Tuesday, September 26, 2017

बॅक टू स्क्वेअर वन


भरत नाट्य मंदिरमधून सुमेध आणि मी बाहेर पडत होतो.
'बघितलंस ना ?' बाइकला किक मारता मारता सुमेधने प्रश्न केला.
'हो.. 'स्क्वेअर वन' बद्दलच बोलतोयस ना?' मी विचारलं.

शेवटच्या दिवशी असणा-या पुरुषोत्तमच्या फायनल एकांकिकांपैकी 'स्क्वेअर वन' नावाची एकांकिका आमच्या दोघांच्याही मनात घर करून राहिली होती. जीआरई देऊन पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला जाणाऱ्या मुलांवर भाष्य करणारी ती एकांकिका होतीच तशी. इंजिनियरिंगला असताना होणाऱ्या चर्चांच्या, वादविवादाच्या अनेक टॉपिक्स पैकी 'ब्रेन ड्रेन' हा ऑल टाईम हॉट टॉपिक होता. त्यात सुमेधचा फेव्हरेट! अमेरिकेबद्दल प्रचंड दुस्वास असणाऱ्या लोकांमध्ये कम्युनिस्ट लोकानंतर या सुमेधचा नंबर लागला असता. भारतातून एम एस करायला यु एस ला जाणारे एन्थु लोक हे कॉलेजमधलं त्याचं सॉफ्ट टार्गेट होतं.

'एकांकिकेचा शेवट कसा केला ते सोडून दे पण मी नेहमी सांगत असतो तेच सांगितलंय ना पूर्ण एकांकिकेत?' सुमेध तावातावाने म्हणाला. एकंदरीत मला कल्पना आली होतीच. तसे आम्ही दोघे जिवलग वगैरे मित्र नव्हतो परंतु सुमेधच्या बिनतोड मुद्द्यांवर थोडंफार भाष्य करायची हिम्मत करणाऱ्यांपैकी तरी एकजण होतो. माझे अज्ञानातून आलेले प्रतिप्रश्न कधीकधी त्याला  एक वेगळा व्हयू पॉईंट देत असत आणि कदाचित त्याचे आधीचे बिनतोड मुद्दे अजूनच मजबूत बनवण्यासाठी अधिकची माहितीही पुरवत असत. त्या दिवशी तर त्याच्याकडे बाईक आहे आणि दोघांनाही पुरुषोत्तमच्या फायनल्स बघायच्या आहेत एवढी गरज मी त्या चर्चेचा भाग असण्यासाठी पुरेशी होती.

'आपल्यासारख्या लोकांनी, आपण या देशाचं, समाजाचं देणं लागतो असा विचार केला नाही तर कसं  होणार ? दर पिढीतली हुशार मुलं अमेरिकेचा रस्ता धरताहेत आणि नंतर इथे राहतोय तो गाळ. हेच लोक पुढे देश चालवणार आणि मग आपण, आपली पुढची पिढी, म्हणत राहणार कि आपण प्रगत कधी होणार?'
संभाषणाला असणारी एकांकिकेची पार्श्वभूमी बघता हे डिस्कशन कुठे जाणार हे मला कळलं होतं त्यामुळे चहाचा घोट घेत मी म्हटलं "हे असलं  बोलतोस म्हणून बाकीचंपण पब्लिक भडकतं तुझ्यावर."
"म्हणजे?" सुमेधनं विचारलं.
"म्हणजे हेच कि इथे राहतो तो गाळ वगैरे असं काही नसतं. आता तू आणि मी इथे, या देशात राहिलो, अमेरिकेला गेलो नाही म्हणून गाळ होऊन जातो का? हे आय ए एस, आय पी एस वगैरे सिव्हिल सर्व्हिसेस वाले लोक , डॉक्टर्स,  सी ए, इस्रो वाले सायंटिस्ट्स आणि बाकीचे कित्येकजण इथे राहताहेत म्हणून त्यांची व्हॅल्यू कमी नाही ना होत?'
"तू शब्दात पकडू नकोस रे.. मला काय म्हणायचंय तुला चांगलं कळतंय. जितके हुशार लोक देशातच राहतील तेवढं चांगलं नाही का देशासाठी? इथे राहणारे लोक त्यांचं ज्ञान देशासाठी वापरतील, चांगल्या सुविधा मागतील, त्या व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतील. हे हे आय आय टी, आय आय एम मध्ये लोकांच्या पैशावर शिकून मग ते ज्ञान दुसऱ्या देशाच्या प्रगतीसाठी वापरतात त्याचाच राग येतो. "

लोकांनी कररूपाने भरलेल्या पैशातून सरकार कमी फीमध्ये या संस्थांमध्ये शिक्षण देतं आणि मग तिथे शिकणारे , तिथल्या लॅब्ज , हॉस्टेल आणि इतरही अनेक सुविधा वापरणारे बरेचसे विद्यार्थी एकतर एम एस साठी किंवा मग गुगल मायक्रोसॉफ्ट सारख्या अतिविशाल कंपन्यांमध्ये, कॅम्पस सिलेक्शन मधून-भारतीय रुपयांत कन्व्हर्ट केली तर-कित्येक लाखात मिळणा-या पे पॅकेजेस च्या मोहापायी अमेरिकेला प्रयाण करतात याची सुमेधला मनस्वी चीड होती. मी एकदा त्याला 'पर्चेसिंग पॉवर पॅरिटी' म्हणजे थोडक्यात अमेरिकेत मिळणारे एकलाख डॉलर म्हणजे सरळ सरळ भारतातले पंचावन्न लाख रुपये होत नाहीत कारण तिथले खर्चही तसेच असतात वगैरे ऐकीव आणि 'वाचीव' ज्ञान सांगायचा प्रयत्न केला होता पण सुमेध मात्र हा मुद्दा आला कि काही ऐकण्याच्या पलीकडे जात असे. अगदी गद्दार, देशद्रोही च्या पातळीपर्यंत! कराच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट राजकारणी लोकांपेक्षा हि मुलं त्याला काही वेगळी वाटतच नसत.

"शांत वत्स शांत! कितीवेळा हे सांगणार आहेस तेच तेच?" मी विचारलं. "जाताहेत ते ठीकच आहे ना.. इथे राहून सारख्या कम्प्लेंट करत रहाण्यापेक्षा ते बरं...तुझं आणि माझं काय जातंय? उलट ते लोक गेले तर भारतातल्या तेवढ्या नोकऱ्या वाचतील असा हिशोब घालून बघ!" मी चेष्टेच्या सुरात म्हटलं.

