सोमवार, ४ मार्च, २०१३

बाबांचं लिखाण..

मागच्या पिढ्यांमध्ये सुद्धा कित्येक उस्फुर्त लेखक, सुरस काव्यरचनाकार आहेत.. फक्त सर्वांनाच ब्लॉग सारखं व्यासपीठ मिळू शकलं नाही..माझे बाबा त्यातलेच एक..
त्यांच्या तरुणपणात बिल गेट्स जन्माला यायचा होता. त्यामुळे कम्प्युटर हे एक 'निषिद्ध फळ' होतं.
कामाच्या धबडग्यात, आपल्या काव्य-नाट्य-विनोदाच्या हौशी  त्यांच्या परीने पूर्ण करताना कम्प्युटर 'शिकणं' दुरापास्तच झालं त्यांच्यासाठी..
पण केवळ त्यामुळे त्याचं लिखाण अप्रकाशित राहू नये असं मला वाटत होतं. म्हणून याच ब्लॉगवर प्रकाशित करत आहे.. माझ्या बाबांचं लिखाण… लवकरच… 

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

प्रेमाची (नवीन, टवटवीत आणि वेगळी) गोष्ट!!

चित्रपटसृष्टीत काही नावं उदाहरणार्थ राजकुमार हिरानी, आमिर खान, सतीश राजवाडे , अतुल कुलकर्णी वगैरे अशी असतात कि डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवावा आणि पैसे खर्च करून सिनेमाला जावं.. हमखास वसुली होण्याची हमी आणि चुकुनमाकून भ्रमनिरास झालाच तर अगदीच 'पैसे वाया गेले' असं म्हणण्याइतपत तरी दुःख होत नाही.. .. मात्र 'प्रेमाची गोष्ट' तुमचे पैसे वसूल करते हे नक्की!

आता सिनेमा म्हटला कि अवखळ नायिका आणि क्युट नायक यांची प्रेमकथा. बहुतेकदा 'पुरी दुनिया के कोई भी ताकत के साथ लडके झगडके ' वगैरे वगैरे नायिका नायकाला मिळते आणि सिनेमा संपतो.. प्रेमकथा संपते.. प्रेमाची गोष्ट संपते आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सुरु होते.. लग्न या विषयामध्ये फारसं रंजक काही नसावं त्यामुळे लग्न झालं कि नायक नायिकेमधलं हलकं फुलकं, खेळीमेळीच नातं लोप पावतं आणि पडद्यावर दाखवण्याइतकं काही नसतं या समजामुळे बरेचसे सिनेमे तिथेच संपत असावेत..

पण जिथे नेहमीचे सिनेमे संपतात अगदी तिथूनच 'प्रेमाची गोष्ट' सुरु होते.. 'डिवोर्सी'ज हे हलक्याफुलक्या प्रेमकथेचे नायक-नायिका होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं पण हा सिनेमा हा समज खोटा ठरवतो. फेल गेलेले लग्न जुळवून ठेवण्याची पराकाष्ठा करणारा नायक आणि लग्न टिकवण्यासाठी दोन वेळा प्रयत्न करूनही यश न मिळाल्यामुळे 'आपलं काय चुकलं' याचा शोध घेणारी नायिका यांची कौन्सिलर ऑफिसमध्ये (अगदीच चुकीच्या पद्धतीने) भेट होते आणि तिथून चित्रपटाची सुरुवात होते.

काही जोड्या मुळातच एकमेकांसाठी बनलेल्या नसतात.. पण नायकाला हे पटत नसतं आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना (इव्हन प्रेक्षकांना) हे उमजत असतं. मुळात लेखक असणारा नायक त्याच्या प्रतिभेने नवनवीन वाक्यं तयार करून त्याचा मुद्दा मांडू पाहत असतो आणि इतर लोक त्याला वास्तव जीवनात राहून , प्रत्यक्ष आयुष्याचे धडे शिकवत असतात.. ओघाओघानेच चित्रपटाची नायिका सेक्रेटरी म्हणून लेखकाच्या जीवनात येते आणि अप्रत्यक्षपणे ते एकमेकांमध्ये गुंतत जातात.. संपूर्ण चित्रपटात हा गुंता अजून वाढत जातो आणि शेवटच्या क्षणाला तितक्याच हळूवारपणे सोडवलाही जातो...

हि सहजता संपूर्ण चित्रपटभर आपल्याला दिसत राहते.. ' दोघेही घटस्फोटीत.. च्यायला म्हणजे बौद्धिकं असणार. सिरियस असणार सगळं' असा सुरुवातीला होणारा ग्रह किती फोल आहे याचा प्रत्यय जसजसा पिक्चर पुढे सरकत जातो तसतसा आपल्याला येत जातो. प्रेमात पडल्यावरही त्याची कबुली स्पष्टपणे द्यायचा गोंधळ.. लिहित असलेल्या स्क्रीनप्लेच्या माध्यमातून आपली मतं पटवून द्यायची नायक नायिकेची धडपड, दोघांचेही पार्टनर्स असताना त्यांना भेटल्यावर होणारी तगमग अतिशय यथार्थपणे पडद्यावर चितारण्यात आली आहे.

