मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

आर्टी

आर्टी म्हणजे आर टी.. हे त्याचे इनीशीयल्स नव्हते बरं का.. आर टी म्हणजे रोख-ठोक. माणूसच तसा! एकदम सडेतोड. तसा तो पेशाने डॉक्टर. लोक त्याला डॉक्टर म्हणूनच ओळखत आणि हाक ही अशीच मारत.. "ओ डॉक्टरसाहेब!" अशी.. पण मी त्याला आर्टीच म्हणत असे..सावंतवाडीच्या कॉलेजातून बीएएमएस (मुंबई) केलं होतं त्याने. (पूर्वी मुंबई युनिवर्सिटी ही डिग्री द्यायची; हल्ली नाशिक युनिवर्सिटी देते. त्यामुळे कंसात काहीतरी मेन्शन करावं लागतं म्हणे!) मी शाळेत होतो तेव्हा आमच्या नात्यातला एकजण- एक दादा तिथे शिकत होता. त्याचा हा मित्र. त्याच्याबरोबर तो आमच्या घरी यायचा. सुट्टीच्या दिवशी घरचं जेवण जेवायला. घरात लगेच मिक्स होऊन गेला तो. त्या दिवसातसुद्धा संस्कृत आणि इंग्लिश मध्ये लिखाण असणारी मोठी मोठी पुस्तकं,ग्रंथ वाचायचा..आणि मला उपदेशाचे डोस द्यायचा! मला तर आधी वाटायचं, याला हे सगळं त्या संस्कृत श्लोकांमधूनच समजतं कि काय! :) पण नाही!.. ते रसायनच अजब होतं.

आर्टीचं बीएएमएस झाल्यावर त्याने त्याच्या गावात दवाखाना टाकला. तो चांगला चालायलासुद्धा लागला. मग त्याचं आमच्याकडे येणं जवळजवळ थांबलं. पण मग मी माझ्या आजोळी गेलो कि आवर्जून त्याच्याकडे जायला लागलो. दवाखाना म्हटलं कि एकतर पांढरीफटक किंवा मळकट निळसर,हिरवट असे आजारीपणाचं  फिलिंग देणारी खोली डोळ्यासमोर येते, त्यात डेटॉल,फिनाईल किंवा तत्सम जंतूनाशकाचा दर्प,वेगवेगळ्या विकारांचे पोस्टमार्टेम करणारे फोटो किंवा पोस्टर असं काहीतरी भयंकर डोळ्यासमोर येतं. पण आर्टी वेगळा होता. प्रचंड स्वच्छ दवाखाना,आकर्षक रंगसंगती, कुठून तरी आणलेलं सुंदर वासाचं जंतुनाशक, थोड्या थोड्या वेळाने हवेत स्प्रे होणारे सुवासिक स्प्रीन्क्लर्स असा त्याचा थाट होता. का नाही येणार पेशंट्स? तिथे आल्या आल्या त्यांना निम्म बरं वाटत असेल!

तो पेशंटशी बोलत असताना फार कमी लोकांना तिथे थांबण्याची परमिशन होती. मी त्यातलाच एक सुदैवी!
"काय होतंय काका?"
"बर नाय वाटत हाय..गळून गेल्यासारक वाटत हाय..विन्जेक्षण द्या!!"  मी आश्चर्यचकित!
"ताप,खोकला, अंग दुखी वगैरे?"
"बाकी काय नाय,"
"काका,शेती केलीत ना आता? त्यानं थोडफार होतं असं.."
"तुमी ते विन्जेक्षण द्याना डागतर.त्यांनी बरं वाटतंय" गावातले लोक त्याच्याशी 'शुद्द आणि सपष्ट' बोलायचा प्रयत्न करीत असत!
"बरं.. या इथे बेडवर..चप्पल काढून ठेवा.." वगैरे वगैरे.. मी गुपचूप पणे बघत होतो..