 "तेच ना! म्हणजे एकंदरीत सिस्टीमचं  डिग्रेडेशन होत जाणार ना हळूहळू? काही नाही रे. स्वार्थ आहे हा.. निव्वळ स्वार्थ! फक्त पैशांच्या मोहापायी तिकडे पळतात हे असले लोक." चहा संपवत सुमेध म्हणाला. "जाईनात का तिकडेच सगळे.. माझं काsssही म्हणणं नाही मग तिकडे गेल्यानंतर इथल्या राजकारण्यांवर टीका करायची, देशाला शिव्या घालायच्या, इथे अमुक नव्हतं, तमुक नाही, इथे काही प्रगती होणार नाही म्हणून यु एस ला गेलो; असला दुबळा युक्तिवाद करायचा याला काही अर्थ नाही. 'कोई भी देश परफेक्ट नही होता, उसे  परफेक्ट बनाना पडता है" हा डायलॉग आठवतो ना रंग दे बसंती मधला? इथे राहून काहीतरी भरीव केल्याने, नवीन आयडिया आणल्याने, मतदान करून चांगले लोक निवडून दिल्याने हा देश सुधारेल कि बाहेर जाऊन देशाला शिव्या घातल्याने सुधारेल ?'  त्याच्या म्हणण्यात तसं थोडं तथ्य होतं. पण मला दोन्ही बाजू पटत असल्यामुळे नेमकं काय बोलावं या विचारात मी अडकून राहत असे.

आमच्याबरोबर कॉलेजात जीआरई टोफेल देणाऱ्या लोकांचा आकडा खूप जास्त होता. म्हणजे ओक अकॅडमी मध्ये जाणारी, कसली तरी कठीण कठीण इंग्रजी शब्दांची कार्ड घेऊन फिरणारी जनता बरीच होती. आता त्यापैकी ती एक्झाम क्रॅक करणारे, केलीच तर चांगली युनिव्हर्सिटी मिळणारे, मिळालीच तर स्कॉलरशिप किंवा/आणि कर्ज वगैरे मार्गाने पैशाची व्यवस्था जुळणारे असं होत होत प्रत्यक्षात अमेरिकेत जाणाऱ्या लोकांचा आकडा सुरुवातीच्या इच्छुकांच्या तुलनेत बराच रोडावलाच असता. परंतु सुमेधने तर - ते नुसते परीक्षा देताहेत म्हणजे अमेरिकेत चाललेच -असं गृहीत धरून सगळ्यांना शिंगावर घेतलं होतं आणि त्यापैकी काही महाभागही -आपण परीक्षा देतोय म्हणजे आता चाललोच - असं गृहीत धरून त्याच्यावर उलट आगपाखड करत असत.

"तुला काय वाटतं आम्ही काय मजा करायला चाललोय काय तिकडे? एज्युकेशनल लोन उचलावं लागणार आहे त्याच काय?  इकडे राहिलो तर हे शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं रिझर्वेशन, नंतरची वशिलेबाजी, राजकारणं , पावलोपावली बोकाळलेला भ्रष्टाचार कशाला सहन करत  बसायचं? हे सरकारी बाबू हात गरम केल्याशिवाय आपली कामं  करत नाहीत, कॉलेजमधले क्लार्क साध्या आमच्या हक्काच्या स्कॉलरशिपचा -जातीमुळे मिळालेली नव्हे-परीक्षा देऊन मिळालेल्या स्कॉलरशिपचा चेक रिलीज करायला नाटकं  करून दाखवतात, साध्या  ट्रान्सक्रिप्टच्या कामासाठी खेटे  घालायला लावतात.  पोलिसाला चिरीमिरी दिली नाही तर तो पासपोर्ट व्हेरिफिकेशन करत नाही.. आमच्या टॅलेंटला मित्रांमध्ये, शिक्षकांमध्ये जो मान मिळतो तो बाहेरच्या जगात कुठेही मिळत नाही.. मग आमची सगळी हुशारी इथल्या या गोष्टी सॉर्ट आऊट करण्यात घालवू का? तू म्हणतो आहेस इथले प्रॉब्लेम्स सोडवा.. कितीही प्रयत्न केला तरी  एका पिढीने सुटणारे नाहीयेत बाबा.. मग म्हणून इथे बसून सिस्टीम ला शिव्या घालण्यापेक्षा हे बरं ना? अमेरिकेत निदान टॅलेंट ला किंमत तरी आहे. हुशारीचं, कष्टाचं योग्य फळं मिळण्याचे 'फेअर चान्सेस' इथल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. इथेच राहून भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे हे मान्य करायचं किंवा डोळ्यादेखत गैरमार्गाने आरक्षण मिळवणारे बघून देशाबद्दल, सिस्टीमबद्दल वाईट बोलून इथलं  वातावरण गढूळ करायचं, वाद घालायचे, नालायक लोकांसमोर आपली लायकी काढून घ्यायची यापेक्षा इथून जायचा प्रयत्न करतोय तर जाणं कसं चुकीचं आहे हे सांगणारे तुझ्यासारखे दीडशहाणे भेटतात. चांगली लाईफस्टाईल मिळवणं हि गरज नसू शकते का आमची? कि जळतोस तू आम्ही 'तिकडे' जाणार म्हणून?" एखादा, सुमेधच्या बोलण्याने दुखावलेला, मनातली खळबळ,भडाभडा बाहेर काढत असे. 
 या आणि अशा चकमकी सुमेधला नवनवे मुद्दे मिळवून देत असत आणि सुमेध बऱ्याचदा तिथल्या तिथे हिशोब चुकता करत असे... अगदीच नाहीतर नंतर त्या व्यक्तीला गाठून त्याचं म्हणणं खोडून काढत असे.

"हे लोक मला म्हणतात कि मी जळतो त्यांच्यावर. मी कशाला जळू ? मला काय कमी आहे इथे? बरं  या बाकीच्यांना तरी काय कमी आहे? ३०-४० लाखाची एज्युकेशनल लोन मिळू शकणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती काय वाईट असते काय रे? फक्त पैशांच्या मागे धावून, चांगल्या लाईफस्टाईल च्या आशेने आई वडलांना एकटं टाकून तिकडे जाणं  माझ्या मनाला पटतच नाही." सुमेध म्हणाला.
  "अरे बाकीच्यांना काही आईवडिलांची काळजी नसते असं नाही, पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. आता एखाद्या मध्यमवर्गीय पोराला इथे एखादी नोकरी करून मध्यमवर्गीय लाइफ जगत राहण्यापेक्षा तिकडे जाऊन जास्त पैसे मिळवता आले तर बरंच आहे ना? तो ते पैसे भारतात पाठवेल आणि त्याच पैशात त्याचे एकटे आईवडील इकडे म्हातारपणात जास्त सुखात राहू शकतील. त्यामुळे आपली सिस्टीममधला पैसे सुद्धा वाढेल नाही का?" मी माझा काहीही संबंध नसताना उगाचच त्या पोरांचा बचाव करायचा प्रयत्न केला असं मला एक क्षण वाटून गेलं.
"अरे पण पैसाच म्हणजे सगळं असतं का रे? म्हातारपणी मुलगा मुलगी जवळ आहेत हे भावनिक सुख महत्वाचं कि पैसे फेकून मिळणारं भौतिक सुख? एवढं काय आहे तिकडे?" त्याला सांगायला मला तरी कुठे ते माहित होत? माझ्यासारख्या बऱ्याच जणांसाठी अमेरिका म्हणजे हॉलिवूड मुव्हीज मधून फिरवणारी, पेपरमधून दाखवली जाणारी, 'फ्रेंड्स'सारख्या सिरीयल मध्ये दिसणारी होती. पण ही ठिकाणं असणारं, ट्वीन टॉवर्सवालं , न्यायदेवतेच्या पुतळ्यावालं न्यूयॉर्क हा विशाल अमेरिकेचा एक छोट्टासा प्रांत आहे हे कळायला पुढे काही वर्ष जावी लागली! मला वाटायचं कि तिथे शिकायला जाणारे लोक तिथे शिकून परत भारतात आले तर लॉन्ग टर्म मध्ये देशासाठी ते भलंच असेल, त्यांच्या जग बघण्याचा, नॉलेज चा देशाला फायदा ह परंतु सुमेधने स्टॅटिस्टिकल स्टडी करून एकदा अमेरिकेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेलेले पुन्हा भारतात परतण्याचं  प्रमाण कसं एकदम फारच कमी आहे ते दाखवून दिलं होतं.