बरं फक्त लग्न, घटस्फोट आणि त्या अनुषंगाने तोच तो विषय चघळून चघळून त्यातला इंटरेस्ट निघून जाणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे हे विशेष. लेखक असलेल्या नायकाच्या तोंडी असलेले 'कितीही मोठा लेखक असला तरी कोरा कागद समोर आला कि मन बधिर होतंच'  किंवा
'सिनेमा म्हणजे काय गं ? आपल्या आजूबाजूच्या घटना...'
'देवाचा प्रत्यय तेव्हाच येतो जेव्हा तुमची त्याच्यावर गाढ श्रद्धा असते' असे संवाद आपले वाटून जातात..
'हे सिनेमावाले इमोशनल सीन इतके मेलोड्रामाटिक करतात कि आपल्याला रडण्याऐवजी हसू येतं आणि विनोदी सीनला जणू डोक्यावर बंदूक ठेवून 'हसा' म्हणतात'
'तूच म्हणायचास ना , कि ती तुझी बायको झाली पण मैत्रीण नाही होऊ शकली.'
'लग्न म्हणजे प्रोडक्ट नव्हे एक्सपायरी डेट असायला..'
'जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात आणि तरीही जुळवायचंच म्हटलं तर संसार होतो.. सहवास नाही' अथवा 'भांडण करून, नाती तोडून, वेगळं होऊन प्रश्न सुटत नाहीत' अशासारखे संवाद विचार करायला लावतात. (कदाचित संदर्भ नसल्यामुळे इथे वाचताना त्यांचा अर्थ लागणार नाही पण सिनेमा बघताना नक्कीच कळेल..)

'अतुल कुलकर्णीने नायक अगदी ताकदीने उभारला आहे' वगैरे कोणीही म्हणणं म्हणजे काजव्याने सूर्याची प्रतिभा जोखण्यासारखं आहे .. प्रचंड कॅलिबरच्या या अभिनेत्याने निर्विवादपणे अपेक्षांची पूर्ती केली आहे.. भूमिकेच्या, कथानकाच्या, दिग्दर्शकाच्या आणि प्रेक्षकांच्याही !! सागरिका घाटगेला पदार्पणातच सतीश सारखा दिग्दर्शक आणि अतुल सारखा सहकलाकार लाभला हे तिचं (आणि आपलंही ) भाग्य.. तिच्या फ्रेश आणि टवटवीत लूक मुळे अख्खा मूवी रीफ्रेशिंग होतो हे सुद्धा नाकारून चालणार नाही.. रोहिणी हट्टंगडीने मराठमोळ्या घराघरातून दिसणारी आई सर्वार्थाने साकारली आहे पण सासू म्हणून तिच्या इतका समजूतदारपणा फार कमी सापडेल.. :) सतीश राजवाडे हा उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या जोडीने उत्तम अभिनेता आहे हे ही दिसतं.. थोडक्यात सगळेच कलाकार आपल्या भूमिका जगले आहेत.

'ओल्या सांजवेळी' सारखं मुळातच सुंदर शब्दरचना असणारं गीत स्वप्नील आणि बेलाने आपल्या सुरेल आवाजाने जिवंत केलं आहे. कैलाश खेरनं देखील सागरिका घाटगेसारखी मराठीतल्या पदार्पणातच दमदार सेन्चुरी मारली आहे.. एकंदर म्युझिक आणि गाणी संपूर्ण चित्रपटात कुठेही उपरी वाटत नाहीत. आणि नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रायोजकांच मन न मोडता चित्रपटात केलेली एका प्रोडक्ट ची जाहिरात! यासाठी दिग्दर्शकाला मनापासून दाद द्यावीशी वाटते! ('आम्ही सातपुते' वाला सचिन पिळगावकर यातून नक्कीच काही 'आयडीयेची कल्पना' घेईल अशी भाबडी आशा!!)

तर अशी ही 'प्रेमाची गोष्ट'! प्रोमोजमध्ये  म्हटल्याप्रमाणे सहज,साधी,सोपी नसली तरी सुंदर आणि हळुवार तरी नक्कीच. सिनेमागृहातून बाहेर पडताना तुम्हाला अपेक्षित संदेश मिळत नसेल कदाचित पण एक समाधान मिळतं आणि तुमच्या असलेल्या / नसलेल्या लाईफ पार्टनरसाठी गुणगुणायला एक सुंदर गाणं..
"ओल्या सांजवेळी..उन्हे सावलीस बिलगावी..तशी तू जवळी ये जरा..
को-या कागदाची कविता अन जशी व्हावी.. तशी तू हलके बोल ना..."

बुधवार, ५ डिसेंबर, २०१२

हुंकार



रस्त्यावरून एक स्मॉल कार मार्गक्रमणा करत होती. गाडीच्या आय पी वरच्या घड्याळात रात्रीचे ११ वाजले होते. रस्ता फक्त नावाला डीस्ट्रीक्ट हायवे. रुंदीला छोटासाच. नुसता म्हणायला दोन पदरी. समोरून ट्रक आला तर गाडी आधीच जेमतेम असणा-या टार रोड वरून खाली उतरवावी लागणार हे नक्की! पण सुदैवाने रस्त्याला कोणीच नव्हतं.

ना ट्राफिक, ना वर्दळ, ना वस्तीची चिन्ह. गाडी चालवणा-यासाठी म्हटलं तर चांगलंच पण काही विपरीत घडलं तर मदतीसाठी सुद्धा कोणी येणार नाही अशी जागा!

