सोमवार, २६ जुलै, २०१०

मुंबई-पुणे-मुंबई... सिनेमास्कोपमुंबई-पुणे-मुंबई पाहिला.. कालच! पण पहिल्यांदा नाही तर तिस-यांदा.. एकदा "इ-स्क्वेअर" मग "मंगला" आणि नंतर या दोन ठिकाणी पैसे उधळल्यामुळे आलेल्या गरिबीमुळे शेवटी "प्रभात".. आता हा लेख काही त्या पिक्चरचं परीक्षण वगैरे नाही.. पण निरीक्षण जरूर आहे.

मुंबईवरून "मुलगा बघण्या" च्या कार्यक्रमासाठी आलेली 'ती' आणि पुण्यात तिला भेटलेला 'तो'.. यांच्यातला संवाद म्हणजे हा अख्खा मुव्ही! पिक्चर मध्ये विशेष असं काही नाहीये. म्हणजे मारामारी, रोमान्स, सुंदर लोकेशन्स.... (अर्थात पुणे हे ब्याकग्राउंड निवडल्यावर "सुंदर लोकेशन" ला एक मर्यादा येणं स्वाभाविक आहे...) असं काही काही म्हणून नाहीये तरीपण काहीतरी 'खास' आहे खरं.. मनाला भावतो एकदम हा सिनेमा. मुळात भारतीय पिक्चरची गरज असणारी हिरो आणि हिरॉईन यांची सुंदर सुंदर नावं, छान छान आणि वेळोवेळी वाजणारी गाणी आणि कुटुंब कलह , वाद विवाद , व्हिलन, आदळआपट, दंगा आणि तत्सम इतर काही मसाला नसताना सुद्धा हा चित्रपट एक घट्ट पकड घेऊन ठेवतो. "ते कशामुळे?" हे शोधण्याचा मात्र हा प्रयत्न नाही.. कारण मला ते कोडं तसंच राहू देण्यात जास्त मजा वाटतेय.

मुंबईकर "ति"ला पुण्यात आल्यानंतर योगायोगाने "तो" भेटतो आणि नंतर काही "टीपीकल पुणेरी" अनुभव येतात.. ते ती त्याच्याशी शेअर करते.. त्यामुळे त्याचा पुणेरी स्वाभिमान डिवचला जातो आणि तोही तिला उलट उत्तर देतो.. एकमेकांचा पिच्छा सोडवता सोडवता परिस्थिती त्यांना एकत्र थांबायला भाग पाडते. त्याचा पुण्याविषयीचा अभिमान मोडून काढण्यासाठी ती प्रतिवाद करत जाते आणि तो तिच्यावर पर्यायाने मुंबईकरांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतो.. आयुष्यात ही व्यक्ती पुन्हा भेटण्याची सुतराम शक्यता वाटत नसल्यानेच कि काय ती त्याला आपली कथाही ऐकवते आणि मग तोही तिला आपल्या जुन्या प्रेमाबद्दल सांगून स्वतःचं मन मोकळं करून घेतो.

पुण्याचा अवास्तव अभिमान बाळगणारा तो आणि त्याला वठणीवर आणणारी ती;जुन्या पद्धतीच्या लग्नसंस्थेवर ताशेरे ओढणारी ती आणि तिला "नात्यांची मजा ती उलगडण्यात असते" असं सांगून समजावणारा तो; सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक रंगत कायम ठेवतात.. जाणूनबुजून एकात एक गुंफत नेलेले प्रसंग आणि अलगद सोडवत नेलेली ती गुंतागुंत कुठेच कृत्रिम वाटत नाही. विशिष्ट वयोगट डोळ्यासमोर ठेवून जरी हा चित्रपट बनवला नसला तरी लग्न न झालेल्या, नुकतंच बेडीत अडकलेल्या आणि लग्नाच्या बंधनात मुरून मुरून पार लोणचं झालेल्या प्रौढ वर्गाला देखील तो तितकाच आवडेल असं मला वाटतं. अर्थात चित्रपटात एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे "हे माझं मत आहे , निर्णय नाही.."

