Friday, April 15, 2011

इंग्रज

मुंबई-पुणे हा प्रवास वॉल्वो आणि एक्स्प्रेस वे या दोघांनी मिळून बराच सुखावह बनवलाय यात कोणाचं दुमत नसावं.. जेव्हा वॉल्वो भारतीय बाजारपेठेत आयात होत असत आणि 'नीता' वगैरेनी तो प्रकार अगदीच कॉमन केला नव्हता तेव्हा वॉल्वोने प्रवास हि चैनीची गोष्ट मानली जायची. सर्वसामान्य लोकांना त्या गाडीला लांबून बघितल्यावर देखील बुजरेपण येत असे.. गाडीत चढल्यावरची तर गोष्टच सोडा! तसा प्रवास करणा-या आणि केलेल्या काही व्यक्तींचं अनुभवकथन ऐकताना उगीच अंगावर काटा-बीटा येत असे! मीही तेव्हा सर्वसामान्य या क्याटेगरीत येत असल्यामुळे (अजूनही येतो, उगीच गैरसमज नको!) माझ्या विद्यार्थीदशेत "एकदातरी पुण्याला वॉल्वोनेच जायचं" असं खूप आधी ठरवून,त्याप्रमाणे खर्चाला फाटे देऊन, घरून मिळणारे पैसे साठवून वगैरे तो प्रवास केला होता..

गाडीत झोप येऊ नये म्हणून आदल्या दिवशी एक्स्ट्रा २-३ तास झोप काढली.. दिवसाउजेडी प्रवास करायचा म्हणून सकाळच्या बसची तिकिट्स काढायचं ठरवलं, नवीनच घेतलेले आणि सगळ्यात कमी वापरलेले कपडे घातले आणि मी ठरलेल्या वेळेच्या कितीतरी आधी दादरला पोचलो. लोकांच निरीक्षण करत बसलो आणि त्यांच्यासारखं कसं वागायचं ते ठरवू लागलो. उगीच त्यांना मी 'नवखा' वाटायला नको! तिकीटबारीवर एकदम "यो" टायपातले काही लोक, उगीच अर्ध्या चड्ड्या घालून जास्तच कम्फर्टेबल राहायचा प्रयत्न करणारे लोक, सुंदर सुंदर ड्रेस घातलेल्या (ड्रेस म्हणजे पंजाबी नाही होss !) आणि डोक्यावर (हो डोक्यावरच) गॉगल घातलेल्या मुली,बायका बघून मला अंमळ भीती वाटली. पूर्ण कपड्यातला मी एकटाच होतो बहुधा आणि त्यामुळेच त्या गो-याचीट्ट लोकांत जास्तच वेगळा वाटत होतो.. माझी बस आल्यानंतर गुपचूप तिकीट,पाण्याची (आताच्या तुलनेत मोठी) बाटली आणि पेपर घेऊन मी बसमध्ये पाऊल टाकलं. बस माझ्या वजनानेही थोडी झुकली. मौज वाटली.

माझी विंडो सीट होती पण तिथे एक वयस्कर वाटणारे गृहस्थ बसले होते आणि "वयस्कर वाटणारे गृहस्थ" म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहिलं तसे ते मुळीच नव्हते!! ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट, ग्लॉसी स्ट्रिप्स असणारी पतलून, टाय वगैरे अगदी टायपिनसहीत.. थोडक्यात सांगायचं तर...अं.. तुम्ही 'मोहनदास बी ए एल एल बी' बघितलंय का कधी? सोनी 'चायनल' वर लागायचं कधीकाळी.. त्यातला पंकज कपूर.. म्हणजे तशी वेशभूषा. मी तिथे पोहोचताच त्यांच्या चेह-यावर 'अवर्णनीय' असे भाव उमटले. "ती सीट माझी आहे" असं सांगतानाची अजिजी माझ्या चेह-यावर स्पष्ट दिसत असावी. "वूड यू माईंड इफ आय सीट-इन हिय?" त्यांनी विचारलं. अस्मादिकांच इंग्लिश "त्या" काळी (आणि अजूनही) यथातथाच असल्यानं त्या प्रश्नाला लगोलग काय उत्तर द्यावं मला सुचलं नाही. पण मी गांगरल्याचे भाव लपले नसावेत! त्यानी बाहेर येवून मला आत बसायला जागा दिली.