शक्य तितक्या लवकर आपापली घरं गाठायची असा चौघांचाही प्लान होता.. आशू, सॅम, अन्या आणि पमू.. पैकी पमू एकटीच मुलगी. हायवे चा कंटाळवाणा रस्ता सॅम ने काटल्या नंतर स्टीअरिंग व्हीलचा ताबा आता खडतर रस्त्यांचा राजा म्हणजेच अन्याकडे आला होता. हायवे सोडून या मधल्या रस्त्याने घुसायची आयडिया आशूची.. मुलखाचा फट्टू! निघाल्यापासूनच 'बारा वाजायच्या आत घर गाठायचं' हा धोशा घेऊन बसलेला.. आता सगळ्यांनाच माहित होतं कि सरळ रस्त्याने गेलं तर बाराच काय तर रात्री दीड वाजला तरी पोहोचणं शक्य नव्हतं. एकवेळ गाडी फास्ट नेता येईल पण टोल नाक्याची गर्दी जाम टंगवते! पण आशूने गुगल map मधून एक नवाच रस्ता शोधून काढला होता. 'डीस्ट्रीक्ट हायवे' असा उल्लेख असल्यामुळे बाकीचे लोक सुद्धा जायला तयार झाले. तेवढाच एक नवा रस्ता कळेल आणि लवकरसुद्धा पोचता येईल असा सगळ्यांचा कयास होता.

पण एकंदरीत रस्ता बघितल्यावर त्याला हाय वे म्हणायचे कि नाही असा प्रश्न पडला होता. सुरुवातीचा थोडा रस्ता चांगला होता. नंतर आनंदीआनंद होता. मुख्य हाय वे पासून दहा एक किलोमीटर पर्यंत वर्दळ होती कारण तिथे एक गाव होतं. तिथपर्यंत माणसांची चाहूल तरी होती.आता तर ते पण नव्हतं.. रस्ता जास्त वाहतुकीचा नव्हता त्यामुळे फारसा खराब नव्हता पण त्यामुळे आपसूकच रस्ता जिथे खराब झाला होता तिथे दुरुस्त करायचे कष्टही घेण्यात आले नव्हते. चांगला रस्ता; मधेच एक खराब patch अशी परिस्थिती होती..

गप्पांचे विषय संपले नसले तरी बडबड करायचा कंटाळा आला होता. सी डी प्लेयर वर तीच तीच गाणी ऐकून सगळ्यांचा जीव जाम वैतागला होता. रेडीओ कोणताही सिग्नल रिसीव्ह करत नव्हता. गाडीची काच ओपन केली तरी घुसणा-या वा-याचा आवाज भीतीदायक वाटत होता. आणि काचा बंद केल्यावर सगळ्यांनाच गाडीतली शांतता भयाण वाटत होती.

" ए काहीतरी टॉपिक काढून बोला ना रे.. मला भीती वाटतेय शांततेची" पमू म्हणाली
"हो रे.. " आशूने अपेक्षेप्रमाणे दुजोरा दिला.
" तासाभरात पोचू काय रे... ? अमानवी वेळ सुरु व्हायच्या आत पोचलो तर बरं.." तो पुढे म्हणाला..
"ए .. असलं काहीतरी बोलणार असलास तर शांत बसलेलं बरं.. आधीच बाहेरचं वातावरण हे असं त्यात हा असले शब्द वापरतोय.."
"तर काय.." सॅम ने आशूला टपली मारली
"मग काय? ए, पण तुम्हा लोकांना हा रस्ता जरा जास्तच सुनसान वाटत नाही काय रे ? " अन्या विचारायला लागला.
"तुला आणि पमूला तरी समोर गाडीचे लाईट्स दिसताहेत, आम्हा दोघांना मागच्या सीट वरून फक्त काळोख आणि काळोखच दिसतो आहे."
"आणि कित्ती झाडं ही?" पमूने म्हटलं..
"गाणी तरी लावा.. असं एकमेकांना घाबरवत राहण्यापेक्षा ते तरी बरं.." -आशू
"हो आणि तेवढाच आवाजही होत राहील.. " पमूने री ओढली
"कसले फट्टू आहात रे दोघेपण.." अन्या म्हणाला आणि टाळीसाठी त्याने हात मागे-सॅमकडे नेला..

पमू ने सीडी प्लेयर ऑन केला. गाडीचं panel झळाळून उठलं.
तेवढ्यात अन्याने डोळ्याच्या कोप-यातून उजवीकडच्या खिडकीत बघितलं आणि तो गडबडला.
अचानक त्याने स्टीअरिन्ग व्हील डावीकडे वळवलं आणि क्षणार्धात परत सरळ केलं.
बेसावध असणा-या बाकीच्या तिघांचाही तोल गेला.. सॅम आणि पमू गाडीच्या विंडो ग्लासेस वर आपटले तर आशू सॅमवर!

"अरे हळूsss"
"सॉरी गाय्झ, खिडकीत बघितल्यावर मी दचकलो.."
"क्काय? काय दिसलं तुला?"
" मला वाटलं कोणीतरी तिकडून आलं कि काय.."
"... " त्याच्या या वाक्याने एका क्षणात सगळ्यांची हवा गुल झाली नसती तरच नवल!
"अक्चुअली या टेप panel च्या लाईट्स चं रिफ्लेक्शन पडतंय न काचेत.. मी तिकडे बघत होतो. इतक्यात बहुतेक इकडे पमूने आवाज वाढवायला हात फिरवला. त्यामुळे मला भास झाला कि कोणीतरी आलं कि काय या बाजूने.."
"कित्ती घाबरवलंस आम्हाला"
"डोन्ट वरी या..."
"अरे अरे अरे... समोर बघ.."