सारसबागेतल्या एका प्रसंगात त्याने तिला भेळ देऊन त्यावर "कशी वाटली आमची भेळ?" अशी प्रतिक्रिया विचारल्यावर "ठीक आहे" अशी शांत प्रतिक्रिया ती देते. त्यावर खवळून तो तिला ही भेळ त्रिभुवनात कशी आदर्श आहे वगैरे गोष्टी सांगू पाहतो, तेव्हा ती त्याला म्हणते की " भेळ, चणे हे समुद्रावर जाऊन खायचे पदार्थ आहेत !! पुण्यात अरसिकता आहे हे बरोबर आहे कारण तिथे समुद्र नाहीये ना.. “ आपली विकेट डाऊन झाल्याच त्याला कळतं पण हेका सोडेल तर तो पुणेकर कसला?? तो लगेच तिला विचारतो.. "तुमच्याकडे सगळं असेल पण तुळशीबाग आहे का?" या वाक्यावर पुण्यातल्या प्रेक्षागृहात दाद न मिळती तरच नवल!!

पुण्यातल्या मुलींचा "हिरवळ" वगैरे असा उल्लेख, तिने त्याला थेट "आर यू अ वर्जिन?" असं विचारल्यावर त्याचा गोरामोरा झालेला चेहरा अशा टाईपची थोडी वाक्यं असली तरी ती त्या त्या ठिकाणी चपखल आहेत.. कुठेही बघणा-याला ऑकवर्ड वाटत नाही. एकमेव असणार गाणं देखील त्याने केलेली कविता म्हणून ऐकवलं गेलंय.. त्यामुळे ते संपूच नये असं वाटत राहतं.. स्वप्नील जोशीने उभा केलेला नायक; नसणा-या "six pack abs" मुळे "खात्या-पित्या घरचा वाटतो.. आणि ब-याच जणांना तो आपल्यातला ही वाटतो! ( साहजिकच आहे ना! त्याच्या पोटाचा शर्टवरून दिसणारा आकार सेम आपल्यातल्या ब-याचजणांसारखा दिसतो हो! खरंच!! अगदी देवा शप्पथ!! )आणि मुक्ता बर्वे.. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय गोड आणि लाघवी, पुरोगामी पण मराठमोळी "ती" उभी करण्यात ती कुठेच अवघडली नाहीये..

दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गायक या गोष्टींकडे सहसा सामान्य प्रेक्षकाचं लक्ष जात नाही. पण या सिनेमा मध्ये ठिकठिकाणी हे लोक "वा! " म्हणायला भाग पाडतात. पुण्यातली कपल्ससाठी ('कु')प्रसिद्ध spots वापरल्यामुळे एकप्रकारची जवळीक वाटते.. पण प्रेक्षक "अरे हा जे एम रोड, हा एफ सी, हे तर वाडेश्वर.. पेठेत आली रे कुठच्यातरी.." असा खेळ खेळतात तेव्हा थोडा वैताग येतो.. अरे, काय ठिकाणं ओळखली म्हणून पिक्चरचे पैसे परत मिळणार आहेत का? मग? जाऊ दे.. विषयांतर झालं!

सिंहगडावर एकदा त्याने तिच्या जुन्या जखमेवरची खपली काढल्यामुळे (हा शब्दप्रयोग लाक्षणिक अर्थाने घ्यावा.) ती दुखावली जाते आणि रडायला लागते ते पाहून त्याची उडणारी त्रेधातिरपीट पाहण्यासारखी आहे.. त्याचवेळी तिथून जाणारा वाटसरू त्या दोघांकडे पाहत जातो आणि पुढे जाऊन मागे वळून पाहतो तेव्हा स्वप्नील जोशी आपण त्या गावचे नाहीतच असं दाखवण्याकरिता मुद्दाम दुस-या बाजूला चालत जातो.. या आणि अशा प्रसंगातून सहजता राखली गेलीय.. मुव्ही मधल्या ब-याचश्या गोष्टी या आपल्या जीवनात घडणा-या असल्यामुळे काही ठिकाणी आपण स्वतःच्या नकळत स्वतःला ठेवू पाहतो..