 "बघितलंस ना आजपण एकांकिकेत , तिथे म्हणे बॉण्ड साइन करून घेतात कि पुढे भारत-अमेरिका युद्ध झालं, तर तुमच्या निष्ठा अमेरिकेशी असल्या पाहिजेत, भारताशी नाही. " मला हॉस्टेलला ड्रॉप करून निघता निघता तो म्हणाला.
"अरे त्या एकांकिकेतल्या गोष्टी सगळ्या खऱ्याच असतील असं नाही. शेवटी काल्पनिक कथानक आहे ते! तिथलं नागरिकत्व घेताना कदाचित हा सवाल येत असेलही पण शिकायला किंवा नोकरीला जाताना कशाला निष्ठा गहाण ठेवायला लावतील ते? आणि एकांकिका हाच रेफरन्स धरायचा झाला तर तूही बघतिलंस ना एकांकिकेत शेवटी? तुझ्यासारखा अमेरिकाविरोधी लेक्चर देणारा पोरगा जीआरई देत असतो बाकीच्यांना अंधारात ठेऊन!" मी हसत हसत म्हटलं..

सुमेध गप्प बसला. एकांकिकेच्या सुरुवातीपासून सुमेधसारखी वैचारिक भूमिका घेऊन आलेला अभिनेता, इतरांना ते जीआरई देऊन केवढा मोठा देशविरोधी अपराध करत आहेत हे पटवून देतो मात्र त्यांच्या अपरोक्ष स्वतः ती परीक्षा देतो असा तो शेवट होता. अर्थातच स्वतःच्या विचारधारेशी प्रतारणा करणारा तो शेवट सुमेधला आवडला नव्हता.

           ----------------------X ------------------O -----------------X ------------------------

....अमेरिकेतल्या उठसुठ येणाऱ्या निरनिराळ्या 'शॉपिंग सिजन्स' पैकी ,शाळा सुरु व्हायच्या आधी असणाऱ्या 'बॅक टू  स्कुल' सिझनचा शेवटचा वीकेण्ड असल्यामुळे वॉल-मार्ट मध्ये प्रत्येक काउंटरला बिलींगसाठी भली मोठ्ठी लाईन होती.. माझा नंबर येईपर्यंत विरंगुळा म्हणून मी वेगवेगळ्या रंगाची,वर्णाची, रंगीबेरंगी कपड्यातली माणसं  निरखत होतो, अमेरिकेतही मोठ्या संख्येने दिसणाऱ्या आणि उगीचच ओळखीच्या वाटणाऱ्या भारतीय लोकांचं निरीक्षण करत होतो. माझा नम्बर आला. 'डिड यु फाईन्ड एव्हरीथिंग ऑलराईट सर?" खोटं  हसून काउंटरवरच्या मुलीने तिचा ठेवणीतला प्रश्न केला..... "सर? " तिने पुन्हा एकवार विचारलं पण..

मी स्तब्ध उभा राहिलो होतो... बाजूच्याच काउंटरवरच्या कॅरीबॅग्ज घेऊन सुमेध वॉल-मार्ट मधून बाहेर पडत होता!

Friday, January 20, 2017

शिकवणी


गणिताच्या सरांचा तो आवडता विद्यार्थी. शाळेत कोणालाही सांगितलं तर कोणीही ते अमान्य केलं नसतं. मुलगा हुशार, हस्ताक्षर सुरेख -अगदी सरांसारखंच- आणि मुख्य म्हणजे सर शिकवत असणाऱ्या विषयात रस असणारा. गणित आणि इंग्रजी हे बऱ्याच जणांच्या नावडीचे विषय त्यामुळे आपसूकच हे विषय शिकवणारे शिक्षकही! सर मात्र आवड निर्माण करायला बघत. हसतखेळत शिकवत.सगळ्या मुलांनी गणितात प्रगती करावी म्हणून सगळ्यांकडे तेवढंच लक्ष देत.. कच्च्या लिंबाकडे  जरा जास्तच! काही नाठाळ कार्टी मात्र निव्वळ विरोधासाठी विरोध असल्यासारखं मुद्दामच लक्ष देत नसत. मग मात्र सरांचा पारा  चढत असे. ते कधी कोणाला मारत नसत पण कान धरून उभं करत असत... मुलगा असो वा मुलगी! प्रत्येक वर्गात सरांचं  कोणी ना कोणी फेव्हरेट होतं. आणि नेहमी गणिताची आवड असणारं पब्लिकच.. :)

इतर सगळ्या शिक्षकांच्या तुलनेत त्यालाही सर जास्त आवडत असत. ते कधी त्याला रागे भरत नसत कि दटावत नसत. सर काय शिकवताहेत, कशाला शिकवत आहेत हे त्याला बाकीच्यांपेक्षा आधी समजत असे. त्यांची शिकवण्याची पद्धतच इतकी सुरेख होती कि त्याला सगळं वर्गातच समजत असे. गणिताची उत्तरं  त्याला चटकन येत असत. त्यामुळे हात वर केला तरी सर त्याला सहसा उत्तर सांगायला सांगत नसत. नंतर नंतर तर त्याने उत्तर येत असताना देखील हात वर करणंच सोडून दिलं. कारण सर 'इतरांना' विचारत असत. अर्थात सगळीच उत्तरं त्याला यायचीच असं नाही पण सरांना उगीच वाटत असे कि 'याला माहित असेल' ते कधी कधी त्याच्याही पथ्यावर पडत असे!

आवडत्या विद्यार्थ्यांपैकी कोणीही शंका विचारायला गेलं कि सर हातातलं काम सोडून ते उदाहरण सोडवायला घ्यायचे. कित्येकदा मधल्या सुट्टीत त्याला , स्टाफ रूमच्या दरवाजापाशी वही घेऊन उभा बघून सरांनी जेवणाचा उघडलेला डबा परत बंद करून ठेवला होता. एकसामायिक समीकरण असो कि एखादं  कठीण प्रमेय, सर हातातलं काम सोडून लगेच एक्स-वाय थिटा-गामा च्या जंजाळात गुंतून जायचे. शाळेतून घरी जायच्या आधी एखादे शिपाईकाका वर्गात येऊन, सरांनी सोडवलेलं-सुंदर काळ्याभोर अक्षरात स्टेप बाय स्टेप लिहिलेलं-गणिताचं उत्तर त्याच्या हातात सोपवून जायचे. मग तर त्याचा सरांबद्दलचा आदर अजून वाढत असे.