एक रस्त्याचा अतिप्रचंड वाईट patch अचानक समोर आला होता. गप्पा मारण्याच्या गडबडीत अन्याचं लक्ष हटलं होतं तेवढ्यात हा खराब रस्ता आला होता. स्पीड मधून गाडी स्लो करे-करेपर्यंत एका प्रचंड खड्ड्यातून गेलीच! मोठ्ठा आवाजही आला.. पुढच्या बाजूचा बम्पर रस्त्याला घासला असणार यात शंकाच नव्हती!! एकापाठोपाठ एक चिकटून चिकटून असे खड्डे होते की स्टीअरिन्ग चाकांना कंट्रोल करण्याऐवजी चाकं स्टीअरिन्गला कंट्रोल करत होती.. निदान असं वाटत तरी होतं... कारण पहिल्या दणक्यानेच अन्याचा डावा हात व्हीलवरून सटकला होता. गियर शिफ्ट करायलाही वेळ न मिळाल्यामुळे अपेक्षेप्रमाणेच काही अंतरातच आचके देऊन गाडी बंद पडली होती..सगळेजण शिव्या घालायला लागले..

अन्याने गाडी पुन्हा चालू करण्याआधी सवयीप्रमाणे दिवे, एसी आणि टेप बंद केला.. स्टार्टर मारण्याआधी त्याच्या कानाने एका आवाजाचा वेध घेतला. कोणीतरी गुणगुणत होतं..
हुं...हुं...हुं...
एका संथ लयीत.. त्याने दुर्लक्ष केलं आणि स्टार्टर मारला..
...पहिला प्रयत्न फेल गेला.. त्याने पुन्हा एक अटेम्प्ट केला ... आवाज करून गाडी बंद पडत होती..
अजून एक प्रयत्न आणि...आणि काही फारस भयप्रद न घडता तिस-या प्रयत्नात गाडी चालू झाली..

पुन्हा तोच रस्ता.. तीच स्मशान शांतता.. पण तो आवाज सुद्धा.. हुंकार भरल्यासारखा!!
"ए तुमच्यापैकी कोणाचा मोबाईल वाजतोय का ?"
"माझा नाही बुवा" -पमू
"माझापण नाही" -आशू
"माझाही.. पण का रे?" -सॅम
"तुम्हाला कोणाला गाण्याचा आवाज येत नाहीये का? मोबाईलच्या स्पीकर वर काहीतरी उशी वगैरे ठेवली की त्याचा आवाज बाहेर पडू शकत नाही त्यामुळे येतो ना ? तसा.. किंवा सायलेंट मोड वर असताना फोन कसा वाजतो ? तसा... कोणाचा सेल खाली पडलाय का बघा जरा लाईट लावून.." अन्या जास्तच खोलात शिरायला बघत होता..
"आमचे सेल्स आमच्या खिशातच आहेत आणि तुझा तिथे dash बोर्डवर" पमुने म्हटलं
हुं...हुं...हुं...हुं...
"ए होय रे मला पण येतोय ..बहुतेक कुठेतरी लांबवर गाणी चालू असतील लाउड स्पीकर वर" आशू म्हणाला.
काही क्षण शांततेत गेले..
हुं...हुं...हुं...
आवाज येतच होता ..

"पण बाहेरचा आवाज गाडीत कसा काय येईल?"
"आपण मगाशी दाणकन आपटलो त्यामुळे गाडीचं काही निखळलं नाही ना?"
"मलापण मगाशी तीच शंका आली... पण इतका बारीक आवाज नाही येणार आणि तो पण असा गुणगुणल्यासारखा.." खिडकीची काच जराशी खाली करत अन्या म्हणाला.. " बघ वा-याचा आवाज आला कि तो आवाज बंद होतो.. निदान ऐकू तरी येत नाही!" त्याने काच बंद केली..
हुं...हुं...हुं...हुं...हुं...हुं...

आता सगळ्यांना तो आवाज स्पष्ट पणे ऐकू येत होता.. सगळ्यांची तंतरली होती..
"नक्कीच हा आवाज लाउड स्पीकर वरच्या गाण्यांचा नाहीये.. नाहीतर इतका वेळ येत राहिला नसता." सॅम म्हणाला
"हो आणि मगाशी काच खाली केली तेव्हाही ऐकू आला नाही..फक्त वा-याच्याच आवाज येत होता" अन्या ने अनुमोदन दिलं..
हुं...हुं...हुं...हुं...
"जरी तो तसा असता तरी आता आपण बरेच किलोमीटर्स पुढे आलो आहोत आणि आवाज तर इतक्या जवळून येतोय.."

रस्त्यात परत खड्ड्यांचा patch आला.. अन्याने कचकावून ब्रेक्स लावत ३ सेकंदात गाडी १० च्या स्पीडवर आणली. कशामुळे तरी पमू दचकली आणि पाठोपाठ हात जोरजोरात झटकत तिने जोरात किंकाळी फोडली.. आणि पाय उचलून सीटवर घेतले.. तिच्या किंकाळीने सगळ्यांचे धाबे दणाणले!

"काय झालं अगं?" अन्याने विचारलं
पमूने डोळे गच्च मिटून घेतले होते.
"अगं बोल ना..." सॅम म्हणाला
"इथून पटकन लांब चल.."
"अगं पण झालं काय?"
"या खिडकीतून कोणीतरी माझ्या हातावर उडी मारली.. आणि नन्तर गाडीत.. म्हणजे आता 'ते' गाडीत पडलंय.."
"अन्या.. पटकन गाडी पळव आणि वस्तीच्या ठिकाणी घे.. " आशूची प्रॉपर फाटली होती!!