साहजिकच शुटींग एका दिवसात झालं नसणार.. पण पूर्ण दिवसभराचा वेळ इतक्या व्यवस्थित आणि अशा प्रकारे चित्रित केला आहे कि शंका घ्यायला वावच उरत नाही..वेगवेगळी ठिकाणं फिरून एकमेकांची मनोरंजक बौद्धिकं घेऊन झाल्यावर मुंबई-पुणे-मुंबई गाडी जेव्हा शेवटच्या वळणावर येते तेव्हा आपल्या मनात एक हुरहूर दाटून येते.. या जोडीचा सहवास आता संपणार... सुखद शेवट अपेक्षितच होता आणि तो तसाच झालाय यात वाद नाही पण तिथपर्यंत येण्यासाठीसुद्धा शेवटच्या ५ - १० मिनिटांमध्ये जी वळणावळणाची वाट निवडली आहे तीसुद्धा अप्रतिमच.. बाहेर पडताना आपण काही विशेष घेऊन निघत नाही पण एक मस्त मूड घेऊन निघतो एवढं मात्र खरं!

१० टिप्पण्या:

 1. Kay re..... Ata ha pan "DHANDA" suru kelas ki kay........

  Jokes Apart... Cinema Atyant sundar ahe... Sampurn Pune Darshan hote ....

  Ramyaman Hirwal, swattch raste, thandgar haweche aksharashaha anubhawach yeto........


  AMOL

  उत्तर द्याहटवा
 2. Punashch ek chan varnan...

  Mi ha cinema pahila nahiye pan mi hya lekha warun kiti zakkas asel he tharwu shakato... :)

  उत्तर द्याहटवा
 3. अरे वा ....अजून एक सम-सुखी बघून बरा वाटला ...अगदी २-४ दिवसा पूर्वीच माझी एक कराड ची मैत्रीण काय डोकेदुखी आहे हा movie असा म्हणाली ...आणि sollid चिडली जेव्हा मी तिला म्हणालो कि हा picture समजायला किमान काही पावसाळे तरी पुण्या किंवा मुंबई मध्ये तुम्ही काढलेले पाहिजेत तर च त्यात ले बारकावे कळतात....आणि मुळात शब्दांची गम्मत कळण्या साठी शब्दांची जाण असली च पाहिजे.....नाहीतर मग डोकेदुखी च पदरी पडणार ना....असो...ती हा blog वाचत नाही हे गृहीत धरून हे शौर्यकर्म करतो आहे.......
  दोन वेग-वेगळ्या वातावरणातून आलेल्या लोकांची लव-ष्टोरी हा साधा विषय ..एकीकडे kites सारखा अति रद्दड movie ...आणि त्याच विषयावर बनलेला पण आपल्या मातीतला ,आपल्या भाषेतला ..मुंबई-पुणे-मुंबई ....कमी खर्चात बनलेला असला तरी ..मनाला खूप भावतो...
  पण picture पेक्षा तुझा निरीक्षण जास्त interesting आहे....१) अखिलेश खूप practical आहे...२) आणि picture प्रेम या तरल भावने वर आधारित आहे !!... या २ मधला एक statement खोटा ठरवावा लागणार आता...कारण एक practical माणूस दुसऱया माणसाने मांडलेल्या भावना ..ते पण प्रेमा सारख्या विषयावरच्या ....एवढ्या चांगल्या प्रकारे interprete नाही करू शकत...असा मला तरी वाटता ...तरी कृपया लेखक महोदयांनी वास्तवा चा खुलासा करावा ....आणि वरील २ पैकी कुठले statement रद्दबातल ठरवावे .....
  एक गरीब भाबडा वाचक

  उत्तर द्याहटवा
 4. अमोल, प्रशांत प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
  रघु तुलापण धन्यवाद रे.. नाहीतर तू खार खाऊन राहशील!! खरतर शिव्या न देता तुला उत्तर द्यायचं म्हटलं तर हे कमेंट blank राहिली असती! पण असो.. भावनेला काबूत ठेवून प्रतिक्रिया देत आहे!