हुशारी सोडली तर बाकी कसलाच भेदभाव सरांनी केला नाही. गरीब-श्रीमंत, जात-पात, मुलगा-मुलगी, ओळखीतले- अनोळखी अगदी कसला कसलाच नाही. हो पण हुशारीवरून भेदभाव करताना, कमी हुशारांना प्रगती कशी करता येईल हे मात्र ते बघायचे. गाव छोटं असल्यामुळे मुलांचे आईवडील सरांना ओळखत असत आणि सरही त्यांना! त्यामुळे मुलांची विषयातली प्रगती त्यांच्या पालकांना परीक्षेआधीच समजत असे.

होता होता आठवी आली आणि वर्गात एक नवी ऍडमिशनही झाली. म्हणजे झाल्या बऱ्याच,पण ही विशेष होती. कारण तो ट्रस्टींचा मुलगा होता! सात वर्ष मुंबईमधल्या शाळेत शिकून कशाला कोण जाणे तो गावातल्या शाळेत आला होता. शाळेचे ट्रस्टी म्हणजे गावातली नावाजलेली असामी.. वर्षानुवर्षं शाळेचा कारभार त्यांच्याच इशाऱयांवर चालत असे. क्वचित वर्गांवर एखादी चक्कर सुद्धा होत असे. पण आता मुलाची ऍडमिशन झाल्यानंतर त्यांच्या चकरा वाढल्या. शाळेत पोरांना दमात घेणाऱ्या शिक्षकांची ट्रस्टींच्या मागे त्यांना खुश ठेवण्यासाठी चालणारी हांजी हांजी बघून तो मनातल्या मनात हसत असे. 'सगळे शिक्षक असतीलही लाळघोटेपणा करत पण सर नाही करणार!' त्याला ठाऊक होतं. आणि होतंच तसं. आधीच म्हटलं तसं सरांना 'टॅलेंट' सोडून इतर कशाशीच देणं घेणं नव्हतं.

ट्रस्टींच्या मुलाच्या ऍडमिशन नंतर वर्गातलं वातावरण गढुळलं होतं खरं पण त्याला काही फरक पडत नव्हता. पूर्वी प्रत्येक शिक्षकाचा कोणी ना कोणी फेवरेट असे किंवा कोणीच नसे. पण आजकाल नवा मुलगाच सगळ्या शिक्षकांचा 'फेव्हरेट' झाला होता.मराठी मिडीयमच्या शाळेतही तो " सर I've a doubt.. " वगैरे म्हणून शंका विचारत असे. ज्या  शिक्षकांना एकेकाळी मध्ये मध्ये प्रश्न विचारलेलं आवडत नसे ते त्याच्या शंकेचं  निरसन डेस्क वर जाऊन करून देत असत आणि इतरांना त्याचा 'आदर्श' घ्यायचं प्रवचन देत असत. मॅडम ना देखील तो स्टाईलमध्ये 'मॅ'म' म्हणत असे! सरांच्या पुढ्यात मात्र त्याची डाळ शिजत नसे.

वर्गात ऍवरेज असणारा तो मुलगा घटक चाचणीत मात्र बाजी मारून गेला. गणित वगळता इतर सगळ्या विषयात पठ्ठयाने चांगलाच स्कोअर केला. वर्गाला आता नवा कॉम्पिटिटर मिळाला होता. त्याला मात्र हे खटकत होतं. तपासलेले पेपर वर्गात बघायला दिल्यानंतर त्याला जाणवलं कि मराठी आणि इंग्रजीच्या पेपर्स मध्ये निबंध, सारांश असल्या विभागांमधले त्याचे मार्क कापले होते ज्यात तो शिक्षकांना चॅलेंज करू शकत नव्हता, नेमका त्याच विषयांमध्ये नव्या मुलाने त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवले होते. हा निव्वळ योगायोग होता? वर्गातल्या नेहमी दुसरा नम्बर येणाऱ्या मुलीने इतिहासाच्या मॅडमना विचारलं कि त्याने लिहिलेलं आणि तिने लिहिलेलं उत्तर सेम असूनही त्याला जास्त मार्क आणि तिला कमी असं का? तर मॅडम सगळ्यांसमोर असल्या डाफरल्या तिच्यावर! बिचारी रडायलाच लागली. त्याला जाणवत होतं कि होतंय ते चांगलं नाही.

त्याची घालमेल काही लपून राहत नव्हती. घरातही सगळ्याना ते जाणवत होतं. आजकाल जेवतानाही लक्ष नाही हे बघून त्याच्या आईने विचारलंच होतं कि त्याचं काही बिनसलंय का? खूप लपवायचा प्रयत्न करूनही त्याला ते काही जमलं नव्हतं आणि आईला त्याने सगळा प्रकार सांगून टाकला. नंतर एकदा बाजारात सर दिसल्यावर त्याच्या आईने सहज म्हणून विषय काढला आणि सरांकडे ट्रस्टींच्या मुलाबद्दल चौकशी केली. सरांनी त्यांचं परखड मत व्यक्त केलं  आणि "माझ्या वर्गातल्या मुलांवर कोणताही अन्याय होणार नाही याची जबाबदारी माझी!" अशी दबक्या आवाजात कबुलीही दिली. त्यामुळे निश्चिन्त झालेल्या त्याच्या आईने त्याला फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष द्यायला सांगितलं.

ट्रस्टींच्या हल्लीच्या वर्गावरच्या फेरीत- "दहावीत हमखास बोर्डात आणणाऱ्या" कोचिंग क्लास पेक्षा आपल्या शाळेतले शिक्षक कसे भारी आहेत, त्यामुळे कोणी तो कोचिंग क्लास लावायची कशी गरज नाही वगैरे लेक्चर असे आणि त्यांच्या मुलाच्या प्रगतीचा सगळ्यांसमोर घेतलेला लेखाजोखा! पण त्यांचा मुलगा उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तोच क्लास लावणार होता हे तर त्याने सांगितलेलंच उघड गुपित होतं. बाकीचे शिक्षक त्याची प्रगती वाढवून सांगत असताना सरांनी मात्र तो बीजगणितात आणि भूमितीत कसा कच्चा आहे ते निर्भीडपणे सांगितलं .  ट्रस्टीना ते काही फारसं  आवडलेलं दिसलं नाही पण त्याच्या मनातला सरांबद्दलचा आदर द्विगुणित झाला!

कोवळ्या वयात राजकारणाची जाणीव थोडीच असते मुलांना? त्याचाच फायदा घेऊन ट्रस्टींसमोर इंप्रेशन चांगलं करण्याच्या नादात त्यांच्या मुलाला मार्कांची खैरात वाटली जाऊ लागली. मागच्या परीक्षेपेक्षा जास्त मार्क असणारं मार्कशीट घेऊन येणाऱ्या त्याचा - गुणतालिकेतला नंबर दर परीक्षेगणिक वर सरकू लागला. सगळ्याच विषयांमध्ये त्याला त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळू लागले...आठवीच्या परीक्षेत जेमतेम पहिल्या दहात नंबर मिळवणारा तो नववीच्या वार्षिक परीक्षेपर्यंत दुसरा नम्बर मिळवू लागला. ट्रस्टीदेखील आपल्या मुलाची प्रगती बघून भारावून गेल्यासारखे झाले होते.! फक्त गणिताचा अपवाद वगळता! सरांनी बेधडक कमेंट केल्यामुळे त्यांची बदली होणार अशी अफवा पसरली होती. त्याचा जीव घायकुतीला आला.

