रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

प्लेसमेंट(ल) : पूर्वार्ध

"मे  आय कम इन सर? " किलकिल्या दरवाजातून बघणारा चेहरा मला विचारतो...
"यस प्लीज" खोटं हसू चेहऱ्यावर आणून मी म्हणतो. जरा स्थिरस्थावर झाल्यावर
"सो कॅन यु प्लीज टेल मी अबौट योर्सेल्फ?" ने प्रश्नोत्तरांचा ओघ सुरु होतो… एका पाठोपाठ एक कॅन्डीडेट्स येणार  असतात. नॉलेज , कॉन्फीडन्स, बॉडी  लँग्वेज वगैरे नाही नाही त्या गोष्टी वापरून मला१५ पैकी ३ लोक निवडायचे असतात… आधीच aptitude, ग्रुप डिस्कशन यामध्ये अर्धा दिवस संपलेला असतो. त्यामुळे साधारण दहा मिनिटं ते अर्ध्या तासात एक या हिशेबाने मी मुलाखती घेत असतो. feedback फॉर्म्स भरून द्यायला थोडा वेळ मिळतो तेव्हा मी (बहुधा डीन च्या) केबीन च्या खिडकीतून बाहेर पाहत उगीचच सिनेमात दाखवतात तसं थंडावलेल्या कॉफीचे घुटके घेत उभा राहतो…

"फोर्ब्ज मार्शल आलीये, तू बसणार नाहीयेस का?" पुरुषोत्तम ची practice चालू असताना कोणीतरी येउन म्हणाल्यावर मी पळतच तिकडे गेलो. पहिल्यांदा aptitude टेस्ट होती. मी ती दिली. त्यात shortlist  होणाऱ्या  लोकांची टेक्निकल टेस्ट झाली . त्यामधून काही मुलं सिलेक्ट झाली…aptitude नंतर रिझल्ट लागणार असल्यामुळे तिथंच  थांबावं  लागलं-- तीच परिस्थिती टेक्निकल नंतर. मुलाखतीसाठी निवड झालेल्या मोजक्या मुलांमध्ये माझं नाव आलं आणि अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार पहिलंच! जेव्हा माझ्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर ने माझ्याकडे पाहिलं  तेव्हाच मला पहिल्यांदा माझा अजागळ  "पुरुषोत्तमी" अवतार जाणवला!

"असा जाणारेस इंटरव्यूला ?" त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा  मराठी अनुवाद. (एकांकिकेत मी मरतो आणि त्याक्षणी जमिनीवर लोळण  घेतो  असा सीन असल्यामुळे ) मळकं गोल गळ्याचं टी शर्ट आणि जमिनीच्या बाजूला घासून फाटलेली मळकी जीन्स, त्याखाली फ्लोटर्स असा माझा अवतार मला जाणवला. समोर सुटाबुटात वावरणारे कंपनीतले लोक होते. "मी पटकन कपडे बदलून येतो"
"अरे मुर्खा, तुला आत बोलवताहेत  ते" (पुन्हा सोयीस्कर मराठी अनुवाद!)
"सर प्लीज त्यांना सांगा ना, मी चटकन तयार होऊन येतो"
यापुढे आमच्यात जो संवाद झाला त्यानंतर "टीपीओ या व्यक्तीचा उगम हा मुळात भाव खाण्यासाठी आणि असहकार्य करण्यासाठी झाला आहे" असे माझे मत तयार झाले!

धावत पळत जाऊन मी विनोदी वेशभूषा करून आलो. कसेतरी विंचरलेले केस, घाई गडबडीने टक-इन केलेलं शर्ट, कोणाचेतरी मागून घेतलेले थोड्या मापाचे पायातून बाहेर निघणारे शूज अशा अवतारात बदकचालीने मी पुन्हा तिथे पोहोचलो. टीपीओ तिथे नव्हता,
"माझा इंटरव्यू होता" हातात फाईल्स घेऊन लगबगीने ये जा करणाऱ्या एका बाईला मी म्हटलं.
"सो?" तिने माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं…
"अं,,, मी,,,"
"तुझं नाव ?" --अनुवाद! हातातल्या फाईल्समधले कागद चाळत तिने विचारलं.
मी नाव सांगितलं. ती एच आर होती. त्यामुळे आमच्यात पुढे जो सुखसंवाद झाला तो पुढील प्रमाणे  अनुवादित….
"तुझं  नाव सगळ्यात पहिल्यांदा कॉल औट  केलं होतं "
मी- "खरंतर  माझे कपडे… "
"वेळेची काही किंमत आहे कि नाही तुला? हे कॉलेज नाही कॉर्पोरेट कंपनी आहे" तिचं  कॉलेज  बहुधा वेळा पाळत नसावं !
मी - "आएम सॉरी "
"सॉरी ? तू इंटरव्यू साठी आलाहेस आणि तुला वेळेत येता येत नाही?" वगैरे वगैरे….
मी तिला उलट उत्तर देत निर्लज्जासारखा तिथेच उभा राहिलो. ती तिथून तावातावाने निघून गेली. आणि आमचा टीपीओ लांबून मजा बघत होता!! सुदैवाने सगळ्यात शेवटी मला मुलाखतीकरता आत बोलवण्यात आलं. मी आतापर्यंत दिलेली ती सर्वोत्कृष्ट मुलाखत असावी. इंटरव्यूअर ने मला चहा ऑफर केला आम्ही इतरही गप्पा मारल्या आणि मी बाहेर पडलो.

थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार होता आणि आमच्या टीपीओनं सांगितलं कि 'फायनली कोणाकोणाला घ्यायचं ते त्या अमुक अमुक madam आणि इंटरव्यू पँनल ठरवणार आहेत,' बोलता बोलता त्याने जो दिशानिर्देश केला तो त्या सुखसंवाद करणाऱ्या madam  कडेच! म्हणजे माझं भविष्य मी मघाशीच ठरवलं होतं!!
इंटरव्यू हा फक्त फार्स होता!! मी चमत्काराची अपेक्षा करत होतो परंतु केबिन मध्ये madam च्या विरुद्ध बाजूला बसलेले panel मेम्बर्स बघून निकाल काही फारसा सुखावह नसणार हे कळतच  होतं! फायनल सहापैकी चार लोक निवडले गेले होते. मी त्यात नव्हतो! बदकासारखा चालत मी घरी पोचलो आणि पहिल्यांदा कपड्यांचा एक सेट तयार करून ठेवला आणि माझ्या मापाचे बूट कोणाकडे आहेत ते ताबडतोब बघायचंही ठरवून टाकलं!

नंतर कधीतरी इमर्सन आली. यावेळी मात्र मी ठरवलेले कपडे घालून कॅम्पस साठी पोचलो. तयारीने! एप्टीट्यूड मधून शॉर्ट लिस्ट झालो मग टेक्नीकल क्लिअर केली..सगळे निकाल पूर्वीसारखेच येत गेले.. अगदी इंटरव्यूचा सुद्धा! :) पण ड्रामेटिकली.. दहा जण इंटरव्यू साठी सिलेक्ट झाले होते त्यापैकी 4 जणांची नाव पुकारण्यात आली. त्यात माझं नाव होतं.एक गोड शिरशिरी अंगभर सळसळत गेली. त्यापाठोपाठ "except these names rest all are selected" असे शब्द कानात जाळ ओतत गेले. क्षणापूर्वी असणारं "झालं बुवा सिलेक्शन" हे क्षणभराचं फिलिंग त्या वाक्यात मातीमोल झालं!
--X-O-X--
" दिज आर रेस्ट ऑफ़ द फॉर्म्स.. या एका कैंडीडेटला एच आर राउंड साठी घ्या. या एकाला त्या पॅनेलकड़े पाठवा. आएम इन डायलेमा." मी सूचना देत एच आर ने दिलेले बाकीचे सी व्ही नजरेखालुन घालतो. "Objective : to pursue challenging career in an organization that would enable blah blah blah.." जर हिला विचारलं की तुझं करिअर ऑब्जेक्टीव् एका दमात..एवढं कशाला? नुसतं पाठ म्हणून दाखवता येईल का? तर सांगता येणार नाही.. तीस चाळीस टक्के माहिती म्हणजे निव्वळ निरुपयोगी! ऑनलाइन जगात घरचा पत्ता पासपोर्ट नंबर आईवडीलांचे पूर्ण नाव कॉलेजातल्या कुठल्यातरी इव्हेंट चं नुसतं पार्टीसिपेशन हे रेझुमी वर कशाला हवं? पण असो! 
मी किलकिल्या दरवाजात उभ्या एच आर rep ला हातातल्या सी व्ही वरचं नाव वाचून दाखवतो.... दरवाजा बंद होतो आणि थोड्याच वेळात पुढच्या उमेदवाराच्या चेहऱ्यासकट पुन्हा किलकिला होतो...
--X-O-X--
"इंटरव्यूला बाहेर पडतोस म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव करायला पाहिजे तुला.. मैं इंटरव्यूतक पहुँचता तो कभी बाहर नहीं निकलता" छुपा अर्थ स्पोकन इंग्लिश मधे वीक आहेस तू..पासून "काही नाही रे होशील सिलेक्ट.. आमची तर एप्टीट्यूडच crack करायचे वांधे आहेत" पर्यन्त सगळ्या पद्धतीचे सल्ले मिळत होते. तीन कॉलेजचे उमेदवार एकत्र असल्याने फिल्टर लावायला सोपं पड़ावं म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स ने टेक्निकल मधून शॉर्ट लिस्टेड लोकांना ग्रुप डिस्कशनला बोलावलं होतं. आमच्या ग्रुप ला ब्रेन ड्रेन हा विषय होता.. स्वदेस च्या शाहरुख चं उदाहरण देऊन मी बऱ्यापैकी बोलबच्चन दिले.. 12 जणांच्या आमच्या ग्रुप मधून 3 जण पी आय साठी निवडले गेले.. मी त्यात होतो. कमाल म्हणजे ग्रुप डिस्कशन मधून पुढे न गेलेल्या लोकांमधे "माझं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव व्हायला पाहिजे" म्हणणाऱ्या व्यक्ती होत्या.. पर्सनल इंटरव्यू छान झाला.. आमच्या स्ट्रीमचे आम्ही दोघेजण होतो  पण त्यांना एकच रिक्वायरमेंट होती.  सिलेक्ट झालेल्या लोकांना ऑफर लेटर्स लगेच मिळणार अशी वदंता होती. ती खरी ठरली.. काही लोक खाकी लिफाफे घेऊन आले आणि आमच्यापैकी देशपांडे नावाच्या मुलीच्या हातात तो लिफाफा पडला. नशीबाने (किंवा इतर जे काही फॅक्टर्स असतात त्या सगळ्यांनी) पुन्हा एकदा टांग दिली होती!  संधी सारखी सारखी दरवाजा ठोठावत होती पण कॅम्पस सिलेक्शनचं गणित काही सुटता सुटत नव्हतं..