थोडा वेळ गेला.. गाडीचं टायमिंग उलटून १० मिनिटं लोटली असावीत. माझ्यासाठी अजूनही ए सी, न उघडणा-या काचा,पडदे,सीटखाली असणारे काफ रेस्ट या आणि असल्या बारीकसारीक गोष्टींचं कौतुक संपलं नव्हतं. आजोबांची चुळबुळ जरा जास्तच वाढली होती. 'ब्लडी इंडियन्स!' असे काहीतरी उद्गार काढल्याचे माझ्या कानावर आले. मी चपापलो. हा माणूस तर सर्वार्थाने भारतीय दिसत होता. मी गुपचूप खिडकीतून बाहेर बघत बसलो. पण पाचच मिनिटात आजोबांच्या संतापाचा कडेलोट झाला..
"ड्रायवss; कधी निघणार आहे तुमची गाडी? वी आ's अल्रेडी रनीन' लेट. पंधरा मिनिटं उशीर झाला आहे."
"साहेब,निघतोच आहोत.या दोन सीट्सची वाट बघत होतो. रिझर्वेशन होतं त्यांचं.." आत चढणा-या एका कपलकडे बोट दाखवत दाखवत ड्रायवरने बटन दाबून हायड्रोलिक दरवाजा बंद केला. मला नवनवीन अनुभव येत होते!
"दीज रास्कल्स, विल नेवSS und'stan दि impaw SS tans (importans या अर्थी! ) ऑफ टाईम.." म्हाता-याचं पुटपुटणं चालूच होतं!
"तुम्हाला घाई आहे का पुण्यात पोचायची?" मगाशी त्यांनी बोललेल्या चार -पाच मराठी शब्दांच्या आधारावर मी थेट मराठीत संभाषण चालू केलं.
"अं? तसं काही नाहीये.. पण टाईम फॉलो करायला नको? आय मीन वेळ पाळायला नको का? इंडियन्सच्या जीन्स मधेच नाही ते.." मान हलवत साहेब उद्गारले! मग डोक्यात सणक न जाती तर नवल! त्यात पुन्हा मी नुकता तारुण्यात पदार्पण करत होतो. म्हणजे जरा जास्तच सळसळतं रक्त.. "ओ मिस्टर.. मगासपासून ऐकतोय उठसुठ भारतीयांच्या नावाने खडे फोडताय.. तुमच्या हे लक्षात येत नाहीये का कि तुम्ही स्वतःलाच शिव्या घालताय?" मान वळवत मी हलक्या आवाजात बोललो 'यु शूड बी प्राउड टू बी इंडियन" न जाणो व्याकरणाच्या चुका असल्या तर! 'प्रीपोजिशन लावायला हव होतं.. an इंडियन म्हणतात बहुतेक..' मी चटकन करेक्शन करणार इतक्यात..
"एम नॉट an इंडियन.." शांतपणे मागे रेलून बसत तो म्हणाला! मी सर्द! "काय? "
"मी भारतीय नाहीये..अं.. जास्तीत जास्त एन आर आय आहे मी असं म्हणू शकतो, ब्रिटीश नागरिकत्व!"