सुदैवाने तसं  काही झालं नाही! उलट दहावीच्या वर्गात सर त्यांचे वर्गशिक्षक झाले. त्याला खूप बरं  वाटलं. महत्वाच्या वर्षात सगळं सुरळीत होणार होतं. पण आता ट्रस्टींचा मुलगा सरांच्या वर्गातला कच्चा लिंबू ठरला होता! ट्रस्टींनी बरोबर गेम टाकला पण कुणाला का वावगं वाटावं? ट्रस्टींनी आपल्या मुलाला रँकिंग मध्ये टॉपला आणायचा चंगच बांधला होता. सगळे नियम धाब्यावर बसवून त्यांनी मुलाला आणि त्याच्याभोवती लाळघोटेपणा करणाऱ्या दोन चारजणांच्या कंपूला सगळ्या सुविधा पुरवायला सुरुवात केली. त्यांच्या मुलाला आणि मित्रमंडळींना, स्कोअरिंगसाठी आठवीत निवडून दहावीपर्यंत बदलता न येणाऱ्या विषयात बदल करायची स्वतःच्या अखत्यारीतून मुभा दिली, शाळेत हवी तेव्हा दांडी मारण्याची सवलत दिली. वर्गातल्या इतरांना मात्र याच गोष्टी नाकारण्यात आल्या, कोणतंही कारण न देता आणि जाणीवपूर्वक! या इतरांमध्ये अर्थात त्याचाही समावेश होता! स्वतःची रेघ मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेघ खोडण्याचं तंत्र त्यांनी अवलंबलं. सरांच्या मानसिक आधारावर तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करू पाहत होता. सर मात्र वर्गशिक्षक या नात्याने वर्गातल्या सगळ्याच कच्च्या लिम्बाकडे विशेष लक्ष देऊ लागले होते.

'चल काहीतरीच काय?' त्याने मित्राला म्हटलं. 'इतर कोणाबद्दलही काहीही ऐकून घेईन मी पण सरांबद्दल खोटंनाटं ऐकून नाही घेणार"
"अरे खरंच! मी या डोळ्यांनी पाहिलं त्यांना शाळा सुटल्यावर ट्रस्टींच्या घरी जाताना."
"काहीतरी काम असेल त्यांचं.. "
" एकदा असतं तर तुला सांगितलं तरी असतं  का? हल्ली रोजच बघतो मी. नेताजी रस्त्याने जातात म्हणजे समजलं ना? माझ्या घराच्या वाटेवरून.  रोज तिकडेच जातात ते. मी एकदा जाऊन बघितलं तेव्हा कळलं मला. हवं तर उद्या येऊन बघ माझ्याबरोबर." विचार करतच तो घरी आला. त्या दिवशी आई कामावरून जरा लेटच आली. आल्या आल्या त्याला म्हणाली 'अरे आज तुझे गणिताचे सर दिसले होते रस्त्यात,आपल्या नेताजी रोडच्या बँकेत गेले होते ना.. तेव्हा. मी हाक मारली आणि त्यांनी बघितलंसुद्धा पण नंतर घाई घाईने निघून गेले. त्यांच्या लक्षात आलं नाही कि गडबडीत होते कोण जाणे!' त्याला काही सुचेचना! तो गडबडला, मनातल्या मनात कोसळला.

सहामाही परीक्षेत बीजगणितात आणि भूमितीत पहिल्यांदाच तो सोडून इतर कोणी तरी जास्त मार्क्स मिळवले.. खरतर दोन्हीत मिळून एक मार्क जास्त मिळवला.. अर्थात ट्रस्टींच्या मुलानेच!  सरांबरोबर कसंनुसं हसत त्यानं त्याची उत्तरपत्रिका घेतली.. तीन टिम्ब असणारं 'म्हणून' चिन्ह दिलं नाही यासाठी अर्धा आणि प्रमेयाची सिद्धता लिहिताना एक उघड असणारी पायरी गाळली म्हणून अर्धा - असा एक मार्क कट झाला होता.. ट्रस्टींच्या मुलाने स्वाध्याय आणि मेहनत याच्या जोरावर कमी वेळात गणितात कशी प्रगती केली ते सरांच्या तोंडून ऐकताना तो आतल्या आत तुटत होता! संपूर्ण बोलण्यात सरांनी एकदाही त्याच्या नजरेला नजर मिळवली नाही.. दोघांमधलं अंतर दिवसागणिक वाढत जात होतं! सहामाही सारखाच प्रिलिम्स मध्येही ट्रस्टींच्या मुलाचा पहिला नम्बर आला याचं त्याला फार कौतुक वाटलं नाही. वाटेत येणारे सगळे अडथळे ओलांडून जात किंवा त्याकडे दुर्लक्ष करत त्याने शेवटच्या परीक्षेचा अभ्यास जोरात सुरु केला.

...दहावीची मेरिट लिस्ट जाहीर झाली आणि त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. बोर्डात दहावा आणि जिल्ह्यात पहिला नंबर! अपेक्षेपेक्षा जास्तच मार्क्स मिळाले त्याला! त्याच्या वर्गातली ती मॅडमचं बोलणं खाणारी मुलगी तर बोर्डात पंचविसावी आली होती!ट्रस्टींच्या मुलाचा हिंदी संस्कृत मधे बोर्डात पाचवा नंबर आला होता.  दुपारी शिपाईकाकांकरवी मुख्याध्यापकांचं बोलावणं आल्यानंतर तो शाळेत गेला. दोन मुलं मेरिट लिस्ट मध्ये आणि एक मुलगा एका विषयात बोर्डात पाचवा आल्यानंतर शाळेत अर्थातच आनंदाचं वातावरण होतं. सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत तो मुख्याध्यापकांच्या केबिनकडे पोहोचला. आतमध्ये मोठं मोठ्याने ट्रस्टींच्या मुलाच्या बोलण्याचा आवाज येत होता..
'असं कसं होऊ शकतं? काहीतरी नक्कीच चुकलंय! मी रीव्हॅल्यूएशनला टाकणार आहे पेपर्स!! शाळेत पूर्ण वर्षभर मी त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवले सगळ्या विषयात, आणि तरीपण आता बोर्डाच्या परीक्षेत त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स कसे काय?' तो तावातावाने विचारत होता
'सोपं आहे, तुझे पप्पा, 'शाळेचे' ट्रस्टी आहेत, बोर्डाचे नाहीत' सरांचा आवाज आला. काही क्षण शांतता पसरली. भलामोठ्ठा सुस्कारा सोडल्याच्या आवाज आला आणि त्याबरोबरच केबिनचा दरवाजा उघडला गेला.. ताडताड पावलं टाकत ट्रस्टींचा मुलगा बाहेर निघून गेला.. अवघडलेल्या प्रसंगातून बाहेर आलेल्या मुख्याध्यापकांनी आत बोलावून त्याचं अभिनंदन केलं. शाळेचं नाव मोठं केल्याबद्दल आता उभ्या असणाऱ्या सगळ्या शिक्षकांनी त्याचे आभार मानले. त्याने देखील सगळ्यांना धन्यवाद दिले. जरी परीक्षेत त्याचे श्रम असले तरी वर्गात या शिक्षकांनीच शिकवलं होतं ना!

