शुक्रवार, ३० मे, २००८

वाढदिवस...







वाढदिवस म्हणजे प्रत्येकाचा आवडीचा दिवस... नाही का ? तसं या दिवसाचं महत्व प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं .... तरीही मला असं वाटतं की माझा प्रत्येक वाढदिवस हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस असतो... आता असं का वाटतं? हा एक अनुत्तरित ' का' आहे !!

पूर्वी घरी असायचो म्हणजे अर्थात शाळेत असताना... तेव्हा पहाटे पहाटे (माझी पहाट बरं का!) सहा वाजता आई उठवायची अन् शुभेच्छा द्यायची तेव्हा लक्षात यायचं की आज आपला वाढदिवस! मग घरातल्यांचेच म्हणजे मावश्या , मामा, ताई वगैरेंचे फ़ोन यायचे. शाळेत मात्र chocolates वाटल्यानंतर किंबहुना रंगीत कपडे घालून गेल्यावर मुलांना कळत असे की ' आज याचा वाढदिवस'!

मग मात्र प्रत्येकजजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन उरलेल्या chocolates पैकी extra एखादं आपल्याला मिळावं यासाठी मस्का मारायचा. संध्याकाळी आई office मधून घरी आली की तिनं आदल्या दिवशी मी झोपल्यानंतर रात्री जागून बनवलेला केक कापायचा कार्यक्रम व्हायचा. टाळया वगैरे वाजत पण गाणं क्वचीत असे. त्या दिवशी रात्री मग माझी आवडती पुरी बासुंदी किंवा मटनाचा जंगी प्रोग्राम असे. थोडक्यात पूर्ण मराठमोळया पध्दतीने माझा वाढदिवस साजरा व्हायचा.

माझे काही वाढदिवस गणेश चतुर्थी च्या सुट्ट्या मधे साजरे झाले ; त्यावेळीही शाळेत chocolates वाटण्याचा कार्यक्रम वगळता सकाळी सहापासून रात्री दहापर्यंतच्या कार्य्रक्रमात फारसा बदल व्हायचा नाही. फक्त दुपारीही मेजवानी होत असे. अर्थात सम्पूर्ण दिवस आनंदात जायचा...

ताईचं वाढदिवसाचं ग्रीटींग कार्ड यायचं... खरं तर ती एकटीच असं ग्रीटींग वगैरे पाठवायची. तिची काही कार्ड्स मला वेळेवर पोहोचतच नसत. काही उशीरा पोहोचत; तरीही तिचा नित्यनेम काही चुकत नसे.

जस जसा मोठा झालो तस तसं वाढदिवसाचं स्वरूपही बदलत गेलं. सातवी पासून माझे मित्र ही माझा वाढदिवस लक्षात ठेवू लागले. रमेश सिद्धेश सारखे मित्र आठवणीनं शुभेच्छा द्यायचे ; बरोबर एखादं छानसं ग्रीटींगही !! त्याचबरोबर पार्टीचीही मागणी व्हायला लागली. तेव्हा कोल्डड्रिंक वगैरे पाजून पार्टी साजरी केली जायची...

घर सोडल्यानंतर मात्र वाढदिवसाचं स्वरूप नखशिखांत बदललं. वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा व्हायला लागला. अन् विशेष म्हणजे मलाही माझ्याच वाढदिवसाचे वेध लागू लागले! आता सकाळ पर्यंत वाट बघण्याची वेळ येत नाही. रात्री १२ वाजताच फ़ोन ची रिंग वाजू लागते. शुभेच्छांच्या वर्षावात मी अक्षरशः न्हाऊन निघतो. पण इंग्लिश पद्धतीनं !!! बर्थडे सॉंन्ग्ज,बर्थडे केक,बर्थडे पार्टीज... सगळ्याला आंग्ळाललेलं रूप आलंय.