हुं...हुं...हुं...हुं... आवाज चालूच होता!

" गप रे.. " सॅम म्हणाला.. " अन्या आरामात चल.. नाहीतर स्पीडच्या नादात आपटायचो कुठेतरी...आणि काय ग पमू" पमूकडे वळत सॅमने विचारलं "खिडकी तर बंद आहे.. कोणी आणि कसं काय उडी मारू शकतं तुझ्यावर?"
पमू आता भानावर आली.. "काय? खिडकी बंद आहे?" तिने लाईट लावला.. टिश्यू पेपरचा बॉक्स खाली पडला होता. अन्याचा अचानक लावलेल्या ब्रेक्स मुळे तो panel वरून घसरून पमूच्या हातावर पडला असावा.. आणि ती घाबरली..

मघापासून कानाचा ठाव घेणारा तो हुंकार आता काळजाचा ठाव घेत होता..बाकीच्या आवाजांना ओवरराईड करून आता फक्त तोच आवाज येत ऐकू येत होता.. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी..

"ए थांबून बघूया तरी का कसला आवाज आहे ते?"
"ए.. नको हां.. अंधा-या रात्री अनोळखी ठिकाणी नको थांबू.." आशू.
"पण हाच आवाज गाडीचा काळ ठरायचा आणि जबरदस्तीने थांबावं लागायचं.." सॅम म्हणाला..
"हो बरोबर आहे.. मी गाडी बाजूला घेतोय.."
"जरा पुढे चल ना.. पुढे तो बोर्ड दिसतोय तिथे..तिथे रस्ता असेल. म्हणजे काहीतरी वस्ती असेल" सॅम ने सुचवलं.
अन्याने गाडी हळू केली.

हुं...हुं...हुं...हुं... चा आवाज जास्तच स्पष्ट येऊ लागला..
बोर्डच्या जवळून रस्त्याला एक फाटा फुटला होता. बोर्डवर गावांची नाव लिहिली होती..
अचानक पमू पुन्हा ओरडली..
"ए चला इथून .. चला पटकन.. हीच जागा मिळाली होती तुम्हाला थांबायला..?" तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत प्रश्न विचारला..
"काय झालं काय पण? अन्याने विचारलं..
"त्या बोर्ड वर काय लिहिलंय ते वाच"
सॅम आणि अन्याने बोर्ड वाचताच क्षणभर त्यांची पण टरकली! फाट्याच्या दिशेने दिशादर्शक बाण दाखवून
त्यावर लिहिलं होतं.. 'भूतलवाडी' !!!
आशू गर्भगळीत झाला होता..

"ए .. पमू चं म्हणणं बरोबर आहे.. निघू आपण लगेच इथून" काप-या आवाजात तो बोलला..
"मुळीच नाही.." गाडीचं इग्निशन बंद करत अन्या ठामपणे म्हणाला.. "भित्यापाठी ब्रम्ह राक्षस म्हणतात तो असा . ती 'भूत'ल'वाडी' नाहीये तर 'भू'तल'वाडी' आहे...भू म्हणजे जमीन.. तल ..म्हणजे सपाट किंवा तळ यापैकी काहीतरी पण 'भूताशी रिलेटेड नक्कीच काही नाहीये.."
आवाज अजूनही येत होता.. हुं...हुं...हुं...हुं...
"गाडीचं  इंजिन बंद आहे.. टेप बंद आहे.. रेडीओ बंद आहे.. कोणाचाही मोबाईल वाजत नाहीये.. मग हा आवाज कसला असेल?" अन्याने मागे वळून सॅमला विचारलं..
"सॅम.. काय असेल रे .?"
"काहीच कळत नाहीये रे..." सॅम म्हणाला.. त्याचा पण धीर हळू हळू सुटत चालला होता..
"मला तर वाटतंय आपल्याला भुताने पद्धतशीर सापळ्यात अडकवलंय " काप-या आवाजात आशू म्हणाला.
"अन्या..चल ना रे इथून..मला खूप भीती वाटतेय.." पमूने दुजोरा दिला..

तेवढ्यात मागून एका गाडीच्या फ्लड लाईट्सचा झोत गाडीत पडला.. चौघांच्याही जीवात जीव आला. तरीही आशूने शंका काढली.. " ए.. कशावर भरवसा ठेवू नका.. इल्युजन असेल.. !! तू गाडी स्टार्ट कर आणि निघ.." गाडीचा प्रकाश पडला तरी हुंकार ऐकू येतच होता. त्यात अजिबात चलबिचल नव्हती. त्या आवाजाच्या निर्मात्याला मागून येणा-या गाडीच्या अस्तित्वाचा काहीच फरक पडला नव्हता..

सॅमने मागच्या काचेतून गाडीच्या फ्लड लाईट्स कडे पहिलं.. मग काचेकडे पाहिलं आणि तो ओरडला....
"हे बघा भू sssss त..!!!"
पमूने डोळे गच्च मिटले .. आशू ने तिकडे मान न वळवता हनुमान चालीसा गुणगुणायला सुरुवात केली.
अन्याने मागे वळून बघितलं.. नन्तर सॅम कडे बघितलं आणि दोघेही खळखळून हसायला लागले ..
दोघांच्या हसण्याचा आवाज ऐकून पमूने डोळे उघडले.. आशुने स्तोत्र थांबवलं .. दोघांनीही माना वळवून मागे पाहिलं...