बॅक्सटर फार्माच्या प्रिलिमनरी राउंड मधून पुढे गेलेल्या लोकांचा जीडीपीआय चा एकच राउंड होता..  तिथंही इंटरव्यूतुन बाहेर पडलो. मँकलुईड फार्मा ला पण तेच. त्यांनी तर मी आणि अजून एकजण सोडून सगळ्यांना घेतलं! :)  माझ्यासाठी तर ही  हाईट  होती!! काहीतरी चुकत होतं खास पण काय तेच कळत नव्हतं आणि कुणी सांगणारंही नव्हतं..

वर्ष संपत होतं तसं कंपन्यांच्या ओघ आटला होता. आता चुकून माकुन एखादी कंपनी येत होती परंतु माझ्या स्ट्रीम साठी नव्हती किंवा माझे एवरेज मार्क्स पुरेसे नव्हते किंवा टी पी ओ शी निर्माण झालेली कटुता यापैकी किंवा अशा अनेक तत्कालीन कारणांमुळे मला अपियर होता येत नव्हतं..  बरोबरीचे बरेच लोक प्लेस झाले होते त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंट हा विनाकारण प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. आतापर्यंत मी इंटरव्यू मधून कसा बाहेर पडलो हे ऐकण्यात कोणाला काही स्वारस्य असेल असं वाटत नव्हतं!
--X-O-X--
..ही आतापर्यंतची तिसरी कॉफी होती. "Have you had your lunch" मी उगाच समोरच्याला कम्फर्टेबल फिल करवायचा प्रयत्न केला. त्यानं नाही म्हटलं असतं तर मी त्याला "जा दोन घास खाऊन घे" असं मुळीच म्हणणार नसतो! कोणतंही उत्तर चालू शकेल असा तो एक प्रश्न असतो परंतु काहीजण त्याचंही उत्तर फार सीरियस होऊन देतात.. जसं की आज उपास आहे, सकाळचा नाश्ता कसा भरपेट होता वगैरे! ज्याचा त्याचा प्रश्न! साला हा ए सी पण ना.. ही उरलेली कॉफी पण गारढोण होऊन गेली!
--X-O-X--
"एक्स एल डायनेमिक? कसली कंपनी आहे ही? सब प्राइम मॉरगेज पहिल्यांदा ऐकतोय मी" मी म्हटलं. "तुला काय करायचंय? तीन लाखाचं पॅकेज देतेय. एवढा पगार देत असतील तर मी दरवाजात उभा राहून येणाजाणाऱ्याला सॅल्यूट मारायला पण तयार आहे!" मित्राने ऐकीव माहिती सांगितली. मी घाईघाईने आमच्या कम्युनिकेशन सेंटर कड़े गेलो.. तुडुंब गर्दी होती. कमी मार्क्सचा क्रायटेरिया आणि ज्यांचं फ़क्त एका कंपनीत सिलेक्शन झालं आहे त्यांना बसण्याची संधी यामुळे एवढं पब्लिक जमलं होतं! इथं माझं एका कंपनीशी जमता जमत नव्हतं आणि हि आधी कुठे ना कुठे सिलेक्ट झालेली मुलं जास्त पैशाच्या आशेने इथंही गर्दी करत होती!

एप्टीट्यूडसाठी तीन चार क्लासरूम्स भरून मुलं होती. आधी म्हटलेली काही अलरेडी  प्लेस् झालेली मुलं आणि बाकीचा सगळा उरलेला कचरा.. माझ्यासकट! त्यातून कंपनीने एक क्लासरूम भरेल इतकी मुलं सिलेक्ट केली! त्यांची बिझनेस कॉम्प्रिहेन्शनची टेस्ट झाली. ही टेस्ट म्हणजे अक्षरशः तीन पानांचा इंग्लिशचा पेपर होता. असली टेस्ट कोणीच घेतली नव्हती आतापर्यंत. त्यात शॉर्टलिस्ट होणाऱ्यांची नावं दुसऱ्या दिवशी जाहीर होणार असं सांगितलं गेलं. 

दुसऱ्या दिवशी एका मित्राचा फोन आला की कॉलेजच्या गेटवर शॉर्टलिस्टेड मुलांची नावं लागली आहेत. मी चकितच झालो! पोरांच्या इज्जतीचे वाभाडे डायरेक्ट कॉलेजच्या वेशीवर? असं कसं कोणी करेल?

उत्तरार्ध:

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

एक चवदार कॉफी!!


तरुण मुलं आणि त्यांचं  लग्न हा त्यांच्या जिव्हाळ्यापेक्षा त्यांच्या घरच्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. काय? पटतंय ना हे स्टेटमेंट? जर तुमचं उत्तर हो असेल तर 'कॉफी आणि बरंच काही' तुमच्यासाठी आहे. तुमचं वय, तुमची जनरेशन, तुमचं कॉर्पोरेट स्टेटस यापैकी कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला फरक पडणार नाही ! खरंच!!

सेन्सॉर बोर्डानं किंवा निर्मात्यांनी 'बरंच काही आणि कॉफी' कि 'कॉफी आणि बरंच काही' या नावात घातलेल्या गोंधळामुळं पिक्चरचं पाळण्यातलं नाव आणि शाळेतलं नाव यामध्ये गडबड असली तरी एकदा सिनेमा चालू झाल्यावर त्या गडबडगोंधळाचं नामोनिशाण दिसत नाही. रवि जाधव हा माणूस निर्मात्यांमध्ये असेल तर डोळे झाकून सिनेमाच्या उच्च निर्मितीमुल्यांवर विश्वास दाखवावा एवढं स्टेटस  त्यानं जमवलं आहे! तो स्वतः डिरेक्टर नसला तरी!! 'रेगे' वरची त्याची छाप, अभिजित पानसे च्या आडूनही दिसून येते तसंच इथेही झालंय.

अगदीच तरुणपणी नोकऱ्या मिळायला लागल्यानंतर पहिल्यांदा  तरुणाई पसरली ती बिपीओ आणि केपीओ मध्ये त्यानंतर आय टी कंपन्यांमध्ये. मग कामाचा लोड, मिळणारा पैसा, प्रोजेक्टच्या अग्रेसिव्ह डेडलाईन्स आणि हायरार्कीत वर चढायची घाई या नादात लग्न, सेटलमेंट, पर्सनल लाईफ, आणि नाती मागे पडत गेली. नेमका याच विषयाला हात घालत  याच पार्श्वभूमीचा वापर करत  'कॉफी.. ' तयार व्हायला लागते आणि पुढे पुढे तीची रंगत वाढत जाते.