'जरा एक मिनिट चल माझ्याबरोबर.' सर म्हणाले. ते त्याला शाळेच्या गच्चीवर घेऊन गेले. "तुझी आई भेटली होती सकाळी. पेढे घेऊन आली होती. म्हणत होती, शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी असते.. शिक्षक एकदा विद्यार्थ्यांच्या नजरेतून उतरले तर पुन्हा वरती जाणं  मुश्किल असतं"
सर शांतपणे बोलत होते. " माझी बदली करणार होते- हे लोक- शाळेच्या दुसऱ्या ब्रान्चला, दुसऱ्या गावात... एसटीने २ तास जायला आणि  २ तास यायला लागतात.रोज अप-डाउन करायला सांगत होते. डोक्यावर हा कर्जाचा डोंगर; त्यात मुलांची शाळा, बायकोचं दुखणं- औषधं, इथल्या डॉक्टरांची चालू असणारी ट्रीटमेंट. एका बदलीने सगळं पैशाचं गणित कोलमडून पडलं असतं. "

सरांची नजर शून्यात लागली.
"ट्रस्टी म्हणाले मी बदली थांबवतो पण माझ्या मुलाचा कसाही करून पहिला नंबर आणा! गणितात कच्चा आहे म्हणता तर घरी येऊन गणित शिकवा.. मी लाचार होतो रे.."
सरांचा आवाज कातर झाला.
"पण... पण तू प्रूव्ह  करून दाखवलंस शेवटी. ह्या सगळ्या परिस्थितीचा धैर्याने सामना केलास आणि त्याच्यावर मात केलीस.. मला माहित नाही तुला माझ्याबद्दल काय वाटतंय ते ; पण फक्त एकच गोष्ट करशील माझ्यासाठी?"
तो शांत उभा राहिला..
"आयुष्यात कधीतरी मला माफ करशील?"  एवढा वेळ धरून ठेवलेला अश्रूंचा बांध कोसळून पडला आणि त्याला जवळ घेऊन सर ढसाढसा रडू लागले!

Tuesday, October 25, 2016

परवाना करी दिवाना :उत्तरार्ध

पूर्वार्ध: 

सेक्रेटरीएट ऑफ स्टेटच्या ऑफिस मध्ये एका भल्यामोठ्या रांगेत पब्लिकची कागदपत्र चेक करण्यात येत होती. हि रांग ऑफिस मधूनही बाहेर आली होती. नशिबाने मी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली असल्याने मला त्या रांगेतून माझा नंबर येईपर्यंत वाट बघत राहावी लागली नाही. लाइनमधल्या कित्येकांना हे ऑनलाईन अपॉईंटमेन्ट वगैरेचं प्रकरण माहितीही नव्हतं त्यामुळे अमेरिकन जनता सुद्धा आधुनिकतेपासून दूर असू शकते हा साक्षात्कार झाला. सरकारी ऑफिसात धक्काबुक्की, घुसाघुसी आणि वादावादी न करता रांगेत उभं राहिलेलं पब्लिक आणि आपल्याला समजेल इतक्या वेगाने पुढे सरकणाऱ्या रांगा हा मात्र निर्विवादपणे अमेरिकन फॅक्टर!! या खिडकीतून त्या खिडकीत पळवण्याचे सरकारी उद्योग इथंही चालतात त्याला अनुसरून नवीन लायसन्स साठी दोन काउंटर फिरल्यावर तिसऱ्या ठिकाणी मी उभा राहिलो.

दहा-एक मिनिटं तिसऱ्या काउंटर समोर उभा राहिल्यावर मी कशासाठी उभा राहिलोय ते मला विचारण्यात आलं. मी सांगितल्यावर 'तू सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं?' असा उलट प्रश्न आला. आता काय बोलणार? बरं पुढे काय तर परीक्षा द्यायची.. त्या बाईने मला पेपर आणि पेन्सिल दिली आणि एका 'एक्झाम सेक्शन' असा बोर्ड असणाऱ्या ओपन एरिया मध्ये बसून पेपर लिहायला सांगितलं. मी अवाक झालो!  आपल्याकडच्या परीक्षा पद्धतीची सवय असणाऱ्या मला थोडावेळ काही झेपलंच नाही. आपल्या इथं लर्निंग लायसन्ससाठी पद्धतशीर एका खोलीत बसवून प्रश्न दाखवतात आणि तुमच्या बेंचवर असणाऱ्या A B C बटणांपैकी योग्य बटण दाबायला सांगतात. थोडक्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरून परीक्षा देण्याचा हा अनुभव गाठीशी असताना अत्याधुनिक अमेरिकेत कम्प्युटर, टॅब किंवा असंच काहीतरी देऊन टेस्ट द्यावी लागेल असं उगाच वाटत होतं आणि हातात मिळाली पेपर आणि पेन्सिल!

चटकन येणारी उत्तरं सुरुवातीला,थोडी कठीण वाटणारी नंतर आणि 'ड' गटातली शेवटी-असला फॉर्म्युला वापरायची वेळदेखील येऊ नये असला तो पेपर होता! नाही म्हणायला कनफ्यूज होण्यासाठी 2 प्रश्न होते.. ज्यांनी पहिला प्रयत्न देवाला सोडायला सांगून विनाकारण टेन्शन दिलं होतं त्यांच्या मातोश्रींचा मनातल्या मनात उद्धार करून साधारण अर्ध्या तासात मी सोडवलेला पेपर परत दिला. सुपरवायझर नाही कि घंटा नाही.. अगदीच सिरियसनेस जाऊ नये म्हणून माझ्या पाठीमागच्या बाजूला 'कृपया मोबाईल वापरू नये' अशी विनंतीवजा सूचना (अर्थात इंग्रजीतून) चिकटवून ठेवली होती! मघाच्याच बाईने माझ्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका छापून आणली आणि माझ्या समोरच पेपर तपासला. तपासला म्हणजे प्रत्येक उत्तरावर तांबड्या मार्करने ती तिरकी काट मारत सुटली. प्रत्येक काट छातीत धडकी भरवत होती. घाबरून मी विचारलं कि "डिड आय आन्सर एव्हरीथिंग रॉंग?" तर ती बया म्हणे कि "मी बरोबर असणाऱ्या उत्तरांवर अशी खूण करतेय!" अगदी ओठांवर आलेला "शाळा कुठली गं  तुझी?" हा प्रश्न मी महामुश्किलीने गिळून टाकला. 2 प्रश्न वगळता सगळं बरोबर होतं.. आता ते 2 प्रश्न चुकल्यामुळे मी त्यांना कनफ्यूज करणारे म्हटलं ते वेगळं सांगायला नको! झालं.. दृष्टी - कागदपत्र तपासणीचे उरलेले सोहळे आटपल्यावर आणि रोख फी भरल्यानंतर लर्निंग लायसन्स ताब्यात आलं. सुदैवाने भारतीय परवान्यामुळे मला ताबडतोब प्रात्यक्षिक परीक्षा द्यायला परवानगी देण्यात आली होती.