"आर्टी.. लोक इंजेक्शन द्या म्हणाले कि तू देतोस? कमाल आहे!" पेशंट गेल्यावर मी म्हटलं..
"ग्लुकोजचं इंजेक्शन असतं रे ते..या लोकांना थकवा येतो शेतीभाती करून. ग्लुकोज ने थोडी तरतरी येते.."
"च्यायला, म्हणून तू ३० ३० रुपयांना नाडतोस?"
"काहीही काय बोलतोस? मी नाही दिलं तर ते तिकडे त्या डॉक्टर शानभाग कडे जाऊन तेच इंजेक्शन घेणार.. मला ३० रुपये देतात ते त्याला जावून ५० देणार.. वरून 'या डॉक्टरला  काय जमत नाही' असं म्हणणार ते वेगळंच! गावातले लोक आहेत बाबा हे.. सगळं जपावं लागतं. पेशंट गमावून चालणार नाही मला."
"हो,शेवटी तुझा पैसा त्यांच्या खिशातूनच येतो.." मी टोमणा मारला
" तू लहान आहेस अजून आणि माझा लाडका म्हणून मी हे ऐकून घेतो हां!" drawer उघडत आर्टी म्हणाला "या माझ्या सगळ्या पेशंट्सच्या फाईल्स आणि केस पेपर्स. इतक्यांचा स्टडी आहे माझा,त्यांच्या हिस्टरी सकट. कोणाला कशाची allergy आहे इथपासून कोणत्या औषधाला कोण कसं react करतं इथपर्यंत. म्हणून त्यांनी लक्षणं सांगितली कि मी लगेच डायग्नोस करतो काय झालंय ते.  एक पेशंट गमावला कि ही फाईल म्हणजेच त्याच्यामागचे माझे प्रयत्न, सगळं वाया गेलं! समजलं?"

नजरेत जरब, वागण्याबोलण्यात शून्य गोडवा असा हा प्राणी.
"नाही आवडत मला गुलझार! लोकांना आवडतो म्हणून मला आवडलाच पाहिजे का?"
"तसं नाही.." माझी सारवासारव
"मला नाही कळत उर्दू.. आणि त्याचं तर नाहीच नाही. मी म्युझीकपेक्षा लिरिक्स ऐकणारा माणूस आहे. गाणी ऐकून म्हणायला आवडतात मला.. त्यामुळे असेल कदाचित. आता त्या 'छैय्या छैय्या' गाण्यातलं 'गुलपोश कभी इतराए कहीं, महके तो नज़र आ जाये कहीं ताबीज़ बना के पहनू उसे आयत की तरह मिल जाए कहीं' हे किंवा 'यार मिसाले ओस चले पांव के तले फिरदौस चले कभी डाल डाल कभी पात पात' हे वाक्य! काय अर्थ आहे सांग? अजून तुझं ते साथियातलं गाणं 'बर्फ गिरी हो वादी में और हंसी तेरी गूंजी उन में लिपटी सिमटी हुयी बात करे धुवां निकले.. गर्म गर्म उजला धुवां नर्म नर्म उजला धुवां' या वाक्याचा रीलेवंस काय? एखादी गोष्ट नाही कळत तर नाही कळत! तशीच इंग्लिश गाणी! तीपण नाही झेपत.त्याच्यात शब्द महत्वाचे नसतात म्युझिक महत्वाचं असतं.. मी vernacular मिडीयमचा आहे.लोकांमध्ये शायनिंग मारण्यासाठी मी इंग्लिश पिक्चर बघतो,इंग्लिश गाणी ऐकतो असं सांगणं मला नाही जमायचं.. मला इंग्लिश पिक्चर आवडतात पण हिंदी मध्ये डब केलेले. इंग्लिशमध्ये बघताना एक डायलॉग कळेपर्यंत पुढचे बरेचसे मिस होतात.. मग काय उपयोग ते बघण्याचा?"
"त्यानं इंग्लिश सुधारतं असं म्हणतात!" मी ऐकीव माहिती दिली..
"मेडिकलला इंग्लिशमधूनच शिकलोय रे मी आणि international कॉनफरंसेस अटेंड करतो मी ते बघतोस ना? माझं active पार्टीसिपेशन असतं माहितीये ना? माझं इंग्लिश पुरेसं आहे माझ्या कामासाठी!" असं त्यानं म्हटलं कि मी बापडा काय वाद घालणार?