उपवर परंतु नॉन-लग्नेच्छुक मुलामुलींचा बराच सुकाळ आहे. निदान आताच्या काळात तरी. आपल्याला लग्न करायचं आहे का? किंबहुना  आपल्याला का लग्न करायचं आहे? आपल्याला कसा/कशी पार्टनर हवा/हवी आहे? असे असंख्य प्रश्न त्यांना पडलेले असतात परंतु कामाच्या धबडग्यात असेल किंवा इच्छा नसल्यामुळे असेल त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या भानगडीत हे लोक पडत नाहीत. आईवडील मात्र आपल्या कर्तव्य असल्याच्या थाटात किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या मुलांसाठी स्थळ शोधत असतात. 

असंच मित्राच्या मुलाचं 'स्थळ' लहानपणीच्या मित्राची (मोठी झालेली) मुलगी बघायच्या कार्यक्रमाला येतं आणि चित्रपट सुरु होतो. लिबरल कुटुंब आणि त्यात मोकळंढाकळं वातावरण असल्यामुळे हा कार्यक्रम काही तितकासा फॉर्मल होत नाही. अरेंज्ड लग्नाला दोघांचाही फारसा सपोर्ट नसतो त्यामुळे जाई (प्रार्थना बेहरे) त्याला- अनिष (भूषण प्रधान) ला आपल्या लाईफ  मधल्या घटना सांगत जाते आणि चित्रपट उलगडत जातो. तिची आणि निषादची झालेली पहिली भेट (जी फारशी लक्षात राहण्यासारखी पण नसते) इथपासून ती आजच्या दिवसापर्यंत छोट्या मोठ्या गोष्टींनी  भरलेला पेटारा ती अनिषसमोर उघडून टाकते. तिकडे कधी नव्हे ते जाई ला भेटायला बोलावून तिची (वेळेनंतरही) वाट पाहणारा  थोडासा अबोल असणारा निषाद (वैभव तत्ववादी) जे घडतंय त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न  करत असतो. 

ऑफिसमधला पहिला प्रोजेक्ट संपल्यावर आणि रिसोर्स रीअलोकेशन झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव जाणवायला लागते. सिनेमाचा प्रभाव असणा-या आपल्यावर 'हंसी  तो फंसी' किंवा 'प्यार है तो पलट के देखेगी' असल्या बालिश कल्पना म्हणजे प्रेम असलं काहीबाही जे बॉलीवूड ने ठसवलं आहे ते या दोघांच्याही डोक्यात आहे. तसलं काहीही वास्तव जीवनात होत नसल्यानं, जे होतंय ते प्रेम आहे कि नुसतं  infatuation आहे हेच त्या दोघांनाही कळत  नाही. जाईला एकदम मेमरेबल 'प्रपोज' हवाय आणि निषादला माहितीये कि त्याचं लाईफ ,त्याचा स्वभाव फिल्मी नाहीये. त्याला साधं I  like  you  बोलणंही कठीण जातं तर प्रेमाचा खुल्लमखुल्ला  इजहार करणं तर दूरची गोष्ट!! त्यामुळे कोणीही व्यक्त होत नाही आणि त्यामुळेच गोष्टी अडकून पडलेल्या असतात. त्यांना या प्रेमाची कोणीतरी जाणीव करून दिली पाहिजे ना? तशी जाणीव कोणी करून देतं का ? नुसती मैत्री आणि मैत्रीपलीकडचं नातं यातल्या सीमारेषा तशाच राहतात कि पुसल्या जातात? या प्रश्नांची उत्तरं  सिनेमागृहात जाऊन शोधायला पाहिजेत. 

संपूर्ण सिनेमात कुठेही 'कथा' नावाखाली कोंबलेला मेलोड्रामा नाही, भावनांचे विनाकारण हसू रडू आणणारे हिंदोळे नाहीत, खलनायक किंवा  प्रेमाच्या विरोधात असणारे आई-बाबा नाहीत, 'दुनिया कि कोई भी ताकत' च्या विरोधात लढणारे नायक नायिका नाहीत, समाजासाठी संदेश वगैरे तर नाहीच नाही तरी ही कंटेपररी पद्धतीने खुलत जाणारी लव्ह स्टोरी आहे! निखळ, हलकीफुलकी, रोमेंटिक! 

फक्त निषाद आणि जाईच नव्हे तर सिनेमातले इतरही लोक आपली छाप सोडतात. विशेष करून आभा! (नेहा महाजन)  तिने तिची वैचारिक दृष्ट्या 'मोठी' असणारी लहान बहिण मस्त साकारली आहे. दरवेळी नव्या  मुलीच्या प्रेमात पडून नंतर तोंडावर पडणाऱ्या  सुयश टिळकने निषादचा मावसभाऊ-निलेश म्हणून उत्तम काम केलं आहे. तो इनोसंटली देत असणारे सल्ले चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाहीत! बोजड संवाद आणि उदात्त तत्त्वज्ञान न सांगणा-या पटकथेमुळे सिनेमा आजूबाजूला घडणा-या घटना असल्यासारखाच वाटतो. 

वैभव तत्ववादी च्या वाट्याला पहिल्यांदा 'अमर प्रेम' सारखी टुकार सिरियल आणि त्यानंतर 'तुझ माझ जमेना' कि अशाच काहीतरी नावाची डेली सोप आली होती! त्याचं आणि टीव्ही सिरियलचं काही जमलं नाही पण या सिनेमात पहिल्यांदाच त्याला खरा अभिनय वगैरे करायची संधी मिळाली असं  वाटतंय, त्याने चीज केलंय. प्रार्थना बेहरे का कोण जाणे , क्लोज अप शॉट  मध्ये बऱ्याचदा ('मितवा' मधेही ) ऐश्वर्या राय सारखी दिसते असं  वाटतं. पण तिनेही चब्बी मराठी मुलगी खूप छान साकारली आहे. पुण्यातली  टिपिकल फमिली साकारण्यात दिग्दर्शक नव्वद टक्के तरी यशस्वी ठरला आहे हे मान्य करायलाच हवं!

सिनेमात दिसणारं ऑफिस असो, घर (जाईच्या भाषेतला साधा थ्री बी एच के चा flat !) असो कि कॉफी शॉप… प्रत्येक लोकेशनला एक प्रकारचा फ्रेशनेस आहे. तीच गोष्ट लागू होते charactersच्या कपड्यांच्या रंगसंगतीला! संपूर्ण सिनेमा संपेपर्यंत ते फ्रेश वातावरण प्रत्येक प्रसंगाला वेगळ्या  उंचीवर नेउन ठेवतं. 'रंग हे नवे नवे' हे मल्टीलिंग्वल गाणं तर खासच!! एकूणच काय तर मुलगा असो व मुलगी , स्त्री असो व पुरुष , आई असो व बाबा किंवा अशाच जोड्यांपैकी कोणीही असो, प्रत्येकाने किमान एकदा जाऊन या 'फिल्टर्ड' कॉफीचा आस्वाद घ्यायलाच हवा!! 

गुरुवार, १५ जानेवारी, २०१५

वर्दीतले सर

याला ‘एस एम’ मधे घाला असं खामकर सरांनी माझ्या बाबांना सांगितलं आणि पहिलीपासून माझा ‘एसेम’मधला प्रवास सुरू झाला.अगदी दहावीपर्यंत. खामकर सर हे एस. एम. हायस्कूल मधल्या कित्येकांसारखे माझेदेखील आद्य गुरु! तरीही या सुखद प्रवासात काही असे शिक्षक भेटले ज्यांचाशिवाय हा प्रवास नक्कीच साहसी आणि रंजक झाला नसता..

प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्यदिन हे एस एम च्या मुख्य ‘सणां’पैकीचे दिवस.लहानपणी माझे हे दोन्ही दिवस आई-बाबांच्या ऑफिस मधेच साजरे होत असत.पाचवीमधला स्वातंत्र्यदिवस हा माझा शाळेत साजरा होणारा पहिलाच स्वातंत्र्य दिवस होता. सात वाजायला अजून अवकाश होता तरीपण स्कूलबस च्या वेळेनुसार शाळेसमोरच्या प्रांगणात सगळी मुलं जमली होती. आमचे पी ई चे शिक्षक जरब दाखवून मुलांना शांत बसवत होते पण मुलांची चुळबूळ काही थांबत नव्हती. एक-दोन जणांनी फटके सुद्धा खाल्ले असावेत. तरीही हळू आवाजात गोंगाट चालूच होता. तो काही पूर्ण शमत नव्हता. त्याचवेळी एका बाजुला खाकी पोशाखधारी मुलांचा एक चमू उभा होता. शांत आणि शिस्तीत.सगळ्य़ांच्या पायात काळे कुट्ट चकाकणारे लेदरचे शूज,त्यात काळे सॉक्स,खाकी (आणि  ओवरसाईज्ड) हाफ पँट्स, त्यावर आमचे पट्टे असत त्याच्या तिप्पट रुंदीचे पट्टे,पूर्ण बाह्यांचे पण कोपरापर्यंत दुमडलेले शर्टस,खांद्यावर पिवळ्या रंगाची अक्षरं मिरवणारे लाल बिल्ले. डोक्यावर एका बाजूला कललेली कॅप आणि त्यावर लाल लोकरीचा गोंडा! त्यांच्यातलाच एक मुलगा त्यांना ऑर्डर्स देत होता आणि तो पूर्ण ग्रूप त्याप्रमाणे वागत होता. मी शेजारीपाजारी चौकशी करून घेतली. तेव्हा कळलं हि ‘एन सी सी’! त्यांचे सर अजून यायचे होते.तरीपण मुलं अजिबात दंगा करत नव्हती. शहाण्या मुलासारखी वागत होती. आमच्या वयाच्या मुलांसाठी ही खरंच कौतुकाची बाब होती.