तो म्हातारा जन्माने भारतीय होता. शिक्षण सुद्धा भारतातच झालं. पुढे तो इंग्लंडला गेला मग तिथलाच झाला. "आता कधीतरी चक्कर मारतो भारतात. कामानिमित्त." तो सांगत होता.
"आता तिकडे गेलाय म्हणून असं म्हणता काय तुम्ही? हे बरंय! आमचं शिक्षण,आमचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरलंत आणि आता बिनदिक्कत स्वतःला इंडियन नाही म्हणवता? तेसुद्धा अभिमानाने?"
"म्हणजे ? गेलो म्हणजे काय स्वखुशीने गेलोय असं वाटतं कि काय तुला? इथेच बिझनेस सुरु करायचा होता पण इकडे पत्ती सरकवा, तिकडे वजन ठेवा, अमक्याकडे टेबलाखालून द्या, तमक्याचा खिसा गरम करा..वैतागलो आणि गेलो निघून तिकडे. थोडे कष्ट घ्यावे लागले तिकडेपण , तरी केला स्वतःचा बिझनेस सुरु; बट विथ नो करप्शन. मी गेलो त्यावेळी आताच्या तुलनेत थोडया सोप्या होत्या गोष्टी तिकडे.मग नंतर तिथलीच नॅशनॅलिटी घेतली.ऍन्ड नाउ आएम अ प्राउड ब्रिटिश सिटिझन"
"तुम्ही सारखा सारखा भारताचा अपमान करताय असं नाही वाटत?तिथे असण-या सगळ्या गोष्टी भारतात नाहीयेत का? उगीच कशाला शिव्या घालायच्या?"
"आहे की.. सगळं जरी नसेल तरी बरंचसं आहे.पण कधी विचार केलायस की या सगळ्या गोष्टी आल्या कुठून?स्वतःचं काही आहे का तुमच्याकडे?"
"म्हणजे?हे सगळं आम्ही भारतीयांनी केलं नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला?"
"मी कशाला काय म्हणायला हवं?तूच जरा तुझ्या आजुबाजुला निरखून बघ.भारतातली सगळी सरकारी कार्यालयं ब्रिटिशांनी त्यांच्या काळात बांधली होती,त्यांच्या सोयीप्रमाणे.अजुनही तीच वापरताय ना? कार्यालयंच कशाला? जवळपास सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग्ज,तुमच्या सनदी अधिका-यांचे रेसिडेन्शियल बंगलोज,ऑफिसर्स गेस्ट हाउसेस,क्वॉर्टर्स त्यावेळेला ब्रिटीशांनी बांधले-तेपण त्यांच्यासाठी आणि अजुनही तुमचे लोक ते वापरत आहेत..मोठ्या खोल्या,बाहेर लॉन्स,बट्लर, नथिंग हॅज चेन्ज्ड!" उसासा सोडत आजोबा थांबले.
"पण आतासुद्धा होतायत की बांधकामं.."
"कोणाची समजूत घालतो आहेस? स्वतःचीच?"हसत म्हातारा म्हणाला."व्ही टी किंवा चर्चगेट स्टेशन सारखं सुबक स्टेशन बांधलंय का रे तुम्ही लोकांनी? ही बघ डि वाय पाटील युनिवर्सिटी." गाडी वाशीतून पास होत होती.."मोठ्या बिल्डिंग्ज, शो ऑफ़ वगैरे.. पुण्याच्या सीओईपी ला किंवा इथे व्हिजेटिआय ला गेला आहेस कधी? अगदीच नाही तर निदान पुणे युनिवर्सिटी तरी?" मी होकरार्थी मान हलवली.
"तिथला ,तिथल्या कॅम्पसचा फ़ील येतो का रे या युनिवर्सिटीला पाहिल्यावर?" पॉईंट होता!
"आता होतायत म्हणतोस बांधकामं मग पुढ्च्या जनरेशनसाठी माईलस्टोन ठरेल असा एखादा तरी मास्टरपिस का नाही बनला?५० वर्ष होऊन गेली ना आता स्वातंत्र्य मिळून?" माझी बांधकाम क्षेत्रातली माहिती फ़ारशी नसल्याने मी एखादं उदाहरण देउन त्यांचं तोंड बंद करु शकलो नाही याचं मला वाईट वाटलं. पण इलाज नव्हता.
"अरे छोट्या दोस्ता.. गावागावातल्या पोस्ट ऑफ़िसांपासून अगदी संसदभवनापर्यंत सगळं त्यांनी बांधून दिलंय तुम्हाला."
कुठल्या तरी रेल्वेच्या ओव्हर ब्रिज वर ट्राफिकमुळे गाडी जरा स्लो झाली.

मी विचार करायला लागलो..हि रेल्वेसुद्धा त्यानीच दिलीय की.लाईट,रस्ते,पाण्याची व्यवस्था.. आमच्या गावात दोन ब्रिटिशकालीन ब्रिजेस आहेत,मुंबई गोवा हायवेवर असण-या असंख्य पूलांपैकी दोन. तर ग्रामपंचायतीला हल्लिच्या काळात थेट इंग्लंड वरुन पत्र आली होती की "त्या पूलांचं आम्ही ठरवून दिलेलं आयुष्य आता संपलेलं आहे तर तुम्ही पर्यायी व्यवस्था करा." ग्रामपंचायतीने उपाय म्हणून पुलाच्या कठड्यांच्या दगडांची एक रांग काढून त्यांची उंची कमी केली!