आता लायसन्स घ्यायचं तर प्रात्यक्षिक द्यायलाच हवं--प्रात्यक्षिक द्यायचं तर गाडी हवी--गाडी विकत किंवा लीज वर घ्यायची तर लायसन्स हवं--इतर कोणाची मागावी तर इन्शुरन्स वर चालकाचं नाव हवं--बरं इन्शुरन्स वर नाव ऍड करायचं म्हटलं तर ज्याचं नाव ऍड करायचं त्याचं लायसन्स हवं-- आणि लायसन्स घ्यायचं तर प्रात्यक्षिक द्यायलाच हवं! म्हणजे नोकरी नाही म्हणून अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून नोकरी नाही च्या धर्तीवर लायसन्स आणि गाडी चा खेळ चालू झाला! लोकांशी बोलताना नव्याने इमिग्रेट झालेल्या लोकांना भाड्याने गाड्या देणाऱ्या एका गॅरेज मालकाबद्दल माहिती कळली, त्याच्याकडे गेलो तर त्याच्या सगळ्या गाड्या बाहेर गेलेल्या होत्या, होती ती एक अतिप्रचंड जुनाट गाडी. तो माणूस ती सुद्धा कशी  'मख्खन' आहे वगैरे गोष्टी समजवायला लागला! आता हे लोढणं महिनाभर गळयात अडकवून घेण्यापेक्षा लोकांचे उपकार घेणं परवडलं असतं. "एखादी-चालवताना स्वतःचीच स्वतःला लाज वाटणार नाही -इतपत बरी गाडी असेल तर सांग" असं त्याला सांगून मी बाहेर पडलो. अनेक ठिकाणी चौकश्या करून दमल्यावर सरतेशेवटी आमचं हपिस मदतीला आलं. इन्शुरन्स बद्दल चौकशी करायला गेलं असताना 'गरजू' लोकांना ऑफिस आठ्वड्याभरासाठी गाडी + विमा कागदपत्रं देतं असं कळलं. नेहमी भांडल्यासारखा वाटणारा आवाजाचा सूर कटाक्षाने खालच्या पातळीत ठेऊन मी स्वतःला 'गरजू' ठरवण्यात यशस्वी झालो आणि ऑफिस ने मला आहे तेवढं पेट्रोल भरून द्यायच्या बोलीवर सात दिवस वापरायला गाडी दिली..

आता सुरु झालं प्रात्यक्षिक! अमेरिकन जमिनीवर पाऊल ठेवल्यानंतर मी पहिल्यांदाच गाडीत ड्रायव्हर सीट वर बसत होतो. डावीकडे!!  ड्रायव्हिंग गाईडलाईन्स चं  पुस्तक कोळून प्यायलं आणि कितीही नाही म्हटलं तरी सुरुवातीला आपला मेंदू गाडी डावीकडूनच चालवायला आणि गाडी रस्त्याच्या (लेनच्या) उजवीकडे ठेवायला सांगतोच सांगतो! त्यात भारतात स्वतःची गाडी असताना आणि ती इतकी वर्ष चालवत असताना इथे ड्रायव्हिंग स्कुल मध्ये परत शिकणे हा कसा अपमान समजला पाहिजे यावर इतरांनी माझी बौद्धिकं घेतली. त्यात क्लासचं  टायमिंग ऑफिसच्या वेळात आणि वरून दर ताशी काही डॉलर्स अशी दणकावून फी! त्यामुळे तो मार्गही माझा मीच बंद करून टाकला. सात दिवसात गाडी परत करायची बोली असल्यामुळे वेळ दवडून उपयोग नव्हता. शेवटी नवख्या ड्रायव्हर सारखं अगदी स्लो सुरुवात करून रात्रीच्या वेळी कम्युनिटीच्या आतल्या रस्त्यांवर निशाचरासारखी मी गाडी फिरवायला लागलो. दोन दिवसांनी शेजारी एकाला नियम पाळतोय का ते बघण्यासाठी बसवून मुख्य रस्त्यावर बाहेर पडलो. पण सगळं स्मूथ होईल तर शप्पथ! थोडं अंतर जातो न जातो तोच 'टॉंय टॉंय टॉंय' असा सायरनचा आवाज आला! मी टरकलो.. निळा गणवेश, रंगांची उधळण, पिस्तुलधारी पोलीस सगळे डोळ्यासमोरून तरळून गेले.. च्यायला, गाडी चालवायला बाहेर पडलो नाही आणि मी कुठलातरी नियम तोडला कि काय ?  पण नाही, नशिबाने अँब्युलन्स होती. इतरांचं  बघून मीही  गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. कमाल  म्हणजे रस्त्याच्या अलीकडे पलीकडे असणाऱ्या सगळ्या गाड्या थांबल्या होत्या! अँब्युलन्स गेल्यावर परत सगळे रस्त्यावर आले (शब्दशः अर्थ घेणे!). नाही म्हटलं तर चकित व्हायला झालंच.


असो, अशा रीतीने कधी अँब्युलन्स तर कधी स्कुलबस तर कधी रस्ते दुरुस्त करणाऱ्यांची गाडी , असे (पोलिसांची गाडी वगळता) इतर वाहनांचे अनुभव घेत घेत ६ दिवस उलटून गेले.  होता होता, बाकीच्या गाड्यांचा अंदाज आला, रस्त्यावरच्या सूचनांकडे आपसूकच लक्ष दिलं  जाऊ लागलं. अंडर कन्स्ट्रक्शन रोड्स वरचे 'रस्ता  कामगाराला जखमी केलंत तर ७५०० डॉलर्स दंड आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास' अशा अर्थाचे बोर्ड भीती दाखवायचे कमी झाले. थोडा तरी कॉन्फिडन्स आला. मी आधीच अधिकृत प्रात्यक्षिक घेणाऱ्या आणि सर्टिफिकेट देणाऱ्या प्रायव्हेट ड्रायव्हिंग स्कुल ची अपॉईंटमेन्ट घेतली होती. म्हटलं होईल ते होईल! त्यादिवशी थोडा जास्त वेळ देवासमोर घालवू आणि जाऊ. समजा नापास झालोच तर चारचौघात बदनामी नको या हेतूने 'वैयक्तिक कामासाठी' म्हणून ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन गुपचूप जायचा माझा प्लॅन होता. अर्धा दिवस सुट्टी तर मंजूर झाली पण गुपचूप सटकायच्या धोरणाला सुरुंग लागला. ज्या माणसाने ऑफिसची गाडी माझ्या ताब्यात सोपवली होती तो सकाळी सकाळीच 'मी गाडी ठरल्याप्रमाणे आणि पेट्रोल वगैरे भरून वेळेत परत करणार आहे ना'  याची खातरजमा करायला माझ्या जागेवर आला. मी त्या दिवशी टेस्टला जाणार आहे हे कळल्यावर त्याने बोटाने लांब दिसणारी एक जागा दाखवून तिथे बसणारी अमुक एक मुलगी महिन्याभरापूर्वी कशी लागोपाठ दोनदा फेल झाली होती आणि रडत होती याचं अगदी रसभरीत आणि यथायोग्य हावभाव करीत वर्णन केलं आणि वरून 'ऑल द बेस्ट' देऊन गेला. आधीच उद्यापासून गाडी नसणार हे टेन्शन आणि त्यात त्याचं ते अगोचर वागणं! हे कमी म्हणून कि काय त्याच्या (अमेरिकन रिवाजाप्रमाणे) मोठमोठ्याने बोलण्यामुळे आणि विनाकारण केलेल्या गडगडाटी हास्यामुळे आजूबाजूच्या चार जणांना  मी कुठे जाणार आहे ते कळलं आणि त्यांनी मोलाचे सल्ले देऊन कमी अधिक प्रमाणात 'माझं टेन्शन कमी तर होणार नाही ना' याची काळजी घेतली.