तेवढ्यात त्यांचे सर आले. तसाच खाकी परंतु पूर्ण पोशाख आणि कडक भासणारा अवतार. आपली जागा घेउन त्यांनी हुकुम सोडला ‘परेssssड साव्धान’! आणि पुढच्या क्षणापासून ती जवळपास पन्नासजणांची पलटण कोणताही गडबड गोंधळ न घालता त्यांच्या सुचनेबरहुकुम वागू लागली. मला तेव्हा वाटलं होतं कि हि व्यक्ती बाहेरून फक्त एन सी सी च्या मुलांसाठी एस. एम. मध्ये येते परंतु नंतर  कळलं कि ते इथेच शिक्षक आहेत. ए एन पाटील सरांचं माझ्यावर पडलेलं पहिलंच इम्प्रेशन असं होतं. या व्यक्तिला पाहून कोणी आणि का भारावून जाउ नये? त्यावेळेपासून मला आपलंही एन सी सी मध्ये सिलेक्शन व्हावं असं प्रकर्षाने वाटत राहिलं.

मी सहावीमध्ये असताना आमच्या बंधुराजांचं एन सी सी मध्ये सिलेक्शन झालं आणि आमच्या घरात तो ड्रेस आला.शूज आले.गोंड्यावाली टोपी आली. सगळं  सगळं शाळेकडून मिळतं हे माझ्यासाठी अजून आश्चर्यजनक होतं. तेव्हा कळलं कि सर शुक्रवारी आणि शनिवारी शाळा सुटल्यानंतर थांबून मुलांकडून हे सगळं करून घेतात. मग कधी शाळेत थांबून मी दादा कशी practise करतो ते बघत असे.शाळा सुटल्यावर मैदानावर जमलेली --एन सी सी ची -- ग्रुप ग्रुप ने गप्पा मारत असणारी मुलं, सरांनी मैदानावर येत ‘फॉssssल इन’ अशी गर्जना केली कि उंचीनुसार एका रेषेत उभी रहात असत. ‘परेssssड साव्धान..विश्राम..’ एकापाठोपाठ एक ऑर्डर्स सुटत असत आणि मुलं न चुकता त्या फॉलो करत असत.

आठवीमध्ये `एन सी सी इच्छुकांनी ए एन पाटील सरांशी संपर्क साधावा अशी नोटीस फिरल्यानंतर लगोलगच्या सुट्टीत त्यांना जाऊन भेटणा-यांमध्ये मी होतो.  वरकरणी कडक वाटणारे सर प्रत्यक्षात बरेच सौम्य आहेत हे तेव्हा कळलं.  सरांनी उंची,वजन यासारखे बेसिक सिलेक्शन क्रायटेरिया लाऊन काही मुलं सिलेक्ट केली पण नंतर  "माझ्याकडे झालं म्हणून फायनल सिलेक्शन झालं असं नसतं. बटालियन चे ऑफिसर येउन फायनल करणार. "  सरांनी सांगितलं. त्याप्रमाणे  ऑफिसर्स आले त्यांनी ३०-४० इच्छुकांपैकी १८-20 जणांना घेतलं.   सुदैवाने मी त्यात  होतो परंतु ब-याच जणांचा भ्रमनिरास झाला.  काहींना  मनापासून आवड होती तरीही त्यांचं  सिलेक्शन होऊ शकलं नव्हत अशावेळी सरांनी स्वतःचे अधिकार  वापरून त्या मुलांना समाविष्ट करून घेतलं.   ज्या मुलांना त्यांनी घेतलं  त्यांचा ना  कोणामार्फत वशिला  होता , ना  सरांशी घरोब्याचे संबंध.  तरीही  केवळ नियमावर बोट न ठेवता मुलांची आवड मारली जाऊ नये म्हणून सरांनी त्यांच्यासाठी  निर्बंध थोडे शिथिल केले.

मग सुरु झाला फाईव्ह महाराष्ट्र बटालियन चा सराव. सरांची कदमताल ची ऑर्डर आली कि अजुनपण पोटात गोळा येतो..  'कदम्ताल एक.. दो.. एक.. दो..लेफ्ट राय्ट..लेफ्ट राय्ट..डावा. ..उजवा..डावा.. उजवा..एक.....एक..’ म्हणत मध्ये मध्ये एखाद्याला ‘लल्या... पाय कमरेपर्यंत उचलायचे..हे बघ.. हात हलता नयेत.. एक दो..एक दो..’ म्हणत स्वतः करुन दाखवत असत. आता लल्याला ते पहिल्या प्रयत्नात जमलं तर ठिक नाहीतर त्याला ते बरोबर जमेपर्यंत बाकिच्यांच्या कदमांचा ताल चुकायचा धोका निर्माण होत असे.  तरीही मुलं सरावाला  आवडीने हजर राहत असत.  कधी कधी  ट्रूपला  अगदीच मरगळ आली आहे असं वाटलं  कि सर मोठ्याने सांगत असत , 'काय रे हळू हळू चालताय? ती अमुक अमुक इयर ची batch अजून लक्षात आहे माझ्या .. ती पोरं चालायला लागली कि धुळीचा लोळ उठायचा.  अगदी बिल्डींग च्या वरपर्यंत जायचा .. आणि तुम्ही . बुटांवर पण धूळ बसत नाही तुमच्या !!" मग आम्ही अजून जोशात येउन  practice करायचो.  सर अगदी 'शर्टच्या स्लीव्हज कश्या फोल्ड करायच्या' इथपासून 'चालताना हात कुठपर्यंत  वर गेला पाहिजे' इथपर्यंत सगळ्या गोष्टी सांगत असत.

सव्वीस जानेवारी आला कि आमची practice अजून जोर धरायची . विद्यामंदिरच्या मुलांसमोर आपण उठून दिसलो पाहिजे हे एक परंपरागत कारण होतंच परंतु एन सी सी चा ड्रेस  घालून, प्रभातफेरीमधून कणकवली मध्ये  फिरायची ती एक संधी असे. कुठेही झेंडावंदन असलं तरी एन सी सी वाल्यांना सर्वात पुढे उभे राहता येत असे  आणि एएनपी या मानाचे मानकरी असत .  अशावेळी आम्हाला आमचाही अभिमान वाटत असे आणि सरांचाही!

National Integration Camp साठी सरांनी सार्जंट  आणि लान्स कार्पोलर  या नात्याने   मला आणि सुजित गवईला  बंगलोर ला पाठवलं होतं तेव्हा ते जातीने कोल्हापूरपर्यंत  सोडायला आले होते.  तिथुन पुढे  आमच्याबरोबर कोल्हापूर  च्या  शाळेतले सर सोबत करणार  होते. ते  सर त्यांच्या अपरोक्ष आमच्या सरांचं कौतुक  करत होते ते ऐकून खूप बरं  वाटलं होतं  .  पुढे मी तिथून बेस्ट कॅडेट रनर अपचं बक्षीस  घेऊन आलो तेव्हा सरांचा चेहरा कौतुकाने फुललेला अजूनही आठवतोय .  दुस-या  दिवशी वर्गातून नोटीस फिरली होती . एन सी सी संदर्भातल्या प्रावीण्याची तोपर्यंतची ती पहिली आणि एकमेव नोटीस.

त्यानंतरही  Annual Training Camp ला आम्हाला सर सोडायला तर आले  होते पण आमची राहायची व्यवस्था न लावताच गायब झाले. bag आणायला म्हणून गेले ते आलेच नाहीत. आम्ही त्यांना शोधलं  पण कुठे गेले काहीच कळेना. आम्ही नववीतली मुलं .  बरीचशी पहिल्यांदाच घराबाहेर  आलेली.  त्यात  पुन्हा त्या अथांग मैदानात इतक्या शाळांमधली मुलं.  एवढ्या गर्दीत काय करायचं सुचेना.. अखेर इकडे तिकडे चौकशी  करून आम्ही आमची व्यवस्था करून घेतली . तो एक  शिकण्यासारखा अनुभव होता.  पण तेव्हा मी मनातून  सरांवर खूप रागावलो होतो.  कॅम्प वरून परत आल्यावर मी सरांकडे याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनीही ते ऐकून घेतलं आणि म्हणाले " माझी चूक झाली खरी पण माझी bag ,आपण सगळे  गेलो होतो त्याच  गाडीत राहिली होती आणि ती गाडी परत गेली होती . त्यामुळे मी तिथेच एका सरांना तुमची  व्यवस्था करायला सांगून  bag आणायला गेलो. तिथून पुन्हा यायला काही साधन नव्हतं,  त्यामुळे मला परत येतापण आलं नाही ."  वास्तविक पाहता एका शिक्षकाकडून चुकीची स्पष्ट  कबुली आणि एवढ्या पारदर्शकतेची  अपेक्षा ठेवणेही गैर असते परंतु  या गोष्टीने त्यांच्या बद्दलचा  आदर मात्र दुणावला.