मी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतोय हे माहीत असुनही आजोबांना हा किस्सा सांगून टाकला! खाज.. दुसरं काय? पण मजा येत होती. कारण हा विचार मी कधी केलाच नव्हता.ते मघासारखेच हसले.
"ब्रिटिश वेअss गुड मॅनेजssस ऍन्ड दे स्टिल आss" आजोबा बोलले."नुसतं इन्फ़्रास्ट्रक्चरच नाही तर त्यानी सिस्टिमही डेव्हलप करुन दिली तुम्हाला.या ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था,जमिनीचे सात बारा चे उतारे,टॅक्स सिस्टिम, राज्य आणि केन्द्रातली सरकारं... यू पिपल आ'ss जस युज'ssस"

पुन्हा एक दीर्घ उसासा सोडून आजोबा म्हणाले "ते सुद्धा वापरायची अक्कल नाही काही लोकांना.. मुळात ती मानसिकताच नाही तर कुठून समजणार? बापच पोराला सांगतो कि 'टाक choclate चा raper इथेच' , आई त्याच पोराला रस्त्याच्या कडेला 'शू' साठी उभं करते.. मग मोठेपणी हि पोरं स्वतःहून उभी राहतात.." ते केवीलवाण हसत होते.. त्यांना black कॉमेडी करायची होती. थोडाफार प्रयत्न सक्सेसफुलदेखील झाला. पण ते क्षणातच गंभीर झाले.

"कशी बदलणार मानसिकता? अहो इथे मुळात लाखो लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे आणि तुम्ही सामाजिक जबाबदारीची जाणीव असण्याच्या गोष्टी करताय?" मी जरा मोठे मोठे शब्द वापरून इम्प्रेस करायचा प्रयत्न केला..
"ते दुष्टचक्र आहे एक.. काही लोक देशाच नाव मोठं करण्यासाठी झटतात तर काहीना 'देशाचं नुकसान करून आपण किती मूर्खपणा करत आहोत याची जाणीवच नसते! अगदी "भारत बंद"ही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून 'साजरा' होणा-या या देशाच भविष्य काय आहे god only knows !"
"तुमच्या सारखे कर्तृत्ववान, या सगळ्या जाणीवा असणारे लोक असेच देशाबाहेर जायला लागले आणि मी एक ब्रिटीश आहे अस अभिमानाने सांगू लागले तर मग मात्र अगदीच कठीण आहे भविष्य एवढं नक्की.."
"ब्रेन ड्रेन होतंय ते इथल्या परिस्थितीमुळे..देश तर राहूदे. कोणाला स्वतःचं घर सोडून जायला आवडेल परदेशी? त्यांना तिकडे बेटSS एनवो SS मेंट मिळत असेल तर का थांबावं त्यांनी इथं? की इथे खितपत पडायला हवं होतं,केपेबल असतानासुद्धा कोणाची तरी नोकरी करत..."