"तू गर्विष्ठ दिसतोस,वागतोस असं कोणी तुला सांगितलं नाही?" ६-७ वर्षांनी लहान असलो तरी सुदैवाने मी आर्टीला काही म्हणजे काहीही विचारू शकत असे! "पुणेरी भाषेत त्याला माज म्हणतात!" मी हसत म्हणालो.
"कुणी सांगायला कशाला हवं? माहित आहे मला! मी रोज माझा चेहरा आरशात बघतो..!"
"मग? विद्या विनयेन शोभते असं म्हणतात!"
"ते ढ लोक.. म्हणून मी ऐकू? तसं तर 'ठेविले अनंते तैसेची राहावे' असंही म्हणतात! 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असंही म्हणतात!" आर्टी हसत म्हणाला..मी गप्प बसलो.
"का असू नये माज? सांग ना? का असू नये? स्वकर्तृत्वावर इथपर्यंत पोचलोय मी. बाबा दारू पिऊन नेहमी जमीनदोस्त,आई पंचायत समितीत कामाला होती म्हणून शिकलो तरी. त्यात माझ्याकडे जातीच्या प्रमाणपत्रासारख्या कुबड्या नाहीत..'खुला प्रवर्ग' असल्याबद्दल वाईट वाटलं ते तेव्हाच, admission च्या वेळी. आमच्याकडे डोनेशन ची रक्कम नाही,त्यामुळे management कोट्यातून एमबीबीएस ला admission घेण्याचा प्रश्नच नव्हता.. विपरीत परिस्थितीतून एवढे मार्क्स मिळवूनही बीएएमएस शिवाय पर्याय नव्हता. तुला सांगतो..तिथे पण कित्येकजण केवळ वडिलोपार्जित धंदा पुढे चालवायचा म्हणून आलेले! passion अशी नाहीच. बापाचं हॉस्पिटल आहे किंवा क्लिनिक आहे; ते पुढे चालवायला हवं म्हणून आलेले बैल होते ते! जोतावरून बाप निघाला कि तोच जोत खांद्यावर घेणारे!"
"त्यात चूक काय आहे? वडिलांनी दिलेला वारसा पुढे चालवण्यात? बिझनेसमन तेच तर करतात"मी म्हटलं
"अरे पण लायकी तरी हवी ना? डॉक्टरी पेशा हा बिझनेस नाहीये रे. गावात लोक देव मानतात त्यांना. पैसे देवून आणि रिझर्वेशन थ्रू किंवा management कोट्यातून प्रवेश घेवून मग रडत खुरडत पास होत केवळ सर्टीफिकेट मिळवण्यापुरतं डॉक्टर होण्यात काय हशील?"
"भारतातली सगळी एज्युकेशन सिस्टीमच तशी आहे आर्टी.. आपल्याकडे तयार होणारे इंजिनियर्ससुद्धा तसेच आहेत त्याला काय करणार?"
"म्हणूनच म्हणतो कि मी करणार माज! एक ई बी सी सर्टीफिकेट मिळवण्यासाठी वणवण फिरलोय मी.. डोमिसाईल , nationality सारख्या दाखल्यांसाठी लायकी नसणा-या लोकांनी तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारायला लावले आहेत मला. त्यांच्याबद्दल कोणी अवाक्षर नाही उच्चारत! सगळा विनय दाखवायचा तो माझ्यासारख्यांनी..मी नाहीये त्यांच्यातला ..शून्यातून उभारलंय मी सगळं.. एकट्याच्या जीवावर. अभिमान आहे मला त्याचा.स्वाभिमान! मग त्याला कोणी माज म्हणो अथवा गर्व. आणि 'गर्वाचे घर खाली' असेल तर हरकत नाही.. ते घर माझं तरी असेल!"तो म्हणायचा.