पुढे एम सी सी चा देखावा उभा  राहिला आणि शाळेत  खाकी वर्दिबद्दलचं कुतूहल तितकसं उरलं नाही.

पण फक्त एन सी सी हाच  त्यांचा विषय होता असं नव्हे .  दोन वर्ष ते आमचे क्लास टीचरदेखील होते. कोणाच्याही दबावाला बळी न पडता किंवा न जुमानता वर्गात सगळ्यांना समान न्यायाने वागवणारे जे मोजके शिक्षक होते त्यात ए एन पाटील सरांचं  नाव वरती होतं. आम्हाला ते एका वर्षी बीज-गणित शिकवत. त्यांचा शिकवण्यापेक्षा त्यांच्या वर्गातलं मोकळं ढाकळं  वातावरण मला जास्त आवडत असे.. वर्गात मुलांच्या शेजारी बेंचवर बसणारे देखील ते एकटेच आणि शाळेत येताना प्लेझंट वासाचं परफ्युम लावून येणारेदेखील ते एकटेच!  आम्ही आमच्या मित्र मंडळींना ज्या टोपण नावाने हाक मारत असू त्याच नावाने तेही  हाक मारत असत..  उदाहरणार्थ सिद्धेश ला सिद्धया , रमेश ला रम्या  वगैरे ! एखाद्या एन सी सी  कॅडेटने वर्गात बीज-गणिताच्या तासाला ग्राफ वरचे  बिंदू छोटे मोठे काढले  किंवा लाईन किंचीतशी जाड-बारीक झाली कि ते चिडत. " अरे लेका, एन सी सी  कॅडेट तू.. शिस्त कशी काय विसरतोस?  एकदा लावून घेतलेली शिस्त अंगात मुरली पाहिजे.."

त्यांनी कधी कोणाला ओरडून  'शांत बस ' असे म्हटलेले आठवत नाही ; परंतु त्यांच्या तासाला दंगा करण्याही  कोणाची हिम्मत झालेलीही आठवत नाही !
पुण्यात मी आणि रमेश सावंत, दोघेही  एस एम चेच विद्यार्थी तेव्हा एकाच कंपनीत होतो.  एकदा ऑफिस चं आउटिंग आटपून आम्ही परतत होतो .  .  आउटिंगच्या निमित्ताने शाळेच्या वनभोजनाचा ,सहलींचा, कॅम्प चा विषय निघाला. तेव्हा ए एन पाटील सरांचा देखील बोलण्यात उल्लेख झाला .  शास्त्री रोड वरून राहायच्या ठिकाणी  येत  असताना एका पी एम टी  stopवर सरांसारखं कोणीतरी दिसलं . आम्ही एकमेकांकडे पाहिलं. थबकून आम्ही पुन्हा पाहिलं तर प्रत्यक्ष सरच होते! तोच फिटनेस , तीच personality ! योगायोगाचं यापेक्षा चांगलं उदाहरण काय  असू शकेल ? ते काही कामानिमित्त पुण्यात मुलीकडे आले होते . आम्ही आग्रह केल्यावर  आमच्या बरोबर ते घरी आले , मनसोक्त गप्पा मारल्या,मन मोकळं  केलं आणि गेले.  शिक्षकांच्या हाताखालून  शेकडो मुलं दरवर्षी तयार होऊन निघत असतात तरी देखील इतक्या वर्षांनी अनपेक्षित ठिकाणी अचानक भेटूनही सरांनी आम्हाला नावानिशी ओळखले  हि आमच्यासाठी अभिमनाची  बाब होती.

आता सर रिटायर्ड झाले आहेत, कणकवली सोडून तांच्या  मूळ  गावी स्थायिक झाले आहेत.. कणकवलीत आल्यानंतर अजूनही एन सी सी मधली मुलं दिसतात..  एस एम च्या मैदानात  आताही परेडस होत असतील,  आताही ऑर्डर्स घुमत असतील, आताही धुरळा उडत असेल,  पण....

.... ए एन पाटील सरांशिवाय एस एम च्या  एन सी सी ची कल्पना करणंही अवघड हे देखील तितकच सत्य !!

शुक्रवार, २७ जून, २०१४

अनुत्तरीत प्रश्न : उत्तरार्ध


पूर्वार्ध:

साव्याच्या थेट हल्ल्याने ते निष्प्रभ झाले..
"नाही.. म्हणजे आम्ही राहिलो भाड्याच्या घरात नंतर मग हल्ली घेतलं घर. मुलगी भाड्याच्या घरातच लहानाची मोठी झाली तर आता स्वतःच्या घरातून परत भाड्याच्या घरात पाठवायची म्हणजे.." ते लाचार हसत म्हणाले..
"आता लग्नानंतर 'आमचं' घर असणार म्हणजे आमच्या दोघांचे परिश्रम नकोत का घर उभारणीसाठी?"
"पण आधीच घर असतं तर.. आमची अटच आहे अशी.." वडिलांनी नेहमीचा सूर आळवला..
साव्या उठला , मला उठायची खूण केली..
"म्हणजे थोडक्यात तुमच्या मुलीसाठी मी घर घेऊन ठेऊ आणि तुमची मुलगी तिथे आयती राहायला येणार असं म्हणणं आहे तुमचं..बरोबर? "
"अरे मग? आम्ही लग्नात वरदक्षिणा देऊ कि घसघशीत" निर्लज्जपणे ते म्हणाले
"त्यापेक्षा 'हुंडा देणार नाही' अशी अट ठेवायला हवी होती तुम्ही. आमची मुळात तसली अपेक्षा नाहीच आहे पण मुलीने माझ्या सोबतीने संसार उभा  करावा एवढीच माफक अपेक्षा होती आमची. पण कणाहीन वडिलांच्या मुलीकडून काय अपेक्षा करायच्या?" साव्याने सवाल केला. एवढं मराठी त्यांच्या डोक्यावरून गेलं असावं. ते तसेच हसत राहिले होते.  "तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जावई मिळो " अशा शुभेच्छा देऊन  आम्ही बाहेर पडलो.

मी हसलो. "अरे ते आपण गेलो होतो सिंहगड रोड ला ते स्थळ आठवलं" साव्याच्या प्रश्नार्थक चेह-याला मी उत्तर दिलं. तो सुद्धा हसला
"बघ ना? त्या बापाला माझा स्वभाव कसा आहे, लहानपणापासून जपलेल्या मुलीला मी समजून घेऊ शकतो का?  त्यांच्या जीवनात मी adjust होऊ शकतो का याच्याशी काडीमात्र देणंघेणं नव्हतं.माझा पगार किती आहे आणि माझं फुकटचं घर आहे कि नाही यातच त्यांना इन्टरेस्ट होता!"
आम्ही दोघेही खळखळून हसलो.
"आणि ती सातारकर आठवते का तुला? माझ्या चुलतमामाचं इंटरकास्ट लग्न आहे म्हणून आठवडाभरानंतर नकार देणारी?" आम्ही पुन्हा तसेच हसलो.
"अजून त्या नगरच्या पोरीच्या कोण कुठल्या मावशीने तर 'सगळं चांगलं आहे पण पत्रिकेत फक्त साडेसतरा गुण जुळतात' म्हणून नाही म्हटलं होतं माहितीये ना?"
एका पाठोपाठ एक आठवणी जाग्या होत होत्या.. प्रत्येक आठवणीनंतर साव्या खिन्न होत होता.

"चुकलंच माझं.." सिलिंग fan कडे एकटक पाहत साव्या म्हणाला.. " हुशार, सरळसाधा  मुलगा हि इमेज जपण्याच्या प्रयत्नात प्रेमात पडण्याचं टाळलं. जाणीवपूर्वक. तीच चूक झाली.. आई वडील आपल्यामुळे नसत्या झेंगटात  पडू नयेत म्हणून कुठल्या पोरीकडे मान वेळावून पाहिलं नाही. नाकासमोर चाललो. शाळा कॉलेजात जेव्हा मला कुठली मुलगी साधी बोलायला आवडली तरी तेव्हा 'हे काय प्रेम करायचं वय नव्हे' असा प्रौढत्वाचा विचार केला. जेव्हा अनघा attract होतेय असं वाटलं तेव्हा मी स्वतःहून तिला झिडकारून लावलं.. का? तर केवळ मला प्रेमात पडायचं नव्हतं म्हणून!" तो पुन्हा खिन्न हसला..