"एक मिनिट.. " त्यांना मधेच तोडत मी म्हणालो.." काय शब्द वापरलात तुम्ही?खितपत? हे टाटा,बिर्ला.. अगदी हल्लीचेच नारायण मूर्ती हे लोकं खितपत पडलेयत का इथे ?" मी माझ्या दृष्टीने रोखठोक सवाल केला..
"टाटा,बिर्ला यांची खानदानं इंग्रजांच्या काळातली आहेत मित्रा..! आणि मूर्तींचं सांगत असशील तर सर्विस प्रोवायडर आहेत ते.. मी कम्पेअर करत नाहीये पण माझं स्वतःचं पेंट प्रोडक्शन आहे....प्रोडक्ट बेस्ड कंपनी.."
"असेल.. पण विषय भरकटतोय.. तुम्ही तुमच्या बोलण्यातून इंग्रजांच्या राजवटीचं समर्थन करताय का?"
"होयच मुळी!! का करू नये यासाठी मला पटणार तार्किक कारण देऊ शकतोस का ?"
"अर्थातच, इथल्या लोकांना परकीय राजवट नको होती, हे आणि एवढं मोठ्ठ कारण तार्किक दृष्ट्या पटत नाही का तुम्हाला?"
"नाही पटत.. तसं असतं तर आणि बघायला गेलं तर लोकांना आता भारतात जे काही चाललंय ते देखील नको आहे.. कारगिल घे,बोफोर्स चं प्रकरण घे, एन्रोन प्रकल्प घे.. हे सगळं हवं आहे का तुम्हा लोकांना?" आजोबांनी विचारलं
"पण निदान जे चाललंय त्याविरुद्ध बंड करण्याइतकी वेळ तरी आली नाहीये अजून.. मुळात लोकांना त्रास होत नाहीये या राजवटीचा.. कारण--" मी कारणमीमांसा करणार तेवढ्यात मला तोडत ते म्हणाले,
"--कारण तुम्ही लोक निगरगट्ट झाला आहात.. जाणीवा मेल्या आहेत तुमच्या!! भीक म्हणून दिलेली राजवट कोडग्यासारखी 'स्वातंत्र्य-स्वातंत्र्य' म्हणून मिरवताय.."
"ओ... काहीही काय बरळताय? शेकडो-हजारो लोकांचे स्वातंत्र्यलढे, बलिदानं, अटका ,प्राणाहुती, १८५७ चा उठाव, १९४२ ची चलेजाव चळवळ, १९४७ चं बंड कश्शा कश्शालाच तुमच्या लेखी महत्व नाहीये तर मग बोलणंच खुंटलं!" माझं टाळकं सटकत होतं!
"तसं काही नाहीये.. आय अडमायs देम.. " आजोबा शांत झाले.. "पण-- " तरीही अजून 'पण' होताच!
"एवढंच इतिहासात स्वारस्य आहे तुला तर मग १८५७ च्या उठावाची कारणं माहितीयेत तुला?"
"तुम्ही काय मला मार्क देणार आहात उत्तर दिलं तर?" मी मुद्दामच तिरकसपणे विचारलं..
"नाही, पण तुला मी दिलेली उत्तर पटत नाहीयेत म्हणून तुलाच विचारतो.."
"मंगल पांडेने गायीची चरबी लावलेली बंदुकीची आवरणं दातानं तोडावी लागतात म्हणून अधिका-यावर गोळी झाडली.."
"कारण तसं केल्याने त्याचं ब्राह्मण्य भ्रष्ट होत होतं.. " ते म्हणाले आणि मी चपापलो.. उगीचंच बसमधले लोक अचानक माना वळवून आमच्याकडे टकामका पाहायला लागले आहेत कि काय असा मला भास झाला!!
"अहो हळू.. तुम्ही सारखी सारखी मोठ्या आवाजात तुमची मतं प्रदर्शित करणार आहात का ? लोकांच्या भावना दुखावतात आजकाल.."
"बरं.. " आवाजाची पट्टी खाली आणून ते म्हणाले.. "हे एक कारण झालं.. बाकीची कारणं मी सांगतो..कोणतंही कारण चुकीचं वाटलं तर तू मला थांबव.. आत्ता थांबवलंस तसं!!' डोळे मिचकावत आजोबा पुढे बोलू लागले,
"केशवपन,सती,बालविवाह सारख्या अघोरी प्रथा-रूढींवर बंदी, विधवाविवाह, शिक्षण याचं प्रमोशन, संस्थान चालकाचं दत्तक विधान नामंजूर अर्थात घराणेशाहीला विरोध वगैरे वगैरे, यातलं तुझ्या मते वैध असणारं कारण कोणतं?"
मी गप्प बसलो..पर्यायच नव्हता!
"धर्मात ढवळाढवळ का हस्तक्षेप काय तो केला म्हणून पहिला लढा झाला.. त्यात भारताचं स्वातंत्र्य हा मुद्दा नव्हताच, in fact ,अखंड भारत ही संकल्पनाच आमच्या राणीनं रूढ केली!"
भयंकर देशाभिमानी माणूस! पद्धतशीर "तुम्ही-आम्ही" करत होता.. "आमची राणी" म्हणे!
"म्हणजे काय? आमची संस्कृती,धर्म परंपरा भ्रष्ट करायला निघाले होते ते तेव्हा.."
"एक सांगतो.. खोटा अभिमान बाळगू नको.. संस्कृती परंपरा सगळ्याच देशांना असतात.. त्यांना जपून पुढे जायचं असतं.. त्यांना कुरवाळत बसून मागे नसतं पडायचं.. हे कारण आहे कारण! समजलं? आणि टीव्ही वर दिसणारं सगळं सत्य नसतं.. तिथेही कुटुंब,विवाह या संस्था आहेतच की.."
"तुम्ही मूळ विषयावर या.." वय झाल्यामुळे आजोबा संदर्भ विसरताहेत असं मला राहून राहून वाटत होतं!
"बर्र,..१९४२ च्या चलेजाव चळवळीविरुद्ध मला काही भाष्य नाही करायचं.. पण १९४७ चं बंड प्रामुख्याने सैनिकांचं होतं.. आणि ते होतं त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध दुस-या महायुद्धात भाग घ्यावा लागला म्हणून.. ते जर झालं नसतं तर कदाचित इंग्रजांची सत्ता गेलीच नसती.. कुणी सांगावं??" मी चकित झालो. सगळ्या गोष्टींचे निरनिराळे पैलू हा माणूस सांगत होता.. सेल्फ analysis का कायसंसं म्हणतात ना तेच करून!!