त्याला कार या गोष्टीची खूप आवड.. म्हणजे विकत घ्यायचीच असं नव्हे पण चालवायची सुद्धा. विकत घेण्याच्या बाबतीतही अगदी secondhand  मारुती ८००  पासून सुरुवात करत करत साहेब आता शेवरोले क्रुझ पर्यंत पोहोचले आहेत. 
"मक्खन आहे एकदम..डीझेल इंजिन आहे पण बॉनेटला हात लावला तरी कळणार नाही गाडी चालू आहे ते.." तो सांगतो आणि डीझेल इंजिनचे व्हायब्रेशन्स जास्त जाणवतात याचा गंधही नसणारा माणूस किंवा त्याचा एखादा पेशंट "त्यात काय विशेष?" असा चेहरा करून ते ऐकून घेतो!
"मी खरा mechanic व्हायचो पण केवळ तो व्यवसाय एकट्याच्या जीवावर करता येत नाही म्हणून मी डॉक्टर झालो. :)"असं म्हणून "टायमिंग बेल्ट आवाज करतोय, चल सर्विस करून येवू.. किंवा cranking च्या वेळी कसलंतरी हमिंग येतं.." असं काहीतरी जर तो म्हणाला तर मला ते "vascular डेमेंटीया ची केस आहे त्यामुळे शहरात जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागेल" या वाक्याइतकंच अगम्य वाटत असे!

त्याच्याबरोबर लाँग ड्राईव्ह ला जायचा मजा औरच.
"घे चल गाडी!आपल्याच गाडीवर बिनधास्त शिकशील" असं म्हणत त्यानं मला कार शिकवली..
"माझी उंची कमी आहे रे अजून..बॉनेट दिसतपण  नाही. पूर्ण वाढ झाली कि शिकेन.. " मी घाबरायचो.
"इथे शरीराची उंची लागत नाही रे,मेंदूची लागते..तुझी ती उंची पुरेशी आहे..बारावीत म्हणजे लायसन्सचं वय आहे तुझं.. तुझ्याइतका असताना मी कुठलीपण गाडी चालवू शकत होतो. मला तर अशी आयती गाडी पण कोणी देत नव्हतं. 'जजमेंट' एवढी एकाच गोष्ट महत्वाची आहे. ती स्टीअरिंग हातात घेतल्याशिवाय नाही यायची."
लवकरच मी गाडी शिकलो.नंतर मग मी कधी त्याच्याकडे गेलो कि आम्ही गाड्यांच्या टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने ब-याच गाड्या चालवल्या. सिटीमधल्या वेगवेगळ्या शोरूम्सना त्याची '+' चिन्ह असणारी कार घेऊन दाबात जायचं आणि आम्हाला हवी ती गाडी फिरवून कमेंट्स टाकून परत यायचं असले उद्योगही आम्ही केले! सिटीमध्ये ओळख नसल्याने बाकी कसला प्रश्न नव्हता.. हल्ली हल्ली ऑडी , निसान अशा कंपन्या appointment शिवाय प्रवेश देत नाहीत हे देखील मला त्याच्यामुळेच कळलं!
'डॉक्टरच्या वरचढ झालेत हे शोरूम्स वाले' असला शेलका शेरा टाकून आम्ही परतायचो!
"एक लक्षात ठेव.. जोपर्यंत आपण गाडी शिकत असतो तेव्हा आपल्याला गाडी येत नाही असं समजायचं आणि सावध राहायचं.. एकदा शिकलास की इतरांना गाडी येत नाही असं समजायचं आणि सावध राहायचं..थोडक्यात काय तर.."
"..तर गाडी चालवताना आपण नेहमी सावध राहायचं.." मी वाक्य पूर्ण करायचो आणि तो हसायचा..