च्यायला.. म्हणजे मी विचारल्यावर प्रत्येकवेळी  'तसं काही  नाही , वी आर जस्ट फ्रेंडज, तुला उगाच तसं वाटतं' म्हणणारा साव्या तिच्या प्रेमात होता तर. ती शेजारच्याच flat मध्ये राहायची. तिचं त्याच्यावर असणारं प्रेम ही तर अगदीच उघड गोष्ट होती. पण तिचं लग्न ठरलेलं नसतानाही त्याने स्थळं बघायला सुरुवात केली तेव्हा मीही तो विषय 'खरंच तसं काही नाही' म्हणून सोडून दिला होता.

अनघाचं मागच्या वर्षीच लग्न झालं होतं. साव्या आला नव्हता. मी त्याचा आणि माझा आहेर  घेऊन गेलो होतो. अनघा काही बोलली नाही मला पण तिचं कसनुसं हसणं मला बरंच काही सांगू पाहतंय असं वाटत होतं.. प्रत्येकवेळी 'ओल्या बैठकी'त छेडल्यानंतर तिचा विषय शिताफीने टाळणारा साव्या आता फ्रस्ट्रेशन मध्ये चुकून खरं काय ते बोलून गेला होता.

"तू तिच्या प्रेमात होतास?'
"आत्ता जाणवतंय रे मला ते.. घरी आल्यावर माझ्याकडून मी तिला घेऊन फिरायला जावं अशी अपेक्षा बाळगणारी तरी नव्हती रे ती.  तिचं बोलणं ऐकण्यात मला इन्टरेस्ट असायचा. कित्ती वाचायची ती.बाप रे! इतकी माहिती असायची तिच्याकडे. मुलींशी बोलताना इतका लाजणारा मी.  तिच्या नजरेला नजर न भिडवता बोलायचो तिच्याशी. तरीपण मी काय सांगायचो त्यात तिला इन्टरेस्ट असायचा. निदान तसं दाखवायची तरी. मी काही बोललो आणि माहिती नसेल तर लगेच सगळं वाचून माहिती करून घ्यायची."
साव्या सिलिंग कडे एकटक बघत होता.

"नवरा म्हणून माझ्या याच अपेक्षा आहेत रे आधीपासून..  दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं, त्यांना एकमेकांच्या बोलण्यात इन्टरेस्ट असावा यापलीकडे मी काही एक्स्पेक्ट करत नव्हतो आणि नाही. नुसतं बाह्य सुख महत्वाचं असतं तर ते पैसे फेकून मिळतं. "
 मी काहीच बोलू शकलो नाही.
"जोक्स अपार्ट  पण मला सांगून आलेल्या स्थळांपेक्षा कित्येकपट सुंदर choices होत्या बँकॉक ला माहितीये ?"
 "साव्या , जोक्स चा विषय नाहीये हा. लाईफ पार्टनरला त्यांच्याशी कम्पेअर करतोयस तू ?" मी करवादलो
"मुळीच नाही. पण मुलींचे बाप आणि स्वतः मुली मला एटीएम  मशीनशी कम्पेअर करताहेत हे नक्की!"
 " अरे त्यांच्या पण काही डिफीकल्टीज असतील. घर, उच्च डिग्री म्हणजे पर्यायाने पुरेसे पैसे हे त्यांच्यासाठी तुझी stability मोजायचे  क्रायटेरिया असतील कदाचित."

"मान्य , शंभर टक्के मान्य पण आयुष्यात आपण एका अनोळखी व्यक्तीबरोबर राहणार आहोत त्याची निवड करताना होमवर्क नको का पुरेसं? उच्च डिग्री म्हणजे नेहमीच पुरेसे पैसे  नसतात. एकट्यानेच घर घेतलं कि आर्थिक गणितं बिघडतात हे कळायला नको त्यांना? संपवून टाक!"
शेवटचं वाक्य मला (म्हणजे ग्लासातल्या द्रव्याला) उद्देशून होत हे कळायला मला वेळ लागला.

"कंटाळलोय रे मी. आयुष्याची ऐन उमेदीची चार -पाच वर्ष लग्न या विषयासाठी नाहक वाया दवडली असं  वाटतंय. जो तो स्थळं सुचवतो. हे हे वधू-वर सूचक मंडळं  चालवणारे लोक, मुलीचे काही अतिशहाणे नातेवाईक, 'माझं भलं करतोय' असा आव आणून माझ्या पर्सनल प्रश्नात नाक खुपसणारे आमचे नातेवाईक अश्या या सगळ्या  लायकी नसणा-या लोकांकडून मला सल्ले ऐकून घ्यावे लागताहेत. बरं, मी नाराजी दाखवली तर, 'कसला attitude  आहे,त्यामुळेच लग्न नाही जुळत ' नाहीतर 'आम्हाला शहाणपण शिकवणार का तू? ' वगैरेचा भडीमार,शुंभासारखा राहिलो तरी  'आतातरी हातपाय हलव, स्वत:ची स्वत:च बघितली असतीस तर ही वेळ  आली नसती' किंवा 'तुलाच इंटरेस्ट  नाही म्हणून हे असं आहे' वगैरे जावईशोध लावतात ते वेगळंच."

मी गप्प राहिलो.
"आता सहन होत नाही सगळं. मित्रांमध्ये जीव रमवावा म्हटला तर मित्र पण बदलले रे त्यांची लग्न झाल्यापासून. बायकोचंच जास्त ऐकतात. त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. आता कुटुंबाला प्रायोरिटी दिली पाहिजे. तुला सांगू, तू एकटा आहेस जो लग्नानंतर पण तसाच राहिलाय "

"खरंतर मी सुद्धा बदललोय." मी कबुली दिली " मोजके लोक आहेत… तुझ्यासारखे… ज्यांच्यासाठी मी तसाच आहे. अदरवाईज मीपण family लाच प्रायोरिटी देतो. द्यावीच लागते. आपण  समाजात राहतो. त्या समाजाचे काही अलिखित नियम आपल्याला पाळावेच…  "
" समाज… आय हेट धिस सोसायटी " माझं वाक्य मधेच तोडत तो म्हणाला. " या लग्नाचं लचांड या समाजानेच मागे लावून दिलंय माझ्या. मी एक साधा सरळ माणूस आहे. मला सांग कशासाठी करू लग्न ? आयुष्यात एक companion पाहिजे असं  म्हटलं तर मी बघतोय कि लग्नानंतरचा काही काळ वगळला तर त्यानंतर अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत नवरा बायकोचं पटत नसतं एकमेकांशी. पन्नाशी साठीतलं  कपल एकमेकांशी गुजगोष्टी करतंय , आयुष्यभराचे जमाखर्च मांडतंय असं चित्र मी एकतर सिरियल्स मध्ये बघितलंय नाहीतर 'बागबान'सारख्या सिनेमांमध्ये ! "

माझ्याकडे अर्थात समर्पक उत्तर नव्हतं.

"कित्येकांच्या घरात आई वडिलांची धुसफूस चालू असते हे ते सांगतात तेव्हा कळतं. अगदी माझ्या घरात पण काही वेगळी परिस्थिती नाही." तो पुढे म्हणाला " असंच जर लाईफ होणार असेल तर कशाला हवं लग्न करायला? मी काही वंश वाढवण्यासाठी हपापलेलो नाही. कशासाठी करावं लग्न?"

"बघ, माझ्याकडेही याचं तुला पटेल असं उत्तर नाहीये. आणि तू म्हणतोस तशी  असते परिस्थिती पण अगदीच एकांगी विचार नको करू. काहीजण  अगदी छान गोडीगुलाबीने राहतात पण. निदान इतरांना तसं  दाखवतात तरी."

"तेच ना. मी स्वतः शोधायचा प्रयत्न केला, खूप जणांशी चर्चा केली तर त्यांनी कधी हा विचारच केला नव्हता. वरून कधी कधी तर  मारून मुटकून  स्वतःचा कसाबसा सेट केलेला संसार मुलांच्या लग्नानंतर, सुनेच्या आगमनानंतर मात्र  विस्काटायची वेळ आलेले लोक भेटले "
साव्या गडगडाटी हास्य करत म्हणाला!
"कसं असतं लोक या गोष्टी चारचौघात बोलत नाहीत म्हणून आपल्याला कळत  नाही एवढंच!!"

मी शांत बसलो. पर्याय नव्हता. उपाय नव्हता. मी काही करून त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मदत करू शकेन असा काही मार्ग नव्हता. खूप वेळ आम्ही एकमेकांशी न बोलता त्या स्कोटलॆन्ड मेड एजेड व्हिस्किचे छोटे घोट रिचवत राहिलो.. झोपेचं चिन्ह दिसत नव्हतं. तो सांगत होता त्यात अतिरंजित असं काहीही नव्हतं.