"१९४२ चा लढ्याबद्दल का बोलायचं टाळताय?" मी त्यांना पेचात पकडायचा प्रयत्न केला..
"तुला क्रिकेट आवडतं का रे?"
"विषय बदलू नका.. चलेजाव चळवळीचा उल्लेख का टाळताय?"
"विषय नाही बदलत.. पण क्रिकेट मध्ये पाहिलं आहेस का? हरत आलेल्या सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये एखाद्या बोलर ने केलेल्या फटकेबाजीमुळे सामन्याचं चित्र पालटतं आणि हरणारा संघ जिंकतो मात्र त्याचं क्रेडीट जातं आधी कुणीतरी केलेल्या शतकाला.."
"त्याचा इथे काय संबंध? "
"संबंध आहे ना..
" शतक करणारा पायाभरणी करत असतोच की!"
"पण शेवटी ती झालेली फटकेबाजी जर झाली नसती.. तर आधीच्या शतकाला काय अर्थ?"
"बरं.. मग पुढे?"
"आय ऑनर द फ्रीडम फायटर्स, आय अडमायss गांधीजी.. त्यांचे सत्याग्रह.. पण मला वाटत नाही त्याने प्रबळ इंग्रजी साम्राज्यावर शष्प फरक पडला..! त्यांना फरक पडला तो महायुद्धाचा.. युनियन नेशन्स च्या दबावाचा.."
"..."
"भारताला स्वातंत्र्य देताना विन्स्टन चर्चिल काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला, Power will go to the hands of rascals, rogues and freebooters. All Indian leaders will be of low calibre and men of straw त्याला वाटत नव्हतं की भारतीय स्वातंत्र्य पचवण्याइतके मच्युअss आहेत.. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं की त्यांची लायकी नाहीये!!.. आणि इथे तुम्ही,मी आपण सगळेच.. आज त्यांनीच रूढ केलेल्या पद्धती वापरतोय ना? अगदी सरकारी भाषा सुद्धा ? इंग्रज गेले पण ते फिजिकली.. तुमच्या मनामनात एक इंग्रज वसलेला आहे म्हणून सगळं थोडंफार तरी सुरळीत चाललंय,, ज्याक्षणी तो इंग्रज समूळ नष्ट झाला त्याक्षणी अराजक माजेल बघ इथे!"
मी सुन्न झालो.. आजोबांचा फोन वाजायला लागला. " जी.. मैं लोनावला पहुंचा हूँ.. रुकता हूँ यहाँ पे.. पहुँच जाना.. हां ठीक है.." ते कोणाला तरी सांगत होते.