...त्यांच्याच गाडीच्या त्या काचेवर रियर वायपर फिरत होता.. एका संथ लयीत..

पहिल्यांदा आपटलेल्या खड्यात जेव्हा अन्याचा डावा हात व्हीलवरून स्लीप झाला होता तेव्हा स्टीअरिन्गशेजारी असणारं वायपरचं लीवर खाली झालं होतं. त्यामुळे त्याच्या आणि इतरांच्याही नकळत गाडीचा रियर वायपर चालू झाला होता.

सुक्या काचेवर पाण्याशिवाय घासणारा त्या वायपरचा रबर एका लयीत आवाज करत होता....
हुं...हुं...हुं...हुं... !!!!

मी मराठी लाईव्ह दैनिकाच्या 'ब्लॉगांश' सदरात प्रकाशित

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

मृत्यू असावा तर असा!!

आयुष्यात ब-याच व्यक्ती पाहिल्या..काहींची चरित्रं वाचली.. वर्णनं ऐकली..काहींवर बनलेले सिनेमे पाहिले, सिरीयल्स बघितल्या.. सगळ्यांमधून एकाच संदेश मिळाला. 'जीवन असावं तर असं!' पण परवा पहिल्यांदा असं  वाटलं कि 'मृत्यू असावा तर असा!!'
वीस हजारांचं पोलीस दल, तीन स्पेशल आर सी एफ च्या तुकड्या , वीस एक लाखांचा जनसमुदाय..आणि सार्वजनिक जीवनाला स्वयंघोषित पॉज! इतक्या लोकांना दुखावून एखाद्याला घेऊन जाताना यमानेही दोन क्षण विचार केला असेल.

राजकारण या शब्दाची उकल व्हायला लागण्याच माझं वय होतं तेव्हा या माणसाच्या नावाचा दबदबा होता. नव्हे.. चुकलो! दरारा होता... सेना म्हणजे हाणामारी, कापाकापी, सेना म्हणजे तोडफोड,हातापाई आणि हो मुख्य म्हणजे सेना म्हणजे शिव-सेना असाच सरळ हिशोब होता. त्यामुळे शिवसैनिक (आणि कोकणात सिवसैनिक !!) म्हटला कि कुतूहलापेक्षा भीती जास्त वाटत असे..

मग जशी अक्कल यायला लागली , पेपर पहिल्या पानापासून वाचता येऊ लागले तेव्हा कळलं कि सैनिक करतात ते 'रिमोट कंट्रोल' ने दिलेल्या आदेशावरून.. आणि हेही कळलं कि एका माणसाच्या हाकेवर तमाम महाराष्ट्र उभा राहतो तो असाच नव्हे काही. काहीतरी जादू आहे .. हृदयाला हात घालणारे शब्द आहेत.. मनाला साद घालणारी शैली आहे. विरोधकही नावापुढे 'साहेब' हा शब्द जोडतात म्हणजे काहीतरी आहे..

अशाच एका काळात सच्च्या 'सिव'सैनिकाच्या घरावर हल्ला झाला होता.. एका खुनाला चिथावणी दिल्याच्या संशयावरून. हल्लेकरी विरोधी पक्षातले होते..हल्ल्यानंतर प्रत्यक्ष दर्शींनी सांगितलं कि संपूर्ण घरात तोडफोड करण्यात आली होती.. घरात दोनच गोष्टी सुखरूप राहिल्या होत्या . एक शिवाजी राजांची तसबीर आणि दुसरी साहेबांची!

काळ  पुढे सरकला तसं कळलं कि शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणा-याच्या मनातही या माणसाबद्दल अढी नाही. असला तर तो फक्त आदर! किंबहुना प्रत्येकाचे शिवसेना सोडण्याचे कारणही कधीच शिवसेनाप्रमुख हे नव्हतं. देवस्वरूप मानलं सगळ्यांनी त्यांना.

टीव्ही मधल्या चर्चासत्रातली एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे अंत्ययात्रेसाठी आलेल्या लाखोच्या जनसागराला ना त्यांनी नगरसेवक बनवलं होतं , ना आमदार, ना खासदार..  हे लोक होते ज्यांना त्यांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. प्रत्यक्ष ओळख नसताना त्यांच्यासाठी ढसाढसा रडणारे लोक पहिले तेव्हा त्यांना ' हिंदूहृदयसम्राट' कशासाठी म्हणत त्याच उत्तरही मिळालं!

मराठीपणाचा धोशा लावताना हिंदी आणि इंग्रजीवरची त्यांची पकड तोंडात बोटं घालायला लावणारी होती. अस्खलित  इंग्रजी मध्ये दिलेल्या त्यांच्या मुलाखती ऐकल्या कि 'मराठी माणूस... मराठी माणूस...' चा जाप करणारी व्यक्ती ती हीच का असा प्रश्न पडत असे..मी त्यांचं तरुणपण पाहिलं नाही पण उतरत्या वयात देखील ऐन तारुण्यातल्या घटना ज्या डिटेल्स सहित ते सांगत ते पाहून त्यांच्या तल्लख स्मृतीचं आश्चर्यही वाटत असे.