  चुकीच्या व्यक्तीबरोबर असा सिनेमा बघणं हे मुळात तुझी घोडचूक होती..पण ठीकेय. नाशिक ला असताना तू अशा (माझ्याबरोबर मुव्ही बघायच्या) चुका वारंवार केल्या होत्यास त्यामुळे माफ केलं!! :)
  आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर! अखिलेश (अर्थात अस्मादिक) खूप practicalच आहे.. कारण जेव्हा जेव्हा तो ती कक्षा ओलांडू पाहतो त्यावेळी त्याला तो तसा असल्याची जाणीव करून दिली जाते! राहता राहिला विषय पिक्चरचा.. तास अख्ख्या लेखात "प्रेम" हा शब्द मी एकदाच वापरला आहे. पिक्चर प्रेम या तरल भावनेवर आधारित आहे या वाक्याशी मी थोssडासा असहमत आहे.. पिक्चर मध्ये बरेच निरनिराळे पैलू आहेत असं मला वाटलं. तू जो चष्मा लावशील तसा तो तुला दिसेल.. तू "प्रेम " पाहिलंस ते तुला दिसलं.मी तिचा "practical approach" पाहिला,तो मला दिसला..
  आपलं काय मत?

  उत्तर द्याहटवा
 5. mast varnan..aani awadya goshta mhanje varnan karnyachi ek swatahchi mast mast shaili..
  bhari re mitra..:)

  उत्तर द्याहटवा
 6. मित्रवर्य अखिलेश (अर्थात अस्मादिक)
  मी पण तुझ्या ब्लॉग चा पाठलाग करणारा एक वाचकाच आहे.
  ब्लॉग चा विषय पहिले कुठल्या कोनातून पाहायचा त्यावर तुझ्या एकूण विषय मांडणीतून व्यक्त होणारा अभिप्राय समजेल
  १ कोन : समीक्षकाचा
  २ कोन :समीक्षा वाचून चित्रपट पाहायला जाणारे
  ३ कोन : केवळ मनाला आनंद मिळावा म्हणून चित्रपट पाहणारे आणि आपल्याला जो आनंद झाला आहे तसाच दुसऱ्याला झाला आहे त्यातही आनंद मानणारे .
  आणि माझे मत आहे ( माफ करा न मागता देत आहे ) कि तिसरा कोन हा सर्वात योग्य वाटतो
  बाकी ब्लॉग फार आवडला म्हणून buzz
  ला टाकला आहे
  तुझा एक वाचक
  अमित गावडे

  उत्तर द्याहटवा
 7. @rohan , @amit नुसत्या वाचक मित्रांपेक्षा, लिखाणावर प्रतिक्रिया देणारे वाचक लिहिण्याची प्रेरणा देतात..
  @sarita : ब्लॉगवर स्वागत..वरील विधान तुलाही लागू आहे बरं का!

  उत्तर द्याहटवा
 8. हा माझा अतिशय आवडता सिनेमा. कालच पहिला हा सिनेमा दुसर्यांदा. खर सांगायचं तर हा सिनेमा पाहिल्यानंतर कोणताच सिनेमा याच्या तोडीचा मला तरी वाटला नाही. बाकीच्या सिनेमा पेक्षा फारच वेगळा. सिनेमा पाहताना कुठे गुरफटत जातो हे कळतच नाही. असा तर मी सोलापूरचा आहे पण मला पुण्याविषयी फारच ओढ आहे. जेमतेम फ़क़्त दोनदाच आलेलो पुण्यात. जाम आवडला पुणे. तुमच्या लेख बद्दल लिहायचं झाल तर एकच म्हणेन Thank you Sooooooooooooooooo much for flash back once again.

  उत्तर द्याहटवा
 9. धन्यवाद निलेश .. ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. बाकीचं लिखाण नजरेखालून जाईल अशी अपेक्षा बाळगतो.

  उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!