.. गाडी एव्हाना फूड मॉल ला थांबली..
"तुम्ही इथेच थांबणार आहात का?" पंधरा रुपयांची पाणचट कॉफी घेत मी त्यांना विचारलं..
"मी चाललोय पुण्याला.. महाराष्ट्रातले इमर्जिंग मराठी बिझनेसमन्स आहेत त्यांना थोडा गाईडन्स.. आपलं... मार्गदर्शन हवं आहे..मी एक समाजकार्य म्हणून ते करतो.. जमेल तसं फायनान्स पण करतो.. पण मुळात ठकवण्याची प्रवृत्तीच जास्त आहे इथे.. त्यांना वाटतं 'इतकी वर्ष तिकडे राहिलाय, याला मराठी काय समजणार?' म्हणून माझ्यासमोरच काहीतरी बोलतात आणि फसतात.. त्यांना काय माहित, माझ्या घरी जीए,हरिभाऊ,खांडेकर,पुल,वपु सगळे सगळे पुस्तक रूपाने वास्तव्य करून आहेत ते! मी कोणाला कधीच कळू देत नाही तिथे की मी मराठी बोलतो ते.. असो.. काही लोक जातात पुढे. फसवण्याचा प्रयत्न करणा-यांनाही मी योग्य पद्धतीने हाताळतो... आज सकाळी गाडी चालू होईना म्हणून बस ने निघालो. म्हटलं बरेच दिवस झाले होते बस ने फिरून.. बघू तरी.."
मी निशःब्दपणे त्यांच्याकडे पाहत होतो..

फूड मॉल वर एक काळ्या कुळकुळीत बी एम डब्लू-इ-फोर्टीसिक्स ने एन्ट्री केली.. या गाड्या सुद्धा फार रेअर्ली भारतात आयात होत असत तेव्हा.. त्यामुळे एखादी कार दिसली तरी कार्सचे शौकीन माना वळवून वळवून ती गाडी अगदी दिसेनाशी होईपर्यंत पाहत असत.. इथे तर गाडी समोरच आली होती.. ४-५ लोकांनी गर्दी करून गाडी पाहायला सुरुवात केली..

"चलो देन.. नाईस टू मीट यो.. इट वॉज अ हेल्दी डिस्कशन.." माझी तंद्री तोडत आजोबा म्हणाले..
"तुमचं नाव ? आय मीन तुमच्याबद्दल सांगायचं झालं कोणाला तर.."
"कशाला सांगायला हवं? या सगळ्या गोष्टी मी माझ्या आनंदासाठी करतो..एम अ सेल्फिश पर्सन यु नो.." ड्रायव्हर ने दरवाजा उघडून त्यांना आता बसायला विनवलं..दरवाजा लावल्यानंतर त्यांनी काच जराशी खाली घेतली..
"तरीही.. एक आयडेन्टीटी म्हणून.." मी मोठ्याने ओरडलो..
आजोबा हसले.. "इंग्रज भेटला होता म्हणावं..!!" त्या आलिशान गाडीची काच वरती करून ड्रायव्हरला त्यांनी निघण्याची खूण केली.. आणि मला त्या अर्ध्या प्रवासात न जाणवलेली एक गोष्ट दिसली.. त्यांच्या चेह-यावर विलसणारं एक सुंदर स्मितहास्य!

14 comments:

 1. after reading it even i wanna meet that old man:-p
  khup chaan ahe..gdtc

  ReplyDelete
 2. १८५७ चा उठाव, १९४२ ची चलेजाव चळवळ, १९४७ चं बंड हे सगळ काही खर नहीं हे शाळेत असतानाच लक्षात आल होत. म्हणून इतिहासात काठावर पास व्हायचो .. ते काहीही असो इंग्रज आजोबा बरोबर बोलत होते ..

