सोमवार, १८ ऑगस्ट, २००८

सार्वजनिक जागांवर एक तास!!

लहानपणी सार्वजनिक जागांवर निबंध असायचे। उदाहरणार्थ ' बसस्थानकावर एक तास' किंवा 'रेल्वे स्थानकावर एक तास' इत्यादी... तो एकच तास का असायचा ठाऊक नाही पण त्यावेळी ' कल्पनाशक्ती' लढवून 'एक तास' मी एक- दीड पानांवर आणि पंधरा - वीस मिनिटांत भरून काढत असे. पण आता एवढा प्रवास केल्यावर सार्वजनिक ठिकाणी काढलेल्या तासांपैकी कोणता एक तास शब्दबद्ध करायचा हा विचार करताना पाच तास कसेच जातील !! अन् दहा पानं ही डिटेल वर्णन करायला अपुरी पडतील!!

खरंच विचार करून पाहिलं तर हे पटेल.कारण आपण स्टेशन वर कधी जातो? कुठेही जायचं असेल तरच ... तेही गाडीच्या वेळे आधी १५ -२० मिनीटं पोहोचू अशा बेतानं . अन् निबंधात लिहिल्याप्रमाणे 'गाडी लेट , एक तास उशिराने येईल' वगैरे अन्नौंसमेंट वेळेवर होण्याचे प्रकार कमीच ... त्यामुळे गाडीचे टायमिंग उलटल्यावरही आपण त्याच वाटेकडे डोळे लावून बसतो !! प्रत्येक गाडीकडे 'आपल्याला हवी असलेली ती हीच' या अपेक्षेने! अगदी दीड-दोन तास का उलटेनात!! मग आपली गाडी आल्यावर लक्षात येतं की वेळ फुकट गेला !!
म्हणून कधी मोकळा वेळ मिळाल्यावर स्टैंडवर बसायचं, लोकांची धावपळ, तारांबळ, गिल्ला, आरडाओरडा, आनंद, दु:ख सगळं डोळे, कान उघडे ठेऊन भरून घ्यायचं मग चवीनं रवंथ करत बसायचं...

गाडी येईपर्यंत मस्त,इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत उभे राहिलेले लोक,अगदी जुन्या आठवणी,संसारातली सुख दु:ख ,बहुतेकदा दु:खच ,आपले फ्यूचर प्लान्स,महागाई ,शेयर बाजार ,जागतिक गुंतवणूकीत भारताचे स्थान,ठिकठिकाणी दिसणारा पाकिस्तानचा हरामखोर स्वभाव,हल्लीची वाया गेलेली पिढी(निसर्गनियमानुसार आपल्यानंतरची पिढी ही ’वाया’ जाण्यासाठीच जन्माला येते!),टी व्ही सिनेमाचं वेड,नाटकाचा कमी होणारा प्रेक्षक वर्ग,तरीही वाढलेले तिकीट दर,अगदी बोअर करून जीव नकोशी करणारी तरी आपला (स्वतःचा)जीव न सोडणारी जुनी पिढी... गर्दीला कुठलाही विषय वर्ज्य नसतो!!

नुसता एक फेरफटका मारला, तरी अख्ख्या जगातल्या घडामोडी, जीवनाची विविध रुपं डोळ्यांसमोर उभी राहतात. प्रत्येक एस टी स्टॅंडवर गेल्यावर तिथला तो ’खुळ्ळुक खुळ्ळुक’ आवाज;त्या दिशेला पाहिल्यावर त्या आवाजाचं उगमस्थान असणारं ’नवनाथ रसवंती गृह’,डिझेलचा टिपीकल वास,मुता-यांचा दर्प,न कळणा-या सुरात केली जाणारी अनाउन्समेंट,त्याकडे साफ दुर्लक्ष करत नवी गाडी स्टॅंड मध्ये आली की तिच्यामागे पळणारं पब्लिक, मागोमाग घोटाळणारे ’आSग्ग्गारेग्ग्गार्रस्स्स’ वाले किंवा ’ल्लेप्पाक लेमन’ वाले...प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो...

स्टेशनवरही तेच.. फक्त तिथे फर्स्टक्लासचं पब्लिक,आपलं स्टॅंडर्ड आपल्या वागण्याबोलण्यातून दाखवायचा अन स्टेटस राखायचा केविलवाणा प्रयत्न करत असतं. संक्रमणावस्थेतलं म्हणजे मध्यमवर्गीयांमधून उच्च मध्यमवर्गीयांमध्ये जाणारं पब्लिक आपल्या स्थित्यंतराबद्दल विचार करत,’फर्स्टक्लास’ लोकांकडे बघत ’थ्री टियर शयनयान’ समोर उभं असतं. अन ’बहुधा’ ’जनरल’चं पब्लिक अगणित गाठोडी,बॅगा,असंख्य लहान मुलं इत्यादींमध्ये राहुनही, कुणाचाही मुलाहीजा न ठेवता गालिप्रदान समारंभात गुंग असतं!!
गाडी आल्यावर मात्र सा-यांचीच तारांबळ उडते..आपण मस्त प्लॅटफॉर्मवर बसून ती बघायची.. गाडी हळूहळू वेग घेते. कोलाहल शांत होतो. थोड्यावेळापूर्वी आपण इथंच होतो यावर थोडावेळ विश्वास बसत नाही.. मात्र पुन्हा फलाटावरची गर्दी वाढायला लागते अन पुन्हा एकदा ही जाणीव होते.एक चक्र..परत परत सुरुवातीपासून फिरणारं.. जन्ममरणाचंही असंच असतं म्हणतात..

२ टिप्पण्या:

  1. सगळ्या रसवन्तीगृहांची ( बस stand वरच्या) नावे " नवनाथ" का असतात हे मला अजूनही न उलगडलेलं कोड आहे...

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!