मुलींचं कमी होणारं प्रमाण , पुरुष जाती विषयीचा वाढलेला तिरस्कार, लग्नाचं बाजारू स्वरूप , हुंडाबळी,  जातीव्यवस्था, मुलीकडच्या वाढलेल्या अपेक्षा, स्त्री सबलीकरण हे असले विषय निबंधां साठी नाहीतर चर्चासत्र भरवण्यासाठी बरे वाटतात पण जेव्हा त्यामध्ये नाहक होरपळणारे असे असंख्य साव्या बघितले कि या विदारक सत्याची जाणीव होते. स्त्री दाक्षिण्याचं  भान बाळगणा-या  या लग्नाच्या बाजारातल्या उमेदवारांना समाजात राहण्यासाठी शेवटी आपल्या मूल्यांशीच  तडजोड करावी लागते. तेही माहित नसलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करण्यासाठी!!

"सो… कमिंग back टू द स्क्वेअर वन… मी लग्न न करण्याच्या माझ्या निर्णयावर सध्यातरी ठाम आहे. ज्यावेळी लग्न का करावं याचं थोडं तरी समाधानकारक उत्तर मिळेल तेव्हा कदाचित मी माझ्या निर्णयाचा फेरविचार करेन. नैतिकता बाजूला ठेवली आणि तथाकथित समाजाला फाट्यावर मारलं तर इतर सगळ्यासाठी बँकॉक आहेच!"  पुन्हा एकदा गडगडाटी हसून साव्याने माझी विचारशृंखला तोडत टाळी साठी हात पुढे केला.

 सकाळी उठून मी भणभणतं डोकं घेऊन घरी पोचलो. तो पूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवल्यानंतर माझं रुटीन सुरु झालंय. आज  प्रॉपर्टी प्रदर्शनातल्या त्याच्या stall ला भेट द्यायला चाललोय पण जाताजाता साव्याला देण्यासाठी माझ्याकडे उत्तर नाही हे सुद्धा कबुल करायलाच हवं… 

रविवार, १ जून, २०१४

अनुत्तरीत प्रश्न : पूर्वार्ध


वामन सावंत उर्फ साव्याचा फोन म्हटला कि नेहमीच माझं मन द्विधा अवस्थेत जातं.. बोलायचं खूप असतं पण त्याचा फोन हमखास अशा वेळी येतो कि मनसोक्त बोलताच येत नाही. उदाहरणार्थ घरात असलो तर जेवत असताना, सकाळी उठल्या उठल्या, ऑफिस मध्ये मिटिंग चालू असताना  किंवा बॉस  शेजारी येउन गोष्टी सांगत असताना .. वगैरे वगैरे.. मला अशीही दाट शंका आहे कि त्याला मला फोन करावासा वाटला कि माझ्या साहेबाला माझ्याशी काही बोलण्याची हुक्की येत असावी.. किंवा मी मिटिंग रिक्वेस्ट एक्सेप्ट केली रे केली कि आमचे एच आर साव्याला फोन करून माझं शेड्युल कळवत असावेत! असो...

ऑफिस जवळच्या एका चहाच्या टपरीवर तो नेहमी येत असे. सिगारेट फुकणा-यांच्या त्याच्या कंपूत तो एकटाच फुकत नसे. (त्यामुळेच तो माझ्या लक्षात राहिला!) चहाचे घुटके घेत तो त्यांच्या थट्टा मस्करीत दंग असे. एकदा शनिवारी किंवा रविवारी मी कामानिमित्त ऑफिस ला गेलो. एकटाच . दुपारी मी टपरीवर गेलो तर नेमका साव्या तिथे होता. तेव्हा माझी आणि त्याची पहिली आणि फॉर्मल  ओळख झाली. काहीजणांशी आपलं ट्युनिंग पहिल्या भेटीतच जुळतं आणि काहीजणांशी आयुष्याच्या शेवटपर्यंत जुळत नाही . साव्या  पहिल्या टाईपचा होता. एकदम चांगला दोस्त बनला तो माझा.

साव्या हा त्याच्या काळात प्रचंड हुशार विद्यार्थी. माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा असेल पण लहानपणापासून ब-याच मुलांना त्यांचे आई वडील आदर्श घालून देण्यासाठी काही विशिष्ट मुलांचा यथेच्छ वापर करतात (उदाहरणार्थ , "बघ बघ तो सावंतांचा वामन बघ.. आणि तू.. कार्ट्याला खेळ सोडून दुसरं काही दिसतच नाही इ.) त्यापैकी साव्या एक! 'साला हा अभ्यास करतो आणि अव्वल येतो त्याच्यामुळे आम्हाला ऐकून घ्यावं लागतं आणि खेळ सोडून आम्हालापण अभ्यास करावा लागतो' असं म्हणून कित्येक मुलांनी आपल्या लहानपणात त्याला मनोमन शिव्या घातल्या असतील.

तसा तो काही फार गरीबीतून वगैरे पुढे आलेला किंवा पेपरची लाईन टाकून शिक्षण पूर्ण करणारा वगैरे नव्हे. जात ओपन क्याटेगरीत  मोडणारी! आई वडील साधे, सरळ, प्रेमळ, मनमिळाऊ वगैरे वगैरे आणि त्यात सुद्धा पद्धतशीर जिवंत आणि ठणठणीत,. म्हणजे समाजाची सहानुभूती मिळवण्याचा अगदीच काही स्कोप नव्हता! एक सरळ साधा मध्यमवर्गीय कुटुंबाचा मध्यमवर्गीय  मुलगा. पण उपजत हुशार. आई वडिलही 'मला डॉक्टर बनायचं होतं पण पैसे नसल्यामुळे जमलं नाही. आता तू माझं स्वप्न पूर्ण कर' अशा टायपाची तद्दन भंपक आणि स्वार्थी स्वप्नं बघून ती पूर्ण करण्यासाठी  पोराच्या इच्छा-आकांक्षांची होळी करणारे नव्हते. त्यामुळे 'तुला काय वाटतं ते कर' असं सांगितल्यावर त्याने  आर्कीटेक्ट व्हायचं ठरवलं होतं आणि तसा तो झालाही होता.

त्यादिवशीपण असाच फोन आला त्याचा. "बोलायचं आहे. अर्जंट . वेळ आहे का?" पहिल्यांदाच असं झालं होतं कि मला वेळ होता. "हो.. बोल"
"फोनवर नव्हे! प्रत्यक्ष भेटून. "
"have यू गॉन मॅड साव्या? वाजलेत बघ किती रात्रीचे पावणेबारा.. टी व्ही बघत होतो म्हणून मी जागा तरी आहे. हि मॅच संपली कि मी झोपणारे.."
" तू ताबडतोब मला पिक करायला ये. मी वाट  बघतोय.. रात्री माझ्याकडेच थांब आज." माझ्याकडे पर्याय न ठेवता तो बोलला..

...मी इतक्या रात्री घराबाहेर चाललो आहे आणि त्यातही रात्री परत येणार नाही हे कळल्यानंतर माझ्या घरात झालेला तमाशा ही एक वेगळी पोस्ट होऊ शकते त्यामुळे तूर्तास ते टाळतो..!

साव्याला मी पुणे एयरपोर्टवरून उचलला. तो बँकॉक-पटाया च्या सफरीवरून आला होता.
"फाईव्ह डेज सिक्स नाईट..मजा करून आलो. अजून २ -४ पोरं होती. बड्या बड्या बापांची..पण चांगल्या घरातली.. धिंगाणा केला.. बँकॉक च्या गल्ल्या न गल्ल्या फिरून आलो! कसल्या आहेत माहितीये?"
त्याच्या राहत्या ठिकाणापर्यंत पोचेपर्यंत  तो मला बँकॉक च्या गोष्टी सांगत होता… चकचकीत एयर पोर्ट, थाई लोकांनी  केलेली प्रगती वगैरे वगैरे.. "नुसत्या पर्यटनावर कुठल्या कुठे पोहोचलाय माहितीये तो देश?" अश्या पद्धतीचे थोडे सवाल जवाब होते :)

घरात पोचल्यानंतर बँकॉक वरून आणलेलं स्कॉचच्या स्वरुपातलं अल्कोहोल ब्यागेतून बाहेर आलं आणि त्याच्या मोक्षस्थानी (म्हणजेच आमच्या पोटात!) जाऊ लागलं… जशी जशी पेग्ज ची संख्या वाढत गेली तशी तशी त्याची गाडी तिथली टापटीप, शिस्त, आतिथ्य, मातृसत्ताक कुटुंब , राजेशाही (आपल्या लोकशाही सारखी), झगमगाट, वगैरे वगैरे वरून  तिथले क्लब्ज, नाईट  लाईफ, मसाज वगैरे वगैरे वर घसरली..
"तीनशे बाहत देऊन फुल बॉडी मसाज करून घेतला, काय मजा आली माहितीये?"
"मला कसं काय माहित असणार?" मी कुतूहलाने विचारलं
"अरे फुल टू धमाल. नंतर 'तसल्या' गल्ल्या बघितल्या"
"तसल्या म्हणजे कसल्या रे?"
"तसल्या रे " मान वाकडी करून मानेला झटके देत आणि भुवया उडवत त्याने सांगितलं
"ओ हो…  तसल्या ?" कल्पनेचा वारू चौखूर उधळवत मी म्हटलं "लिमिट क्रॉस  नाही ना केलंस ?"
"खरतर केलं! आणि त्यासाठीच तुझ्याशी बोलावसं वाटलं… "

इतकावेळ हलकं फुलकं असणार वातावरण अचानक  सिरियस झालं. काही वेळ असाच शांततेत गेला. आम्ही दोघेच होतो.शेंगदाणे आणि वेफर्स च्या कुरुम कुरुम चा आवाजसुद्धा ऐकू येत होता.