भारतासारख्या देशातही जातीपलीकडे जाऊन राजकारण करता येतं हे तमाम राजकारण्यांना आणि जनतेला या व्यक्तीने पहिल्यांदा शिकवलं. अमुक एक समाजाचा नेता हे समीकरण त्यांच्या कारकिर्दीत कधीच दिसलं नाही. जो जिथे काम करतो त्याला तिथे संधी मिळणार तिकीट मिळणार असा सरळसोट आणि रास्त हिशोब दिसत असे.. त्यांची बरीचशी विधानं हि जनसामान्यांच्या मनातली होती आणि त्यामुळे आपलेपणाची वाटणारीही होती. असो..त्यांचा राजकारण,समाजकारण आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरंच काही छापून  येत आहे, येत राहील,आणि माझी समजही नसेल त्याबद्दल लिहिण्याची कदाचित....

तरीपण..

यापुढे जेव्हा जेव्हा  कोणी "माझ्या बंधुंनो , भगिनींनो आणि मातांनो " अशी साद देईल....
जेव्हा जेव्हा कोणाचा रुद्राक्षांच्या माळेत गुरफटलेला हात हवेत जाईल...
कमरेवर हात ठेवलेला आणि भगवी शाल पांघरून घेतलेला कोणताही पाठमोरा माणूस जेव्हा जेव्हा दिसेल... किंवा जेव्हा जेव्हा रिमोट-कंट्रोल ,शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट यापैकी एखादा शब्द कानावर पडेल तेव्हा तेव्हा मेंदूमध्ये ज्याची प्रतिमा तयार होईल ती व्यक्ती एकच असेल.. आणि ती ओळखायला कोणत्याही 'विशेषनामा'ची गरज पडणार नाही!!

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

द गोल्डन आईड लायन!!

'आम्ही' (आदरार्थी मी या अर्थी) 'वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर' या नावाने दाखवल्या जाणा-या चित्रपटांपैकी एक अतिप्रचंड टुकार रिमेक बघितला.. आणि हे लिहायचे सुचले. सदर टुकार हे विशेषण सिनेमा साठी नसून रिमेक साठी आहे हे लक्षात घ्यावे! नाव 'रावडी राठोर..' मूळ 'व्हर्जिनल' चित्रपट ज्यांनी पहिला असेल त्यांना हे पटेल.. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी लेखाचा पहिला प्याराग्राफ वगळून लेख वाचायला सुरुवात केली तरी हरकत नाही. अर्थात इथपर्यंत पोचायला तो वाचवा लागणारच पण असो..

लेखाचा मूळ मुद्दा मुव्ही नसून मुव्हीचा हिरो आहे .. पहिला नव्हे दुसरा नव्हे तर तिसरा हिरो. यापूर्वी दबंग स्टाईल मध्ये पदार्पण केलेला आणि उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळवलेला हिरो. यावर बरेच दिवस लिहावं लिहावं म्हणत होतो पण जमलं नाही.. हा सिनेमा पाहिल्यावर मात्र म्हटलं आता 'आळस सगळा झाडोनी' हे काम हातावेगळं केलंच पाहिजे नाहीतर प्रकरण हाताबाहेर जायचं. तर त्या हीरोचं नाव आहे....
सोनाक्षीबाई सिन्हा!! द गोल्डन आईड लायन!!
म्याडमची तथाकथित 'मादक' अदा !

हो हो.. बरोबरच लिहिलं आहे मी! सोनाक्षी सिन्हा या व्यक्तिमत्वाला 'हिरोईन' या क्याटेगरीत क्लासिफाय करायचं आमचं धाडस नाही बुवा! तिला एकतर हिरोतरी समजा नाहीतर बाईतरी!मुळात सोनाक्षी सिन्हा कोणत्याही चित्रपटात जो कोणता 'किरदार' करते त्यावेळी हिरोचं तिच्याबरोबर अफेअर आहे असं न वाटता एक्स्ट्राम्यारीटल अफेअर आहे असं आम्हाला वाटतं.

बाप इंडष्ट्री  मध्ये मोठा माणूस असेल तर कोण, कसं आणि काय होऊ शकतं याची जी मोजकी उदाहरणं आहेत त्यापैकी सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा हि मजबूत नावं! सोनाक्षी हे तर अंगापिंडाने
सुद्धा मजबूत असणारं उदाहरण!!

चेह-यावरची रेघ अथवा माशीसुद्धा (ज्यावेळी हलायला पाहिजे त्यावेळी) हलू  न देता ज्या मख्खपणे ही अभिनेत्री वावरते तिला जर उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळू शकतो तर आमचा तमाम सिनेसृष्टीला सवाल आहे कि याच न्यायाने आतापर्यंत एकदापण अजय देवगणला उत्कृष्ट नृत्याचा पुरस्कार का बरे मिळाला नाही? आणि डायलॉग काय तर म्हणे "थप्पड से डर नही लगता साब..प्यार से लगता है!" आम्ही तर पुढे जाऊन असे म्हणतो कि हिला डरायची काहीच जरुरी नाही, 'डर' त्याला वाटायला पाहिजे ज्याच्या प्रेमात ही पडेल..

एखाद्या अभिनेत्रीला आवश्यक असणारं, जरा बरं दिसण्याचं, सौजन्य तरी दाखवावं कि नाही या बयेनं (कि या बाईनं)? तर ते पण नाही. हां...आता रुंद भाल प्रदेश हे सौन्दर्याच लक्षण असतं असं म्हणतात. पण हे (अव)लक्षण तिच्याबाबतीत जरा जास्तच ठळकपणे उठून दिसतं. भुवयांच्या वरून तिची कपाळपट्टी सुरु तर होते पण अर्धं डोकं संपलं तरी पट्टी काही संपायचं नाव घेत नाही. फेसवॉश च्या किती ट्युब्ज ती महिन्याकाठी संपवत असेल याचा हिशेबच न ठेवलेला बरा..