  ReplyDelete
 3. Sudha: Thanks sudha! This is again a fictional work. So unfortunatly you can't meet him,though you wish so! :) thanks again for reading this lengthy post
  Abhi: hmm.. कधी कधी मला वाटतं कि आपल्याला इतिहासच चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला! पण.. जोपर्यंत आपल्याचकडे चांगला मार्ग नाही तोपर्यंत आहे त्यावर टीका करण्यात काय अर्थ? असो.. :)

  ReplyDelete
 4. लेखांतील मतां विषयी: इंग्रज जेव्हा होते तेव्हा ते सर्व देऊन गेले..इमारती वगैरे बांधून गेले..समाज व्यवस्था बधून गेले..त्या सत्ठी त्यांचे आभारी आहोतच.. स्वातंत्र्यसैनिकांमुळे स्वातंत्र्य मिळाला ह्यावर माझा ही विश्वास नाही.. पण.. आताचा भारत देश हा बर्यापैकी परिपूर्ण आहे..इथे की चांगलं नाही म्हणून बाहेर पळून जाणं हा त्यावरचा उपाय नव्हे..समाज व्यवस्थेला नावं ठेवण्या ऐवजी त्यात योगदान गेऊन ती अजून बळकट कशी करता येईल याचा विचार केला जावा..
  लेखा बद्दल: खूप सिरिअस आहे..त्यात शंका नाही.. पण एका भारतीयाच्या मनात आपल्या देशाबद्दल एवढं परकेपण असावं आणि कारणं कोणती तर १९५० च्या पूर्वीची.. थोडंसं खटकलं.. मला ही कधी कधी राग येतो देशा-विषयी..पण तेव्हा कोणी ६० वर्षांपूर्वीची कारणं भांडायला म्हणून उकरून नाही काढत..!! :P :P :P :P :P

  ReplyDelete
 5. @rohan : अशी प्रतिक्रिया अपेक्षितच होती आणि ती तुझ्याकडून मिळाली यामुळे आनंद झाला.. लेखाचा उद्देश समाजव्यवस्थेला नाव ठेवण हा नव्हता परंतु स्वातंत्र्याचा जो अर्थ लोकांना अपेक्षित होता तो साध्या करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत एवढंच म्हणायचं होतं. देशाबद्दल मीसुद्धा positive च आहे. परंतु राष्ट्राविषयी,समाजाविषयी जी आत्मीयता हवी ती अजून ९५% लोकांकडे नाहीये असं माझं मत आहे.
  राहिला मुद्दा भारतीयाच्या मनात परकेपण असण्याचा: तर मी ती ५० पूर्वीची कारणं स्वातंत्र्या बाबतीत उल्लेखलेली आहेत.. आता दिसणारं चित्रही तेवढ आशादायक नाही हेपण सत्य आहेच!
  २००० सालची पार्श्वभूमी घेतल्यामुळे मी लेखात कारगिल,एन्रोन वगैरेचेच उल्लेख केले आहेत, २ जी स्पेक्ट्रम, आदर्श वगैरेचे उल्लेख नाही करता आले...
  असो.. वर एका प्रतिक्रियेत आधीच म्हटल्याप्रमाणे,जोपर्यंत आपल्याचकडे चांगला मार्ग नाही तोपर्यंत आहे त्यावर टीका करण्यात काय अर्थ? :)

  ReplyDelete
 6. wa .. kya kehane .. mudde vagaire sagale far lambache ahe .ani yachyavar dhigbhar charcha zaleli ahe .. pan lihinyachi style avadali ..bestt

  ReplyDelete
 7. @विनायक: मनापासून धन्यवाद रे.. आलाच आहेस तर येत राहा अधूमधून इथे..

  ReplyDelete
 8. yenarach re mitra... tula gtalk var hi add keley..accept kar ... bolat rahu kayam...

  ReplyDelete
 9. स.न.वि.वि.
  एका मेल थ्रु तुझे लिखाण वाचले आणि गुगल वर सर्च करुन तुजा ब्लॉग शोधला. छान लिहीतोस! असेच लिहीत रहा
  मझ्या ब्लॉगची लिंक देत आहे...
  http://www.snvivi.blogspot.com/

  ReplyDelete
 10. @Harshad Madhav Godbole : धन्यवाद आणि तुझं लिखाण देखील वाचलं. मस्त लिहितोस. प्रचंड आवडलं. :) लोभ असावा!

  ReplyDelete
 11. Apratim lekh aahe !!!!

  ReplyDelete
 12. @sarita : दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल आभार!

  ReplyDelete
 13. atishay sundar lekh..sagale lekh manapasun vachale ani enjoy kele...workload naslyamule he ase time utilization changle jamle :):)

  Keep writing...

  ReplyDelete
 14. @Pradnya : मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे madam !!

  ReplyDelete

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!