याच काळातल्या एका वाढदिवसाला तर इंजीनियरिंग च्या वर्गात contribution काढून मित्रांनी मोठा केक आणला अन एखाद्या लहान मुलाचा करतात ना तसा वाढदिवस साजरा केला मुलांनी! तो पण canteen मधे !! मलाच एकदम ओशाळल्यासारखं झालं! पण शुभेच्छा देण्याची पद्धतही बदलली.. गिफ्ट्स च ट्रेंड सुरू झाला.. शर्ट, टी-शर्ट सारखी गिफ्ट्स मिळू लागली. पार्टी च्या कक्षा रुन्दावल्या. ती पूर्वीसारखी छोटेखानी न राहता हक्कानं एखाद्या होटेल मध्ये मागितली जाऊ लागली. ग्रीटिंग्स ही कालबाह्य झाल्या सारखी वाटताहेत त्याऐवजी एकट्यानं अथवा ग्रुपनं गिफ्ट देण्याची प्रथा पडलिये. थोडक्यात जुना वाढदिवस मावळलाय.

त्याच बरोबर काहीसं न आवडणारं , न पटणारं असंही काही घड़तय.. काही ' अमानुष' आणि विचित्र प्रथा रूढ़ होताहेत. उदाहरणार्थ केक तोंडाला फासण्यामध्ये काही धैर्य, शौर्य, मजा आहे, असं मला नाही वाटत.. पण माझ्या बाबतीत हे घडलंय ! केकचा एक अष्टमांश तुकडा विनाकारण माझ्या चेहरयाला फासला होता पब्लिकने! अगदी चश्म्याच्या काचान्नाही !! नंतर अर्धापाऊणतास पाण्यानं चेहरा धूत मी ती पेस्ट्री, क्रीम वगैरे काढण्याचा प्रयत्न करत होतो.. चश्मा धुताना तर नाकी नऊ आले.. कारण थोडं जरी क्रीम राहीलं तरी विदुषकासारखं फिरावं लागलं असतं! निव्वळ केक वाया घालवणे अन् आनंदी मूड चा कचरा करणे याव्यतिरिक्त त्या कृतीने कोणाच काही साधलं असेल असं मला वाटतही नाही आणि पटतही..

तसेच ते बर्थडे बम्प्स !! या इतकी विकृती तर कुठेच नसेल भूतलावर !! बर्थडे बॉय ( उच्चारात बड्डे बॉय ?! ) ला चौघेजण दोन पाय , दोन हाताना धरून उचलतात नि उरलेले त्याला लाथा घालतात ... आई sss गं !! आठवलं तरी कमरेत कळ उठते. बड्डे बम्प्स नंतर उरलेला दिवस बिचारा बड्डे बॉय मात्र विव्हळत राहतो.. त्यामुळे वाढदिवस कायमचा लक्षात राहतो..!! आपण त्या दिवशी जन्म घेउन केवढं मोठं पातक केलय याची जाणीव , कमरेत बसणारया प्रत्येक लाथेबरोबर होत असते.. विकृत आनंद आणि वर्षभराचा राग काढून घ्यायची अधिकृत आणि नामी संधी असते ही.. हं.. बड्डे बम्प्स म्हणे !!

पण अजुनही... जरी फ्रेंड्स करीता रात्री १२ वाजता माझा वाढदिवस सुरू होत असला तरी घरी मात्र भारतीय पद्धतीनेच - सकाळी ६ वाजता - मला नवीन वर्ष लागतं. म्हणजे आई बाबांचा फोन सकाळीच ( माझ्यासाठी खरंतर पहाटे पहाटेच :P) येतो.. इतरांसाठी इंग्लिश पद्धत असली तरी घरच्यांसाठी मराठी पद्धतीनेच माझा वाढदिवस साजरा होतो..

कधीकधी वाटतं , की पुन्हा लहान होऊन शाळेत जावं.. chocolates वाटताना प्रत्येकाला सांगावं ' आज माझा वाढदिवस !! ' मोंजीनीसचा वाइननं माखलेला black forest केक खाण्यापेक्षा घरी आईनं केलेला केक कापावा, रात्री मी कोणाला पार्टी देण्याऐवजी आईनं दिलेली मटन पार्टी झोडावी.. अन् मस्त झोपी जावं!! पण दुर्दैवानं बऱ्याच गोष्टी घडवून आणणं आपल्या हातात नसतं....