त्याच्या लग्नासाठी गेल्या ३-४ वर्षांपासून मुली बघण्याचा/स्वतःला मुलींना दाखवण्याचा कार्यक्रम चालू होता. स्वतःच्या लग्नासाठी चार ठिकाणचे पोहे टेस्ट करायचं भाग्य जरी मला लाभलं नसलं तरी साव्यामुळे मी ते सुख अनुभवू शकलो होतो.साव्याच्या आई वडिलांना प्रत्येकवेळी येणं  शक्य नसे त्यामुळे "बघण्याचा कार्यक्रम"  मुलीच्या घरीच असेल तर कधी त्याचा मामेभाऊ तर कधी मावस भाऊ वगैरे बनून मी जात असे. बाहेर असेल तर मित्र म्हणूनच. पण साव्या आणि मुली मधलं तंग वातावरण जरा निवळवून दोघांना कम्फर्टेबल फील करवून देण्याचा माझा जॉब  असे.

"वैतागलोय यार मी आता… आता लग्नच नाही करणार! " साव्या  बोलत होता. दारूच्या नशेत सुद्धा तो नेहमीच सेन्सिबल बोलत असे. मी गप्प राहिलो.
"का करावं  लग्न?" माझ्याकडे तरी या प्रश्नाला उत्तर नव्हतं.
"नुसती शरीराची भूकच महत्वाची असते का? बाकीच्या गोष्टींना काहीच महत्व नाही का रे आपल्या समाजात?"
"..."
" तुला माहितीये, नेहमीच मी एका अशा मुलीच्या शोधात आहे जी खरोखर माझी बायको व्हायला लायक असेल"

"हे वाक्य मी खूपवेळा ऐकलंय. कधी त्याच्या अर्थ समजावून द्यायचा प्रयत्न केलास? निदान मलातरी?" मी विचारलं..  " सगळ्यांना आपली बायको ऐश्वर्या राय सारखीच दिसणारी हवी असते, पण आपण अभिषेक बच्चन सारखे दिसत नाही, सलमान सारखे पिळदार शरीराचे नाही गेलाबाजार विवेक ओबेरॉय सारखे चॉकलेट हिरो नाही याची कोणाला जाणीवच नसते! " मी  पुढे म्हणालो..  "खूप प्रयत्न करून तुम्ही ब्युटीफुल ड्रीम गर्ल शोधली तरी ती हँडसम  ड्रीम बॉय च्या शोधात असेल तर?"

"ही तुझी विधानं मला लागू होताहेत का?" तो म्हणाला
"मी जेनेरिक स्टेटमेन्ट केलं. आताच्या तरुण मुलांच्या बाबतीत… "
" आतापर्यंत फक्त फोटो बघून मुलगी बघायला गेलोय असं  एखादं तरी उदाहरण देशील मला?" मला तोडत तो म्हणाला. कदाचित नसावा! नाहीतर हे वाक्य तो इतक्या कॉनफिडन्टली बोलला नसता!
"उलटपक्षी मुलींच्या अपेक्षाच इतक्या वाढल्या आहेत कि तुझं ते ऐश्वर्या राय चं उदाहरण त्यांना ऐकवायला हवं !!" छद्मी हसत तो म्हणाला!

"ती सुभद्रा आठवते तुला?"
"नाही"
"ती रे सॉफ्टवेअर जॉब  वाली. सुभद्रा म्हणजे... "
"हां… हो आय बी एम मध्ये होती ती ना? सुभद्रा हॉटेलात भेटला होता ना तुम्ही? म्हणून सुभद्रा होय.. आठवते आठवते.. "
"हो… तीच! ती पोरगी काय म्हणाली माहितीये ना? माझा पगार अमुक एक लाख आहे मला तमुक लाख वाला मुलगा पाहिजे"
" अरे पुढे जाऊन इगो प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून ती म्हणाली असेल. तेव्हा 'हट!  नाही तर नाही' अशा भाषेत  तू उडवून लावलं  होतंस. "
"मग काय करू यार? मी तसला  आहे का ? माझा पगार तिच्यापेक्षा कमी म्हणून वाईट वाटून घेणारा? अरे मी आता पहिल्या फेज मध्ये आहे. माझ्या बिझनेस मध्ये माहित आहे ना ग्रोथ कसली आहे ती ?"
"अरे, पण या सगळ्या गोष्टी तिला सांगायच्यास  ना? "
"तिला कळायला नको? सरळ पैशाची फुटपट्टी वापरून मुलगा नाकारणारी मुलगी काय संसार करणार? एखाद्या वर्षी मला लॉस  झाला तर साली मला सावरायच्या ऐवजी मलाच दोष देईल असली पोरगी…"
"…"
"सॉरी  फॉर  that 'साली' "
"इट्स  ओके… पण मला सांग आपण ते 'पांचाली'  मध्ये गेलो होतो ते? ती मुलगी ? ती तर तूच नाकारलीस.   मला तेव्हापासून बोलला नाहीस तू काय कारण होतं ते!"
"हां  यार… ती 'पांचाली' " साव्या हसला "तिला मी विचारलं कि मुलाबद्दल तुझ्या अपेक्षा काय आहेत तर मला म्हणे 'मी बीई  केलं आहे त्यामुळे मला एम ई  किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा हवा… आई बाबा म्हणाले म्हणून मी आले आज. नाहीतर मला इंजिनियर किंवा एम ई मुलगा बघायचा होता… damn  दीज इंजिनियर्स " साव्याने एका झटक्यात 'बॉटम्स अप' मारला…

मला गिल्टी वाटलं…

" तू काही  म्हणाला नाहीस का तिला?"
"म्हणालो ना…. म्हटलं माझ्या बघण्यात जितके इंजिनियर मित्र आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्यांना नोक-या मिळत नाहीत ते लोक एम ई करतात. जे हुशार आहेत ते आयदर एमटेक  करतात किंवा एमएस, एमबीए असलं काहीतरी करतात अदरवाईज त्यांना कुठलीतरी कंपनी उचलतेच…"
"मग?"
"मग काय ? तिने असला विचारच केला नव्हता! मी तिला पुढे म्हटलं तुझ्या त्या कित्येक एम ई लोकांपेक्षा जास्त पगार कमावतो मी महिन्याला… बरोबर ना?"
"हो अर्थात.. पण मग पुढे ?"
"ती गांगरली . गडबडली. मग मीच म्हटलं तुमच्या पुढच्या शोध कार्यासाठी शुभेच्छा. बिल मागवून ते देईपर्यंत तिला एक शब्द सुद्धा सुचला नाही"
"कमाल आहे. काहीच बोलली नाही ती?"
"काय बोलणार? अरे ओळखीने कुठल्यातरी कंपनीत चिकटून खर्डेघाशी करूनही, मुलाबद्दल मात्र असल्या अपेक्षा ठेवणारी मुलगी आयुष्यात काही करेल ही अपेक्षाच बाळगणं व्यर्थ आहे."

मी शांत बसलो.. खरी होती त्याची गोष्ट.
आम्ही एका ठिकाणी मुलगी बघायला गेलो होतो. मुलीपेक्षा वडिलांचेच प्रश्न. "पगार किती, घरी कोण कोण असतं वगैरे नंतर त्यांनी विचारलं पुण्यात घर वगैरे विकत घेतलंय का? "
साव्याने शांतपणे नकारार्थी मान हलवली. " मी भाड्याने राहतो.. विनाकारण एवढी गुंतवणूक एकट्याने करून मी स्वतःचे आर्थिक हाल आणि ओढाताण का करून घेऊ?" हे त्याचं स्पष्टीकरण त्यांना रुचलं नसावं.
"स्वतःचं घर हवं हो आजकाल लग्न करायचं असेल तर.."
"तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं घर होतं का हो?"

उत्तरार्ध