हणून आवडावा अशी वेळच आली नाही. अगदीच नाही म्हणायला पावसाळ्यातले ट्रेक करायला, किल्ले फिरायला, भजी आणि चहाचा प्लॅन करायला आणि बाल्कनीत भिजावं लागणार नाही अशा बेतानं उभं राहून चहाचे घुटके घ्यायला मला आवडतो पाऊस.. पण नेमक्या तेवढ्यासाठीच आवडता ऋतू पावसाळा असायला हवं असं थोडीच आहे ?
छान अखिलेश
उत्तर द्याहटवाधन्यवाद!!
हटवानेहमीप्रमाणे फारच सुंदर... हा लेख वाचता मन एक 20 वर्षापुर्वी round मारून आला... मग आठवलं ते माझा कोकण सोडल्यावरचा पहिला प्रवास... कोकणात असताना शाळेत छत्री घेऊन जायची एवढी सवय लागलेली की कोल्हपूरला college ला रोज छत्री घेऊन जाणारा मी एकमेव प्राणी असायचो...
उत्तर द्याहटवाधन्यवाद!!
हटवाखूपच छान.. कोकणातील लोकांना सगळं डोळ्यासमोरून जाईल एवढे बारकावे आहेत ..
उत्तर द्याहटवाधन्यवाद!!
हटवाFar chan aahe tuza lekh. Junya aathvani ujalalya.
उत्तर द्याहटवाKhas awadlel te kokanatla 'khay ha paus' mhanje punyacha 'musaldhar paus'
Mi kokanatun baher gele tevha samajal ki paus suru zala mhanje chatri ughada as bilkul nahi. Tithe paus pahaycha andaj ghyaycha na mag chatri la hath lawaycha. Aplya kokanant pavasacha pahila themb padaychya aadhi jari chatri ughadaychi parakashtha keli tari paus ardha bhijavun mokla !
धन्यवाद!!
हटवाएकदम समर्पक वर्णन केले आहे ..सिंधुदुर्गातील पावसाळ्याचे..
उत्तर द्याहटवाधन्यवाद!!
हटवाखूप छान लिहिलं आहेस ।।
उत्तर द्याहटवाधन्यवाद!!
हटवा