बुधवार, २८ मे, २००८

माझ्या भावना...


तू निघून जातेस तेव्हा
मन नेहमी सैर भैर होतं...
वेटरनं आणून ठेवलेलं बिल
डोळ्यासमोर फेर धरतं...

तू फ़ोन ठेवतेस तेव्हा
एकटेपण खायला उठतं...
फ़ोन बिलाच्या अंदाजानं
काळजात एकदम धस्स होतं...

तुला घरी सोडल्यानंतर
सतत तुझी उणीव भासते...
पेट्रोलच्या किमती खूपच वाढल्यात
याची सारखी जाणीव होते...

तुझ्यासोबत shopping करताना
तुझ्या choiceला दाद देतो ...
credit card ची due date कधी ?
हाच प्रश्न छळत राहतो...

तुझ्या बरोबर असताना
वेळ चटकन निघून जातो...
खर्चाचा ताळमेळ जुळवताना मात्र...
माझा प्राण कंठाशी येतो...

-- तुझाच 'हैराण' अखिलेश !!

शुक्रवार, ७ मार्च, २००८

दाढी....!!

परवाच दाढी करताना चुकून ब्लेडचा अंदाज चुकला!
अन्.. आई गं!! गालावर जखमेचा मोठ्ठा ओरखडाच उठला!!

जखमेच्या व्रणातून हळूहळू रक्त येऊ लागलं होतं!
त्याचवेळी नेमकं माझं आफ्टर शेव संपलं होतं!!

हताशपणे मी येउन आरशासमोर उभा राहिलो..
वाहणारं रक्त पाहण्याचा असफल प्रयत्न करू लागलो..

पण, अहो आश्चर्यम!! रक्तातून चक्क जीन बाहेर आला!
'जो हुकुम मेरे आका' म्हणत कमरेत वाकू लागला!!

मी दचकलो , भानावर आलो आणि त्याला विचारलं..
हे इथून, अन् अचानक येण कसं काय बुवा झालं !?

म्हणे,'तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला देवानंच दिलंय!
तुमची एक इच्छा पूर्ण करायला त्यानं मला पाठवलंय!!'

हे मागू की ते मागू असं मला होऊन गेलं!
काय सांगू तुम्हाला?अहो काय काय मनात येऊन गेलं !!

बंगला मागू ऐटदार, की भली मोठ्ठी गाडी?
की मागू सुंदर बायको, नेसून लफ्फेदार साडी?

सगळयांवरती मिरवायाला थोडी जादा मागू का अक्कल?
जीन्स की शूज? नको; त्यापेक्षा पैसाच मागतो बक्कळ !!

पैसा कितीही सांभाळला तरी चुटकीसरशी सरतो..
त्यापेक्षा एका बड्या कंपनीची ओनरशिपच मागतो..

गोष्टींमध्ये ईसापनीतीच्या तर तीन इच्छा पूर्ण करतात..
माझ्याच बाबतीत मग देवा ,चिक्कूपणा का दाखवलात ?

शेवटी 'ऐसा करो' म्हणत मी जीन कड़े वळलो जेव्हा
जीन नव्हता जागेवर; 'छू' झाला होता केव्हाच!

समजेना काहीच, की हा गायब कुठे झाला?
आता होता इथेच, क्षणात नाहीसा कुठे झाला?

कळलं मला लगेच, की 'I missed my chance'
मिळाली होती संधी तेव्हा केला नाही डान्स!!

माझी विचारशृंखला बराच काळ लांबली होती
तोपर्यंत रक्त सुकून जखमेवर खपली धरली होती!!

जीन गेला, सोबत गेल्या माझ्या स्वप्नातल्या जीन्स
I couldn't get him back by any means!!

म्हणून सांगतो तुम्हाला, ठरवून ठेवा एक इच्छा !!
ब्लेड लागून रक्त येवो,यासाठी माझ्या शुभेच्छा !!

:अखिलेश परब

रविवार, २ डिसेंबर, २००७

माझं आवडतं महाराष्ट्र गीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

शुक्रवार, १० ऑगस्ट, २००७