तिचे बलदंड बाहू पाहिल्यानंतर तिचं रक्षण करायला कोण्या सलमान खान ची गरज का पडावी हा बाळबोध प्रश्न आम्हाला 'दबंग' हा सिनेमा पाहताना पडला होता.त्या चित्रपटात तर तिच्या पडद्यावरच्या एन्ट्रीलाच तिने विस्तीर्ण पाठ दाखवल्यानंतर या दृश्याला 'सेन्सॉर'वाल्यांना 'किळस' या क्याटेगरी अंतर्गत कात्री कशी लावावीशी वाटली नाही कोण जाणे!

'ओ माय गॉड' या सिनेमातला न पाहण्यासारखा कोणता भाग असेल तर ते 'गो गो गोविंदा' वालं गाणं. बिचा-या प्रभुदेवाला तिला नाच शिकवताना काय यातायात करावी लागली असेल ते (प्रभू) देवालाच ठाऊक. त्या बिचा-याने केलेले वेडेवाकडे अंगविक्षेप हिरो लोकांना सुद्धा नाकी नउ आणत असतात मग एखाद्या बाईला शिकवताना तर विचारूच नका! ज्या पद्धतीने गरीब पद्धतीचे कपडे (फाटलेली प्यांट आणि बटनं तुटलेला आणि गाठ मारून अंगावर घातलेला शर्ट ) घालून तिने प्रभू देवासारखं नाचल्याचा आव आणत जो उच्छाद मांडला आहे त्यावरून तर आम्हाला हा पिक्चर बघायची सुद्धा छाती होत नव्हती परंतु काही पेपरवाल्यांनी या सिनेमात ती फक्त एवढ्याच गाण्यापुरती आहे आणि सिनेमाशी तिचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा केल्यामुळे आम्ही हा सिनेमा पहायचं धाडस केलं.

"कमर या कमरा?" संभ्रमावस्थेतील राठोडसाहेब
रावडी राठोर (कि राठोड ) मध्ये "चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया" हे गाणं आम्ही सुरुवातीला 'पतली कमर पे' असं ऐकलं होतं. जेव्हा आम्ही ते पुन्हा ऐकलं तेव्हा गाण्यात उल्लेखिलेली ती 'कमर' नेहमीसारखी 'पतली' नसून  'चिकनी ' आहे हे आम्हाला कळलं. ज्यावेळी आम्ही ते गाणं आमच्या या या चक्षुंनी पाहिलं तेव्हा गीतकाराने मूळ (आणि सर्वत्र वापरली जाणारी ) 'पतली कमर' ही टर्म बदलून 'चिकनी कमर' का केलं असावं हे आम्हाला उमगलं आणि पटलं सुद्धा! कारण त्या कमरेचा साईड  व्ह्यू हा सामान्य कमरांच्या  फ्रंट व्ह्यू इतका होता! काय बिशाद होती कोणाची तिला पतली कमर म्हणून हिणवायची? तिला जर गीतकाराने 'पतली' असं संबोधलं असतं तर त्याला बिचा-याला 'पतली गली' पकडून इंडस्ट्री सोडावी लागली असती. असो! पण ज्या पद्धतीने ती या गाण्यात नाचली आहे ते पाहिल्यावर 'बृहन्नडेने भर दरबारात जे नृत्य केलं होतं ते कसं दिसलं असावं' हे
आमचं ब-याच दिवसांपासून असणारं कुतूहल शमलं,तो भाग वेगळा. यासाठी आम्ही तिचे आयुष्यभर ऋणी राहू!

सोनाक्षी बाईंचे जोकर सारखे चित्रपट (सुरुवातीला आमचं मत होतं कि चित्रपटाचं नाव या बाईवरून ठेवण्यात आलं आहे कि काय? परंतु आधीच्या अनेक मतांप्रमाणे हे मत देखील चुकीचे निघाले! ) बघायचं धैर्य काही आम्हाला अखेरपर्यंत एकवटता आले नाही. अगदी केबल वरून तो फुकट प्रसारित झाला तरीही! आता तर 'सन ऑफ सरदार' नावाच्या सिनेमात ती दिसणार आहे. एकंदरीत (संजय दत्तशी [कि तो तिचा भाऊ आहे ?] तिचे लग्न होताना दिसते आणि अजय देवगण दुःखी कष्टी होतो तो ) प्रोमो बघताना सिनेमाचा विषय जरठ विवाह , विधवा पुनर्विवाह किंवा तत्सम काहीतरी सामाजिक बांधिलकी जपणारा असावा असा आमचा कयास आहे. अर्थात, आधीच्या चुकलेल्या कयासांप्रमाणे हा अंदाजदेखील चुकणार हे सांगणे न लगे!

चांगल्या ब्यानरच्या सिनेमांमुळे किंवा सिनेमाच्या हिरोंमुळे सोनाक्षी बाईंच करियर त्यांना सध्या हिरोईन म्हणून प्रमोट करून पाहत असलं तरी तिचं भवितव्य तीच जाणे. परंतु आम्हास मनापासून विश्वास आहे कि सोनाक्षीबाईंनी बॉलीवूडला हिरोईन दिली नाही तरी 'रेडीमेड आई' मात्र नक्कीच दिली आहे!

तिच्या भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देऊन (आणि तिची फ्यान मंडळी आम्हाला फटकावायच्या आत) आम्ही आवरतं घेतो !