त्याच्या आयुष्यातली मुलगी देखील गोड होती.त्यावेळी ती इंजिनियर होत होती.. तिची ओळख त्याने 'तुझी वहिनी' अशी करून दिली होती. इंजिनियरिंगला जाताना तिने  इंजिनियरिंगचा अभ्यास कसा करावा यावर मला मार्गदर्शन केलं होतं (जे अंमलात आणायची वेळ कधीच आली नाही!! )छान होती वहिनी. (आणि हो..इंजिनियरिंगला 'अभ्यास' वगैरे करणारी माझ्या बघण्यातली एकमेव इंजिनियर!!) त्याने तिला  लिहिलेल्या काही प्रेमपत्रांचं मी प्रुफ रीडिंग करायचो आणि तिच्या पत्रांचं नुसतं रीडिंग! मला जाम हसू यायचं पण तो हळवा व्हायचा त्यामुळे तेव्हा हसून त्याला दुखवावंसं नाही वाटायचं! पण शेवटी जगातल्या असंख्य मुला-मुलींप्रमाणे हा गडी सुद्धा प्रेमभंगाच्या गर्तेत सापडला! दोघांनीही प्रत्यक्ष आणि पत्रातून, प्रेमाच्या आणाभाका घेवून आणि शेवटपर्यंत एकमेकांची साथ द्यायच्या आणि एकमेकांशिवाय न जगण्याच्या शपथा-बिपथा घेवून नंतर तिच्या पालकांनी परवानगी नाकारल्यामुळे त्याच्या प्रेमकहाणीचा शेवट लग्नात होऊ शकला नाही. तरीसुद्धा हे दोघेही जिवंत आहेत आणि धडधाकटही आहेत त्यामुळे या असल्या शपथा काही ख-या नसतात हे मात्र मला पटलं!असो..

काही काळ तो डिप्रेस्ड होता पण त्याचा रोजच्या कामकाजावर त्याने कधीच परिणाम होऊ दिला नाही .
"नाती ही अपेक्षेतून तयार होतात रे.. काही ना काही अपेक्षा असते. अगदी आई बाप आणि मुलाच नातं सुद्धा.. मुलानं आपल्याला पुढं जाऊन आपलं ऐकावं, आपल्याला सांभाळावं म्हणून लहानपणापासून त्याचं ऐकायचं, त्याला वाढवायचं असा व्यवहार असतो तो. मुलांनी नाही ऐकलं तर हेच आई बाप पोटच्या पोरांना दूषणं देतात. रक्ताचं आणि इतकं जवळचं नातं कधी निरपेक्ष नसतं,तर इतर नात्यांची काय कथा? आणि सगळी दुःखं ही अपेक्षाभंगातून निर्माण होतात.. विचार करून बघ. परीक्षेत चांगले मार्क्स मिळावेत ही अपेक्षा असते,इतरांनी आपल्या मनासारखं वागावं ही अपेक्षा असते, चांगल्या कॉलेज मध्ये एडमिशन मिळावं ही अपेक्षा असते, मनासारखी नोकरी मिळावी ही अपेक्षा असते.."
"पण आर्टी,जर अपेक्षा ठेवल्याच नाहीत तर प्रगती कशी होणार?"
"मी तसं म्हणत नाहीये.. पण या दुःखाचंही डायग्नोसीस केल्यानंतर मला जे जाणवलं ते सांगतोय..गेली ८ -१०  वर्ष जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवलं, ती माझी सहचारिणी नाही बनू शकली. सगळ्याच प्रेमकहाण्यांचं रुपांतर लग्नात नाही होत. तसं व्हावं ही अपेक्षा असते. माझी तशीच अपेक्षा होती. आमच्या पिताश्रींमुळे तिचे आई बाबा तिला आमच्या घरी पाठवायला तयार नाही झाले. आणि संसाराच्या सगळ्या स्वप्नांचं पाणी झालं. मग तिचंही म्हणणं पटलं मला.. 'ज्या आईवडिलांनी इतकी वर्ष सांभाळलं त्यांच्या विरोधात जाऊ मी?' मी अर्थातच 'नाही' म्हटलं.. पण मी आता लग्न नाही करणार. मी प्रेम करूच शकत नाही इतर कुणावर.दुस-या मुलीमध्ये तिचं रूप शोधून मी मला आणि त्या मुलीला फसवू नाही शकणार." त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..