ठरलेल्या वेळेप्रमाणे मी निघालो तर अर्ध्या रस्त्यात ड्रायव्हिंग सेंटर वाल्या बाईंचा फोन! त्या स्वतःच  माझ्या परीक्षक असणार होत्या. मी त्यांना 'पाच मिनिटात पोचतो' असं सांगितलं परंतु बहुतेक तिला माझ्यासारख्या लोकांच्या 'पाच मिनिटांचा' अर्थ ठाऊक असावा. तिने 'आतापासून १० मिनिटात पोहोचला नाहीस तर मी तुझ्यसाठी थांबू शकत नाही' अशी प्रेमळ सूचनावजा धमकी दिली. सुदैवाने मी पाचव्या मिनिटाच्या आतच तिथे पोहचलो आणि 'एक बार जो मैने कमिटमेंट दे दी' च्या धर्तीवर 'मी कसा पक्का वेळ पाळणारा आहे' या अर्थाचं एक वाक्य फेकलं. परीक्षक आणि पर्यवेक्षक अशी दुहेरी भूमिका निभवायला तयार असणाऱ्या त्या वयस्कर स्त्रीने माझं वाक्य ऐकून उगाच कायच्याकाय तोंड केलं आणि माझे कागद तपासायला घेतले. \ त्यानंतर गाडीचे लाईट, इंडिकेटर्स, हॉर्न सगळं एक एक करून तपासलं. जणू काही मी तिला सेकण्डहॅन्ड गाडी विकायला आलोय!

सुरुवातीला बाहेर उभं राहून तिने थांबणं, रिव्हर्स घेणं, पार्किंग करणं यासारख्या प्राथमिक गोष्टी मला करायला लावून त्याला मला जमताहेत आणि मी गाडीत बसवून नेल्यानंतर गाडीसकट तिला 'आपटवणार' आणि 'आटपवणार' नाही  याची खातरजमा करून घेतली.  त्यानंतर सुरु झाली परीक्षा. एक्स्टर्नल व्हायव्हा च्या वेळेला  जे फिलींग येते ते घेऊन मी तिच्या सूचनांनुसार गाडी चालवायला लागलो.. पण इथे प्रॅक्टिकल करत व्हायव्हा द्यायची होती! ती अगदी काटेकोर पणे  मी स्पीड लिमिट्स, सिग्नल्स, नियम पाळतोय का ते पाहत आपल्या नोंदवहीत टिपणं काढत होती. मध्ये मध्ये मला वाहतुकीच्या नियमासंदर्भातले प्रश्न विचारत होती. त्यामध्ये "समोरून कोणीतरी गाडी चालवत तुझ्या दिशेने आला आणि तुला ठोकणारच आहे तर तू गाडी कुठे आपटवशील?" अशा सारख्या अघोरी प्रश्नांचाही समावेश होता. "शुभ बोल गं नारी" असं मनात म्हणून दिलेली माझी उत्तरं ती नोंदवून घेत होती. रेडिओ बंद कर, ए सी चालू कर असा बावळटपणा करायला सांगत होती. मध्येच 'वॉच युर स्पीड' वगैरे सांगून सावध करीत होती. गाडीतल्या बटणांची कार्यपद्धती आणि त्या एरियातले साधारण सगळे गल्लीबोळ तिच्या मनासारखे बघून झाल्यानंतर तिने मला गाडी हायवे ला घ्यायला लावली. माझ्या डोळ्यांसमोर आपल्याकडच्या ड्रायविंग टेस्ट चे सुखद अनुभव तरळून गेले..

"साहेब, हे काय? ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुमचीच गाडी आणलीय का? " -इति परीक्षा घेणारा खाकी वर्दीधारी इसम.
"होय साहेब.. हि हि " -इति मी
"वा! आता या रस्त्याने पुढे जावा आणि वळवून आणा." - खा. व. इ. 
"माझ्याबरोबर कोणी बसणार नाही? तुम्ही?" -मी
"मी या ड्रायव्हिंग स्कुल वाल्यांच्या गाडीत बसणाराय, जावा तुम्ही" - खा. व. इ.
मी गेलो आणि साधारण दोनशे फुटावरच्या अंतरावरून गाडी वळवून परत आलो. वर्दीधारी इसम रस्त्याच्या पलीकडे राहिला आणि "ड्रायव्हिंग स्कुलवाल्यांच्या गाडीत" बसायच्या तयारीत होता
"ओ ss  साहेब... मी काय करू?" - मी
"जावा तुम्ही, येईल तुमचं  लायसन्स" - खा. व. इ.
 "बरं..!" -इति मी आणि इत्यस्तु ! हाय काय नि नाय काय!!

"टेक दि नेक्स्ट एक्सिट अँड रिमेम्बर यू नीड टू स्टाप दि इंनिकेटा (प्रमाण भाषेत इं-डि-के-ट-र) वन्स यू मुव्ह्ट टु डिजायर्ड लेन" तिच्या सूचनेने मी त्या रम्य आठवणींच्या तंद्रीतून वास्तवात आलो. साधारण चाळीस पंचेचाळीस मिनिटं गाडीचं पेट्रोल जाळल्यानंतर आम्ही परत होतो त्या ठिकाणी पोहोचलो. तिच्या हातावरच्या अर्जावर तिने केलेल्या असंख्य खुणा बघून काळीज धडधडलं. निर्विकार चेहऱ्याने ती अजून काहीबाही लिहीतच होती. घाबरतच मी तिला विचारलं की "हौ वॉज इट? डिड आय ड्रॅईव्ह वेल ऑर इट वॉज अ  स्केअरी ड्रॅईव्ह?" मी गाडी चालवताना केलेल्या चुकांचा पाढा वाचून दाखवून काही क्षण जाणीवपूर्वक शांतता ठेऊन ती म्हणाली "तरीसुद्धा तू टेस्ट पास झाला आहेस.. हे घे तुझं सर्टिफिकेट!" मी सुस्कारा सोडला.

ते सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा एस ओ एस च्या ऑफिस मध्ये गेलो. प्रथेनुसार एक बावरलेल्या चेहऱ्याचा आधार कार्ड टाईपचा फोटो काढला आणि सगळ्या कागदपत्रांसहित पक्क्या लायसन्सच्या औपचारिकता पूर्ण केल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसची गाडी परत केली(अर्थात पूर्ण पेट्रोल भरूनच.. नसत्या शंका घेऊ नयेत!) त्यानंतर पुन्हा इतरांच्या उपकारावर काही दिवस काढल्यावर माझे लायसन्स घरपोच आले आणि अशा तऱ्हेने अमेरिकेतल्या गाड्यांच्या गर्दीमध्ये अजून एका गाडीची भर घालण्याचा माझा मार्ग मोकळा झाला!!