त्याच्या आईला नातवंड हवी होती म्हणून आर्टीने लग्नाची तडजोड अजिबात स्वीकारली नाही. पण त्याने एक गोड मुलगी दत्तक घेतली. लहान आहे तरीसुद्धा बाबाच्याच मुशीत तयार होतेय.. एकदम रोखठोक.. त्याला तिचे पाय पाळण्यात दिसले कि काय कोणास ठाऊक पण त्याने नावही तसंच ठेवलंय.. त्याच्या मी ठेवलेल्या पेटनेमचा अपभ्रंश.. आरती! :)

१३ टिप्पण्या:

  1. Dhanyawad Kedu.. aani blogvar saharsh swagat. Facebook var aapanach request pathvali aahe ka?

    उत्तर द्याहटवा
  2. सही आहे... मजा येते वाचताना ... " जोपर्यंत आपण गाडी शिकत असतो तेव्हा आपल्याला गाडी येत नाही असं समजायचं आणि सावध राहायचं.. एकदा शिकलास की इतरांना गाडी येत नाही असं समजायचं आणि सावध राहायचं.."
    पुढच्या पोस्टची वाट बघतोय ..

    उत्तर द्याहटवा
  3. Chotese Chan...manala bhavnare !!!...ani saglyach lekhanche logos, fotos ekdam chapkhal..arthapurna

    उत्तर द्याहटवा
  4. @Abhijit: Facebook वरच्या कमेंट वरून हि प्रतिक्रिया तुझीच आहे हे कळलं.. Thanks रे भावा..
    @Aishwarya : लिखाण आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी आवडल्या हे पाहून बरं वाटलं. धन्यवाद..:)

    उत्तर द्याहटवा
  5. पार्टनर ....
    मस्त च रे ....
    सगळ्यात पहिला "R .T ." म्हणाल्यावर मला वाटला मी च कि काय तो :)
    एका सरळ सध्या "conversation " मधून बरयाच गोष्टींवर भाष्य केला आहेस ...
    ते पण तुझ्या नेहमी च्या शैली मध्ये ...
    RT चा माझ आवडला आपल्याला ....
    शेवट जोरात आवडलेला आहे यावेळी !!

    मित्र,
    रघुराज

    ( ता.क. : तुझा राग असलेल्या गोष्टी लिखाणातून पण दिसून येतात (reservation quota आणी गुलजार) :)

    उत्तर द्याहटवा
  6. अतिप्रचंड आभारी आहे.. आणि हो रे..माझ्या लक्षातच नाही आला हा को-इन्सीडन्स.. R T .. (बाय द वे तुझ्यावर लिहायचं झालं तर तो लेख राहणार नाही..ती दीर्घकथा होईल!) माझ्या राग असणा-या गोष्टींबद्दल सांगायचं तर हो.. ते तसंच आहे. पण मी माझ्या तोंडून सांगितलं तर लोक चपलेने मारायला कमी करणार नाहीत ;) दुस-यांच्या तोंडून ते वदवून घेतलं तर ते तेव्हढ जिव्हारी लागत नाही! हो कि नाही.. म्हणून पात्रांच्या तोंडी ती वाक्य घालतो! शेवटी बोलविता धनी मीच ! हा हा.. तुला काय ते नव्याने सांगायला नको! जाता जाता.. तुझी हि प्रतिक्रिया हा देखील 'फाउल' होता!! पुन्हा एकदा लेखापेक्षा मस्त..

    उत्तर द्याहटवा
  7. amiable...mast ahe...pan mala pan guljar avdato re n tyachi lyrics tar aflatoon astat....
    keep it up...

    उत्तर द्याहटवा
  8. @sudha : प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.. लिखाण आवडलं हे पाहून बरं वाटलं..

    उत्तर द्याहटवा
  9. tuzya comments sudha sodata yet nahit wachaychya..
    tya sudha titkyach jabardast astat....

    उत्तर द्याहटवा
  10. @sarita: कौतुकाबद्दल धन्यवाद वहिनीसाहेब!

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!